Sunday, April 26, 2020

माझा पुढचा ट्रेक

लै मोकळा वेळ मिळतोय सध्या चायनीज व्हायरस मुळे.  म्हणून पुढच्या ट्रेक ची कथा आत्ताच लिहून ठेवतोय.

सध्या माझा नवीन ठिकाणी ट्रेक विशाल, स्वप्नील, शिल्पा ह्यांच्या शिवाय पूर्ण होत नाही.  अनेक वर्ष चालू असलेला प्रवास एखाद्या परफेक्ट वळणावर येऊन थांबतो तसं आहे हे.  कुठे जातोय, कधी पोहोचायचंय ह्याचा विचार प्रवाशाने केलेला नसतो.  त्याने पुढे जात राहिलेले असते.  दुनिया बघत तो पुढे गेलेला असतो.  मग कधीतरी कुठेतरी चार टाळकी सापडतात ज्यांना सोडवून पुढे जाता येत नाही.  चौघंही वेगवेगळ्या प्रकारची.  तरी चौघात मिळून जे ट्रेक बनतात ते जगात भारी बनतात.  ट्रेकिंग हे असंच असतंय.  सुरुवातीला ट्रेक प्लॅन ठरवायला आमचा चौघांचा एक छोटा WhatsApp ग्रुप बनायचा.  आता त्याचीही गरज नाहीये.  कुठल्या जागी धाड टाकायचीये त्याचा प्लॅन शिल्पा बनवणार.  सह्याद्रीतल्या गर्दी नसलेल्या एकापेक्षा एक जागांची लिस्ट आहे तिच्याकडे.  आणि हि लिस्ट किती मोठी आहे हे कोणालाही माहिती नाही.

दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी पुण्याकडे निघणारी शिल्पा काही कामात अडकून जेव्हा खरोखर पुण्याच्या दिशेने सुरुवात करते तेव्हा संध्याकाळ संपलेली.  लाल डब्या पासून अंबानींच्या विमानापर्यंत कोणतेही वाहन तिला चालते.  अख्ख्या जगात ह्या ताई कुठेही कशाही कधीही फिरू शकतात.  शिल्पा बस मधे झोपल्यावर तिचा फोन लागत नाही.  तोपर्यंत पुण्यातले आम्ही जेवण आटोपून तयार होतो.  चार टाळकी गोळा होऊन मार्गस्थ होई पर्यंत घड्याळातला दिवस संपून दुसरा सुरु झालेला.  सुरुवातीला मी माणसात राहून गाडी चालवतो.  बरोबर जर कोणी गाडीवान तयार असेल तर त्याला गाडी चालवायला देतो.  बरोबर दुसरा गाडीवान नसेल तरी हरकत नाही.  सकाळी सात वाजेपर्यंत मला गाडी चालवता येते.  त्यामुळे फिकर नॉट.  पण रस्ता सांगायला मला बाजूला कोणीतरी navigator लागतो.

स्वप्नील आणि शिल्पा ह्या दोन बावनकशी "ट्रेक लीड" च्या ट्रेक गप्पा माझ्या डोक्यावरून जातात.  असो.  मी पण मग नेपाळ, भूतान, म्यानमार अशा ठिकाणांचं माझं ज्ञान पाजळतो.  ते बिचारे सगळं ऐकून घेतात.  मुंबई विरुद्ध पुणे हा विषय येणारच.  कोल्हापूर विरुद्ध पुणे हा विषयच नाहीये.  तसं विशाल चाव्या फिरवण्यात पटाईत आहे.  त्याच्याकडून मी शिकतोय कुणाच्या चाव्या कशा फिरवायच्या.

ज्यांना झोपायचंय ते मागच्या सीट वर आणि ज्यांना जागं राहायचंय ते पुढच्या सीट वर अशी सोपी आसन व्यवस्था आहे आपल्याकडे.  पुण्यापासून दूर गेल्यावर रस्त्याचं ट्रॅफिक कमी होतं.  मग माझ्यातला WRC ड्रायव्हर थोडासा जागा होतो.  WRC म्हणजे World Rally Championship.  माझे पप्पा जर बिर्ला किंवा अंबानी असते तर मी नक्कीच WRC ड्रायव्हर झालो असतो.  पण सध्या रात्रीच्या मोकळ्या रस्त्यांवर Terrano पळवण्याचा आनंद घेतोय.  गावातले छोटे रस्ते लागले कि मग मात्र मी परत माणसात येतो.  गावातल्या छोट्या रस्त्यांवर मी कधीच गाडी जोरात पळवत नाही.

ससा पळताना दिसला कि मी समजतो, जिथे जायचंय ते गाव जवळ आलंय.  शिल्पा किंवा स्वप्नील पूर्ण वेळ मॅप बघत असतात.  त्यामुळे चुकण्याची शक्यता जवळपास शून्य.  आणि थोडं इकडे तिकडे झालं तर बिघडलं कुठे.  रात्रीच्या अंधारात आम्ही बरोबर शोधून काढतो कुठे थांबायचंय ते ठिकाण.  योग्य जागा बघून मी गाडी लावून देतो तिच्या विश्रांतीसाठी.  आम्ही जिथे पोहोचलो असतो तिथे मोबाईल ला रेंज नाही आणि रेडिओलाही रेंज नाही.  तुझी आवडती जागा कोणती असं जर मला कोणी विचारलं तर हि अशी.  जी जगाच्या कोलाहलापासून खूप खूप दूर आहे.  मी सोडून बाकी सर्व जण आपापल्या स्लीपिंग बॅग बाहेर काढतात.  माझ्याकडे अजूनही स्लीपिंग बॅग नाहीये.  अंदाजे चार वाजलेले असतात.  दोन तास झोपायचा प्लॅन ठरतो.

रोज्याप्रमाणे मी पहाटे उठतो.  बाकीची सगळी टाळकी त्यांच्या त्यांच्या जगात हरवलेली.  मग माझा आजूबाजूला फेरफटका होतो.  आपण कुठे आलोय त्या परिसराची पाहणी होते.  जमतील तसे फोटो काढून होतात.  तोपर्यंत सर्व टाळकी त्यांच्या त्यांच्या जगातून बाहेर येतात.  गावकऱ्यांशी संवाद साधणे हे शिल्पाचं आवडतं काम आहे.  आम्ही त्यात व्यत्यय आणत नाही.  इतरांचं आवरून होतंय तोपर्यंत तिने गावातल्या एका घरातून चहाची व्यवस्था केलेली असते.

सगळं आवरून आम्ही निघेपर्यंत सात वाजून गेलेले असतात.  दिवसभरात कसा किती आणि कुठे ट्रेक आहे ह्याचा मला बिलकुल पत्ता नसतो.  पण महाभारताच्या कथेमधून मी शिकलेलं असतं कि कृष्णाच्या अफाट सेनेपेक्षा एकटा कृष्ण, निःशस्त्र असणार असला तरी बरोबर घ्यावा.  इथे तोडीस तोड तीन अवतार बरोबर, तेसुद्धा लढायच्या तयारीत.  मग कसली भीती.  माकडनाळेत काय, लिंगाण्यावर काय, कुठेही न्या मज पामराला.  आजची शिल्पाने शोधलेली वाट माझ्यासाठी अवघड श्रेणीतली अशीच असते.  आम्ही गावातून निघताना गावकऱ्यांचा इशारेवजा संदेश मला त्याची आधीच वर्दी देऊन गेलेला असतो.  बहुतेक सगळा वेळ मी सगळ्यात मागे राहून चालत असतो.  जमतील तसे झाडांचे, फुलांचे, परिसराचे फोटो काढतो.  मधेच कधीतरी पाच मिनिटं लीड ला राहिल्यावर मला नव्वद मिनिटांच्या फुटबॉल मॅच मधे शेवटच्या पाच मिनिटाला खेळायला येऊन गोल मारणाऱ्या substitute सारखा फील येतो.  नव्वद मिनिटं किल्ला लढवणारे शांत असतात.

ट्रेक मधल्या सगळ्यात अवघड ठिकाणी स्वप्नील किंवा विशालची मदत घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो.  एकट्याने चुकूनही कधी पाय ठेवला नसता अशा जागा मी ह्यांच्याबरोबर पार करतो.  जमलं तर फोटो काढून ठेवतो.  कुठच्या कड्यावरचा कुठल्या कोपऱ्यातून मी काठावर पास झालोय त्या आठवणींसाठी.

पूर्ण दिवसभरात सगळ्या जागांवरून आजूबाजूला दिसणारे सगळे डोंगर स्वप्नीलशी गुजगोष्टी करत असतात.  एकवेळ ह्याच्या घरातले स्टेपलर आणि नेलकटर नाही सापडणार ह्याला, पण अख्ख्या सह्याद्रीतले झाडून सगळे डोंगर किल्ले ह्याचे ओळखीचे आहेत.  कित्येक तर त्याचे जिवाभावाचे सखे सोबती आहेत.  वेडा माणूस आहे हा.  ठार वेडा.

काहीतरी अतरंगी केल्याशिवाय ट्रेक पूर्ण होत नसतो.  हि जबाबदारी विशाल उचलतो.  म्हणजे तो एखादा मोठा खेकडा धरून उचलतो.  किंवा खळाळत्या पाण्याच्या डोहात अख्खा डुबून बाहेर येतो.  किंवा एखाद्या scree पॅच वर घसरगुंडी करतो.  मी फोटोग्राफर च्या भूमिकेत.  अवघड ट्रेक अशा प्रकारे सोपा होऊन जातो.

माझ्या संकल्पनेप्रमाणे खाद्यभ्रमंती आणि ट्रेक हे कधी एकत्र होऊ शकत नाहीत.  आम्ही जमेल तसा त्या संकल्पनेला छेद देण्याचा प्रयत्न करतो.

एक योग्य जागा बघून मी माझ्या आवडत्या पोझ मधे फोटो काढतो.  कड्यावरून पाय खाली सोडून बसल्यावर पायांचा आणि समोर पसरलेल्या दरीचा फोटो.  तोंडाचा फोटो हवाय कोणाला.  त्यापेक्षा पायांचा फोटो काढावा.  माझ्याकडे सगळ्या ट्रेक मधले असले पायांचे फोटो आहेत.

जिथून सुरुवात केली त्या गावात संध्याकाळी पाच वाजता परत जायचा प्लॅन थोडा थोडा पुढे ढकलला जातो. आम्ही गावात परततो तेव्हा अंधार व्हायला सुरुवात होत असते.  पोटातले कावळे ओरडून ओरडून थकलेले असतात.  आम्ही आमच्या परीने त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो.  दिवसभराचा ट्रेक रूट विशाल स्वप्नील शिल्पा ह्यापैकी एकाने मोबाईल मधे मार्क केलेला असतो.  माझ्या डोक्यात एकच app आहे.  त्यात लिहिलंय,
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे


चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे

गावातल्या छोट्या रस्त्यांवर गाडी चालवायला मला फार आवडते.  डॉन मॅकलिन चं american pie किंवा डायर स्ट्रेट्स चं sultans of swing किंवा पाल्मि गुनारसन चं the villager किंवा असलंच कुठलं तरी गाणं कुठूनतरी येऊन माझ्या डोक्यात अडकतं.  का ते कळत नाही.

छोटे रस्ते संपून हायवे लागल्यावर माझ्यातला WRC ड्रायव्हर जागा होतो.  विशालला गाणी ऐकायची असतात.  तो त्याच्या playlist मधली गाणी लावून देतो.  हाय वे वरच्या दोन किंवा तीन लेन मधली तुझी आवडती लेन कोणती असं जर मला कोणी विचारलं तर माझं उत्तर आहे, जी मोकळी असेल ती.  बऱ्याचदा सगळ्यात डावीकडची लेन मोकळी असते.  तीन लेन असतील तर मधल्या लेन मधून जावं, म्हणजे वेळ पडली कि डावीकडे आणि उजवीकडे असे दोन्ही पर्याय उपलब्ध राहतात.  पण मोठे अवजड ट्रक बऱ्याचदा मधल्या लेन मधून जातात.  मग त्यांना चकवत जावं लागतं.  पुढच्या चार ट्रेक चे आमचे प्लॅन बनतात.

रात्री अकरा बारा कधीतरी मी घरी पोहोचतो.  अंघोळ करावी का नको हा यक्षप्रश्न.  शिल्पाला मुंबईला घरी पोहोचायला तीन वाजलेले असतात.  दुसऱ्या दिवशी उठून ताई ऑफिसला जातात.  मी पण मागच्या दोन दिवसात काही झालेच नाही अशा थाटात ऑफिसच्या कामाला लागतो.  पण माझ्या मॅनेजरला आता माहिती झालंय, दोन दिवस सुट्टीत आरामात घरी बसणारं प्रकरण नाहीये हे.  तो मला मधेच विचारतो, काय केलंस weekend ला, कुठे जाऊन आलास.  मी जमेल तसं शहरी भाषेत दोन ओळीत ट्रेकचं वर्णन करायचा प्रयत्न करतो.  विशाल आणि स्वप्नील पण असंच करत असणार.

Wednesday, April 15, 2020

शोध


जेव्हापासून माणूस पृथ्वीवर राहतोय तेव्हापासून सुरु झालाय शोध.  जगण्यासाठी राहण्याच्या जागेचा.  पोट भरण्यासाठी खाण्याचा.  पिण्यासाठी पाण्याचा.  अन्न वस्त्र निवारा अशा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर जे मिळतंय ते आणखी सोप्या प्रकारे कसं मिळेल त्याचा. मागच्या हजारो वर्षात मानवाच्या प्रगत मेंदूतून हा शोध इतक्या पुढे पोहोचलाय कि आज मूलभूत गरजा काय असतात त्याचा विसर पडलाय बहुतेक जणांना.  जे पाहिजे ते मिळतंय.  जो प्रश्न पडतोय त्याचं उत्तर लगेच मिळतंय.  गुगल बाबाने सगळं आधीच शोधून ठेवलंय.  जिथं जाऊ तिथं गुगल बाई "आता नव्वद मीटर नंतर डावीकडे वळा" इतक्या अचूक पणे सोबतीला आहे.  सुखाचा शोध घेता घेता माणसाचा कंफर्ट झोन इतका मोठा झालाय कि आज त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते शोधायची वेळ आलीये.
हा नव्या जगातला नव्या युगातला नवीन शोध.
शहरातल्या रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर कसं पडायचं तो शोध.
गर्दीतला पोकळ दिलासा सोडून मोकळेपणाने स्वतः कसं जगायचं तो शोध.
पक्षी म्हणजे फक्त कबुतर नाही हा शोध.
कुत्रा आणि मांजरा व्यतिरिक्त इतरही प्राणी ह्या पृथ्वीतलावर राहतात ह्याची जाणीव होणारा तो शोध.
माणसांच्या जितक्या जाती नि प्रकार आहेत त्याच्या शेकडो पट अधिक जाती नि प्रकार झाडांचे आहेत हा शोध.
आपलं शालेय शिक्षण किती निरुपयोगी होतं त्याची जाणीव करून देणारा तो शोध.
तरीसुद्धा आपण शिकून पुढे गेलोच हा शोध.
शिक्षण म्हणजे नक्की काय तो शोध.
एकलव्याची गोष्ट जरी पुराणातली वांगी म्हणून बाजूला टाकलीत तरी स्वतःचं स्वतः बरंच काही शिकता येतं हा शोध.
इतकं सगळं शिकून करायचंय काय नि जायचंय कुठे असं अंतर्मुख होण्याचा तो शोध.
घरापासून जितकं जास्त लांब जाऊन येऊ तितकं जास्त शहाणपण येतं हा शोध.
आणि जितक्या अवघड परिस्थितीतून जाऊ तितकी जास्त अक्कल डोक्यात शिरते हा शोध.
जगण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे तो शोध.
कंफर्ट झोन म्हणजे नक्की काय आणि आपला स्वतःचा तो किती मोठा आहे तो शोध.
इडियट बॉक्स कशाला म्हणतात आणि का म्हणतात तो शोध.
कुठलाही एक प्रॉब्लेम सोडवायला गेलं कि त्याच्या जोडीने असणारे इतर छोटे मोठे प्रॉब्लेमही सोडवावे लागतात हा शोध.
माणूस ह्या प्राण्याकडे प्रगत मेंदू असला तरी तो किती मूर्ख आहे तो शोध.
गोऱ्या कातडीच्या कॉर्बेट साहिबांचा "माय डिअर इंडिया" समजून घेण्याचा शोध.
कधी गीत रामायणाचा शोध तर कधी पाडगावकर समजून घेण्याचा शोध.
टिळक भट मोघे प्रभू तांबे मर्ढेकर बोरकर करंदीकर ह्या सगळ्यांचा शोध.

देणार्याने देत जावे,
घेणार्याने घेत जावे

बर्फाळलेल्या हिमालयातून
उद्यासाठी नवी उमेद घ्यावी
साल्हेरच्या परशुरामाकडून
जगण्यासाठी ऊर्जा घ्यावी

सालोट्याच्या हनुमानाकडून
शक्ती युक्तीची गोळी घ्यावी
उघड्याबोडक्या कातळकड्यावरून
अभेद्य अखंड कणखरता घ्यावी

शिवथरच्या कड्याकपारीत
शिवबाची गाणी गावी
त्याच्या गड किल्ल्यांमधून
मनगटे पोलादी व्हावी

देणार्याने देत जावे,
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !

विंदांची बिनशर्त माफी मागून हे लिहिण्याचे धाडस केले.