बुधवार ११ एप्रिल २०१८
परवा सकाळी पुण्यातून सुरु झालेली भ्रमंती दुपारी दिल्ली विमानतळ, संध्याकाळी आनंद विहार बसस्थानक, काल पहाटे बॉर्डर जवळचं बनबसा, दुपारी लमकी गाव असे थांबे घेत आज पहाटे पोखराला पोहोचली. दोन्ही रात्री बस प्रवास.
पहाटे सहाच्या दरम्यान मी पोखराच्या बस स्थानकामधून बाहेर पडलो. आधीच उजाडलेलं होतं. रस्त्यावर तुरळक माणसांची सकाळची कामावर जायची लगबग. लेकसाईड रोडला अनेक हॉटेल आहेत तिथे मला जायचं होतं. रात्रीच्या प्रवासानंतर बॅग पाठीवर घेऊन लेकसाईड रोडला चालत जाऊन हॉटेल शोधणं जरा जड गेलं असतं. एक टॅक्सी ठरवली लेकसाईड रोडला जाण्यासाठी. ३०० रुपये. म्हणजे आपले १९०. हॉटेल लेक ब्रीझ बरे वाटले.
 |
हॉटेल लेक ब्रीझ चे रिसेप्शन |
पाणी थंडगार. तशीच अंघोळ उरकली. हॉटेलची रूम साधी होती. हॉटेलच्या आवारात अनेक प्रकारची फुलझाडं लावून परिसर सजवलेला. मी फुलांचे भरपूर फोटो काढले. बाजूच्या रूम मधला नेपाळी माणूस ब्लॅक टी पीत होता. मी पण ब्लॅक टी (साखर टाकलेला) घेऊन प्यायलो.
 |
हॉटेल लेक ब्रीझच्या परिसरातलं एक फुल |
हॉटेलच्या किचन वरून समोर फेवा लेक दिसत होता. लेक पलीकडच्या डोंगरावर पांढऱ्या रंगातला वर्ल्ड पीस स्तूप लक्ष वेधून घेत होता.
हॉटेलच्या मालकाबरोबर बोलताना त्याने पोखरा डे टूर साठी बस असल्याचे सांगितले. त्याच्याशी बोलून हि टूर ठरवली. बस समोरच्या रस्त्यावर येणार होती. मी जाऊन समोरच्या रस्त्यावर उभा राहिलो. वेळ होऊन गेली तरी बस काही येईना.
 |
लेकसाईड रोडच्या फूटपाथ वरील ग्राफिटी |
हॉटेलच्या मालकाचा फोन आता टूर वाला उचलेना. मग ह्या डे टूर चा नाद सोडला. फेवा लेक समोरच होता. तिथे बोट राईड आणि वर्ल्ड पीस स्तूप ला भेट द्यायची ठरवली. पोखरा बद्दल मी केलेल्या अभ्यासात फेवा लेक मध्ये बोट राईड कराच असा तिथे आधी गेलेल्या पर्यटकांचा सल्ला वाचला होता. आणि वर्ल्ड पीस स्तूप ला गाडीने जाण्याऐवजी होडीतून लेक च्या पलीकडे जाऊन तिथून चालत जाणे इष्ट असेही वाचले होते.
दहा वाजून गेले होते. पुण्यात सध्या भाजून काढतंय तसलं ऊन इथे नव्हतं. हॉटेल लेक ब्रीझ पासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर फेवा ताल. नेपाळी भाषेत ताल म्हणजे तलाव. हा नेपाळमधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव.
 |
फेवा लेक |
लेक च्या काठाला पाण्यात कचरा होता. पर्यटनाचे दुष्परिणाम. असे पर्यटनाचे दुष्परिणाम जर नको असतील तर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. भूतानमध्ये हे चांगलं जमलंय. असो. नेपाळ आणि भूतान ह्यांची तुलना करणे हा आपला आजचा विषय नाही. जर तुम्हाला जाणून घ्यायचीच असेल नेपाळ आणि भूतान ची तुलना तर मला प्रत्यक्ष भेटा.
लेकच्या कडेला चालत जायचा रस्ता आणि रस्त्यापलीकडे छोटी मोठी रेस्टऑरेंट्स. लेक च्या कडेने चालत पोहोचलो बोटी दिसत होत्या तिथे. तिकीट काउंटर वर फेवा लेक पर्यंत जाऊन परत यायच्या बोटीचे तिकीट काढले. २० रुपये देऊन लाईफजॅकेट घेणं कम्पलसरी आहे.
 |
तिकीट काउंटर |
एक माणूस बोट चालवण्यासाठी तयारच होता. आम्ही दोघे बोटीतून निघालो. मी बोटीत पुढे आणि मागे बसून तो बोट चालवत. फेवा लेक च्या पलीकडच्या बाजूला अनेक पॅराग्लायडर्स उतरत होते. समोरच्या सारंगकोट नावाच्या डोंगरावरून ते सर्व उडत होते आणि फेवा लेकच्या कडेच्या सपाट जागेत उतरत होते.
अर्ध्या तासात बोट लेक च्या कडेला पोहोचली. इथे बोटीचा नावाडी दोन तास थांबणार होता. मी पायऱ्यांच्या वाटेने डोंगर चढायला सुरुवात केली. डोंगर चढणे उतरणे हा आपला आवडता उद्योग. तरी किती वाजता चढायला सुरुवात केली ते मोबाइल मधल्या घड्याळात बघून ठेवले.
 |
बोटीने फेवा लेकच्या पलीकडे गेल्यावर तिथून वर्ल्ड पीस स्तूप ला चालत जायचा रस्ता |
रस्ता साधा सोपा आहे. घसरण कुठेही नाही. अनेक ठिकाणी पायऱ्या बनवल्यायत. तब्येतीने धडधाकट सर्वजण इथे चढून जाऊ शकतात. इथे जाणारे फारसे कोणी नव्हते.
 |
रस्त्याला फाटा फुटला तिथे लावलेला फलक |
रस्त्याला जिथे जिथे फाटे आहेत तिथे तिथे फलक लावलेत. त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. गर्द झाडीमुळे इथे आल्हाददायक वातावरण.
 |
गर्द झाडीतून टेकडीवर जाणारा रस्ता |
तीस मिनिटात टेकडीवर पोहोचलो. इथे उंचावर असूनही वारा काही नव्हता. तरी पण वातावरण भन्नाट होतं. आणि गर्दी नसल्यामुळे सोन्याहून पिवळं. प्रवेशद्वारातून आत जाताच एक फलक आपण कुठे पोहोचलोय त्या ठिकाणाची जाणीव करून देत होता.
 |
विश्व शांती स्तूप च्या प्रवेशद्वाराजवळील फलक |
एका मोठ्या फुलावर एका फुलपाखराला आणि एका कीटकाला शांती लाभलेली. तसं पाहिलं तर आज मनुष्यप्राण्याने स्वतःच्या स्वार्थासाठी इतर सर्व प्राणिमात्रांची शांतता हिरावून घेतलीये.
 |
Habitat - निवासस्थान
फुलावर एक छोटे फुलपाखरू आणि एक कीटक बसलाय
पृथ्वीवर राहणाऱ्या लाखो प्रजातींपैकी एक
काय करायचंय माणूस ह्या त्यातल्या एका प्रजातीला - इतर सर्व प्रजातींचे निवासस्थान नष्ट करायचेय कि त्या सर्वांबरोबर मैत्रीने राहायचंय |
काही पायऱ्या चढून जाताच समोर होता
निप्पोन्झान म्योहोजी जपानी बुद्ध विहार. दार कुलूप लावून बंद होते. बहुदा नेपाळी पर्यटकांचा गलका शांतीप्रिय जपानी बुद्ध विहाराला नकोसा होत असावा.
पुढे गेल्यावर एक लाखमोलाचा फलक दिसला.
 |
एक लाखमोलाचा फलक |
इथला परिसर स्वच्छ आहे. विविध छोटी मोठी झाडं लावलीयेत. सकाळी हॉटेलच्या गच्चीवरून पाहिलेला
विश्व शांती स्तूप आता समोर होता.
 |
विश्व शांती स्तूप |
आधी परिसरात जिरून मग पायऱ्या चढून जायचे ठरवले. हा विश्व शांती स्तूप जपान्यांनी बांधलाय. १९४५ साली विश्व शांती हा विषय जपान्यांना जितक्या चांगल्या प्रकारे समजलाय तितका इतर कोणत्या राष्ट्राला समजला असण्याची शक्यता कमीच.
 |
परिसरातील एक फलक |
बांधकामातला काटेकोरपणा पाहता हे नेपाळी काम नाही हे तसे ओळखता येते. ११५ फूट उंचीच्या पॅगोडा मध्ये चारही बाजूला बुद्धाच्या मुर्त्या आहेत. पुढची मूर्ती जपानमध्ये बनवलेली आहे. पश्चिम बाजूची श्रीलंकेहून आणली आहे. उत्तर दिशेकडची थायलंडहून आणलेली आहे. दक्षिण बाजूची नेपाळमध्ये बनवलेली आहे.
१९७३ साली हा पॅगोडा जपान्यांनी बांधायला घेतला. १९७४ मध्ये त्यावेळच्या नेपाळी सरकारने जुजबी कारणे दाखवून सर्व बांधकाम पाडून टाकले. अनेकदा नेपाळी सरकारने इथल्या कामगारांना अटक केली. विश्व शांती स्तूप बांधण्याचे प्रयत्न
निप्पोन्झान म्योहोजी ह्या जपानी संस्थेकडून पोखरा मधल्या बुद्ध धर्मियांच्या मदतीने पुढचे १८ वर्षे सुरु होते. हार मानून सोडून देतील ते जपानी कसले. चिवटपणा नेपाळयांकडे जितका आहे तितकाच जपान्यांकडेही आहे. १९९२ साली त्यावेळचे नेपाळचे पंतप्रधान गिरीजा प्रसाद कोईराला इथे आले आणि त्यांच्या सहकार्याने बांधकाम पुनश्च सुरु झाले. मग कोणतेही विघ्न न येता १९९९ साली हि वास्तू बांधून पूर्ण झाली.
 |
फेवा ताल आणि पोखरा शहराचे विहंगम दृश्य |
इथून फेवा ताल आणि पोखरा शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. बहुदा आकाश निरभ्र असेल तर दूरवरचे बर्फाच्छादित पर्वत दिसत असावे. आज आकाश ढगाळलेले होते.
 |
विश्व शांती स्तूप ... जरा वेगळ्या प्रकारे पाहिलेला |
बोटवाला खाली वाट बघत असल्याने फार वेळ रेंगाळलो नाही. पण प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर खाली उतारण्याऐवजी दुसरा रस्ता घेतला. थोडं पुढे गेल्यावर विश्व शांती स्तूप एका वेगळ्या प्रकारे दिसला. इथे काही सायकल स्वार पलीकडून कुठूनतरी दनादन आले. नंतर वाचनात आले कि हा पोखारामधला माउंटन बायकिंग ट्रेल, म्हणजे सायकल वरून डोंगरात फिरण्याचा रस्ता होता. रस्ता असा नसेलच. आपल्याकडे डोंगरात ट्रेकिंगला जायच्या वाटा आहेत तशी वाट असेल.
एक पाश्चिमात्य माणूस दोन्ही हातात वॉकिंग स्टिक घेऊन चालत आला. तो पलीकडच्या गावापर्यंत ट्रेक ला चालला होता. एकटाच. अशी डेरिंग असावी. नाहीतर रोजच्या रहाटगाड्यात आयुष्य कधी संपून जाईल कळणारही नाही.
प्रवेशद्वारापर्यंत येऊन आता मी उतरायचा रस्ता धरला.
 |
उतरताना |
भर दुपारीही वातावरण आल्हाददायक होते. एका ठिकाणी एक मोठे झाड खोडापासून तोडलेले दिसले. हि पण हत्याच. झाडाची कसली हत्या असा विचार करणारे आजकाल अनेकजण सापडतात. असो. झाडांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पीटर वोहलबेन ह्यांनी लिहिलेलं द हिडन लाईफ ऑफ ट्रीज हे पुस्तक वाचलं नसाल तर नक्की वाचा.
 |
हत्या |
आजूबाजूच्या गावातल्या एक नेपाळी बाई झाडाची पानं तोडण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याशी नमस्ते झाल्यावर त्यांनीच मला त्यांचा फोटो काढायला सांगितले. थोड्या गप्पा मारून मी जायला निघाल्यावर मग पैसे मागितले. त्यांना मी नेपाळी वीस रुपये दिले.
 |
झाडाची पानं तोडायला आलेल्या नेपाळी बाई |
वीस मिनिटात डोंगर उतरलो. बोटवाला तयारच होता. मला म्हणतो बराच लवकर आलात. त्याला नाही सांगितले ह्या डोंगरासारखा माझ्या घराजवळचा घोराडेश्वरचा डोंगर मी गेले तीन चार वर्ष चढतोय.
विविधरंगी डुंगा, म्हणजे नेपाळी होड्या, लांबवर पसरलेला फेवा ताल, पलीकडे सारंगकोटचे डोंगर, असा इथे अप्रतिम नजारा.
 |
फेवा ताल आणि डुंगा, म्हणजे नेपाळी होड्या |
आता परत जाताना तळ्यातल्या बेटावचे
बाराही देऊळ बघून जायचे ठरवले. ह्या ज्यादाच्या ठिकाणामुळे बोट परत गेल्यावर तीनशे नेपाळी रुपये द्यायचे ठरले. अठराव्या शतकात बांधलेले हे देवीचे दुमजली देऊळ आहे. आलेले भाविक इथे धान्य विकत घेत होते तळ्यातल्या माशांना खायला घालायला. ज्याची त्याची श्रद्धा. उगाच आपण आधुनिक कुतर्कपणा दाखवून दिसेल त्यावर टीका करत जाऊ नये.
 |
फेवा ताल मधल्या बेटावरून समोरचे दृश्य |
ढगाळ वातावरणामुळे आज दूरवरची बर्फाच्छादित शिखरं दिसत नव्हती. वीसेक मिनिटात बोट काठाला परतली.
 |
एका छोट्या हॉटेलच्या भिंतीवरची ग्राफिटी |
आता पोटातल्या कावळ्यांना शांत करणं गरजेचं होतं. हॉटेल लेक ब्रीझ ज्या गल्लीमधे होते त्या गल्लीत, म्हणजे गंतव्य स्ट्रीट, एका ठिकाणी चाऊमिन खाल्ले. आपण ज्याला नूडल्स म्हणतो त्याला इथे चाऊमिन म्हणतात. हा मूळचा तिबेटी पदार्थ आहे असे एका ठिकाणी वाचनात आले.
हॉटेल लेक ब्रीझच्या बाजूलाच हॉटेल द कोस्ट दिसलं. इथे उद्यासाठी रूम घेतली. आता
इंटरनॅशनल माउंटन म्युझियमला भेट द्यायची ठरवलं. पोखरामधली हि जागा चुकवून चालणारच नव्हतं. तिथे जायला द कोस्ट हॉटेलची गाडी ठरवली. इंटरनॅशनल माउंटन म्युझियमला भारतीयांसाठी दोनशे नेपाळी रुपये तिकीट होतं.
 |
पंगुं लंघयते गिरिम् असं वाचलं होतं. इथे तेच तर लिहिलंय. फक्त काळ आणि वेळ बदललीये. |
सगरमाथा (म्हणजे
एव्हरेस्ट), हिमाल (म्हणजे
हिमालय), आणि ट्रेकिंग हे मॅग्नेट आहेत जगभरातल्या साहसी, निम-साहसी, आणि हौशी गिर्यारोहकांना, तसेच पर्यटकांना नेपाळ मधे ओढून आणणारे. People don’t take trips - trips take people, असं जॉन स्टेनबेक ह्यांनी म्हटल्याप्रमाणे.
नेपाळमधे समुद्रसपाटीपासून साठ मीटर पासून ते आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पर्यंत उंचीचे नानाविध भाग आहेत. त्यामुळे ह्या छोट्याशा देशात प्रचंड जैवविविधता आढळते.
इंटरनॅशनल माउंटन म्युझियमला दुपारी भरपूर मोकळा वेळ काढून भेट द्यावी. सकाळच्या वेळी पोखरमधल्या इतर ठिकाणी जावं. संपूर्ण
म्युझियम व्यवस्थित पाहायला तीन तास लागतील.
मी म्युझियम बघत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला. मी इथे यायला गाडी केली ते बरंच झालं. आता जाताना भिजावं लागणार नाही. मला नंतर कळलं कि पोखरामधे रोज संध्याकाळी पाऊस पडतो. वर्षभर. आपल्याकडे जसे चेरापुंजी आहे तसे इकडे पोखरा. नेपाळ मधलं सगळ्यात जास्त पाऊस पाडण्याचं ठिकाण.
 |
इंटरनॅशनल माउंटन म्युझीयम च्या परिसरात |
इंटरनॅशनल माउंटन म्युझीयम च्या परिसरात एक भलीमोठी क्लाइंबिंग वॉल आहे. इतकी मोठी कि मोबाईल मधल्या कॅमेऱ्याच्या एका फ्रेम मधे हि बसवणं अवघड आहे. ह्या क्लाइंबिंग वॉलला
मॉरिस हरझॉग ह्यांचं नाव दिलंय.
 |
इंटरनॅशनल माउंटन म्युझीयम च्या आवारातील भलीमोठी क्लाइंबिंग वॉल |
द कोस्ट हॉटेलच्या गाडीचा ड्रायवर चम्या निघाला. चालत्या गाडीत उगाच सारखा दार उघड बंद करत होता. ह्याला रस्ते समजेनात. बोलायलाही बावळट. परत नाही ह्याला घेऊन कुठे जायचं.
हॉटेलवर जाऊन तासभर आराम केला. पाऊस थांबल्यावर जेवायला बाहेर पडलो. लेक साईड रोड वर सगळीकडे हॉटेल्स.
लेक ब्रीझ हॉटेलवर परतल्यावर हॉटेलच्या मालकाशी बोललो उद्याच्या भटकंतीचा बेत बनवायला. पण निश्चित काही ठरवू शकलो नाही. टुरिस्ट बसमधे बसून दिवसभर पोखरा दर्शन करायची माझी इच्छा नव्हती. उद्याच बघू.
No comments:
Post a Comment