Sunday, May 26, 2019

बौद्धनाथ


नेपाळला भेट देणाऱ्यांसाठी काठमांडू हे एक कोडं आहे.  बऱ्याच जणांना ह्याची जाणीव नसते.  त्यामुळे काठमांडू म्हणजे बकालपणा, फालतूपणा अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.  हे कोडं सोडवायचं असेल तर वेळ द्यावा लागतो.  जाण्याआधी योग्य तयारी करून जावं लागतं.  तिथे पोहोचल्या नंतर दिसेल ते बघून लगेच मत न बनवता संयम ठेवावा लागतो.  असं प्रयत्न करून हे कोडं सोडवता येतं.  माझ्या पहिल्या नेपाळ सफरीत मलाही हे कोडं सोडवता आलं नव्हतं.  ह्यावेळी मला काठमांडू चांगल्या प्रकारे समजलं, बघता आलं.

ह्यावेळी आम्ही काठमांडूला पोहोचल्यावर संध्याकाळी बौद्धनाथ ह्या ठिकाणी गेलो.  तिथे जायच्या आधी दुसऱ्या दिवशीच्या पोखरा जाण्याची तिकिटं काढली होती.  त्यामुळे मनामध्ये कुठलाही साशंक भाव न ठेवता तिथे आम्ही तीन तास होतो.  आमच्या बाहेरून तीन फेऱ्या आणि आतून एक फेरी झाली.  तिथेच जेऊन मग हॉटेल वर परतलो.

बौद्धनाथ
बौद्धनाथ हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज आहे.  एक भलामोठा गोलाकार बौद्ध स्तूप.  ह्याचे आधीचे नाव होते खास्ती चैत्य.  नेपाळी भाषेत खास म्हणजे दव आणि ती म्हणजे थेंब.  हा स्तूप बनवला जात होता त्या वेळी दुष्काळ पडला होता.  पाण्याचे दुर्भिक्ष होते.  स्तूपाच्या बांधकामासाठी दव बिंदू गोळा करून लोकांनी पाणी मिळवले.  त्यामुळे ह्या जागेचे नाव होते खास्ती चैत्य.  नेपाळच्या हिंदू राजाने ह्या जागेला बौद्धनाथ हे नाव ठेवले.

अनेक शतकांपासून हि जागा तिबेटी बौद्ध तसेच स्थानिक नेपाळी जनतेचे तीर्थक्षेत्र आहे.  तिबेट आणि नेपाळ मधल्या जुन्या काळच्या व्यापार मार्गावरच्या ह्या जागी प्रवासी आणि व्यापारी थांबत असत.

बौद्धनाथ
पाचव्या शतकात बांधला गेलेला हा बौद्ध स्तूप चौदाव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी तोडला होता.  सध्याचा स्तूप हा त्यानंतर परत बांधलेला आहे.  पाचव्या शतकात हा स्तूप बांधला त्याबद्दलची नेपाळी गोष्ट वेगळी आहे आणि तिबेटियन गोष्ट वेगळी.  मतभेद हे असणारच.  पण इतिहास बघता हिंदू आणि बौद्ध कधीही एकमेकांचे वैरी नव्हते.  एकाच लेणी समूहात हिंदू, बौद्ध, आणि जैन ह्या तीनही धर्मांची लेणी आहेत भारतातल्या काही ठिकाणी.  इथेही बौद्धनाथ हा जरी बौद्ध स्तूप असला तरी कितीतरी हिंदू मुर्त्या आहेत इथे.  हिंदू आणि बौद्ध धर्मांचं सुरेख मिश्रण म्हणजे नेपाळ.

सरस्वती

 २०१५ मधे झालेल्या भूकंपात ह्या जागेचे बरेच नुकसान झाले होते.  त्यानंतर इथला काही भाग नव्याने बांधण्यात आला.


एका छोट्याची निरागसता

काठमांडूला कधी गेलात तर बौद्धनाथ ह्या ठिकाणी संध्याकाळी तीन तास वेळ काढून जा.  इथे जेवण्यासाठी अनेक जागा आहेत.  जेऊन हॉटेल वर परत जा.  दुपारच्या अर्ध्या तासात धावती भेट दिली तर बौद्धनाथ कसा समजेल.  आणि हो, जरी आपण इथे एक पर्यटन स्थळ बघायला म्हणून गेलो असलो तरी हे एक धार्मिक स्थळ आहे.  इथे अर्ध्या चड्डीवर जाऊ नये.  प्रत्येक ठिकाणी चप्पल बूट घालून आत शिरू नये.  मुर्त्या, शिलालेख, घंट्या वगैरे तुटलेल्या जीर्ण अवस्थेत असतील तरी त्यांचा आदर ठेवावा.  त्यांच्यावर बसून फोटो काढू नयेत.  जरी तुम्ही आधुनिक झाल्याने तुमचा धर्म भ्रष्ट झाला असला तरी इतर सगळ्यांचा झालेला नाही.  स्तूपाभोवती फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने (clockwise) चालावे.  आम्ही म्हणजे कोण, असे उगाच उलट्या दिशेने चालू नये.  Remember at all times that while you are seeing the world, the world will see you.  हे विसरू नये.  तसेही उद्धट आणि बेदरकार म्हणून भारतीय पर्यटक जगभर प्रसिद्ध आहेतच.