मंगळवार १० एप्रिल २०१८
काल संध्याकाळी साडेसातला दिल्लीला चालू झालेला बस प्रवास उत्तराखंड मधल्या
बनबसा ह्या गावात थांबला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. सहा वाजता गेट उघडल्यावर आम्ही बॉर्डर ओलांडून नेपाळ मध्ये प्रवेश करणार होतो. तोपर्यंत इथेच वेळ घालवायचा होता. इथे रस्त्याच्या कडेला काही प्रवासी-धाबे दिसत होते. त्यातल्या कुठल्या धाब्यावर थांबायचं हे आमचा म्होरक्या चंद्राने ठरवले. एका बाजूला बॅगा ठेऊन आम्ही तिथल्या बाकड्यांवर स्थानापन्न झालो.
बाहेर गेल्यावर मी चहाचा चाहता अजिबात नसल्यामुळे मी चहा घेतला नाही. इतरांनी घेतला. मला फक्त माझ्या बायकोने बनवलेलाच चहा आवडतो. त्यामुळे मी चहा फक्त स्वतःच्या घरीच पितो.
|
बनबासा गावातला ढाबा आणि दुकान |
इथल्या दुकानात चंद्राने गृहपयोगी वस्तू बऱ्याच खरेदी केल्या. विवेकने सांगितले कि त्याचे गाव पहाडी भागात आहे जिथे अशा वस्तू मिळणे अवघड आहे. त्यामुळे तो घरी जाताना जमेल तेवढी खरेदी करत होता.
|
धाब्याच्या शेफ ने पेटवलेली भट्टी |
धाब्याच्या शेफ ने भट्टी पेटवल्यावर उब घेता आली. थंडी अशी नव्हतीच. फक्त गारवा होता. बहुदा आम्ही उन्हाने भाजून निघणाऱ्या दक्खनच्या पठारावरून आल्यामुळे आम्हाला थोडं गार वाटत असावं. आम्ही अजूनही सपाट प्रदेशातच होतो. हिमालयीन भागात पोहोचायला मला अजून दोन दिवस होते. विवेक आणि हेमंतचं गावही सपाट प्रदेशातच आहे असं विवेकने सांगितलं होतं.
आमचा म्होरक्या चंद्राने एक स्कॉर्पिओ गाडी ठरवली बॉर्डर पलीकडच्या बस स्टॉप पर्यंत जाण्यासाठी. त्याचे म्हणणे बॉर्डरच्या अलीकडे पर्यंत गाडीने जाऊन बॉर्डर जर चालत ओलांडली तर गेटवरचे इंडियन पोलीस त्रास देतात. काल दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकात शिरताना आम्ही तो अनुभव घेतला होताच.
बॉर्डर जवळ आली तसं रस्त्याला ट्रॅफिक लागलं. ट्रक बस वगैरे मोठ्या
गाड्या नाहीतच. कार, जीप, दुचाकी, सायकलस्वार असलेच सगळे. टुरिस्ट कोणीच
नव्हते. मला वाटत होतं मी एकटाच असावा ह्या बॉर्डर वरून नेपाळ सफारीला
निघालेला. पण एक GJ नंबरची टुरिस्ट बस दिसली. गुजरात्यांनी बसच इकडे
आणलेली होती. आता हे स्वतःच्या बस मधून नेपाळ फिरणार.
बॉर्डर जवळच्या मोकळ्या जागेत कितीतरी नेपाळी रात्रभर राहिलेले. सकाळी गेट उघडल्यावर पलीकडे जाणार असावेत.
|
बॉर्डर ओलांडल्यावर मागे वळून पाहताना |
शारदा नदी हि इथली भारत आणि नेपाळ ची बॉर्डर आहे. नदीवरच्या छोट्या पुलावरून आमची गाडी पलीकडे. थोडीशी जुजबी तपासणी. स्वतःच्या देशाची बॉर्डर अशी चालत आणि गाडीतून ओलांडणे एक वेगळा अनुभव आहे.
|
नेपाळ प्रवेशादरम्यान मागे वळून पाहताना |
बॉर्डर पलीकडच्या नेपाळ मधल्या भागाचं नाव आहे गड्डा चौकी. इथे एका नेपाळी चेकपोस्ट वर आमचा ड्राइवर एन्ट्री करून आला. भारतीय गाडी नेपाळ मध्ये जाण्यासाठीचा सोपस्कर.
|
स्कॉर्पिओ गाडी ज्यातून आम्ही बॉर्डर ओलांडली |
सातच्या सुमारास आम्ही एका बस स्टॉप ला पोहोचलो. इथून पुढे चंद्रा वेगळ्या बसने जाणार होता. विवेक, हेमंत, आणि मी वेगळ्या बस ने जाणार होतो त्यांच्या गावाला.
विवेक आणि हेमंतने आपापल्या फोनमध्ये त्यांच्याकडची नेपाळी सिम कार्ड टाकली. विवेकने त्याच्याकडचे एक नेपाळी सिम कार्ड मला दिले. माझ्या कार्डला हेमंत आणि मी समोरच्या दुकानातून १०० नेपाळी रुपयांचे रिचार्ज मारले. मी दुकानदाराला भारतीय ५०० ची नोट दिली. त्याने त्यातून नेपाळी १०० रुपये घेऊन बाकीच्या नेपाळी रुपयांच्या नोटा मला परत दिल्या. इथे कळून गेले कि भारतीय नोटा इथे चालतायत. आपले १०० रुपये म्हणजे नेपाळी १६० रुपये.
मी, विवेक, आणि हेमंत एका जुन्या मिनी बस मधून त्यांच्या गावाला गेलो.
कैलाली जिल्ह्यातलं लमकी चुहा गाव. पोहोचताच विवेकने एक हॉटेल शोधून त्यात रूम घेतली. बाथरूम टॉयलेट असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन प्रकारच्या रूम होत्या. मी सकाळचे सोपस्कार पूर्ण करेपर्यंत विवेक आणि हेमंत जाऊन माझ्याकडचे भारतीय रुपये देऊन माझ्यासाठी नेपाळी रुपये घेऊन आले. मग विवेक आणि हेमंतने सकाळचे सोपस्कार पूर्ण केले. तोपर्यंत मी हॉटेल बाहेर एक फेरफटका मारून आलो.
आता जेवणाची वेळ झालीच होती. भूकही लागली होती. त्याच हॉटेल मध्ये जेवायला बसलो. नेपाळी पद्धतीची थाळी. डाळ, भात, दोन भाज्या, आणि चटणी. ह्या चवदार जेवणाचा आम्ही तिघांनी मनसोक्त समाचार घेतला. पाहिजे तेवढे जेवा. नेपाळी स्थानिक जेवणात फक्त भात असतो. चपात्या नसतात.
|
जेवायला बसलेले (तुमच्या डावीकडून उजवीकडे) मी आणि विवेक |
यथेच्छ जेऊन झाल्यावर विवेकच्या घरी जायला निघालो. पण आधी मला पोखराला जायच्या बसचे तिकीट मिळते का ते बघायला गेलो. बस स्टॅन्ड पर्यंत जायला विवेकने एक बॅटरीवर चालणारी रिक्षा ठरवली. पोखराला जायच्या बसचे तिकीट मिळत होते. अडीज वाजता म्हणजे अजून दीड तासाने बस होती, जी पोखराला पहाटे पोहोचणार. इथे लमकी गावात बघण्यासारखे काही नव्हते. त्यामुळे इथे एक दिवस न घालवता ह्या बसने पोखराला जाणे हा योग्य पर्याय होता. बस तिकीट घेतले.
आता त्याच बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षातुन विवेकच्या घरी जायला निघालो. रस्त्यात एक घर दिसल्यावर विवेकने रिक्षा थांबवायला सांगितली. आम्ही उतरून त्या घरी गेलो. मला सगळेच अनोळखी होते. विवेक सर्वांना भेटल्यावर रिक्षातुन पुढे निघालो. विवेकने नंतर खुलासा केला कि हे त्याच्या बायकोचे घर होते. तो त्याच्या सासू सासऱ्यांना भेटून आला होता.
पुढचा स्टॉप विवेकचे घर. हे तसे त्याचे फॅमिली होम होते. इथे त्याच्या बहिणी वगैरे रहात होत्या. त्याचे स्वतःचे घर इथून थोड्या अंतरावर होते. विवेक घरातल्या सगळ्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्यावर आम्ही इथून निघालो. आता विवेकच्या स्वतःच्या घरी आमची स्वारी निघाली. त्याचे घर अजून बांधून पूर्ण झाले नव्हते. सध्या तिथे त्याच्या बायकोची बहीण राहते. विवेकच्या घराच्या अलीकडचे घर त्याच्या मामांचे आहे आणि पलीकडचे घर त्याच्या बायकोच्या मामांचे आहे. आता आमची स्वारी निघाली हॉटेल वर. हॉटेलची रूम सोडून पैसे देऊन आम्ही निघालो बस स्टॅन्ड कडे.
बस स्टॅन्ड वर पोहोचलो तेव्हा अडीज वाजून गेले होते. रिक्षावाल्याला संपूर्ण फिरवल्याचे नेपाळी तीनशे रुपये दिले. म्हणजे आपले १९० रुपये. पोखराला जायची बस अजून यायची होती.
|
लमकी गावातला बस स्टॅन्ड |
बस स्टॅन्ड वर काही तुरळक माणसं. काठमांडूला जाणारी बस येऊन त्यात काहीजण चढले. दहा मिनिटांनी पोखराला जाणारी बस आली आणि मी पोखराच्या दिशेने मार्गस्थ झालो. बसमध्ये पुढची सीट मिळाली. उद्या पहाटे बस पोखराला पोहोचणार होती. चारशे नव्वद किलोमीटरचा लांबचा पल्ला होता.
|
लमकी ते पोखरा प्रवास, गुगल मॅप मधे पाहिलेला |
रस्त्याला वाहने अगदीच तुरळक. लमकी गाव सोडल्यावर थोड्या वेळाने एक चेकपोस्ट आली. एक पोलीस बसमध्ये शिरून नजर फिरवून गेला. वाहकाने बसची डिक्की उघडून दिली आणि पोलिसाने सामानावर नजर फिरवली. मग बस पुढे सुरु. बर्दीया नॅशनल पार्क मधून आमची बस जात होती.
|
चेकपोस्ट जवळचा एक फलक |
साधारण अर्ध्या तासाने परत एक चेकपोस्ट. इथेही एक पोलीस बसमध्ये शिरून नजर फिरवून गेला. वाहकाकडून बसची डिक्की उघडवून सामानाची जुजबी तपासणी.
|
प्रवाशांच्या लघुशंकेसाठी थांबली गाडी |
प्रवाशांपैकी काहींनी लघुशंका बोलून दाखवल्यावर गाडी थांबवण्यात आली. पुरुष रस्त्याच्या डाव्या बाजूला गेले आणि स्त्रिया उजव्या बाजूला.
|
लमकी ते पोखरा प्रवासातला रस्ता |
साडेसहा नंतर एका गावात चहापाण्याचा वीस मिनिटांचा ब्रेक. इथे एक गजब रिक्षा दिसली जिचा पुढचा भाग बाईकचा आणि बाकीची बॉडी एखाद्या मेटल वर्कशॉप मध्ये बनवलेली.
|
एक गजब रिक्षा |
केसरी किंवा वीणा वर्ल्ड बरोबर केलेली ट्रिप म्हणजे बागेतल्या फुलांवर बागडणारी फुलपाखरं. एखादा देश खराखुरा बघायचाय तर असं गावं शहरं रस्ते धुंडाळत फिरणं क्रमप्राप्त आहे. सिनियर सिटिझन्स झाल्यावर मग केसरी आणि वीणा वर्ल्ड बरोबर फिरावं.
साडेनऊच्या दरम्यान गाडी एका धाब्यावर जेवणासाठी थांबली. दुपारी विवेकच्या गावात तुडुंब जेवण झालेलं होतं. आता मी पोटाला विश्रांती दिली.
|
जेवणासाठी थांबलो त्या धाब्याचा फलक |
रात्री मी जमेल तेवढी झोप पूर्ण करून घेतली.
No comments:
Post a Comment