Monday, February 25, 2019

गाडीरस्ता सोडून पाहिलेला वरंध घाट

फेब्रुवारी महिन्यातला तिसरा आठवडा.  थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागतेय.  तरी अजून पहाटेचा गारवा थोडाफार आहेच.  शनिवारी सकाळी फुटबॉल खेळून झाल्यावर दुपारी स्वप्नीलला विचारले, उद्या काही ट्रेक प्लॅन आहे का.  बेत जमून आला. वरंध घाट परिसरात दिवसभराची गिरिभ्रमंती करण्याचा.  शिल्पा, स्वप्नील, मोनिश, आणि मी.  ट्रेकिंगच्या भाषेत बोलायचं तर तिघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.  एक घाटवाटांची तज्ञ.  दुसऱ्याला अख्ख्या महाराष्ट्रातले किल्ले तोंडपाठ.  तिसरा खेळ आणि फिटनेस ह्या विषयात पारंगत.  त्यांच्या बरोबर मी.

शनिवारी ऑफिस आणि जेवण झाल्यावर शिल्पा मुंबईहून पुण्याकडे निघाली.  तिने तळेगाव पार केल्यावर मी आणि मोनिश पिंपळे सौदागर मधून निघालो.  शिल्पाला घेतल्यावर मुंबई बंगलोर महामार्गाने पुढे निघालो.  चांदणी चौकात स्वप्नील आमची वाट बघत थांबला होता.  पुढच्या दोन तासात चौघांच्या गप्पांचा गाडीत बराच खच पडला.  भोरच्या जवळ गाडी थांबवून छोटा ब्रेक घेतला.  मोनिशने गाडी चालवून मला आराम दिला.

पुढे गेल्यावर रस्त्यात तीन ठिकाणी ससा दिसला.  त्यातला एक बराच वेळ आमच्या गाडीच्या पुढे धूम पळत जात होता.  सश्याची मिडनाईट मॅरेथॉन.  एक मुंगसाएवढा प्राणी दिसला.  त्याच्या अंगावर काळे केस होते.  Asian palm civet.  असा प्राणी मी पहिल्यांदाच पहिला.  नंतर समजले कि ह्याला मराठीत कांडेचोर असं म्हणतात.

इच्छित स्थळी पोहोचलो तेव्हा पाच वाजत आले होते.  एक मोकळी जागा बघून गाडी थांबवली.  एका अर्धवट बांधलेल्या खोलीत झोपलो.  मोनिशने दोन स्लीपिंग बॅग आणल्या होत्या.  त्यातली एक मी घेतली.  जमिनीवर गाडीचं कव्हर टाकलं.  त्याच्यावर झोपलो.  खालून दगड टोचले.

उठलो तेव्हा साडेसात वाजून गेले होते.  स्वप्नील आणि शिल्पा आधीच उठले होते.  आम्हाला वाट दाखवायला गावात कोणीच तयार होईना.  शिल्पा आणि स्वप्नीलने बरीच खटपट केली.  पण सर्व व्यर्थ.  असे अनुभव केव्हातरी कुठेतरी येणारच.

गाडीत बसल्या बसल्या फोटोग्राफी

मग पलीकडच्या गावात जायला निघालो.  पलीकडच्या गावात फार वाईट अनुभव आला नाही.  शिल्पा आणि स्वप्नील वाट दाखवायला कोण मिळतंय का ते बघतायत तो पर्यंत मी आजूबाजूच्या परिसरात फोटोग्राफी केली.

फिरंगी धोत्रा

Common name = Mexican prickly poppy
मराठी = फिरंगी धोत्रा
Botanical name = Argemone mexicana

ह्या गावात मिळालेल्या क्लू प्रमाणे वरंध घाटाचा रस्ता पकडला.  रस्त्याच्या कडेच्या एका टपरी वजा हॉटेलात थांबलो.  इथे वडा पावची न्याहारी झाली.  दोन वेळा चहा.  तोपर्यंत आमच्याबरोबर यायला मामा तयार झाले.  आज रविवार.  धंद्याचा दिवस.  तरीसुध्दा तयार झाले आमच्याबरोबर यायला.

आजचा आमचा ट्रेक सुई दोरा ह्या प्रकारातला होता.  म्हणजे एका वाटेने डोंगर उतरून जायचं, आणि त्या वाटेला समांतर दुसऱ्या वाटेने डोंगर चढून यायचं.  वरंध घाटाच्या गाडीरस्त्याने चालायला सुरुवात केली तेव्हा पावणे दहा वाजत होते.  मामांनी वाटेतली झाडं तोडायला एक कोयता बरोबर घेतला होता.  आजचा ट्रेक अवघड वाटेने होणार हे त्यातून लक्षात आले.

वरंध घाटाचा रस्ता
रस्त्याला वर्दळ काहीच नाही.  रस्त्याच्या कडेला बरीच झाडं झुडुपं.

रामेठा
Common name = Fish Poison Bush, Balsam tree
मराठी = रामेठा
Botanical name = Gnidia glauca


इतकं बहरलेलं भामण मी इतर कुठे पाहिलं नव्हतं.

भामण

Common name = Indian Squirrel Tail
मराठी = भामण
कोकणी = भामिणी
नेपाळी = धुर्सुली, धुल्सु
Botanical name = Colebrookea oppositifolia

एका ठिकाणी रस्ता सोडून दरीच्या बाजूला उतरलो.  असं रस्ता सोडून रानाच्या वाटेला लागण्यात फार मजा आहे.  शाळेत, कॉलेज मधे असताना हा विचार माझ्या मनात बऱ्याच वेळा यायचा.  मधेच रस्ता सोडून आपण रानात जायला सुरुवात केली तर कुठे जाऊ.

नंतर टिपलेला फोटो

ता. क.  काही महिन्यांनी परत एकदा वरंध घाटात गाडी घेऊन आलो तेव्हा थांबून फोटो घेतला आम्ही कुठे रस्ता सोडून रानात शिरलो होतो त्या जागेचा.

दसमूळी
Common name = Rosy Eranthemum
मराठी = दसमूळी
कोकणी = रान अबोली
Botanical name = Eranthemum roseum

स्वप्नीलच्या बॅगेच्या पट्ट्याने दगा दिला.  त्याने वेळप्रसंगी जुगाड खटपट करेपर्यंत मला समोर निवडुंगावर लाल फुलं दिसली.  लाल फुलं असलेला हा निवडुंगाचा कोणता प्रकार ते मी नंतर राजकुमार डोंगरे सरांकडून जाणून घेतले.

निवडुंग

Common name = Leafless Milk Hedge
मराठी = निवडुंग
Botanical name = Euphorbia caducifolia


करवंद यायला अजून वेळ आहे.  आत्ता सगळीकडे फुलांचा बहर आहे.

करवंद

Common name = Karanda
मराठी = करवंद
Botanical name = Carissa carandas

थोबाडपुस्तक हा जसा वेळ वाया घालवण्याचा फालतू धंदा आहे, तसाच तो उपयोगी मित्रही आहे.  थोबाडपुस्तक म्हणजे नक्की काय ते प्रत्येकाच्या वापरावर अवलंबून आहे.  थोबाडपुस्तकातला Indian Flora हा गट माझ्यासारख्या नवशिक्यांसाठी फारच उपयुक्त आहे.

पांगळी

Common name = Bengal Pogostemon
मराठी = पांगळी
नेपाळी = रुधिलो
Botanical name = Pogostemon benghalensis

वाट एका पाड्यातून पुढे गेली.  आम्हा शहरी ट्रेकरना अशा डोंगरातल्या छोट्या गावांचं, पाड्यांचं काय कौतुक.  कसे राहतात इथे.  आणि त्यांच्यासाठी आम्हा शहरी माणसांचं कौतुक.  ह्या दोन ठिकाणातलं अंतर आता एवढं आहे, कि कनेक्ट होणं दोन्ही बाजूंकडून अवघड झालंय.  आठ दहा घरांच्या त्या छोट्या पाड्यातून चालत जाताना मला तसं जाणवलं.  कदाचित थोडा वेळ देऊन, एखादा समान दुवा शोधून प्रयत्न केला तर जमू शकेल.  शहरी लोकांनी ह्यांना खेडवळ, गावंढळ, बावळट समजण्याची चूक करू नये.  स्वच्छ नीटनेटका पेहराव म्हणजे हुशार आणि मळकट जुने कपडे म्हणजे बिनडोक असं काही नसतं.  सबंध पृथ्वीचा विचार करता ह्या पाड्यात राहणाऱ्यांचा कार्बन फूटप्रिंट शहरी माणसांच्यापेक्षा कित्येक शेकड्याने कमी असेल.

आत्तापर्यंत सरळ सोपी असलेली वाट आता उभ्या दरीत उतरू लागली.  मामा सगळ्यात पुढे.  त्यांच्या मागून मोनिश.  त्याच्या मागून शिल्पा आणि माझ्या मदतीला स्वप्नील.  काही जागा उतरून जायला मला बराच वेळ लागला.  काही ठिकाणी बसून घसपटत गेलो.  पॅन्ट फाटली तरी चालेल, डोकं फुटलं नाही पाहिजे.

कावळ्या किल्ल्याचा बुरुज, वरंध घाटाचा गाडीरस्ता वगैरे दूरवर दिसत होते.  आजपर्यंत वरंध घाट मी फक्त घाटावरून कोकणात आणि कोकणातून घाटावर जाताना गाडीत बसून पहिला होता.  आज गाडीरस्ता सोडून डोंगरात जाऊन पाहिला.

डोंगराचा कडा उतरल्यावर घनदाट जंगलातून वाट पुढे गेलेली.

पांढरी खाजकुइरी

Common name = Negro Bean
मराठी = पांढरी खाजकुइरी
Botanical name = Mucuna monosperma

घनदाट जंगलातून थोडं पुढे गेल्यावर आम्ही एका सुकलेल्या ओढ्याच्या पात्रात पोहोचलो.  दोन चार ठिकाणी अजून पाणी होतं.  तोंड धुतलं.  रिकाम्या झालेल्या बाटलीत पाणी भरून घेतलं.  आता ह्या सुकलेल्या ओढ्याच्या पात्रातून आम्ही पुढे जायला सुरुवात केली.

सुकलेल्या ओढ्याचं पात्र
दुपारच्या उन्हात थकवा जाणवत होता.  अशा वेळी लक्ष विचलित झालं कि घात होतो.  हे पूर्णवेळ ध्यानात ठेऊन कुठेही दगडावरचा पाय न चुकवता ह्या दगड धोंड्यांनी भरलेल्या सुक्या ओढ्यातून जात राहिलो.

एका ठिकाणी ओढा सोडून उजवीकडची वाट घेतली.

जमिनीलगत पसरलेल्या वेलीवरचं पांढरं फुल


शिवथर घळीपर्यंत न जाता आधीच उजवीकडे वळून जावे असा आमचा जो विचार होता तसे काही झाले नाही.  ज्या वाटेने मार्गक्रमण करत गेलो तिथून शिवथर घळीपर्यंत पोहोचलो.  दुरवरूनच कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले.  गाडीरस्ता सोडून रानातल्या वाटेने इथे येणाऱ्या आम्हाला बघून कुत्र्यांनी त्यांची कामगिरी पार पाडली. भुंकणे हे कुत्र्यांचे कामच आहे.  त्याचा आपण राग मानू नये.  तसेच त्यांची वर्तणूक फार मनावर घेऊ नये.  त्यांना त्यांचे काम करू द्यावे.  आपण आपल्या मार्गाने जात राहावे.  आपण शिवथर घळीजवळच्या कुत्र्यांबद्दल बोलतोय.  दैनंदिन जीवनात कधे मधे भेटणाऱ्या मनुष्यरूपी कुत्र्यांबद्दल नाही.  आपल्या तुकड्याने सांगितलेच आहे, निंदकाचे घर असावे शेजारी.  ते विसरू नये.  त्यामुळे Thank you for making me who I am today असं म्हणून आपण पुढे जात रहावे.  सर्वांना पुरून उरावे.  अशी दुर्दम्य इच्छाशक्ती, आणि तिच्या जोडीला चिवट काटक मनोवृत्ती बनवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ट्रेक करावा.  अवघड असा करावा.  हार मानू नये.  ट्रेकिंग का करावे ह्या प्रश्नाच्या छप्पन्न उत्तरांपैकी हे एक.

गंजलेला फलक
एका छोट्या हॉटेलात विसावलो.  तोंड धुवायला पाणी.  बसायला टेबल खुर्ची.  आयतं ताटभर जेवण.  दिवसभराच्या endurance ट्रेक मधे असं काही मिळणं म्हणजे वाळवंटातलं ओएसिस.  प्रत्येकाने जितकी भूक असेल त्याप्रमाणे जेवण केले.  मी जेवणाला सुट्टी दिली.  अशा दिवसभराच्या ट्रेक मधे मला फक्त पाणी हवे असते.

शिवथर घळीच्या पवित्र स्थानाला ट्रेकर परंपरेनुसार नमस्कार करून पुढे निघालो.  चढावरचा डांबरी रस्ता दिसल्यावर मी जमेल तेवढी स्प्रिंट मारली.  डांबरी रस्ता कसबे शिवतर गावात संपला.  इथून आम्हाला वाट विचारून त्याप्रमाणे पुढे जायचं होतं.  गावातल्या सगळ्या घरांसमोर शुकशुकाट.  वाट विचारावी कोणाला.  एका घराच्या ओसरीत शिक्षण, गावातले प्रश्न, वगैरे विषयांवर घहन चर्चा चालू होती.  त्यातल्या एकांनी आम्हाला वाट समजावून सांगितली.  एक मिनिटात हि वाट सोडून उजवीकडची वाट घ्या.  मग ती वाट बिलकुल सोडू नका.  त्या वाटेने जात रहा.  काही शेतं ओलांडून पुढे जा.  पुढे गेल्यावर एक मंदिर लागेल.  तिथून पुढे जा.  हे मनात ठेऊन तिथून निघालो.

गावाबाहेर कुठेतरी चंद्रराव मोरेंच्या वाड्याचे अवशेष आहेत.  ते आमचे बघायचे राहून गेले.  परत कधी आलो तर बघू.  हो तेच जावळीचे चंद्रराव मोरे.  इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले.

एका झाडाखाली एक भंगलेली हनुमानाची मूर्ती होती.  एक घाव नि दोन तुकडे.  हे छायाचित्र जर थोबाडपुस्तकातल्या भिंतीवर टाकलं, तर दोन चार पुरोगामी बुद्धिवादी सापडतीलच, "मूर्तिभंजक नाही हो, रानात वीज पडून तुटली असेल" असा युक्तिवाद मांडणारे.  भारतवर्षातल्या समाजाचं हेच तर दुर्दैव आहे.  हमे तो अपनोने लुटा गैरोमे कहा दम कहा था, मेरी कश्ती थी डुबी वहा जहा पानी कम था, असं काहीसं नशीब आहे इथलं.  असो.  विषय भलत्या दिशेला न्ह्यायला नको.

हनुमान
मूर्ती भंगलेली असल्यामुळे गावकऱ्यांनी शेंदूर फासून केशरी केली नव्हती.  आपली शक्तीची देवता अशीच कुठे कुठे रानावनात आपल्याला भेटण्यासाठी थांबलेली असते.  दगडूशेटचा बडेजाव शहरातल्या गर्दी गोंधळात.  रानावनातलं शक्ती युक्तीचं गणित त्या गर्दी गोंधळात कधीच समजू शकत नाही.  त्यासाठी असा मोकळ्या आभाळाखालचा परमभक्त हनुमान रानातच भेटावा लागतो.

काही शेतं ओलांडून पुढे गेलो.  दूरवरचं एक लाल फुलांचं झाड लक्ष वेधून घेत होतं.

सावर

Common name = Silk Cotton Tree
मराठी = सावर
नेपाळी = सिमल
Botanical name = Bombax ceiba

सावराचं जमिनीवर पडलेलं फुल
पुढे वाट पोहोचली एक नेहमी पाणी असलेल्या झऱ्यापाशी.  इथे एक मोठं झाड कापून पाडलेलं.

कापून पाडलेलं एक मोठं झाड

डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाट तशी सोपी आहे.  मामा, मोनिश, आणि स्वप्नील अजूनही वेगात चालत होते.  आता शिल्पा आणि माझा वेग थोडा कमी व्हायला लागला.

Fabaceae कुळातील एक झाड

पिवळ्या फुलांची झुडुपं सकाळपासून काही ठिकाणी दिसली.  हे Showy Rattlepod किंवा Rattleweed ह्यापैकी एक आहे.  नक्की कोणते ते ओळखू शकलो नाही.

आता आम्हाला समोरचा डोंगर चढून वर जायचं होतं.  शिल्पा सकाळपासून GPS track बघून आम्ही योग्य मार्गाने जात आहोत ना ह्याच्यावर लक्ष ठेऊन होती.  डोंगर चढायची वाट नक्की कुठून सुरु होतेय ते आम्हाला सापडेना.  मामांसाठीही हि वाट नवीन होती.  आम्ही GPS track जिथे होता त्याच्या पुढे आलो होतो.  मागे जायला वाट सापडेना.  जमेल तिथून वाट काढत गेलो.  मामा, मोनिश, आणि स्वप्नील पुढे, आणि त्यांच्या मागून शिल्पा आणि मी, असे आता आमचे दोन गट बनले.

इच्छा तिथे मार्ग
Where there's a will, there's a way
शिवथर घळीतल्या हॉटेलचे मालक सांगत होते खड्या चढणीचा हि वाट आहे तेव्हा ऐकायला मला मजा वाटत होती.  खडी चढण म्हणजे नक्की काय ते आता समजत होते.  बऱ्याच ठिकाणी सरळ उभं राहून चढत जाणं माझ्यासाठी अवघड होतं.  खाली वाकून आधाराला हाताने काहीतरी पकडून पुढे गेलो.  हाताच्या आधाराला दगड क्वचित कुठेतरी.  अधे मधे झाडांच्या फांद्या.  पण फांद्या तपासून घ्याव्या लागत होत्या.  बऱ्याचशा लांबलचक वाळलेल्या फांद्या नुसत्याच जमिनीवर पडलेल्या होत्या.  त्यामुळे हाताने जोर देण्याआधी फांदी तपासायची.  काही दगडही हलणारे होते.  त्यामुळे पायाखालच्या दगडावर भार देण्यापूर्वी तोही तपासून बघावा लागत होता.  जिथे हाताच्या आधाराला फांद्या नव्हत्या तिथे चार पाच छोट्या झुडुपांच्या दांड्या एकत्र धरून त्यांच्या आधाराने चढलो.  ह्या सगळ्यात चढण्याचा वेग मंदावलेला.  मामा, मोनिश, आणि स्वप्नील पुढे जाऊन थांबायचे.  मी आणि शिल्पा आम्हाला जमेल तसे थोड्या वेळाने तिथपर्यंत पोहोचायचो.

सोप्या टप्प्यामधे  ...  वाळलेल्या गवतामधून गेलेली वाट

सहा वाजत होते.  थोड्याच वेळात दिवस संपणार होता.  आजचा ट्रेक पूर्ण करायला अजून बराच पल्ला गाठायचा होता.  आमची पायगाडी ज्या गावात पोहोचणार होती तिथपासून Nissan Terrano आम्ही बरीच लांब ठेवलेली होती.  ते दहा किलोमीटरचं अंतर चालत जाणं फार अवघड झालं असतं.  आता मामा, मोनिश, आणि स्वप्नीलने वेग वाढवून पुढे जाऊन त्या दहा किलोमीटर अंतरासाठी काही गाडी मिळते का ते बघावं असा आम्ही निर्णय ठरवला.  सकाळी गावात एकांना सांगून ठेवलं होतं आम्ही संध्याकाळी येतो म्हणून.  तिथे जर दुचाकी मिळाली तर मोनिश पुढे जाऊन Terrano आणणार होता.  एका पिशवीत एक पाण्याची बाटली आणि हेड टॉर्च मी बरोबर घेतला.  बाकी दोन बॅगा स्वप्नील आणि मोनिश घेऊन गेले.

मामा, मोनिश, आणि स्वप्नील तिघं वेगात पुढे गेले.  शिल्पा आणि मी त्यांच्यापेक्षा थोड्या कमी अशा वेगात, आम्हाला जमेल तेवढ्या.  डोंगराच्या शेवटच्या टप्प्यात आमची जरा गडबड झाली.  मी शॉर्टकट मारण्यासाठी डावीकडे वळत सरळ वाट सोडली.  आम्ही GPS track सोडला ते बघून शिल्पा ने आमची पायगाडी परत track वर आणली. ह्यात आमचे पुढे गेलेले तिघं सह्यमित्र आमच्या पुढे जाऊन दिसेनासे झाले.

कानफुटी

Common name = Wild Hops
मराठी = कानफुटी
नेपाळी = भटमासे
Botanical name = Flemingia strobilifera

गाव जवळ तर आलंय पण अजून किती जायचंय ते कळत नाहीये.  थकवा तर आलाय पण अजून बराच पल्ला गाठायची तयारी आहे.  एका बाजूला सूर्य मावळतोय आणि दुसऱ्या बाजूला चंद्र उगवतोय.  सर्व परिसरात तांबूस प्रकाश.  वाळलेल्या गवतातून गेलेली वाट.  प्रत्येक ट्रेक मधले शब्दात वर्णन करता न येणारे जे काही क्षण असतात त्यापैकी आजचे हे.

गावात पोहोचल्यावर चाहूल घेत होतो.  एका दादांनी आम्हाला आवाज दिला.  आमचे सह्यमित्र काही वेळापूर्वी इथे येऊन गेले होते.  आमच्यासाठी निरोप ठेवला होता.  त्याप्रमाणे आम्ही गाडीरस्त्यावर जाऊन थांबलो.  रस्त्याला काहीच गाड्या नाहीत.  एक दुचाकी आली तीन स्वारांची.  त्यांना निरोप दिला आमचे पुढे गेलेले तीन सह्यमित्र किंवा काळी गाडी दिसली तर त्यांना आम्ही कुठे आहोत ते सांगा म्हणून.

साडेसात वाजले असतील.  रस्त्याच्या कडेला बसून राहण्यापेक्षा आम्ही चालायला सुरुवात केली.  थोड्या वेळाने दूरवरून येणाऱ्या एका गाडीचे दिवे दिसले.  एक छोटा टेम्पो आमच्या पुढ्यात येऊन थांबला. आमचे तिन्ही सह्यमित्र ह्या छोट्या टेम्पोतुन उड्या मारून उतरले.

आता स्वप्नील, शिल्पा, मोनिश, आणि मी टेम्पोच्या मागच्या भागात, तर मामा, टेम्पोचालक, आणि त्याचा मित्र टेम्पोच्या केबिन मधे.  पुढे आवाज देऊन आम्ही आमच्या इथला लाईट बंद करायला सांगितला.  अंधारात मोकळ्या रस्त्यावरून टेम्पो पळत निघालेला.  टेम्पोच्या मागच्या भागात आम्ही चौघं चार बाजूंना पहुडलेलो.  थंड वारा.  वर चांदण्यांनी भरलेलं आकाश.  आजच्या अवघड ट्रेकचा असा सुखद शेवट.  सकाळी मामांच्या हॉटेलातून घेतलेले वडा पाव आणि भजी अजून पिशवीतच होती.  ते सगळं संपवलं.

टेम्पोतुन सवारी

मामांचं हॉटेल आल्यावर हॉटेलात विसावलो.  चहा प्यायलो.  सकाळपासून बंद असलेला कुटीर उद्योग मोनिशने परत सुरु केला.  टेम्पोवाल्या दादांना आणि मामांना त्यांचं मानधन दिलं.  त्यांचा निरोप घेऊन Terrano मधे बसून निघालो.

भोर जवळ चहाचा विचार होता.  पण वेळ जेवणाची होती.  त्यामुळे कुठे चहा मिळाला नाही.  आज स्वप्नीलच्या जोडीला मोनिश दुसरा चहाप्रेमी.  मोनिशने गाडी चालवून मला आराम दिला.  गावातल्या रस्त्यांवर मोनिश जोरात गाडी चालवतो.  तर मी हळू.  मुंबई बंगलोर हायवेला लागल्यावर मोनिशने एकदम गुणी मुलासारखी गाडी एका लेन मधे शिस्तीत चालवायला सुरुवात केली.  टोल नाक्याच्या पुढे आम्ही जेवायला थांबलो.  इथून पुढे मी गाडी चालवली.

पहिला स्टॉप स्वप्नीलचा.  पुढे वाकड जवळ मुंबईला जाणाऱ्या गाड्या बघत थांबलो.  थोड्या वेळाने एक लाल डब्बा आला.  किंवा लाल परी आली म्हणा.  नक्की काय ते तुमच्या बघण्यावर आहे.  शिल्पा मुंबईच्या दिशेने गेल्यावर मोनिश आणि मी पिंपळे सौदागरच्या दिशेने निघालो.  घरी पोहोचलो तेव्हा एक वाजला असेल.

दुसऱ्या दिवशी माझे फक्त पाय नाही तर खांदेही दुखत होते.  थकव्याची भरपाई व्हायला मला दोन दिवस लागले.  ह्या ट्रेकचं समाधान बरेच दिवस पुरेल.  तसा आम्ही पुढचा प्लॅन बनवलाय.  बघू कधी जमतो ते.

Thursday, February 14, 2019

एव्हरेस्ट - शाप कि वरदान

एव्हरेस्ट.  हा फक्त एक गरम मसाल्याचा ब्रँड म्हणून आपणास माहिती असल्यास कृपया हा लेख वाचण्याची तसदी घेऊ नये.  उगाच कशाला वेळ वाया घालवावा.

एव्हरेस्ट शब्द ऐकल्यावर किंवा वाचल्यावर जर तुमच्या मनात सगरमथ्था किंवा चोमोलुंगमा हे शब्द येत असतील तर तुमचे सहर्ष स्वागत आहे.

ह्या दोन टोकाच्या श्रेणींच्या मधल्या पट्ट्यातल्या ट्रेकर्स, हायकर्स व इतर सर्व जणांचेही सहर्ष स्वागत.

एव्हरेस्ट.  कित्येकांसाठी एक अपूर्ण स्वप्न.  काहींसाठी जग जिंकल्याचा दाखला.  कोणासाठी एखाद्या पुस्तकात पाहिलेली एक साहसी जागा.  कोणासाठी त्यांच्या आयुष्यात गाठण्याचं सर्वोच्च धेय्य.  कोणासाठी फक्त EBC वर समाधान.  कोणाच्या अष्टहजारी शिरपेचामधला एक मानाचा तुरा.  असे आणखी अनेक दृष्टिकोन सापडतील.

इंटरनॅशनल माउंटन म्युझियम मधला एक फलक.  पोखरा, नेपाळ

मागच्या वर्षी मी एक डॉक्युमेंटरी फिल्म पाहिली.  LOVED BY ALL: THE STORY OF APA SHERPA.  एकदा पाहिल्यावर नंतर अनेकदा इंटरनेट वर शोधून शोधून पाहिली.  पहिल्यांदाच एव्हरेस्ट एका वेगळ्या नजरेतून बघायला मिळाला.  स्थानिकांच्या.

कळसुबाई, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर.  एकदा १५ ऑगस्ट च्या धुकं आणि पावसाने भरलेल्या सकाळी कळसुबाईच्या शेवटच्या टप्प्यात जिथे बऱ्याच जणांची "कधी एकदा संपते हि वाट" अशी अवस्था झालेली, तिथे खालच्या बारी गावातले ८० वयाचे आजोबा पायात साधे पावसाळी बूट, पाठीवर ओझं, त्यावर घोंगडी, आणि हातात काठी घेऊन तरुण ट्रेकर लाजतील अशा वेगात चढून चाललेले.  तो त्यांचा आदीवास आहे.  तिथे कसं जगायचं आणि कसं राहायचं हे त्यांना पिढ्यानपिढ्या शिकायला मिळालंय.  उनकी गली मे वो शेर होते है.

एव्हरेस्ट परिसरातले असे जे शेर आहेत त्यांना शेर्पा म्हणून ओळखतात.  तिथले स्थानिक रहिवासी.  समुदाय म्हणून विचार केला तर जगातले सर्वोत्कृष्ट पर्वतारोही.  एव्हरेस्ट ह्यांच्या शिवाय पुरा होत नाही.  माझा विचार तर आजही तोच आहे - You don't climb Mount Everest. The sherpas do it for you.  पटत नसेल तर जाऊदे.  राहिलं.  शेर्पांना खरंच खूप आवडतं का हो एव्हरेस्ट सर करायला?  आणि इतरांना सर करण्यासाठी मदत करायला?  थोड्या वेगळ्या शब्दात मांडायचं तर, समोर जीवन मरणाचा प्रश्न आहे हे माहिती असतानाही तो धोका पत्करायला?  आपा शेर्पांच्या शब्दात सांगायचं तर, "I climbed Mount Everest twenty-one times.  But I wouldn't wish this for anybody."  शिक्षण, पैसा, चैन हे सगळं शेर्पांसाठी दुर्मिळ जग आहे.  आणि अतिशय खडतर जीवनशैलीची शेर्पांना उपजतच सवय आहे.  तिथे येणाऱ्या पर्वतारोहींना एव्हरेस्ट सर करवणे हा शेर्पांसाठी प्रगतीचा उत्तम मार्ग आहे.  High risk आहे, पण high benefits हि आहेत.  काय म्हणायचं खुम्बू व्हॅली मधे राहणाऱ्या शेर्पांना आणि त्यांच्या परिस्थितीला?  शापित वरदान?  An evitable conflict?

"Without education we have no choice."  -- Apa Sherpa
You never know how strong you are until being strong is the only choice you have.  असं कोण कोणास म्हणाले ते मला माहित नाही.
ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजायच्या का?

एव्हरेस्ट हे ब्रिटिशांनी ठेवलेलं नाव.  ह्या जागेला तिबेटी भाषेत म्हणतात चोमोलुंगमा.  Holy Mother.  नेपाळी भाषेत सगरमथ्था.  Goddess of the sky.  तिबेटी आणि नेपाळी लोक पर्वत शिखरांना पवित्र स्थान मानतात.  त्यातलंच हे एक पर्वत शिखर, जिथे सर्व देशातले हौशे, गवशे, नवशे, तज्ञ, कुशल, अकुशल, सगळ्या प्रकारचे पर्वतारोही एखाद्या मॅग्नेटने खेचून नेल्यासारखे पोहोचतात.  नेपाळ देशासाठी पैसे कमावण्याचं हे एक महत्वाचं माध्यम आहे.  नैसर्गिक साधन-संपत्तीचा अभाव, गरीब देश.  त्यामुळे एव्हरेस्ट ह्या माध्यमातून पैसे कमावले तर ते योग्यच आहे.  भारताबरोबर तुलना केली तर अनेक बाबतीत भारताच्या तीसेक वर्ष मागे असलेला हा देश.  गर्दी, गोंगाट, बेशिस्त, अनागोंदी कारभार ह्यात आपल्याही पुढे.  एव्हरेस्ट मुळे जितका पैसा मिळतोय तितका त्यांनी मिळवावा.  ते योग्यच आहे.  पण आपली हि सोन्याचं अंडं देणारी कोंबडी निरोगी राहील आणि दीर्घायुषी होईल हा नेपाळच्याच भल्यासाठीचा विचार?

आज एव्हरेस्ट वर भरपूर कचरा साठतोय.  गिर्यारोहकांनी सोडून दिलेले टेन्ट, ऑक्सिजन सिलिंडर, शी, शु, मेलेल्या गिर्यारोहकांपर्यंत सर्वकाही.  हे बघा.  जरा ह्यात धुंडाळून पण बघा.

पलीकडचा भूतान बघा.  स्वप्नवत प्रदेश, आणि आजही स्वतःचं वेगळेपण जपणारा.  कार्बन फूटप्रिंट फक्त झिरो नाही तर सरप्लस असलेला पृथ्वीवरचा एकमेव देश.  ते अभिमानाने सांगणारा.  GDP नाही तर GNH मधे स्वतःच्या देशाची आणि देशवासीयांची श्रीमंती मोजणारा.  तुलना करायची नाही असं कितीही ठरवलं तरी ह्या दोघांची तुलना हि होतेच.  वेगवेगळ्या दिशेने मार्गक्रमण करणारी हि दोन भावंडं.  एव्हरेस्ट आणि कंगकर पुनसुम ह्यांची तुलना करायची नाहीये आपल्याला.  त्यामुळे आज आपण फक्त एव्हरेस्ट आणि नेपाळ बद्दलच बघूया.

आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.  आपण एव्हरेस्ट बद्दल विचार मंथन करतोय.  आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या जिल्ह्यात डोंगरांची काय परिस्थिती आहे, असा विचार?  आपल्या घराजवळच्या टेकडीवर जाऊन आपण कधी चार झाडं लावलीयेत?  दोन बाटल्या पाणी नेऊन कधी त्या टेकडीवरच्या झाडांना घातलंय?  अटकेपार झेंडे जरूर लावावे.  तसेच आपल्या घराजवळच्या टेकडीलही विसरू नये.  तिथूनच तर आपली तयारी होते सीमोल्लंघन करून नवनवे डोंगर मुलुख सर करण्याची.

मग तयारी झाल्यावर, सगळं जुळून आल्यावर पडावं घराबाहेर.  नेपाळ मधे सगळ्यांचं स्वागतच असेल.  एव्हरेस्ट सोडून इतरही शेकडो जागा आहेत तिथे.  आपा शेर्पांच्या शब्दात सांगायचं तर, "The true beauty of Nepal isn't the mountains.  But the people who live in their shadow."  समजून घेणं थोडं अवघड आहे.  पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

अन्नपूर्णा पर्वतरांगेतील शिखरं न्याहाळताना
पोखरा विमानतळावरून गायरोकॉप्टर मधून भ्रमंती

तळटीप : वाचकांची एव्हरेस्ट किंवा अन्य कोणतीही पर्वतारोहण मोहीम पाण्यात बुडवण्याचा लेखकाचा उद्देश नाही.  आठ हजार मीटर पेक्षा जास्त उंचीवर, म्हणजे डेथ झोन मधे कशासाठी जातात ह्याची लेखकाला (पुसटशी) कल्पना आहे.  अगदीच काही नाही तर "ह्याला काय समजतंय" असा विचार करून विषय सोडून द्यावा.

Saturday, February 9, 2019

खरडवहीतलं एक पान - कळसुबाई शिखर

खरं तर हि बखर आहे पण वेळेअभावी आज तिची खरडवही बनवतोय.  २६ जानेवारी २०१९, भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सहकुटुंब सर करण्याचं भाग्य आम्हास लाभलं.  त्यानिमित्त ह्या चार ओळी खरडवहीत उमटवल्या.

२६ जानेवारी २०१९, भारताचा सत्तराव्या प्रजासत्ताक दिन शनिवारी आल्यामुळे ह्या शुभ दिवशी कळसुबाई सर करायला खूप गर्दी असेल असं वाटलं होतं.  पण आमच्या अपेक्षेपेक्षा कमी गर्दी होती.

शुक्रवारी रात्री जेऊन झाल्यावर पुण्यातून निघालो.  बारी गावात रात्री कधीतरी तीन वाजता पोहोचलो.  पोहे आणि चहा संपवून डोंगर चढायला सुरुवात केली.  अंधार असल्यामुळे किती लांब जायचंय ते कळतच नव्हतं.  पुढे गेलेल्या ग्रुपच्या बॅटऱ्या चमकत होत्या.  त्यामुळे वाट कुठे आहे त्याचा अंदाज येत होता.  मागच्या वेळी बारी गावातल्या कुत्र्यांचा उपद्रव झाला होता तसा ह्या वेळी झाला नाही.

शिड्या चढून गेलो तेव्हापण अंधार होता.  पुढे काही ठिकाणी वाटेच्या बाजूला पिवळे दिवे चालू होते.  एक एक दिवा गाठत वाटचाल करत राहिलो.

सूर्योदय व्हायच्या आधी आम्ही कळसुबाई शिखरावर पोहोचलो होतो.  बरोबरचे काही स्वछंद गिर्यारोहक यायला वेळ होता.  सगळे येईपर्यंत आम्ही तासभर तरी शिखरावर होतो.  कसे होतो विचारू नका.  मंदिराच्या मागच्या भिंतीला टेकून बसलं तर जरा बरी परिस्थिती होती.  तिथून जरा लांब गेलो कि थंड वारा झोडपून काढत होता.  वाऱ्याच्या झोतात एका जागी थांबलं तर त्या दिशेने कपड्यांवर बारीक हिमकण जमा होत होते.

२६ जानेवारी २०१९, भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर, सहकुटुंब, महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर

हाडं गोठवणारी थंडी, बोचरे वारे, कडाक्याचा गारठा, वगैरे वगैरे सगळं फिकं पडेल असं वातावरण होतं कळसुबाई शिखरावर.  थंडी वाऱ्याचा इतका कडकडाट अपेक्षित नसल्यामुळे आम्ही फारशा तयारीनिशी नव्हतो.  बॅगेतून कॅमेरा बाहेर काढलाच नाही.  खिशात हात घालून मोबाईल पण बाहेर काढू शकलो नाही.  हाताची बोटं थंडगार सुन्न आणि कडक झालेली.

दीप्ती आणि खुशीने थंडीचा तडाखा सहन करून, न थकता ट्रेक पूर्ण केला.  अवघड ट्रेक खुशी न धडपडता यशस्वीरीत्या पूर्ण करते ह्यावर आधीच शिक्कामोर्तब झालेलं आहे.

स्वछंद गिर्यारोहकांबरोबर केलेला प्रत्येक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण होतोच, तसेच संस्मरणीयही ठरतो हि परंपरा कायम राहिली.

ट्रेकचं योग्य नियोजन, आणि त्या दिवशी समोर असलेली परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार विशालने उत्तम प्रकारे ट्रेक पार पाडला.

लोखंडी शिड्या उतरताना गर्दी होती.  शिड्यांच्या भागात ह्यावेळी माकडांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला.

निम्मा रस्ता उतरल्यावर मी कॅमेरा बॅगेतून बाहेर काढला.  कॅमेरा हातात आल्यावर माझा आणि खुशीचा वेग निम्म्यावर आला.

पंगुं लंघयते गिरिम् असं कधीतरी कुठेतरी वाचणं आणि प्रत्यक्षात समोर बघणं ह्यात बराच फरक आहे.


पंगुं लंघयते गिरिम्
Enlightened souls seen during trek to Kalsubai, the highest peak in Maharashtra
 on morning of 26 January 2019, the 70th Republic Day of India


भामण

Common name = Indian Squirrel Tail
मराठी = भामण
नेपाळी = धुर्सुली
Botanical name = Colebrookea oppositifolia

उतरताना दुसऱ्या टप्प्याला गर्दी कमी झाल्यावर खुशी आणि मी झाडांचे, फुलांचे फोटो काढले.

डोंगरातले ढग   ...  आणि ढगातले डोंगर

गोरखमुंडी

Common name = East Indian Globe Thistle
मराठी = गोरखमुंडी
Botanical name = Sphaeranthus indicus

बारी गावजवळचं लोखंडी प्रवेशद्वार


कळसूबाईचा प्रसाद


बारी गावातली शेतं, पलीकडे डोंगराळ भाग