Sunday, December 4, 2022

रुद्राक्ष

 ह्यावर्षी काठमांडू मधल्या पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली तेव्हा तिथल्या दुकानांमध्ये रुद्राक्षाची फळं विकायला पाहिली.  छोटी फळं नेपाळी दहा रुपयाला एक फळ.  मोठी फळं नेपाळी वीस रुपयाला एक.  थोडी घेतली.  भारतीय दहा रुपयाला नेपाळी सोळा रुपये मिळतात.  फळातून रुद्राक्ष बाहेर काढणार त्यामुळे तो खत्रिशीर अस्सल.  रुद्राक्ष ह्या विषयावर धार्मिक रंग दिलेली अर्धसत्य माहिती असंख्य प्रमाणात उपलब्ध आहे.  पण रुद्राक्ष कसा बनतो, त्याचं झाड कोणतं ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर मराठीत काही सापडले नाही.  ती उत्तरे शोधताना विचार सुचला कि हे मराठीत लिहावं.  त्यामुळे हा लेखनप्रपंच.

फळे

वृक्ष
Botanical name = Elaeocarpus sphaericus
शास्त्रीय नाव =  इलेओकारपस स्फेरिकस  
सदाहरित, दुष्काळात तग धरून राहणारे, औषधी गुणधर्म असलेले हे वृक्ष ४५ ते १०० फूट वाढतात.
Elaeocarpus ह्या वंशाच्या ३५० प्रजाती ज्ञात आहेत.  त्यापैकी ३५ भारतात आढळतात.
ह्या वृक्षाच्या पानं, फळं, आणि बियांत औषधी गुणधर्म असतात.

हे वृक्ष कुठे आढळतात
इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, म्यानमार, नेपाळ, भूतान, बांगलादेश, भारत ह्या देशात हे वृक्ष वाढतात.
रुद्राक्षांच्या मागणीमुळे भारतातला ह्या वृक्षांचा नैसर्गिक प्रदेश आणि संख्या कमी झाली आहे.  भारतात हा वृक्ष दुर्मिळ झाला आहे.  सध्या उत्तर पूर्व भारतात, विशेषतः आसाम आणि अरुणाचल प्रदेश ह्या भागात हे वृक्ष आढळतात.  बिहार, बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि उत्तराखंड ह्या राज्यात काही वृक्ष अजूनही आहेत.  महाराष्ट्रात कोकणातील जंगलात हा वृक्ष काही ठिकाणी आढळतो.  भारतात काही ठिकाणी ह्या वृक्षाची लागवड करण्याचा प्रयत्न झाला आहे.

ह्या वृक्षांसाठी उपयुक्त वातावरण
दमट उष्णकटिबंधीय हवामानात हे वृक्ष वाढतात.  २० ते ३० अंश तापमान आणि वर्षभरात २००० ते ४५०० मिलीमीटर पाऊस असलेल्या भागात हे वृक्ष चांगले वाढतात.  
गरम प्रदेशात वाढलेल्या ह्या वृक्षांना फळे येत नाहीत.  

पाने व फुले
पाने वरून चमकदार हिरव्या रंगाची आणि खालून गडद हिरव्या रंगाची असतात.  वास नसलेली पाने हलक्या कडू चवीची असतात.  पाने ६ ते ८ सेंटीमीटर रुंद व १८ ते २० सेंटीमीटर लांब असतात.  पानं पिकल्यावर लाल होतात.
झाड सात ते आठ वर्ष वाढल्यानंतर फुले यायला सुरुवात होते.  एप्रिल आणि मे महिन्यात पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फुले येतात.

फळे
साधारणतः जून महिन्यात ह्या झाडांना फळे येतात.  एका झाडाला एका मोसमात एक हजार ते दोन हजार फळे येतात.  ऑगस्ट ते ऑक्टोबर च्या सुमारास फळे पिकतात.  गोल किंवा अंडाकृती आकाराची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची असतात.  पिकल्यावर निळसर किंवा जांभळ्या किंवा तपकिरी किंवा राखाडी रंगाची बनतात.  फळाची साल टणक दगडासारखी दिसणारी असते.  फळांच्या आत आंबट चवीचा गर असतो.  फळाच्या मधोमध बिया असतात.  बियांच्या संरक्षणासाठी कडक आवरण असते.  बिया आणि त्यांच्यावरचं कडक आवरण म्हणजे रुद्राक्ष.  रुद्राक्षाचा आकार मटारच्या दाण्यापासून अक्रोडाएवढा असतो.  रुद्राक्षाच्या आत जे कप्पे असतात त्यात बिया असतात.  ठिकाण आणि वातावरण जसे असेल त्या प्रमाणे रुद्राक्ष बनतात.  रुद्राक्षावर असलेल्या भागांनुसार तो किती मुखी आहे ते ठरते.  रुद्राक्ष १ ते २१ मुखी असतात.  ४ मुखी, ५ मुखी, आणि ६ मुखी रुद्राक्ष सगळ्यात जास्त संख्येने आढळतात.  हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भागातील रुद्राक्ष उत्तम प्रतीचे मानतात.  बहुतेक रुद्राक्ष तपकिरी रंगाचे असतात.  क्वचित एखादा पांढरा, लाल, पिवळा, किंवा काळा असू शकतो.  रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म असतात.  रुद्राक्ष हा संस्कृत शब्दाची फोड रुद्र आणि अक्ष अशी होईल.  रुद्र हे शंकराचे एक नाव असून अक्ष म्हणजे डोळे.  रुद्राक्षांना शंकराचे डोळे असे म्हटले आहे.

संदर्भ
१. प्रतीक्षा आर्यल (२०२१),  Medicinal value of Elaeocarpus sphaericus: A review
२. पंत मनू, अंकिता लाल, राणी अंजु (२०१३),  Elaeocarpus sphaericus: A Tree with Curative Powers: an Overview