गुरुवार १९ ऑक्टोबर २०१७
सकाळी आवरून ब्रेकफास्ट न करताच तयार झालो. भल्या पहाटेच बॉर्डर ओलांडून जायचा बेत होता. हॉटेलच्या मालकाने कबूल केल्याप्रमाणे आम्हाला डस्टर गाडीतून बॉर्डर पर्यंत सोडले. हॉटेल पासून बॉर्डर जेमतेम पाच मिनिटाच्या अंतरावर. इतक्या सकाळी इमिग्रेशन ऑफिसच्या खिडकीत कोणीच नव्हते. हॉटेलचा मालक हुशार आणि हेल्पफुल होता. त्यानेच इमिग्रेशन ऑफिसमधे आणि बॉर्डरवरच्या भूतानी रखवालदारांशी बोलून आम्हाला पलीकडे जायला मदत केली. इमिग्रेशन ऑफिसमधे आमचे परमिट परत द्यावे लागणार होते. कालच मि फोटो काढून ठेवले होते.
|
फुनशिलींग मधे बनवलेलं परमिट |
बॉर्डर पलीकडे ठरल्याप्रमाणे राजू ओम्नी गाडी घेऊन तयार होता. गाडीत आमचे सगळे सामान घुसवले. मग आम्ही घुसलो. गाडीच्या मागून मि पटकन एक फोटो काढला बॉर्डर गेटचा.
|
गाडीमागून मी पटकन एक फोटो काढला बॉर्डर गेट चा |
रस्त्याची अवस्था फारच दयनीय होती. छोट्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेल्या धूळयुक्त रस्त्यावरून गाडी धावायला लागली. पलीकडचे भूतान आणि इकडचे आसाम ह्यामधला फरक शेंबड्या पोरालाही सांगता येईल. दोनच मिनिटात एक चेकपोस्ट लागली. राजू गाडीतून उतरून चेकपोस्ट वर एन्ट्री करायला गेला. गाडी चालू ठेऊनच. लगेच परतला आणि पुढचा प्रवास सुरु.
|
बॉर्डर क्रॉस केल्यावरची भारतीय चेकपोस्ट |
पुनाखाहुन आल्यावर काल आम्हाला गेलेफू गरीब गाव वाटत होतं. आता बॉर्डर क्रॉस केल्यावर गेलेफू श्रीमंत आणि आसामचा हा भाग गरीब आहे हे स्पष्ट दिसत होतं. इथल्या एकंदर परिस्थितीवरून कोणीही टुरिस्ट भारतातून भूतानला जाण्यासाठी इथे येत नाहीत हे लक्षात आले. बहुदा भूतानहुन बॉर्डर क्रॉस करून भारतात जाणारे आमच्यासारखे टुरिस्टहि दुर्मिळच. लेबर म्हणून जाणारे भारतातले कामगार हेच मुख्यतः इथले बॉर्डर क्रॉस करणारे.
जवळजवळ अर्धा तास रस्ता म्हणजे चाळण्यातली चाळणीतली चाळण. नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत गेली. मधेच काही फुल्ली लोडेड टाटा ट्रक भूतानच्या दिशेला गेले.
रस्ता मोकळा असल्याने आम्ही भराभर अंतर कापत गेलो.
बोन्गाइगाव आणि
न्यू बोन्गाइगाव आल्यावर फोटो काढून अमितला पाठवले. त्याच्या गावचे फोटो. बोन्गाइगाव आणि न्यू बोन्गाइगाव सोडून पुढे गेल्यावर रस्त्यावरचं ट्रॅफिक परत ओसरलं.
गुगल मॅप प्रमाणे गेलेफू ते
गुवाहाटी एअरपोर्ट ह्या दोनशे पंचविस किलोमीटर अंतराला पाच तास लागणार होते.
|
गुगल मॅप मधे गेलेफू ते गुवाहाटी एअरपोर्ट |
मोबाईल मधलं भूतानचं सिमकार्ड काढून मी त्याजागी माझं व्होडाफोनचं सिम टाकलं. लांबच लांब
नरनारायण सेतू वरून आम्ही
ब्रह्मपुत्रा नदी पार केली. सव्वादोन किलोमीटरच्या ह्या पुलावरून आमची गाडी बराच वेळ जात होती.
|
ब्रह्मपुत्रा नदीवरचा नरनारायण सेतू |
इथून गुवाहाटी एअरपोर्ट पर्यंतचा रस्ता आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगला होता. बॉर्डर जवळच्या रस्त्यापुढे आता सगळेच रस्ते सपाट गुळगुळीत वाटत होते.
|
गुवाहाटी एअरपोर्ट कडे जाताना... |
रस्त्यात कुठलेही विघ्न न येता आम्ही गुवाहाटी एअरपोर्टला बाराच्या सुमारास पोहोचलो. गेलेफू पासूनचा पूर्ण प्रवास काही न खाता पिता झाला. रस्त्यात ब्रेकफास्ट साठी जागा पूर्णवेळ शोधत होतो, पण एकही चांगली जागा दिसली नाही. राजुलाही हे माहिती असावे. त्याने कुठेही न थांबवता गाडी सुसाट पळवत आणली. गुवाहाटी एअरपोर्ट जवळ आल्यावर तो एकदा रस्ता चुकला तेवढाच एक छोटा ब्रेक.
आम्ही साडेतीन तास लवकर पोहोचलो होतो. एअरपोर्ट मधे शिरण्याआधी समोर खादंतीकडे मोर्चा वळवला. गुवाहाटी एअरपोर्ट वर यथेच्छ टाइम पास करून झाला. आमचे गुवाहाटी ते कोलकता विमान वेळेत होते.
|
विमानाच्या खिडकीतून ख़ुशीची फोटोग्राफी |
पुढचे कोलकता ते पुणे विमानही वेळेत होते. गेलेफू ते गुवाहाटी एअरपोर्ट पर्यंतच्या प्रवासात ख़ुशीने चांगल्या झोपा काढल्या होत्या. त्यामुळे तिने दोन्ही एअरपोर्ट वर आणि दोन्ही विमान प्रवासात मस्त एन्जॉय केले.
|
आपल्या विमानाची तयारी होतेय |
पुण्यात विमानाच्या बाहेर पडल्यावरच हवेतला फरक जाणवला. दिवाळीच्या फटाक्यांमुळे हवेत नको तेवढा धूर. भूतानच्या स्वच्छ हवेतून आल्यावर इथे गुदमरायला होत होते. रस्त्यांवर कचराच कचरा. जाऊदे. एक दोन दिवसात सवय होईल.
No comments:
Post a Comment