Showing posts with label hiking. Show all posts
Showing posts with label hiking. Show all posts

Saturday, March 9, 2019

संदीप खरे यांची माफी मागून ...
आता पुन्हा एकदा कडक उन्हाळा सुरु होणार.  विशाल पुन्हा एकदा दिवसभराचा ट्रेक ठेवणार.
बाहेर नारायणराव दिसेल त्याला चटके देत असले तरी ट्रेक ला जायची आमची खाज काही नाही संपणार.
सकाळच्या उत्साही वातावरणानंतर दुपार जसजशी चढत जाणार तसतसा उन्हाचा तडाखा चढत्या क्रमाने वाढत जाणार.
कितीही पाणी बरोबर नेलं तरी ते शेवटी कमीच पडणार.
बरोबरचे सगळे दमून ढेपाळले तरी विशालची एनर्जी लेव्हल सकाळसारखीच राहाणार.
दुपारची उन्हाळी परीक्षा आटोपल्यावर थकवा आणि dehydration घेऊन संध्याकाळ येणार.
"हे पण करू आणि जमलं तर ते पण करू" असले आधी बनवलेले प्लॅन मग गुंडाळले जाणार.
चार नवीन सह्यमित्र भेटणार. एक नवीन ट्रेक route बघून होणार. तळपत्या उन्हाळ्यातला दिवसभराचा ट्रेक आपण ह्यावर्षीही खिशात घालणार. आणि ह्या समाधानावर काही दिवस जातायत तोच पावसाळ्या पूर्वीचा मौसम चुकवू नये म्हणून आपण पुढच्या ट्रेकची वाट बघणार.
-- योगेश सावंत

Friday, January 11, 2019

रामशेज

गडकोटविरहित जें राज्य त्या राज्याची स्थिति म्हणजे अभ्रपटलन्याय आहे.  याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणीं गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचें बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, असें पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्याचें संरक्षण करणें; व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतांच करावा, कोणाचा विश्वास मानू नये.

 

माझ्या राज्याने सांगितलेलं हे समदं म्या झोपेतबी विसरणार न्हाय.

रमजान महिन्याच्या ५ तारखेस अजमेर येथून फतहचे कलम पढून औरंगजेब निघालाय बुऱ्हाणपूरच्या दिशेने.  दक्षिणेच्या मोहिमेवर.  सोबत प्रचंड मोठी फौज.  स्वराज्य, कुतुबशाही, आदिलशाही, असं अवघं दख्खन काबीज करायचंय त्याला.  स्वराज्यावर एक महाप्रलय चालून येतोय.

खबर आलीय कि औरंगजेबाने पहिला गड रामशेज निवडलाय.  ४५ वर्षापूर्वी त्याच्या बापाने, म्हणजे शहाजहानने दक्षिणेत स्वारी केली होती आणि त्यावेळी त्याने पहिला गड काबीज केला होता रामशेज.  त्यामागोमाग बरेच किल्ले पटापट ताब्यात घेतले होते.  म्हणून ह्याने देखील सुरुवात करायला रामशेज निवडलाय.  राजं, महादेवाची शपत.  हा रामशेज काय म्या पडू देत नाय.  वेताळ येउदे नाहीतर भुतं येउदे.  तयार हाय आम्ही.  साडेपाचशे शिबंदी हाय हितं रामशेज वर.

किल्ला उंचीने इतका छोटा आहे कि खालच्या वस्तीतले आवाज गडावर ऐकू येतात

रामशेज जिंकून घ्यायला औरंगजेबाने कासीमखान निवडलाय.  बारा हजार फौज येतेय इकडे.  एका झटक्यात किल्ला सर करू म्हणतायत.  खबऱ्यांनी त्यांचं काम उत्तम केलं तर.

कासीमखान आला फौजेनिशी गडाच्या पायथ्याला.  आणि तोफेचे गोळे मारतोय.  पुढचा दिवसभर वाट बघतोय किल्लेदार घाबरून शरण यायची.

 

आता गडाला वेढा घालायला बघतायत.  रातच्याला छापा घातला.  माझ्या मावळ्यांनी जो काय हल्ला केलाय.  एकबी हशम सोडला न्हाय.  ह्यावर कासिमखानाने औरंगजेबाला पत्र लिहून पाठवलं. 

पूर्वी तोफांच्या माऱ्याने रामसेजच्या किल्ल्यातील बुरुजाची भिंत पडली होती.  म्हणून त्या वाटेने माझ्या माणसांनी वर बाण फेकून किल्ल्यात जावे, असे मी ठरवले.  तारीख २७ शाबानला रात्रीच्या वेळी पाच सहाशे मेवाती व माझे लोक यांना किल्ल्यात जाण्यासाठी तयार करून मी हल्ला केला.  शेवटी खंजरखानाच्या भाऊबंदापैकी काही व माझे लोक किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचून मोठ्याने ओरडले कि, "बेलदारांनी यावे".  त्या आवाजाने गनिमाचे लोक जागे होऊन त्यांनी दगड व बंदुकी यांचा एकच मारा केला.  बहुतेक सर्व बादशाही लोक कामास आले व जखमी झाले.  काही प्रगती झालेली नाही.  सध्या हे काम हातचे गेले, असे बादशाही लोक बोलतात.  परंतु मला ते मान्य नाही.  माझ्याबाबत जो हुकूम होईल, त्याप्रमाणे मी करेन. 

बरोबरच्या सगळ्यांना वेढ्यात सोडून, वेढ्याची सूत्रे शहाबुद्दीनखानाकडे सोपवून, हुजुरास हजर व्हावे, असा कासीमखानास औरंगजेबाचा हुकूम आला.  औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे कासीमखान वेढा सोडून औरंगाबादला निघून गेला.  वेढ्याचा सूत्रधार आता शहाबुद्दीनखान.  असेल कोण त्याच्या प्रदेशात.

शहाबुद्दीनखान काय कस्त करतोय.  गडाचा वेढा सैल सुटला कि ह्यो हजर.  सुरुंग लाववतोय.  मोर्चे बांधतोय.  दमदमे तयार करवून त्यावरून तोफांचे हल्ले करवतोय.

 

हत्ती घोडे उंट तोफा आज इथे आमच्याकडे न्हायत.  त्या समद्याला पुरून उरण्याची ताकद हाय आमच्या मनगटात.  अन ताकदीला युक्तीची जोड कशी द्यायाची ते आमच्या राजाने आम्हासनी शिकवलंय.  लोखंडी तोफा न्हायत तर काय.  घ्या रे हि सगळी लाकडं अन कातडी. अन बनवा ह्यांच्या तोफा.  दगड धोंडे हवे तेवढे हायत आपल्याकडे.  दिसला गनीम कि द्या दणके.  आमची हि येक येक तोफ धा लोखंडी तोफांच्या बरोबरीची हाय.  खर्च किती आन आजपतुर गनीम मारलेत किती त्याचा विचार करून बघा.  मग समजेल.

 

शहाबुद्दीनखानाने एल्गार करून हल्ला चढवला.  मावळ्यांनी निग्रह केला.  बराच मोगल धुळीस मिळवला.  दतियाचा राव दलपत बुंदेला दगडाच्या माऱ्याने जखमी झाला.

रामशेज किल्ल्यावरून टेहळणी

खबर हाय कि संभाजी राजानं रुपाजी भोसले आन मानाजी मोरे सहा हजार सैन्य घेऊन पाठवलेत.  टोपीकरांच्या कालगणनेनुसार १६६२ साल आन मे महिना हाय हा.  खबरांमागून खबरा येतायत.  शहाबुद्दीन आडवा आला त्यांना तिकडं गणेश गावाजवळ.  तुंबळ युद्ध झालं.  मोगल माघार घेऊन पळाले.  मोगलांचे पाचशे घोडे घावले आपल्या सैन्याला.  ह्या खबरा ऐकून हिकडं आमच्या मावळ्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय.  आन तिकडं औरंगजेब संतापलाय.  अजून करतो काय गड्या.

हितं रोज लहान मोठा मऱ्हाटी हिसका खातोय शहाबुद्दीनखान.

डोंगरचा उंदीर काय.  आरं हे डोंगरचे उंदीरच उद्या संपवतील बघा औरंगजेबाला.  इराणच्या बादशहाने सांगावा धाडलाय ना, हे कसले आलमगीर.  दिल्लीत बसून वाटतं आम्ही जगाचे मालक.  दख्खन काबीज करायला आलेला तुमचा आलमगीर हितं मऱ्हाठ्यांच्या राज्यातच हाय खाऊन जाईल बघा.

चोर दरवाजा

रामशेज घेण्याचे हजारभर प्रयत्न करून झाले बघा ह्या शहाबुद्दीनखानाचे.  श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हि.  आम्ही मोगलाच्या हातात लागू देत न्हाय. 

हताश झालेल्या औरंगजेबानं पत्र धाडलंय शहाबुद्दीनखानाला.  म्हणतो,

शिहाबुद्दिनखानास हसबुलहुकुम लिहावा, कि तू रामसेजचा किल्ला घेण्याबाबत खूप कष्ट घेतलेस.  स्वताःचा जीव गमावण्यास देखील मागे पुढे पाहिले नाहीस.  सध्या तो किल्ला खानजहान बहादूरच्या अधिकाराखाली दिला आहे.  तेव्हा तो रामसेज बादशाही अमलाखाली आणील.  खानजहान बहादूरजवळ तोफखाना सोडून तू स्वतः आपल्या जमेतीसह अंतूरचा ठाणेदार अहमद या जवळ पोहोचावे.

हा निघाला शहाबुद्दीनखान, आणि आता इथे पोहोचलाय बहादूरखान.  आरं हा कसला बहादूर.  राजांनी ठरवून झोडपलेलं "पेंडीचं गुरु" हे.  "बहादूरखान कोकलताश" तिकडं दिल्लीत.  हितं आमच्या सह्याद्रीत हे "पेंडीचं गुरु" कसं झोडपायचं ठाव हाय आम्हासनी.

 

आरं हि काय गडबड हाय ह्या बाजूला.  तोफा काय.  दारुगोळा काय.  तोफची किती आन बाजारबुणगे किती.  हे नवीनच चाललंय बघा.  निसता गोंधळ.  दुसरीकडच्या बाजूनी ह्यांचा डाव असणार.  हितं गोंधळ घालतील आन पलीकडनं चढून येतील.  हितं नगारे नौबती कर्णे घेऊन एकच गलका करू.  आन बाजारबुणग्यांना धोपटायला दगड धोंडे लोटून देऊ.  साथीला तेलात बुडवले कपडे पेटवून वाऱ्याबरोबर सोडून देऊ ह्या बुणग्यांच्या मागनं.

हि खबर लागली बघा.  तिकडं पलीकडं बाजारबुणग्यांच्या गोंधळ.  आन हिकडनं मोगल चढून वर येणार तर.  बिनबोभाट.  म्या हिकडं हत्यारबंद शूर शिपाई दबा धरून बसवले.  सदा मुस्तेद.  मोगलांची वाट बघत.  मोगल आल्यावर त्यांच्यावर जो काय वार चालवलाय.  डोचकी फुटून समदे खाली फेकले.

 

कस्त करून करून खानजहान बहादूरखान जेर जाहला.  असे महिन्यांमागून महिने जातायत.  समदी शिबंदी बिलाकसूर गड लढवतेय.

किल्ला चढून जायला पंधरा मिनिटं पुरतात

आज परत एकदा मोगली एल्गार.  आन ह्यो काय नवा.  कोण रे तो पुढे येतोय.  हातात काय त्याच्या.  टप्प्यात आल्यावर गोफणीतून दगडफेक सुरु.  ह्यो बघा गोफणेचा गोळा बसला त्याच्या छाताडावर.  आन कोसळला त्यो खाली.  समदी परत निघाली बघा.  मग जासूद समदी बातमी घेऊन आला.  किल्ला घ्यायला बहादूरखान कायबी करायला राजी व्हता.  मोगलांनी त्याच्याकडे मोतदार आणला होता.  तो खानाला म्हणाला, "भुते वंश करण्यात मी पटाईत आहे.  मला एक शंभर तोळे सोन्याचा साप बनवून द्या.  तो मी मंतरून हाती घेईन.  सुलतानढवा करून मला सगळ्यात पुढे ठेवा.  मोगल सैन्याला मी भुतांच्या मदतीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेईन".  असा तो मोतदार त्या दिवशी पुढं आला व्हता.

 

आज वेढ्यात लगबग दिसतेय.  आता कसला नवा मोगली डाव.  हा बातमीदार आला, औरंगजेबाने बहादूरखानाला हुकूम फर्मावलाय कि, परत निघून ये.  अन ह्यो जाळ कसला.  मोगलांनी त्यांचाच लाकडी बुरुज जाळला कि रं.  वाजवा रे नगारे चौघडे तटावर.  वेढा उठला.  मोगल गेले.  राजं, पाच पावसाळे सरले बघा आतापतूर.  आन ह्यो मोगल थांबला असता तर पाच काय, अजून पन्नास वर्स गड झुंजवत ठेवला असता म्या.  महादेवाची शपत.  नशीब लागतंय स्वराज्यात जल्म घ्यायाला.

 

एकः शतं योधयति प्राकारस्तो धनुर्धरः |
शतं दशसहस्त्राणि तस्माद दुर्गम विधीयते ||


दुर्गाच्या आश्रयाने लढणारा एक एक योध्दा बाहेरील शंभर मनुष्यांशी युद्ध करू शकतो, तसेच दुर्गाच्या आश्रयाने शंभर योद्धे बाहेरील दहा हजार मनुष्यांशी लढू शकतात.

Tuesday, December 25, 2018

K2S - कशासाठी

Only those who will risk going too far can possibly find out how far one can go.  -- T.S. Eliot

जर तुम्ही पुण्यनगरीत रहात असाल आणि असं काही करायची हुक्की आली तर जवळच एक उत्तम जागा आहे.  जागा नव्हे एक प्रयोगशाळा म्हणा.  स्वतःला ओळखण्याची.  स्वतःच्या क्षमता जाणून घेण्याची.  तमाम ट्रेकर मंडळींमधे हि प्रयोगशाळा K2S म्हणून प्रसिद्ध आहे.  कात्रज ते सिंहगड.  के टु एस.  जुन्या मुंबई बंगलोर रस्त्यातल्या बोगद्यापासून चालत जायचं सिंहगडापर्यंत.  अंतर मोजलं तर साधारण १३ किलोमीटर.  ह्यात सपाट भाग कुठेच नाही.  १६ टेकड्या चढायच्या आणि उतरायच्या.  एकामागोमाग एक.  एकदा चालायला सुरुवात केली कि हा प्रयोग संपवावाच लागतो.  मधे कुठे सोडून देऊ शकत नाही.  तसा पर्यायच उपलब्ध नाही.  एकदा सुरुवात केली कि प्रयोग संपवूनच सोडायचा.

मागच्या वर्षी मी केलेला हा प्रयोग जरा अवघड गेला होता.  शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोन तास फुटबॉल खेळलो.  पूर्ण दिवस छोट्या मोठ्या कामांमधे गेला.  दिवसा झोप न घेता तसाच थकलेल्या अवस्थेत रात्री K2S चा प्रयोग केला.  हात पाय गळाले नव्हते पण निद्रादेवी क्रोधीत झाली.  ते प्रकरण इथे वाचा.

ह्यावेळी शनिवार सकाळचं फुटबॉल सोडून दिलं.  दुपारी अर्धा तास झोपायचा प्रयत्न केला.  दिवसा जमेल तेवढा आराम करायचा प्रयत्न केला.  असा K2S साठी संध्याकाळी तयार होतो.  साडेसात वाजता विशालचा फोन आला, त्याने ग्रुप घेऊन स्वारगेट सोडलंय.  आणि मी अजून घरीच होतो.  बापरे.  मग बदाबद बॅग भरली आणि निघालो.  पिंपळे सौदागर ते स्वारगेट रिक्षा प्रवास हा एक वेगळा विषय ठरला.  मीटर भाड्याने रिक्षा मला वर्ज्य आहे.  तरी वेळेला करावी लागली.  बुद्धिबळाच्या पटावरचा जसा घोडा, तशी पुण्याच्या रस्त्यांवर रिक्षा.  बुद्धिबळाच्या पटावर सगळ्यात आगळा वेगळा कोण असेल तर घोडा.  भयंकर अनाकलनीय चाल.  प्रचंड अनपेक्षित मार्गक्रमण.  सगळ्या सुखद सुरळीत चाललेल्या राज्यात नेमक्या वेळी येऊन कडमडणार आणि सगळा डाव पलटवणार.  नाहीतर नेमक्या ठिकाणी उभा रहाणार आणि प्रतिस्पर्ध्याच्या नाकात दम आणणार.  हल्ला करायला लागला कि समोरच्याला पळता भुई थोडी.  आणि दोन घोडे एकत्र आले तर मग विचारूच नका.  तर अशा ह्या रिक्षाने तिच्या अगम्य अतर्क्य चालीने वाटेतला पटाचा जमेल तेवढा भाग उधळत मला इच्छित स्थळी वेळेत नेऊन पोहोचवले.

एक एक करत १४ स्वछंद गिर्यारोहक जमा झालो.  साडेनऊला बस आल्यावर बस मधे चढलो.  बस पूर्ण भरलेली.  बरेचसे K2S साठीचे ट्रेकर्स.  काही पुण्यातून आपापल्या गावी परतणारे गावकरी.  कात्रज घाट चढून गेल्यावर जो बोगदा आहे, त्याच्या नंतर लागेचच K2S ट्रेकची सुरुवात आहे.  इथे बस बरीचशी रिकामी झाली.  एक मोठा ग्रुप खाजगी बस मधून आला होता.  त्यांच्यातल्या एकाने स्टिरीओ सिस्टिम वर मोठ्या आवाजात गाणी लावलेली.  आत्ता उडतोय.  रात्रीत K2S ह्याचा जीव काढेल.  तो मोठा ग्रुप आणि पंधरा राही ट्रेकर्स पुढे गेल्यावर आम्ही त्यानंतर K2S च्या वाटेने सुरुवात केली.  थोडं पुढे गेल्यावर एका मोकळ्या ठिकाणी आम्ही १४ जणांनी तोंडओळख करून घेतली.  देवळाजवळ न जाता K2S च्या वाटेने पुढे निघालो.  अमोल सगळ्यात पुढे, भाग्येश सगळ्यात शेवटी, आणि ह्या दोघांमधे बाकीचे सगळे.  हे फॉर्मेशन तुटू द्यायचे नाही.  काहीही झाले तरी स्वछंद गिर्यारोहक कधीच कोणाला सोडून जात नाहीत.

काही वेळापूर्वी विशाल आणि ग्रुप देवळापासून पुढे गेले होते.

पुणे आणि सभोवतालचा परिसर  ...  K2S ट्रेक मधे पाहिलेला

मुंबई बंगलोर नव्या रस्त्याला जो बोगदा आहे त्या डोंगरावरून K2S ची वाट जाते.  पुणे आणि सभोवतालचा बराच मोठा परिसर इथून दिसतो.

पहिल्या दोन टेकड्या मोठ्या आहेत.  ह्या दोन मधेच चित्र बरंचसं स्पष्ट होतं. आज ट्रेकला किती वेळ लागणार ते.

तिसरी किंवा चौथी टेकडी असेल जिथे आम्ही विशाल आणि पहिल्या फळीतल्या स्वछंद गिर्यारोहकांना जाऊन मिळालो.  आता विशाल ने सगळ्यांचं एक फॉर्मशन केलं.  अमोल सगळ्यात पुढे.  भाग्येश सगळ्यात शेवटी.  दोघांच्या मधे सगळ्या स्वछंद गिर्यारोहकांना घेऊन विशाल आणि प्रसाद.

टेकड्यांमागून टेकड्या संपवल्या.  आज मी ठरवूनच आलो होतो.  K2S तोडायचाच.  पूर्ण वेळ अमोल बरोबर लीड ला राहिलो.

अंधाराची भीती घालवण्यासाठी रात्रीचा K2S ट्रेक हि उत्तम जागा आहे.  आज पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश पूर्णवेळ मदतीला होता.  टॉर्चची गरजच नव्हती.  हात मोकळे असलेले केव्हाही चांगलेच.  ह्या ट्रेकला वाट चुकायचा धोका नाही.  शेवटची टेकडी येईपर्यंत एकच वाट आहे.  वाट सोडून कुठेही डावीकडे उजवीकडे जायचे नाही.  वाट जाईल तशा सर्व टेकड्या चढायच्या आणि उतरायच्या.  कुठेही टेकडी सोडून शॉर्टकट मारायला जायचं नाही.  सिहंगडावरच्या टॉवरवरचा लाल लाईट पहिल्या टेकडीपासून दिसत राहतो.

आज डिसेंबरच्या थंडीतला शनिवार आणि पौर्णिमा.  K2S साठी जुळून आलेला योग्य दिवस.  तसा K2S अवघड प्रकारे करायचा असेल तर दिवसा करावा.  रात्रीच्या वेळी अवघड प्रकारे करायचा असेल तर उन्हाळ्यातल्या अमावास्येच्या रात्री करावा.  मिट्ट काळोखात.

टेकड्या चढण्या उतरण्याचा आज भरपूर सराव झाला.  टेकड्या उतरताना आज मी वापरलेली तंत्र सांगतो. 
१. नाकासमोर सरळ न उतरता तिरकं उतरत जायचं.  हे तुम्हाला माहिती असेल.  आता ह्यातले बारकावे बघा.  दहा बारा पावलं एका बाजूला तिरकं गेल्यावर दुसऱ्या बाजूला तिरकं जायचं.  अशी बाजू बदलल्याने आपण चालत्या वाटेपासून फार लांब भरकटत जात नाही.  बाजू बदलताना दोन पर्याय आहेत.  शरीराची दिशाही बदलायची, किंवा शरीराची दिशा तीच ठेऊन फक्त बाजू बदलायची.
२. उतारावर वेग पकडला असाल आणि थांबायचं असेल तर डावीकडे नव्वद अंशात वळायचं.  वेग कमी होऊन थांबुन जाल. डावीकडेच का वळायचं, उजवीकडे का नाही ह्याचं माझ्याकडचं उत्तर हे माझं एक सीक्रेट आहे.  कोणाला सांगू नका.  मला डावीकडे वळणं सोपं जातं कारण माझ्या शरीराची डावी बाजू उजव्या बाजूपेक्षा जास्त लवचिक आहे.  कोणाला सांगू नका.  तुम्ही तुमच्यासाठी योग्य असेल त्या बाजूला वळा.
३. नेहमीपेक्षा छोटी पावलं टाकत उतरायचं.  ह्यामुळे उतरताना शरीराचा तोल सांभाळला जातो.
४. उतरताना मधेच थांबायचं नाही. एका वेगात उतरत राहायचं.  वेग कमी किंवा जास्त करायचा नाही.  थांबलो तर "आता काय करू" असा प्रश्न पडतो, आणि सुसाट वेग पकडला तर उतारावर थांबणं अवघड.
५. वाटेच्या बाजूला मोठे दगड असतील तर हाताने त्यांचा आधार घ्यायचा.  हाताने आधार घेतला कि पायांवरचा भार कमी होतो.
६. वाटेच्या बाजूला मजबूत झाड असेल तर त्याचा आधार घ्यायचा.
७. अवघड ठिकाणी ढुंगण टेकवून घसपटत जाण्याला पर्याय - पाय दुमडून अर्ध बसायचं, ढुंगण टेकवायचं नाही.  ह्यासाठी पायात ताकद लागते.  आता पायांच्या लांबीचा वापर करून एक एक पाय पुढे टाकत जायचं.  खूप वेळ नाही पण दोन चार पावलं असं जाता येईल, ज्यात छोटी असलेली अवघड जागा पार होईल.  दुमडलेला पाय अडकत नाही ह्याकडे लक्ष असू द्या.  एक पाय पूर्ण दुमडला आणि दुसरा पूर्ण लांब करून पुढे टाकला,  तर दुमडलेला पाय परत सरळ करता येत नाही.  पोझिशन लॉक होते.  त्यामुळे ८० % पाय दुमडून २० % बाकी ठेवावा.  तसेच पुढे टाकलेला पाय ८० % लांब करून २० % बाकी ठेवावा. अशी मोकळी जागा ठेवावी.

एवढं ज्ञान पाजळल्यावर तुम्हाला जर वाटलं कि मी डोंगर उतरण्याचा निष्णात आहे, तर तो तुमचा गैरसमज असेल.  माझी हुशारी डोंगर चढण्यात आहे.  पायातली ताकद डोंगर चढायला कामी येते.  डोंगर उतरण्यात ताकदीचे काय काम.  थांबूया.  स्व मग्न होण्याआधीच आवरते घेउया.

K2S हि काही ऐतिहासिक जागा नाही.  त्यामुळे वाटेत किल्ल्याच्या भिंती, बुरुज, दगडात कलाकुसर केलेली देवळं, वीरगळी, सतीच्या शिळा, असलं इथे काहीएक नाही.  हि आहे स्वतःचा शोध घ्यायची एक प्रयोगशाळा.  ह्या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्याचं वैशिष्ठ्य आहे एन्ड्युरन्स.  सहनशक्ती.  एकेकीचा विचार केला तर ह्या टेकड्या सोप्या आहेत.  एका रांगेत १६ मांडल्यामुळे K2S हा अनोखा प्रयोग जमून आलाय.  आज सगळे ग्रुप मिळून अडीजशे ट्रेकर असतील हा प्रयोग करून पहाणारे.  पुढे गेलेल्या आणि मागून येणाऱ्या ग्रुप चे टॉर्च दिसत रहातात.  त्यामुळे कुठून आलोय आणि कुठे जायचंय त्याचा अंदाज येतो.

शेवटच्या टेकडीला तीन वाटा आहेत.  लीड ला असेलेले आम्ही पाच जण इथे थांबलो.  प्रसाद आमच्या आधी इथे पोहोचला होता.  मधल्या फळीतले स्वछंद गिर्यारोहक येईपर्यंत आम्हाला इथे थांबायचं होतं.  पहाटेचे पाच वाजले असतील.  इथे हाडं गोठवणारी थंडी.  रात्री चालताना थंडी नव्हती.  आता इथे झोप तर राहूदे बाजूला, थंडीमुळे काय करावे ते कळत नव्हते.

एक एक करत मधल्या फळीतले स्वछंद गिर्यारोहक दाखल झाले.  १५ झाल्यावर निघालो.  उजवीकडची वाट पकडली जी रस्त्यावर जाते.  रविवार सकाळी सिंहगड चढणाऱ्यांची रांग पूर्ण डोंगरभर.  अंधारात त्यांचे टॉर्च ओळीने चमकत होते.

विशालने सांगून ठेवलेली जीप रस्त्यावर तयार होती.  १४ जण कोंबून बसलो.

गुगल मॅप मधे बघितलेला K2S ट्रेक चा भाग
केशरी ठिपका  = पायगाडीला सुरुवात
लाल ठिपका = गाडीरस्त्याला येऊन मिळालो
ह्या दोन्ही ठिपक्यांना जोडणाऱ्या डोंगरांच्या रेषेवरून चालत १६ टेकड्या पार करायच्या

सिंहगडावर जाणाऱ्या गाडीरस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात रस्ता कॉंक्रिटचा बनवण्याचं काम चालू आहे.  पुणे दरवाजातून वर गेलो.  रविवार सकाळची तुडुंब गर्दी.  लिंबू पाणी, चिंच, काकड्या, वगैरे विकणारी दुकानं.  तेच नेहमीचं दृश्य.  अजून सूर्योदय व्हायचा बाकी होता.

पुणे दरवाजातून वर गेल्यावर
कुठच्या १६ टेकड्या चालून आलो त्यांचा फोटो काढला.

१६ टेकड्या ज्या आम्ही चालून आलो  ...  सिंहगडावरून पाहिलेल्या

बऱ्याच दिवसानंतर आज इथे येत होतो.  कोणालाही कितीही आपलासा वाटला तरी हा गड आहे सिंहाचा. तानाजीचा आणि शिवबाचा.  आपण सगळे इथे उपरा.

K2S ट्रेकच्या पहिल्या टेकडीपासून दिसत होता तो लाल लाईट  ...  आणि टॉवर

आम्हाला सागर हॉटेलपाशी थांबायचं होतं.  सागर हॉटेल शोधून काढलं.  मालक हजर नव्हते.  हॉटेल अजून सुरु झालेलं नव्हतं.  आम्हीच हॉटेलचा बोर्ड बाहेर आणून ठेवला.  मागून येणाऱ्या स्वछंद गिर्यारोहकांना कुठे थांबायचंय ते कळण्यासाठी.

आजचे सगळे स्वछंद गिर्यारोहक इथे पोहोचायला वेळ लागणार होता.  समोर कड्याजवळ गेलो.  इथे उजव्या बाजूला कल्याण दरवाजा.  न राहवून तिकडे गेलो.  जातानाच सूर्योदय झाला.

सूर्योदय  ...  कल्याण दरवाजाजवळून पाहिलेला

कल्याण दरवाजाजवळ भरपूर फोटो काढले. 

शाळेत आणि कॉलेजला असताना मला एक प्रश्न होता, ह्या दरवाजाला कल्याण दरवाजा का म्हणतात?  इथून मुंबई जवळच्या कल्याणला जाणारी वाट आहे काय?  नंतर कधीतरी कळले, इथून खाली डोंगर उतरून गेल्यावर कल्याण नावाचे गाव आहे.  म्हणून हा कल्याण दरवाजा.

दरवाजात वरच्या बाजूला शिलालेख आहे त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला.  मोबाईल मधे चांगला आला नाही.  परत कधीतरी DSLR घेऊन येईन.
श्री शालिवाहन शके १६७२ कारकीर्द
श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान

असं दगडात लिहिलेलं आहे.

दरवाजाच्या आतल्या बाजूच्या देवड्या.  दगडी भिंतीतले कोनाडे.  बाहेरच्या दोन्ही बाजूकडच्या भिंतींवरची शरभ शिल्प.  दरवाजावरची कमळ शिल्प.  गणपती.  दरवाजाच्या पुढे काढलेले बुरुज.  का ते कळत नाही पण इथे आलं कि मन तृप्त होतं.

कल्याण दरवाजा
पलीकडे गर्दीने भरलेला पुणे दरवाजा आणि इथे मनमोकळा कल्याण दरवाजा.  किती मोठा कॉन्ट्रास्ट.

दुसरा दरवाजा

दोन दरवाजे आणि त्यांचे बुरुज.  युद्धशास्त्राच्या दिशेने पहिले तर उत्कृष्ट रचना आहे.

वाट उतरून थोडं पुढे गेलो.

बुरुज  ...  वाटेने थोडं खाली उतरून पाहिलेला
मग परत फिरून तृप्त मनाने सागर हॉटेल पाशी परतलो.  बरेचसे स्वछंद गिर्यारोहक इथे आलेले होते.  मागे रेंगाळलेले काहीजण थोड्या वेळात पोहोचले.

यथावकाश न्याहारी केली.  कांदाभजी, लाल चटणी, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, हिरवा ठेचा, मडक्यातलं दही.  रात्रभराच्या जोमदार ट्रेकिंग नंतर कल्याण दरवाजाला सुखद भेट आणि त्यानंतर पोटभर जेवण.  अजून काय पाहिजे जीवाला.

सिंहगडावर न्याहारी

निघालो तेव्हा साडेनऊ होऊन गेले होते.  जीपने कोंढणपूर गावात गेलो.  विशालने जीपची व्यवस्था आधीच करून ठेवली होती.  नेहमीप्रमाणे हाही ट्रेक विशालने उत्तम प्रकारे घडवला.  ट्रेकिंग संस्था चालू करणे सोपं आहे.  आयोजित केलेला प्रत्येक ट्रेक उत्तम प्रकारे पार पाडणं, तेही खंड न पाडता प्रत्येक वर्षी, हे भलतं अवघड आहे.

थोड्या वेळाने स्वारगेट बस आली.  बस मधे जमेल तशी झोप काढली.  स्वारगेटला उतरून तिथे मी शिवाजीनगर बस पकडली.  शिवाजीनगरला रस्त्यापलीकडे जाऊन पिंपरी गाव बस घेतली.  कोकणे चौकात घराजवळ उतरलो.  एक ग्लास उसाचा रस पिऊन घरी गेलो तेव्हा एक वाजला असेल.  १०० टक्के बॅटरी संपलेल्या अवस्थेत घरी जाऊन चालत नाही.  ९० टक्के बॅटरी संपवून १० टक्के बाकी ठेवावी लागते.  का ते सुज्ञ ट्रेकर जाणून असतीलच.  राहिलेली झोप पूर्ण करायला मला तीन तास लागले असतील.  मग?  कशासाठी करायचा हा खटाटोप.  सुट्टीच्या दिवशी खाऊन पिऊन ताणून द्यायची.  मस्त मजेत दिवस घालवायचा.  टीव्ही समोर लोळायचं.  कशाला जीवाला त्रास.  कशासाठी.  उत्तर सापडलं नसेल आणि शोधायची इच्छा असेल तर पडा एकदा घराबाहेर.  करा सीमोल्लंघन.  पडा कम्फर्ट झोन च्या बाहेर.  स्वछंद गिर्यारोहकांच्या ह्या संकेतस्थळ भेट द्या आणि बघा पुढचा कुठला ट्रेक करता येतोय ते.

Tuesday, September 18, 2018

तुंग, सप्टेंबर, आणि फुले

माझा आवडता ऋतु आहे हिवाळा.  थंडी.  पण थंडी पडायला अजुन वेळ आहे.  सध्या चालु आहे सप्टेंबर.  सप्टेंबर म्हणजे ट्रेक करायला उत्तम दिवस.  गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी आम्ही पुन्हा एकदा तिकोना सर करायचा बेत ठरवला.  तसा तिकोना मी "य" वेळा सर केलाय.  पण दिप्ती आणि खुशी नेहमी येत नाहीत ना.  मागच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी केलेल्या ट्रेक मधुन शिकलेल्या दोन गोष्टी म्हणजे :
१. ह्या दिवशी रस्त्याला ट्रॅफिक नसतं.  अपवाद पुण्यातुन कोकणात जाणारे रस्ते.
२. किल्ले रिकामे असतात.

आजच्या ट्रेक साठी तिकोना का निवडला ?
१. पुण्यातुन कोकणात जाणारं ट्रॅफिक आम्हाला सकाळी लागणार नव्हतं.
२. लोणावळा आणि मावळ परिसरात जून - जुलै मधे होणारी आचरट पर्यटकांची गर्दी आता संपली होती.

माझा दिवस ४:५५ ला उजाडला.  तिघं आवरून घरातुन निघायला पावणे सहा होऊन गेले होते.  रस्त्यावर तुरळक वाहनं.  आज भल्या पहाटे उठून किल्ल्यावर निघालेले आमच्यासारखे आम्हीच.  आमच्या घरापासुन तिकोना पर्यंतचा रस्ता मला पाठ आहे.  गुगल मॅप च्या बाईला मी हा रस्ता सांगु शकतो.

खुशी मागच्या सीट वर आडवी झोपली होती.  दिप्तीही पुढे डुलक्या काढत होती.  जुन्या मुंबई पुणे रस्त्याने कामशेत पर्यंत जाऊन डावीकडचा रस्ता घेतला. पुढे पवनानगर वगैरे परिसरात काही ठिकाणी रस्त्यात खड्डे, तर काही ठिकाणी खड्ड्यात रस्ते.  पण जेंव्हापासुन मी काठमांडू मधले रस्ते बघितलेत तेव्हापासुन भारतातल्या रस्त्यांना आणि ते रस्ते बनवुन घेणाऱ्यांना शिव्या घालणं सोडुन दिलंय.  तिकोना किल्ल्याच्या पायथ्याचं तिकोनापेठ गाव जवळ आलं होतं.  दहा मिनिटांच्या अंतरावर.  एक बाई जड ओझं घेऊन चालत चालल्या होत्या.  आमची गाडी येताना बघून थांबल्या.  त्यांना लिफ्ट दिली.  त्यांना जायचं होतं जवण गावाला.  म्हणजे तिकोनापेठच्या पुढचं गाव.  त्यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांच्या जवण गावात सोडलं.  तिकोनापेठच्या पुढे आलोच आहोत तर तिकोनाच्या ऐवजी तुंग करायचं ठरवलं.

दरवेळी तिकोना वरून तुंग बघताना तो आशेने बघत असतो.  इकडे येताय ना.  का नेहमीप्रमाणे तिकोनावरूनच परत. असा दुजभाव कशासाठी.  आज वाट लांबडी करून तुंगकडे निघालो.  लांबडी म्हणजे पवना धरणाच्या दूरवर पसरलेल्या पाणीसाठ्याला भलामोठा वळसा घालून तुंगच्या पायथ्याला पोहोचावं लागतं.  तिकोनापेठ पासुन पुढे पाऊण तास.

तिकोनापेठ ते तुंग ह्या रस्त्याला ट्रॅफिक असे नाहीच.  पण रस्त्याला खड्डे बरेच आहेत.  त्यामुळे गाडी सुसाट चालवता येत नाही.  खुशी आणि दिप्ती गाडीत झोपलेल्या असल्या कि मी गाडी फार जोरात पळवत नाही.

पवना धरणाचा पाणीसाठा आणि पलीकडे तुंग
आता मी मधे मधे गाडी थांबवुन फोटो काढायला सुरुवात केली.  सप्टेंबर महिन्यातली रानफुलं जिकडे तिकडे.  सोनकीची छोटी पिवळी फुलं होतीच.  इतरही बरीच होती.

एका झाडावर बगळे दिसले त्यांचा फोटो घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.   जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे.  पक्षांचे फोटो काढायला वेगळी लेन्स घ्यावी लागेल.  ह्या १८ - ५५ लेन्स ने पक्षांचे फोटो जमत नाहीत.

नेहमी न दिसणारी जरा वेगळी फुलं दिसली कि गाडी थांबवून त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली.  हि लालसर पिवळी कांडी कसली आहे ते मी अजून शोधतोय.  Zingiber diwakarianum असावे.  नक्की माहिती नाही.

Zingiber diwakarianum असावे हे.  नक्की माहिती नाही.


थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी आकर्षक वेगळी फुलं दिसली.  गाडी थांबवुन फोटो काढले.  हि एक विषारी वनस्पती आहे.  ह्या वनस्पती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे टिचकी मारा.  झिम्बाब्वे ह्या देशाचे हे राष्ट्रीय फुल आहे.

कळलावी
Common name = Glory Lily
मराठी = कळलावी, अग्निशिखा, वाघचबका
Botanical name = Gloriosa superba

थोडं पुढे गेल्यावर पवना धरणाच्या पाणीसाठ्यात तुंग किल्ल्याचं प्रतिबिंब छान दिसत होतं.  तो फोटो काही मला घेता आला नाही.  एका ठिकाणी भारंगी दिसल्यावर पुढे भारंगी आणि पाठीमागे दूरवर तुंग असा फोटो घेतला.

समोर भारंगी
मागे तुंग किल्ला
Common name = Blue Fountain Bush
मराठी = भारंगी
Botanical name = Rotheca serrata

रस्त्याच्या कडेला गवतावर पसरलेली दोन कोळ्याची जाळी दिसली.  तिकोनापेठ ते तुंग हा रस्ता इतर रस्त्यांसारखा नाही.  इथे ट्रॅफिक नसल्यामुळे बरंच काही आहे.

कोळ्याचं जाळं आणि कोळी

एक दोन ठिकाणी छोटे तपकिरी रंगाचे पक्षी पळत जाताना दिसले.  Quail असावे.  नक्की कोणते ते मला ओळखता येत नाहीत.  जमिनीवरून पळणारे असले पक्षी आम्ही तुंग तिकोना परिसरात आधीही पाहिलेत.

तुंगच्या अलीकडची छोटी टेकडी

आठला किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो.  पार्किंगच्या जागेत गाडी लावली.  आमच्याशिवाय कोणीच नव्हते.  माकडांचा एक कळप झाडांवरून उड्या मारत गेला.  पार्किंगच्या जागेसमोर दोन बोर्ड आहेत तुंग किल्ल्याची माहिती देणारे ते वाचले.  आजुबाजुला छोटी निळी जांभळी फुलं बरीच दिसत होती त्यांचे फोटो घेतले.

हिरवी निसुर्डी

Common name = Lambert's Borage
मराठी = हिरवी निसुर्डी
Botanical name = Adelocaryum lambertianum

दिप्ती आणि खुशीला थोडा वेळ देऊन मग सावकाशपणे चढायला सुरुवात केली.  मी पुढे, मधे खुशी आणि मागे दिप्ती.  कैलासगडला दिप्तीला पुढे ठेऊन मि मागे राहिलो होतो.  ति चुक परत केली नाही.  फुटबॉल काय किंवा ट्रेकिंग काय, फॉर्मेशन हि लाखमोलाची गोष्ट आहे.

पिवळी स्मिथिया फुलं घोळक्याने अनेक ठिकाणी फुललेली.  ह्या फुलांना मिकी माउस म्हणतात.  वाऱ्याबरोबर डुलली कि मजेदार वाटतात.

स्मिथिया  ...  बोलीभाषेत मिकी माउस

Common name = Hairy Smithia
मराठी = कावळा
Botanical name = Smithia hirsuta

वाटेशेजारी डावीकडे कातळात पहारेकऱ्यांची छोटी जागा खोदलेली.  तिथे आता एक मारुतीची मूर्ती आहे.

पुढे नेहमीपेक्षा वेगळी फुलं दिसली.  गुलाबी अडुळसा.

गुलाबी अडुळसा
Common name = Squirrel Tail
मराठी = गुलाबी अडुळसा
Botanical name = Justicia betonica

एका ठिकाणी उजवीकडे थोडं पुढे गेल्यावर खांब टाकी आहेत.  दिप्ती आणि खुशीने माझा तिकडे जाण्याचा विचार हाणून पाडला.

नाजुक गुलाबी तेरड्याची फुलं सोनकीची बरोबरी करायला सगळीकडे.

तेरडा

Common name = Garden Balsam
मराठी = तेरडा
Botanical name = Impatiens balsamina

वाटेच्या उजवीकडे थोड्या उंचावर एक पाण्याचं टाकं आहे.  पावसाळ्यात निसरड्या दगडावर तिथे चढणं जरा अवघड आहे.  तिथे जायचा प्रयत्न न करता आम्ही पुढे गेलो.  जरा पुढे गेल्यावर पहिला दरवाजा समोर दिसायला लागला.

पहिला दरवाजा
सुरक्षिततेच्या दृष्टीने पहिला दरवाजा तिथे येणाऱ्या वाटेपेक्षा उंचावर बनवला आहे.

सप्टेंबर महिना ट्रेकिंग साठी का उत्तम असतो हा ज्याने त्याने स्वतः शोधून काढायचा प्रश्न आहे.  तरी तुंगच्या पहिल्या दरवाज्याचा मी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मधल्या एका सकाळी काढलेला फोटो पहा.

तुंगचा पहिला दरवाजा  ...  मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मधल्या एका सकाळी काढलेला फोटो

पहिल्या दरवाजातुन आत गेल्यावर लगेच येतो दुसरा दरवाजा.  दुसऱ्या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागते.  दरवाजासमोर गोलसर मोकळी जागा सोडली आहे.  इथे शत्रू थांबला तर तिन्ही बाजूंच्या भिंतींवरून त्याच्यावर हल्ला करता येईल.

इथल्या भिंतीतल्या एका दगडात कोरलाय मारुती.  शक्तीची देवता मारुती गडावर पाहिजेच.

भिंतीतल्या दगडात कोरलेला मारुती
दरवाजासमोरच्या मोकळ्या गोल जागेत येण्यासाठीची वाट मुद्दाम छोटी ठेवलेली आहे.  जेणेकरून एकावेळी खूप माणसं तिथे येणार नाहीत.

भिंतींमधल्या चिंचोळ्या जागेतुन पाहिलेलं विहंगम दृश्य

कोणत्या तरी दुर्ग संवर्धन संस्थेने इथे लाकडी दरवाजा बसवलाय.  मागच्या वर्षी मी इथे आलो होतो तेव्हा दरवाजा बसवण्याचं काम चालु होतं.

दुसऱ्या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.  देवड्या म्हणजे दरवाजाच्या आतल्या बाजुला पहारेकऱ्यांना राहण्यासाठीची जागा.  देवड्या म्हणजे काय ते खुशीला सांगितले.  एका देवडीत कोनाडा आहे.  कोनाडा म्हणजे भिंतीतला कप्पा.  वस्तू ठेवण्यासाठी.  तसेच रात्रीच्या वेळी दिवा लावण्यासाठी.

दुसऱ्या दरवाजातुन आत गेल्यावर छोटं पठार आहे.  इथे डावीकडे पुढे जाऊन माची आणि बुरुज पाहिले जिथे आम्ही गेलो नाही.

माची आणि बुरुज
४ सप्टेंबर १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातील हा किल्ला जिंकुन घेतला.  किल्ल्याचे नाव कठीणगड असे ठेवले.  मुघल सरदार जयसिंग आणि दिलेरखान ह्यांनी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना परिसरातली अनेक गावं जाळली.  पण हे किल्ले ते जिंकू शकले नाहीत.  पुढे पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला.  नंतर १६७० किंवा १६७१ ह्या काळात कधीतरी शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकुन घेतला.  पुढची ३३ वर्ष कठीणगड मराठ्यांच्या ताब्यात होता.  १३ मे १७०४ रोजी मुगल सरदार अमानुल्ला खान ह्याने हा किल्ला जिंकला.  औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बंकीगड असे ठेवले.  दिल्लीहुन महाराष्ट्र बुडवायला आलेला औरंगजेब १७०४ मधे महाराष्ट्रातच हाय खाऊन गेला.  मोगल साम्राज्याची पीछेहाट सुरु झाली.  तुंग किल्ला मोगलांकडून हिरावला गेला.  १८१८ साली ब्रिटिशांनी इतर अनेक किल्ल्यांबरोबर तुंग किल्लाही जिंकुन घेतला.  नंतरच्या काळात हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात होता.

आम्ही आता गणेश मंदिराकडे निघालो.  मी पुढे, खुशी मधे, आणि दिप्ती मागे.  एका ठिकाणी वाटेत माझ्या समोरून एक छोटा काळपट साप बाजुच्या झुडुपात गेला.  दिप्ती आणि खुशीला सांगितलाच नाही.  सांगितला असता तर आमचा तुंग किल्ला इथेच संपला असता.  आणि परतीच्या वाटेतही अनेक शंका कुशंका आडव्या आल्या असत्या.

गणेश मंदिराच्या बाजुचा छोटा तलाव हिरव्या पाण्याने भरलेला.  गणेश मंदिरासमोर दिप्तीने गणपतीची आरती म्हटली.  आम्ही दोघं दोन बाजुला हात जोडुन उभं राहिलो.  आज गणेश चतुर्थी.  तरी बरं दिप्ती गणपतीची आरती म्हणून थांबली.  इतर आरत्या सुरु नाही केल्या.

गणेश मंदिरासमोरच्या छोट्या जांभळ्या फुलांचे फोटो घेतले.

करंबल
Common name = Water Willow
मराठी = करंबल
कोकणी = घाटी पित्तपापड
नेपाळी = बिसाउने झार, खुर्सानी झार
Botanical name = Justicia procumbens

आजुबाजुच्या परिसरातुन मोरांचे आवाज अधून मधून ऐकू आले.

निलवंती
मराठी = निलवंती
Botanical name = Cyanotis fasciculata

ट्रेकिंग का करावे ह्या प्रश्नाच्या पन्नास उत्तरांपैकी काही दिप्ती आणि खुशीला समाजलीयेत.  पुढे जाऊन बाकीचीही समजतील.

पांढरी छोटी फुलं आणि कळ्या काही ठिकाणी दिसल्या.  एका दांडीवर एक कीटक येऊन बसला.  निळसर हिरव्या पंखांचा.

पांढऱ्या फुलांची दांडी आणि त्यावर बसलेला निळसर हिरव्या पंखाचा कीटक

Common name = Scaly-Stem Chlorophytum
Botanical name = Chlorophytum glaucum

बालेकिल्ल्यावर जायची वाट अवघड अशी नाही.  पण जपुन जावे.  एका बाजुला दरी आहे.  गणेश मंदिर ते बालेकिल्ला ह्या भागात आज फुलांची विविधता पहायला मिळाली.  सप्टेंबर असल्यामुळे.  एरवी तुंग फक्त ऐतिहासिक किल्ला म्हणुन पहावा लागतो.  किंवा पाऊण तासात बालेकिल्ल्यावर पोहोचायचा शारीरिक व्यायाम म्हणुन.

गजकर्णिका

Common name = Konkan Begonia
मराठी = गजकर्णिका
Botanical name = Begonia concanensis

चढाईला सुरुवात केल्यापासुन एका तासात बालेकिल्ल्यावर पोहोचलो.  तुंगीदेवीचे मंदिर पाहिले.  मंदिरासमोरची खोदीव गुहा पाहिली.  खालच्या गावातले आवाज इथे ऐकू येत होते.  तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला इतर सर्व किल्ल्यांच्या बाल्लेकिल्ल्यांपेक्षा छोटा असेल.  पण इथून चहुबाजूंना दूरपर्यंत नजर ठेवता येते.  तुंग किल्ल्याची समुद्रसपाटीपासुनची उंची आहे ३५३० फूट.  पवन मावळातला तुंग हा एक घाटरक्षक किल्ला होता.  जुन्या काळी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वहातुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे.  बालेकिल्ल्यावरून लोहगड, विसापुर, कोराईगड, तिकोना, मोरगिरी हे किल्ले दिसतात.  दरवेळी तिकोना वरून तुंग पहातो.  आज तुंग वरून तिकोना पहात होतो.

पिवळ्या सोनकीचा बहर तिकोनापेठ सोडल्यापासुन अधे मधे सोबतीला होता. इथे बालेकिल्ल्यावरही.

सोनकी

Common name = Graham's groundsel
मराठी = सोनकी
Botanical name = Senecio bombayensis

बालेकिल्ल्यावर फोटो उत्कृष्ट येतात.  फोटोग्राफी सुरु करतोय तोपर्यंत दिप्तीला एक मधमाशी चावली.  इथे खूप मधमाशा आहेत ह्याची दिप्ती आणि खुशीला आता जाणीव झाली.  मग काय.  राहिली फोटोग्राफी.  चला तडक खाली.  जितकी फुलं तितक्याच मधमाशा.  मधमाशा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या आहेत.  कशा ते तुम्हाला माहिती नसेल तर हे वाचा.  हे हि वाचा.  आणि हे पण वाचा.

बालेकिल्ल्यावरून सभोवतालचं दृश्य
समोरच्या घराचं लोकेशन बघुन घ्या.  शेणात गेले ते प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या शहरातले दीड दोन कोटीचे फ्लॅट.  आणि त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्याचा सत्तर लाखाचा बँक बॅलन्स.  होय मि त्याच घराबद्दल बोलतोय ज्याच्या चहुबाजूंनी पाणी आहे.  घरापर्यंत जायला एक वाट आहे.

मी दोन चार फोटो काढतोय तो पर्यंत दिप्ती आणि खुशी माझ्या पुढे पटापट उतरून गेल्या.  गळ्यात अडकवलेला कॅमेरा सांभाळत उतरायला मला वेळ लागत होता.  तसाही उतारण्यात मी सावकाशच आहे.  चढण्यात मी वेग पकडतो.  पायातली ताकद चढताना कामी येते.  उतरताना ताकदीचे काय काम.  उतरताना शरीराचा तोल सांभाळण्याचं कसब उपयोगाचं.  पाण्याची टाकं आहेत तिकडे दिप्ती आणि खुशीला जायचं नव्हतं.  तिथे जायची वाट जिथे आहे तिथपर्यंत मी यायच्या आताच दोघी तिथून खाली सटकल्या.  खुदुखुदु हसत होत्या.  थोडं उतरून गेल्यावर थांबुन आणलेली बिस्कीटं खाल्ली.  पाणी प्यायलो.

मी पुढे राहुन माझ्या मागे खुशी आणि तिच्या मागे दिप्ती असे आता उतरायला लागलो.  मी मुद्दामच वेग कमी ठेवला.  पळू नको म्हणून खुशीला अधेमधे सांगितलं.  तुंग किल्ल्यावरून उतरताना कोणी पाय सटकुन दरीत खाली पडलं तर डायरेक्ट डोंगराच्या तळाला जाऊन थांबणार.  अधे मधे कुठे स्टॉप नाही.  ह्या वर्षीच एक मुलगी उतरताना दरीत खाली पडुन मृत्युमुखी पडली.  असो.  आम्ही तिघेही कुठेही न धडपडता एक एक टप्पा उतरत होतो.

दुसऱ्या दरवाजाच्या समोरच्या भागात गेल्यावर तिथून समोर भिंतीपकडे सूर्यदेव पृथ्वीवरील सर्व जीवजंतुंना ऊर्जा देण्याचे कार्य अखंड नित्यनेमाने करताना दिसत होते.  त्यांचा एक वेगळा फोटो घेण्याचा प्रयत्न केला.  मोबाईल मधून काढलेल्या फोटोत असे चमकदार सूर्यकिरण कधीच दिसत नाहीत.  मला तरी कधीच जमलं नाहीये मोबाईल मधून असला फोटो काढायला.

चमकदार सूर्यकिरण फोटोत पकडण्याचा एक प्रयत्न
पहिल्या दरवाजाच्या अलीकडच्या भिंतीवर बसून दिप्ती आणि खुशीचे फोटो काढले.

भिंतीवर बसून फोटोग्राफी

इथून एक वाट माची आणि बुरुजाकडे जाते तिकडे जायला परत दिप्ती आणि खुशीचा नकार.  दरवाजातुन पलीकडे किल्ला उतरत निघालो.  पुन्हा एकदा सगळ्यात पुढे मी, मधे खुशी, आणि मागे दिप्ती.

दूरवर पसरलेला पवना धरणाचा पाणीसाठा
सगळ्यात डावीकडे दिसतोय तो तिकोना
गळ्यातला कॅमेरा मि बॅगेत ठेऊन दिला.  कोणतीही धावपळ गडबड न करता सावकाश उतरत होतो.  तुंग किल्ल्याची वाट बऱ्याच ठिकाणी अरुंद आहे.  एक माणूस जाईल इतकीच.  वाटेच्या कडेला वाढलेलं गवत आणि झुडुपं ऐन भरात असल्यामुळे वाट अरुंद झाली होती.  उन्हाळ्यात गवत आणि झुडुपं वाळून गेल्यावर हीच वाट अरुंद रहात नाही.

इथे काही छोटे खेकडे आणि बेडूक दिसले.  एक खेकड्याचं पिल्लू पूर्ण लाल रंगाचं होतं.

बेडुक
घसरड्या दगडावर चिकटुन बसलाय
पाठीवर फुलाच्या पाकळीचा तुकडा
माझ्या पायाखाली नकळतपणे एक छोटा खेकडा चिरडला गेला.  माझ्या मागोमाग येताना खुशीने पाहिला.  अशी अजाणतेपणी केलेली हत्या आपल्या अकाउंट मधे जमा होत नाही असा माझा समज आहे.  ऍक्शन (किंवा इनॅक्शन), म्हणजे आपली कृती नाही, तर त्यामागचे आपले इंटेन्शन (म्हणजे हेतू) जे काही असेल ते आपल्या अकाउंट मधे जमा होते.  अर्थात हा माझा विचार आहे.  तुमचा वेगळा असू शकतो.  असो.  विषय भलतीकडे जाण्याआधीच थांबूया.

खुशी sure footed आहेच.  उतरताना न घाबरता पटापट उतरते.  कसलाही गडबड घोटाळा नको म्हणून पुढे राहून मी अधे मधे अर्ध्या मिनिटांचे छोटे ब्रेक घेतले.

तुंग उतरताना शेवटचा टप्पा

उतरताना शेवटच्या टप्प्याला तीव्र उतार आहे.  घसारा (स्क्री) कुठेच नाही.  दगडात होल्ड मिळतात.  फोटोग्राफी करत करत पाऊण तासात उतरून आलो.  आम्ही उतरून आलो तेव्हा नवख्या ट्रेकर्स ची एक टोळी चढायला सुरुवात करत होती.  माझ्या तुंगच्या मागच्या भेटीत असंच झालं.  पूर्णवेळ किल्ला माझ्या एकट्याचाच.  मी उतरून आलो तेव्हा ट्रेकर्स चढायला सुरुवात करत होते.

सव्वादहाच्या सुमारास गाडीतुन परतीच्या प्रवासाला लागलो.  रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पंद दिसले.  छोट्या छोट्या घोळक्याने.  एका ठिकाणी तर मोठा घोळका.  मागच्या महिन्यात तिकोना वर फक्त एकाच ठिकाणी पंद होते.  इथे शेकड्यात सापडतील.  पंद पाहून मला अमेरिकेने शोधून काढलेले क्लस्टर बॉम्ब आठवले.  अमेरिकेचे क्लस्टर बॉम्ब महाप्रचंड विध्वंसकारी.  सह्याद्रीतले पंद हा निसर्गाचा एक उत्कृष्ट अविष्कार.

पंद
Common name = Konkan Pinda
मराठी = पंद
Botanical name = Pinda concanensis

एका ठिकाणी छोट्या पठारावर सोनकी बहरलेली.  जोडीला कुठे कुठे तेरडा.

दिप्तीची फोटोग्राफी
सकाळी येताना रस्ता बघून ठेवल्याने आता परतीचा रस्ता शोधावा लागला नाही.

फुलांचे फोटो काढायला आता परत एकदा गाडी थांबवली.  एकाच ठिकाणी अनेक प्रकारची फुलं होती.  पांढरी छोटी खाली वाकलेली फुलं दिसली तसली मागच्या महिन्यात मला घोराडेश्वर टेकडीवर पण दिसली होती.

Clasping-Leaf Borage

Common name = Clasping-Leaf Borage
Botanical name = Trichodesma inaequale

ह्याचे मराठी नाव मला माहित नाही.  तुम्हाला माहित असेल तर मला सांगा.

इथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला पिवळी फुलं दिसली.

दिवाळी

Common name = Bitter Luffa, wild luffa, wild ribbed gourd, wild ridge gourd
मराठी = दिवाळी
कोकणी = कोडु घोसाळे
Botanical name = Luffa acutangula

फोटो काढायला गाडी थांबवली कि दिप्तीला कधीकधी आवडत नाही.  तसे आज मला बरेच फोटो काढू दिले.

चिमीन

Common name = Sweet Clock-Vine, White Lady
मराठी = चिमीन
Botanical name = Thunbergia fragrans

तिकोनापेठ ते पवनानगर रस्त्याला जो उतार आहे तिथे संध्याकाळी भन्नाट वारा असतो.  आत्ता सकाळीही बऱ्यापैकी होता.  इथून समोर पवना धरणाचा पाणीसाठा आणि त्याच्या पलीकडे दूरवर तुंग दिसतो.

समोर पवना धरणाचा पाणीसाठा  ...  पलीकडे तुंग
उत्तम दृश्यमानता  ...  पाण्याचा गडद निळा रंग इथे कधी न पाहिलेला
तुंग पासुन जसजसे लांब गेलो तसतशी पोटातली भुकेची जाणीव वाढत गेली.  मुंबई पुणे जुना रस्ता येईपर्यंत पोटासाठी काही मिळण्याची शक्यता नव्हतीच.  तिथून पुढेही काही मिळेना.  गणेश चतुर्थी मुळे आज सर्व ठिकाणं बंद.  एखादा दिवस असा पोटाला ताण दिल्यास हरकत नाही.  रोजच न चुकता वेळच्या वेळी खायला मिळत असेल तर न खायला मिळालेली परिस्थिती पोटाला कधी समजतच नाही.  आता जेवायची वेळ झालीच आहे, घरी जाऊन जेऊया असा विचार केला.  पण वाकडला शिव सागर समोर थांबलो.  स्वच्छ पण अतिशय खर्चिक ठिकाण आहे.  पोटातला आगडोंब शांत करून घरी पोहोचलो.  घरी येतानाही कुठे ट्रॅफिक लागलं नाही.

आजच्या जमेच्या बाजु :
१. दिप्ती आणि खुशीची पहिली तुंग स्वारी
२. सप्टेंबर महिन्यातलं उत्कृष्ट हवामान
३. सगळीकडे फुललेली सप्टेंबर महिन्यातली रानफुलं.  फुलांची माहिती मी जर कुठे चुकीची छापून दिली असेल तर मला सांगा.
४. खुशी अवघड ट्रेक न घाबरता करते ह्याच्यावर शिक्कामोर्तब

पुढे काय :
१. दिप्तीची सापांची काल्पनिक भिती आणि खुशीची मधमाश्यांची भिती घालवणे.  ह्याचा उपयोग होईल.
२. सप्टेंबर महिना आणि गणेश चतुर्थी हे दोन्हीही ट्रेकर्ससाठी "चुकवू नये असे काही" ह्या सदरात मोडतात.  दोहोंचा लाभ असावा.  ही विनंती.
३. मागच्या वर्षी अर्ध्यात सोडुन दिलेला कैलासगड ह्या वर्षी पूर्ण करावा म्हणतो.  तसे कागदावर प्लॅन तर खूप तयार आहेत हो आमचे.  रात्र थोडी नि सोंगे फार.  असो.  चालायचंच.

Tuesday, September 11, 2018

ऑगस्ट महिन्यातली रानफुलं

शनिवार दुपार.  घोराडेश्वर टेकडीवरची माझी ह्या वर्षातली सातवी आणि ऑगस्ट मधली पहिली स्वारी.  ऑगस्टचा शेवटचा आठवडा.  पावसाचा जोर आता कमी झालाय.  अधे मधे उघडीप होतेय.  म्हणजे रानफुलं यायला सुरुवात झाली.  तसा मुख्य बहर पाऊस थांबुन उन्हं पडायला लागल्यावर.  नविन घेतलेल्या कॅनन कॅमेऱ्यातुन फुलांचे फोटो घेण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.  दिसेल तसा गोड मानुन घ्यावा.  मला नसलेली फुलांबद्दलची माहिती मला नक्की कळवा.  मंडळ आभारी आहे.  आणि मी चुकीची माहिती इथे छापुन दिली असेल तर बिनदिक्कत माझे कान ओढा.

टेकडी चढायला सुरुवात केल्यावर रस्त्याच्या कडेला छोटी झुडुपं, गवत वगैरे भरपूर.  जरा आजुबाजुला बघत चाललं तर छोट्या पांढऱ्या फुलांचे छोटे झुबके लक्ष वेधून घेतात.  हा गवताचा एक प्रकार, झरवड.

झरवड

Common name = Silk Leaf, Acuate, American softhead
मराठी = झरवड
Botanical name = Lagascea mollis
मूळचं अमेरिकेतील हे गवत आता भारतात स्थायिक झाले आहे.

आणखी एक मूळचं अमेरिकेतलं आणि आता भारतात शिरकाव केलेलं झुडूप घाणेरी.  इथे रस्त्याच्या कडेला सगळीकडे हेच.

घाणेरी

Common name = Lantana
मराठी = घाणेरी, टणटणी
Botanical name = Lantana camara


टेकडी चढून जाताना घाणेरी वगैरे झुडुपं कमी होत गेली आणि इतर झाडा झुडुपांनी त्यांची जागा घेतली.  नाजुक गुलाबी फुलं बऱ्याच ठिकाणी.  तेरड्याचा एक प्रकार.

तेरड्याचा एक प्रकार

Common name = Garden Balsam
मराठी = तेरडा
Botanical name = Impatiens balsamina

लाल फुलं येणारं तेरड्याचं रोप माझ्या बायकोने काही दिवसांपुर्वी तिच्या गावाहुन आणलं.  आणि आमच्या घरी कुंडीत लावलं.  हे जगेल कि नाही मला शंका होती.  पण कुंडीत लावल्यावर दुसऱ्या दिवशीच तरारलं.  आठवड्याभराने फुलायला लागलं.  आता भरगच्च फुललंय.  तेवढीच बायकोला फुशारक्या मारायला संधी.


काही ठिकाणी रान हळद दिसली.  जगभरात फक्त सह्याद्रीच्या पश्चिम आणि पूर्ण रांगांमध्येच रान हळद आढळते.  आणि ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  ह्या वनस्पती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे टिचकी मारा.

रान हळद

Common name = Hill Turmeric
मराठी = रान हळद, शिंदळवानी
Botanical name = Curcuma pseudomontana


अधुन मधुन बारीक निळ्या फुलांची घोडेगुई.

घोडेगुई
Common name = Feather-leaved Lavender
मराठी = घोडेगुई
Botanical name = Lavandula bipinnata


टेकडी चढून वरच्या पठारावर पोहोचल्यावर काही ठिकाणी भारंगी.  एक औषधी वनस्पती.

भारंगी
Common name = Blue Fountain Bush
मराठी = भारंगी
Botanical name = Rotheca serrata


बऱ्याच ठिकाणी पांढरी छोटी फुलं घंटेसारखी, खाली वाकलेली.  त्यातलं एक न वाकलेलं दिसलं.  ह्यांना मराठीत काय म्हणतात मला माहित नाही.  तुम्हाला माहित असेल तर मला सांगा.

Clasping-Leaf Borage

Common name = Clasping-Leaf Borage
Botanical name = Trichodesma inaequale


जांभळ्या फुलांचे तुरे काही ठिकाणी गटागटाने.  ह्यांचं मराठी नाव तुम्हाला माहित असलं तर मला सांगा.  हि फुलं हिमालयात १२०० ते २४०० मीटर उंचीवर आढळतात.  तसेच सह्याद्री पर्वतरांगातहि फुलतात.

Indian Coleus

Common name = Indian Coleus
Botanical name = Plectranthus barbatus

फुलं पाहात फिरता फिरता एक गोगलगाय सापडली.

A bend in the road is not the end of the road ...
Unless you fail to make the turn
गोगलगाई जगात सर्वत्र आढळतात.  गोगलगाईंचे मुख्य तीन प्रकार ठरवता येतील - जमिनीवर राहाणाऱ्या, समुद्रात (म्हणजे खाऱ्या पाण्यात) राहाणाऱ्या, आणि गोड्या पाण्यात राहाणाऱ्या.  गोगलगाईंचे ६०,००० पेक्षा जास्त प्रकार आहेत.  गोगलगाईंना पाठीचा कणा नसतो.  गरजच काय.  पाठीवर कवच असतं त्यात त्या वेळ पडल्यास सुरक्षित लपू शकतात.  त्यांच्या पाठीवरचे कवच कॅल्शिअम कार्बोनेट चे बनलेले असते.  ज्यात कॅल्शिअम भरपूर आहे असा आहार गोगलगाई घेतात.  जेणेकरून त्यांचं कवच जाड आणि मजबूत राहील.  गोगलगाईंचे आयुष्यमान  तीन ते सात वर्षांचे असते.  गोगलगाई रात्री आणि पहाटे सक्रिय असतात.  पुरे झाला गोगलगाईवरचा निबंध.  ह्या गोगलगाईचे फोटो काढुन झाल्यावर मी आल्या मार्गाने टेकडी उतरायला लागलो.

टेकडीच्या पायथ्याला पांढरी छोटी फुलं दिसली.  चढुन जाताना माझं ह्यांच्याकडे लक्ष्य नव्हतं.

तुतारी

Common name = Rice vampireweed
मराठी = तुतारी
Botanical name = Rhamphicarpa fistulosa

रोजच्या धावपळीतुन जमेल तसा वेळ काढून आपण कधीतरी कुठेतरी अटकेपार झेंडे लावतोच.  पण आपल्या घराजवळच्या टेकडीवरही बरेच काही आहे.  घर कि मुर्गी दाल बराबर असं होऊ नये म्हणून हा प्रयत्न.