Thursday, May 17, 2018

भट्टीचं रान, उन्हाळ्यातल्या मध्यावरचं

मागचा आठवडाभर पेपरात एकामागून एक बातम्या येतायत - आज इकडे सर्वोच्च तापमानाची नोंद झाली, उद्या तिकडे सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.  उन्हाळा ऐन रंगात आलाय.  उत्तर भारतात धुळीची वादळं होतायत.  अशातच विशालने एक ट्रेक ठेवला - भट्टीचं रान.  आमच्या सर्वांना हि वाट नवीन होती.  त्यामुळे हा ट्रेक फक्त निमंत्रितांसाठीच होता.  म्हणजे स्वछंद गिर्यारोहकांच्या संकेतस्थळावर हा ट्रेक विशालने टाकला नाही.  फार विचार न करता मी येतोय म्हणून विशालला सांगून टाकले.  अशा काही गोष्टी अनेक वर्ष धडपडल्यानंतर आता मला पूर्वीपेक्षा चांगल्या जमतात.  का, कुठे, कसं, कधी असे विविध प्रश्न डोक्यात घोळवत बसण्यापेक्षा साधा सोपा मार्ग पकडायचा.  हो म्हणून जे असेल ते संपवायचं.  डोक्याचा भाग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा.

रविवारच्या ट्रेक ला शनिवारी रात्री निघायचे होते.  सध्याचा उन्हाळ्याचा कडाका बघता शनिवारी दिवसभरात जमेल तेवढा आराम करणे आणि झोप घेणे गरजेचे होते.  पण कामाच्या पसाऱ्यात आराम आणि झोप दोन्ही झाले नाही.  एका कौटुंबिक कार्यक्रमानंतर रात्री सव्वाअकराला घरी पोहोचलो.  बदाबदा बॅग भरली.  मागच्या महिन्याभरात आंब्याच्या बाठा, जांभळांच्या, कलिंगडाच्या वगैरे बिया गोळा करून ठेवल्यायत त्या गडबडीत घ्यायला विसरलो.  बाराच्या आधी कोकणे चौकात पोहोचलो.  गाडी कोकणे चौकातून, म्हणजे माझ्या घराजवळून जाणार होती.  कित्ती भारी.

गाडीत बसल्यावर काही वेळ गप्पा, आणि मग जमेल तशी झोप.  आहुपे गावात आम्ही रात्री कधीतरी चारला वगैरे पोहोचणार होतो.  रात्रीच्या अंधारात रस्ते सापडणं मुश्किल.  विशालने मोबाइल मधला मॅप बघत ड्रायव्हरला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.  बसच्या दिव्यांच्या उजेडात तीन वेळा ससा दिसला. आहुपे गावात थांबल्यावर आमचा ड्रायव्हर सांगत होता कि त्याला पाच ससे आणि एक मुंगूस दिसलं.  विशाल ने एक पिशवी भरून साहित्य आणलं होतं आमच्या पहाटेच्या चहा पोह्यांसाठी.  भारी आयडिया.   तो आणि दिलीप गेले आहुपे गावातल्या मामांचं घर शोधायला.  बाकीचे सगळे एकतर राहिलेली झोप पूर्ण करत होते किंवा अंधारात जमेल तसे इकडे तिकडे हिंडत होते.

उजाडल्यावर आम्ही बस घेऊन मामांच्या घराजवळ गेलो.  चहा पोहे व्हायला वेळ लागतोय असं दिसल्यावर तोपर्यंत जवळच्या कड्याजवळ जाऊन यायचं ठरलं.  आहुपे गावाचं लोकेशन भन्नाट आहे.  शहरीपणा दूर दूर पर्यंत सापडत नाही आणि निसर्गाची उधळण मुक्तहस्ताने.  इथे मी मोबाईल फ्लाईट मोड वर टाकला तो संध्याकाळ पर्यंतसाठी.  आता दिवसभरात मोबाईलचा एकच उपयोग, फोटो काढायला.

असा सूर्योदय पहायला मिळणं हे आमचं भाग्य.  आहुपे गावातल्या रहिवाशांना वर्षभरात असे विविध रंगछटांचे सूर्योदय पहायला मिळत असतील
नारायणराव आणि त्यांच्या जोडीला शे दीडशे ढग आज रंगात आले होते.  खरोखरीच्या रंगात.  तासाभरात त्यांनी अनेक रंग अविष्कार दाखवले.

आहुपे गावापासून पाच मिनिटाच्या अंतरावर सह्याद्रीचे बुलंद बेलाग कडे.  दूरवर गोरखगड आणि मच्छिन्द्रगड.

स्वच्छंद गिर्यारोहक समीर अथणे
हा उत्कृष्ट फोटो टिपलाय प्रथमेशच्या कॅमेऱ्यातून

कड्यावर करवंद अनेक ठिकाणी.  सर्वांनी झाडावरून तोडून करवंद खाण्याचा आनंद लुटला.  गावात मामांच्या घरी परतेपर्यंत साडेसहा होऊन गेले होते.  अजून चहा पोहे बाकी होते.  म्हणजे आम्ही निर्धारित वेळेपेक्षा तासभर उशिरा ट्रेक सुरु करणार होतो.

अंगण झाडून एक चटई टाकण्यात आली.  मग एक मोठं पातेलंभर पोहे आले.  कितीही खाल्ले तरी आम्हा सोळा जणांमधे हे संपणार नव्हते.  शहरीपणाचा फारसा संबंध न आल्यामुळे अहुपे गावचे गावकरी हे असे साधे शिंपल.  स्वतःच्या आणि भेटलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण पैशात मोजायची खाज शहरी माणसांनाच असते.

अनुप सरांच्या कॅमेऱ्यातून  ...  पोहे तयार आहेत

लवकर आटपा वगैरे आज कोणीच कोणाला घाई करत नव्हते.  आमच्यात नवे नवखे कोणीच नव्हते.  त्यामुळे ट्रेक वेळेत आटोपण्यासाठी मेंढरं हाकण्याची आज गरज नव्हती.

गावातल्या घरांसमोर कसलीतरी फळं वाळायला घातलेली.  चौकशी केल्यावर कळले कि हि फळं औषधी आहेत.  ह्यांना चांगला भाव येतो.  एक मामा म्हणाले किलोला शंभर रुपये.  दुसरे म्हणाले किलोला दोनशे रुपये.  तिसरे म्हणाले किलोला चारशे रुपये.  ह्यांचं काय करतात, कसलं औषध बनवतात विचारलं तर कोणालाच माहिती नाही.  फक्त फळं गोळा करायची, वाळवायची, आणि विकायची.  मिळेल तो भाव घ्यायचा.

वाळवलेली औषधी फळं - हिरडा
आयुर्वेदात अतिशय गुणकारी म्हणून सांगितलेला हिरडा इथे सगळ्या घरांसमोर ढिगाने गोळा केलेला.

एक वाटाड्या आम्हाला अर्ध्यापर्यंत रस्ता दाखवणार होता.  नंतर आम्ही स्वतः वाट शोधणार होतो.  त्याच्या बरोबर गावाबाहेर पडलो तेव्हा घड्याळाचे काटे साडेसातच्या पुढे पोहोचलेले.  गावाबाहेर पडल्यावर एक सावली असलेली मोकळी जागा बघून सर्वांची तोंडओळख झाली.  सगळ्यात पुढे वाटाड्या आणि विशाल, मागे शेपटाला दिलीप सर, आणि मधे बाकीचे चौदा अशी आमची पलटण निघाली.  सकाळच्या वेळी रानात साथीला विविध पक्ष्यांचे आवाज.

गावापासून अर्धा तास चाललो असू.  आमच्या वाटाड्याने वाटेवरच्या धुळीत उमटलेले बिबट्याच्या पायाचे ठसे दाखवले.  त्याच्या म्हणण्याप्रमाणे ठसे ताजे होते.  काही वेळेपूर्वीच बिबट्या इथून गेला होता.

भट्टीच्या रानात दिसलेला बिबट्याच्या पायाचा ठसा
आमच्या वाटाड्याला आमच्याबरोबर फार लांब यायचं नव्हतं.  दिवसभरात मिळतील तेवढी हिरड्याची फळं गोळा करण्यासाठी त्याला जास्त वेळ हवा होता.

तासाभराने आमची पलटण पोहोचली डोंगरकड्यावरच्या येतोबाला.

श्रुती मॅम च्या कॅमेऱ्यातून  ...  डोंगरकड्यावरचा येतोबा
इथून लांबवर सिद्धगड दिसत होता.  एका छोट्या ब्रेक नंतर येतोबाचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो.

येतोबा देवळासमोरून पाहिलेला सिद्धगड
डावीकडे दमदम्या
येतोबा पासुन सुमारे तासभर डोंगरकड्याच्या बाजूने वाटचाल.  इथून दमदम्या डोंगर समोर दिसत होता.

दमदम्या
मध्ययुगीन काळात एखाद्या डोंगरी किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी डोंगराजवळ खूप मोठ्या उंचीचे लाकडी मचाण उभारत, ज्याला दमदमा म्हणायचे.  सिद्धगडावर तोफांचा मारा करण्यासाठी हा उपयुक्त डोंगर असावा.  त्यामुळे ह्याला दमदम्या म्हणत असावेत.

डोंगराच्या कड्यावर पोहोचल्यानंतर उतरायची वाट शोधावी लागली.

एक अवघड टप्पा  ...  सुरेश सरांच्या कॅमेऱ्यातून

आता आम्ही आमच्या वाटाड्याचा निरोप घेतला.  इथून पुढे आम्हाला वाट शोधत जायचं होतं कोंढवळ गावात.  सकाळपासून विशाल मोबाईल मधल्या नकाशात आमची वाटचाल बघत होताच.

समीर सरांच्या कॅमेऱ्यातून  ...  सुकलेल्या झाडोऱ्यातून वाट शोधत जाताना
सुकलेल्या  झाडोऱ्यातून वाट काढत जाताना पाय घसरत होते.  जमिनीवर पसरलेल्या सुकलेल्या पानांच्या थरामुळे पायाला पकड मिळत नव्हती.

गर्द रानाचा टप्पा आला कि सोबतीला मोठ्या माश्या.  सुरेश भाग्यवंतांना दिवसभरात पाच वेळा चावा मिळाला.

गर्द रानातून चाललेली वाट
भट्टीच्या रानात सावली हवीहवीशी वाटत होती.

डोक्यावर सदाहरित वृक्षाचं छत्र आणि पायाखाली सुकलेल्या पानांचा सडा
एका घसरड्या पॅच ला मी लीड घेऊन वाट शोधून काढली.

आता गर्द झाडी जाऊन मोकळं रान सुरु झालं.  उन्हाचा तडाखा वाढत चालला.  सकाळच्या सत्रातला ट्रेकचा पहिला टप्पा मजेदार होता.  आता दुपारचा दुसरा टप्पा म्हणजे प्रत्येकाची उन्हाळी परीक्षा होती.

समोरून गावातली आठ दहा पोरं येताना दिसली.  त्यांना आमच्याकडचा खाऊ दिला.  कोंढवळ गावची वाट विचारून घेतली.

गावातल्या पोरांना खाऊ वाटप

गावच्या पोरांनी सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी कच्च्या रस्त्याला येऊन मिळालो.  हा रस्ता आम्हाला कोंढवळ गावात नेणार होता.  सकाळपासुन उन्हात चालण्याने आणि भुकेने आता सर्वच जण थकलेले.  गावात पोहोचल्यावर जेवण करायचं ठरवलं.  गोखले सर वेगात पुढे गेले.  गाव काही येता येईना.  उन्हाने घसा कोरडा पडला, जीव कासावीस झाला वगैरे वाक्प्रचार आजपर्यंत फक्त लिहिले वाचले होते.  हे सगळं नक्की काय ते आज अनुभवायला मिळालं.

एका सावलीच्या जागी छोटा ब्रेक घेतला.  कोणीतरी खाऊ बाहेर काढला.  एक एक करत सगळेच खाद्य पदार्थ बाहेर पडले.

वनभोजन
वनभोजन आटपून कोंढवळ गावाकडे निघालो.  साडेबाराच्या सुमारास नारायणराव दिसेल त्याला तापवत होते.  आज झिरो शॅडो डे होता.

श्रुती मॅम ने टिपलेला शून्य सावली क्षण

आम्ही वनभोजनाला थांबलो होतो तिथून गाव जवळच होतं.  पण ह्या घडीला थोड्या अंतरासाठीही दमछाक होत होती.  इथे रस्त्याकडेला करवंद सापडत होती.  बाकी भट्टीच्या रानात करवंद कुठेच नाहीत.  एक विहीर दिसल्यावर तिथे थांबणं भागच होतं.  विहिरीतून पाणी काढून हात पाय धुतले.  मी डोक्यावर पण पाणी ओतून घेतलं.  विहिरीचं पाणी पिण्यासारखं नव्हतं.  पण गावात हे पाणी कदाचित पीतही असावेत.

कोंढवळ गावातली विहीर

कोंढवळ गावात आज लगीनघाई होती.  मंडप नाही, पैशाची उधळपट्टी नाही.  गावातल्या असेल त्या infrastructure मधेच लग्न चालू होतं.  एक बँडबाजाची गाडी गावात थांबवलेली.  एक माणूस लाऊडस्पीकर वर बडबड करत होता.  त्याच्या तोंडातल्या तोंडात बोलण्यामुळे आमच्यात काही हास्यफवारे उडाले.  त्याचे तटकरे हे शेतकरी वाटत होते.  मानपान हा अपमान वाटत होता.

इथल्या हातपंपावर आम्ही सगळ्यांनी पाणी पिऊन घेतले.  भरून घेतले.

छपराची सावली असलेल्या एका मोकळ्या जागेत सर्वजण विसावलो.  एक एक करत विकेट पडत होत्या.  भोरगिरी गावात आमचा ड्रायवर आमच्यासाठी थांबणार होता.  भोरगिरी गावात मोबाईल नेटवर्क कमकुवत असल्यामुळे ड्रायव्हरशी संपर्क होऊ शकत नव्हता.  म्हणजे आम्हालाच संध्याकाळपर्यंत भोरगिरी गावात जायचे होते.

इथून भोरगिरी पर्यंत ट्रेक कसा पूर्ण करायचा त्याच्याबद्दल निर्णय घ्यायची वेळ होती हि.  कोंढवळ ते भिमाशंकर हा पहिला टप्पा भाजक्या उन्हामुळे अवघड होता.  भिमाशंकर ते भोरगिरी हा दुसरा टप्पा उन्ह उतरल्यावरचा आणि जंगलातल्या सावलीमुळे सोपा होता.  इथे आमच्याकडे तीन पर्याय होते. 
पर्याय पहिला : ट्रेक मार्गाने चालत भिमाशंकर आणि तिथून पुढे चालत भोरगिरी गावात जायचे.
पर्याय दुसरा : गाडीरस्त्याने चालत भिमाशंकर आणि तिथून पुढे चालत भोरगिरी गावात जायचे.
पर्याय तिसरा : गाडी करून भिमाशंकर आणि तिथून पुढे चालत भोरगिरी गावात जायचे.

पहिले दोन्ही पर्याय अवघड होते.  आधीच जीव अर्धमेला असताना दुपारच्या भाजक्या उन्हात इथून चालत भिमाशंकर गाठणे टोळीतल्या बहुतेकांना जड जाणार होते.  आणि तिथून पुढे भोरगिरीला वेळेत पोहोचायचे होते.  परिस्थितीचा विचार करता सर्वानुमते तिसरा पर्याय निवडण्यात आला.

सर्वजण थकून आराम करत असताना विशाल मात्र जीपवाला ठरवण्यासाठी खटपट करत होता.  प्रत्येक ट्रेक मधे नेहमी सर्वांना बरोबर घेऊन जाणार.  अवघड प्रसंगातही हसत खेळत रहाणार.  वयाने लहान असला तरी विशाल फार उत्तम लीडर आहे.  आणि ह्याला सह्याद्रीतले सगळे रस्ते तोंडपाठ.  जे रस्ते तोंडपाठ नाहीत तिथेही न चुकता वाट काढण्याची कला ह्याला अवगत.  ह्याची सगळ्या गावांमधून ओळख.  प्रत्येक ट्रेकचं खर्चाचं गणित, वेळेचं गणित न चुकता सांभाळणार.  असा गिर्यारोहक मित्र मिळणं म्हणजे नशीबच लागतं.

आता आम्हाला इथून उठा अशी विनंती करण्यात आली.  साडेतीन च्या मुहूर्तावर ह्याच मोकळ्या जागेत लग्न लागणार होतं.  त्यासाठी हि जागा झाडून घ्यायची होती.  समोरच्या घराच्या पडवीत आमचा डेरा पडला.  एक एक करत परत दनादन विकेट गेल्या.  अख्खा संघ पंधरा मिनिटात आऊट.

दिलीप सरांना गवसलेलं झोपाळू दृश्य
जीप आल्यावर आम्ही सोळा जण आणि ड्रायव्हर पकडून सतरा एका जीप मधे कसे बसणार असा प्रश्न होता.  ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वर तीन, मधल्या सीट वर चार, आणि मागे सहा बसले.  उरलेले तीन टपावर गेले.

विनयने टिपलेला एक दुर्मिळ फोटो

भिमाशंकर जवळ आल्यावर जीपवाला म्हणाला आता टपावरच्यांना खाली यावं लागेल.  आज रविवार असल्याने इथे पोलीस असतात.  मग टपावरच्या तिघांपैकी दोघे मधल्या सीट वर आणि एक ड्रायव्हरच्या बाजूला अवतरला.

भिमाशंकर मंदिराजवळ जीप मधून उतरलो.  मंदिराच्या मार्गाने निघालो.  देवदर्शन करण्याचा कोणाचा उद्देश नव्हताच.  एका हॉटेलात जेवणाचा कार्यक्रम केला.  मी जेवणाला सुट्टी देऊन त्याऐवजी चार लिंबू सोडा प्यायलो आणि दोन मँगो आईस्क्रीम खाल्ले.  पहिला लिंबू सोडा पिल्यावरच जीवाला तरतरी आली.

भिमाशंकर देऊळ
आता फक्त भिमाशंकर ते भोरगिरी हा शेवटचा टप्पा शिल्लक होता.  अडीज तासांचा अंदाज होता.  पावणे चार झाले होते.  म्हणजे आम्ही अंधार पडायच्या आत भोरगिरीला पोहोचत होतो.  भिमाशंकर मंदिराच्या मागच्या बाजूने निघालो.  परिसरातला अखंड कचरा बघून आपल्याच जनतेचं वाईट वाटलं.  श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे गोष्टी राहुद्या बाजुला. परिसर स्वच्छ ठेवता येण्याची अक्कल नसेल तर काय होणार आहे ह्या जनतेचं.  आज किती जणांना समजतंय कि पर्यावरणाचं नुकसान करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत.  उद्या प्यायला पाणी आणि खायला अन्न मिळायची वानवा झाली तर कसला देव आणि कसलं भिमाशंकर.

गुप्त भिमाशंकरला नमस्कार करून आम्ही भोरगिरी गावची वाट पकडली.  गोखले सर आधीच पुढे गेले होते.  साधारण दीड तास गर्द झाडीने भरलेला डोंगर उतार.  बऱ्याच ठिकाणी झाडांवर छोटे फलक लावलेले, ज्यांच्यावर गुप्त भीमाशंकर लिहिलेले आणि दिशादर्शक बाण.  म्हणजे हा एक लोकप्रिय ट्रेक रूट आहे तर.  त्यामुळे ट्रेक रूट ला कचरा पण आहे.  आजकाल कचरा करू नका असे फलक जंगलातून पण लावायची वेळ आलीये.

माझ्याकडच्या रिकाम्या कॅरी बॅग मधे चालता चालता मी कचरा गोळा केला.  सध्या ह्याला प्लॉगिंग असे नाव देण्यात आलंय.  दादानु, ह्यो तुमि काय सुरु केल्यात ना, ट्रेक मंदी आम्ही पंधरा वर्स करतोय.

ट्रेक ला जायच्या आधी मी विशाल ला दोन तीन वेळा विचारलं होतं कि सगळे रेग्युलर ट्रेकर आहेत ना, कोणी नवीन नाही ना ज्यांना दिवसभर इतरांनी वाहून न्यावं लागतं.  आता थकव्याने मीच गळून गेलो होतो. जमेल तिथे बसून घेत होतो.

कधीकधी सूर्यास्त मला भकास, उजाड, एकाकी वाटतो.  इथे क्षितिजावर एकच निष्पर्ण झाड आणि बरोबर अस्ताला जाणारा सूर्य.  मनातील विचार समोर दृष्टीस पडलेले.

सूर्य झाडामागे घेऊन फोटो काढण्याऐवजी झाड आणि सूर्य शेजारी शेजारी ठेऊन फोटो घेण्याचा प्रयत्न
आता मार्ग सोपा असला तरी थकव्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात प्रत्येकावर जाणवत होता.

लीड ला असणाऱ्यांना एका ठिकाणी दूरवर बिबट्या दिसला.  कॅमेऱ्यात झूम करून बघितल्यावर लक्षात आले त्या एका सुपारीसारख्या झाडाच्या पिवळ्या फांद्या होत्या.  पण त्या अर्ध्या मिनिटासाठी वातावरण बदलले होते.

ट्रेक संपता संपता फर्स्ट एड किट बाहेर काढावे लागले.  थकव्याने साध्या सोप्या ठिकाणीही घात होऊ शकतो.  श्रुती मॅम ची जिद्द आणि ट्रेकची क्षमता दाद देण्यासारखी आहे.  घाबरण्याची चिन्हं तर सोडाच, त्या शेवटपर्यंत लीड ला राहिल्या.

ट्रेक चा शेवटचा टप्पा  ...  समीर सरांच्या कॅमेऱ्यातून

इथे बघतो तर भोरगिरी पासुन भिमाशंकर पर्यंत गाडीरस्ता बनवण्याचं काम चालू आहे.  म्हणजे हे हि जंगल मनुष्यप्राणी गिळंकृत करणार तर.

भोरगिरी गावात उतरायचा एक शॉर्टकट विशालला माहिती होता.  असेच ट्रेकिंग चालू ठेवले तर काही वर्षात विशाल सह्याद्रीतला चालता बोलता गुगल मॅप बनेल.

भोरगिरी गावात पोहोचल्यावर समोरून भोरगिरी किल्ला बोलावत होता.  आम्ही दुरूनच सांगितले, आज आपला योग नाही.  परत केव्हातरी भेटू.  गावातल्या देवळाशेजारी गाडी लावून राजू आमची वाट बघत थांबला होता.  गोखले सर आमच्या पस्तीस मिनिटं आधी इथे पोहोचले होते.

गाडीत मला कधी झोप लागली ते समजलेच नाही.  साडेदहाला कोकणे चौकात उतरून दोन मिनिटात घरी पोहोचलो.

मी स्वछंद गिर्यारोहकांबरोबर केलेला एकही ट्रेक बेचव निरस झाला नाहीये.  एकूण एक ट्रेक आठवणीत राहतील असे झालेत.  शून्य सावलीच्या दिवशी भाजक्या उन्हात केलेला हा ट्रेकही अविस्मरणीय झाला.

1 comment:

  1. Ek number.. Word to word.. Tya diwshi cha pratek kshan athawat aahe.. Jaam maja aali hoti. Bhar unhat trek la nighalo mhanun bolni pan khalli hoti.. But summit nantr tya saglya ch vichar mage padla hota.. Parat mansoon made jau sagle apan.. Teva pan ashi ch dhamal karu

    ReplyDelete