Wednesday, April 15, 2020

शोध


जेव्हापासून माणूस पृथ्वीवर राहतोय तेव्हापासून सुरु झालाय शोध.  जगण्यासाठी राहण्याच्या जागेचा.  पोट भरण्यासाठी खाण्याचा.  पिण्यासाठी पाण्याचा.  अन्न वस्त्र निवारा अशा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर जे मिळतंय ते आणखी सोप्या प्रकारे कसं मिळेल त्याचा. मागच्या हजारो वर्षात मानवाच्या प्रगत मेंदूतून हा शोध इतक्या पुढे पोहोचलाय कि आज मूलभूत गरजा काय असतात त्याचा विसर पडलाय बहुतेक जणांना.  जे पाहिजे ते मिळतंय.  जो प्रश्न पडतोय त्याचं उत्तर लगेच मिळतंय.  गुगल बाबाने सगळं आधीच शोधून ठेवलंय.  जिथं जाऊ तिथं गुगल बाई "आता नव्वद मीटर नंतर डावीकडे वळा" इतक्या अचूक पणे सोबतीला आहे.  सुखाचा शोध घेता घेता माणसाचा कंफर्ट झोन इतका मोठा झालाय कि आज त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते शोधायची वेळ आलीये.
हा नव्या जगातला नव्या युगातला नवीन शोध.
शहरातल्या रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर कसं पडायचं तो शोध.
गर्दीतला पोकळ दिलासा सोडून मोकळेपणाने स्वतः कसं जगायचं तो शोध.
पक्षी म्हणजे फक्त कबुतर नाही हा शोध.
कुत्रा आणि मांजरा व्यतिरिक्त इतरही प्राणी ह्या पृथ्वीतलावर राहतात ह्याची जाणीव होणारा तो शोध.
माणसांच्या जितक्या जाती नि प्रकार आहेत त्याच्या शेकडो पट अधिक जाती नि प्रकार झाडांचे आहेत हा शोध.
आपलं शालेय शिक्षण किती निरुपयोगी होतं त्याची जाणीव करून देणारा तो शोध.
तरीसुद्धा आपण शिकून पुढे गेलोच हा शोध.
शिक्षण म्हणजे नक्की काय तो शोध.
एकलव्याची गोष्ट जरी पुराणातली वांगी म्हणून बाजूला टाकलीत तरी स्वतःचं स्वतः बरंच काही शिकता येतं हा शोध.
इतकं सगळं शिकून करायचंय काय नि जायचंय कुठे असं अंतर्मुख होण्याचा तो शोध.
घरापासून जितकं जास्त लांब जाऊन येऊ तितकं जास्त शहाणपण येतं हा शोध.
आणि जितक्या अवघड परिस्थितीतून जाऊ तितकी जास्त अक्कल डोक्यात शिरते हा शोध.
जगण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे तो शोध.
कंफर्ट झोन म्हणजे नक्की काय आणि आपला स्वतःचा तो किती मोठा आहे तो शोध.
इडियट बॉक्स कशाला म्हणतात आणि का म्हणतात तो शोध.
कुठलाही एक प्रॉब्लेम सोडवायला गेलं कि त्याच्या जोडीने असणारे इतर छोटे मोठे प्रॉब्लेमही सोडवावे लागतात हा शोध.
माणूस ह्या प्राण्याकडे प्रगत मेंदू असला तरी तो किती मूर्ख आहे तो शोध.
गोऱ्या कातडीच्या कॉर्बेट साहिबांचा "माय डिअर इंडिया" समजून घेण्याचा शोध.
कधी गीत रामायणाचा शोध तर कधी पाडगावकर समजून घेण्याचा शोध.
टिळक भट मोघे प्रभू तांबे मर्ढेकर बोरकर करंदीकर ह्या सगळ्यांचा शोध.

देणार्याने देत जावे,
घेणार्याने घेत जावे

बर्फाळलेल्या हिमालयातून
उद्यासाठी नवी उमेद घ्यावी
साल्हेरच्या परशुरामाकडून
जगण्यासाठी ऊर्जा घ्यावी

सालोट्याच्या हनुमानाकडून
शक्ती युक्तीची गोळी घ्यावी
उघड्याबोडक्या कातळकड्यावरून
अभेद्य अखंड कणखरता घ्यावी

शिवथरच्या कड्याकपारीत
शिवबाची गाणी गावी
त्याच्या गड किल्ल्यांमधून
मनगटे पोलादी व्हावी

देणार्याने देत जावे,
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !

विंदांची बिनशर्त माफी मागून हे लिहिण्याचे धाडस केले.

3 comments:

  1. खूपच छान . असेच लिहित रहा.

    ReplyDelete
  2. मस्तच ..... थोडा ब्रेक पाहिजेच होता माणसाला आणि निसर्गाला सुद्धा

    ReplyDelete