आजचा निबंध आहे माझा आवडता किल्ला - तिकोना.
तुम्ही कॉलेज बुडवून सिंहगडला गेलायत का? गेला नसाल तर तो एक वेगळा विषय आहे. आणि ऑफिस बुडवून तिकोनाला? कशी वाटली आयडिया?
आज पहाटे ४:४५ ला उठून दुर्गा टेकडी वर १ तास हिल रनिंग झकास झाले. नवरात्रीमुळे बऱ्यापैकी वर्दळ होती. थोडंफार धुकं पण होतं.
ऑफिसला न जाता माझ्या आवडत्या तिकोना किल्ल्याला जायचं ठरवलं. हा माझ्या घरापासूनचा सगळ्यात जवळचा किल्ला आहे. फारशी गर्दी नसते. त्यामुळे कचरा पण नाही. चढायला सोपा. बालेकिल्ल्यावरून चहुबाजूंचे विहंगम दृश्य दिसते.
इंद्रवज्र दिसण्याइतका मी अजून भाग्यवान नाही. आम्हाला एकदा धुक्यात पडलेली आमचीच सावली दिसलीये. अर्ध्या दिवसात तिकोनाची मस्त भटकंती होते. भल्या पहाटे गेलो आणि वेळ असेल, तर वाटेत बेडसे लेण्यांसमोरून सूर्योदय पाहण्याचा स्टॉपही भारी होतो.
हौशी आणि नवख्या ट्रेकर्ससाठी सावधानतेचा इशारा - परिसराची योग्य माहिती करून घेतल्याशिवाय आणि काटेकोर प्लॅन बनवल्याशिवाय एकट्याने गिरिभ्रमण (solo trek) करणे धोक्याचे ठरू शकते. साहसाला सावधतेची जोड असावी.
घरून निघालो तेव्हा १० वाजून गेले होते. जुन्या मुंबई-पुणे रस्त्याचे सकाळचे mixed veg ट्रॅफिक कामशेत पर्यंत भरभरून खाल्ले. Mixed veg म्हणजे पायी चालणार्यांपासून २० चाकी ट्रेलरपर्यंत सर्व काही असते त्यात. कामशेतला लेफ्ट टर्न घेतल्यानंतर ट्रॅफिक हळूहळू कमी होत गेले. घरून निघाल्यापासून दीड तासात तिकोना पेठ ह्या पायथ्याच्या गावी पोहोचलो. खिंडीत गाडी पार्क केली.
ह्याच्या विशिष्ट आकारामुळे तिकोना उर्फ वितंडगड दुरूनही ओळखू येतो. त्रिकोणी आकाराच्या डोंगरावर आणखी एक छोटा त्रिकोण बसवलेला.
 |
पायथ्याच्या तिकोना पेठ गावामधून दिसणारा तिकोना किल्ला |
पाऊस नुकताच संपत आलाय. त्यामुळे झाडोरा भरपूर असणार. नेहमीच्या वाटेनेच
जायचे ठरवले. ह्या दिवसात वहिवाट सोडू नये. नव्या वाटा आणि परिसर
धुंडाळायला उन्हाळा चांगला. खिंडीपासून आल्या रस्त्याने चालत गेलो जिथून
किल्ल्यावर जायची वाट सुरु होते.
 |
रस्त्याच्या कडेला अधेमधे बहरलेली रानफुले |
सुरुवातीचा चढ संपल्यावर चौकात पोहोचलो. चौकात म्हणजे ह्या ठिकाणी चार वाटा येऊन मिळतात. म्हणून मी ह्याला चौक म्हणतो. चढून आल्यानंतर किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडे वळावे. डावीकडची वाट झाडोऱ्यानी भरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून घळीत उतरते, जिथे मी गाडी पार्क केली. चौकातून सरळ गेलो तर डोंगराच्या कडेने गेलेली वाट सातवाहन कालीन गुहांपर्यंत पोहोचवते. ही गुहांपर्यंत जाणारी वाट गच्च झाडोऱ्यानी भरलेली होती. इकडे उन्हाळ्यातच जाणे बरे. मी उजवीकडची किल्ल्यावर जाणारी वाट पकडली.
चौकापासून दोनच मिनिटात एक प्राचीन काळची चेकपोस्ट लागते. गडावर जाणाऱ्या वाटेवरील पहिली तपासणीची जागा. आजूबाजूच्या परिसरातील निरोपांची गडावर देवाण घेवाण करण्याचे केंद्र. तसेच गडावरील होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण. सध्या फक्त दगडी चौथरे उरलेत.
 |
डोंगराच्या सोंडेवरून किल्ल्यावर जाणारी वाट |
डोंगराच्या पलीकडच्या बाजूने माकडांचा आवाज आला. ह्या सातवाहन कालीन गुहांच्या बाजूला घनदाट रान आहे.
पावसाळा संपून उन्हं पडू लागल्याने रानफुलांचा बहर जोमात होता. पहिल्या चेकपोस्ट पासून डोंराच्या धारेने चढत गेल्यावर दहा मिनिटात एका छोटेखानी पण अभेद्य भासणाऱ्या दरवाजापाशी पाशी पोहोचलो. निळ्या ड्रेसमधले श्री. मोहोळ आज स्वागताला हजर नव्हते. नेहमी हसतमुख चेहेऱ्याने स्वागत करून प्रत्येकाला गुळ-पाणी देणार.
 |
डोंगरात खोदून काढलेला दरवाजा |
डोंगरात खोदून काढलेल्या पहिल्या दरवाजापासून पाचच मिनिटात येतो गडाचा दुसरा वेताळ दरवाजा. दरवाजाच्या दोन्ही बाजूला छोटेखानी बुरुज. बुरुज व्यवस्थित आहेत, पण जागा मिळेल तशी झाडंझुडुपं वाढलेली.
 |
वेताळ दरवाजाच्या बाजूचे छोटेखानी बुरुज |
दरवाजातून आत गेल्यावर मोकळी जागा आहे. पहारेकर्यांच्या खोल्यांचे फक्त दगडी जोते शिल्लक आहेत. वेताळेश्वर मंदिराचे अवशेष म्हणजे जमिनीवरचे काही शेंदूर लावलेले दगड वगैरे. इथल्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण झालेलं दिसतंय ह्या वर्षी.
जवळच्या एखाद्या गावातली सात आठ पोरं किल्ल्यावरून बोंबलत खाली आली. शनिवार रविवारी येणारे पुण्या-मुंबई चे हौशी ट्रेकर्स आज नव्हते.
 |
हा बुरुज म्हणजे डोंगराच्या सोंडेवरून येणाऱ्या वाटेवर लक्ष्य ठेवण्यासाठी उत्तम जागा |
इथल्या आजच्या परिस्थितीवरून गतकाळचे वैभव ओळखणे अवघड आहे. वेताळ दरवाजापासून पुढे गेल्यावर पाच मिनिटात भेटला चपटदान मारुती. दगडात कोरलेली मारुतीची पंधरा फुटी मूर्ती. एका पायाखाली राक्षसाला दाबून त्याला चपट दान देणारा मारुती.
वरच्या बाजूला काही आवाज येत होते. काय आहे ते बघायला तिकडे गेलो. दोन्ही मोहोळ बंधू मिळून भर उन्हात श्रमदान करत होते. एका घराच्या जोत्याची डागडुजी.
पुढच्या पाच मिनिटात पोहोचलो ती जागा आहे श्रीरामाची गादी. इथे श्रीरामाचे मंदिर होते. परिसरातील राज्यकारभार चालवण्यासाठी सदर होती. श्रीरामाच्या पादुका गादीवर ठेऊन राज्यकारभार चालवला जात असे. आज दोन्ही वास्तु अस्तित्वात नाहीत. तसे राज्यकर्तेही अस्तित्वात नाहीत.
इथून पुढे डावीकडील पायऱ्यांची वाट बालेकिल्ल्यावर जाते. उजवीकडील वाटेने उतरून गेल्यावर महादरवाजा आहे. मी नेहमी आधी महादरवाजा बघून मग बालेकिल्ल्यावर जातो.
 |
बालेकिल्ल्यावर जाणारी डावीकडील पायऱ्यांची वाट
उजवीकडची वाट उतरून महादरवाजाकडे जाते |
महादरवाजाला जाणाऱ्या वाटेवर भरपूर झाडं आणि भरपूर सावली आहे. किल्ल्यावर येणारे बरेचजण महादरवाजापाशी येतच नाहीत. फक्त बालेकिल्ल्यावर जातात. पहिल्या वेळेस माझेही असेच झाले होते. आता बोर्ड लावल्यामुळे नव्याने येणाऱ्या गिरीप्रेमींना फायदा होत असेल.
 |
झाडांच्या सावलीत महादरवाजाकडे उतरत जाणारी वाट |
पाच मिनिटात महादरवाजापाशी पोहोचलो. इथे काही घरांची जोती, किल्ल्याचा मुख्य दरवाजा, आणि चोर दरवाजा आहेत. किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित आहे.
मुख्य दरवाजातून समोर पायथ्याचे तिकोना-पेठ गाव आणि मळवंडी धरणाचा जलाशय दिसतो. ह्यावर्षी पाऊस दमदार झाल्यामुळे परिसर हिरवागार, आणि मळवंडी धरणात पाणी भरभरून साठलेलं.
 |
किल्ल्याचा मुख्य दरवाजा |
जुन्या काळी हा मार्ग प्रचलित होता. सध्या इथून किल्ला उतरणे किंवा चढणे अशक्य. दरवाजाच्या बाहेर फक्त चार पायऱ्या आहेत. त्यांच्या पलीकडे गच्च झाडोरा आणि तीव्र उतार. कित्येक वर्षे वापरात नसल्याने वाट नाहीशी झालेली आहे.
 |
मुख्य दरवाजाच्या बाहेरचा गच्च झाडोरा
समोर पायथ्याचे तिकोना पेठ गाव आणि मळवंडी धरणाचा जलाशय |
उन्हाळ्यात झाडोरा नसताना मला इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसल्यायत.
मुख्य दरवाजाच्या बाजूला एक छोटासा चोर दरवाजा आहे. बहुदा पूर्वीच्या काळी लाकडी दार असावे.
 |
मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेला चोर दरवाजा |
इथून परतलो आलेल्या जागी - श्रीरामाची गादी. सध्या इथल्या गुहेत एक साधूबाबा वास्तव्यास आहेत.
आता पायऱ्यांच्या वाटेने बालेकिल्ल्यावर चढाई. भर दुपारच्या उन्हात झाडांच्या सावल्या मिळण्यासारखं सुख नाही.
 |
पायऱ्यांच्या वाटेने बालेकिल्ल्यावर चढाई |
पाच मिनिटात चुन्याच्या घाण्यापाशी पोहोचलो. पूर्वीच्या काळचे सिमेंट बनवण्याची हि जागा. इथे बनवलेल्या मिश्रणाचा उपयोग बांधकामात होत असे.
 |
चुन्याचा घाणा |
इथून पुढे तिकोना त्याचे अविष्कार दाखवायला सुरुवात करतो. सर्वप्रथम दिसतात खडकातल्या भल्यामोठ्या आणि तीव्र चढाच्या पायऱ्या आणि वर भक्कम बुरुज. पावसाच्या दिवसात पाण्यामुळे ह्या पायऱ्या जास्तच अवघड बनतात. कोण्या गिरीप्रेमी मित्रांनी लावलेल्या रोपची खूपच मदत होते.
 |
खडकातल्या भल्यामोठ्या आणि तीव्र चढाच्या पायऱ्या |
पायऱ्या चढून वर गेलो कि समोर येते भरभक्कम तटबंदी आणि त्यातला दरवाजा. दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक खडकात कोरलेलं भलंमोट्ठ पाण्याचं टाकं आणि त्याच्या वर राहण्यासाठी जागा. पाण्याच्या कुबट वासामुळे फार वेळ इथे थांबता येत नाही. पाणी ओलांडून पलीकडच्या जागेत कसं जायचं ते काही मला अजून उमगलं नाहीये.
 |
खडकात कोरलेलं पाण्याचं टाकं आणि वर राहण्यासाठी जागा |
तटबंदीतल्या दरवाजातून आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला आहे टेहळणीचा बुरुज. इथे एका बाजूने तुंग खुणावत राहतो. इकडे कधी येतोयस. का नेहमीप्रमाणे तिकोनावरूनच माघारी.
इथून वर जाण्यासाठी परत मोठमोठ्या तीव्र चढाच्या पायऱ्या. चढताना डाव्या बाजूला बांधलेला उंच बुरुज. कोण होता ह्या सगळ्याचा आर्किटेक्ट. कसं बांधलं असेल हे सगळं. PWD ला तासभर मुस्काडून काढण्यागत बांधकाम. आज शेकडो वर्षे सह्याद्रीतील सोलपटवणारे ऊन पाऊस झेलुनही त्याच आवेशात उभे.
 |
पायऱ्या चढून गेल्यावर मागे वळून पाहताना |
इथे खडकात खोदलेल्या काही गुहा आणि पाण्याची टाकं आहेत. सध्या गडावरील कुठल्याच टाक्यातले पाणी पिण्यायोग्य नाही.
इथला छोटेखानी पण अभेद्य भासणारा परिसर हा एक उत्तम टेहळणीचा किल्ला असल्याची साक्ष देतात.
 |
उंच बुरुज - टेहळणीसाठी उत्तम जागा |
शेवटच्या काही पायऱ्या चढून बालेकिल्ल्यावर पोहोचलो. तटबंदीच्या कडेकडेने चालत गेलो. एक छोटा साप तटबंदीवर ऊन खात पहुडला होता. मी तिथे पोहोचल्याचे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते. आणि माझ्याही. तो सुर्र्कन पळाल्यावर मला दिसला.
 |
तटबंदीतल्या खिडकीतून दिसणारा नजारा |
इथल्या आठ दहा उंच पायऱ्या चढून बालेकिल्ल्याच्या वरच्या भागात पोहोचलो. इथे त्रंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दगडी नंदी आणि एक शिवलिंग ठेवले आहे.
 |
मंदिरासमोरील नंदी आणि शिवलिंग |
कडेला एका घराचे जोते शिल्लक आहे. आज वारा पडलेला होता. त्यामुळे ऊन चांगलंच जाणवत होतं. पहिला पाणी ब्रेक थेट बालेकिल्ल्यावरच केला.
 |
बालेकिल्ल्यावरील घराचे जोते |
बालेकिल्ल्यावर एक बांधीव तलाव आहे. हिरव्या पाण्याने भरलेला. हा तलाव पाहून मला नेहमी संदीप खरेंचं बूमबूमबा गाणं आठवतं. ...पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
 |
बालेकिल्ल्यावरील पाण्याचा तलाव |
ह्या परिसरातल्या प्राचीन घाटवाटांवर लक्ष्य ठेवण्यासाठी तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले बांधले गेले. पवना धरणाच्या पाणीसाठ्याने तीन बाजूंनी वेढलेला तुंग दुरूनही ओळखता येतो. काहीजण तुंग आणि तिकोना असा दोन्हीचा ट्रेक करतात म्हणे. तिकोन्याच्या पायथ्याशी पोहोचणे सोपे आहे. तुंगचा पायथा गाठायचा म्हणजे पवना धरणाच्या जलाशयाला वळसा घालून जायचे. दूरचा प्रवास. काही वर्षांपूर्वीपर्यंत धरणाच्या जलाशयातून लाँचने पलीकडे जाता येत असे. आता रस्ता झाल्याने आणि मागणीअभावी लाँचची सेवा बंद पडली.
 |
बालेकिल्ल्यावरून दिसणारा परिसर
पवना धरणाचा पाणीसाठा
दूरवर धुक्यात हरवलेला तुंग
किल्ल्याच्या तटबंदीवर फुललेली सोनकीची फुले |
शिवरायांच्या काळात ह्या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख करण्यासाठी होत असे.
औरंगाबाद, अहमदनगर, हैदराबाद अशा सपाट प्रदेशात गनिमांनी रियासती चालवल्या. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मात्र त्यांना शूर मावळ्यांनी कापून काढले. किल्ला बांधावा तर असा. आणि सैन्य जमवावं तर असं. शे दीडशे मावळ्यांनी हजारभर गनिमांना वर्षभर झुंजवत ठेवावं.
 |
तिकोनाच्या तटबंदीवरुन |
आल्या मार्गाने साधारण ४५ मिनिटात किल्ला उतरून आलो. दुपारच्या उन्हात पळण्याचा प्रश्नच नव्हता. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात जमेल तिथे मी पळत खाली उतरलोय.
उतरल्यावर खिंडीकडे वाटचाल. वाटेत एक तुटलेले झाड दिसले. का तुटले असेल. वीज कडाडून, का मनुष्यप्राण्याचे काम.
 |
तुटलेले झाड |
खिंडीत पोहोचल्यावर दुसरा पाणी ब्रेक घेतला. पुढे काय? लगेच घरी जाण्यापेक्षा एखादी नवीन जागा बघण्याइतका वेळ होता. घरून निघण्याआधी गुगल मॅप मध्ये आजूबाजूचा परिसर बघून ठेवला होता. मुंबई-पुणे महामार्गाच्या जवळची एक नवीन टेकडी मनात होती. पण इतकी सुंदर भटकंती झाल्यानंतर महामार्गाच्या बाजूला परत जायला मन होत नव्हते. खिंडीपर्यंत पोहोचणारा हा रस्ता पुढे कुठपर्यंत जातो ते पाहायचे ठरवले.
 |
खिंडीपासून पुढे कुठेतरी जाणारा रस्ता |
माणसे, वाहने नसलेल्या ह्या रस्त्याला फक्त पक्ष्यांचे आणि कीटकांचे आवाज. ऊन काही कमी होत नव्हते. फारसा चढ उतार न करता वाट एका लयीत चाललेली.
 |
पूर्णपणे वर्दळ विरहित कच्चा रस्ता |
दहा मिनिटांनी आडबाजूला असलेले एक फार्महाऊस दिसले. रस्त्याने पुढे चालत राहिलो. इकडे प्राणी कोणी असण्याची शक्यता नाहीच. सरडे बरेच दिसले. विविध पक्ष्यांचे आवाज चालू होते. मला त्यातला एकही ओळखता नाही आला.
अर्ध्या तासाने एक देऊळ आले. देवळात काही गावकरी दुपारचे पहुडलेले होते. देवळासमोर एका जागी उंदरासारख्या दिसणाऱ्या दगडी प्रतिकृती दाटीवाटीने रचलेल्या.
झोपेत व्यत्यय आल्यामुळे कि काय, गावकरी बोलायला फारसे उत्सुक नव्हते. त्यांना रामराम करून परतीची वाट धरली.
 |
देवळाच्या समोर रचलेले दगडी बैल |
नंतर घरी जाताना ह्या दगडी प्रतिकृतींबद्दल माहिती समजली. पवनानगर जवळ एका गावकऱ्याला गाडीत लिफ्ट दिली, तो बोलका निघाला. त्याने माहिती दिली. मळवंडीचे हे देऊळ आसपासच्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतले शेतकरी त्यांच्या बैलांच्या तब्बेतीसाठी ह्या देवळात नवस बोलतात. नवस पावला तर बैलाची लाकडी किंवा दगडी प्रतिकृती देवळात अर्पण करतात.
उन्हं उतरल्यावर आता रस्ता मजेदार वाटत होता. पण आता थकवा जाणवायला लागला. सकाळच्या हिल रनिंग नंतर दुपारचा ट्रेक, जरा जास्तच होतं.
 |
मळवंडी गावाजवळची गाववाट |
एका बाजूला डोंगराचा कडा, पक्ष्यांची गाणी, तर दुसऱ्या बाजूला दूरवरचे मळवंडी गावातले आवाज. आणि मधून चाललेला हि गाववाट. गाववाट, कारण पायवाटही नाही आणि गाडीवाटही नाही. अर्ध्या तासात खिंडीत गाडीजवळ पोहोचलो. इथे शेवटचा पाणी ब्रेक.
 |
खिंडीतून दिसणारा रस्ता
डावीकडच्या कोपऱ्यातून तिकोना डोकावतोय |
अशा प्रकारे दिवसभर स्वछंद फिरल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये दाखल झालो.
No comments:
Post a Comment