मंगळवार १७ एप्रिल २०१८
नेपाळ सफारीचा आजचा शेवटचा दिवस. काल रात्री डासांनी झोपेचा विचका केला. साडेसहाला उठलो. ह्या गावात बघण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे फ्लाईट दुपारी असलं तरी इथे वेळ न घालवता बॉर्डर ओलांडून बागडोगराला जायचे ठरवले.
हॉटेल विनायकचा मालक म्हणाला आज काकरविटाकडे जाणाऱ्या लोकल बस बंद दिसतायत, रिक्षाने जा. हॉटेलच्या जवळच बस स्टॉप होता. तिथे काही कॉलेजची मुलं मुली बसची वाट बघत थांबले होते. बस काही येईना. थोड्या वेळाने एक रिक्षा ठरवली बॉर्डर पर्यंत जाण्यासाठी. रिक्षावाला NC पाचशे वर अडलेला आणि मी NC तीनशे वर. शेवटी आमच्यात तह झाला कि जर अजून कोणी भाडं मिळालं तर माझ्याकडून पैसे कमी घ्यायचे. कोणीच भाडं मिळालं नाही तर NC पाचशे. इथे NC म्हणजे नेपाळी करन्सी आणि IC म्हणजे इंडियन करन्सी. हे विवेकने मला सांगितले होते. बॉर्डरवरच्या भागांमध्ये नेपाळी आणि इंडियन दोन्ही करन्सी चालते.
|
विर्तामोडहून काकरविटाकडे |
विर्तामोड सोडायच्या आतच रिक्षा भरली. नवरा बायको आणि दोन मुलं असं एक चौकोनी नेपाळी कुटुंब रिक्षात बसलं. तेही बॉर्डरकडे निघाले होते.
सकाळच्या वेळी रस्त्याला वर्दळ नाही. रिक्षा सुसाट निघाली. रिक्षात बसलेलं हे नेपाळी कुटुंब सिक्कीमला फिरायला चालले होते. मोठा मुलगा शांतपणे पुढे रिक्षावाल्या शेजारी बसला होता. माझ्या शेजारी त्याच्या पप्पांच्या बरोबर बसलेला छोटा मुलगा भलता उद्धट होता. मोठा समजूतदार आणि छोटा लाडावलेला उद्धट.
|
मोकळ्या रस्त्यावर रिक्षा सुसाट निघालेली |
अर्ध्या तासात रिक्षा बॉर्डरच्या पन्नास मीटर अलीकडे पोचलेली. माझ्या अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकर बॉर्डरवर पोहोचलो होतो. मी देत असलेली नोट बघून रिक्षावाला भलता उचकला. बघतो तर हि नेपाळी शंभर रुपयांची नोट होती. मला ती नेपाळी पाचशेची वाटली होती आणि मी खातरजमा न करताच त्याला देत होतो. मग त्याला नेपाळी पाचशेची नोट दिली. त्याने नेपाळी शंभर परत दिले. नेपाळी लोक हे असे सरळ साधे. फसवा फसवी करण्याचा, लुबाडण्याचा त्यांचा हेतू नाही. पण नेपाळ जवळच्या भारतीय राज्यांमधून ह्याच्या विरुद्ध प्रवृत्तीचे लोक आढळतात. दिल्ली, उत्तराखंड, युपी, बिहार, पश्चिम बंगाल इकडे सगळे ठग भेटतात.
|
रिक्षातून विर्तामोड ते काकरविटा |
पुढे जाण्याआधी रिक्षाचा फोटो घेतला. हि रिक्षा नवीन होती. त्यामुळे मोकळ्या रस्त्यांवर सुसाट पळाली. बॉर्डर वरच्या गावांमध्ये नवी वाहनं दिसत होती. काठमांडू मधल्या सारखी पंधरा वीस वर्ष जुनी नाही.
समोर बॉर्डरवरचं गेट दिसत होतं. चालत पलीकडे गेलो. कसली चौकशी नाही. बॅगांची तपासणी नाही. असं वाटत होतं, कोण आलं कोण गेलं बघायला इथे कोणी आहे कि नाही.
|
नेपाळमधून पाहिलेलं बॉर्डरवरचं गेट |
इथे मेची नदी हि नेपाळ आणि भारताची बॉर्डर आहे. नेपाळमधला भाग काकरविटा आणि भारतातला भाग पानीटंकी.
भूतान आणि नेपाळच्या बॉर्डर चालत ओलांडल्या. आता कधी जमलं तर तिबेटमधे जायचंय.
बॉर्डर गेट ओलांडताच टॅक्सीवाले, सायकलवाले, जीपवाले ह्यांची गिऱ्हाइक मिळवण्यासाठीची चढाओढ. आणि हे टुरिस्ट दिसल्यावर वाट्टेल त्या किमती सांगत होते. इथेच स्पष्ट कळत होते नेपाळमधे जगभरातून इतके पर्यटक का येतात आणि त्या तुलनेत भारतात कोणीच का येत नाही. पर्यटकांना लुबाडणे हा प्रकार नेपाळमधे नाही असं नाही. पण भारतातल्या बऱ्याच ठिकाणी हा प्रकार इतक्या प्रमाणावर होतो कि त्यामुळे पर्यटन राहिलं बाजूला ठग लोकांपासून दूर राहण्यातच सगळा वेळ जातो.
ह्या गोंधळातून मी एक सुमोवाला ठरवला बागडोगराला जाण्यासाठी. बघतो तर ह्याची सुमो सगळीकडे खचाखच भरलेली होती. फक्त ड्रायव्हरची सीट रिकामी होती. आता मी ह्यात कुठे बसणार असा मला प्रश्न पडला. ड्रायव्हर ने मला त्याच्या सीट वर बसायला सांगितले. बसल्यावर सरकायला सांगितले. मग माझ्या बाजूला तो बसला. माझा डावा पाय गियरच्या रॉडला लागूनच होता. पलीकडच्या सीटवर पण दोन माणसं बसली होती. मागे पण अशीच कोंबलेली असणार. असाही प्रवास करावा कधीतरी. नाहीतर 5 seater ऐसपैस निसान टेरानो मधून आम्ही तिघं जण फिरतो.
नदीवरच्या पुलावर रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे दोनपैकी एकच लेन वाहतुकीस चालू होती.
|
नदीपलीकडचं पाहिलं भारतीय चेकपोस्ट |
नदीवरचा पूल संपताच पहिलं भारतीय चेक पोस्ट होतं. कसलीही चेकिंग चौकशी वगैरे नाही. रस्ता अरुंद. जिकडे तिकडे छोट्या मोठ्या वाहनांची गर्दी. त्यामुळे वाहतुकीस एकच लेन मोकळी. त्यातून गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या.
दुसऱ्या चेकपोस्टलाही चेकिंग चौकशी वगैरे काही नाही.
|
दुसरं चेकपोस्ट |
बॉर्डर पासून कितीतरी दूरपर्यंत ट्रकांची लांबच लांब लाईन. दोन किलोमीटर लांब तरी असेल. मग रस्ता मोकळा होत गेला. एका रेल्वे क्रॉसिंगला थांबलो. एक ट्रेन गेली. इथून पुढे सपाट गुळगुळीत रस्ता होता.
|
पानीटंकीहून बागडोगरा कडे |
पावणेनऊला मी बागडोगराला उतरलो. सुमो पुढे कुठेतरी जाणार होती. सुमोवाल्याला नेपाळी शंभर रुपये दिले. त्याने आणखी मागितले. मग आपले शंभर रुपये दिले.
बागडोगरा गावात जिथे सुमोतून उतरलो तिथून विमानतळ थोड्या अंतरावर होता. चालत अर्ध्या तासावर आहे असं कळलं. माझ्याकडे सहा तास होते.
|
बागडोगरा गावचा फलक |
आता रस्त्याच्या उजव्या बाजूला एअर फोर्स स्टेशन वगैरे वगैरे आणि डाव्या बाजूला नजर जाईल तिथवर पसरलेले चहाचे मळे. भारताच्या ह्या भागापासून नेपाळ, भूतान, चीन, आणि बांगलादेश असे चार देश दोनेक तासांच्या अंतरावर आहेत. तसेच नॉर्थ ईस्ट इंडियाची सात राज्य ह्या
चिंचोळ्या पट्टीने मुख्य भारताला जोडलेली आहेत. त्यामुळे हा भाग भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. शालेय जीवनात भारताचा नकाशा पहाताना मला ह्या भागाचं मोठं आकर्षण. दोन वर्षापूर्वी अमित कुमार आणि मी भूतानला जाताना ह्या भागातून ट्रेनने गेलो. आता इथून रस्त्याने जाणंही झालं.
|
नजर जाईल तिथवर पसरलेले चहाचे मळे |
सव्वानऊच्या सुमारास एअरपोर्टपासून हाकेच्या अंतरावर पोहोचलो होतो. माझं फ्लाईट साडेचारचं होतं. इथे एक छोटंसं पण बरं हॉटेल दिसलं. तिथे गेलो. इडली डोसा पुरी भाजी वगैरे नाश्त्याचे पदार्थ नव्हते ह्यांच्याकडे. नाश्त्याला चपाती सब्जी खाल्ली. कांदे आणि टोमॅटोची रसदार भाजी. ज्यांचं फ्लाईट दुपारी होतं असे आणखी काही जण इथे आले. मी फोन मधून Ncellचं सिमकार्ड काढून वोडाफोनचं सिमकार्ड टाकलं. दहाच्या सुमारास एअरपोर्टकडे जायला निघालो. आता उरलेला वेळ एअरपोर्टमधे टाइम पास.
|
गुगल मॅप मधून बघितलेली आज सकाळची भ्रमंती
केवळ अंतरं दाखवून काय होतंय. इथल्या भ्रमंतीची खासियत गुगल मॅपला कसली कळतेय. त्यासाठी स्वतःच गेलं पाहिजे इथून |
एअरपोर्ट मधे शिरायच्या आधी जमेल तेवढा टाइम पास केला. आत गेल्यावर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं दोन वाजता बॅगा स्कॅन करायला या. तोपर्यंत वरच्या मजल्यावरच्या वेटिंग रूम मधे थांबा.
|
बागडोगरा विमानतळ |
सकाळी एअरपोर्ट रिकामं होतं. नंतर गर्दी वाढत गेली. बाराच्या नंतर लांबच लांब रांगा लागल्या. वरच्या मजल्यावरच्या वेटिंग हॉल मधे टाइम पास करून करून कंटाळा आला.
|
बागडोगरा एअरपोर्ट मधली दुपारची गर्दी |
कलकत्त्याला जाणाऱ्या आमच्या फ्लाईटमधे सिक्कीम टूर करून आलेले काहीजण दिसत होते. इंडिगो एअरलाईन्स फ्लाईट 6E 534 वेळेत निघालं आणि वेळेत पोहोचलं.
कोलकता विमानतळावर गर्दी नव्हती. किंवा बागडोगरा विमानतळाच्या तुलनेत हे विमानतळ खूपच मोठं असल्याने माणसं तेवढीच असली तरी गर्दी होत नव्हती.
|
कोलकता विमानतळावर ...
पुण्याला जाणारं आमचं फ्लाईट तयार होतंय |
कलकत्त्याहून उड्डाण करण्यापूर्वीच विमानाच्या कॅप्टनने माहिती दिली कि ह्या दिवसात इकडे आकाशात विजा चमकून पाऊस पडतो. हवामान वादळी असतं. उड्डाणानंतर थोड्याच वेळात विमान धडधडायला लागलं. मधेच काही वेळा गपकी खाऊन खाली गेलं. हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. हि दहा पंधरा मिनिटं नेहमीपेक्षा वेगळी होती.
पुण्यात पोहोचल्यावर ओला कॅब केली. मराठी ड्रायव्हर अवली व्यक्तिमत्वाचा होता. घरी पोहोचायला अकरा वाजून गेले होते. खुशी आणि दीप्ती वाट पाहतच होत्या. खुशी दाराच्या बाहेरच मला जी बिलगली ते किती वेळ सोडेनाच. पप्पा नऊ दिवसांनी भेटला, पण आनंद झालेला जणू काही नऊ वर्षांनी भेटलाय.
No comments:
Post a Comment