शनिवार १४ ऑक्टोबर २०१७
आजचा दिवस
थिंफू आणि आजूबाजूला भटकंती. कुठे कुठे जायचे ते मी DD ला (म्हणजे आमच्या ड्रायव्हर ला) आधीच दाखवले होते. त्याचे म्हणणे "हि सर्व ठिकाणं दाखवून मी अजून पण ठिकाणं दाखवतो जी तुमच्या लिस्टमधे नाहीयेत". त्याच्या प्लॅन नुसार जायचे ठरवले.
आज शनिवार असल्याने इमिग्रेशन ऑफिस बंद होते. रविवारीही इमिग्रेशन ऑफिस बंद. त्यामुळे परमिट एक्सटेन्ड करायला सोमवार उजाडणार होता. पण आमच्या प्लॅनला काहीही धोका नव्हता. आम्ही मंगळवारी थिंफू सोडणार होतो. आणि सोमवारी टायगर्स नेस्ट ला जायला आमचं सध्याचं परमिट पुरेसं होतं. भूतानमधे एन्ट्री केल्यावर जे परमिट देतात ते घेऊन फक्त थिंफू आणि पारो एवढेच फिरता येते. ह्याच्या पलीकडे कुठेही जायचे असल्यास थिंफू मधल्या इमिग्रेशन ऑफिसमधे जाऊन परमिट एक्सटेन्ड करावे लागते. आम्हाला पुनाखा आणि गेलेफू साठी परमिट एक्सटेन्ड करायचे होते.
आजची सुरुवात झाली
मेमोरियल चोरटेन पासून. समोरच्या पार्किंग मधे गाडी लावून आमचा ड्राइवर तिथे थांबला. प्रौढांसाठी तीनशे रुपये तिकीट होतं. मुलांना तिकीट नाही.
आतमधे बौद्ध साधक जप आणि ध्यान करत बसलेले. त्यांना पर्यटकांची सवय होती. त्यातल्या कोणाचीही चिडचिड झाली नाही.
 |
थिंफूमधील मेमोरियल चोरटेन |
भूतानच्या तिसऱ्या राजाच्या स्मरणार्थ त्याच्या आईने हि वास्तू बांधून घेतली. थिंफूमधे गेलात तर इथे अवश्य भेट द्या. तुमच्याबरोबर गाईड असेल तर तो तुम्हाला सगळी डीटेल माहिती देईल. गाईड नसला तरी हरकत नाही. सर्व काही व्यवस्थित पाहून घ्यावे. चार गोष्टी नाही समजणार. सगळंच समजून घ्यायचं असेल तर गाईड घेऊन भूतानची सफर करावी. त्याचे पैसे मोजायचीही तयारी असावी. पैसे तर देणार नाही आणि तरीपण सगळं सांगा असला आडमुठा स्वभाव असला तर भूतान काय इतर सगळ्या ठिकाणी हीच बोंब होणार. अशांनी वीणा वर्ल्ड, केसरी बरोबर जाणे चांगले. स्वतःच फिरायला जाऊ नये.
 |
मेमोरियल चोरटेनच्या प्रवेशद्वाराशेजारील फलक |
इथल्या आवारात फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरावे. उलट्या
दिशेने जाऊ नये.
मेमोरियल चोरटेन संपूर्ण पाहून बाहेर यायला अर्धा तास
लागला.
 |
मेमोरियल चोरटेनच्या पार्किंगमधली एक गाडी |
पार्किंगमधे विविध मोटारी उभ्या होत्या.
निसान नवारा इथे पॉप्युलर आहे असे DD (म्हणजे आमचा ड्रायव्हर) सांगत होता. भूतानला गरीब देश समजण्याची चूक भारतीयांनी कृपया करू नये. भारत हा श्रीमंत जनतेचा गरीब देश आहे. भूतान हा सुखी जनतेचा श्रीमंत देश आहे.
आता आम्ही जाणार होतो
बुद्ध डोरडेन्मा हा भव्य पुतळा पाहायला. प्रवेशद्वारापर्यंत गाडीने जाता येते. इथे आम्हाला सोडून आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन थोड्या खाली गेला. कारण प्रवेशद्वारासमोर पार्किंग नाहीये. बुद्ध बघून झाल्यावर DD ने आम्हाला समोरच्या पायऱ्या उतरून खाली यायला सांगितले. तिथल्या पार्किंगमधे तो थांबणार होता.
आज इथे काहीतरी इव्हेंट होता. त्यामुळे सगळीकडे बरीच लगबग होती. आजच्या इव्हेंट मुळे काही भागात जायला प्रवेश नव्हता.
ब्रॉंझच्या ह्या पुतळ्याला सोन्याचे आवरण आहे. इथलं सगळंच गोल्डन थिम मधे.
 |
थिंफूजवळचा बुद्ध डोरडेन्मा |
थिंफूमधे सगळीकडून हा डोंगरमधला भव्य पुतळा दिसतो. जणू काही थिंफूच्या जनतेसाठी समोर ध्यानस्थ बसलाय.
 |
बुद्धाच्या चहूबाजूंना अशा देवतांच्या मुर्त्या आहेत |
जर तुम्हाला ट्रेकिंग किंवा रनिंगची आवड असेल तर भल्या पहाटे उठून इथे चालत किंवा पळत जा.
पायऱ्या उतरून आम्ही पार्किंगमधे गेलो. गाड्यांच्या दाटिवाटीत आमच्या गाड्या शोधल्या. डोंगर उतरून जाताना थिंफू शहराचा सुन्दर व्हू दिसतो. रस्त्याकडेच्या दगडावर बसून मी फोटो काढला.
 |
डोंगरांमधल्या दरीत पसरलेलं थिंफू शहर
रस्त्याकडेच्या दगडावर बसून मी काढलेला फोटो |
थिंफू हि राजधानी आणि भूतानमधले सर्वात मोठे शहर. लोकसंख्या फक्त एक लाख पाच हजार. अहो आमच्या पुण्यात ह्याच्या पस्तीस पट लोकं राहतात. बाजूचं पिंपरी-चिंचवड पकडून पंचावन्न पट. थोडक्यात, भारताच्या एखाद्या कोपऱ्यातही ह्यांच्या सबंध देशाच्या जनतेपेक्षा जास्त लोकं सापडतील. आणि पूर्ण भारतात जितकी झाडं आहेत त्यापेक्षा जास्त इथे भूतानमधे असतील. दोन शेजारी देशांमधला केवढा हा विरोधाभास.
आता पुढचं ठिकाण चानगानखा लखांग हा प्राचीन बौद्ध मठ. तुमच्याबरोबर गाईड असेल तर तो तुम्हाला इथली सर्व डिटेल माहिती सांगेल. आम्ही सर्व फिरून घेतले आणि जमेल तेवढे जमेल तसे समजून घेतले.
 |
चानगानखा लखांगच्या आवारात |
भूतानमध्ये सातव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. इथे आधी असलेल्या बॉन धर्माबरोबर बौद्ध धर्माची कुठलीही भांडणं झाली नाहीत. भारतवर्षात उगम पावलेल्या सर्वच धर्मांची हि खासियत आहे. हिंदू, बौद्ध, जैन, शीख हे सर्व एकमेकांचे शत्रू कधीच नव्हते. ख्रिस्ती आणि इस्लामची बात मात्र वेगळी आहे. ह्यांचा उद्देशच मुळी इतर धर्मांच्यावर कुरघोडी करण्याचा असल्यामुळे भांडण तंटे हे आलेच. सध्याच्या जगात जिथे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही इस्लामच्या राक्षसाला चुचकारतोय तिथे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच देशांनी इस्लामला विरोध केलाय. भूतान मध्ये धर्मांतर घडवून आणण्याला कायद्याने बंदी आहे. भारतात तर Proselytism असं काही असतं आणि ते आपल्या देशात पद्धतशीरपणे केलं जातं ह्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.
 |
चानगानखा लखांगच्या आवारात |
झॉन्गखा हि भूतानची राष्ट्रीय भाषा.
झॉन्ग म्हणजे डिस्ट्रिक्ट (जिल्हा) आणि खा म्हणजे भाषा. थोडक्यात झॉन्गखा म्हणजे जनतेची बोलीभाषा. लिहिण्यासाठी
तिबेटी वर्णमाला वापरतात. पश्चिम भूतान मधली, म्हणजे जवळ जवळ २५% जनतेची हि मूळ भाषा. भूतानच्या पूर्वेकडील भागात शांगला आणि इतर काही भाषा ह्या मूळ भाषा आहेत. भूतानच्या दक्षिणेकडील काही भागात नेपाळी मूळ भाषा आहे.
अब अगला पडाव
मोतीथांग टकिन प्रिझर्व, म्हणजे प्राणीसंग्रहालय, आणि त्याच्याआधी BBS टॉवर. BBS टॉवर प्राणीसंग्रहालयाच्या रस्त्याला पुढे जाऊन डोंगरावर आहे. आधी तिकडे गेलो. BBS टॉवरच्या आवारात जात येत नाही. पण इथल्या रस्त्यावरून थिंफूचा सुंदर व्हू दिसतो.
प्राणी संग्रहालयाची वेळ आहे सकाळी नऊ ते दुपारी चार.
 |
जाळ्या लावून बंदिस्त केलेल्या मोठमोठ्या भागात टकिन सोडलेले आहेत |
ह्या प्राणीसंग्रहालयात फक्त टकिन आणि हरणेच आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी नव्हती. आमच्यासारखे काही मोजकेच आलेले होते.
 |
भूतानचा राष्ट्रीय प्राणी टकिन |
साधारण मेंढ्यासारखे दिसणारे टकिन बऱ्यापैकी माणसाळले वाटले. ख़ुशीने त्यांना आणि हरणांना भरपूर गवत भरवले.
प्राणीसंग्रहालयाच्या आवारात चक्क लाकडाच्या ओंडक्यांपासून बनवलेली खुर्च्या टेबलं होती.
 |
लाकडाच्या ओंडक्यांपासून बनवलेली खुर्च्या टेबलं |
पाऊण तासात आम्ही प्राणीसंग्रहालय पाहून बाहेर आलो. आता जेवणाची वेळ झालेली. आम्ही थिंफूकडे निघालो. वाटेत एका ठिकाणी DD ने गाडी थांबवली. इथून समोर ताशीछो झॉन्ग आणि त्याच्या पलीकडे राजाचा प्रासाद दिसत होता.
 |
डोंगरउतारावरची भातशेतं आणि पलीकडे ताशीछो झॉन्ग |
दुपारच्या जेवणाला थिंफूमधल्या चुल्हा रेस्टोरंट मधे जायचं ठरलं. DD च्या डोक्यात एक आयडिया आली - आज तुम्ही ट्रॅडिशनल भूतानी जेवण का नाही जेवत, मी घेऊन जातो तुम्हाला एका जागी. आम्ही होकार दिला. आम्ही पोहोचलो
फोक हेरिटेज म्युझीयम मधे. आधी म्युझीयम बघून मग जेवायचे ठरले. एका दीडशे वर्ष जुन्या दुमजली घराचे म्युझीयम बनवले आहे. हे बघून पूर्वीच्या काळी भूतान मधे लोक कसे रहात असत त्याची कल्पना येते. हे कुण्या श्रीमंत माणसाचे घर असणार. त्या काळचे गरिबांचे घर म्हणजे एकच मोठी खोली.
फोक हेरिटेज म्युझीयम पाहून आपल्याकडच्या प्राचीन कोकण म्युझीयमची आठवण झाली.
 |
थिंफूमधील फोक हेरिटेज म्युझीयम |
म्युझीयम पाहून झाल्यावर भूतानी पारंपरिक बैठकीप्रमाणे जेवायला बसलो.
 |
ट्रॅडिशनल भूतानी जेवण |
एमा म्हणजे मिरच्या, दातशी म्हणजे पनीर, केवा म्हणजे बटाटे. थुक्पा म्हणजे सूप मिक्स नूडल्स. ना जा म्हणजे दुधाचा चहा, सु जा म्हणजे लोण्याचा चहा. थोडक्यात, जा म्हणजे चहा.
जेऊन झाल्यावर आम्ही थिंफू मधला
ताशीछो झॉन्ग बघायला निघालो. १९६८ पासून भूतान सरकारचं कामकाज इथूनच चालतं. सोमवार ते शुक्रवार इथे पर्यटकांना पाच नंतर प्रवेश असतो. आज शनिवार असल्याने सरकारी कामकाज आज बंद होतं. त्यामुळे पर्यटकांना आज दिवसभर प्रवेश होता.
इथे पर्यटकांना गाईडशिवाय प्रवेश नाही. आमच्याबरोबर गाईड नसल्याने तिथला एक गाईड आमच्याबरोबर आला. ह्या झॉन्गला तीन प्रवेशद्वारं आहेत. पहिले राजा मंत्रिमंडळ इत्यादींसाठी, दुसरे सर्वसामान्य नागरिकांसाठी, आणि तिसरे बौद्ध भिक्खू वगैरेंसाठी. आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या प्रवेशद्वारातून आत गेलो. बॅगा स्कॅन झाल्या, आमची तपासणी झाली आणि आम्ही आमच्या गाईड बरोबर पुढे गेलो.
 |
ताशीछो झॉन्गचं पाहिलं प्रवेशद्वार - राजा, मंत्रिमंडळ इत्यादींसाठी |
झॉन्ग बाहेरून बघताना बंदिस्त वाटला तरी आतमध्ये भलीमोठी मोकळी जागा असते.
 |
ताशीछो झॉन्गच्या आवारात |
गाईड बरोबर आम्ही झॉन्गचा काही भाग पाहिला. काही भागात पर्यटकांना प्रवेश बंद आहे.
 |
ताशीछो झॉन्ग मधल्या एका भिंतीवरची मूर्ती |
ह्या झॉन्गचं पाहिलं बांधकाम १२१६ मधे झालं होतं. १६४१ साली आज आहे तसा झॉन्ग बांधला गेला. १७७२ मधे हा झॉन्ग आगीत जळाला. त्या जागी आजचा झॉन्ग बांधला गेला.
झॉन्ग पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा साडेचार वाजून गेले होते. इथे बाहेर थांबा, थोड्याच वेळात झेंडा उतरवण्याचा समारोह होईल असे आमच्या गाईडने सांगितले. आम्ही झेंड्याजवळ जाऊन थांबलो. पावणेपाच वाजता सर्वात पुढे पायघोळ कपडे घातलेले तिघेजण, त्यांच्यामागे आणखी एकजण आणि त्याच्या मागून सैनिकांची एक तुकडी आली. त्यांनी समारोहपूर्वक झेंडा उतरवला. झेंडा घेऊन आल्या मार्गाने सर्वजण परत गेले. प्लॅनमधे नसताना अनपेक्षितपणे हा छोटासा समारोह बघायला मिळाला.
 |
ताशीछो झॉन्ग मधला संध्याकाळचा झेंडा उतरवण्याचा समारोह |
ज्ञात असलेल्या इतिहासापर्यंत भूतान नेहमी स्वतंत्र प्रदेश राहिलाय.
त्यामुळे ह्या देशाला स्वतंत्रता दिवस नाहीये. एका बाजूला दूर दूर पर्यंत
पसरलेलं जगाचं छप्पर तिबेट आणि दुसऱ्या बाजूला सपाटीवरचा भारत. मधल्या
हिमालयातील हा छोटासा देश. ब्रिटिशांनी पूर्ण भारत खंडावर राज्य केलं पण
भूतान आणि नेपाळ त्यांच्या हाताबाहेर राहिले. कधीकाळी तिबेटी आणि मोंगोल
अशा एकत्रित सेनेचं आक्रमणही भूतान्यांनी परतवून लावले होते.
 |
ताशीछो झॉन्गच्या पार्किंग मधली एक आलिशान मोटार |
ताशीछो झॉन्गच्या पार्किंग मधे काही आलिशान मोटारी थांबलेल्या.
 |
पार्किंग मधे आमची टॅक्सी आणि मागे ताशीछो झॉन्ग |
साडेपाचच्या आसपास हॉटेलमधे परतलो.
जेऊन झाल्यावर हॉटेलच्या जवळपास फिरायला बाहेर पडलो. फुनशिलींगहुन थिंफूला येताना वाटेतल्या दुकानात चॉकलेट मिळाले होते तसले ख़ुशीला हवे होते. ते शोधण्याची मोहीम फत्ते केली.
 |
थिंफूच्या एका सुपर मार्केटमधील खाऊ |
भारतीय चलन भूतानमधे सगळीकडे चालतं. दुकानदार सुट्टे परत देताना भारतीय माणूस बघून त्यांच्याकडे असल्या तर भारतीय नोटा देतात. आपला एक रुपया म्हणजे ह्यांचा एक
गुलत्रम. आणि आपला एक पैसा म्हणजे ह्यांचा एक चेत्रम. ह्यांची करन्सी भारतीय करन्सी बरोबर समान किमतीला जोडलेली आहे. म्हणजे रुपयाचा भाव चढला उतरला कि ह्यांच्या गुलत्रमचा भाव तसेच हेलखावे खातो.
आपले ATM कार्ड इथल्या ATM मधे चालते. पैसे काढता येतात, पण प्रत्येक वेळी शंभर रुपये चार्ज पडतो. मागच्या वेळच्या अनुभवावरून ह्या वेळी पुरेशी कॅश बरोबर घेऊन आलो होतो.
भूतानमधे रात्री नऊनंतर सगळीकडे सामसुम असते. रात्री नऊला बहुतेक रेस्टोरंट बंद होतात. काही मोजकीच दुकानं उघडी दिसतात. आधीच इकडे लोकसंख्या कमी. नऊ नंतर रस्त्याला फारसं कोणी भेटत नाही.
उद्या टायगर्स नेस्ट वर मोहीम व जमल्यास पारोमधील इतर ठिकाणांना भेटी.
No comments:
Post a Comment