रविवार १५ ऑक्टोबर २०१७
आजचा प्लॅन होता
टायगर्स नेस्ट वर मोहीम व वेळ मिळाल्यास
पारोमधील काही ठिकाणांना भेटी. सकाळी आठ वाजता आवरून ब्रेकफास्ट करून आम्ही तिघे तयार होतो.
थिंफू सोडल्यावर बबेसा नावाचा भाग आला. इथे एका चोरटेन (म्हणजे
स्तूप) समोर आमच्या ड्राइवरने गाडी थांबवली. पुण्यात असताना मी त्याला WhatsApp वर ह्या ठिकाणाचा फोटो पाठवला होता. त्याची आठवण ठेऊन त्याने इथे गाडी थांबवली होती. मी एकटाच गाडीतून उतरलो. चोरटेन पाहून झाल्यावर चहूबाजूंनी फोटो काढले.
|
बबेसा मधील एक चोरटेन (म्हणजे स्तूप) |
सकाळच्या सुंदर वातावरणात नदीच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावरून आम्ही पारोच्या दिशेने प्रवास सुरु केला. साधारण अर्ध्या तासाने पुलावरून नदी पार केली. इथे मी गाडीतून उतरून आजूबाजूच्या सगळ्या फलकांचे फोटो काढले. मी सांगेन तिथे DD (आमचा ड्राइवर) गाडी थांबवायचा. आत्तापर्यंत त्याला कळले होते मला कुठे आणि कसले फोटो काढायचे असतात ते.
|
दिशादर्शक फलक |
पुलापलीकडच्या रस्त्याला
पारो छू सोबतीला होती. छू म्हणजे नदी. नदीशेजारच्या रस्त्याने अर्ध्या तासाच्या अंतरानंतर DD ने स्वतःहून गाडी थांबवली. तसे ह्याच्याआधी माझे दोन फोटो ब्रेक झालेले होते. आता इथून समोर
पारो एअरपोर्ट नजरेच्या टप्प्यात होते. भूतानमधे येण्यासाठीचे हे एकमेव विमानतळ. एकच रनवे. फक्त तीनच विमान कंपन्यांची विमानं इथे येतात. द्रुक एअर, भूतान एअरलाईन्स, आणि बुद्ध एअर.
एक हेलीकॉप्टर इंधन भरण्यासाठी थांबलेले. इतर विमानतळांवर असतो तसला गजबजाट कुठेही दिसत नव्हता. पूर्ण भूतान असेच आहे. गर्दी गडबळ गोंधळ गोंगाट कुठेच नाही.
ह्या विमानतळावर विमान उतरवणे आणि उडवणे भलते अवघड आहे म्हणे. अनुभवी पायलटचेच काम आहे इथे. का तर हा विमानतळ दरीत आणि चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. रनवे पण छोटा आहे. आम्ही थांबले होतो त्या पॉईंट वरून विमान उतरताना किंवा उडताना छान दिसते अशी DD ची माहिती. पुढचे विमान अकरा वाजता येणार होते. त्याला एक तास वेळ असल्यामुळे आम्ही जायच्या तयारीत होतो. तेवढ्यात एक विमान येताना दिसले. त्याचे लँडिंग पाहायला मिळाले. हे एक private विमान होते.
|
पारो एअरपोर्ट |
हे आगळंवेगळं विमानतळ पाहून पुढे गेल्यानंतर दहा मिनिटात मी DD ला परत गाडी थांबवायला सांगितली. मार्चमधल्या भूतान दौऱ्यात रस्ताकडेच्या फलकांचे फोटो काढायचे राहून गेले होते. ह्यावेळी मी बऱ्याच ठिकाणी गाडी थांबवायला सांगून फोटो काढले. DD ने तसे कबूल केले होते, पाहिजे तिथे गाडीतून उतरून फोटो काढा म्हणून. दीप्ती आणि ख़ुशीला माझी आवड माहिती असल्यामुळे त्यांचीही काही कुरकुर नव्हती.
|
किती साधा सरळ सोपा मेसेज. पण आज सर्व जगाला एकतर कळतंय पण वळत नाहीये किंवा कळतच नाहीये. |
DD ने टायगर्स नेस्ट झाल्यावर परतताना पारोमधे हॉट स्टोन बाथचा प्रस्ताव
मांडला. माणशी बाराशे रुपये. चार किंवा जास्त माणसं असतील तर माणशी
अकराशे रुपये. जर हॉट स्टोन बाथ घ्यायचा असेल तर त्यांना तासभर आधी
सांगावे लागते. तयारी करण्यासाठी.
पुढच्या पाच मिनिटात दूरवर टायगर्स नेस्ट दिसायला लागले. पारो गाव पार करून आम्ही पुढे गेलो. गाव अशासाठी कि शहरीपणा कुठेच दिसला नाही. पण गबाळेपणा गलिच्छपणा कुठेच नव्हता. सर्वत्र शेतं, घरं, वगैरे वगैरे टुमदार आणि नीटनेटके. आजचा पहिला कार्यक्रम टायगर्स नेस्ट असल्यामुळे आम्ही पारोमध्ये थांबलो नाही. रस्त्यात एक लोखंडी पूल लागला. भूतान मधले बहुतेक पूल छोटेसे आणि लोखंडी आहेत.
टायगर्स नेस्टच्या पायथ्याला पार्किंगच्या जागेत आमची गाडी थांबली. इथून पुढे एकतर डोंगर चढून जायचे होते किंवा घोड्यावरून. घोडा निम्म्या अंतरापर्यंत जातो. तिथून पुढे चालतच जावं लागतं. मी तिकिटं काढली.
इथे तिकिटं काढल्याशिवाय वर जाऊ नका. वर पोहोचल्यावर तिकिटं तपासून मगच टायगर्स नेस्टमधे प्रवेश देतात.
दीप्ती आणि ख़ुशी साठी घोडे ठरवले. प्रत्येकी सहाशे रुपये. मी चालतच जाणार होतो. प्रत्येकी पन्नास रुपये देऊन आम्ही काठ्या घेतल्या. खरंतर काठ्या घेतल्या नसत्या तरी चाललं असतं. कधीच ट्रेकिंग न केलेल्यांनी मात्र काठ्या घ्याव्यात.
|
वाटेत लागलेला एक फलक |
सुरुवातीचा थोडा वेळ सोपा चढ होता. नंतर मोठा चढ लागला. ज्यांनी ट्रेकिंग फारसं केलेलं नाही त्यांनी घोडा घेणंच उत्तम. नाहीतर पूर्ण दिवस टायगर्स नेस्ट मधेच जायचा आणि पारो बघायचे राहून जायचे.
जायची वाट सोडली तर पूर्ण डोंगरभर झाडंच झाडं. आजही भूतानच्या ७२% भागात जंगलं आहेत.
|
हे जर सगळ्यांना समजलं आणि उमजलं तर जग किती वेगळं असेल |
खाली उतरून येणारी माणसं वाटेत भेटत होती. खाली येणारे घोडे चार पाचच्या कळपाने उतरत होते. काहींबरोबर मालक होते. काही कळप स्वतःच उतरत होते. रोजचा रस्ता असल्याने घोड्यांना सवय होती. आणि वर जाणारे घोडेवाले खाली येणाऱ्या घोड्यांना हाका देऊन उतरवत होते. सर्व घोडेवाले सगळ्या घोड्यांना मदत करत होते. फक्त आपल्यापुरतं न बघता सर्व कम्युनिटीला सर्वांनी मदत करावी हे ह्या अनपढ घोडेवाल्यांना समजते. आमच्या सोसायटीतल्या एज्युकेटेड मेंबर्सना पाठवा इथे चार गोष्टी शिकायला.
|
टायगर्स नेस्टच्या वाटेवर... मागे दूरवर घोडेवाल्याचे गाव दिसतंय |
इथे घोडे रोज एक किंवा दोन फेऱ्या करतात. साधारण निम्म्यापर्यंत जाऊन घोडे थांबले. तोपर्यंत मी थोडं पुढे कॅफेटेरिया पर्यंत जाऊन एक फोटोसेशन केलं होतं. आमचे घोडे आणि माणसं आलेली पाहून मी परत त्याजागी गेलो. कॅफेमध्ये चहाकॉफीचा ब्रेक न घेता आम्ही पुढे निघालो. इथून वरपर्यंत पायगाडीचा प्रवास होता. ख़ुशीला घेऊन मी पुढे गेलो. दीप्ती थोड्या मागून येत होती
रोज शे दोनशे माणसांनी तुडवलेला धोपटमार्ग चुकण्याची शक्यताच नाही.
|
टायगर्स नेस्टच्या वाटेवरचा दिशादर्शक |
१६९२ मध्ये इथे पहिले बौद्ध देवालय बांधले होते. सतराव्या आणि अठराव्या शतकात इथे जाण्याची वाट अतिशय अवघड आणि धोकादायक होती. आता सव्वाचारशे वर्ष वापरात असल्यामुळे हि वाट तब्येतीने धडधाकट असलेली कोणीही व्यक्ती चढू शकते.
ख़ुशीला मी शेवटपर्यंत हात धरून घेऊन गेलो. चढ काही केल्या संपेना. ख़ुशी आता मधेमधे बसायला लागली. तिचा ब्रेक होईपर्यंत माझे छोटेसे फोटोसेशन व्हायचे.
|
उन्हात न्हालेलं टायगर्स नेस्ट आणि तिथपर्यंत पोहोचायची वाट |
१९९८ मध्ये टायगर्स नेस्ट आगीत खाक झाले होते. २००५ पर्यंत ते परत पूर्वीसारखे बनवले.
टायगर्स नेस्ट हाकेच्या अंतरावर आलं तेव्हा दीप्ती आम्हाला येऊन मिळाली. वाटेत एक सुंदर धबधबा लागला. दोन सिंहगड एकामागूनएक एवढं चढायला आहे टायगर्स नेस्ट.
|
टायगर्स नेस्ट जवळचा धबधबा |
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक चेकपोस्ट आहे. इथे आपले सर्व सामान
ठेवावे लागते. जर काही किमती सामान बरोबर घेऊन गेलात तर एक छोटे पॅडलॉक
बरोबर न्या. इथल्या लॉकर मधे सामान ठेऊन लॉक लावू शकाल. आम्ही बॅग आणि
काठ्या इथल्या सामानघरात ठेवल्या. तोकडे कपडे घालून इथे प्रवेश मिळत नाही. अंगभर कपडे घालून जा. माझ्या टीशर्टला कॉलर नव्हती. मला तिथे पडलेल्या शर्टपैकी एक शर्ट घालायला सांगितले. एका गार्डने तिकिटं तपासली.
आम्ही टायगर्स नेस्ट मधे प्रवेशलो होतो. एकेक बौद्ध देवालय पाहत पुढे जात राहिलो. शेवटी एक भन्नाट जागा पाहायला मिळाली. डोंगरकपारीत उतरून जायला छोटीशी बोळकांड आणि लाकडाची तुटपुंजी शिडी. मी पुढे, ख़ुशी मध्ये, आणि दीप्ती मागे असे हळूहळू उतरून गेलो. अंधाऱ्या गुहेत उतरून गेल्यावर एक वाघाचा फोटो ठेवलेला आणि त्याच्यासमोर दिवा लावलेला. सतराव्या शतकातली हि ध्यानाला बसायची जागा असणार. पूर्ण जगापासून दूर. एकांतात. डोंगराच्या पोटात जिथे कॉस्मिक रेज पण पोहोचू शकत नाहीत.
|
टायगर्स नेस्टचे प्रवेशद्वार... परतताना आतून बघितलेलं |
उतरताना व्हू पॉईंट वरून परत एकदा टायगर्स नेस्टची फोटोग्राफी झाली.
|
डोंगरकड्यावरचं टायगर्स नेस्ट... कोणिकाळी अगम्य दुर्गम... आज सर्वांच्या आवाक्यात असलेलं |
उतरण्याचा रस्ता सोपा आहे. घसरण गचपण कुठेच नाही. पण थकल्यामुळे ख़ुशी आणि दीप्तीचा वेग मंदावला होता. आता चढून वर येणारे कोणीच दिसत नव्हते. सगळे खाली उतरणारेच.
|
टायगर्स नेस्टची वाट उतरताना |
शाळेचा ड्रेस घातलेली काही मुलं सकाळपासून मागे पुढे दिसत होती. त्यातल्या एकाबरोबर माझ्या गप्पा सुरु झाल्या. उतरून जाईपर्यंत आमच्या गप्पा चालल्या.
|
टायगर्स नेस्टची वाट उतरताना |
पार्किंगमधे पोहोचलो तेव्हा साडेचार वाजले होते. आता आम्ही पारोमधे हॉट स्टोन बाथ घ्यायला निघालो. पाऊण तास आमचा हॉट स्टोन बाथ चालला. हॉट स्टोन बाथ नंतर थोडा वेळ मला चक्कर आल्यासारखे होत होते. त्यानंतर भूतानी ड्रेस घालून मनसोक्त फोटोग्राफी केली.
|
भूतानी ड्रेस घालून फोटोग्राफी |
पारोमधे एका ठिकाणी शॉपिंगसाठी थांबलो. पण ह्या दुकानात फारशी व्हरायटी नव्हती. किमती पण जास्त होत्या. त्यामुळे शॉपिंग उद्या थिंफूमधे करायचे ठरले. मार्चमधल्या भूतान दौऱ्यामुळे मला थिंफूमधल्या दुकानांची माहिती होती.
दुकानासमोरच्या रस्त्यावरून
रिंपुंग झॉन्गचं अप्रतिम दृश्य फोटोत पकडलं. १६४६ साली बांधलेला हा झॉन्ग, म्हणजे भुईकोट किल्ला. वेळेअभावी इथे भेट देणं राहून गेलं.
|
रात्रीच्या अंधारात उजळलेला रिंपुंग झॉन्ग |
आता पारोमधली इतर ठिकाणं पाहायला वेळ नव्हता. थिंफूमधे परतायचे होते. सकाळी जो प्रवास मजेदार आणि आल्हाददायक होता तो आता रात्री कंटाळवाणा वाटू लागला.
आज आम्ही रहात असलेल्या नेमसेलिंग हॉटेलमधे न जेवता जवळच्या चुल्हा रेस्टोरेंट मधे गेलो.
उद्या थिंफूमधल्या उरलेल्या ठिकाणची भटकंती.
No comments:
Post a Comment