वृश्चिक संक्रांतीच्या पुण्य मुहूर्तावर (फिरंगी कालगणनेनुसार १६ नोव्हेंबरच्या सकाळी) कैलासगड आणि जमलं तर घनगड पदरात पाडुन घ्यायचा बेत ठरवला. माझा दिवस साडेचार वाजता उजाडला. राहुल उठल्याची खातरजमा करून त्याच्या घराकडे कूच केले. पुढे विशाल आणि यज्ञेशना उचलेपर्यंत घड्याळाचे काटे सहा पर्यंत पोहोचले. चौघं गाडीत स्थिरावल्यावर प्लॅन मे चेंज, कैलासगड च्या ऐवजी उपांड्या घाट आणि मढे घाट करायचे ठरले.
आजचे स्वछंद गिर्यारोहक :
१. राहुल आवटे
२. विशाल काकडे
३. यज्ञेश गंद्रे
४. योगेश सावंत
आजचा पहिला प्रश्न होता पोटाची खळगी भरण्याचा. एवढ्या सकाळी कुठेच काही मिळणार नव्हते. गाडी पुण्यनगरीपासून दूर जाताना विशालने काकांना फोन करून तो प्रश्न सोडवला. साडेसातला आम्ही मिसळीवर ताव मारत होतो. काकांना जेवणाची ऑर्डर देऊन मार्गस्थ झालो रायलिंग पठाराच्या दिशेने. सिंगापूरच्या वाटेने पुढे जात गुगल मॅप ने दाखवलेल्या लिंगाणा पार्किंग ह्या ठिकाणापर्यंत गाडी दामटवली. विशाल आणि यज्ञेशला ह्या भागातले सर्व रस्ते पाठ. गावातल्या एका माणसाच्या सांगण्याप्रमाणे एका ठिकाणी गाडी लावून दिली. आमच्या भोवती आजूबाजूची आठ दहा पोरं गोळा झाली. आपल्या गावात हे कोण आलंय बघायला.
पायगाडीला सुरुवात झाल्याझाल्या यज्ञेश आणि विशालने वेग पकडला. रायलिंग पठार हे प्रकरण मला नवीन होतं. सह्याद्रीच्या खडकाळ माळरानात जमतील तिथं झाडं झुडुपं आणि इतर ठिकाणी सुकलेलं रानगवत. मधेच कुठेतरी काटेरी. वाट शोधायला यज्ञेश आणि विशाल पुढे, आणि त्यांच्या मागून राहुल आणि मी. समोर लिंगाणा दिसायला लागल्यावर पावलं झपाझप पडली नाहीत तर नवल.
|
रायलिंग पठारावरून समोर रायगडाचा रखवालदार लिंगाणा
उजवीकडे लांबवर दुर्ग दुर्गेश्वर रायगड |
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरच्या ह्या पठाराला रायलिंग का म्हणतात त्याचे उत्तर इथून समोरच दिसते. समोर उभा अजोड अभेद्य
लिंगाणा आणि लांबवर दुर्ग दुर्गेश्वर रायगड.
लिंगाण्यावर जायची वाट आणि खडकात कोरलेल्या गुहा इथून दिसल्या. जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी १६४८ मधे लिंगाणा किल्ला बांधून घेतला. इथल्या गुहांमध्ये कैदी ठेवले जात. १८१८ साली ब्रिटिशांनी लिंगाणा घेतल्यावर इथे जायच्या पायऱ्या, सदर, बुरुज, दरवाजे, तटबंदी सर्व काही उध्वस्त केले. सध्या लिंगाण्यावर जाण्यासाठी प्रस्तररोहणाचे तंत्र वापरण्याला पर्याय नाही. दुरूनही अंदाज येतो - लिंगाण्यावर पोहोचण्याचा मार्ग जितका अवघड तितकाच वर पोहोचल्यावरचा आनंद त्रिशतकी असेल.
|
लिंगाण्याचं दुरून दर्शन |
इथे किती वेळ थांबलं तरी मन भरत नव्हतं आणि चला आता म्हणायला कोणीच तयार नव्हतं. दिवसभरात उपांड्या घाट आणि मढे घाट करायचा असल्यामुळे कसेबसे परत फिरलो.
थोड्या अंतरावर बोराट्याची नाळ खुणावत होती. यज्ञेशचा विचार होता थोडं पुढे जाऊन यायचा. विशालने दूरदृष्टीने तो हणून पाडला. बोराट्याच्या नाळेला दुरून नमस्कार करून पुढे निघालो.
|
बोराट्याच्या नाळेला दुरून नमस्कार |
आमची परत जातानाची वाट आलेल्या वाटेपेक्षा वेगळी होती. पुन्हा एकदा विशाल आणि यज्ञेश वाट शोधायला, तर राहुल आणि मी त्यांच्या मागून. विशाल आणि यज्ञेशचं वाटा शोधण्याचं तंत्र अचूक होतं. तरीपण काही वेळा काटेरी रानातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अंदाज घेत घेत, काही ठिकाणी गर्द झाडीतून मार्ग काढत पुढे जात होतो. एका ठिकाणी येऊन बोध झाला - आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथून पुढे जाण्यासाठी गर्द झाडीने भरलेला चढ चढायचा आहे. परत मागे जाण्याचा पर्याय योग्य नव्हता. वेळ, पाणी, आणि शक्तीचा विचार करता. जमेल तसे पुढे सरकत राहिलो. चढून आल्यावर मागे वळून पहिले - आपण कुठून वर आलोय ते.
|
अशा ठिकाणी वर चढून येणं जितकं बोचरं त्रासदायक तितकंच वर पोहोचल्यावरचं समाधान स्फुर्तीदायक |
कपड्यांवर अडकलेले काटेकुटे काढून काढून थकलो. यज्ञेशने तर तो प्रयत्नच सोडून दिला.
विशाल आणि यज्ञेशच्या बिनतोड दिशाज्ञानाने गाडीची जागा अचूक हेरली. आता आमची गाडी निघाली उपांड्या घाटाकडे. राहुलने गाडी चालवून मला आराम दिला. तसेच ऑटोमोबाईल इंजिनीरिंग ह्या विषयी राहुलकडून आम्हाला काही ज्ञान प्राप्ती झाली.
रस्ते कसेही असले तरी २०५ मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स आणि रुंद टायरची निसान टेरॅनो सर्व जागी पोहोचते. गावातल्या शाळेचं आवार ही पार्किंगसाठी योग्य जागा.
|
पार्किंगसाठी योग्य जागा - गावातल्या शाळेचं आवार |
काही शेतं पार करून उपांड्या घाटाच्या दिशेने निघालो. वाटेत एक शांत जागा पाहून खाद्य विश्रांती साठी थांबलो. जेवणाची वेळ झाली होती. पण आम्ही जेवणार होतो उपांड्या घाट उतरून आणि मढे घाट चढून वर आल्यावर.
|
खाद्य विश्रांती साठी निवडलेली जागा |
उपांड्या घाटाच्या सुरुवातीपासून बऱ्याच अंतरापर्यंत एक लोखंडी पाईप आहे. हा वापरात नाही. कधी काळी वापरात असावा खालच्या गावात पाणी पुरवण्यासाठी.
|
उपांड्या घाटाची सुरुवात |
घाटाची उतरण सुरु झाल्यावर राहुल आणि मी वेग वाढवला. एकच वाट उतरत जात असल्यामुळे चुकायचा प्रश्नच नव्हता. विशाल आणि यज्ञेशने गप्पांचा गियर टाकलेला.
|
उपांड्या घाटातून दिसलेलं पठार आणि पलीकडे दरी |
अर्ध्या तासात आम्ही घाट उतरून खालच्या पठारावर पोहोचलो. आता उजवीकडे वळत पुढे जाऊन मढे घाटाची वाट शोधायची होती.
|
खालच्या पठारावरून दिसलेला उपांड्या घाट व मढे घाट |
गावातून पुढे गेल्यावर एक झरा आहे. तो झरा ओलांडल्यावर मढे घाटाची वाट आहे - इति यज्ञेश आणि विशाल. वाट शोधताना परत यज्ञेश आणि विशाल पुढे, आणि त्यांच्या मागून राहुल आणि मी.
|
स्वछंद गिर्यारोहक यज्ञेश गंद्रे |
अशा सुकलेल्या गवतात फोटो छान येतात हे मला महाबळेश्वरच्या परिसरात फिरून माहिती आहे. उपांड्या घाट उतरल्यानंतर तासभर आम्ही ह्या सपाट वाटेने भटकत होतो.
वाटेशेजारी एक मंदिर दिसले. मंदिराच्या आवारात कोंबडीचा नेवैद्य झाल्याच्या खुणा होत्या. एका तुटलेल्या वीरगळीचा वरचा भाग, एका भंगलेल्या मूर्तीचा वरचा भाग मंदिराच्या आवारात विखुरलेले.
|
भंगलेल्या आणि तुटलेल्या मूर्ती बघताना एक गोष्ट कळते ती म्हणजे शिवाजी या नावाला एवढे महत्व का दिले जाते ते...
काय माहिती आज या मूर्तीचा एवढातरी भाग पाहायला मिळाला असता की नाही ते...
-- शंतनू परांजपे |
मंदिराच्या बाजूने पुढे निघालो तोच एक दर्शनाला आलेले कुटुंब भेटले. आरामात घरी बसायचं सोडून आम्ही इथे का भटकतोय हा त्यांचा साधा सोपा प्रश्न. त्यांच्या प्रश्नाला जमेल तसं उत्तर देऊन, पुढची वाट विचारून, आम्ही मार्गस्त झालो. थोडं पुढे एक वीरगळ दिसली. आम्हाला अर्थबोध काही झाला नाही.
|
वीरगळ |
पुढे वाट झाडाझुडूपात हरवत चाललेली. एका ठिकाणी झरा लागला, पण आम्ही झरा ओलांडण्याचा योग्य ठिकाणी आलेलो नव्हतो. विशाल आणि यज्ञेशच्या सल्ला मसलतीतून निर्णय झाला - इथे वाटा हुडकत भटकण्यापेक्षा परत त्या देवळापर्यंत मागे फिरून तिथून योग्य वाट शोधावी. त्याप्रमाणे देवळापर्यंत येऊन आमची वाट शोधायला सुरुवात. नंतर लक्षात आले - आम्ही त्या देवळाकडे आणि त्याच्या पलीकडच्या भागात उगाच शिरलो होतो. देवळाकडे न वळता आणखी सरळ गेलो असतो तर योग्य वाटेने झरा गाठला असता. पण रानातल्या अशा वाटा शोधण्याचा आनंद काही औरच. सरळ सोप्या वहिवाटेवर तो कसा मिळायचा.
झरा पार करून मढे घाटाची वाट पकडली. घाट सुरु झाल्यावर चुकण्याचा प्रश्न नव्हताच. आता राहुल आणि मी वेग वाढवला. आज आम्ही दोघं मारुतीरायाला नमस्कार करून आलो होतो. तर यज्ञेश आणि विशालने घाट चढता उतरताना महिनाभराच्या राहिलेल्या गप्पा संपवल्या. मढे घाट चढून आल्यावर धबधबा दिसला.
थोडंसं इतिहासात डोकावताना... का म्हणतात ह्याला मढे घाट
४ फेब्रुवारी १६७० ची रात्र. नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, आणि सातशे मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. कोंढाणा स्वराज्यात आणला. पण ह्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. त्यांची अंत्ययात्रा ज्या घाटातून त्यांच्या उमरठ गावी नेली, तो हा मढे घाट.
|
मढे घाटाच्या सुरुवातीचा धबधबा |
मढे घाटाच्या वरपासून धबधब्यापर्यंत सगळीकडे आचरट पर्यटकांनी केलेला विचकट कचरा. असो. एकविसावं शतक हे प्लास्टिकचं आणि कचऱ्याचं आहे.
पावणे पाचला गाडीजवळ पोहोचलो. आता पोटातले कावळे वरून काहीतरी मोठं पडण्याची आशा करून बसलेले. सकाळपासून त्यांना फक्त जिवंत ठेवण्यापुरता खुराक दिला होता आम्ही वेळोवेळी.
जाताना एका ठिकाणी थांबून तोरण्याचे फोटो काढले.
|
गरुडाचं घरटं ... किल्ले तोरणा |
इथे रस्त्याला वर्दळ फारशी नाही. पण रस्ता मात्र सुरेख सुंदर गुळगुळीत. का ते थोड्या नंतर कळले. बारामतीच्या एका शेतकरी बाईंनी इथे भरपूर जमीन घेतली आहे. विकत कि कशी ते कळू शकले नाही. त्यामुळे रस्त्याचा एकदम कायापालट झालाय.
गुंजवणे धरणाच्या परिसरात आल्यावर गाडी थांबवावीच लागली.
|
गुंजवणे धरणाच्या परिसरातला नितांत सुंदर सूर्यास्त |
काकांच्या हॉटेलात तुडुंब जेवलो.
पुण्यनगरीत परतताना एक सापप्रसंग घडला. झाले असे कि एका वळणानंतर अचानक समोर नक्षीदार अंगाचा मजबूत साप. रस्ता सपाट गुळगुळीत आणि वर्दळ फारशी नाही. त्यामुळे गाडी वेगात चाललेली. त्याला मी गाडीच्या चाकांच्या मधे घेतला जेणेकरून कोणतं चाक त्याच्यावरून जाणार नाही. माझ्या बाजूला डुलक्या काढत असलेल्या राहुलला सापाचा पत्ताच नव्हता. पण माझ्या मागच्या सीट वर बसलेल्या यज्ञेशने साप अचूक ओळखला. त्याचं म्हणणं एकच - तू गाडी थांबव. आणि मी त्याला परत परत सांगतोय - अरे मी नाही त्याला मारला, मी त्याला मधे घेतला गाडीच्या चाकांच्या. यज्ञेश, विशाल, आणि राहुल गाडीतून उतरून बघून आले. साप पळून गेला होता. माझ्यासाठी एकच चांगली गोष्ट झाली - मी त्याला मारलेलं नाही हे स्पष्ट झालं ज्याअर्थी तो पळून गेला होता.
नंतर यज्ञेशने सापांविषयी आमच्या ज्ञानात बरीच भर घातली.
अशा रीतीने दिवसभराची स्वछंद गिरिभ्रमणाची मेजवानी लुटून घरी परतलो.
Awesome blog... Sure will help everyone
ReplyDeleteधन्यवाद शिरीष
DeleteGood info
ReplyDelete