Friday, January 11, 2019

रामशेज

गडकोटविरहित जें राज्य त्या राज्याची स्थिति म्हणजे अभ्रपटलन्याय आहे.  याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणीं गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचें बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, असें पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्याचें संरक्षण करणें; व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतांच करावा, कोणाचा विश्वास मानू नये.

 

माझ्या राज्याने सांगितलेलं हे समदं म्या झोपेतबी विसरणार न्हाय.

रमजान महिन्याच्या ५ तारखेस अजमेर येथून फतहचे कलम पढून औरंगजेब निघालाय बुऱ्हाणपूरच्या दिशेने.  दक्षिणेच्या मोहिमेवर.  सोबत प्रचंड मोठी फौज.  स्वराज्य, कुतुबशाही, आदिलशाही, असं अवघं दख्खन काबीज करायचंय त्याला.  स्वराज्यावर एक महाप्रलय चालून येतोय.

खबर आलीय कि औरंगजेबाने पहिला गड रामशेज निवडलाय.  ४५ वर्षापूर्वी त्याच्या बापाने, म्हणजे शहाजहानने दक्षिणेत स्वारी केली होती आणि त्यावेळी त्याने पहिला गड काबीज केला होता रामशेज.  त्यामागोमाग बरेच किल्ले पटापट ताब्यात घेतले होते.  म्हणून ह्याने देखील सुरुवात करायला रामशेज निवडलाय.  राजं, महादेवाची शपत.  हा रामशेज काय म्या पडू देत नाय.  वेताळ येउदे नाहीतर भुतं येउदे.  तयार हाय आम्ही.  साडेपाचशे शिबंदी हाय हितं रामशेज वर.

किल्ला उंचीने इतका छोटा आहे कि खालच्या वस्तीतले आवाज गडावर ऐकू येतात

रामशेज जिंकून घ्यायला औरंगजेबाने कासीमखान निवडलाय.  बारा हजार फौज येतेय इकडे.  एका झटक्यात किल्ला सर करू म्हणतायत.  खबऱ्यांनी त्यांचं काम उत्तम केलं तर.

कासीमखान आला फौजेनिशी गडाच्या पायथ्याला.  आणि तोफेचे गोळे मारतोय.  पुढचा दिवसभर वाट बघतोय किल्लेदार घाबरून शरण यायची.

 

आता गडाला वेढा घालायला बघतायत.  रातच्याला छापा घातला.  माझ्या मावळ्यांनी जो काय हल्ला केलाय.  एकबी हशम सोडला न्हाय.  ह्यावर कासिमखानाने औरंगजेबाला पत्र लिहून पाठवलं. 

पूर्वी तोफांच्या माऱ्याने रामसेजच्या किल्ल्यातील बुरुजाची भिंत पडली होती.  म्हणून त्या वाटेने माझ्या माणसांनी वर बाण फेकून किल्ल्यात जावे, असे मी ठरवले.  तारीख २७ शाबानला रात्रीच्या वेळी पाच सहाशे मेवाती व माझे लोक यांना किल्ल्यात जाण्यासाठी तयार करून मी हल्ला केला.  शेवटी खंजरखानाच्या भाऊबंदापैकी काही व माझे लोक किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचून मोठ्याने ओरडले कि, "बेलदारांनी यावे".  त्या आवाजाने गनिमाचे लोक जागे होऊन त्यांनी दगड व बंदुकी यांचा एकच मारा केला.  बहुतेक सर्व बादशाही लोक कामास आले व जखमी झाले.  काही प्रगती झालेली नाही.  सध्या हे काम हातचे गेले, असे बादशाही लोक बोलतात.  परंतु मला ते मान्य नाही.  माझ्याबाबत जो हुकूम होईल, त्याप्रमाणे मी करेन. 

बरोबरच्या सगळ्यांना वेढ्यात सोडून, वेढ्याची सूत्रे शहाबुद्दीनखानाकडे सोपवून, हुजुरास हजर व्हावे, असा कासीमखानास औरंगजेबाचा हुकूम आला.  औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे कासीमखान वेढा सोडून औरंगाबादला निघून गेला.  वेढ्याचा सूत्रधार आता शहाबुद्दीनखान.  असेल कोण त्याच्या प्रदेशात.

शहाबुद्दीनखान काय कस्त करतोय.  गडाचा वेढा सैल सुटला कि ह्यो हजर.  सुरुंग लाववतोय.  मोर्चे बांधतोय.  दमदमे तयार करवून त्यावरून तोफांचे हल्ले करवतोय.

 

हत्ती घोडे उंट तोफा आज इथे आमच्याकडे न्हायत.  त्या समद्याला पुरून उरण्याची ताकद हाय आमच्या मनगटात.  अन ताकदीला युक्तीची जोड कशी द्यायाची ते आमच्या राजाने आम्हासनी शिकवलंय.  लोखंडी तोफा न्हायत तर काय.  घ्या रे हि सगळी लाकडं अन कातडी. अन बनवा ह्यांच्या तोफा.  दगड धोंडे हवे तेवढे हायत आपल्याकडे.  दिसला गनीम कि द्या दणके.  आमची हि येक येक तोफ धा लोखंडी तोफांच्या बरोबरीची हाय.  खर्च किती आन आजपतुर गनीम मारलेत किती त्याचा विचार करून बघा.  मग समजेल.

 

शहाबुद्दीनखानाने एल्गार करून हल्ला चढवला.  मावळ्यांनी निग्रह केला.  बराच मोगल धुळीस मिळवला.  दतियाचा राव दलपत बुंदेला दगडाच्या माऱ्याने जखमी झाला.

रामशेज किल्ल्यावरून टेहळणी

खबर हाय कि संभाजी राजानं रुपाजी भोसले आन मानाजी मोरे सहा हजार सैन्य घेऊन पाठवलेत.  टोपीकरांच्या कालगणनेनुसार १६६२ साल आन मे महिना हाय हा.  खबरांमागून खबरा येतायत.  शहाबुद्दीन आडवा आला त्यांना तिकडं गणेश गावाजवळ.  तुंबळ युद्ध झालं.  मोगल माघार घेऊन पळाले.  मोगलांचे पाचशे घोडे घावले आपल्या सैन्याला.  ह्या खबरा ऐकून हिकडं आमच्या मावळ्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय.  आन तिकडं औरंगजेब संतापलाय.  अजून करतो काय गड्या.

हितं रोज लहान मोठा मऱ्हाटी हिसका खातोय शहाबुद्दीनखान.

डोंगरचा उंदीर काय.  आरं हे डोंगरचे उंदीरच उद्या संपवतील बघा औरंगजेबाला.  इराणच्या बादशहाने सांगावा धाडलाय ना, हे कसले आलमगीर.  दिल्लीत बसून वाटतं आम्ही जगाचे मालक.  दख्खन काबीज करायला आलेला तुमचा आलमगीर हितं मऱ्हाठ्यांच्या राज्यातच हाय खाऊन जाईल बघा.

चोर दरवाजा

रामशेज घेण्याचे हजारभर प्रयत्न करून झाले बघा ह्या शहाबुद्दीनखानाचे.  श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हि.  आम्ही मोगलाच्या हातात लागू देत न्हाय. 

हताश झालेल्या औरंगजेबानं पत्र धाडलंय शहाबुद्दीनखानाला.  म्हणतो,

शिहाबुद्दिनखानास हसबुलहुकुम लिहावा, कि तू रामसेजचा किल्ला घेण्याबाबत खूप कष्ट घेतलेस.  स्वताःचा जीव गमावण्यास देखील मागे पुढे पाहिले नाहीस.  सध्या तो किल्ला खानजहान बहादूरच्या अधिकाराखाली दिला आहे.  तेव्हा तो रामसेज बादशाही अमलाखाली आणील.  खानजहान बहादूरजवळ तोफखाना सोडून तू स्वतः आपल्या जमेतीसह अंतूरचा ठाणेदार अहमद या जवळ पोहोचावे.

हा निघाला शहाबुद्दीनखान, आणि आता इथे पोहोचलाय बहादूरखान.  आरं हा कसला बहादूर.  राजांनी ठरवून झोडपलेलं "पेंडीचं गुरु" हे.  "बहादूरखान कोकलताश" तिकडं दिल्लीत.  हितं आमच्या सह्याद्रीत हे "पेंडीचं गुरु" कसं झोडपायचं ठाव हाय आम्हासनी.

 

आरं हि काय गडबड हाय ह्या बाजूला.  तोफा काय.  दारुगोळा काय.  तोफची किती आन बाजारबुणगे किती.  हे नवीनच चाललंय बघा.  निसता गोंधळ.  दुसरीकडच्या बाजूनी ह्यांचा डाव असणार.  हितं गोंधळ घालतील आन पलीकडनं चढून येतील.  हितं नगारे नौबती कर्णे घेऊन एकच गलका करू.  आन बाजारबुणग्यांना धोपटायला दगड धोंडे लोटून देऊ.  साथीला तेलात बुडवले कपडे पेटवून वाऱ्याबरोबर सोडून देऊ ह्या बुणग्यांच्या मागनं.

हि खबर लागली बघा.  तिकडं पलीकडं बाजारबुणग्यांच्या गोंधळ.  आन हिकडनं मोगल चढून वर येणार तर.  बिनबोभाट.  म्या हिकडं हत्यारबंद शूर शिपाई दबा धरून बसवले.  सदा मुस्तेद.  मोगलांची वाट बघत.  मोगल आल्यावर त्यांच्यावर जो काय वार चालवलाय.  डोचकी फुटून समदे खाली फेकले.

 

कस्त करून करून खानजहान बहादूरखान जेर जाहला.  असे महिन्यांमागून महिने जातायत.  समदी शिबंदी बिलाकसूर गड लढवतेय.

किल्ला चढून जायला पंधरा मिनिटं पुरतात

आज परत एकदा मोगली एल्गार.  आन ह्यो काय नवा.  कोण रे तो पुढे येतोय.  हातात काय त्याच्या.  टप्प्यात आल्यावर गोफणीतून दगडफेक सुरु.  ह्यो बघा गोफणेचा गोळा बसला त्याच्या छाताडावर.  आन कोसळला त्यो खाली.  समदी परत निघाली बघा.  मग जासूद समदी बातमी घेऊन आला.  किल्ला घ्यायला बहादूरखान कायबी करायला राजी व्हता.  मोगलांनी त्याच्याकडे मोतदार आणला होता.  तो खानाला म्हणाला, "भुते वंश करण्यात मी पटाईत आहे.  मला एक शंभर तोळे सोन्याचा साप बनवून द्या.  तो मी मंतरून हाती घेईन.  सुलतानढवा करून मला सगळ्यात पुढे ठेवा.  मोगल सैन्याला मी भुतांच्या मदतीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेईन".  असा तो मोतदार त्या दिवशी पुढं आला व्हता.

 

आज वेढ्यात लगबग दिसतेय.  आता कसला नवा मोगली डाव.  हा बातमीदार आला, औरंगजेबाने बहादूरखानाला हुकूम फर्मावलाय कि, परत निघून ये.  अन ह्यो जाळ कसला.  मोगलांनी त्यांचाच लाकडी बुरुज जाळला कि रं.  वाजवा रे नगारे चौघडे तटावर.  वेढा उठला.  मोगल गेले.  राजं, पाच पावसाळे सरले बघा आतापतूर.  आन ह्यो मोगल थांबला असता तर पाच काय, अजून पन्नास वर्स गड झुंजवत ठेवला असता म्या.  महादेवाची शपत.  नशीब लागतंय स्वराज्यात जल्म घ्यायाला.

 

एकः शतं योधयति प्राकारस्तो धनुर्धरः |
शतं दशसहस्त्राणि तस्माद दुर्गम विधीयते ||


दुर्गाच्या आश्रयाने लढणारा एक एक योध्दा बाहेरील शंभर मनुष्यांशी युद्ध करू शकतो, तसेच दुर्गाच्या आश्रयाने शंभर योद्धे बाहेरील दहा हजार मनुष्यांशी लढू शकतात.

No comments:

Post a Comment