Wednesday, May 9, 2018

नेपाळ सफर - दिवस चौथा - पोखरा

गुरुवार १२ एप्रिल २०१८

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली.  पुण्याच्या शहरी गजबजाटात पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येणं दुर्मिळ झालंय.  तिथे मोबाइल मधल्या गजराची गरज पडते.  इथे जाग येताच आल्हाददायक वातावरणाची चाहूल लागली.  सहा वाजता लख्ख उजाडलेलं होतं.  कालच्याप्रमाणे आजही साखर टाकलेला ब्लॅक टी घेतला.  हॉटेल लेक ब्रीझच्या गच्चीवरून फेवा लेकचा परिसर, आजूबाजूचे डोंगर, पोखरा मधली घरं वगैरे बघत चहा संपवला.  आज आकाश निरभ्र होतं.  सारंगकोटच्या पलीकडून एक बर्फाच्छादित शिखर दूरवरून खुणावत होतं.

हॉटेल लेक ब्रीझच्या गच्चीवरून दिसलेला सारंगकोट डोंगर आणि पलीकडे अन्नपूर्णा पर्वतशिखरांपैकी एक
हॉटेलच्या परिसरात मालकांनी विविध फुलझाडं लावली आहेत.  इथल्या फुलांचे फोटो काढले.  हॉटेलमध्ये पाश्चात्य पर्यटक बरेच होते.  हॉटेलच्या मालकाने मार्केटिंग उत्तम प्रकारे केलेलं होतं तर.

हॉटेल लेक ब्रीझच्या परिसरातलं फुल
हॉटेल लेक ब्रीझच्या पलीकडचंच, म्हणजे दोन्हीच्या मधे एकच भिंत असलेलं, द कोस्ट हॉटेल आजसाठी ठरवलं होतं.  सकाळी सातलाच मला रूम द्यायला ते तयार झाले.  मग हॉटेल लेक ब्रीझ मधली रूम सोडून बॅगा पलीकडच्या द कोस्ट हॉटेल मधे नेल्या.

हॉटेल लेक ब्रीझ मला तितकंसं आवडलं नव्हतं.  अंघोळीला पाणी अजिबात गरम नव्हतं इथे.  काळ सकाळी मी थंड पाण्यानेच अंघोळ केली होती.  पुण्यात भर एप्रिलचा उन्हाळा असला तरी इथे पोखरामधे थंडीच होती.  रूमची स्वच्छता बेताचीच होती.  डासही होते.

हॉटेल लेक ब्रीझच्या तुलनेत द कोस्ट हॉटेल छान होतं.

पोखारामधलं द कोस्ट हॉटेल
हॉटेलच्या रिसेप्शन वरची मुलं बोलकी होती.  त्यांच्याशी बोलून आजचा कार्यक्रम ठरवला.  छोट्या हेलिकॉप्टर मधून पंधरा मिनिटांची सफर.  त्यानंतर सारंगकोटला झिप लाईन राईड.

हेलिकॉप्टर सफर पोखरा एअरपोर्ट पासून होती.  तिथे जायला त्यांनी गाडी पाठवली.  पोखरा एअरपोर्ट च्या आवारातल्या हेली एअर नेपाळ च्या कार्यालयात साडेसातला दाखल झालो.

इथे हेलिकॉप्टर सफारीच्या वेळा ठरलेल्या आहेत.  सकाळी लवकर हवामान चांगले असते.  नंतर दुपारी हवामानाचा काही भरवसा नाही.  आणि पोखरामध्ये रोज संध्याकाळी पाऊस पडतो.  वर्षभर.  त्यामुळे हेलिकॉप्टर सफर इथे सकाळी लवकरच असते.  त्यानंतर सारंगकोटहून उडणारे पॅराग्लायडर्स.

दोन सीटचं छोटंसं हेलिकॉप्टर, ज्याला गायरोकॉप्टर म्हणतात, समोर तयार होतं.  पायलटही तयार होता.

मी फॉर्म भरला.  गायरोकॉप्टरची तपासणी झाली.  आधी मी मागच्या सीटवर बसलो.  मग पुढच्या सीटवर पायलट.  मागच्या सीट वर बसण्यासाठी पुढची सीट पुढे सरकवून जागा करावी लागली.  माझ्या उजव्या बाजूला एक कॅमेरा ठेवला होता.  फोटो काढण्यासाठी.

गायरोकॉप्टर
मी कानाला लावलेल्या हेडफोन मधून पायलट आणि कंट्रोल टॉवरचं सगळं संभाषण मला ऐकू येत होतं.  पायलटने माझ्याशी संपर्क होतोय ना ह्याची खात्री करून घेतली.  कंट्रोल टॉवरकडून सिग्नल मिळाल्यावर आम्ही मुख धावपट्टीजवळ गेलो.  मुख धावपट्टीच्या अलीकडेच थांबलो.  दूरवरून एक विमान उतरायला येत होते.  ते उतरल्यावर आपला नंबर आहे असे पायलटने मला सांगितले.

उड्डाणासाठी मुख्य धावपट्टीवर पोहोचताना
ते विमान उतरल्यावर मग आमचं गायरोकॉप्टर पायलटने मुख्य धावपट्टीवर आणलं.  सरळ जात थोडा वेग घेऊन झक्कास उड्डाण.  कसली धडधड नाही.  मोठा आवाज नाही.  विमानांपेक्षा हे गायरोकॉप्टर फारच सुरेख उडालं.  तिन्ही बाजूच्या मोठ्या काचांमुळे उत्कृष्ट दृश्यमानता.

उड्डाणानंतर पोखरा शहराचं उंचावरून दर्शन
पलीकडे सारंगकोट वगैरे डोंगर
त्यांच्या पलीकडे अन्नपूर्णा पर्वतरांगेतली बर्फाच्छादित शिखरं

पायलट कंट्रोल टॉवरशी संपर्क साधून होता.  मधे मधे माझ्याशीही बोलत होता.  आम्ही जात होतो सारंगकोट डोंगराच्या दिशेने.

अन्नपूर्णा पर्वतरांगेतील शिखरं न्याहाळताना

दूरवरच्या अन्नपूर्णा पर्वतरांगेतील शिखरांचा नजारा शब्दात वर्णन करणं अशक्य.  मोबाइलमधे फोटो काढणेही अशक्य.  अफाट पसरलेल्या ह्या हिमालयापुढे थोटुकभर मोबाइल तो कसला.  चिटुकल्या गायरोकॉप्टर मधून बघताना शब्द अपुरे पडतात.  प्रत्यक्ष ह्यातल्या एखाद्या बर्फाच्छादित शिखरावर उभं राहिलं तर काय होईल तो जगडव्याळ पसारा बघताना.

सारंगकोट परिसरावरून उडताना

सारंगकोट परिसराभोवती एक चक्कर मारून, अन्नपूर्णा पर्वतरांगेतली बर्फाच्छादित शिखरांना दुरून नमस्कार करून आम्ही परत फिरलो.

पोखरा शहरावरून उडताना
गायरोकॉप्टरमधे बसल्यापासून मी जो फोटोंचा क्लिकक्लीकाट सुरु केला तो गायरोकॉप्टरमधून उतरेपर्यंत.

पायलटची गायरोकॉप्टर धावपट्टीवर उतरवण्याची तयारी जवळून पाहायला मिळाली.  गायरोकॉप्टर इतकं हळुवार उतरलं कि जमिनीवर केव्हा टेकलं समजलंही नाही.

उतरण्याची तयारी
गायरोकॉप्टर मधे बसून उडण्याचा अनुभव एकदा तरी घ्यावाच.  तो जर पोखरा सारख्या ठिकाणी असेल तर वर्णन करायला शब्द अपुरे पडणार.  गायरोकॉप्टर मधून बाहेर पडल्यावरही मी यथेच्छ फोटोग्राफी केली.

हेली एअर नेपाळ च्या कार्यालयातील एक फलक
हेली एअर नेपाळ च्या गायरोकॉप्टरमधून सफर हा पोखरमधला माझा आणखी एक अविस्मरणीय अनुभव.

पायलट सोबत फोटो

जर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरले तर नेपाळमधे चार टक्के जास्त पैसे घेतात बँक चार्जेस म्हणून.  माझ्याकडे कॅश कमी होती.  मग पोखरा विमानतळाच्या आवारातल्या ATM मधून कॅश काढली.

पोखरा विमानतळाच्या आवारात
मला हॉटेलवर सोडायला हेली एअर नेपाळतर्फे गाडी होती.  कारच्या डॅशबोर्डच्या कप्प्यात ड्रायव्हरने पाच नाणी ठेवली होती.  आमच्या नाण्यांच्या संग्रहात मला ती हवी होती.  ड्रायव्हरला मी ती मला देतो का विचारले.  लगेच तयार झाला.  नेपाळी एक रुपयाची पाच नाणी होती.   मी त्याला नेपाळी दहा रुपयाची नोट दिली.  पाच रुपये सुट्टे नाहीयेत म्हणाला.  बरेचसे नेपाळी लोक हे असे साधेभोळे.  समोरच्याला फसवणं ह्यांना जमत नाही.  नेपाळच्या बाजूच्या दिल्ली, उत्तराखंड, युपी, बिहार ह्या भारतातल्या राज्यांमध्ये आले कि हेच फसवले जातात.

नऊला मी हॉटेलवर परतलो होतो.  आता साडेदहाला हायग्राउंड ऍडव्हेंचर्सच्या कार्यालयात पोचायचं होतं.  सारंगकोटला झिप लाईन राईड करण्याच्या ठिकाणी त्यांची गाडी घेऊन जाणार होती.  हॉटेल मधून लवकरच निघालो.  लेक साईड रोडच्या लेक यार्ड पिझ्झेरिया मधे ब्रेकफास्ट उत्तम मिळाला.

लेक यार्ड पिझ्झेरिया मधला आजचा ब्रेकफास्ट
पोटाचा प्रश्न मिटल्यावर मग दूरवर चालायला काही वाटत नाही.  हायग्राउंड ऍडव्हेंचर्सच्या कार्यालयात वेळेआधीच पोहोचलो होतो.  मग लेक साईड रोडला थोडा टाइमपास.

हायग्राउंड ऍडव्हेंचर्स चे कार्यालय
वेळ झाल्यावर गाडीत ड्रायव्हर आणि आम्ही पाच जण बसलो.  एक भारतीय दाम्पत्य, एक पाश्चिमात्य दाम्पत्य, आणि मी.

ह्या गाडीत बसून सारंगकोटला गेलो
तीस मिनिटांनी सारंगकोटला गाडीतून उतरलो.

झिप फ्लायर नेपाळ चे प्रवेशद्वार
इतकी लांब जाणारी झिप लाईन होती कि दूरवर कुठपर्यंत जायचंय हे दिसतही नव्हतं.

बरोबरच्या माणसाकडून मला हव्या त्या पोझ मधे माझा फोटो काढून घेतला
इथल्या माणसाने व्यवस्थित सूचना दिल्या.  झिप लाईन ची तयारी पूर्ण झाली.  दोन वेगवेगळ्या झिप लाईन शेजारी शेजारी होत्या.  एकावेळी दोन्हीकडून एक एक माणूस खाली सोडता येत होता.


जगातली सर्वात थरारक झिप लाईन
दोन मिनिटात डोंगरावरून थेट खाली
अंतर एक किलोमीटर आठशे मीटर.  दोन हजार फुटांचा व्हर्टिकल ड्रॉप.  एकशेवीसचा वेग.  खाली पोहोचायला लागणार वेळ फक्त दोन मिनिटं.  शब्दात वर्णन न करता येणार अनुभव.  झिप लाईन च्या ऐवजी झिप फ्लायर हे नाव अतिशय योग्य आहे.

सुसाट खाली येताना
अशा ठिकाणी न घाबरता मस्त मजेत थरार अनुभवायचा कानमंत्र म्हणजे कसं कुठं काय कधी असले विचार डोक्यात आणायचेच नाहीत.  डोकं मोकळं ठेऊन करायच्या गोष्टी आहेत ह्या.

झिप फ्लायर नेपाळच्या खालच्या स्टेशनवर बंजी जंपचा लोखंडी मनोरा होता.  आमच्यातला एक जण बंजी जंप करणार होता.  बाकीचे सगळे प्रेक्षक.

बंजी जंपचा लोखंडी मनोरा

थोड्याच वेळात आम्हाला आमचे झिप लाईन वरून खाली येतानाचे फोटो, एक टीशर्ट, आणि सर्टिफिकेट मिळालं.

साहसवीरांसाठी सदैव तयार
आमची गाडी इथे येऊन तयार होती.  आमच्यातल्या एकाची बंजी जंप झाल्यावर आम्ही गाडीत बसलो परत लेक साईड रोड वरच्या हायग्राउंड ऍडव्हेंचर्सच्या कार्यालयात जाण्यासाठी.

लेक साईड रोड वर परत आल्यावर पोटाचा प्रश्न सोडवायचा होता.  आणि उद्याच्या रहाण्याचा.  उद्या द कोस्ट हॉटेल मधे सगळ्या रूम भरलेल्या होत्या.  नेपाळी नववर्षानिमित्त.  लेक साईड रोड आणि परिसरातली बरीच हॉटेल धुंडाळल्यावर हॉटेल सेंटर लेक मधे उद्यासाठी रूम मिळाली. मग पोटाचा प्रश्न सोडवला.

दुपारचं जेवण ...  चाऊमिन
द कोस्ट हॉटेल मधे परत आल्यावर माझ्यासाठी हेली एअर नेपाळ ने फोटो आणि सर्टिफिकेट पाठवले आहे काय अशी विचारणा केली.  रूम मधे जाऊन आराम केला.  पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत हुंदळल्यावर संध्याकाळी पाच ते सहा माझी आरामाची वेळ.  रिसेप्शनवरच्या मुलाने मला फोन करून सांगितले तुमचं सर्टिफिकेट आणि फोटो आले आहेत.

हेली एअर नेपाळ ने मला दिलेले सर्टिफिकेट
पाऊस थांबल्यावर बाहेर पडलो.  मी काल राहिलो होतो त्या शेजारच्या लेक ब्रीझ हॉटेलच्या मालकाबरोबर बोलून उद्या सकाळचा बेत ठरवला.  अन्नपूर्णा पर्वतरांगेवर होणार सूर्योदय बघायला सारंगकोटला जायचं.  सकाळी सव्वापाचला निघून त्याच्या गाडीतून सारंगकोटला जाऊन यायचे आठशे नेपाळी रुपये.  म्हणजे आपले पाचशे.

कालच्याप्रमाणे आजही लेक साईड रोडला लांबलचक फेरफटका आणि योग्य ठिकाण बघून जेवण.  दुपारी एक दुकान बघितलं होतं तिथे थोडं शॉपिंग.


लेक साईड रोडकडेचं एक दुकान
एका दुकानात नेपाळी नवी जुनी नाणी आणि पोस्टाचे स्टॅम्प मिळाले.

No comments:

Post a Comment