Tuesday, December 12, 2017

भटकंतीच्या क्षमतेची सत्वपरीक्षा - K2S

एखाद्याच्या हृदयाचं कार्य व्यवस्थित चाललंय कि नाही ते बघायला ट्रेडमिल टेस्ट करून ECG काढतात.  अगदी तंतोतंत नाही पण ढोबळमानाने निष्कर्ष कळून जातो.  त्याचप्रमाणे पुण्यातल्या ट्रेकर्सना स्वतःच्या भटकंतीच्या क्षमतेची सत्वपरीक्षा करायची असेल तर एक उत्तम जागा आहे.  K2S म्हणून ओळखतात.  साधारण १३ किलोमीटरचे अंतर.  १६ टेकड्या चढायच्या आणि उतरायच्या.  कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून सिंहगडापर्यंत.

शनिवार ९ डिसेंबरच्या रात्री आम्हा सहा स्वछंद गिर्यारोहकांचा हा योग जमून आला.  तसे आमच्यात नवे नवखे कोणीच नव्हते.  त्यामुळे परीक्षा कोणाचीच नव्हती.  ९ च्या आसपास एक एक करत स्वारगेटला हजर झालो.  काहीजण जेऊन तर काहीजण न जेवता.

टोळके :
१. अमित
२. अमोल
३. गुरुदास 
४. प्रशांत
५. विशाल (म्होरक्या)
६. योगेश

साडेनऊच्या PMT मधे बसायला जागा मिळाली.  कात्रज बोगद्यातून बाहेर पडल्यावर बसमधून उतरलो.  आवरा आवरी करून दहाला चालायला सुरुवात झाली.  वाघजाई मंदिरा समोर खाद्य विश्रांती करून पुढे निघालो.

सर्वांचा वेग चांगला होता.  नवखे कोणीच नसल्यामुळे आजचा ट्रेक वेळेत पूर्ण होणार हा अंदाज आला.  लीड ला राहण्याच्या मोहात न पडता आज मी सर्वात मागे राहायचे ठरवले.

एकमेकाला समजून घेऊन मिळून मिसळून राहणाऱ्या अशा मंडळींबरोबर अवघड ट्रेकही सोपा होऊन जातो.

प्रशांतच्या कॅमेऱ्यातुन ...   सेल्फी टाइम
स्लो मुव्हींग ट्रॅफिक आम्ही सुरुवातीलाच मागे टाकली होती.  गप्पांमध्ये फार अडकून न पडता आम्ही चांगल्या वेगाने पुढे सरकत होतो.  गप्पांचं गुऱ्हाळ सुरु झालं कि पायगाडीचा वेग मंदावतो.  तसे रात्रभरात शेकडो विषय चघळून झाले.

रात्र जशीजशी सरत होती तशी एकेक टेकडी मागे पडत होती.

दोन ठिकाणी गाई गुरं आडोशाला बसलेली.  त्यांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण दूरपर्यंत ऐकू येत होती.  त्यांना असं रात्रभर बसण्यात काही धोका नव्हता.  कारण इथे वन्य प्राणी कोणीही नाहीत.  सध्या मनुष्य नावाच्या प्राण्याने इतर प्राणिमात्रांसाठी जागाच सोडलेली नाही.

अमितच्या कॅमेऱ्यातुन ...   निद्रादेवीच्या अधीन पुणे आणि पिंपरी चिंचवड


ह्या ट्रेक मधे रॉक पॅच कुठेच नाही.  घसाऱ्याचा (scree) त्रास फारतर एखाद्याच जागी.  काट्याकुट्यांनी भरलेल्या झाडोऱ्यातून वाट शोधावी लागत नाही.  सरळसोट पायवाटेनं चालत राहायचं.  फक्त लांडगे ज्याप्रमाणे त्यांच्या सावजाला पळून पळून थकवतात त्याप्रमाणे १६ टेकड्या आपला चालून चालून जीव काढतात.  एकेकीचा विचार केला तर ह्या टेकड्यांमध्ये फारसा दम नाही.  पण एकत्रितरित्या सर्व मिळून एक वेगळीच अनुभूती देऊन जातात.  K2S नावाची.

दहा वगैरे टेकड्या झाल्या असतील.  आता अमितचा डावा पाय दुखायला लागला.  दोन महिन्यापूर्वीच्या ऍक्सीडेन्ट नंतरचा त्याचा हा पहिलाच मोठा ट्रेक.  इथून पुढे अमित बसला कि आमचा छोटा ब्रेक.  असे करत करत सिंहगडच्या गाडीरस्त्याला लागलो.  इथून गडावर जायला काही मिळते का हा आमचा शोध लवकरच संपला.  एक जीपवाला खाली आला आम्हाला शोधत.  वर जाणाऱ्या एका रिक्षाने त्याला सांगितले होते.  जीपमधून सिंहगड गाठला.  गेल्या पाच सहा वर्षात मी इकडे फिरकलेलो नव्हतो.  ह्या परिसरातले मागच्या तीसेक वर्षातले बदल डोळ्यासमोर तरळून गेले.  दुसरीत असताना इथे पहिल्यांदा आलो होतो.

बोचऱ्या थंडीने परिसराचा ताबा घेतलेला.  सूर्योदय अजून व्हायचा होता.  पण पुणेकर त्याआधीच सिंहगडावर पोहोचलेले.  सिंहगड - इतिहास - पर्यटन - पुणे - ह्या गोष्टींबद्दल न बोललेलंच बरं.  तसं वेगवेगळे बघितले तर चारही विषय उत्तम आहेत.  पण मला इथे काय म्हणायचंय ते तुम्हाला कळलं असेलच.  सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

सिंहगडावरून पाहताना ...   आम्ही चालून आलो त्या १६ टेकड्या

आम्ही थांबलो ती जागा सूर्योदय पाहण्यासाठी एकदम मोक्याची होती.  प्रशांत आणि अमितने त्यांच्या लेन्सच्या कॅमेऱ्यांमधून सूर्योदय टिपला.  सूर्यदेवाचे आगमन झाल्यानंतर हळूहळू थंडीने काढता पाय घेतला.  त्या वेळी परिसरातल्या सर्व जनमानसात आम्ही सहा जण वेगळे दिसत असू.  भल्या पहाटेच पूर्णपणे थकलेले, झोपाळलेले.

गडावर फिरून यायचा आमचा बेत होता.  अमितने दुखऱ्या पायामुळे त्यातून माघार घेतली.  मग इतरांनीही तो विचार सोडून दिला.

प्रशांतच्या कॅमेऱ्यातुन ...   सूर्योदयाची केशरी उधळण
K2S जिंकलेल्या आम्हा सहा जणांनी आता पावलं उचलेनात.  नरवीर सिंहाचा गड समोर उभा ठाकलेला.  माझ्या राजाच्या शब्दाखातर मी रात्रीत घोरपडीमागून चढलो.  छाती फुटेस्तोवर उदेभानाचे घाव झेलले.  कल्याण दरवाजात उभे राहून बघा ४ फेब्रुवारी १६७० ची ती रात्र आठवते का.

सिंहगडावरची न्याहारी - कांदाभजी आणि भाकरी भरीत

जीपवाल्याचा शोध घेऊन त्याला पाचारण करण्यात आले.  जीपमधून गडाच्या पायथ्याला पोहोचलो.  रात्रीप्रमाणे दिवसाही आमचे नशीब चांगले होते.  काही मिनिटातच बस आली.  स्वारगेट येईपर्यंत बस मधे जमेल तशा डुलक्या घेतल्या.  झोपेचा खूप मोठा साठा बाकी होता.  पुढचा स्वारगेट ते पिंपळे सौदागर प्रवासही बसमधे डुलक्या काढण्यात गेला.  बस स्टॉप पासून घरी जाणं हे एक वेगळेच प्रकरण ठरले.  पाय थकले नव्हते, पण निद्रादेवीचा कोप होतो कि काय असे वाटायला लागले.  रविवारच्या दिवसभरात झोप हा एकच विषय.  पण K2S व्यवस्थितरित्या खिशात घातल्याचे समाधान त्यापेक्षा जास्त.

कधीतरी असं reset बटण दाबणं फार उपयुक्त असतं.  मग रोजचं रहाटगाडं ओढायला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात.

No comments:

Post a Comment