Wednesday, May 9, 2018

नेपाळ सफर - दिवस सातवा - काठमांडू

रविवार १५ एप्रिल २०१८

आजचा पहिला कार्यक्रम चंद्रगिरी हिल.  काठमांडू मधे असाल तर ह्या जागी अवश्य भेट द्या, आणि सकाळीच इथे जा, असे माझ्या काठमांडू बद्दलच्या अभ्यासात मी वाचले होते.  तिथे जाण्यासाठी गाडी न ठरवता मी लोकल बस ने जायचे ठरवले.  सकाळी सहा पासून तिथे जाण्यासाठी लोकल बस असतात असे काल कळले होते.  हॉटेल मधून सव्वासहाच्या सुमारास बाहेर पडलो.  चंद्रगिरी हिल जाण्यासाठी लोकल बस कुठे मिळेल अशी रस्त्यावर सापडलेल्या माणसांकडे चौकशी केली.  इतक्या सकाळी रस्त्याला फारसे कोणी नव्हते.  अचूक उत्तर देणारे कोणीच सापडले नाहीत.  असं होतं कधीकधी.  आपण एखाद्या ठिकाणाला भेट द्यायला दुरून आलेले असतो.  आणि त्या गावच्या लोकांना त्या ठिकाणाचा पत्ताच नसतो.  थोडं अंतर चालत गेलो एका हायवे पर्यंत.  इथून सोलंकी पर्यंत बस घेऊन तिथून दुसऱ्या बसने जावं लागतं असं कळलं.  सोलंकीला जाणारी लोकल बस मिळाली.

काठमांडू मधले धुळीने भरलेले रस्ते
रस्त्याच्या दुतर्फा खुरटी घरं, दुकानं
आपल्या देशाला, व्यवस्थेला, मोदींना शिव्या घालणाऱ्या लोकांना इथे काठमांडूमधे राहायला पाठवून दिले पाहिजे महिन्याभरासाठी.  बरेचसे सरळ होऊन परत येतील.

अखंड धुळीने भरलेले काठमांडू शहर ट्रिप ऍडव्हायजर वेबसाईट मधे इतक्या भारी रेटिंग देऊन कशाला दाखवतात हे मला अजिबात कळले नाही.  ह्यापेक्षा पोखरा नक्कीच भारी आहे.  ट्रिप ऍडव्हायजर आणि इतर सर्व ट्रॅव्हल वेबसाईट बहुसंख्य ग्राहकांना रुचेल ते आणि त्यातून त्यांचा स्वतःचा फायदा ज्यात होईल तेच दाखवतात.  ऑफबीट डेस्टिनेशन्स, धोपट मार्ग सोडून बघण्याची ठिकाणं असे सर्व इथे सापडत नाही.  गूगल मॅप पिंजून काढला तर अशा जागा कळतात.  हाताशी भरपूर वेळ ठेऊन स्वतः केलेली भटकंती हा सर्वात उत्तम मार्ग.

मी बसलेल्या लोकल बसचा चालक हुशार नव्हता.  मला उतरायचा स्टॉप येऊन गेला तरी मी बसलेलोच होतो.  आजूबाजूच्या प्रवाशांना विचारल्यावर लक्षात आले.  खरंतर स्टॉप चे नाव कलंकी होते.  सोलंकी नव्हे.  मग बस मधून उतरून चौकशी केली.  रस्ता ओलांडून उलट्या दिशेला जाणारी लोकल बस पकडली.  रस्त्यांची दुर्दशा बघवत नव्हती.  एका देशाच्या राजधानीमधे आपण फिरतोय असे अजिबात वाटत नव्हते.  नेपाळ हा गरीब देश आहे हे ऐकून होतो.  पण इथली परिस्थिती इतकी वाईट असेल असे वाटले नव्हते.

तसे बघितले तर माझी हि ट्रिप फारच यशस्वी होत होती.  बागेतल्या फुलांवर बागडणाऱ्या फुलपाखरांप्रमाणे मला फक्त लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या नव्हत्या.  इथे सर्वसामान्य लोक कसे राहतात, शहरातले आणि खेड्यातले दोन्ही, वगैरे अनुभवायचे होते.  "Like a local" हि ह्या ट्रिप ची travel style मी आधीपासूनच ठरवून आलो होतो.  त्याची प्रत्यक्षात पूर्णता होताना wanderlust का काय म्हणतात ते दिल्ली सोडल्यापासून भरभरून पीत होतो.

माझी कलंकी ला उतरून पुढची चौकशी.  इथून चंद्रगिरी हिल कडे जाणारी बस घेतली.  एका ठिकाणी उतरून पुढे काही अंतर चालत जायचे होते.

डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी केबल कार आहेत.  केबल कार स्टेशनला साडेसातला पोहोचलो.  आठ वाजता तिकीट काउंटर सुरु होईल असे कळले.  आठच्या आधीपासूनच तिकीट काउंटरच्या खिडक्यांसमोर रांगा लागल्या.  सार्वजनिक ठिकाणी शिस्त, संयम वगैरेच्या बाबतीत नेपाळी लोक भारतीयांसारखेच.

केबल कार स्टेशनवरचे तिकीट काउंटर
अजून तिकिटं द्यायला सुरुवात व्हायचीये
रांगेत उभं राहून तिकीट घेतले.  भारतीयांसाठी अकराशे वीस नेपाळी रुपये तिकीट होतं.  म्हणजे आपले सातशे रुपये.  आत्तापर्यंत केबल कार स्टेशनमधे जाण्यासाठी आणखी एक भलीमोठी लाईन बनली होती.  हातात तिकीट आल्यावर आता त्या लाईन मधे थांबलो.  केबल कार भराभर जात होत्या.  रांगेतून पुढे सरकत सरकत एकदाचा साडेनऊ वाजता मी केबल कार मधे बसलो.  इथले तिकीट घेतल्यानंतर सात दिवसात वापरायचे असते.  हे तिकीट काठमांडू मधल्या काही हॉटेल्स मधेही मिळते.  जर हा रांगेतला दीड तासाचा वेळ वाचवायचा असेल तर काठमांडू मधून तिकीट घेऊन इकडे या.  मला माहिती नसल्यामुळे मी दीड तास रांगेत होतो.

केबल कार स्टेशन
एकेक केबल कार डाव्या बाजूने थोड्या थोड्या वेळाने खाली येत होती.  अर्धगोल फिरून उजव्या बाजूने वर जात होती.  अर्धगोल फिरताना केबल कार हळू पुढे सरकत होत्या.  तेवढ्यात आत बसून घ्यायचे.  अर्धगोल वळून जायला येण्याआधीच केबल कारची स्वयंचलित दारं उघडत होती.  माणसं बसल्यानंतर दारं बंद होत होती.  एका केबल कार मधे दोन्ही बाजूला तीन तीन अशी सहा माणसं बसायला सीट.

केबल कार स्टेशन पासून वर जायला सुरुवात
उंच जागांवर जाण्याची भीती असणाऱ्यांनी केबल कारच्या प्रवासात सावध रहावे.  खरंतर उंच जागांची भीती घालवण्यासाठी ह्या केबल कारपेक्षा उत्तम जागा नाही.  एकदा आत शिरलात कि दारं बंद आणि केबल कार वर वर सरकायला सुरुवात.  मग कितीही बोंब मारा.  डोंगरावरच्या स्टेशन वर पोहोचल्यावरच त्यातून बाहेर पडायचं.

अडीज किलोमीटरचं अंतर पार करून केबल कार दहा मिनिटात डोंगरावरच्या स्टेशन वर पोहोचली.  हा डोंगर चालत चढायचा झाला तर अर्धा दिवस गेला असता.  हा संपूर्ण डोंगर गर्द झाडीने भरलाय.

डोंगरावरून बघताना ... डावीकडची केबल कार स्टेशन मधे येतेय आणि उजवीकडची स्टेशन मधून खाली जातेय
इथे पर्यटक होते पण गर्दी अशी कुठे नव्हती.  सर्वच्या सर्व नेपाळीच दिसत होते.  आचरट विचरट पर्यटक कोणीच नव्हते.  तसा थोडाफार कचरा केला होता नेपाळी पर्यटकांनी.  आपल्याप्रमाणेच नेपाळी लोकही सार्वजनिक ठिकाणी जिकडे तिकडे कचरा करतात.  इथे कचरा उचलायला सफाई कर्मचारी होते.  काठमांडूच्या रस्त्यांवर ढिगाढिगाने कचरा.

इथल्या उंचीची जाणीव करून देणारे फलक काही ठिकाणी लावलेत.

इथल्या उंचीची जाणीव करून देणारा एक फलक
पोखरातल्याप्रमाणे इथेही पॅराग्लायडिंग आणि झिप लाईन करण्याचा विचार आहे.

भालेश्वर महादेव मंदिर
भालेश्वर महादेव मंदिर आणि ह्या पर्वताला नेपाळच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे.  गोरखा साम्राज्याचे राजे पृथ्वी नारायण शाह एकदा ह्या पर्वतावर आले आणि त्यांनी इथून दूरदूर पर्यंत पसरलेली काठमांडू व्हॅली पहिली.  अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी काठमांडू व्हॅली जिंकून घेतली.  त्याकाळी नेपाळ मधे अनेक छोटे मोठे राजे आपापल्या प्रदेशांवर राज्य करत होते.  गोरखा साम्राज्याचे राजे पृथ्वी नारायण शाह ह्यांनी सर्व छोट्या मोठ्या राज्यांना एकत्र करत अखंड नेपाळ राज्याची स्थापना केली.

नेपाळच्या इतिहासातील एक महत्वाचा प्रसंग दाखवणारं भित्तीचित्र
भालेश्वर महादेव मंदिराबद्दल ज्या ऐतिहासिक कथा आहेत त्या एका फलकावर वाचायला मिळाल्या.

भालेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात

खादाडीसाठी इथे अनेक पर्याय होते.  पण खादाडी करण्यासाठी मी इथे आलेलो नव्हतो.

वरच्या केबल कार स्टेशन मधे काहीच गर्दी नव्हती.

केबल कार मधून दिसणारा डोंगर, गर्द झाडी, आणि दूरवर खाली काठमांडू परिसर
ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता कमी होती

आज ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता कमी होती.

खालचं केबल कार स्टेशन दिसायला लागलं
आता बघतो तर तिकीट काउंटर समोरची लाईन संपलेली होती.  अकराच्या सुमारास आल्या रस्त्याने परत निघालो.  टेकडीच्या पायथ्याला बस स्टॉप होता जिथून मी बस सोडून चालत आलो.  तिथे पोहोचल्यावर थोड्या वेळाने लोकल बस आली.  सकाळच्या अनुभवाने आता मला माहीत होते कुठे जायचेय ते.  आधी कलंकी आणि मग सोरखुट्टे.  कलंकीला उतरल्यावर पुढची बस घ्यायला बस स्टॉप शोधून तिथे थांबलो.  इथे प्रचंड गर्दी.  आलेल्या बस आणि मायक्रो एकतर तुडुंब भरून येत होत्या आणि ज्यांच्यात काही थोडीफार जागा शिल्लक होती ती इथली माणसं उड्या टाकून मिळवत होती.  एक रिकामी मायक्रो येत असताना मी आधीच हेरली आली त्यात जागा मिळवली.  सोरखुट्टे स्टॉपला उतरून हॉटेल तिबेट पीस इन् ला चालत गेलो.  आता तासभर आरामाची गरज होती.

काठमांडू दरबार स्क्वेअर हि जागा इथून जवळच आहे असं मला कळलं होतं.  हॉटेलच्या रिसेप्शनवरच्या मुलाबरोबर ह्याची खातरजमा करून तिथे जायला निघालो.  हॉटेल पासून सरळ रस्ता काठमांडू दरबार स्केअर पर्यंत होता.  वाटेत एका ठिकाणी जेवणाला थुक्पा खाल्ल्या.

थुक्पा, म्हणजे सूप आणि नूडल्स एकत्र
काठमांडू दरबार स्क्वेअर हि जुन्या काळची भलीमोठी जागा दिसत होती.  काठमांडू मधला एक ऐतिहासिक भाग. भारतीयांसाठी तिकीट होतं एकशे पन्नास नेपाळी रुपये.  नेपाळयांसाठी तिकीट नाही.  तिकिटाबरोबर एक छापील पत्रक मिळालं ज्याच्यात इथला नकाशा होता आणि सर्व ठिकाणांची थोडक्यात माहिती होती.  मी कुठल्या रस्त्यावरून आलो ते बघून ठेवले.  कारण इथे सर्व रस्ते एकसारखेच दिसत होते.  परत जाताना गडबड नको.

पर्यटकांप्रमाणेच भिकारी आणि रिकामटेकडेही अनेक दिसत होते.  काही ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांनी जागा काबीज करून दुकानं मांडलेली.

एका गाईडने माझ्यासमोर थोडी बडबड केली.  मी काही त्याला गाईड म्हणून घेतला नाही.

एका मंदिरासमोर दगडात कोरलेले भलेमोठे सिंहासारखे प्राणी

ह्या इमारती आणि देवळं बाराव्या ते अठराव्या शतकात बांधलेली आहेत.  २०१५ साली झालेल्या भूकंपात इथल्या सगळ्याचंच कमी अधिक प्रमाणात नुकसान झालं आहे.  जागोजागी लाकडी टेकू लावलेले आहेत.  जपानी मदतीतून काही इमारतींचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे.

जपान्यांना हे चांगलं जमतंय.  भारताला का जमू नये?
अहो आपल्याला आपलेच प्रश सोडवताना नाकीनऊ येतायत.  शेजारी देशाला कुठनं मदत करताय
छापील पत्रकात बघून सर्व वास्तू, देवळं ओळखणं अवघड होतं.  जमेल तेवढं समजून घेतलं.  वेळेचा तुटवडा नव्हताच.  एका जागी परत परत फिरल्यावर दरवेळी नवीन काहीतरी सापडतं.

द्वारपाल
इथल्या ऐतिहासिक इमारतींच्या बांधकामात लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.  सगळीकडे लाकडात आणि दगडात सुरेख कोरीवकाम केलेलं.  लाकडातलं कोरीवकाम बऱ्याच ठिकाणी झिजलंय.

गड किल्ल्यांच्या भिंतींवर, ऐतिहासिक स्थळांवर आपापली आणि आपल्या नसलेल्या मैत्रिणींची नावं अजरामर केलेली आपण भारतभर पहातो.  कोणी पाश्चिमात्य व्यक्तीने आपलं नाव ऐतिहासिक स्थळी अजरामर केलेलं पहिल्यांदाच पाहिलं
इथे फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.  गतकाळचे वैभव मोडीत निघालेले, आणि सध्या (काही कारणांमुळे) दुर्लक्षिलेला असा हा भाग.  युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट जरी असला तरी इथली आजची परिस्थिती खूपच वाईट दिसली.  काय करणं असतील ह्या अशा अवस्थेची ते मी शोधायचा प्रयत्न केला नाही.  आपण आपली ऐतिहासिक ठिकाणं, वास्तू सांभाळतो का?  शनिवार वाडा,  प्राचीन देवळं,  गड किल्ले हि काही प्रातिनिधिक उदाहरणं.  आपल्याला जे जमत नाही ते दुसऱ्याला शिकवायला जाऊ नये.

गतकाळचं वैभव  ...  आणि आजची अवस्था

काठमांडू मधल्या तीन दरबार स्क्वेअर जागांपैकी हि एक.  ऐतिहासिक काळापासून काठमांडू भागात रहाणाऱ्या नेवार लोकांनी ह्या परिसरांची निर्मिती केली.

एका वास्तूच्या चौथऱ्यावर दोन माणसं जुन्या नाण्यांच्या पसाऱ्यात बसली होती.  ह्यांच्याकडे ढिगाढिगानी ऐतिहासिक नाणी होती.  पण मी ह्या विषयात तज्ज्ञ नसल्याने त्यांच्याकडे गेलो नाही.
एका अजस्त्र लाकडी ओंडक्यावरची कलाकृती
 प्रचंड मोठे लांबलचक लाकडी ओंडके एक दोन ठिकाणी होते.

अप्रतिम कोरीवकाम
इथल्या काही वास्तू २०१५ साली झालेल्या भूकंपात पूर्णपणे उध्वस्त झाल्या.  नारायण मंदिराचा फक्त चौथरा उरलाय.  दहा फूट उंच भलामोठा चौकोनी चौथरा.  त्यावर तीन मजली मंदिर होतं.  आता फक्त फलक उरलाय.

भूकंपात जमीनदोस्त झालेलं नारायण मंदिर.  आता फक्त फलक उरलाय.
इथून हॉटेलकडे जायच्या रस्त्यावर काही अंतरापर्यंत आजुबाजुला जुन्या काळच्या इमारती, वास्तू, देवळं होती.

आज दिवसभर बरीच पायी भटकंती झाली होती.  आता संध्याकाळी आरामाची वेळ.  हॉटेलवर तासभर आराम.  नंतर निघालो थमेल काय आहे ते बघायला.  तासाभरात जमेल तेवढे रस्ते धुंडाळले.  नंतर योग्य ठिकाण बघून जेवण.

उद्या दुपारी काठमांडू ते भद्रपूर विमानाने आणि पुढे बॉर्डर जवळच्या काकरविटा पर्यंत जाऊन तिथे मुक्काम.  उद्या सकाळचा बेत काय करावा ते उद्याच बघू.

No comments:

Post a Comment