Wednesday, May 9, 2018

नेपाळ सफर - दिवस आठवा - काठमांडू ते विर्तामोड

सोमवार १६ एप्रिल २०१८

आज दुपारी काठमांडू सोडून येति एअरलाईन्स फ्लाईट ९२५ ने भद्रपूरला जायचे.  दुपारी दीडपर्यंत काठमांडू एअरपोर्टला पोहोचायचे होते.  तोपर्यंत काठमांडू मधे भ्रमंती करायला वेळ होता.  परवा पोखराहून काठमांडूला येताना आणि काल हॉटेलवरून चंद्रगिरी हिलला जाताना रस्त्याच्या बाजूला तीन मोठ्या मुर्त्या दिसल्या होत्या.  त्या ठिकाणी जायचे ठरवले.  तिथे लोकल बसने कसे जायचे ते हॉटेलच्या रिसेप्शनवरच्या मुलाला विचारले.  तिथे जायला मायक्रो मिळेल असं त्याने सांगितलं.  मायक्रो म्हणजे आपल्या मारुती ओम्नी सारखी पण ओम्नी पेक्षा मोठी गाडी.  स्वयंभू ह्या ठिकाणी मला जायचं होतं.

स्वयंभू इथल्या बस स्टॉपचं नाव आहे.  मला आधी वाटलं होतं मी जातोय त्या तीन मोठ्या मुर्त्यांच्या जागेलाच स्वयंभू म्हणतात.  तिथे गेल्यावर तिथला फलक बघून कळलं, हे होतं साक्या महाकाला मंदिर.  इंग्रजी स्पेलिंग नुसार साक्या महाकाला, आणि योग्य शब्दात शाक्य महाकाल.  मागच्या बाजूच्या एका गल्लीत मायक्रो चा स्टॉप होता.  मायक्रो मधून उतरल्यावर कळतच होतं आपण एखाद्या मंदिराच्या जवळपास आहे.  माणसांची वर्दळ.  रस्त्याच्या कडेला छोटे मोठे विक्रेते.

सूर्योदय
सूर्योदयाआधीचा एक तास म्हणजे golden hour.  कुठेही गेलो तरी दिवसातली हि वेळ सर्वोत्तम असते.  इथल्या प्रसन्न वातावरणात हि वेळ कधी संपूच नये असं वाटत होतं.  बरं झालं इथे दुपारी किंवा संध्याकाळी नाही आलो.

धूप जाळण्याचं ठिकाण इथेही होतं.  भूतान मधल्या मोनॅस्टरिंच्या परिसरात असं धूप जाळण्याचं ठिकाण मी पाहिलं होतं.

धूप जाळण्याचं ठिकाण
एका बाजूला "लॅम्प ऑफरिंग रूम" म्हणजे "बत्ती बालने घर" होतं.  आलेले भाविक तिथे दिवे लावत होते.

दिवे लावण्यासाठी जागा

एका खोलीत मोठं प्रेयर व्हील होतं.  एका लांबलचक भिंतीवर बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरलेले होते.

भिंतीवर कोरलेले बुद्धाच्या जीवनातील प्रसंग
कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळी गेल्यावर "देव देवळात नाही" अशा अवस्थेत बाहेरच थांबणारा मी.  फारतर आतमध्ये डोकावून येणारा.  पण इथल्या भारलेल्या वातावरणातून लगेच निघून जाणं अशक्य होतं.

ह्या तीन मोठ्या मुर्त्यांनी परिसर भारून टाकलेला

परत जायचा बस स्टॉप मी येताना उतरलो तो नसणार हे लक्षात आले.  कारण त्या छोट्याशा गल्लीत one way होता.  मंदिराच्या पुढच्या बाजूने बाहेर पडून सोरखुट्टेला जाणारी मायक्रो कुठे मिळेल ते शोधून काढले.  इतक्या सकाळी अजून गर्दी नव्हती.  त्यामुळे मायक्रोमधे कोंबून कोंबून भरायला माणसं नव्हती.  दुपारी गर्दी झाली कि मायक्रो मधे अशक्य प्रकारे माणसं कोंबली जातात.  सोरखुट्टे हा माझा स्टॉप आल्यावर मायक्रो मधून उतरलो.  कालच्या लोकल बस आणि मायक्रो मधून गर्दीच्या वेळी फिरण्याच्या अनुभवामुळे मी आता तरबेज झालो होतो.  मायक्रो मधून उतरल्यावर मी फोटो काढला.

मायक्रो
स्टॉप पासून तिबेट पीस इन् जवळच होते.  भरपेट ब्रेकफास्ट करून घेतला.  हॉटेलच्या रिसेप्शन वरच्या मुलाबरोबर आणि हॉटेलच्या मालकाबरोबर भरपूर गप्पा मारल्या.  मला एक वाजता एअरपोर्टला पोहोचायचं होतं.  मधल्या वेळात एक ठिकाण बघण्याचा वेळ होता.  कोपान मोनॅस्टरी बद्दल विचारलं तर हे ठिकाण एअरपोर्ट पासून फार लांब नाही असं कळलं. आधी कोपान मोनॅस्टरी बघून मग एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी ठरवली.  अठराशे नेपाळी रुपये.  म्हणजे आपले अकराशे.

एक चाबरा राजस्थानी माणूस त्याच्या रूममधून इथे आला.  आमच्या गप्पात सहभागी झाल्यावर त्याने भारतीय अर्थव्यवस्था, मोदी, रामदेव बाबा, हिंदु धर्म सगळ्याला हाडतुड करत शिव्या शाप द्यायला सुरुवात केली.  घराबाहेर पडल्यावर अशी ना ना तऱ्हेची माणसं भेटतात.  फक्त स्वतःच्या बिझनेस पुरता विचार करणारा ह्या हॉटेलचा मालक, तोंड उघडलं कि गटार वाहणारा हा राजस्थानी, मागच्या दोन वर्षातले स्वतःमधले बदल मोकळेपणाने बोलून दाखवणारा साध्या सरळ स्वभावाचा विवेक, भूतानच्या ट्रिपमधलं खत्रूड भांडकुदळ कुटुंब, ट्रेकला येताना सर्वांसाठी अप्रतिम चवीच्या भाकऱ्या आणि ठेचा गाठोड्यात बांधून आणणारे सुरेश भाग्यवंत,  गावाकडच्या छोट्या रस्त्यावर कसलाही विचार न करता सहाव्या गियरमधे गाडी चालवणारा ऑफिसमधला सहकारी, निगर्वी निर्भीड सह्यमित्र स्वप्नील खोत.  जितकी भ्रमंती करावी तितके नानाविध रंग दिसतात.  नाहीतर घरबशांसाठी टीव्ही आहेच.  कुठेच जायची गरज नाही.  टीव्हीतच सगळं पाहून घ्यायचं.  असो.  टॅक्सी आली आणि सगळ्यांना नमस्ते करून मी निघालो.

आता सगळे रस्ते ट्रॅफिकने भरलेले.  सगळीकडे नियमांची ऐशी तैशी.  मिळेल तिथून मिळेल तशी वाट काढत आपली गाडी पुढे हाकायची.

काठमांडू मधल्या अरुंद रस्त्यांवरचं सकाळचं ट्रॅफिक

हि जुनी मारुती 800 कुठच्या काळची होती कोण जाणे.  ड्रायव्हरशी बोलल्यावर इथल्या गाड्यांबद्दल चार गोष्टी समजल्या.  नेपाळमधे गाड्या बनत नाहीत.  इथे बऱ्याचशा गाड्या भारतातून येतात.  गाडी खरेदी करताना नेपाळ सरकार दोनशे टक्के टॅक्स लावते.  त्यामुळे गाड्यांच्या किमती आकाशाला भिडलेल्या.  हि गाडी अठरा वर्ष जुनी होती.  नेपाळमधे गाड्या वीस वर्षापर्यंत वापरता येतात.  अजून दोन वर्ष हा ड्रायव्हर हि गाडी चालवणार.  आपल्याकडे पाच वर्ष झाली कि लोकं गाडी विकायला काढतात.

कोपान मोनॅस्टरी काठमांडूच्या बाजूच्या एका टेकडीवर आहे.  इथे जाणारा रस्ता रस्ता म्हणजे एक दिव्यच होतं.

कोपान मोनॅस्टरीकडे जाणारा रस्ता

पावणेअकराला कोपान मोनॅस्टरीच्या गेट समोर पोहोचलो.  गेट बंद होतं.  ड्रायव्हरने मला गेटबाहेरच सोडलं आणि आत जायला सांगितलं.  मी गेटजवळ जाऊन रखवालदारांना "नमस्ते" आवाज दिला.  एक रखवालदार माझ्याशी बोलायला आला.  माझ्याशी बोलून झाल्यावर तो ड्रायव्हरशी नेपाळीत काहीतरी बोलला.  नंतर विमानतळाकडे जाताना ड्रायव्हरने मला सांगितलं कि इथे नेपाळयांना प्रवेश देत नाहीत.

गेटमधून आत जाताच रखवालदाराने काही सूचना दिल्या.  इथे कोर्स चालू असल्याने मोनॅस्टरीमधे जाता येणार नाही.  फक्त आजूबाजूचा परिसर बघता येईल.  आणि लायब्ररी मधे जाता येईल.  भूतान दौऱ्यातला फुनशिलींग जवळच्या मोनॅस्टरीच्या गेटवरचा अनुभव मला लक्षात होता.

आत्तापर्यंत पाहिलेल्या काठमांडू शहरापेक्षा हि जागा फारच वेगळी होती.  संपूर्ण परिसरात कुठेही कचऱ्याचा लवलेशही नव्हता.  काठमांडू म्हणजे गडबड गोंधळ ओंगळपणा.

कोपान मोनॅस्टरीच्या गेटजवळचा फलक
इंग्रजी वाल्यांना इतक्या सूचना आणि स्थानिकांना एकच

नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले काठमांडू शहर इथून दिसत होते.

कोपान मोनॅस्टरीच्या परिसरातून पाहिलेले काठमांडू शहर

एका भिंतीवर दलाई लामांनी सांगितलेले आजच्या काळातही समर्पक असलेले विचार लिहून ठेवलेले.

इथे धर्म हि संकल्पना म्हणजे बौद्ध धर्मातली बुद्धांनी दिलेली शिकवण आणि ती रोजच्या जीवनात आचरणात आणणे.  प्रथा परंपरा रूढी म्हणजे धर्म नव्हे.
कोपान मोनॅस्टरीच्या परिसरात अनेक छोटे मोठे स्तूप आहेत.

कोपान मोनॅस्टरीच्या परिसरातील स्तूप
मी मेडिटेशन हॉल समोर गेलो तेव्हा कोर्स मधली माणसं बाहेर पडली.  कोर्स चालू असल्याने मेडिटेशन हॉल मधे इतरांना प्रवेश नव्हता.

मेडिटेशन हॉल चे दार
मेडिटेशन हॉल समोरचे द्वारपाल खरंतर एखाद्या कार्टून कॅरॅक्टर सारखे वाटले.  काल काठमांडू दरबार स्केअर मधल्या इमारतींच्या दरवाजांसमोर पण साधारण अशाच प्रकारचे द्वारपाल होते.

मेडिटेशन हॉल समोरचा द्वारपाल
इथला सर्व वास्तू व्यवस्थित पाहायच्या आणि समजून घ्यायच्या असतील तर दोन तास तरी वेळ पाहिजे.  हे पर्यटन स्थळ नाही.  त्यामुळे इथे गाईड कोणीच नाही.  ह्या वास्तू समजून घ्यायच्या असतील तर कोपान मोनॅस्टरी बद्दल माहिती इथे जाण्याआधीच वाचून ठेवा.  प्रिंट बरोबर घेतल्यात तर उत्तमच.

इथल्या मुख्य स्तूपाच्या भोवती असलेल्या मूर्तींपैकी एक

कोपान मोनॅस्टरी बघून भूतान मधल्या मोनॅस्टरी आठवल्या.  कधी जमलं तर मला यायचंय इथे एखाद्या कोर्सला.  म्हणजे माझ्या बकेट लिस्ट मधून काही गोष्टी जातायत तर काही नवीन जमा होतायत.  भ्रमंतीचा छंद हा कधी न संपणारा असा आहे तर.  स्पिरिट रिआल्म मधे पोहोचल्यावरच बहुदा शांतता मिळेल.

घरी आल्यानंतर कोपान मोनॅस्टरीचा इतिहास वाचल्यानंतर समजलं - हि जगातली भारी जागा आहे.  इथे परत यावंच लागतंय.  ऑप्शन नाही.

गेशे लामा कोनचोक ह्यांचा स्मृतीप्रित्यर्थ असलेला इथला मुख्य स्तूप

इथल्या मुख्य स्तूपाच्या समोर एका कारंजात चेनरेझिग नावाची सुंदर मूर्ती आहे.  चेनरेझिग बद्दल माहिती इथे वाचा.

विविध प्रकारची छोटी मोठी झाडं कोपान मोनॅस्टरीच्या परिसरात लावलेली आहेत.  त्यातली काही तर मी बहुदा पहिल्यांदाच पहात असेन.  धर्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणाऱ्यांनी इथे येऊन त्यांचा अमूल्य वेळ वाया घालवू नये.  विविध प्रकारची झाडंच बघायची असतील तर एखाद्या बोटॅनिकल गार्डन मधे जावं.

कोपान मोनॅस्टरीच्या परिसरातली फुलं

नेपाळयांना इथे फक्त शनिवारीच प्रवेश दिला जातो.  दर शनिवारी इथल्या शांत सुंदर वातावरणाचा काय विचका होत असेल कल्पना करवत नाही.  इथे तुम्हाला भेट द्यायची असेल तर शनिवार नक्की टाळा.

ओम मणी पद्मे हम हा मंत्र असलेलं मोठं प्रेयर व्हील


लायब्ररीच्या बिल्डिंगमधे वरच्या मजल्यावर गेलो.  तिथे शॉप होते.  अनेक विविध वस्तु, पुस्तकं.  मी काही गोळा करतोय तोच भिख्खू म्हणाला जेवणाची वेळ होतेय, आता आवरा.  गोळा केल्या होत्या तेवढ्या वस्तूंचं बिल केलं.  पोखरातल्या लेक साईड रोडवर किंवा काठमांडूतल्या थमेल मधे खरेदी करण्यापेक्षा इथे करावी.

इथे आल्यापासून सव्वा तास कसा गेला समजलंही नाही.  आता आमची गाडी निघाली काठमांडू डोमेस्टिक एअरपोर्ट कडे.

एअरपोर्ट कडे जाताना रस्त्यात पशुपतीनाथ मंदिराचा परिसर दिसत होता.  आता तिथे जायला वेळ नव्हता.  आणि हे ठिकाण माझ्या लिस्ट मधे पण नव्हते.  पृथ्वीवरचा स्वर्गाचा अवतार, कोपान मोनॅस्टरी पाहिल्यानंतर आता इतर सर्व जागा साधारण वाटत होत्या.

साडेबाराला मी विमानतळात होतो.  वेळेच्या आधी.  माझ्या फ्लाईट चे बोर्डिंग पास द्यायला अजून वेळ होता.  इथल्या दुकानात कॉफी मिळत होती.  इतकी भिक्कार कॉफी कशाला घेतली असे झाले.

येति एरलाईन्स चा काउंटर

बोर्डिंग पास घेऊन आत गेलो आणि बघतो तर काय - इथे तुफान गर्दी.  कुठलंच फ्लाईट वेळेवर नव्हतं.  समोर दिसणाऱ्या रन वे वरून एकापाठोपाठ एक विमानं उडत होती.

काठमांडू मधून कुठलंच फ्लाईट वेळेवर सुटत नाही

सार्वजनिक ठिकाणी भारतीय जसा गर्दी गोंगाट कचरा करतात तसाच नेपाळीही करतात.

येति एरलाईन्स फ्लाईट 925

ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर उशिराने आमचं विमान निघालं.  प्रत्येक रांगेत डावीकडे एक सीट आणि उजवीकडे दोन सीटा.  मधे चालायला जागा.  अशा पंधरा रांगा असतील.  इतक्या छोट्या विमानातून हा माझा पहिलाच विमान प्रवास होता.

मुख्य धावपट्टीवर पोहोचताना

आमचं विमान ढगांच्या थोडं वरून उडत होतं.  पण असं वाटत होतं कि इतर मोठी विमानं ज्या उंचीवरून उडतात त्यांच्या तुलनेत खालून उडत होतं.

भद्रपूर विमानतळ
भद्रपूर विमानतळ म्हणजे एकच छोटीशी इमारत होती.  मी पाहिलेलं हे सगळ्यात छोटं विमानतळ.  गर्दी नाही, कसली गडबड नाही, विमानंही नाहीत.  विमानातून उतरल्यावर चालत जाऊन थांबलो बॅगा मिळणार होत्या तिथे.  "तुमच्या बॅगा अमुक अमुक बेल्ट वर येतील" असली घोषणा विमानात झालीच नव्हती.  थोड्या वेळाने बॅगा आणून तिथे ठेवल्या गेल्या.  सगळ्यांनी आपापली बॅग ओळखून घ्यायची.  पहिल्या बॅच मधे माझी बॅग नव्हती.  माझी बॅग दुसऱ्या बॅच मधे आली.  बॅग घेऊन चालत बाहेर निघालो.  एखाद्या छोट्याश्या गावच्या रिकाम्या रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडण्याचा भास होत होता.

बाहेर पडताना एका माणसाला विचारले विर्तामोडला कसं जायचं.  तो म्हणाला हे रिक्षावाले खूप पैसे घेतात, त्यापेक्षा जवळच्या चंद्रगढी पर्यंत चालत जा आणि तिथून लोकल बसने जा विर्तामोडला.  बाहेर पडल्यावर सरळ रस्त्याने चालत जाऊन पंधरा मिनिटात चंद्रगढीला पोहोचलो.

भद्रपूर विमानतळापासून जवळच्या चंद्रगढी बस स्टॉपला चालत जाताना

दोन मिनिटात एक रिकामी बस येऊन थांबली.  बाहेरून आलेला पर्यटक हे बघून मला बसमधे ड्रायवरच्या सीटच्या मागच्या बाकड्यावर जागा दिली गेली.  माझ्या बॅग ड्रायवरच्या सीटच्या बाजूच्या जागेत ठेवल्या.  बसमधे मी सोडून इतर सर्व स्थानिक ग्रामीण प्रवासी होते.  काही आदिवासी मुली तर त्यांच्या पारंपरिक वेशात होत्या.  मला बसमधली सर्वात भारी जागा दिलेली होती.  इथे गर्दी, ढकलाढकली नव्हती.  आणि इथून ड्रायवर आणि त्याच्या समोरच्या काचेमधून समोरचं दृश्य व्यवस्थित दिसत होतं.

चंद्रगढी ते विर्तामोड  ...  लोकल बस मधून

उंचीप्रमाणे नेपाळ चे तीन भाग होतात.  हिमाल, पहाड, आणि तराई.  आता मी पहाड भागातून तराई प्रदेशात पोहोचलो होतो.  तराई म्हणजे सपाट प्रदेश.  पहाड भागातला थंडावा इथे नव्हता.

विर्तामोड हा बसचा शेवटचा स्टॉप होता.  पाचच्या सुमारास बस मधून उतरलो.

चंद्रगढी ते विर्तामोड

दिवसभराची भ्रमंती झाल्यावर आता हॉटेल शोधायचा कंटाळा आला.  पाठीवरचं ओझं कधी एकदा उतरवतोय असं झालेलं.  तरी थोडंफार फिरलो.  बऱ्यापैकी हॉटेल काही मिळेना.  हॉटेल विनायक मधे रूम घेतली.  दिवसाही डास फिरत होते.  थोडा आराम करून बाहेर पडलो आजूबाजूचा फेरफटका मारायला.  बघण्यासारखं ठिकाण इथे काही नव्हतंच.

हॉटेल विनायक
जेवणासाठी थकाली किचन मधे शिरलो.  नेपाळी पारंपरिक जेवण मागवलं, ज्याला हॉटेल मधल्या मेनू कार्ड मधे खाना सेट असं म्हणतात.  ह्यात चपाती नसते.  फक्त भात असतो.  भात आणि डाळ अनलिमिटेड.  ब्रेकफास्ट, लंच, डीनर ह्या इंग्रजी शब्दांना नेपाळी भाषेत प्रतिशब्द नाहीत.  नेपाळी भाषेत दोनच शब्द आहेत, खाना आणि खाजा.  म्हणजे meals आणि snacks.  मुस्टॅन्ग जिल्ह्यातून इतर ठिकाणी पसरलेले झालेले थकाली लोक हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे करतात.

नेपाळी पारंपरिक जेवण - दाल, भात, तरकारी.  हॉटेल मधल्या मेनू कार्ड मधे खाना सेट असं म्हणतात
सर्वच पदार्थ चवदार होते.  जेवण हे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर जिवंत राहण्याची ऊर्जा मिळवण्यासाठी करतात, असं माझं मत आहे.  तसेच, फक्त आमच्या घरचं तेवढंच किंवा अमुक एका व्यक्तीने बनवलेलं तेच चांगलं आणि बाकी सगळं वाईट, असले खुळचट विचार माझ्या डोक्यात नाहीत.  पण हे जेवण खरंच रुचकर होतं.  माझ्या नेहमीच्या स्टाईल ने जेवलो.  ताटातले सर्व पदार्थ संपवून ताट रिकामं.  नेपाळच्या बॉर्डर जवळच्या गावांमधून राहण्याची व्यवस्था भिक्कार असली तरी जेवण उत्कृष्ट मिळालं.

आपलं जेवण हे असं
आठ वाजता जेऊन बाहेर पडत होतो.  उद्या सकाळपासून दिवसभराची भ्रमंती कि रात्री पुण्याला घरी परत.

हॉटेलवर डासांनी चाऊन चाऊन वैताग दिला.  हॉटेलवाल्याने ठेवलेल्या दोन मळकट जुन्या रजया भलत्या जाड होत्या.  ह्या गर्मीत इतकी जाड रजई अंगावर घेण्याचा प्रश्नच नव्हता.  टॉवेल पायांवर टाकून पाय झाकले कि डास हात आणि चेहऱ्याचा समाचार घेत होते.  टॉवेल हात आणि चेहऱ्यावर घेतला कि पाय हे डासांचं खाद्य.  डास मारून मारून वैतागलो.  झोप काही मिळेना.  शेवटी दोन वाजता उपाय सुचला.  पायात सॉक्स घातले.  टॉवेल हात आणि चेहेऱ्यावर घेतला.  असं अख्ख अंग झाकून घेतलं.  मग वाटलं, मला हे आधी का सुचलं नाही.  वाईट वेळ आली कि डोकं चालत नाही ते असं.

No comments:

Post a Comment