Thursday, May 17, 2018

भट्टीचं रान, उन्हाळ्यातल्या मध्यावरचं

मागचा आठवडाभर पेपरात एकामागून एक बातम्या येतायत - आज इकडे सर्वोच्च तापमानाची नोंद झाली, उद्या तिकडे सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.  उन्हाळा ऐन रंगात आलाय.  उत्तर भारतात धुळीची वादळं होतायत.  अशातच विशालने एक ट्रेक ठेवला - भट्टीचं रान.  आमच्या सर्वांना हि वाट नवीन होती.  त्यामुळे हा ट्रेक फक्त निमंत्रितांसाठीच होता.  म्हणजे स्वछंद गिर्यारोहकांच्या संकेतस्थळावर हा ट्रेक विशालने टाकला नाही.  फार विचार न करता मी येतोय म्हणून विशालला सांगून टाकले.  अशा काही गोष्टी अनेक वर्ष धडपडल्यानंतर आता मला पूर्वीपेक्षा चांगल्या जमतात.  का, कुठे, कसं, कधी असे विविध प्रश्न डोक्यात घोळवत बसण्यापेक्षा साधा सोपा मार्ग पकडायचा.  हो म्हणून जे असेल ते संपवायचं.  डोक्याचा भाग थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा.

रविवारच्या ट्रेक ला शनिवारी रात्री निघायचे होते.  सध्याचा उन्हाळ्याचा कडाका बघता शनिवारी दिवसभरात जमेल तेवढा आराम करणे आणि झोप घेणे गरजेचे होते.  पण कामाच्या पसाऱ्यात आराम आणि झोप दोन्ही झाले नाही.  एका कौटुंबिक कार्यक्रमानंतर रात्री सव्वाअकराला घरी पोहोचलो.  बदाबदा बॅग भरली.  मागच्या महिन्याभरात आंब्याच्या बाठा, जांभळांच्या, कलिंगडाच्या वगैरे बिया गोळा करून ठेवल्यायत त्या गडबडीत घ्यायला विसरलो.  बाराच्या आधी कोकणे चौकात पोहोचलो.  गाडी कोकणे चौकातून, म्हणजे माझ्या घराजवळून जाणार होती.  कित्ती भारी.

गाडीत बसल्यावर काही वेळ गप्पा, आणि मग जमेल तशी झोप.  आहुपे गावात आम्ही रात्री कधीतरी चारला वगैरे पोहोचणार होतो.  रात्रीच्या अंधारात रस्ते सापडणं मुश्किल.  विशालने मोबाइल मधला मॅप बघत ड्रायव्हरला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.  बसच्या दिव्यांच्या उजेडात तीन वेळा ससा दिसला. आहुपे गावात थांबल्यावर आमचा ड्रायव्हर सांगत होता कि त्याला पाच ससे आणि एक मुंगूस दिसलं.  विशाल ने एक पिशवी भरून साहित्य आणलं होतं आमच्या पहाटेच्या चहा पोह्यांसाठी.  भारी आयडिया.   तो आणि दिलीप गेले आहुपे गावातल्या मामांचं घर शोधायला.  बाकीचे सगळे एकतर राहिलेली झोप पूर्ण करत होते किंवा अंधारात जमेल तसे इकडे तिकडे हिंडत होते.

उजाडल्यावर आम्ही बस घेऊन मामांच्या घराजवळ गेलो.  चहा पोहे व्हायला वेळ लागतोय असं दिसल्यावर तोपर्यंत जवळच्या कड्याजवळ जाऊन यायचं ठरलं.  आहुपे गावाचं लोकेशन भन्नाट आहे.  शहरीपणा दूर दूर पर्यंत सापडत नाही आणि निसर्गाची उधळण मुक्तहस्ताने.  इथे मी मोबाईल फ्लाईट मोड वर टाकला तो संध्याकाळ पर्यंतसाठी.  आता दिवसभरात मोबाईलचा एकच उपयोग, फोटो काढायला.

असा सूर्योदय पहायला मिळणं हे आमचं भाग्य.  आहुपे गावातल्या रहिवाशांना वर्षभरात असे विविध रंगछटांचे सूर्योदय पहायला मिळत असतील
नारायणराव आणि त्यांच्या जोडीला शे दीडशे ढग आज रंगात आले होते.  खरोखरीच्या रंगात.  तासाभरात त्यांनी अनेक रंग अविष्कार दाखवले.

आहुपे गावापासून पाच मिनिटाच्या अंतरावर सह्याद्रीचे बुलंद बेलाग कडे.  दूरवर गोरखगड आणि मच्छिन्द्रगड.

स्वच्छंद गिर्यारोहक समीर अथणे
हा उत्कृष्ट फोटो टिपलाय प्रथमेशच्या कॅमेऱ्यातून

कड्यावर करवंद अनेक ठिकाणी.  सर्वांनी झाडावरून तोडून करवंद खाण्याचा आनंद लुटला.  गावात मामांच्या घरी परतेपर्यंत साडेसहा होऊन गेले होते.  अजून चहा पोहे बाकी होते.  म्हणजे आम्ही निर्धारित वेळेपेक्षा तासभर उशिरा ट्रेक सुरु करणार होतो.

अंगण झाडून एक चटई टाकण्यात आली.  मग एक मोठं पातेलंभर पोहे आले.  कितीही खाल्ले तरी आम्हा सोळा जणांमधे हे संपणार नव्हते.  शहरीपणाचा फारसा संबंध न आल्यामुळे अहुपे गावचे गावकरी हे असे साधे शिंपल.  स्वतःच्या आणि भेटलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण पैशात मोजायची खाज शहरी माणसांनाच असते.

अनुप सरांच्या कॅमेऱ्यातून  ...  पोहे तयार आहेत

लवकर आटपा वगैरे आज कोणीच कोणाला घाई करत नव्हते.  आमच्यात नवे नवखे कोणीच नव्हते.  त्यामुळे ट्रेक वेळेत आटोपण्यासाठी मेंढरं हाकण्याची आज गरज नव्हती.

गावातल्या घरांसमोर कसलीतरी फळं वाळायला घातलेली.  चौकशी केल्यावर कळले कि हि फळं औषधी आहेत.  ह्यांना चांगला भाव येतो.  एक मामा म्हणाले किलोला शंभर रुपये.  दुसरे म्हणाले किलोला दोनशे रुपये.  तिसरे म्हणाले किलोला चारशे रुपये.  ह्यांचं काय करतात, कसलं औषध बनवतात विचारलं तर कोणालाच माहिती नाही.  फक्त फळं गोळा करायची, वाळवायची, आणि विकायची.  मिळेल तो भाव घ्यायचा.

वाळवलेली औषधी फळं - हिरडा
आयुर्वेदात अतिशय गुणकारी म्हणून सांगितलेला हिरडा इथे सगळ्या घरांसमोर ढिगाने गोळा केलेला.

एक वाटाड्या आम्हाला अर्ध्यापर्यंत रस्ता दाखवणार होता.  नंतर आम्ही स्वतः वाट शोधणार होतो.  त्याच्या बरोबर गावाबाहेर पडलो तेव्हा घड्याळाचे काटे साडेसातच्या पुढे पोहोचलेले.  गावाबाहेर पडल्यावर एक सावली असलेली मोकळी जागा बघून सर्वांची तोंडओळख झाली.  सगळ्यात पुढे वाटाड्या आणि विशाल, मागे शेपटाला दिलीप सर, आणि मधे बाकीचे चौदा अशी आमची पलटण निघाली.  सकाळच्या वेळी रानात साथीला विविध पक्ष्यांचे आवाज.

गावापासून अर्धा तास चाललो असू.  आमच्या वाटाड्याने वाटेवरच्या धुळीत उमटलेले बिबट्याच्या पायाचे ठसे दाखवले.  त्याच्या म्हणण्याप्रमाणे ठसे ताजे होते.  काही वेळेपूर्वीच बिबट्या इथून गेला होता.

भट्टीच्या रानात दिसलेला बिबट्याच्या पायाचा ठसा
आमच्या वाटाड्याला आमच्याबरोबर फार लांब यायचं नव्हतं.  दिवसभरात मिळतील तेवढी हिरड्याची फळं गोळा करण्यासाठी त्याला जास्त वेळ हवा होता.

तासाभराने आमची पलटण पोहोचली डोंगरकड्यावरच्या येतोबाला.

श्रुती मॅम च्या कॅमेऱ्यातून  ...  डोंगरकड्यावरचा येतोबा
इथून लांबवर सिद्धगड दिसत होता.  एका छोट्या ब्रेक नंतर येतोबाचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो.

येतोबा देवळासमोरून पाहिलेला सिद्धगड
डावीकडे दमदम्या
येतोबा पासुन सुमारे तासभर डोंगरकड्याच्या बाजूने वाटचाल.  इथून दमदम्या डोंगर समोर दिसत होता.

दमदम्या
मध्ययुगीन काळात एखाद्या डोंगरी किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी डोंगराजवळ खूप मोठ्या उंचीचे लाकडी मचाण उभारत, ज्याला दमदमा म्हणायचे.  सिद्धगडावर तोफांचा मारा करण्यासाठी हा उपयुक्त डोंगर असावा.  त्यामुळे ह्याला दमदम्या म्हणत असावेत.

डोंगराच्या कड्यावर पोहोचल्यानंतर उतरायची वाट शोधावी लागली.

एक अवघड टप्पा  ...  सुरेश सरांच्या कॅमेऱ्यातून

आता आम्ही आमच्या वाटाड्याचा निरोप घेतला.  इथून पुढे आम्हाला वाट शोधत जायचं होतं कोंढवळ गावात.  सकाळपासून विशाल मोबाईल मधल्या नकाशात आमची वाटचाल बघत होताच.

समीर सरांच्या कॅमेऱ्यातून  ...  सुकलेल्या झाडोऱ्यातून वाट शोधत जाताना
सुकलेल्या  झाडोऱ्यातून वाट काढत जाताना पाय घसरत होते.  जमिनीवर पसरलेल्या सुकलेल्या पानांच्या थरामुळे पायाला पकड मिळत नव्हती.

गर्द रानाचा टप्पा आला कि सोबतीला मोठ्या माश्या.  सुरेश भाग्यवंतांना दिवसभरात पाच वेळा चावा मिळाला.

गर्द रानातून चाललेली वाट
भट्टीच्या रानात सावली हवीहवीशी वाटत होती.

डोक्यावर सदाहरित वृक्षाचं छत्र आणि पायाखाली सुकलेल्या पानांचा सडा
एका घसरड्या पॅच ला मी लीड घेऊन वाट शोधून काढली.

आता गर्द झाडी जाऊन मोकळं रान सुरु झालं.  उन्हाचा तडाखा वाढत चालला.  सकाळच्या सत्रातला ट्रेकचा पहिला टप्पा मजेदार होता.  आता दुपारचा दुसरा टप्पा म्हणजे प्रत्येकाची उन्हाळी परीक्षा होती.

समोरून गावातली आठ दहा पोरं येताना दिसली.  त्यांना आमच्याकडचा खाऊ दिला.  कोंढवळ गावची वाट विचारून घेतली.

गावातल्या पोरांना खाऊ वाटप

गावच्या पोरांनी सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी कच्च्या रस्त्याला येऊन मिळालो.  हा रस्ता आम्हाला कोंढवळ गावात नेणार होता.  सकाळपासुन उन्हात चालण्याने आणि भुकेने आता सर्वच जण थकलेले.  गावात पोहोचल्यावर जेवण करायचं ठरवलं.  गोखले सर वेगात पुढे गेले.  गाव काही येता येईना.  उन्हाने घसा कोरडा पडला, जीव कासावीस झाला वगैरे वाक्प्रचार आजपर्यंत फक्त लिहिले वाचले होते.  हे सगळं नक्की काय ते आज अनुभवायला मिळालं.

एका सावलीच्या जागी छोटा ब्रेक घेतला.  कोणीतरी खाऊ बाहेर काढला.  एक एक करत सगळेच खाद्य पदार्थ बाहेर पडले.

वनभोजन
वनभोजन आटपून कोंढवळ गावाकडे निघालो.  साडेबाराच्या सुमारास नारायणराव दिसेल त्याला तापवत होते.  आज झिरो शॅडो डे होता.

श्रुती मॅम ने टिपलेला शून्य सावली क्षण

आम्ही वनभोजनाला थांबलो होतो तिथून गाव जवळच होतं.  पण ह्या घडीला थोड्या अंतरासाठीही दमछाक होत होती.  इथे रस्त्याकडेला करवंद सापडत होती.  बाकी भट्टीच्या रानात करवंद कुठेच नाहीत.  एक विहीर दिसल्यावर तिथे थांबणं भागच होतं.  विहिरीतून पाणी काढून हात पाय धुतले.  मी डोक्यावर पण पाणी ओतून घेतलं.  विहिरीचं पाणी पिण्यासारखं नव्हतं.  पण गावात हे पाणी कदाचित पीतही असावेत.

कोंढवळ गावातली विहीर

कोंढवळ गावात आज लगीनघाई होती.  मंडप नाही, पैशाची उधळपट्टी नाही.  गावातल्या असेल त्या infrastructure मधेच लग्न चालू होतं.  एक बँडबाजाची गाडी गावात थांबवलेली.  एक माणूस लाऊडस्पीकर वर बडबड करत होता.  त्याच्या तोंडातल्या तोंडात बोलण्यामुळे आमच्यात काही हास्यफवारे उडाले.  त्याचे तटकरे हे शेतकरी वाटत होते.  मानपान हा अपमान वाटत होता.

इथल्या हातपंपावर आम्ही सगळ्यांनी पाणी पिऊन घेतले.  भरून घेतले.

छपराची सावली असलेल्या एका मोकळ्या जागेत सर्वजण विसावलो.  एक एक करत विकेट पडत होत्या.  भोरगिरी गावात आमचा ड्रायवर आमच्यासाठी थांबणार होता.  भोरगिरी गावात मोबाईल नेटवर्क कमकुवत असल्यामुळे ड्रायव्हरशी संपर्क होऊ शकत नव्हता.  म्हणजे आम्हालाच संध्याकाळपर्यंत भोरगिरी गावात जायचे होते.

इथून भोरगिरी पर्यंत ट्रेक कसा पूर्ण करायचा त्याच्याबद्दल निर्णय घ्यायची वेळ होती हि.  कोंढवळ ते भिमाशंकर हा पहिला टप्पा भाजक्या उन्हामुळे अवघड होता.  भिमाशंकर ते भोरगिरी हा दुसरा टप्पा उन्ह उतरल्यावरचा आणि जंगलातल्या सावलीमुळे सोपा होता.  इथे आमच्याकडे तीन पर्याय होते. 
पर्याय पहिला : ट्रेक मार्गाने चालत भिमाशंकर आणि तिथून पुढे चालत भोरगिरी गावात जायचे.
पर्याय दुसरा : गाडीरस्त्याने चालत भिमाशंकर आणि तिथून पुढे चालत भोरगिरी गावात जायचे.
पर्याय तिसरा : गाडी करून भिमाशंकर आणि तिथून पुढे चालत भोरगिरी गावात जायचे.

पहिले दोन्ही पर्याय अवघड होते.  आधीच जीव अर्धमेला असताना दुपारच्या भाजक्या उन्हात इथून चालत भिमाशंकर गाठणे टोळीतल्या बहुतेकांना जड जाणार होते.  आणि तिथून पुढे भोरगिरीला वेळेत पोहोचायचे होते.  परिस्थितीचा विचार करता सर्वानुमते तिसरा पर्याय निवडण्यात आला.

सर्वजण थकून आराम करत असताना विशाल मात्र जीपवाला ठरवण्यासाठी खटपट करत होता.  प्रत्येक ट्रेक मधे नेहमी सर्वांना बरोबर घेऊन जाणार.  अवघड प्रसंगातही हसत खेळत रहाणार.  वयाने लहान असला तरी विशाल फार उत्तम लीडर आहे.  आणि ह्याला सह्याद्रीतले सगळे रस्ते तोंडपाठ.  जे रस्ते तोंडपाठ नाहीत तिथेही न चुकता वाट काढण्याची कला ह्याला अवगत.  ह्याची सगळ्या गावांमधून ओळख.  प्रत्येक ट्रेकचं खर्चाचं गणित, वेळेचं गणित न चुकता सांभाळणार.  असा गिर्यारोहक मित्र मिळणं म्हणजे नशीबच लागतं.

आता आम्हाला इथून उठा अशी विनंती करण्यात आली.  साडेतीन च्या मुहूर्तावर ह्याच मोकळ्या जागेत लग्न लागणार होतं.  त्यासाठी हि जागा झाडून घ्यायची होती.  समोरच्या घराच्या पडवीत आमचा डेरा पडला.  एक एक करत परत दनादन विकेट गेल्या.  अख्खा संघ पंधरा मिनिटात आऊट.

दिलीप सरांना गवसलेलं झोपाळू दृश्य
जीप आल्यावर आम्ही सोळा जण आणि ड्रायव्हर पकडून सतरा एका जीप मधे कसे बसणार असा प्रश्न होता.  ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वर तीन, मधल्या सीट वर चार, आणि मागे सहा बसले.  उरलेले तीन टपावर गेले.

विनयने टिपलेला एक दुर्मिळ फोटो

भिमाशंकर जवळ आल्यावर जीपवाला म्हणाला आता टपावरच्यांना खाली यावं लागेल.  आज रविवार असल्याने इथे पोलीस असतात.  मग टपावरच्या तिघांपैकी दोघे मधल्या सीट वर आणि एक ड्रायव्हरच्या बाजूला अवतरला.

भिमाशंकर मंदिराजवळ जीप मधून उतरलो.  मंदिराच्या मार्गाने निघालो.  देवदर्शन करण्याचा कोणाचा उद्देश नव्हताच.  एका हॉटेलात जेवणाचा कार्यक्रम केला.  मी जेवणाला सुट्टी देऊन त्याऐवजी चार लिंबू सोडा प्यायलो आणि दोन मँगो आईस्क्रीम खाल्ले.  पहिला लिंबू सोडा पिल्यावरच जीवाला तरतरी आली.

भिमाशंकर देऊळ
आता फक्त भिमाशंकर ते भोरगिरी हा शेवटचा टप्पा शिल्लक होता.  अडीज तासांचा अंदाज होता.  पावणे चार झाले होते.  म्हणजे आम्ही अंधार पडायच्या आत भोरगिरीला पोहोचत होतो.  भिमाशंकर मंदिराच्या मागच्या बाजूने निघालो.  परिसरातला अखंड कचरा बघून आपल्याच जनतेचं वाईट वाटलं.  श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे गोष्टी राहुद्या बाजुला. परिसर स्वच्छ ठेवता येण्याची अक्कल नसेल तर काय होणार आहे ह्या जनतेचं.  आज किती जणांना समजतंय कि पर्यावरणाचं नुकसान करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत.  उद्या प्यायला पाणी आणि खायला अन्न मिळायची वानवा झाली तर कसला देव आणि कसलं भिमाशंकर.

गुप्त भिमाशंकरला नमस्कार करून आम्ही भोरगिरी गावची वाट पकडली.  गोखले सर आधीच पुढे गेले होते.  साधारण दीड तास गर्द झाडीने भरलेला डोंगर उतार.  बऱ्याच ठिकाणी झाडांवर छोटे फलक लावलेले, ज्यांच्यावर गुप्त भीमाशंकर लिहिलेले आणि दिशादर्शक बाण.  म्हणजे हा एक लोकप्रिय ट्रेक रूट आहे तर.  त्यामुळे ट्रेक रूट ला कचरा पण आहे.  आजकाल कचरा करू नका असे फलक जंगलातून पण लावायची वेळ आलीये.

माझ्याकडच्या रिकाम्या कॅरी बॅग मधे चालता चालता मी कचरा गोळा केला.  सध्या ह्याला प्लॉगिंग असे नाव देण्यात आलंय.  दादानु, ह्यो तुमि काय सुरु केल्यात ना, ट्रेक मंदी आम्ही पंधरा वर्स करतोय.

ट्रेक ला जायच्या आधी मी विशाल ला दोन तीन वेळा विचारलं होतं कि सगळे रेग्युलर ट्रेकर आहेत ना, कोणी नवीन नाही ना ज्यांना दिवसभर इतरांनी वाहून न्यावं लागतं.  आता थकव्याने मीच गळून गेलो होतो. जमेल तिथे बसून घेत होतो.

कधीकधी सूर्यास्त मला भकास, उजाड, एकाकी वाटतो.  इथे क्षितिजावर एकच निष्पर्ण झाड आणि बरोबर अस्ताला जाणारा सूर्य.  मनातील विचार समोर दृष्टीस पडलेले.

सूर्य झाडामागे घेऊन फोटो काढण्याऐवजी झाड आणि सूर्य शेजारी शेजारी ठेऊन फोटो घेण्याचा प्रयत्न
आता मार्ग सोपा असला तरी थकव्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात प्रत्येकावर जाणवत होता.

लीड ला असणाऱ्यांना एका ठिकाणी दूरवर बिबट्या दिसला.  कॅमेऱ्यात झूम करून बघितल्यावर लक्षात आले त्या एका सुपारीसारख्या झाडाच्या पिवळ्या फांद्या होत्या.  पण त्या अर्ध्या मिनिटासाठी वातावरण बदलले होते.

ट्रेक संपता संपता फर्स्ट एड किट बाहेर काढावे लागले.  थकव्याने साध्या सोप्या ठिकाणीही घात होऊ शकतो.  श्रुती मॅम ची जिद्द आणि ट्रेकची क्षमता दाद देण्यासारखी आहे.  घाबरण्याची चिन्हं तर सोडाच, त्या शेवटपर्यंत लीड ला राहिल्या.

ट्रेक चा शेवटचा टप्पा  ...  समीर सरांच्या कॅमेऱ्यातून

इथे बघतो तर भोरगिरी पासुन भिमाशंकर पर्यंत गाडीरस्ता बनवण्याचं काम चालू आहे.  म्हणजे हे हि जंगल मनुष्यप्राणी गिळंकृत करणार तर.

भोरगिरी गावात उतरायचा एक शॉर्टकट विशालला माहिती होता.  असेच ट्रेकिंग चालू ठेवले तर काही वर्षात विशाल सह्याद्रीतला चालता बोलता गुगल मॅप बनेल.

भोरगिरी गावात पोहोचल्यावर समोरून भोरगिरी किल्ला बोलावत होता.  आम्ही दुरूनच सांगितले, आज आपला योग नाही.  परत केव्हातरी भेटू.  गावातल्या देवळाशेजारी गाडी लावून राजू आमची वाट बघत थांबला होता.  गोखले सर आमच्या पस्तीस मिनिटं आधी इथे पोहोचले होते.

गाडीत मला कधी झोप लागली ते समजलेच नाही.  साडेदहाला कोकणे चौकात उतरून दोन मिनिटात घरी पोहोचलो.

मी स्वछंद गिर्यारोहकांबरोबर केलेला एकही ट्रेक बेचव निरस झाला नाहीये.  एकूण एक ट्रेक आठवणीत राहतील असे झालेत.  शून्य सावलीच्या दिवशी भाजक्या उन्हात केलेला हा ट्रेकही अविस्मरणीय झाला.

Wednesday, May 9, 2018

आपला सरळ साधा शेजारी - नेपाळ

मागची तीन चार वर्ष डोक्यात घोळत असलेला नेपाळ सफारीचा योग आता जुळून आला.  त्याचा हा भ्रमण वृत्तांत.

आमच्या सोसायटीतल्या गाड्या धुणारी नेपाळी मुलं वर्षातून एकदा त्यांच्या घरी नेपाळला जातात.  त्यांच्या बरोबर नेपाळला जाऊन यायचा किडा माझ्या डोक्यात कधीतरी घुसला.  आमच्या गाड्या धुणाऱ्या विवेक कडून कळले कि दरवर्षी एप्रिल मध्ये, जेव्हा नेपाळी नवीन वर्ष सुरु होते, तेव्हा तो आणि त्याचे सहकारी नेपाळला आपापल्या गावी जातात.  मला बरोबर घेऊन जायला ह्यावर्षी विवेक तयार झाला.  विवेकच्या गावापर्यंत एकत्र जायचे आणि मग तिथून पुढे माझी नेपाळ सफर, असा बेत ठरवला.  पुणे ते दिल्ली विमान तिकीट तीन हजार होते.  विवेकचे दोन नेपाळी साथीदार बरोबर यायला तयार झाले.  आमच्या चौघांची तिकिटं काढली (प्रत्येकाने आपापल्या खर्चाने).  दिल्लीहून बसने नेपाळ मध्ये एन्ट्री करून विवेकच्या गावापर्यंत जायचे ठरवले.

मग मी परतीच्या प्रवासाचे विमान तिकिट काढले बागडोगरा ते पुणे.  नेपाळच्या पश्चिम भागातून सुरुवात करून पूर्व भागातून बाहेर पडायचे.  तिथून बागडोगरा विमानतळ तासाभराच्या अंतरावर.  असा बेत बनवताना गूगल मॅप्स ची फार मदत होते.

विवेकच्या गावापासून पोखराला जाण्यासाठी एक दिवस, पोखरामध्ये दोन दिवस, पोखरा ते काठमांडू प्रवास एक दिवस, काठमांडूमध्ये एक दिवस, आणि काठमांडू पासून बागडोगरा पर्यंत एक दिवस असा बेत ठरवला.  हॉटेल बुकिंग केली नाहीत.  हॉटेल बुकिंग केली तर flexibility निघून जाते.  आणि नेपाळमध्ये मी पहिल्यांदाच जात असल्याने तिथल्या प्रवासांना किती वेळ लागतो ह्याचे गणित माहिती नव्हते.  नेपाळ मध्ये राहणाऱ्या एका मित्राच्या मित्राला विचारून हॉटेल बुकिंग करण्याची गरज नाही हे पक्के केले.

विकिपीडिया, विकीव्हॉयेज,  ट्रिप ऍडव्हायजर इत्यादी धुंडाळून जमेल तेवढी माहिती गोळा केली.  पण शेवटी प्रत्यक्ष जाऊन फिरण्याचा अनुभव तो वेगळाच.

हौशी आणि नवख्या पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा  -  प्रदेशाची योग्य माहिती करून घेतल्याशिवाय एकट्याने भ्रमण (solo travel) करणे धोक्याचे ठरू शकते.  साहसाला सावधतेची जोड असावी.

१९५० मध्ये झालेल्या करारानुसार भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो, कितीही दिवस राहता येते, आणि कामही करता येते.

भूतान दोनदा बघून झाल्यानंतर मला आता नेपाळ बघण्याची उत्सुकता होती.

ह्या सफरीची ट्रॅव्हल स्टाईल :
  • Like a Local
  • Thrill Seeker
  • Backpacker

अन्नपूर्णा पर्वतरांग
दिवस पहिला - पुणे ते दिल्ली

दिवस दुसरा - नेपाळमध्ये प्रवेश आणि लमकी गाव

दिवस तिसरा - पोखरा

दिवस चौथा - पोखरा

दिवस पाचवा - पोखरा

दिवस सहावा - पोखरा ते काठमांडू

दिवस सातवा - काठमांडू

दिवस आठवा - काठमांडू ते विर्तामोड

दिवस नववा - विर्तामोड ते पुणे

नेपाळ सफर - दिवस पहिला - पुणे ते दिल्ली

सोमवार ९ एप्रिल २०१८

सकाळचा वेळ बॅग भरण्यात गेला.  काल डेकॅथलॉन मधून नवीन मोठी सॅक आणली.  ओढत न्यायची बॅग नेण्यापेक्षा हि पाठीवरची मोठी सॅक नेण्याचा निर्णय फारच योग्य ठरला.  ह्या मोलाच्या सल्ल्यासाठी माझ्या बायकोचे धन्यवाद.

वेळेच्या आधी आम्ही पुणे विमानतळावर पोहोचलो होतो.

पुणे विमानतळावर वेळेआधी पोहोचलेले (तुमच्या डावीकडून उजवीकडे) विवेक, हेमंत, चंद्रा, आणि मी

विवेक आणि इतर दोन मित्रांनी जमेल तेवढी फोटोग्राफी केली.  बहुदा त्यांचा पहिलाच विमान प्रवास असावा.  पुणे विमानतळ मला नवीन नसल्यामुळे मी फोटोंसाठी फारसा उत्सुक नव्हतो.  पुढच्या आठ दिवसात नवनवीन ठिकाणी भरपूर फोटो काढायला मिळणार आहेत हा विचार मनामध्ये होताच.

पुणे विमानतळावर
दिल्लीला पोहोचल्यावर आनंद विहार ह्या ठिकाणी जायचे होते.  तिथून नेपाळ बॉर्डर पर्यंत जाणारी बस संध्याकाळी घ्यायची होती.  दिल्लीत विमानतळाबाहेर पडल्यावर ओला कॅब बोलावली.  आनंद विहार ला जेवण्याचं बघू असं ठरलं.  मुसलमान कॅब चालक चाबरा होता.  दिल्लीत सद्गुणी माणसं भेटण्याची अपेक्षा करणं तसं चुकीचंच आहे.

इंडिया गेट आणि परिसरात भारत आणि नेपाळचे झेंडे अनेक ठिकाणी फडकत होते.  नेपाळच्या पंतप्रधानांची भेट दिल्लीत नुकतीच पार पडली होती.  सध्या चिनी ड्रॅगन नेपाळची मैत्री करू पाहतोय.  त्यामुळे भारताला नेपाळ बरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध टिकवणे आणि वाढवणे गरजेचे आहे.

आनंद विहार हे गर्दीने गजबजलेले ठिकाण असणार हे कॅबमधून उतरताच लक्षात आले.  पुण्यापासून आनंद विहार ला पोहोचेपर्यंत मी आमच्या टोळीचा म्होरक्या होतो.  आता विवेक, हेमंत, आणि चंद्रा ह्या तिघांमध्ये वयाने आणि अनुभवाने मोठा असलेला चंद्रा आमचा म्होरक्या झाला.  नेपाळला जाणाऱ्या बस कुठून सुटतात तिकडे जाण्यासाठी चालू लागलो.  एका गेट वर दोन दिल्ली पोलीस आत जाणाऱ्यांच्या झडतीस तयार.  त्यांनी खिशात हात खुपसून खिशातल्या वस्तू बाहेर काढ, बॅगा उचकून किमती वस्तू, पैसे असं जे मिळेल ते बाहेर काढ, असा "धंदा" चालवलेला.  भारतात कामधंद्यासाठी आलेले अनेक नेपाळी वर्षातल्या ह्या वेळी इथून नेपाळला जातात आणि त्यांच्या बरोबर पैसे, साधन सामग्री बरोबर असते हे दिल्ली पोलीसांना माहिती होते.  जो कोणी घाबरेल त्याला लुटायचा.

उत्तराखंड राज्य परिवहन मंडळाच्या बस नेपाळ बॉर्डर पर्यंत जातात.  ज्या ज्या बसच्या टपावर खच्चून सामान लादलय त्या बस नेपाळकडे जाणाऱ्या, अशी बस ओळखण्याची सोपी पद्धत विवेकने मला सांगितली.  बसमध्ये सीट नंबर वगैरे काही नसतो.  जिथे जागा मिळेल तिथे बसायचे.  रस्ता खराब असल्यामुळे मागच्या सीटवर बसायला नको, अशी उपयुक्त माहिती विवेकने मला दिली.

चंद्राने एका बसमध्ये पुढच्या सीट मिळवल्या.  आम्ही सीट पकडून बसलो.  ड्राइवरच्या पलीकडच्या मोकळ्या जागेत खच्चून सामान रचलेलं.  आमच्या बॅगाही त्याच ढिगाऱ्यात कुठेतरी.  बस सहा वाजता निघणार असं ड्राइवरने सांगितलं.  बस सुटेपर्यंत आमचा फुटकळ टाइम पास.

आनंद विहार बस स्थानकात नेपाळ बॉर्डरकडे जाणाऱ्या बस
सहा चे सात वाजले तरी बस निघण्याची काही चिन्हं नाहीत.  साडेसात नंतर कधीतरी बस निघाली.  बसचा ड्राइवर तोंडाने फटकळ आणि एक बेरका युपी बिहारी.

बसच्या प्रवासात आम्ही जमेल तशा झोपा काढल्या.  दहा वाजण्याच्या सुमारास एका धाब्यावर बस जेवणासाठी थांबली.  युपी, बिहार, उत्तराखंड हे मी कधी न पाहिलेले भाग.  इथला भंपकपणा उतावळेपणा मराठी नजरेतून सुटणार नाही.  फोटो काढण्यासारखे फारसे काही दिसले नाही.

दिल्लीहून नेपाळ बॉर्डरकडे जाताना मधेच कुठेतरी
जेवल्यानंतर थोडा टाइम पास करून आम्ही परत झोपाळलो.  आता रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतसा रस्त्याचा गुळगुळीतपणा कमी होत त्याची जागा खडबडीतपणा घेत होता.  बस त्याच्या पप्पांचीच (म्हणजे सरकारची) असल्यामुळे रस्ता कसा का असेना ड्रायव्हरने बस जोरदारपणे चालवली.  बस शेवटच्या स्टॉपला थांबली तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते.  आपापल्या बॅगा घेऊन बस मधून उतरलो.  सहा वाजता बॉर्डर वर गेट उघडेपर्यंत आम्हाला इथेच थांबायचे होते.

नेपाळ सफर - दिवस दुसरा - नेपाळमध्ये प्रवेश आणि लमकी गाव

मंगळवार १० एप्रिल २०१८

काल संध्याकाळी साडेसातला दिल्लीला चालू झालेला बस प्रवास उत्तराखंड मधल्या बनबसा ह्या गावात थांबला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते.  सहा वाजता गेट उघडल्यावर आम्ही बॉर्डर ओलांडून नेपाळ मध्ये प्रवेश करणार होतो.  तोपर्यंत इथेच वेळ घालवायचा होता.  इथे रस्त्याच्या कडेला काही प्रवासी-धाबे दिसत होते.  त्यातल्या कुठल्या धाब्यावर थांबायचं हे आमचा म्होरक्या चंद्राने ठरवले.  एका बाजूला बॅगा ठेऊन आम्ही तिथल्या बाकड्यांवर स्थानापन्न झालो.

बाहेर गेल्यावर मी चहाचा चाहता अजिबात नसल्यामुळे मी चहा घेतला नाही.  इतरांनी घेतला.  मला फक्त माझ्या बायकोने बनवलेलाच चहा आवडतो.  त्यामुळे मी चहा फक्त स्वतःच्या घरीच पितो.

बनबासा गावातला ढाबा आणि दुकान

इथल्या दुकानात चंद्राने गृहपयोगी वस्तू बऱ्याच खरेदी केल्या.  विवेकने सांगितले कि त्याचे गाव पहाडी भागात आहे जिथे अशा वस्तू मिळणे अवघड आहे.  त्यामुळे तो घरी जाताना जमेल तेवढी खरेदी करत होता.

धाब्याच्या शेफ ने पेटवलेली भट्टी

धाब्याच्या शेफ ने भट्टी पेटवल्यावर उब घेता आली.  थंडी अशी नव्हतीच.  फक्त गारवा होता.  बहुदा आम्ही उन्हाने भाजून निघणाऱ्या दक्खनच्या पठारावरून आल्यामुळे आम्हाला थोडं गार वाटत असावं.  आम्ही अजूनही सपाट प्रदेशातच होतो.  हिमालयीन भागात पोहोचायला मला अजून दोन दिवस होते.  विवेक आणि हेमंतचं गावही सपाट प्रदेशातच आहे असं विवेकने सांगितलं होतं.

आमचा म्होरक्या चंद्राने एक स्कॉर्पिओ गाडी ठरवली बॉर्डर पलीकडच्या बस स्टॉप पर्यंत जाण्यासाठी.  त्याचे म्हणणे बॉर्डरच्या अलीकडे पर्यंत गाडीने जाऊन बॉर्डर जर चालत ओलांडली तर गेटवरचे इंडियन पोलीस त्रास देतात.  काल दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकात शिरताना आम्ही तो अनुभव घेतला होताच.

बॉर्डर जवळ आली तसं रस्त्याला ट्रॅफिक लागलं.  ट्रक बस वगैरे मोठ्या गाड्या नाहीतच.  कार, जीप, दुचाकी, सायकलस्वार असलेच सगळे.  टुरिस्ट कोणीच नव्हते.  मला वाटत होतं मी एकटाच असावा ह्या बॉर्डर वरून नेपाळ सफारीला निघालेला.  पण एक GJ नंबरची टुरिस्ट बस दिसली.  गुजरात्यांनी बसच इकडे आणलेली होती.  आता हे स्वतःच्या बस मधून नेपाळ फिरणार.

बॉर्डर जवळच्या मोकळ्या जागेत कितीतरी नेपाळी रात्रभर राहिलेले.  सकाळी गेट उघडल्यावर पलीकडे जाणार असावेत.

बॉर्डर ओलांडल्यावर मागे वळून पाहताना


शारदा नदी हि इथली भारत आणि नेपाळ ची बॉर्डर आहे.  नदीवरच्या छोट्या पुलावरून आमची गाडी पलीकडे.  थोडीशी जुजबी तपासणी.  स्वतःच्या देशाची बॉर्डर अशी चालत आणि गाडीतून ओलांडणे एक वेगळा अनुभव आहे.

नेपाळ प्रवेशादरम्यान मागे वळून पाहताना
बॉर्डर पलीकडच्या नेपाळ मधल्या भागाचं नाव आहे गड्डा चौकी.  इथे एका नेपाळी चेकपोस्ट वर आमचा ड्राइवर एन्ट्री करून आला.  भारतीय गाडी नेपाळ मध्ये जाण्यासाठीचा सोपस्कर.

स्कॉर्पिओ गाडी ज्यातून आम्ही बॉर्डर ओलांडली

सातच्या सुमारास आम्ही एका बस स्टॉप ला पोहोचलो.  इथून पुढे चंद्रा वेगळ्या बसने जाणार होता.  विवेक, हेमंत, आणि मी वेगळ्या बस ने जाणार होतो त्यांच्या गावाला.

विवेक आणि हेमंतने आपापल्या फोनमध्ये त्यांच्याकडची नेपाळी सिम कार्ड टाकली.  विवेकने त्याच्याकडचे एक नेपाळी सिम कार्ड मला दिले.  माझ्या कार्डला हेमंत आणि मी समोरच्या दुकानातून १०० नेपाळी रुपयांचे रिचार्ज मारले.  मी दुकानदाराला भारतीय ५०० ची नोट दिली.  त्याने त्यातून नेपाळी १०० रुपये घेऊन बाकीच्या नेपाळी रुपयांच्या नोटा मला परत दिल्या.  इथे कळून गेले कि भारतीय नोटा इथे चालतायत.  आपले १०० रुपये म्हणजे नेपाळी १६० रुपये.

मी, विवेक, आणि हेमंत एका जुन्या मिनी बस मधून त्यांच्या गावाला गेलो.  कैलाली जिल्ह्यातलं लमकी चुहा गाव. पोहोचताच विवेकने एक हॉटेल शोधून त्यात रूम घेतली.  बाथरूम टॉयलेट असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन प्रकारच्या रूम होत्या.  मी सकाळचे सोपस्कार पूर्ण करेपर्यंत विवेक आणि हेमंत जाऊन माझ्याकडचे भारतीय रुपये देऊन माझ्यासाठी नेपाळी रुपये घेऊन आले.  मग विवेक आणि हेमंतने सकाळचे सोपस्कार पूर्ण केले.  तोपर्यंत मी हॉटेल बाहेर एक फेरफटका मारून आलो.

आता जेवणाची वेळ झालीच होती.  भूकही लागली होती.  त्याच हॉटेल मध्ये जेवायला बसलो.  नेपाळी पद्धतीची थाळी.  डाळ, भात, दोन भाज्या, आणि चटणी.  ह्या चवदार जेवणाचा आम्ही तिघांनी मनसोक्त समाचार घेतला.  पाहिजे तेवढे जेवा.  नेपाळी स्थानिक जेवणात फक्त भात असतो.  चपात्या नसतात.

जेवायला बसलेले (तुमच्या डावीकडून उजवीकडे) मी आणि विवेक

यथेच्छ जेऊन झाल्यावर विवेकच्या घरी जायला निघालो.  पण आधी मला पोखराला जायच्या बसचे तिकीट मिळते का ते बघायला गेलो.  बस स्टॅन्ड पर्यंत जायला विवेकने एक बॅटरीवर चालणारी रिक्षा ठरवली.  पोखराला जायच्या बसचे तिकीट मिळत होते.  अडीज वाजता म्हणजे अजून दीड तासाने बस होती, जी पोखराला पहाटे पोहोचणार.  इथे लमकी गावात बघण्यासारखे काही नव्हते.  त्यामुळे इथे एक दिवस न घालवता ह्या बसने पोखराला जाणे हा योग्य पर्याय होता.  बस तिकीट घेतले.

आता त्याच बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षातुन विवेकच्या घरी जायला निघालो.  रस्त्यात एक घर दिसल्यावर विवेकने रिक्षा थांबवायला सांगितली.  आम्ही उतरून त्या घरी गेलो.  मला सगळेच अनोळखी होते.  विवेक सर्वांना भेटल्यावर रिक्षातुन पुढे निघालो.  विवेकने नंतर खुलासा केला कि हे त्याच्या बायकोचे घर होते.  तो त्याच्या सासू सासऱ्यांना भेटून आला होता.

पुढचा स्टॉप विवेकचे घर.  हे तसे त्याचे फॅमिली होम होते.  इथे त्याच्या बहिणी वगैरे रहात होत्या.  त्याचे स्वतःचे घर इथून थोड्या अंतरावर होते.  विवेक घरातल्या सगळ्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्यावर आम्ही इथून निघालो.  आता विवेकच्या स्वतःच्या घरी आमची स्वारी निघाली.  त्याचे घर अजून बांधून पूर्ण झाले नव्हते.  सध्या तिथे त्याच्या बायकोची बहीण राहते.  विवेकच्या घराच्या अलीकडचे घर त्याच्या मामांचे आहे आणि पलीकडचे घर त्याच्या बायकोच्या मामांचे आहे.  आता आमची स्वारी निघाली हॉटेल वर.  हॉटेलची रूम सोडून पैसे देऊन आम्ही निघालो बस स्टॅन्ड कडे.

बस स्टॅन्ड वर पोहोचलो तेव्हा अडीज वाजून गेले होते.  रिक्षावाल्याला संपूर्ण फिरवल्याचे नेपाळी तीनशे रुपये दिले.  म्हणजे आपले १९० रुपये.  पोखराला जायची बस अजून यायची होती.

लमकी गावातला बस स्टॅन्ड
बस स्टॅन्ड वर काही तुरळक माणसं.  काठमांडूला जाणारी बस येऊन त्यात काहीजण चढले.  दहा मिनिटांनी पोखराला जाणारी बस आली आणि मी पोखराच्या दिशेने मार्गस्थ झालो.  बसमध्ये पुढची सीट मिळाली.  उद्या पहाटे बस पोखराला पोहोचणार होती.  चारशे नव्वद किलोमीटरचा लांबचा पल्ला होता.

लमकी ते पोखरा प्रवास, गुगल मॅप मधे पाहिलेला

रस्त्याला वाहने अगदीच तुरळक.  लमकी गाव सोडल्यावर थोड्या वेळाने एक चेकपोस्ट आली.  एक पोलीस बसमध्ये शिरून नजर फिरवून गेला.  वाहकाने बसची डिक्की उघडून दिली आणि पोलिसाने सामानावर नजर फिरवली.  मग बस पुढे सुरु.  बर्दीया नॅशनल पार्क मधून आमची बस जात होती.

चेकपोस्ट जवळचा एक फलक
साधारण अर्ध्या तासाने परत एक चेकपोस्ट.  इथेही एक पोलीस बसमध्ये शिरून नजर फिरवून गेला.  वाहकाकडून बसची डिक्की उघडवून सामानाची जुजबी तपासणी.

प्रवाशांच्या लघुशंकेसाठी थांबली गाडी

प्रवाशांपैकी काहींनी लघुशंका बोलून दाखवल्यावर गाडी थांबवण्यात आली.  पुरुष रस्त्याच्या डाव्या बाजूला गेले आणि स्त्रिया उजव्या बाजूला.

लमकी ते पोखरा प्रवासातला रस्ता

साडेसहा नंतर एका गावात चहापाण्याचा वीस मिनिटांचा ब्रेक.  इथे एक गजब रिक्षा दिसली जिचा पुढचा भाग बाईकचा आणि बाकीची बॉडी एखाद्या मेटल वर्कशॉप मध्ये बनवलेली.

एक गजब रिक्षा
केसरी किंवा वीणा वर्ल्ड बरोबर केलेली ट्रिप म्हणजे बागेतल्या फुलांवर बागडणारी फुलपाखरं.  एखादा देश खराखुरा बघायचाय तर असं गावं शहरं रस्ते धुंडाळत फिरणं क्रमप्राप्त आहे.  सिनियर सिटिझन्स झाल्यावर मग केसरी आणि वीणा वर्ल्ड बरोबर फिरावं.

साडेनऊच्या दरम्यान गाडी एका धाब्यावर जेवणासाठी थांबली.  दुपारी विवेकच्या गावात तुडुंब जेवण झालेलं होतं.  आता मी पोटाला विश्रांती दिली.

जेवणासाठी थांबलो त्या धाब्याचा फलक

रात्री मी जमेल तेवढी झोप पूर्ण करून घेतली.

नेपाळ सफर - दिवस तिसरा - पोखरा

बुधवार ११ एप्रिल २०१८

परवा सकाळी पुण्यातून सुरु झालेली भ्रमंती दुपारी दिल्ली विमानतळ, संध्याकाळी आनंद विहार बसस्थानक, काल पहाटे बॉर्डर जवळचं बनबसा, दुपारी लमकी गाव असे थांबे घेत आज पहाटे पोखराला पोहोचली.  दोन्ही रात्री बस प्रवास.

पहाटे सहाच्या दरम्यान मी पोखराच्या बस स्थानकामधून बाहेर पडलो.  आधीच उजाडलेलं होतं.  रस्त्यावर तुरळक माणसांची सकाळची कामावर जायची लगबग.  लेकसाईड रोडला अनेक हॉटेल आहेत तिथे मला जायचं होतं.  रात्रीच्या प्रवासानंतर बॅग पाठीवर घेऊन लेकसाईड रोडला चालत जाऊन हॉटेल शोधणं जरा जड गेलं असतं.  एक टॅक्सी ठरवली लेकसाईड रोडला जाण्यासाठी.  ३०० रुपये.  म्हणजे आपले १९०.  हॉटेल लेक ब्रीझ बरे वाटले.

हॉटेल लेक ब्रीझ चे रिसेप्शन
पाणी थंडगार.  तशीच अंघोळ उरकली.  हॉटेलची रूम साधी होती.  हॉटेलच्या आवारात अनेक प्रकारची फुलझाडं लावून परिसर सजवलेला.  मी फुलांचे भरपूर फोटो काढले.  बाजूच्या रूम मधला नेपाळी माणूस ब्लॅक टी पीत होता.  मी पण ब्लॅक टी (साखर टाकलेला) घेऊन प्यायलो.

हॉटेल लेक ब्रीझच्या परिसरातलं एक फुल
हॉटेलच्या किचन वरून समोर फेवा लेक दिसत होता.  लेक पलीकडच्या डोंगरावर पांढऱ्या रंगातला वर्ल्ड पीस स्तूप लक्ष वेधून घेत होता.

हॉटेलच्या मालकाबरोबर बोलताना त्याने पोखरा डे टूर साठी बस असल्याचे सांगितले.  त्याच्याशी बोलून हि टूर ठरवली.  बस समोरच्या रस्त्यावर येणार होती.  मी जाऊन समोरच्या रस्त्यावर उभा राहिलो.  वेळ होऊन गेली तरी बस काही येईना.

लेकसाईड रोडच्या फूटपाथ वरील ग्राफिटी
हॉटेलच्या मालकाचा फोन आता टूर वाला उचलेना.  मग ह्या डे टूर चा नाद सोडला.  फेवा लेक समोरच होता.  तिथे बोट राईड आणि वर्ल्ड पीस स्तूप ला भेट द्यायची ठरवली.  पोखरा बद्दल मी केलेल्या अभ्यासात फेवा लेक मध्ये बोट राईड कराच असा तिथे आधी गेलेल्या पर्यटकांचा सल्ला वाचला होता.  आणि वर्ल्ड पीस स्तूप ला गाडीने जाण्याऐवजी होडीतून लेक च्या पलीकडे जाऊन तिथून चालत जाणे इष्ट असेही वाचले होते.

दहा वाजून गेले होते.  पुण्यात सध्या भाजून काढतंय तसलं ऊन इथे नव्हतं.  हॉटेल लेक ब्रीझ पासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर फेवा ताल.  नेपाळी भाषेत ताल म्हणजे तलाव.  हा नेपाळमधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव.

फेवा लेक
लेक च्या काठाला पाण्यात कचरा होता.  पर्यटनाचे दुष्परिणाम.  असे पर्यटनाचे दुष्परिणाम जर नको असतील तर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवावी लागते.  भूतानमध्ये हे चांगलं जमलंय.  असो.  नेपाळ आणि भूतान ह्यांची तुलना करणे हा आपला आजचा विषय नाही.  जर तुम्हाला जाणून घ्यायचीच असेल नेपाळ आणि भूतान ची तुलना तर मला प्रत्यक्ष भेटा.

लेकच्या कडेला चालत जायचा रस्ता आणि रस्त्यापलीकडे छोटी मोठी रेस्टऑरेंट्स.  लेक च्या कडेने चालत पोहोचलो बोटी दिसत होत्या तिथे.  तिकीट काउंटर वर फेवा लेक पर्यंत जाऊन परत यायच्या बोटीचे तिकीट काढले.  २० रुपये देऊन लाईफजॅकेट घेणं कम्पलसरी आहे.

तिकीट काउंटर
एक माणूस बोट चालवण्यासाठी तयारच होता.  आम्ही दोघे बोटीतून निघालो.  मी बोटीत पुढे आणि मागे बसून तो बोट चालवत.  फेवा लेक च्या पलीकडच्या बाजूला अनेक पॅराग्लायडर्स उतरत होते.  समोरच्या सारंगकोट नावाच्या डोंगरावरून ते सर्व उडत होते आणि फेवा लेकच्या कडेच्या सपाट जागेत उतरत होते.

अर्ध्या तासात बोट लेक च्या कडेला पोहोचली.  इथे बोटीचा नावाडी दोन तास थांबणार होता.  मी पायऱ्यांच्या वाटेने डोंगर चढायला सुरुवात केली.  डोंगर चढणे उतरणे हा आपला आवडता उद्योग.  तरी किती वाजता चढायला सुरुवात केली ते मोबाइल मधल्या घड्याळात बघून ठेवले.

बोटीने फेवा लेकच्या पलीकडे गेल्यावर तिथून वर्ल्ड पीस स्तूप ला चालत जायचा रस्ता

रस्ता साधा सोपा आहे.  घसरण कुठेही नाही.  अनेक ठिकाणी पायऱ्या बनवल्यायत.  तब्येतीने धडधाकट सर्वजण इथे चढून जाऊ शकतात.  इथे जाणारे फारसे कोणी नव्हते.

रस्त्याला फाटा फुटला तिथे लावलेला फलक

रस्त्याला जिथे जिथे फाटे आहेत तिथे तिथे फलक लावलेत.  त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही.  गर्द झाडीमुळे इथे आल्हाददायक वातावरण.

गर्द झाडीतून टेकडीवर जाणारा रस्ता
तीस मिनिटात टेकडीवर पोहोचलो.  इथे उंचावर असूनही वारा काही नव्हता.  तरी पण वातावरण भन्नाट होतं.  आणि गर्दी नसल्यामुळे सोन्याहून पिवळं.  प्रवेशद्वारातून आत जाताच एक फलक आपण कुठे पोहोचलोय त्या ठिकाणाची जाणीव करून देत होता.

विश्व शांती स्तूप च्या प्रवेशद्वाराजवळील फलक
एका मोठ्या फुलावर एका फुलपाखराला आणि एका कीटकाला शांती लाभलेली.  तसं पाहिलं तर आज मनुष्यप्राण्याने स्वतःच्या स्वार्थासाठी इतर सर्व प्राणिमात्रांची शांतता हिरावून घेतलीये.

Habitat - निवासस्थान
फुलावर एक छोटे फुलपाखरू आणि एक कीटक बसलाय
पृथ्वीवर राहणाऱ्या लाखो प्रजातींपैकी एक
काय करायचंय माणूस ह्या त्यातल्या एका प्रजातीला - इतर सर्व प्रजातींचे निवासस्थान नष्ट करायचेय कि त्या सर्वांबरोबर मैत्रीने राहायचंय
काही पायऱ्या चढून जाताच समोर होता निप्पोन्झान म्योहोजी जपानी बुद्ध विहार.  दार कुलूप लावून बंद होते.  बहुदा नेपाळी पर्यटकांचा गलका शांतीप्रिय जपानी बुद्ध विहाराला नकोसा होत असावा.

पुढे गेल्यावर एक लाखमोलाचा फलक दिसला.

एक लाखमोलाचा फलक
इथला परिसर स्वच्छ आहे.  विविध छोटी मोठी झाडं लावलीयेत.  सकाळी हॉटेलच्या गच्चीवरून पाहिलेला विश्व शांती स्तूप आता समोर होता.

विश्व शांती स्तूप
आधी परिसरात जिरून मग पायऱ्या चढून जायचे ठरवले.  हा विश्व शांती स्तूप जपान्यांनी बांधलाय.  १९४५ साली विश्व शांती हा विषय जपान्यांना जितक्या चांगल्या प्रकारे समजलाय तितका इतर कोणत्या राष्ट्राला समजला असण्याची शक्यता कमीच.

परिसरातील एक फलक

बांधकामातला काटेकोरपणा पाहता हे नेपाळी काम नाही हे तसे ओळखता येते.  ११५ फूट उंचीच्या पॅगोडा मध्ये चारही बाजूला बुद्धाच्या मुर्त्या आहेत.  पुढची मूर्ती जपानमध्ये बनवलेली आहे.  पश्चिम बाजूची श्रीलंकेहून आणली आहे.  उत्तर दिशेकडची थायलंडहून आणलेली आहे.  दक्षिण बाजूची नेपाळमध्ये बनवलेली आहे.

१९७३ साली हा पॅगोडा जपान्यांनी बांधायला घेतला.  १९७४ मध्ये त्यावेळच्या नेपाळी सरकारने जुजबी कारणे दाखवून सर्व बांधकाम पाडून टाकले.  अनेकदा नेपाळी सरकारने इथल्या कामगारांना अटक केली.  विश्व शांती स्तूप बांधण्याचे प्रयत्न निप्पोन्झान म्योहोजी ह्या जपानी संस्थेकडून पोखरा मधल्या बुद्ध धर्मियांच्या मदतीने पुढचे १८ वर्षे सुरु होते.  हार मानून सोडून देतील ते जपानी कसले.  चिवटपणा नेपाळयांकडे जितका आहे तितकाच जपान्यांकडेही आहे.  १९९२ साली त्यावेळचे नेपाळचे पंतप्रधान गिरीजा प्रसाद कोईराला इथे आले आणि त्यांच्या सहकार्याने बांधकाम पुनश्च सुरु झाले.  मग कोणतेही विघ्न न येता १९९९ साली हि वास्तू बांधून पूर्ण झाली.

फेवा ताल आणि पोखरा शहराचे विहंगम दृश्य
इथून फेवा ताल आणि पोखरा शहराचे विहंगम दृश्य दिसत होते.  बहुदा आकाश निरभ्र असेल तर दूरवरचे बर्फाच्छादित पर्वत दिसत असावे.  आज आकाश ढगाळलेले होते.

विश्व शांती स्तूप  ...  जरा वेगळ्या प्रकारे पाहिलेला
बोटवाला खाली वाट बघत असल्याने फार वेळ रेंगाळलो नाही.  पण प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर खाली उतारण्याऐवजी दुसरा रस्ता घेतला.  थोडं पुढे गेल्यावर विश्व शांती स्तूप एका वेगळ्या प्रकारे दिसला.  इथे काही सायकल स्वार पलीकडून कुठूनतरी दनादन आले.  नंतर वाचनात आले कि हा पोखारामधला माउंटन बायकिंग ट्रेल, म्हणजे सायकल वरून डोंगरात फिरण्याचा रस्ता होता.  रस्ता असा नसेलच.  आपल्याकडे डोंगरात ट्रेकिंगला जायच्या वाटा आहेत तशी वाट असेल.

एक पाश्चिमात्य माणूस दोन्ही हातात वॉकिंग स्टिक घेऊन चालत आला.  तो पलीकडच्या गावापर्यंत ट्रेक ला चालला होता.  एकटाच.  अशी डेरिंग असावी.  नाहीतर रोजच्या रहाटगाड्यात आयुष्य कधी संपून जाईल कळणारही नाही.

प्रवेशद्वारापर्यंत येऊन आता मी उतरायचा रस्ता धरला.

उतरताना
भर दुपारीही वातावरण आल्हाददायक होते.  एका ठिकाणी एक मोठे झाड खोडापासून तोडलेले दिसले.  हि पण हत्याच.  झाडाची कसली हत्या असा विचार करणारे आजकाल अनेकजण सापडतात.  असो.  झाडांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पीटर वोहलबेन ह्यांनी लिहिलेलं द हिडन लाईफ ऑफ ट्रीज हे पुस्तक वाचलं नसाल तर नक्की वाचा.

हत्या
आजूबाजूच्या गावातल्या एक नेपाळी बाई झाडाची पानं तोडण्यासाठी आल्या होत्या.  त्यांच्याशी नमस्ते झाल्यावर त्यांनीच मला त्यांचा फोटो काढायला सांगितले.  थोड्या गप्पा मारून मी जायला निघाल्यावर मग पैसे मागितले.  त्यांना मी नेपाळी वीस रुपये दिले.

झाडाची पानं तोडायला आलेल्या नेपाळी बाई
वीस मिनिटात डोंगर उतरलो.  बोटवाला तयारच होता.  मला म्हणतो बराच लवकर आलात.  त्याला नाही सांगितले ह्या डोंगरासारखा माझ्या घराजवळचा घोराडेश्वरचा डोंगर मी गेले तीन चार वर्ष चढतोय.

विविधरंगी डुंगा, म्हणजे नेपाळी होड्या, लांबवर पसरलेला फेवा ताल, पलीकडे सारंगकोटचे डोंगर, असा इथे अप्रतिम नजारा.

फेवा ताल आणि डुंगा, म्हणजे नेपाळी होड्या
आता परत जाताना तळ्यातल्या बेटावचे बाराही देऊळ बघून जायचे ठरवले.  ह्या ज्यादाच्या ठिकाणामुळे बोट परत गेल्यावर तीनशे नेपाळी रुपये द्यायचे ठरले.  अठराव्या शतकात बांधलेले हे देवीचे दुमजली देऊळ आहे.  आलेले भाविक इथे धान्य विकत घेत होते तळ्यातल्या माशांना खायला घालायला.  ज्याची त्याची श्रद्धा.  उगाच आपण आधुनिक कुतर्कपणा दाखवून दिसेल त्यावर टीका करत जाऊ नये.

फेवा ताल मधल्या बेटावरून समोरचे दृश्य
ढगाळ वातावरणामुळे आज दूरवरची बर्फाच्छादित शिखरं दिसत नव्हती.  वीसेक मिनिटात बोट काठाला परतली.

एका छोट्या हॉटेलच्या भिंतीवरची ग्राफिटी
आता पोटातल्या कावळ्यांना शांत करणं गरजेचं होतं.  हॉटेल लेक ब्रीझ ज्या गल्लीमधे होते त्या गल्लीत, म्हणजे गंतव्य स्ट्रीट, एका ठिकाणी चाऊमिन खाल्ले.  आपण ज्याला नूडल्स म्हणतो त्याला इथे चाऊमिन म्हणतात.  हा मूळचा तिबेटी पदार्थ आहे असे एका ठिकाणी वाचनात आले.

हॉटेल लेक ब्रीझच्या बाजूलाच हॉटेल द कोस्ट दिसलं.  इथे उद्यासाठी रूम घेतली.  आता इंटरनॅशनल माउंटन म्युझियमला भेट द्यायची ठरवलं.  पोखरामधली हि जागा चुकवून चालणारच नव्हतं.  तिथे जायला द कोस्ट हॉटेलची गाडी ठरवली.  इंटरनॅशनल माउंटन म्युझियमला भारतीयांसाठी दोनशे नेपाळी रुपये तिकीट होतं.

पंगुं लंघयते गिरिम् असं वाचलं होतं.  इथे तेच तर लिहिलंय.  फक्त काळ आणि वेळ बदललीये.
सगरमाथा (म्हणजे एव्हरेस्ट), हिमाल (म्हणजे हिमालय), आणि ट्रेकिंग हे मॅग्नेट आहेत जगभरातल्या साहसी, निम-साहसी, आणि हौशी गिर्यारोहकांना, तसेच पर्यटकांना नेपाळ मधे ओढून आणणारे.  People don’t take trips - trips take people, असं जॉन स्टेनबेक ह्यांनी म्हटल्याप्रमाणे.

नेपाळमधे समुद्रसपाटीपासून साठ मीटर पासून ते आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पर्यंत उंचीचे नानाविध भाग आहेत.  त्यामुळे ह्या छोट्याशा देशात प्रचंड जैवविविधता आढळते.

इंटरनॅशनल माउंटन म्युझियमला दुपारी भरपूर मोकळा वेळ काढून भेट द्यावी.  सकाळच्या वेळी पोखरमधल्या इतर ठिकाणी जावं.  संपूर्ण म्युझियम व्यवस्थित पाहायला तीन तास लागतील.

मी म्युझियम बघत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला.  मी इथे यायला गाडी केली ते बरंच झालं.  आता जाताना भिजावं लागणार नाही.  मला नंतर कळलं कि पोखरामधे रोज संध्याकाळी पाऊस पडतो.  वर्षभर.  आपल्याकडे जसे चेरापुंजी आहे तसे इकडे पोखरा.  नेपाळ मधलं सगळ्यात जास्त पाऊस पाडण्याचं ठिकाण.

इंटरनॅशनल माउंटन म्युझीयम च्या परिसरात
इंटरनॅशनल माउंटन म्युझीयम च्या परिसरात एक भलीमोठी क्लाइंबिंग वॉल आहे.  इतकी मोठी कि मोबाईल मधल्या कॅमेऱ्याच्या एका फ्रेम मधे हि बसवणं अवघड आहे.  ह्या क्लाइंबिंग वॉलला मॉरिस हरझॉग ह्यांचं नाव दिलंय.

इंटरनॅशनल माउंटन म्युझीयम च्या आवारातील भलीमोठी क्लाइंबिंग वॉल
द कोस्ट हॉटेलच्या गाडीचा ड्रायवर चम्या निघाला.  चालत्या गाडीत उगाच सारखा दार उघड बंद करत होता.  ह्याला रस्ते समजेनात.  बोलायलाही बावळट.  परत नाही ह्याला घेऊन कुठे जायचं.

हॉटेलवर जाऊन तासभर आराम केला.  पाऊस थांबल्यावर जेवायला बाहेर पडलो.  लेक साईड रोड वर सगळीकडे हॉटेल्स.

लेक ब्रीझ हॉटेलवर परतल्यावर हॉटेलच्या मालकाशी बोललो उद्याच्या भटकंतीचा बेत बनवायला.  पण निश्चित काही ठरवू शकलो नाही.  टुरिस्ट बसमधे बसून दिवसभर पोखरा दर्शन करायची माझी इच्छा नव्हती.  उद्याच बघू.