सोमवार १६ ऑक्टोबर २०१७
आजचा कार्यक्रम होता थिंफूमधील उरलेली भटकंती. आवरून ब्रेकफास्ट करून सकाळी साडे आठ वाजता तयार होतो. आज ख़ुशीने भूतानी ड्रेस
किरा घातला होता. तिचा नेमसेलिंग हॉटेलच्या स्टाफ बरोबर फोटो काढला. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मी तिला हा ड्रेस घेतला होता. तो घालायचा आज मुहूर्त मिळाला.
भूतानमध्ये बरेचजण रोजच त्यांचा
राष्ट्रीय ड्रेस घालतात. शर्ट पॅन्ट किंवा वेस्टर्न कपडे घातलेले कमी दिसतात.
|
भूतानी ड्रेस (किरा) घालून ख़ुशी नेमसेलिंग हॉटेलच्या स्टाफ बरोबर |
मी हॉटेल जवळच्या भागात एक फेरफटका मारून आलो. रस्त्याला शाळेत जाणारी मुलं आणि कामावर जाणारी माणसं. जवळच एक छोटेसे गार्डन दिसले. भूतान - थायलंड फ्रेंडशिप पार्क.
हि काही खासकरून पाहण्याची जागा नाही. थिंफूमधे गेलात तर इथे जायचे कष्ट घेऊ नका. वाटेत लागले तर ह्या गार्डनमधे दहा मिनिटे थांबा.
|
भूतान - थायलंड फ्रेंडशिप पार्क |
आजच्या भटकंतीतले पहिले ठिकाण
रॉयल टेक्सटाईल म्युझीयम. इथे जाताना एक तास हाताशी ठेऊन जा. म्युझीयमची वेळ आहे सोमवार ते शनिवार नऊ ते चार. रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी बंद.
तिकीट काउंटरच्या कडेला एक भलामोठा स्क्रोल भिंतीवर सोडला आहे.
|
थिंफूच्या रॉयल टेक्सटाईल म्युझीयम मधला भलामोठा स्क्रोल
समोर ख़ुशी उभी आहे, स्क्रोलची उंची समजण्यासाठी |
आत शिरल्यावर पहिल्या रूम मधे एक छान documentary पाहिली. कपड्यांना भूतानी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. म्युझीयम मधली मांडणी अतिशय योग्य प्रकारे केलेली आहे.
म्युझीयमच्या बिल्डिंगमधे त्यांचेच दुकान आहे. दुकानातील किमती थिंफू मधल्या दुकानांपेक्षा जास्त होत्या. म्युझीयम पाहून झाल्यावर आवारातल्या समोरच्या बिल्डिंग मधे गेलो. इथे काही स्त्रिया पारंपरिक भूतानी पद्धतीने विणकाम करत होत्या. प्रत्यक्ष विणकाम करताना बघायला मिळाले.
|
पारंपरिक भूतानी पद्धतीने चाललेले विणकाम |
इथून आम्ही निघालो जवळच असलेल्या नॅशनल इन्स्टिटयूट फॉर झोरीग चुसुम कडे.
झोरीग चुसुम म्हणजे पारंपरिक कला. नॅशनल इन्स्टिटयूट फॉर झोरीग चुसुम हि भूतान सरकारने चालवलेली शैक्षणिक संस्था आहे.
|
विद्यार्थी कापडावर चित्र काढताना
ह्या चित्रांना थान्गका असं म्हणतात |
आमचं पुढचं ठिकाणही जवळच होतं,
भूतानची नॅशनल लायब्ररी. तीन मजल्यांवर अतिशय चांगला प्रकारे पुरातन बौद्ध लेखांचा संग्रह ठेवण्यात आलाय.
|
नॅशनल लायब्ररी मधील एक फलक |
स्वतःच्या देशाच्या परंपरांचा, कलांचा सर्वप्रथम स्वतःला अभिमान असला पाहिजे. तर मग ते सर्व जगाला दाखवता येते. स्वतःचे रीतिरिवाज, धर्म, परंपरा आधुनिकीकरणाच्या नावाखाली सोडल्या तर मग त्याची जागा घ्यायला दाऊदच्या काळ्या पैश्यावर चालणाऱ्या बॉलीवूडची नवी संस्कृती आहेच.
|
भूतानच्या नॅशनल लायब्ररी मधे जतन करून ठेवलेले प्राचीन लेख |
नॅशनल लायब्ररी मधलं फारसं काही आम्हाला समजलं नाही. पण स्वतःच्या देशाची परंपरा कशा प्रकारे जतन करून ठेवावी त्याचे हे उत्कृष्ठ उदाहरण आहे एवढे मात्र समजले.
आता आमची स्वारी निघाली कोरोनेशन पार्क कडे. समोरच्या पार्किंग मधे गाडी लावून आमचा ड्राइवर थांबला. आम्ही नदीशेजारच्या पार्क मधे शिरलो. इथे संध्याकाळी यावे असं मी वाचलं होतं. आम्ही भर दुपारी आलो होतो. कुठलातरी इव्हेंट पार्क मधे नुकताच पार पडला होता. त्याचे स्टॉल्स काढण्याचं काम चालू होतं.
ऊन बऱ्यापैकी होतं. पण थोडा वेळ फिरायला हरकत नव्हती. पार्क मधला बुद्धाचा पुतळा दुपारच्या उन्हात तळपत होता.
|
कोरोनेशन पार्क मधला बुद्धाचा पुतळा |
पार्कच्या बाजूच्या नदीमधून स्वच्छ पाणी वेगाने वाहत होतं. इथल्या नद्यांना बारमाही पाणी असतं. पावसाळ्यात पावसाचं पाणी, आणि उन्हाळ्यात पर्वतांवरचं बर्फ वितळून त्याचं पाणी.
|
कोरोनेशन पार्क मधला ड्रॅगन (किंवा तसलाच कोणीतरी) |
थिंफू मधे खूप वेळ असेल तरच ह्या पार्क मधे या. नाहीतर जवळचं
चांगलिमिथान्ग स्टेडियम बघा. किंवा इतर अनेक चांगल्या जागा आहेत थिंफू आणि आजूबाजूला. आमचं पार्क मधे फिरणं होईपर्यंत आमच्या ड्रायव्हरने पार्किंग मधे जेऊन घेतलं होतं. टॅक्सी जिथे पार्किंग मधे थांबतात तिथे एका मारुती व्हॅन मधून जेवायला मिळते. ड्रायव्हर वेळ मिळेल तसे तिथे जेवतात. हे मी भूतान मधल्या इतर ठिकाणीही पाहिलंय.
पार्किंगच्या पलीकडे काहीतरी छान जागा दिसली. जाऊन पाहतो तर काहीजण तिरंदाजीचा सराव करत होते.
|
तिरंदाजीचा सराव |
भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे तिरंदाजी. खुरू हा सुद्धा इथला लोकप्रिय खेळ. आमच्या सफरीत तिरंदाजी आणि खुरूचा योग काही आला नाही.
ड्रायव्हरला आता मी
पोस्ट ऑफिस म्युझियम कडे गाडी न्यायला सांगितली. नाहीतर ते बघायचे राहून गेले असते. पोस्ट ऑफिसच्या बाजूचे हे पोस्टल म्युझियम आम्ही परवा पहाटे फिरत फिरत आलो तेव्हा पहिले होते. तेव्हा बंद होते. इथे आले पाहिजे हे बाहेरची सजावट बघून तेव्हाच समजले होते.
|
पोस्ट ऑफिस म्युझियम मधली भिंतीवरची सजावट |
थिंफू मधे आलात आणि पोस्टल म्युझियम पहिले नाहीत तर बरंच काही मिस कराल. इथे नक्की भेट द्याच. आणि तासभर वेळ काढून या.
आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या. ड्रायव्हरला गाडी क्लॉक टॉवर जवळ न्यायला सांगितली. इथे गाडी सोडून आम्ही जेवणाच्या शोधाला लागलो. याक रेस्टोरंट आजचे भाग्यवान विजेते ठरले.
|
क्लॉक टॉवर जवळचे याक रेस्टोरंट |
जेऊन झाल्यावर क्लॉक टॉवर परिसरात थोडा फेरफटका मारला. एक माणूस दोन गोड कुत्र्याची पिल्लं घेऊन जाताना दिसला. ख़ुशीला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता. मी पळत जाऊन त्याला थांबवले. त्याने तयारी दर्शवली. ख़ुशीने त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. नेहमीप्रमाणे काही वेळानंतर "आपण कुत्रा पाळायचा का", "आपण मांजर पाळायचं का" असल्या प्रश्नांची मला योग्य आणि समर्पक उत्तरं द्यावी लागली.
|
क्लॉक टॉवर परिसरात फिरताना |
इथल्या पार्किंग मधे विविध गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या निवडक गाड्यांचे मी फोटो काढले. गाड्यांची फोटोग्राफी हा माझा आवडता उद्योग आहे.
|
थिंफू मधल्या क्लॉक टॉवर जवळच्या पार्किंग मधली निसान टेरेनो |
भारतीयांनी भूतानला गरीब देश समजण्याची चूक कृपया करू नये. इथे सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर भारतीय (युपी, बिहारी) आहेत, जे बिल्डिंग बांधायच्या रस्ते बनवायच्या वगैरे मोलमजुरीच्या कामाला आहेत. आणि जर तुम्ही जरा डोळसपणे पहाल... म्हणजे जनतेचे राहणीमान, सार्वजनिक शिक्षणव्यवस्था, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, कुटुंबव्यवस्था... ह्या सर्वांचा विचार करता भूतान भारतापेक्षा बरेच प्रगत राष्ट्र आहे.
प्रगत म्हणजे नक्की काय ह्याची आज बऱ्याच देशात गल्लत झालेली आहे. निसर्गाला ओरबाडून शहरीकरण करणे, सर्व जंगले नष्ट करून तिथे कारखानदारी चालू करणे, म्हणजे प्रगती झाली असा समज बऱ्याच राष्ट्रात आहे. ह्या सगळ्यात आपली जनता सुखी समाधानी आहे का, आपला समाज कुठल्या दिशेला चाललाय ह्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. वरवर दिसणारी हि प्रगती हे केवळ फसवे आकडे आहेत हे समजण्याइतकी बऱ्याच देशातली प्रजा हुशार नाही आणि शासकांना त्याच्याशी देणंघेणंच नाही. भूतानची प्रजा गेली कित्येक शतके भाग्यवान ठरलीये. प्रजेची खरीखुरी काळजी घेणारे शासक ह्या देशाला लाभलेत.
आमच्या ड्रायव्हरला नेक्स्ट कुठे जायचे विचारले तर काही उत्तर नाही. पावणे पाच वाजले होते. आता उरलेल्या वेळात शॉपिंग करायचे ठरले. दिवसभर फिरल्यामुळे सगळे थकलेलो होतो. एका ब्रेकची आवश्यकता होती. हॉटेलवर थोडा वेळ आराम करून शॉपिंगला यायचे ठरले.
|
थिंफूमधील एक दुकान. छोटे मोठे आकाशकंदील (किंवा त्यासारखे काहीतरी) आणि इतर कापडी वस्तू विकायतायत |
भूतान हे काही शॉपिंग डेस्टिनेशन नाही. पूर्ण भूतान मधे एकही मॉल नाही. शॉपिंग ट्रिप करायची असेल तर दुबईला जावे. भूतानच्या वाटेला येऊच नये.
दीप्ती आणि ख़ुशीला शॉपिंगची फारशी हौस नाही. ह्या दोघींपेक्षा मलाच शॉपिंगची जास्त हौस आहे. मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात माझं भूतान मधलं बरंचसं शॉपिंग झालं होतं. त्यामुळे आमचं आजचं शॉपिंग थोडक्यात आटपलं.
मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मला एका दुकानात सोनेरी चकाकणारी नाणी दिसली होती. मी विचारल्यावर दुकानातला मुलगा आधी हि नाणी मला विकायला तयार झाला होता. पण विचार बदलून त्याने मला नाणी विकायला नाहीत म्हणून सांगितले होते. ते दुकान सापडले. आता एक बाई दुकानात बसल्या होत्या. त्यांना मी नाणी विकताय का म्हणून विचारले. हो म्हणाल्या. पंचवीस चेत्रम म्हणजे पंचवीस पैसे मूल्याची सोनेरी चकाकणारी हि नाणी आता चलनातून बाद झालेली होती. दहा रुपयाला एक अशी पाच नाणी घेतली. माझ्या आणि खुशीच्या नाणी, नोटा, स्टॅम्पच्या संग्रहात अजून एक वाढ.
भूतान मधली बरीचशी दुकानं एकतर बायकांच्या मालकीची असतात किंवा बायका चालवतात. भूतानमध्ये आजही पुरुषप्रधान पद्धत नाही. विसाव्या शतकापर्यंत तर लग्न झाल्यावर मुलगा मुलीच्या घरी राहायला जायचा. सर्व प्रॉपर्टी बायकांच्या मालकीची असायची. आईची प्रॉपर्टी तिच्या मुलींना मिळायची, मुलाला नाही. एकविसाव्या शतकात चित्र बदललंय. आता लग्न झाल्यावर मुलाने मुलीच्या घरी जायचे का मुलीने मुलाच्या घरी ते परिस्थिती बघून ठरवले जाते.
हुंडा म्हणजे काय ते आजही इथे कोणाला माहिती नाही. ह्या पद्धतींमुळे समाजातल्या अर्ध्याअधिक समस्या, जशा आपण आपल्या आजूबाजूच्या जगात पाहतो, येतच नाहीत. असं नाहीये कि ह्यांच्या समाजात काही समस्याच नाहीत. समस्या ह्यांच्याकडे पण आहेत. पण त्या मोजक्याच आहेत. आपल्यासारख्या पोत्यापोत्याने नाहीत.
इथली एक समस्या म्हणजे पिऊन पडणारे किंवा धिंगाणा घालणारे. इथे दारू स्वस्त आहे. दारू किराणा दुकानात पण मिळते. विकायला परमिट लागत नाही. भूतानमध्ये फळांचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होतं. इथे manufacturing कॉस्ट सगळ्याचीच कमी आहे. फळं मुबलक असल्याने दारूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. शाकाहारी माणसंही कमी. मांसाहारी जास्त. असो.
शॉपिंग आटोपल्यावर पोटपूजेची आठवण झाली. आज दुपारी क्लॉक टॉवर जवळ फिरताना आपल्याकडे कॅफे कॉफी डे असतं तसं एक रेस्टोरंट दिसलं होतं. तिथे गेलो.
|
थिंफूमधल्या क्लॉक टॉवर जवळचं टॉवर कॅफे |
इथली घड्याळं भारतीय वेळेच्या अर्धा तास पुढे चालतात. वेळेत अर्ध्या
तासाचा फरक. पण इथली जनता भारतीयांपेक्षा अनेक पटींनी सुखी समाधानी
वाटते. पूर्ण भूतानमधे कुठेच भिकारी नाहीत. कुठेही कचऱ्याचे ढीग नाहीत.
ट्रॅफिक नजर लागण्याइतकं शिस्तबद्ध. गर्दी, कोलाहल, फसवाफसवी,
चोऱ्यामाऱ्या कुठेही नाही. इथे गरिबी नाही असं काही नाही. पैश्याने गरीब
लोक सगळीकडे दिसले. पण गरिबी पैश्यात मोजायची नसते हा धडा इथे बऱ्याचदा मिळाला. घरी परत येईपर्यंत गरिबी आणि श्रीमंतीच्या माझ्या
व्याख्या बदलल्या. जणू काही आदर्श देश कसा असावा, त्याचा गुणवान राजा आणि
त्याची समाधानी प्रजा कशी असावी, आणि त्यांची योग्य जीवनपद्धती कशी असावी
ह्याचा पाठच जगाला घालून देतायत इथे द्रुक यूल (म्हणजे भूतान) मधे.
No comments:
Post a Comment