मागच्या वर्षी केलेल्या
साल्हेर स्वारीत एक जागा आमची बघायची राहून गेली होती. परशुरामांच्या पावलांचे ठसे. त्यामुळे दुसरी साल्हेर स्वारी करणे भागच होते. ५ जानेवारी ह्या साल्हेर विजय दिवसाच्या शुभ मुहूर्तावर आमचा हा योग जुळून आला. मागच्या साल्हेर स्वारीत भेटलेला सह्यमित्र शिवम देसाई, the one and only स्वप्नील खोत, आणि मी असे तिघं दुसरी साल्हेर स्वारी यशस्वी करून आलो. त्याचा हा इति वृत्तांत.
साल्हेर विजय दिवसानिमित्त आम्हाला सकाळी लवकर किल्ल्याच्या पहिल्या माचीवर पोहोचायचे होते. पहाटे साल्हेरवाडीत पोहोचायचं म्हणून आम्ही पुण्यनगरीतून रात्री नऊ वाजता निघायचं ठरवलं. वाटेत संगमनेर जवळ शिवम आम्हाला सामील होणार होता. सकाळी साल्हेर विजय दिवसाचा सोहळा, मग परशुरामांच्या पावलांचे ठसे पाहणे, त्यानंतर बाजूच्या सालोटा किल्ल्याला भेट, सालोटा किल्ला बघून झाल्यावर परत साल्हेरला न येता खिंडीतून वाघांबे गावात उतरून जायचे, आणि तिथून साल्हेरवाडीत येऊन मुक्कामाला थांबायचे असा बेत ठरवला. दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारी नंतर साल्हेरवाडीतून निघून परतीच्या वाटेत नाशिक जवळचा रामशेज किल्ला बघून संध्याकाळ पर्यंत पुण्यनगरीत परत जाऊ असा प्लॅन केला.
स्वप्नील जेवायला घरी आला तेव्हा गूढ रम्य महाराष्ट्र हे मिलिंद गुणाजींचं पुस्तक बाहेर काढले. परशुरामांच्या पावलांच्या ठस्यांचे फोटो पाहून घेतले. ते साल्हेर वर कुठे आहेत त्याचा आता स्वप्नीलला अंदाज होता. नक्की जागा कोणती ते आम्ही उद्या शोधून काढणार होतो. आम्ही दोघं जेऊन निघेपर्यंत घड्याळाचा काटा दहाच्या पुढे सरकला होता. पण आपल्याकडे लांब पल्ल्याची दणकट दमदार टेरॅनो असल्यामुळे फिकर नॉट. चाकण वगैरे भागात आज रस्त्याला ट्रॅफिक फारसं नव्हतं. वर्दळीचा भाग जाऊन मोकळा रस्ता मिळाला आणि माझ्या लक्षात आलं कि टेरॅनो नेहमीसारखी पळत नाहीये. थांबून बघितलं. डावीकडचं मागचं टायर पंक्चर होतं.
पंक्चर झालेलं टायर काढून स्टेपनी कशी लावायची हि मला फक्त थिअरी माहित होती. प्रत्यक्ष अनुभव नव्हता. रस्त्याला वर्दळ अतिशय तुरळक. वेळ साडे अकरा. टायर थोडं दबलं होतं पण गाडी पुढे जाऊ शकत होती. टेरॅनोच्या रुंद ट्यूबलेस टायर वर भरवसा ठेऊन नेहमीपेक्षा निम्म्या वेगात पुढे निघालो. रस्त्यातली सगळी पंक्चरची दुकानं बंद. जमेल तिथे चौकश्या करत पुढे जात होतो. दोन ठिकाणी पंक्चरच्या दुकानाबाहेर माणसाने पिऊन पडी टाकलेली. आमच्या विनंतीला झोपेतच नकार. एका पेट्रोल पंपावर दोघे जण होते ते आमच्या विनंती वरून स्टेपनी लाऊन द्यायला तयार झाले. ते दोघं आणि आम्ही दोघं अशा चौघांनी मिळून काम फत्ते केलं आणि पुढे निघालो.
संगमनेर जवळ शिवम सामील झाला तेव्हा अडीज वाजून गेले होते. आता स्वप्नील मागे जाऊन झोपला. शिवम आणि मी गप्पा सुरु केल्या. अखंड गप्पा चालू असतील तर ड्रायवरला झोप येत नाही. नाशिक जवळ स्वप्नील आमच्या गप्पात सामील झाला. कुठेही न थांबता साल्हेरवाडी गाठायचा आमचा विचार होता. नाशिक सोडून बरंच पुढे आलो होतो, आणि एका ठिकाणी एका सेकंदासाठी माझे डोळे बंद झाले. मग योग्य जागा बघून थांबलो. त्यावेळी साडेचार झाले असतील. मोबाईल मधे साडेपाचचा अलार्म लाऊन तिघेही झोपलो. साडेपाचचा अलार्म वाजल्यावर उठणे तिघांमधल्या एकालाही शक्य नव्हते. सहाचा अलार्म वाजला तेव्हाही तो बंद करून झोपलो. मी उठलो तेव्हा साडेसात वाजले होते. स्वप्नील आणि शिवम गाढ झोपलेले. गाडी चालू केली तेव्हा उठले.
जवळच एका ठिकाणी चहा पोहे करून पुढे निघालो. गुगल मॅप प्रमाणे इथून साल्हेरवाडी तीन तास. रस्ता मोकळा होता पण झोप न झाल्याने माझा थकवा काही जाईना. आणि गावातल्या छोट्या रस्त्यांवरून सुसाट जाणं धोकादायक ठरू शकतं. साल्हेरवाडीत पोहोचलो तेव्हा साडे नऊ झाले असतील. साल्हेर विजय दिवस सुरु झाला होता. आम्ही चार तास उशिरा पोहोचलो होतो. असो. घरी झोपून राहण्यापेक्षा इथे उशिरा पोहोचणे उत्तमच. सुनीलच्या हॉटेलात चहा पोहे करून, आवरून, टेरॅनो दिवसभराच्या विश्रांतीसाठी लाऊन दिली. रात्री तिघे जेवायला येतोय म्हणून स्वप्नीलने सुनीलला सांगितले. साल्हेरच्या दिशेने आम्ही पायगाडी सुरु केली. बरोबर तिघांसाठी पुरेसं पाणी आणि खाऊ होता.
सुरुवातीलाच स्वप्नील आणि शिवम ने सुसाट वेग पकडला. आज गावातील काही मुलं मुली साल्हेर चढाई करत होती. वेगात चढाई सुरु झाल्यावर माझा थकवा निघून गेला.
 |
पायऱ्या |
मागच्या साल्हेर स्वारीमुळे हि वाट आम्हाला आता ओळखीची वाटत होती. काही ठिकाणी पायऱ्या तर काही ठिकाणी डोंगरातून चढत गेलेली वाट. एका ठिकाणी दगडात कोरलेला गणपती पाहिला. पुढे दरवाजात पोहोचल्यावर दगडात कोरलेला शिलालेख पाहिला.
 |
साल्हेर विजय दिवसानिमित्त सजवलेलं प्रवेशद्वार |
ह्या भागात फार वेळ न घालवता वर चढाई सुरु ठेवली. साल्हेर विजय दिवसाचा इथला कार्यक्रम सकाळीच करून दुर्गवीर प्रतिष्ठानचे दुर्गप्रेमी इथून पुढे गेले होते.
माचीवर पोहोचल्यावर समोर सह्याद्रीचा प्रशस्त कॅनव्हास दिसायला लागला. सूर्याजी काकडेंची समाधी न शोधता पुढे चालत राहिलो. मागच्या वेळी ज्या जागा वेळ देऊन पाहिल्या होत्या त्या आम्हाला ह्या वेळी परत पाहायच्या नव्हत्या. आता आमचं लक्ष्य होतं बालेकिल्ल्यावर पोहोचून परशुरामांच्या पायाचे ठसे शोधून काढायचे.
एका ठिकाणी पहारेकर्यांना राहण्यासाठी खोदलेली देवडी आहे तिथे फोटो काढले. देवडीचे दार उभे अडीज फूट आणि आडवे पाच फूट खोदलेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने. तसेच जास्त वारा आत जाणार नाही. ह्या भागात रात्री थंडी आणि वारा अमाप असतो. देवडी आतमध्ये प्रशस्त आहे. देवडी म्हणजे गडाच्या पहारेकर्यांना रात्रीच्या निवाऱ्यासाठी केलेली व्यवस्था. बऱ्याच ठिकाणी किल्ल्याच्या प्रवेशद्वारात आतल्या बाजूला देवड्या असतात. इथे हि देवडी प्रवेशद्वाराजवळ नाही तर वाटेत एका ठिकाणी आहे.
 |
पहारेकर्यांना राहण्यासाठी खोदलेली देवडी ... प्रपोर्शन समजण्यासाठी स्वप्नील खोत समोर उभा आहे |
एकेक दरवाजे पार करत गेलो. शेवटच्या दरवाजात सावलीत खाद्य विश्रांती घेतली. आता इथून पुढे सावली अभावानेच. साल्हेरच्या बालेकिल्ल्याच्या परिसरात कुठेही मोठं झाड नाही. शेवटच्या दरवाजातून पठारावर पोहोचलो. यज्ञवेदिका, गंगासागर तलाव, बाकीची पाण्याची टाकं ह्या जागा पाहिल्या. मग बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. चढाईला सुरुवात करतोय तोच दुर्गवीर प्रतिष्ठानचे दुर्गप्रेमी इथे दिसले. त्यांना भेटलो. परशुरामांच्या पावलांचे ठसे नक्की कुठे आहेत ते ह्या दुर्गप्रेमींना माहिती होते. थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांनी बालेकिल्ल्याच्या दिशेने चढाई सुरु केली.
 |
बालेकिल्ला चढून जाताना ... समोर शिखरावर परशुराम मंदिर |
बालेकिल्ल्यावरच्या परशुराम मंदिराकडे न जाता उजवीकडे वाटेने चालत गेलो. थोडं पुढे गेल्यावर आम्ही ज्यांच्या शोधात इथपर्यंत आलो ते परशुरामांच्या पावलांचे ठसे सापडले.
 |
परशुरामांच्या पावलाच्या ठश्याशेजारी पाय ठेऊन फोटो काढला |
कातळात दोन ठसे समुद्र ज्या दिशेला आहे त्या दिशेकडे आहेत. हे परशुरामांच्या पावलांचेच आहेत ह्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हे खरे का खोटे ते तुमच्या मानण्या न मानण्यावर आहे. पलीकडच्या डोंगरावरचं भलंमोठं नेढं इथून दिसतं. नेढं म्हणजे डोंगरात पडलेलं भलंमोठं भोक. सह्याद्रीच्या ह्या माथ्यावर परशुरामांचं वास्तव्य होतं. इथून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकणची सम्रुद्ध भूमी बनवली अशी आख्यायिका आहे.
दोन पावलांमधलं अंतर बरंच जास्त आहे. असं म्हणतात कि पूर्वीच्या काळी माणसांची सरासरी उंची आठ फूट होती. सध्या ती पाच ते सहा फूट आहे. जेव्हा कलियुगाचा शेवट होईल तेव्हा ती चार फूट असेल.
 |
दोन ठश्यांमध्ये अंतर किती आहे ते समजण्यासाठी स्वप्नीलला इथे उभा करून फोटो घेतला
डावीकडे लांबवर परशुराम मंदिर |
आतुरतेने ज्याचा शोध घेतला ते सापडले. आमच्या साल्हेर स्वारीचा हा भाग यशस्वीरीत्या पूर्ण झाला. दुर्गवीर प्रतिष्ठानचे तीन दुर्गप्रेमी इथून पुढे गेले होते त्या दिशेने निघालो.
 |
खालच्या साल्हेरवाडी पासून साल्हेरच्या बालेकिल्ल्यावरच्या परशुराम मंदिरापर्यंतची उंची एका फ्रेम मधे टिपण्याचा प्रयत्न |
इथून साल्हेरच्या अजस्त्र कड्याचे आणि लांबवर पसरलेल्या सह्याद्रीचे दृश्य जे पाहिले ते जमेल तितके डोळ्यात साठवून घेतले. ह्या अफाट उत्तुंग अशा जागा शब्दात वर्णन करणे अवघड. त्या डोळ्यात साठवून ठेवण्याचा योग मिळाला हे आमचे परमभाग्य. कुठेतरी काहीतरी कनेक्शन असतेच.
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनी इथल्या माचीवर भलामोठा भगवा नुकताच लावलेला. त्यांचे फोटो काढले.
 |
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींचा नुकत्याच लावलेल्या भगव्या सोबत फोटो |
साल्हेर विजय दिवसानिमित्त दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनी आज गडावर अनेक ठिकाणी भगवे लावले. सकाळी पूजा केली. कशासाठी? जिथे स्वतः चढून येताना जीव मेटाकुटीला येतोय तिथे जड बांबू, पूजेचं सामान, झेंडे, वगैरे बरोबर आणायचं, गडाची पूजा करायची, योग्य जागा पाहून झेंडे रोवायचे, हे माहिती असतानाही कि माकडं आणि वारा त्यांना फार दिवस पाहू देणार नाहीत. ह्या सगळ्यातून स्वतःला उत्पन्न काहीही नाही. पदरचे पैसे खर्च करून हा सगळा उद्योग करायचा. कशासाठी? मला भूतानच्या राजधानी थिंफू मधल्या नॅशनल लायब्ररी मधली एक भिंत आठवली.
A NATION STAYS ALIVE WHEN ITS CULTURE STAYS ALIVE
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
आणि काय आहे साल्हेर विजय दिवस? जाणून घेण्यासाठी आपल्याला १६७१ सालात जावं लागेल. सुरत लुटल्यानंतर १६७१ साली महाराजांच्या मराठी सैन्याने मोरोपंत पेशव्यांच्या नेतृत्वाखाली साल्हेर जिंकून घेतला. जेधे शकावलीत पुढील प्रमाणे नोंद आहे.
पौष मासी सालेरी भेदें करून घेतली.
मराठी सैन्याच्या विजयवार्ता एकामागोमाग एक दिल्लीला पोहोचत होत्या. सुरत लुटली. बुऱ्हाणपूर लुटले. साल्हेर आणि परिसरातले सर्व किल्ले घेतले. खान्देश, बागलाण, गुजराथ, वऱ्हाडदेश बांधीत चालले. हे ऐकून औरंगजेब विलक्षण अस्वथ झाला. त्याची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चालली. त्याने १६७१ च्या ऑक्टोबर महिन्यात दिलेरखान व बहादूरखान कोकलताश यांना नाशिक प्रांताकडे रवाना केले. मराठ्यांनी जिंकून घेतलेला मुलुख आणि किल्ले परत मुघल साम्राज्यात आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. मुघलांना कशाचीच कमी नव्हती. नामवंत सरदार, अफाट सैन्यबळ, आणि जोडीला अमाप पैसे. त्यामुळे अडचण कशाचीच नव्हती. पावसाळा संपताच औरंगजेबाच्या आज्ञेनुसार बहादूरखान कोकलताश दिलेरखानासह सुरतेहून निघाला. दिलेरखानाशिवाय इखलासखान मियाना, मुहकमसिंग चंद्रावत, राव अमरसिंग चंद्रावत, राय मकरंद असे मातब्बर सरदारही साल्हेरवर चालून जाण्यासाठी बहादुरखानाच्या फौजेत दाखल झाले. एकूण फौज अंदाजे ४०,०००. दिलेरखान व बहादूरखान यांच्या फौजेने साल्हेरला वेढा घातला. साल्हेर हा आकारमानाने प्रचंड मोठा गड.
मोगलांनी स्वराज्यावर प्रलयासारखी फौज सोडल्याची खबर महाराजांना समजली. मोरोपंत पेशवे व सरनौबत प्रतापराव गुजर या दोघांना त्यांनी साल्हेरवर जाण्याची आज्ञा केली. मोतोपंत या वेळेस कोकणात होते. ते सैन्यासह साल्हेरच्या दिशेने निघाले. दुसरीकडे सरसेनापती प्रतापराव गुजर हे घोडदळासह नगर-औरंगाबादच्या बाजूला मोहिमेवर होते. त्यांनाही साल्हेरच्या वेढयासंबंधी हुकूम मिळाला आणि तेही सैन्यासह साल्हेरच्या दिशेने निघाले.
साल्हेर गावाला जी
घनघोर लढाई झाली तिचे वर्णन सभासद बखरीत वाचायला मिळते ते खालीलप्रमाणे.
एक तर्फेनें लष्करांनी घोडी घातलीं. एक तर्फेने मावळे लोक शिरले. आणि मारामारी
केली. मोठें युद्ध जाहालें. चार प्रहर दिवस युद्ध जाहालें मोंगल, पठाण, रजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटें आराबा घालून युद्ध जाहालें.
युद्ध होतांच पृथ्वीचा धूराळा असा उडाला कीं, तीन कोश औरसचौरस आपलें व
परकें माणूस दिसत नव्हतें. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस
मुर्दा जाहालें.
घोडीं, उंट, हत्ती, [यांस] गणना नाहीं. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे
चिखल जाहाले त्यामध्यें रुतों लागलें. असा कर्दम जाहाला. मारतां मारतां
घोडे जिवंत उरले नाहींत. जे जिवंत सापडले ते साहा हजार घोडे राजियाकडे
गणतीस लागले. सवाशें हत्ती सांपडले. साहा हजार उंटें सांपडली. मालमत्ता
खजीना, जडजवाहीर, कापड, अगणित बिछाईत हातास लागली. बेवीस वजीर नामांकित
धरले. खास इखलासखान व बेलोलखान पाडाव जाले. ऐसा कुल सुभा बुडविला. हजार
दोन हजार सडे सडे पळाले. असें युद्ध जालें. त्या युद्धांत प्रतापराव
सरनोबत व आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रुपाजी भोंसले व सूर्यराव कांकडे,
शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदाजी जगताप व संताजी जगताप व मानाजी
मोरे व विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ व मुकुंद बल्लाळ, वरकड बाजे वजीर, उमराव
असे यांणी व सरदारांनीं कस्त केली. तसेंच मावळे लोक यांणी व सरदारांनीं
कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत या उभयतांनीं आंगीजणी
केली. आणि युद्ध करितां सूर्यराव कांकडे पंचहजारी मोठा लष्करी धारकरी,
याणे युद्ध थोर केलें. ते समयीं जंबूरियाचा गोळा लागून पडला. सूर्यराव
म्हणजे सामान्य योद्धा नव्हे. भारतीं जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा
असा शूर पडला. वरकडही नामांकित शूर पडले. असें युद्ध होऊन फत्ते जाहाली.
मराठ्यांच्या इतिहासात साल्हेरच्या रणसंग्रामाला अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या लढाईत मराठांच्या लष्कराची सुसूत्रता आणि सुनियंत्रण वाखाणण्यासारखे होते. मोरोपंत पेशवे व सेनापती प्रतापराव गुजर यांनी आपल्या हाताशी असलेल्या पायदळाचा व घोडदळाचा योग्य पद्धतीने वापर करून घवघवीत यश संपादन केले. शिवराज्याभिषेकापूर्वी झालेली हि सर्वात मोठी आणि तितकीच महत्वाची लढाई होती. मुघलांच्या पराभवामुळे त्यांचा दरारा नाहीसा झाला. तीन चार मुघल सरदार त्यांच्या फौजेनिशी एकत्र येऊनसुद्धा आपण त्यांचा पराभव करू शकतो, गनिमी काव्याच्या युद्धतंत्राबरोबच आपण खुल्या रणांगणात देखील मुघलांच्या प्रचंड फौजांचा दारुण पराभव करू शकतो, असा जबरदस्त आत्मविश्वास साल्हेरच्या युद्धामुळे मराठ्यांच्या मनात कायमचा रुजला. साल्हेरचा रणसंग्राम ज्या दिवशी घडला तो ५ जानेवारी साल्हेर विजय दिवस.
 |
सह्याद्री मस्तक ... दुर्ग साल्हेर |
परशुराम मंदिराजवळ आम्ही पोहोचलो तेव्हा दुर्गवीर प्रतिष्ठानचे दुर्गप्रेमी एक मोठा भगवा फडकवत होते. इथे थोडा वेळ बसून सभोवतालचा भव्य कॅनव्हास जमेल तेवढा डोळ्यात साठवला.
सहा वाटांचा हेर तो दुर्ग साल्हेर. समुद्र सपाटीपासून उंची १६४८ मीटर. महाराष्टातील सर्वात उंच किल्ला. तसेच महाराष्टातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर. पहिला मान कळसूबाईचा.
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींचा निरोप घेऊन आम्ही उतरायला सुरुवात केली. आता आमचं पुढचं लक्ष्य होतं साल्हेर आणि सालोटा किल्ल्यांच्या मधल्या घळीत उतरून जायचं, आणि तिथून सालोटा सर करायचा. परशुराम मंदिरापासून लांबवर दिसणाऱ्या दरवाजाच्या दिशेने उतरायला सुरुवात
केली. उतरताना माझा वेग कमी होतो. आणि रात्रभर गाडी चालवली असेल तर अजून थोडा कमी. स्वप्नील आणि शिवम पुढे गेले.
वेळ वाचवायला आम्ही हा शॉर्ट कट घेतला. पण इथे उतार बराच मोठा. पायवाटेवरून उतरायला गेलं तर सुट्या मातीवर घसरायला होत होतं. गवतात घुसलं तर कुसळं मोज्यातून पायाला टोचायची. त्यातल्या त्यात जिथे कमी त्रासाची जागा दिसेल तिथून उतरत जायचं.
प्रिंसिपल ऑफ लीस्ट एफर्ट. दुसरं काय.
 |
परशुराम मंदिरापासून उतरत जाताना |
उतरून गेल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूची वाट बघितली, जी घेऊन मागच्या साल्हेर स्वारीत आम्ही त्या दिशेला पर्वताच्या कड्यावर वाट संपेपर्यंत गेलो होतो. माझ्या आधी उतरून आलेले स्वप्नील आणि शिवम दरवाजात बसले होते.
 |
सह्याद्रीचा अफाट नजारा न्याहाळत दरवाजात बसलेले स्वप्नील आणि शिवम |
मागच्या साल्हेर स्वारीत आम्ही इकडून उतरून शेवटच्या दरवाजा पर्यंत गेलो होतो. त्यावेळी पाहिलं ते सगळं परत एकदा पाहत होतो. दगडात कोरलेले शिलालेख, पर्वताच्या कड्यात खोदलेली प्रशस्त वाट, बाजूच्या अनेक खोदीव गुहा, पाण्याची टाकं, दरवाजातून दिसलेला सालोटा.
शेवटच्या दरवाजात खाद्य विश्रांती घेतली. स्वप्नील पुढे जाऊन बघून आला सालोटा चढायला वाट कुठून आहे ते. दगडात खोदलेल्या पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे पोहोचायला एक ठरलेली वाट अशी नाही. अनेक ढोरवाटा वाकड्या तिकड्या जातात.
अडीज वाजत होते. नव्या दमाने पुढे वाटचाल सुरु केली.
 |
फारसी भाषेतला शिलालेख |
दरवाजाजवळ फारसी भाषेतला शिलालेख दिसला त्याचा फोटो घेतला.
खिंडीपर्यंतचा हा टप्पा आम्ही तिघांनी वेळ न घालवता जमेल तेवढा लवकर पार केला.
 |
खिंडीच्या दिशेने उतरत जाताना |
बागलाणात पाऊस तुफान कोसळतो म्हणे. पण हा भाग कोकणासारखा झाडा फळांनी समृद्ध नाही.
छोटी काटेरी झुडुपं आणि त्यांना काटेरी गोंड्याची फुलं सकाळपासून बऱ्याच ठिकाणी दिसली. ह्याचे अनेक औषधी उपयोग आहेत.
 |
काटे चेंडू |
ता. क. हा फोटो मी थोबाडपुस्तकातल्या Indian Flora ह्या ग्रुप मध्ये चिकटवला होता. काही महिन्यांनी त्या फोटोवर टिप्पणी आली कि हे Indian Globe Thistle म्हणजे Echinops echinatus नसून Echinops sphaerocephalus आहे.
माझ्या अपुऱ्या माहितीप्रमाणे मला हे Indian Globe Thistle वाटले होते.
Common name = Indian Globe Thistle
मराठी = उत्काटर, काटे चेंडू
Botanical name = Echinops echinatus
Indian Flora ह्या ग्रुप मधल्या तज्ञ व्यक्तींच्या म्हणण्यानुसार Echinops sphaerocephalus हे भारतात आधी आढळत नव्हते, पण आता काही ठिकाणी दिसायला लागले आहे. जे काय असेल ते असेल. हा विषय सध्या तरी माझ्या डोक्यावरून जातोय. आमच्या ह्या उद्योगातून भारतीय वनस्पतीशास्त्राला जर काही थोडेफार योगदान झाले तर म्हणजे दहाव्या क्रमांकावर खेळायला येऊन मणिंदर सिंग ने षटकार मारला कि हो.
फार वेळ न घालवता मधल्या खिंडीत पोहोचलो. खिंडीतून सालोट्याकडे जाणारी वाट पकडली. शिवम आणि माझी हि पहिलीच सालोटा स्वारी. स्वप्नीलने अर्धा डझन सालोटा स्वाऱ्या केलेल्या आत्तापर्यंत. तो पुढे वाट शोधायला, आणि त्याच्या मागून शिवम आणि मी. इथे डोंगराच्या उतरणीत एकमेकाला समांतर जाणाऱ्या अनेक छोट्या वाटा. सगळ्या एक पाऊल रुंदीच्या. "गलतिकी कोई भी गुंजाईश नही" असं चालायला शिकवणाऱ्या.
आणि गडबड झालीच. शोधता शोधता पायऱ्या सुरु होतात त्याच्या बरंच पुढे गेलो. आता आम्हाला डोंगराच्या डावीकडे आणि वरच्या बाजूला जावं लागणार होतं. तिकडे पायऱ्यांच्या दिशेने उतरत्या डोंगरात जागा मिळेल तिथून चढाई सुरु केली. इथे आम्ही एक तिरकस उताराचा धबधबा चढून वर गेलो. शिवम आणि स्वप्नील कुठल्याही अवघड जागा पटापट चढून जातात. मी स्वप्नीलच्या मदतीने धबधब्याची चढाई पूर्ण केली. पूर्ण वर गेल्यावर मागे वळून फोटो काढला, कुठच्या धबधब्यातून चढून वर आलोय ते.
 |
आयुष्याच्या एखाद्या अवघड वळणावर जेव्हा नभ दाटून येतील तेव्हा हा धबधबा पुन्हा एकदा पाहीन
कठीण प्रसंगातून कसं पार पडायचं त्याचं स्मरण करण्यासाठी |
धबधबा चढून आल्यानंतर पुढची अरुंद वाट आता सोपी वाटत होती.
 |
अरुंद वाट चढून जाताना ... शिवमच्या कॅमेऱ्यातून |
धबधब्या नंतरच्या अरुंद वाटेने पंधरा मिनिटं पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पायऱ्या लागल्या. एकेक पायरी गुढग्या एवढ्या उंचीची. काही असो. त्या एक पाऊल रुंदीच्या ढोरवाटांपेक्षा पायऱ्या कितीतरी बऱ्या. आणि धबधबा काही मी विसरणार नाही.
 |
दगडात खोदलेल्या पायऱ्या |
इथे कातळकडा खोदून पायऱ्या बनवलेल्या.
 |
सालोट्याच्या पायऱ्या चढून जाताना
डावीकडे लांबवर सह्याद्री मस्तक दुर्ग साल्हेर |
पायऱ्या सुरु झाल्यापासून दहा मिनिटात सालोट्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो. दरवाजाच्या आतल्या बाजूला छोट्या मोठ्या दगडांचा खच पडलेला. दगड घालून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न. कोण करणार? हे टोपीकरांचं काम असणार, १८१८ सालचं.
 |
सालोट्याचा पहिला दरवाजा |
१८१८ साली महाराष्ट्रातील किल्ले जिंकून घेतल्यावर इंग्रजांनी बहुतेक सर्व किल्ल्यांवर जाणीवपूर्वक विध्वंस केला. कित्येक वाडे, इमारती नष्ट केल्या. सुरुंग लाऊन गडावर जायच्या पायऱ्या अनेक ठिकाणी तोडल्या. गडांवर कोणी जाणार नाही अशी व्यवस्था जमेल तितकी केली. कारण? हे गड किल्ले हि इथल्या जनतेची स्फूर्तिस्थानं आहेत, शक्तिस्थानं आहेत, हे टोपीकर ओळखून होते. इथल्या जनतेवर दीर्घकाळ राज्य करायचं असेल तर ह्यांना आपल्यापेक्षा कधीच वरचढ होऊ द्यायचे नाही, आणि त्यासाठी लागेल ती सगळी तजवीज करायची, ह्या नीतीचाच एक भाग म्हणजे इथल्या जनतेची स्फूर्तिस्थानं, शक्तिस्थानं जमेल तेवढी नष्ट करायची.
 |
सालोट्याचा दुसरा दरवाजा |
दुसऱ्या दरवाजातून पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या खोल्या आहेत. इथे आमची एक छोटी विश्रांती. बसायला आरामदायक जागा आणि समोर नजर जाईल तिथपर्यंत बागलाणातल्या छोट्या मोठ्या डोंगरांचा अफाट पसारा. स्वप्नीलच्या भाषेत हि सालोट्याची बाल्कनी.
डोंगराला वळसा घालत थोडं पुढे गेल्यावर समोर डोंगराची एक सोंड खालपर्यंत उतरत गेलेली. वाघांबे गावातून साल्हेर आणि सालोट्याच्या मधल्या खिंडीत येणारी वाट ह्या डोंगराच्या सोंडेवरून वर येते.
 |
सालोट्यावरून पहाताना ... डोंगराच्या सोंडेवरून वाघांबे गावात जाणारी वाट
दूरवर डोलबारी पर्वतरांगेतली शिखरं |
डोंगराचा वळसा पूर्ण करून पलीकडच्या बाजूला गेल्यावर आम्ही पोहोचलो सालोट्याच्या तिसरा दरवाजा समोर.
 |
सालोट्याचा तिसरा दरवाजा |
तीनही दरवाजे अप्रतिम घडवलेले आहेत. तिसऱ्या दरवाजातून पलीकडे गेल्यावर गवताळ पठार, आणि त्याच्या मधे बालेकिल्ला.
 |
सालोट्यावरची गवतातून गेलेली वाट |
इथे वर्दळ अशी नाहीच. त्यामुळे सगळीकडे गुढगाभर उंचीचं गवत वाढलेलं. वाटेशेजारी एका ठिकाणी हनुमान मंदिर. चौकोनी आकारात दगड रचून त्यांच्यामध्ये हनुमानाची मूर्ती.
 |
विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे |
ह्या वाटेने पुढे जात जात बालेकिल्ल्यावर पोहोचलो. चहूकडे बागलाणातले छोटे मोठे डोंगर. सगळ्यात मोठा बाजूचा साल्हेर. सालोट्याच्या बालेकिल्ल्यावरून पाहताना साल्हेर त्याच आकाराचा दिसतो ज्या आकाराचा साल्हेर वरून सालोटा दिसतो. प्रत्यक्षात दोघांचे आकार वेगवेगळे आहेत.
 |
सालोट्याच्या बालेकिल्ल्यावरून पाहताना ... समोर सालोट्याची आणि साल्हेरची सावली पडलेली |
उतरून जाताना आल्या वाटेने वळसा घालून जाण्यापेक्षा आम्ही एक शॉर्ट कट घेतला. हि वाट सुकलेल्या गवतामुळे आणि सुट्या मातीमुळे घसरडी, आणि तीव्र उताराची निघाली. स्वप्नील आणि शिवम पटापट उतरून गेले. मागून माझी गाडी धडपडत थोड्या वेळाने पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचली. आता आम्हाला अंधार पडण्याआधी वाघांबे गावात पोहोचायचे होते.
माझ्या आवडत्या पोज मधे फोटो काढण्यासाठी एक योग्य जागा दिसली तिथे बसून फोटो काढला.
 |
सालोटा किल्ला उतरताना एका ठिकाणी माझ्या आवडत्या पोज मधे फोटो
समोर साल्हेर (डावीकडे) आणि सालोट्याच्या (उजवीकडे) सावल्या दिसतायत |
आता तो मगाचचा धबधबा उतरून जावं लागतंय कि काय असा विचार माझ्या मनात डोकावत होता. पण आम्हाला योग्य ती वाट सापडली. धबधबा उतरायची वेळ आली नाही. मधल्या खिंडीतून सालोटा चढून जाताना योग्य वाट अचूक शोधणं भलतं अवघड आहे हे मागे वळून पाहताना लक्षात आले.
 |
सालोटा उतरून मधल्या खिंडीत जाताना |
मधल्या खिंडीत पोहोचल्यावर वाघांबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने पुढे निघालो.
इथे वाटेचा वीस एक मीटरचा टप्पा मला भलता अवघड गेला. एक पाऊल रुंद एवढीच वाट. डोंगरातल्या तिरक्या उतारावर कललेली. सुट्या मातीत पायाची पकड घट्ट बसेना. आधाराला हात टेकवण्याचीही सोय नाही. डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला डोंगर. नेमक्या अवघड ठिकाणी डाव्या बाजूला दरी आणि उजव्या बाजूला डोंगर आला कि मला अशा ठिकाणी उतरायला वेळ लागतो. एक एक पाय पुढे सरकवत मी हा टप्पा पार केला.
पुढे डोंगराच्या सोंडेवरून जाणारी वाट सोपी आहे. कितीतरी वेळ झाला तरी आम्ही उतरतच होतो. हि वाट संपून वाघांबे गाव काही येईना. अंधार झाला. मग मी हेड टॉर्च बाहेर काढला.
वाघांबे गावातल्या डांबरी रस्त्याला लागलो तेव्हा मिट्ट अंधार झाला होता. आता आम्हाला इथून साल्हेरवाडी गावात जायचं होतं. रस्त्याला रहदारी नसल्यातच जमा. साल्हेरवाडी गावात मोबाईलला रेंज येत नाही. त्यामुळे तिकडे सुनीलला फोन करून आमची जाण्याची काही व्यवस्था करता येणं शक्य नव्हतं. साल्हेरवाडी पर्यंत जायची सोय झाली तर मी पुढे जाऊन टेरॅनो घेऊन यायची असा आमचा विचार होता. साल्हेरवाडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. दमलो तर होतो पण ऑप्शन नव्हता. जे दोन चार दुचाकीस्वार मागून आले ते सगळे डबल सीट नाहीतर ट्रिपल सीट.
तिघेही भरभर चालत होतो. किती चाललो तरी साल्हेरवाडी काही येईना. शेवटी एक छोटा ब्रेक घ्यायचं ठरवलं. ब्रेक नंतर हळू चालत जाऊ असं मी सुचवलं. स्वप्नील आणि शिवम दोघांनीही हा प्रस्ताव स्वीकारला.
जीवनाची वाट वेडी ती कधी ना संपते!
थांबतो थोडा प्रवासी वाट कुठली थांबते?
दूरवर साल्हेरवाडीतले लाईट दिसायला लागले. तरी चालतच होतो. साल्हेरवाडीत पोहोचलो तेव्हा तिघेही शांतपणे खुर्च्यात जाऊन बसलो. मी चार ग्लास लिंबू सरबत प्यायलो. स्वप्नील आणि शिवम प्रत्येकी तीन ग्लास. तेव्हा थकवा दूर झाला.
घरी जाऊन नंतर गुगल मॅप मधे बघितलं तर साल्हेर आणि सालोट्याच्या मधल्या घळीतून वाघांबे गावातल्या डांबरी रस्त्यापर्यंत अंतर तीन किलोमीटर. डोंगर उतरायला एक तास. तिथून साल्हेरवाडीतल्या सुनीलच्या हॉटेल पर्यंत अंतर सहा किलोमीटर. चालत एक तास पंधरा मिनिटे.
गप्पा टप्पा, जेवणं करून झोपायची तयारी करायला अकरा वाजले. थंडी म्हणजे नक्की काय ते पुण्यात राहून समजणं अशक्य. जर कोणी पुण्यात राहून थंडी समजण्याचा दावा करत असेल तर त्यांना पाठवून द्या इकडे बागलाणात.
प्रत्येक पायात दोन मोजे. अंगात थर्मल आणि त्यावर जॅकेट. पांघरायला मी नेलेली चादर आणि सुनीलने दिलेली रजई. अशा जय्यत तयारीनिशी झोपलो.
शिवमची सकाळ माझ्या आधी झालेली. स्वप्नील अजून निद्रादेवीच्या अधीन. शिवम आणि मी जवळपास एक फेरफटका मारायला निघालो. साल्हेरवाडी गावाजवळच्या शेतांमधून साल्हेर आणि सालोटा किल्ल्यांचे सुंदर फोटो मिळाले.
 |
साल्हेरवाडी गावाजवळच्या शेतातून पाहिलेला साल्हेर किल्ला |
एका शेतातून दुसऱ्या असं मनसोक्त फिरलो. मोज्यातून पायाला कुसळं टोचली.
 |
साल्हेरवाडी गावाजवळच्या शेतातून पाहिलेले साल्हेर (डावीकडचा) आणि सालोटा (उजवीकडचा) किल्ले |
दोन दिवसात साल्हेर सालोटा मोरा हरगड हे चार किल्ले, अशी धावती भेट मला आवडत नाही. बागलाणातले किल्ले हा वेळ देऊन पाहायचा भाग आहे.
 |
रस्त्यात दिसलेल्या फलकांचे फोटो काढणे हा माझा आवडता उद्योग |
फेरफटका संपवून सुनीलच्या हॉटेलात परतलो तेव्हा स्वप्नील उठला होता. हा प्राणी सावकाश जेवतो. झोपतो असा कि बाजूला आग लावली तरी उठणार नाही. मात्र ह्याला डोंगर दऱ्यात, कड्या कपारीत मोकळा सोडा, मग ह्याच्यासम हाच. महाराष्ट्रातला कुठलाही किल्ला मला माहिती नाहीये जिथे हा गेलेला नाही. सह्याद्रीतला इतिहास आणि भूगोल तर ह्याचा इतका पक्का आहे कि ह्याला कुठेही कसेही कधीही शंभर पैकी दीडशे मार्क. किल्ले नसलेल्या डोंगरांनाही नावं असतात हे मला माहिती होतं. पण अखंड सह्याद्रीत कुठेही उभं केलं तरी आजूबाजूला दिसणारा प्रत्येक किल्ला आणि प्रत्येक डोंगर बघताचक्षणी ओळखणारा आणि त्यांची नावं सांगणारा हा माझ्या माहितीतील एकमेव, the one and only स्वप्नील खोत.
चहा पोहे करून, आवरून, सुनील आणि अनिल दादांचा आम्ही निरोप घेतला. आलियाबादचं
प्राचीन महादेव मंदिर बघून मग रामशेज स्वारी करावी असा आजचा बेत ठरवला.
कालच्या तुलनेत आमचा आजचा बेत आरामात भ्रमंती करण्याचा होता. त्यामुळे आता मनसोक्त फोटोग्राफी सुरु झाली.
 |
हॉटेलं चिकार पाहिली असतील तुम्ही ... हॉटेल चिकार पाहीलंयत का |
आलियाबादचं प्राचीन महादेव मंदिर साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलेलं आहे.
 |
आलियाबादच्या प्राचीन महादेव मंदिराचं नक्षीकाम |
महादेव मंदिराच्या बाजूला शाळा आणि शाळेसमोर छोटं पटांगण. सहज लक्ष गेलं तर काही वेगळ्या आकाराच्या वीरगळी दिसल्या. बागलाणातले स्थानिक निवासी त्यांच्या मृतांच्या स्मरणार्थ वीरगळींसारख्या शिळा उभ्या करतात.
 |
बागलाणातल्या स्थानिक निवास्यांनी त्यांच्या मृतांच्या स्मरणार्थ उभी केलेली वीरगळीसारखी शिळा |
काही जण त्यांच्या मृताच्या स्मरणार्थ “शिणोली” उभी करतात. हा साधारण तीन ते चार फूट उंचीचा कोरीव काम केलेला लाकडी खांब असतो. या खांबाचा आकार, उंची, आणि नक्षीकाम मृताच्या सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे असते. एक शिणोलीही इथे होती. शेंदूर फासलेली.
बागलाणात वीरगळींचे इतर प्रकारही सापडतात जे मला इतरत्र कुठे दिसले नाहीयेत.
जमिनीखाली सरपटणारा प्राणी (साप किंवा नाग), जमिनीवर हिंस्त्र प्राणी (वाघ किंवा चित्ता), आकाशात पक्षी आणि सूर्य चंद्र अशा पण वीरगळी असतात. इथली स्थानिक जनता निसर्गालाच देव मानते. निसर्गाची पूजा करण्याचा हा एक भाग. मागच्या वर्षी सापुताऱ्याला जाताना असे निसर्गदेवतेची आराधना करणारे कोरीव दगड आणि वीरगळींचे इतर प्रकार आम्ही बागलाणात पाहिले.
 |
मागच्या वर्षी सापुताऱ्याला जाताना पाहिलेला एक निसर्गदेवतेची आराधना करणारा कोरीव दगड |
नंतर एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक खोदलेलं पाण्याचं टाकं आणि तिथे अशीच निसर्ग देवतेची पूजा केलेली. रस्त्यातले अशी सगळी ठिकाणं पाहात, फोटोग्राफी करत पुढे जात होतो.
 |
वाकेन पण मोडणार नाही |
 |
One’s destination is never a place, but a new way of seeing things. -- Henry Miller |
 |
डोंगरातला खंडोबा |
नाशिक जवळच्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजत होते. रामशेज किल्ला आकाराने आणि उंचीने छोटासा. किल्ल्यावर पाहण्यासारखं म्हटलं तर फार काही नाही. हा किल्ला ऐतिहासिक दृष्टीने पाहावा लागतो. कसा ते
इथे पहा.
Kamaaaaallll 😍😍👌👌
ReplyDeleteNice blog sir.. next week mde amhi salherla challo ahot.. Suryaji kakdenchi samadhi exact kuthe ahe? 3rd darvajyanntr kuthe shodhavi lagel.. Plz detail
ReplyDeleteनमस्कार,
Deleteसाल्हेरवाडी गावातून जाताना तीन दरवाजे पार केल्यावर सपाट माची वरून जाणारी वाट आहे बराच वेळ. तिसरा दरवाजा पार केल्यानंतर ह्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर अंदाजे पाच मिनिटांनी डाव्या बाजूला वाटेपासून काही अंतरावर सूर्याजी काकडे यांची समाधी आहे. शोधावी लागते. exact location सांगता येत नाही.
Good luck to you. See photo in this blog of mine - https://ysawant.blogspot.com/2018/06/blog-post_21.html