Showing posts with label mountain pass. Show all posts
Showing posts with label mountain pass. Show all posts

Friday, December 8, 2017

रायलिंग पठार, उपांड्या घाट, आणि मढे घाट - एक स्वछंद गिरिभ्रमंती

वृश्चिक संक्रांतीच्या पुण्य मुहूर्तावर (फिरंगी कालगणनेनुसार १६ नोव्हेंबरच्या सकाळी) कैलासगड आणि जमलं तर घनगड पदरात पाडुन घ्यायचा बेत ठरवला.  माझा दिवस साडेचार वाजता उजाडला.  राहुल उठल्याची खातरजमा करून त्याच्या घराकडे कूच केले.  पुढे विशाल आणि यज्ञेशना उचलेपर्यंत घड्याळाचे काटे सहा पर्यंत पोहोचले.  चौघं गाडीत स्थिरावल्यावर प्लॅन मे चेंज, कैलासगड च्या ऐवजी उपांड्या घाट आणि मढे घाट करायचे ठरले.

आजचे स्वछंद गिर्यारोहक :
१. राहुल आवटे
२. विशाल काकडे
३. यज्ञेश गंद्रे
४. योगेश सावंत

आजचा पहिला प्रश्न होता पोटाची खळगी भरण्याचा.  एवढ्या सकाळी कुठेच काही मिळणार नव्हते.  गाडी पुण्यनगरीपासून दूर जाताना विशालने काकांना फोन करून तो प्रश्न सोडवला.  साडेसातला आम्ही मिसळीवर ताव मारत होतो.  काकांना जेवणाची ऑर्डर देऊन मार्गस्थ झालो रायलिंग पठाराच्या दिशेने.  सिंगापूरच्या वाटेने पुढे जात गुगल मॅप ने दाखवलेल्या लिंगाणा पार्किंग ह्या ठिकाणापर्यंत गाडी दामटवली.  विशाल आणि यज्ञेशला ह्या भागातले सर्व रस्ते पाठ.  गावातल्या एका माणसाच्या सांगण्याप्रमाणे एका ठिकाणी गाडी लावून दिली.  आमच्या भोवती आजूबाजूची आठ दहा पोरं गोळा झाली.  आपल्या गावात हे कोण आलंय बघायला.

पायगाडीला सुरुवात झाल्याझाल्या यज्ञेश आणि विशालने वेग पकडला.  रायलिंग पठार हे प्रकरण मला नवीन होतं.  सह्याद्रीच्या खडकाळ माळरानात जमतील तिथं झाडं झुडुपं आणि इतर ठिकाणी सुकलेलं रानगवत.  मधेच कुठेतरी काटेरी.  वाट शोधायला यज्ञेश आणि विशाल पुढे, आणि त्यांच्या मागून राहुल आणि मी.  समोर लिंगाणा दिसायला लागल्यावर पावलं झपाझप पडली नाहीत तर नवल.

रायलिंग पठारावरून समोर रायगडाचा रखवालदार लिंगाणा
उजवीकडे लांबवर दुर्ग दुर्गेश्वर रायगड
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरच्या ह्या पठाराला रायलिंग का म्हणतात त्याचे उत्तर इथून समोरच दिसते.  समोर उभा अजोड अभेद्य लिंगाणा आणि लांबवर दुर्ग दुर्गेश्वर रायगड.

लिंगाण्यावर जायची वाट आणि खडकात कोरलेल्या गुहा इथून दिसल्या.  जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी १६४८ मधे लिंगाणा किल्ला बांधून घेतला.  इथल्या गुहांमध्ये कैदी ठेवले जात.  १८१८ साली ब्रिटिशांनी लिंगाणा घेतल्यावर इथे जायच्या पायऱ्या, सदर, बुरुज, दरवाजे, तटबंदी सर्व काही उध्वस्त केले.  सध्या लिंगाण्यावर जाण्यासाठी प्रस्तररोहणाचे तंत्र वापरण्याला पर्याय नाही.  दुरूनही अंदाज येतो - लिंगाण्यावर पोहोचण्याचा मार्ग जितका अवघड तितकाच वर पोहोचल्यावरचा आनंद त्रिशतकी असेल.

लिंगाण्याचं दुरून दर्शन
इथे किती वेळ थांबलं तरी मन भरत नव्हतं आणि चला आता म्हणायला कोणीच तयार नव्हतं.  दिवसभरात उपांड्या घाट आणि मढे घाट करायचा असल्यामुळे कसेबसे परत फिरलो.

थोड्या अंतरावर बोराट्याची नाळ खुणावत होती.  यज्ञेशचा विचार होता थोडं पुढे जाऊन यायचा.  विशालने दूरदृष्टीने तो हणून पाडला.  बोराट्याच्या नाळेला दुरून नमस्कार करून पुढे निघालो.

बोराट्याच्या नाळेला दुरून नमस्कार


आमची परत जातानाची वाट आलेल्या वाटेपेक्षा वेगळी होती.  पुन्हा एकदा विशाल आणि यज्ञेश वाट शोधायला, तर राहुल आणि मी त्यांच्या मागून.  विशाल आणि यज्ञेशचं वाटा शोधण्याचं तंत्र अचूक होतं.  तरीपण काही वेळा काटेरी रानातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.  अंदाज घेत घेत, काही ठिकाणी गर्द झाडीतून मार्ग काढत पुढे जात होतो.  एका ठिकाणी येऊन बोध झाला - आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथून पुढे जाण्यासाठी गर्द झाडीने भरलेला चढ चढायचा आहे.  परत मागे जाण्याचा पर्याय योग्य नव्हता.  वेळ, पाणी, आणि शक्तीचा विचार करता.  जमेल तसे पुढे सरकत राहिलो.  चढून आल्यावर मागे वळून पहिले - आपण कुठून वर आलोय ते.

अशा ठिकाणी वर चढून येणं जितकं बोचरं त्रासदायक तितकंच वर पोहोचल्यावरचं समाधान स्फुर्तीदायक
कपड्यांवर अडकलेले काटेकुटे काढून काढून थकलो.  यज्ञेशने तर तो प्रयत्नच सोडून दिला.

विशाल आणि यज्ञेशच्या बिनतोड दिशाज्ञानाने गाडीची जागा अचूक हेरली.  आता आमची गाडी निघाली उपांड्या घाटाकडे.  राहुलने गाडी चालवून मला आराम दिला.  तसेच ऑटोमोबाईल इंजिनीरिंग ह्या विषयी राहुलकडून आम्हाला काही ज्ञान प्राप्ती झाली.

रस्ते कसेही असले तरी २०५ मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स आणि रुंद टायरची निसान टेरॅनो सर्व जागी पोहोचते.  गावातल्या शाळेचं आवार ही पार्किंगसाठी योग्य जागा.

पार्किंगसाठी योग्य जागा - गावातल्या शाळेचं आवार
काही शेतं पार करून उपांड्या घाटाच्या दिशेने निघालो.  वाटेत एक शांत जागा पाहून खाद्य विश्रांती साठी थांबलो.  जेवणाची वेळ झाली होती.  पण आम्ही जेवणार होतो उपांड्या घाट उतरून आणि मढे घाट चढून वर आल्यावर.

खाद्य विश्रांती साठी निवडलेली जागा

उपांड्या घाटाच्या सुरुवातीपासून बऱ्याच अंतरापर्यंत एक लोखंडी पाईप आहे.  हा वापरात नाही.  कधी काळी वापरात असावा खालच्या गावात पाणी पुरवण्यासाठी.

उपांड्या घाटाची सुरुवात

घाटाची उतरण सुरु झाल्यावर राहुल आणि मी वेग वाढवला.  एकच वाट उतरत जात असल्यामुळे चुकायचा प्रश्नच नव्हता.  विशाल आणि यज्ञेशने गप्पांचा गियर टाकलेला.


उपांड्या घाटातून दिसलेलं पठार आणि पलीकडे दरी
अर्ध्या तासात आम्ही घाट उतरून खालच्या पठारावर पोहोचलो.  आता उजवीकडे वळत पुढे जाऊन मढे घाटाची वाट शोधायची होती.

खालच्या पठारावरून दिसलेला उपांड्या घाट व मढे घाट
गावातून पुढे गेल्यावर एक झरा आहे.  तो झरा ओलांडल्यावर मढे घाटाची वाट आहे - इति यज्ञेश आणि विशाल.  वाट शोधताना परत यज्ञेश आणि विशाल पुढे, आणि त्यांच्या मागून राहुल आणि मी.


स्वछंद गिर्यारोहक यज्ञेश गंद्रे
अशा सुकलेल्या गवतात फोटो छान येतात हे मला महाबळेश्वरच्या परिसरात फिरून माहिती आहे.  उपांड्या घाट उतरल्यानंतर तासभर आम्ही ह्या सपाट वाटेने भटकत होतो.

वाटेशेजारी एक मंदिर दिसले.  मंदिराच्या आवारात कोंबडीचा नेवैद्य झाल्याच्या खुणा होत्या.  एका तुटलेल्या वीरगळीचा वरचा भाग, एका भंगलेल्या मूर्तीचा वरचा भाग मंदिराच्या आवारात विखुरलेले.

भंगलेल्या आणि तुटलेल्या मूर्ती बघताना एक गोष्ट कळते ती म्हणजे शिवाजी या नावाला एवढे महत्व का दिले जाते ते...
काय माहिती आज या मूर्तीचा एवढातरी भाग पाहायला मिळाला असता की नाही ते...
-- शंतनू परांजपे
मंदिराच्या बाजूने पुढे निघालो तोच एक दर्शनाला आलेले कुटुंब भेटले.  आरामात घरी बसायचं सोडून आम्ही इथे का भटकतोय हा त्यांचा साधा सोपा प्रश्न.  त्यांच्या प्रश्नाला जमेल तसं उत्तर देऊन, पुढची वाट विचारून, आम्ही मार्गस्त झालो.  थोडं पुढे एक वीरगळ दिसली.  आम्हाला अर्थबोध काही झाला नाही.

वीरगळ
पुढे वाट झाडाझुडूपात हरवत चाललेली.  एका ठिकाणी झरा लागला, पण आम्ही झरा ओलांडण्याचा योग्य ठिकाणी आलेलो नव्हतो.  विशाल आणि यज्ञेशच्या सल्ला मसलतीतून निर्णय झाला - इथे वाटा हुडकत  भटकण्यापेक्षा परत त्या देवळापर्यंत मागे फिरून तिथून योग्य वाट शोधावी.  त्याप्रमाणे देवळापर्यंत येऊन आमची वाट शोधायला सुरुवात.  नंतर लक्षात आले - आम्ही त्या देवळाकडे आणि त्याच्या पलीकडच्या भागात उगाच शिरलो होतो.  देवळाकडे न वळता आणखी सरळ गेलो असतो तर योग्य वाटेने झरा गाठला असता.  पण रानातल्या अशा वाटा शोधण्याचा आनंद काही औरच.  सरळ सोप्या वहिवाटेवर तो कसा मिळायचा.

झरा पार करून मढे घाटाची वाट पकडली.  घाट सुरु झाल्यावर चुकण्याचा प्रश्न नव्हताच.  आता राहुल आणि मी वेग वाढवला.  आज आम्ही दोघं मारुतीरायाला नमस्कार करून आलो होतो.  तर यज्ञेश आणि विशालने घाट चढता उतरताना महिनाभराच्या राहिलेल्या गप्पा संपवल्या.  मढे घाट चढून आल्यावर धबधबा दिसला.

थोडंसं इतिहासात डोकावताना...   का म्हणतात ह्याला मढे घाट
४ फेब्रुवारी १६७० ची रात्र.  नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, आणि सातशे मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.  कोंढाणा स्वराज्यात आणला.  पण ह्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.  त्यांची अंत्ययात्रा ज्या घाटातून त्यांच्या उमरठ गावी नेली, तो हा मढे घाट.

मढे घाटाच्या सुरुवातीचा धबधबा
मढे घाटाच्या वरपासून धबधब्यापर्यंत सगळीकडे आचरट पर्यटकांनी केलेला विचकट कचरा.  असो.  एकविसावं शतक हे प्लास्टिकचं आणि कचऱ्याचं आहे.

पावणे पाचला गाडीजवळ पोहोचलो.  आता पोटातले कावळे वरून काहीतरी मोठं पडण्याची आशा करून बसलेले.  सकाळपासून त्यांना फक्त जिवंत ठेवण्यापुरता खुराक दिला होता आम्ही वेळोवेळी.

जाताना एका ठिकाणी थांबून तोरण्याचे फोटो काढले.

गरुडाचं घरटं ... किल्ले तोरणा
इथे रस्त्याला वर्दळ फारशी नाही.  पण रस्ता मात्र सुरेख सुंदर गुळगुळीत.  का ते थोड्या नंतर कळले.  बारामतीच्या एका शेतकरी बाईंनी इथे भरपूर जमीन घेतली आहे.  विकत कि कशी ते कळू शकले नाही.  त्यामुळे रस्त्याचा एकदम कायापालट झालाय.

गुंजवणे धरणाच्या परिसरात आल्यावर गाडी थांबवावीच लागली.


गुंजवणे धरणाच्या परिसरातला नितांत सुंदर सूर्यास्त
काकांच्या हॉटेलात तुडुंब जेवलो.

पुण्यनगरीत परतताना एक सापप्रसंग घडला.  झाले असे कि एका वळणानंतर अचानक समोर नक्षीदार अंगाचा मजबूत साप.  रस्ता सपाट गुळगुळीत आणि वर्दळ फारशी नाही.  त्यामुळे गाडी वेगात चाललेली.  त्याला मी गाडीच्या चाकांच्या मधे घेतला जेणेकरून कोणतं चाक त्याच्यावरून जाणार नाही.  माझ्या बाजूला डुलक्या काढत असलेल्या राहुलला सापाचा पत्ताच नव्हता.  पण माझ्या मागच्या सीट वर बसलेल्या यज्ञेशने साप अचूक ओळखला.  त्याचं म्हणणं एकच - तू गाडी थांबव.  आणि मी त्याला परत परत सांगतोय - अरे मी नाही त्याला मारला, मी त्याला मधे घेतला गाडीच्या चाकांच्या.  यज्ञेश, विशाल, आणि राहुल गाडीतून उतरून बघून आले.  साप पळून गेला होता.  माझ्यासाठी एकच चांगली गोष्ट झाली - मी त्याला मारलेलं नाही हे स्पष्ट झालं ज्याअर्थी तो पळून गेला होता.

नंतर यज्ञेशने सापांविषयी आमच्या ज्ञानात बरीच भर घातली.

अशा रीतीने दिवसभराची स्वछंद गिरिभ्रमणाची मेजवानी लुटून घरी परतलो.

Monday, October 30, 2017

उडत्या ड्रॅगनच्या देशात - दिवस सहावा - थिंफू ते पुनाखा

मंगळवार १७ ऑक्टोबर २०१७

प्लॅन प्रमाणे आज थिंफू सोडून पुनाखा कडे प्रयाण.  कालच परमिट एक्सटेन्ड केल्यामुळे आज सकाळी ब्रेकफास्ट नंतर नऊ वाजता पुनाखाला निघायचा बेत होता.  थिंफू ते पुनाखा साधारण नव्वद किलोमीटर आणि अडीज तास.  वाटेत डोचूला पासचा ब्रेक पकडून तीन तास.

पुनाखाकडे प्रयाण केल्यानंतर अर्ध्या तासाने चेकपोस्टपाशी पोहोचलो.  इथे परमिट चेक करून घेतले.  मी पटकन एक फोटो काढला.

चेकपोस्ट

चेकपोस्ट पासून निघाल्यावर दहा मिनिटात डोचूला पास आला.  इथे वीसेक गाड्या थांबलेल्या.  पर्यटकांची वर्दळ.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात हि जागा स्वप्नवत वाटली होती.  गर्दीमुळे आज साध्या वेशात आलेल्या राजासारखी भासली.

समोरच्या टेकडीवरच्या द्रुक वान्ग्याल हखांग (म्हणजे एक बौद्ध मठ) कडे आधी मोर्चा वळवला.  हि वास्तू २००८ मधे बांधून पूर्ण झाली.  भूतान मधल्या सध्याच्या राजसत्तेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हि वास्तू बांधली आहे.  सर्वच देशात आता राजसत्ता एकतर निकाली निघाली आहे किंवा फक्त नावापुरती शिल्लक आहे.  इथे भूतान मधे मात्र आजही राजसत्ता आहे.  जनतेमधे राजाला देवासमान स्थान आहे.  भूतानमधे सर्व दुकानांमधे, हॉटेलांमध्ये, सार्वजनिक इमारतींमधे राजाचे किंवा राजाच्या कुटुंबाचे फोटो लावलेले असतात.  जनतेला लोकशाही नकोय.  आधीच्या राजानेच राज्यघटनेत बदल करून भूतानमधे लोकशाही आणलीये.  पण जनतेमधे आजही राजाच लोकप्रिय आहे.  त्याचे कारणही तसेच आहे.  इथले चार पिढ्यांचे राजे हुशार आणि प्रजेची काळजी घेणारे होऊन गेलेत.  इतर ठिकाणांसारखे उडाणटप्पू खुशालचेंडू राजे इथे अस्तित्वात नाहीत.

द्रुक वान्ग्याल हखांग च्या पायऱ्यांवर ख़ुशी आणि दीप्ती
फोटोसाठी उभं राहिल्यावर ख़ुशी नेहमीप्रमाणे काहीतरी उद्योग करतीये

द्रुक वान्ग्याल हखांग पाहून झाल्यावर, यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर, मग टेकडी उतरून रस्त्यापलीकडचे एकशे आठ चोरटेन पाहायला निघालो.  आज धुकं नसल्याने दूरवरचे बर्फाचे पर्वत दिसत होते.  पण पर्यटकांच्या गर्दीमुळे थोडा वैताग आला.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात गर्दी नसताना हि जागा स्वप्नवत वाटली होती.  एकशे आठच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फारच छान.  जरा शोधा ह्याचे उत्तर.  फार वेळ नसेल तर इथून सुरुवात करा.

डोचूला पास ...
रस्त्यापलीकडच्या टेकडीवरून पाहिलेले एकशे आठ चोरटेन
दूरवर ढगांच्या रांगेत लपलेली बर्फाच्छादित शिखरं

भूतान मधला सर्वात उंच पर्वत गंगखर पुएनसुम इथून दिसतो म्हणे.

८० च्या दशकापर्यंत भूतानच्या १०% भागात हिमनद्या होत्या.  इथल्या हिमनद्या वितळतायत.  दरवर्षी तीस ते चाळीस मीटरने वितळतायत.  २०३५ पर्यंत भूतानमधल्या सर्व हिमनद्या वितळलेल्या असतील असा अंदाज आहे.  सर्व जगभरच हिमनद्या वितळतायत.  हिमनद्या वितळण्याचं आणि आमचं काहीच नाही हो, असं म्हणणं म्हणजे "मी नाही त्यातली..." चा प्रकार.  आपण सर्वमिळून पृथ्वीची वाट लावतोय.  ग्लोबल वॉर्मिंग हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे.

डोचूला पास ला आम्ही तासभर होतो.  इथून पुढे वाटेत एका गार्डन मधे थांबूया असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले.  कुठले गार्डन ते मला माहिती नव्हते.  अर्ध्या तासाने आम्ही पोहोचलो रॉयल बोटॅनिकल पार्क समोर.

रॉयल बोटॅनिकल गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळील फलक
पर्यावरणाविषयी उपयुक्त माहिती देणारं एक छोटं प्रदर्शन आधी पाहिले.  मग निघालो आजूबाजूला फेरफटका मारायला.  इथे सेहेचाळीस प्रकारची ऱ्होडोडेंड्रोन झाडं आहेत.

रॉयल बोटॅनिकल गार्डन मधला एक फलक

इथून छोट्या मोठ्या अंतराच्या ट्रेकिंगच्या वाटा आहेत.  इथे मधमाश्या बऱ्याच होत्या.  त्यामुळे आम्ही जवळपासच्या भागात अर्धा तास फेरफटका मारून बाहेरचा रस्ता पकडला.  ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी ह्या जागेसाठी दोन तीन तास वेळ ठेवावा. बरोबर इथला माणूस घेऊन जंगलात दोन तासाचा मस्त फेरफटका होईल.  पेहराव व्यवस्थित करावा. फुल पॅन्ट आणि फुल हाताचा शर्ट.  हूड असेल तर आणखीन छान.

रॉयल बोटॅनिकल गार्डन पासून पुनाखा साधारण दीड तासाच्या अंतरावर होते.  म्हणजे आम्ही जेवायला पुनाखात पोहोचणार होतो.  जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायलाही वेळ असणार होता.

पुनाखा कडे जाताना गाडीत बसल्या बसल्या फोटोग्राफी ...
गर्द झाडीभरल्या जंगलातून गेलेला रस्ता
रस्त्याला फारशी वर्दळ नाही
कसलीही घाई गडबड न करता गाडी चाळीसच्या स्पीडने आरामात चाललेली

रस्त्यात एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली.  पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी.  मी पण उतरलो पाणी भरून घ्यायला.  भूतान मधे नदीचं पाणी पीत नाहीत.  फक्त झऱ्याचं पाणी पितात.  इथे वर्षभर पाण्याला काही तोटा नाही.

पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी थांबलो तिथला फलक

एक छोटा धबधबा होता बाजूलाच.  त्याचा सुंदर फोटो मिळाला.  निसर्गसौन्दर्याने नटलेल्या ह्या देशात राहणाऱ्यांचा हेवा वाटला.

रस्त्याच्या कडेला लागलेला एक छोटा धबधबा

इथून पाऊण तासात पुनाखा मधल्या दामचेन रिसॉर्टला पोहोचलो.  आमच्या मागोमाग कॉक्स अँड किंग्स च्या गाड्या दाखल झाल्या.  हि मंडळी डोचूला पास आणि रॉयल बोटॅनिकल गार्डनलाही आमच्या बरोबर होती.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मिळालेली पहिल्या मजल्यावरची रूम फारच छान होती.  त्या अनुभवावरून इथे आलो होतो.  ह्यावेळी तळमजल्यावरच्या रूम मिळाल्या.  ह्या तळमजल्यावरच्या रूम बहुतेक नेहमी वापरात नसाव्या.  आमच्या रूम मधे एक पालीचं पिल्लू होतं.  बाथ टब तुटलेला होता.  रूम बदलून देणार का म्हणून मी विचारले तर नाही असे सांगण्यात आले.  एकच दिवस राहायचे असल्याने आम्ही विषय सोडून दिला.

जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायला निघालो.  हॉटेलच्या बाहेर येऊन बघतो तर आमचा ड्राइवर गायब झालेला.  त्याला कॉल करून बोलावून घेतले.

१९५५ पर्यंत पुनाखा भूतानची राजधानी होती.  इथली प्रेक्षणीय स्थळं दोनच.  पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल.  दोन्ही जवळ जवळ आहेत.  आधी लागतो पुनाखा झॉन्ग.  फो चू आणि मो चू नद्यांच्या संगमाजवळ बांधलेला हा भूतानमधील दुसऱ्या क्रमांकाचा जुना आणि मोठा झॉन्ग.  फो चू आणि मो चू एकत्र आल्यानंतर ह्या नदीला पुना सांग चू म्हटले जाते.  भारतात आल्यावर हि संकोश नदी म्हणून ओळखली जाते.

नदीपलीकडून दिसलेला पुनाखा झॉन्ग
आमची आजची पार्किंगची जागा म्हणजे मार्चमधल्या भूतान मॅरेथॉनचा शेवट जिथे झाला ती जागा.  त्यावेळी मॅरेथॉन हे एकच उद्दिष्ट असल्यामुळे हा झॉन्ग बघायचे राहून गेले होते.  आता नदीवरचा पूल पार करून झॉन्ग बघायला निघालो.

तिकिटं काढताना आम्हाला विचारले तुमच्याबरोबर गाईड आहे का म्हणून.  मी नाही सांगितल्यावर एक गाईड आम्हाला दिला.  गाईडचे वेगळे काही चार्जेस नव्हते.  पण झॉन्ग पाहून झाल्यावर गाईडला शंभर दोनशे वगैरे टीप द्यावी अशी अपेक्षा तिकिट काउंटर वर सांगण्यात आली.

पुनाखा झॉन्ग मधली एक वास्तू

झॉन्ग म्हणजे किल्ला.  हा झॉन्ग आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसारखा डोंगरी किल्ला नाही.  ह्याला भुईकोट किल्ला म्हणता येईल.  झॉन्ग हे प्रत्येक जिल्ह्याचे धार्मिक, प्रशासकीय, आणि सामाजिक केंद्र असते.  झॉन्ग मधला साधारणपणे अर्धा भाग प्रशासकीय उपयोगासाठी आणि अर्धा धार्मिक उपयोगांसाठी असतो.  प्रशासन आणि धर्म एकत्र ठेवल्याचे फायदे सांगावे तेवढे कमी.

पुंगतांग देवा छेनबी फोद्रांग (म्हणजे the palace of great happiness) नावाचा हा झॉन्ग १६३८ मध्ये बांधलेला.  आमच्या गाईडने आम्हाला झॉन्गमधे फिरवून झॉन्गची माहिती दिली.  झॉन्गच्या ठराविक भागातच पर्यटकांना फिरता येते.

पुनाखा झॉन्ग मधील एक इमारत


पुनाखा झॉन्ग पाहून झाल्यावर आम्ही समोरचा बौद्ध मठ पाहायला निघालो.  इथे बरोबर गाईड नसल्यामुळे ह्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती कळली नाही.  इथल्या आवारात एक मांजर झोपली होती.  मांजरीबरोबर ख़ुशीचा वेळ मजेत गेला.  नंतर "आपण एक मांजर पाळूया ना", "आपण एक बंगला बांधूया ना" अशा प्रश्नांची मला योग्य व समर्पक उत्तरं द्यावी लागली.

मांजर आणि ख़ुशी

आम्ही इथून बाहेर पडल्यावर मठाचे दार बंद करण्यात आले.  आता आमची स्वारी निघाली जवळच्या झुलत्या पुलाकडे.  इथे फिरताना माझ्या मार्चमधल्या भूतान अर्धमॅरेथॉनच्या आठवणी जाग्या झाल्या.  अर्धमॅरेथॉन चा ट्रॅक ह्या पुलावरून होता.

पुलावर पहिल्या मिनिटभरासाठी काहीतरी वेगळे वाटत होते.  नंतर सवय झाली.

पुनाखा सस्पेन्शन ब्रिज
हा भूतानमधला सर्वात मोठा झुलता पूल.  पुलाच्या पलीकडे गेल्यावर तिथे थोडा वेळ थांबलो.

पुलाच्या पलीकडची शेतं, घरं, डोंगर
पुनाखामधे कधीच बर्फ पडत नाही.  इथले हवामान थिंफूपेक्षा उबदार असते.  थिंफूमधे दरवर्षी बर्फ पडतो.  पुनाखाचा परिसर भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे.

झुलत्या पुलाकडच्या वाटेत एक कुंपण होते, आणि कुंपण ओलांडायला एक छोटीशी लाकडी शिडी.

कुंपण ओलांडण्यासाठी छोटीशी शिडी
हॉटेल मधे परत जाण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा पावणे सहा झाले होते.  हळुहळु अंधार पडायला लागला होता.

दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे रात्रीचे जेवण सर्वांनाच नको होते.  साडेआठ वाजता मी फेरफटका मारायला बाहेर पडलो.  हॉटेलच्या गेटबाहेर येताच लक्षात आले - बॅटरी घ्यायला पाहिजे.  परत रूममध्ये जाऊन बॅटरी घेऊन आलो.  बऱ्याच रस्त्यांवर अंधारच होता.  मधेच कुठेतरी स्ट्रीट-लाइट होते.

एका किराणा मालाच्या दुकानातून दोन छोट्या ज्युसच्या बाटल्या घेतल्या.  फिरता फिरता पिऊन जी काही थोडीफार भूक होती ती संपवली.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात जिथे जेवलो होतो ते हॉटेल शोधून काढले.  जवळच होते.

इथे फिरताना मी लहान असताना खेडला राहायचो त्याची आठवण झाली.

एक लोखंडी पूल पार करून नदीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन परत फिरलो.  उद्या सकाळी उठून गेलेफूकडे प्रयाण.

लोखंडी पूल

भूतानच्या सफरीत आपल्या रोजच्या जीवनातल्या संकल्पनांना धडाधड तडे जातात.  १९६१ पर्यंत इथे डांबरी रस्ते नव्हते.  दळणवळणाची साधने होती - चालत जाणे किंवा खेचर अथवा घोड्यावरून.  भारताच्या बॉर्डर पासून थिंफूला जायला सहा दिवस लागायचे म्हणे.  आजही रस्त्यांची स्थिती बऱ्याच ठिकाणी जेमतेमच.  पूर्ण भूतानमध्ये एकाच विमानतळ चालू स्थितीत आहे.  एक थिंफू सोडलं तर इतर कुठेही आधुनिक इमारती नाहीत.  तरीही एक गोष्ट जाणवली - जगण्याचा अर्थ ह्यांना जेवढा उमगलाय तेवढा दुसऱ्या कुठल्या देशाला उमगला असण्याची शक्यता कमीच.  उगाच नाही हे GDP च्या ऐवजी GNH च्या गोष्टी करत.  शेवटी माणसाचं जीवन म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं तर pursuit of happiness.  आणखी कशाच्या मागे आपण सगळे वर्षानुवर्ष धावतोय.  ह्या एकविसाव्या शतकात जिथे टेकनॉलॉजि ओसंडून वाहतिये पण शहाणपणाचा पत्ता नाही, अशा जगात स्वतःचे वेगळेपण जपलेला हा छोटासा समृद्ध देश खरोखरच The last shangri la आहे.

Tuesday, September 19, 2017

नाणेघाट, नानांचा अंगठा, आणि भोरांड्याचं दार - स्वछंद गिर्यारोहकांबरोबर एक अप्रतिम गिरीभ्रमंती

रविवार १७ सप्टेंबर २०१७ रोजी स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे आणि इतर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर नाणेघाट, नानांचा अंगठा आणि भोरांड्याचं दार पाहायचा योग आला.  त्याचा हा इतिवृत्तांत.  खरंतर हा पायलट ट्रेक ठरला होता.  मेंबर वाढल्यामुळे रेग्युलर ट्रेक बनला.  पुण्याहुन ११ जण आणि मुंबईहुन ९ असे २० ठरले होते.

टोळके
१. विशाल काकडे
२. डॉ. मुग्धा कोल्हटकर मॅम
३. स्वप्नील खोत
४. सविता कानडे मॅम
५. सुरेश भाग्यवंत
६. उदय मोहिते
७. सागर मोहिते
८. रुपेश गौल  (रुपेश मित्रा, तुझं आडनाव जर मि चुकवलं असेल तर चुक भुल देणे घेणे)
९. भाग्येश मोहिते
१०. दिलीप गाडे
११. योगेश सावंत

शनिवारी दिवसा विशाल आणि भाग्येशने स्वछंद गिर्यारोहकांचा रिव्हर्स अंधारबन ट्रेक यशस्वीरीत्या पार पाडला.  त्यांची बस रात्री ९ वाजता शिवाजीनगरला पोहोचली.  तिच बस घेऊन त्यांनी पुढचा ट्रेक सुरु केला.  ठरल्याप्रमाणे ११ वाजता इतर सदस्य जमले आणि बस मार्गस्थ झाली.  रुपेश आणि मि नाशिक फाट्याला बसमध्ये चढलो.  नारायणगावला चहा आणि मसाला दुध अशी सर्वांची फर्माईश होती.  सर्व हॉटेले बंद झाल्यामुळे ति राहुन गेली.

ड्राइवर काकांना बिलकुल घाईची लागलेली नव्हती.  त्यांनी सरळ सोप्या पद्धतीने बस चालवली.  रात्रीच्या अंधारात विशालने गुगल मॅपचा आधार घेत ड्राइवर काकांना रस्ता सांगितला.  घाटात एका चेकपोस्ट वर पोलीसमामांनी १०० रुपये घेतले.  आधी ५० दिले तर ते त्यांना कमी पडले.  पुण्यापासुन जसजसे लांब गेलो तसतसे रस्तावरचे खड्डे वाढतच गेले. त्यामुळे झोप काही चांगली झाली नाही.
साधारण साडेतीनला विशालने एका ठिकाणी बस थांबवली.  सर्वजण बसमधुन उतरून तयार झालो.  इथुन पुढे पायगाडीने प्रवास होता.  उद्या दुपारी बस कुठे आणायची ते विशालने ड्राइवर काकांना सांगितले.  आम्ही नाणेघाटातुन चढुन जाणार होतो आणि भोरांड्याच्या दाराने उतरणार होतो.

मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक आमच्या दोन तास आधी पोहोचले होते.  त्यांनी चढायला सुरुवात केलेली होती.  नाणेघाट चढून गेल्यावर त्यांना भेटण्याचा आमचा प्लॅन होता.

सर्वांची थोडक्यात तोंडओळख केली आणि पायगाडीला स्टार्ट मारला.  मिट्ट अंधार असल्यामुळे आजुबाजुच्या परिसराचा फारसा अंदाज येत नव्हता.  बॅटऱ्यांच्या उजेडात सर्वजण एका रांगेत जात होतो.  वाट अवघड नव्हती पण घाम काढणारी होती.  बहुदा आमचा स्पीड चांगला होता.  ट्रेकची सुरुवात चांगल्या स्पीडने केली कि पूर्ण ट्रेक चांगला जातो.  नवखे कोणीच नसल्यामुळे हा ट्रेक चांगला होणार ह्याचा अंदाज आला.

पायगाडीला सुरुवात झाल्यानंतर थोड्या अंतरावर हे निसर्ग पर्यटन केंद्र लागले.  इथे काही खेळणी होती लहान मुलांसाठी.

नाणेघाटाच्या पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे एक मोठा ब्रेक घेतला.  निमित्त होते नानांच्या अंगठ्याचा फोटो काढण्याचे.  हळुहळु उजाडायला लागले.  थोडे उजाडल्यावर नानांचा अंगठा दिसायला लागला.  अंगठा नक्की कसा बघायचा ते काही मला समजले नाही. असो.  आमचा लॉन्ग ब्रेक चालु असताना एका उंदराने आमच्या अधेमधे लुडबुडून जमेल तसे खाऊचे तुकडे पळवुन नेले.

उजाडल्यावर दिसणारा नानांचा अंगठा. डावीकडच्या घळीतून नाणेघाटाची वाट घाटमाथ्यावर जाते

आम्ही पहिला टप्पा जोरदार पार केलेला होता.  लॉन्ग ब्रेक आटोपल्यावर पुढच्या वाटचालीस सुरुवात.  घडीव पायऱ्यांची वाट माथ्यापर्यंत आहे. कुठे चुकण्याचा प्रश्नच नाही.  ग्रुप ट्रेक मध्ये लीड ला राहण्याचा मोह काही मला सोडवत नाही.

नाणेघाटातील पायऱ्यांची वाट

फार्फार पुर्वीच्या काळी कधीतरी सोपारा ते पैठण हा व्यापारी मार्ग होता.  कल्याण ते जुन्नर हा ह्या मार्गाचा एक भाग.  सातवाहन काळातील हा एक्सप्रेस-वे.  ह्या मार्गावर सह्याद्री चढून वर येण्याचा घाट तो नाणेघाट.  कल्याण पासुन ५५ किलोमीटर वर हा नाणेघाट आहे.

सप्टेंबरच्या सकाळी नाणेघाटातुन दिसणारं विहंगम दृश्य.  नजर जाईल तिथपर्यंत ढग रेंगाळतायत.  सर्वत्र हिरवंगार रान आणि मधेच एखादी वीसेक घरांची वाडी.

एक दोन वेळा वानरांचा आवाज परिसरात घुमला.  मोरांचा आवाज ह्या पूर्ण ट्रेक मध्ये कुठेच आला नाही.  रात्री बंद असलेले कॅमेरे आता बाहेर आले होते.  आम्हा सर्वांचा स्पीड चांगला असल्यामुळे वेळेत ट्रेक पूर्ण होतो का नाही वगैरे विषय आलेच नाहीत.  आणि दिवसभर मनसोक्त फोटोग्राफीला वेळ मिळाला.

नाणेघाटातुन दिसणारा नानांच्या अंगठ्याचा कडा

सध्याच्या काळात माळशेज घाटाचा गुळगुळीत डांबरी रस्ता बनल्यावर नाणेघाटाची गरज संपली.  आसपासच्या गावातले दोनेक जण फक्त जाताना दिसले.  नाणेघाटाच्या शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेली पाण्याची टाकं आणि सातवाहन कालीन लेणी आहेत.  घाट चढून वर आल्यावर प्यायला पाणी आणि आरामाला जागा हवीच.

नाणेघाटातली सातवाहन कालीन लेणी

सातवाहन राजा सातकर्णी ह्याची राणी नागनिका हिने हि लेणी बनवुन घेतली.  लेण्याच्या भिंतींवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे.  सातवाहनांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग वाचा.

सातवाहन कालीन लेण्याच्या भिंतीवर कोरलेला शिलालेख

इथून पुढे नाणेघाटाचा फक्त शेवटचा चढ राहिला होता.  एका घळीतला दगड धोंड्यांनी भरलेला १०० मीटर ट्रॅक.  पाणी वाहुन जायला भरपूर जागा असल्यामुळे हे दगड घसरडे नव्हते.

नाणेघाटाचा शेवटचा टप्पा
शेवटचा चढ मि हिल गियर टाकुन संपवला.  साडेआठला आम्ही घाटमाथ्यावर आलो.  समोर नाणेघाटाच्या प्राचीन दगडी मार्गाला भिडलेला आजचा डांबरी रस्ता पाहुन आश्चर्य वाटले.  डोंगरपठारावर उजवीकडे जीवधन किल्ला तर डावीकडे नवरा नवरी भटजी आणि वाजंत्र्यांचा डोंगर.  मध्ये जुन्नरहुन आलेला आजच्या काळातला डांबरी रस्ता.  ह्या रस्त्याने सर्वसामान्य जनतेची सोय केलेली आहे.  तशीच गैरसोयही केलेली आहे.  इथपर्यंत दुचाकी आणि चारचाकी सहज येत असल्यामुळे काचपात्रातून तीर्थप्राशन करणाऱ्यांची गर्दी आता इथे जमु लागलीये.

नाणेघाटाच्या प्राचीन दगडी मार्गाला घाटमाथ्यावर भिडणारा आजचा डांबरी रस्ता.  समोर जीवधन किल्ला.

मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक इथुन बऱ्याच आधी पुढे गेलेले होते.  ते आम्हाला भोरांड्याच्या दाराने उतरून गेल्यावरच भेटले.

उन्हात न्हाऊन निघालेलं डोंगरपठार, सर्वत्र हिरवंगार गवत, काही रानफुले, मधेच कुठेकुठे पाणी.  दूरवर दिसणारे उंचच उंच डोंगर.  उत्कृष्ट लँडस्केप.

डोंगरपठारावर ढगात बुडालेले नवरा, नवरी, भटजी, आणि वाजंत्री

नाणेघाट चढून घाटमाथ्यावर पोहोचल्यावर एक दगडी रांजण दिसतो.  ह्या मार्गाचा वापर करणारे व्यापारी इथे टोल देत असणार नाण्यांच्या स्वरूपात.  म्हणून हा नाणेघाट.

घाटमाथ्यावर पोहोचल्यावर बाजुला दगडी रांजण - सातवाहन कालीन टोल बूथ

डोंगरपठारावर पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही बाजूच्या नानांच्या अंगठ्याकडे मोर्चा वळवला.  घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेला थेट आकाशात घुसलेला डोंगर आणि पलीकडे सरळसोट खोल दरी.  एक टप्पा आऊट वगैरे नाहीच.  डायरेक्ट बाउन्सर कोकणात जाणार.  हाईट ची भीती घालवायची असेल तर अतिउत्तम जागा.

नानांच्या अंगठ्या वरून...
समोर हिरवाईने नटलेल्या कोकणच्या वाड्या
आजुबाजुला भिरभिरणारे चतुर (म्हणजे Dragon flies)
ह्या रम्य सकाळी सोनकीच्या फुलांमध्ये आणि ढगांमध्ये जास्त कोण तो खेळ चाललेला


एकेक करत सर्वजण नानांच्या अंगठ्यावर पोहोचलो.  रुपेश खालीच राहिला.  मागचे काही आठवडे (त्यात वीकेंड्स पण) त्याच्या कंपनीने त्याला जबरी राबवून काढल्याने बिचारा मिळेल तिथे मिळेल तशी झोप पूर्ण करत होता.  यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर सर्वानुमते इथे एक खादंती ब्रेक झाला.  सुरेश भाग्यवंत सरांनी आणलेली भाकरी, मिरचीचा ठेचा आणि चटणी ज्यांनी नानांच्या अंगठ्यावर बसून खाल्ली तेच खरे भाग्यवंत.

नानांच्या अंगठ्या वरून...
दरीत पडलेली अंगठ्याची सावली, अजस्त्र वीजवाहक सांगाडे, दूरवर ढगांची लयलूट, आणि अंगठ्यावर सोनकीच्या फुलांची गर्दी
समोर एक चुकार ढग मधेच येऊन थांबलेला, आणि त्याची दरीत पडलेली सावली

नानांच्या अंगठ्यावरून उतरल्यानंतर आम्ही दूरवर दिसणाऱ्या आमच्या ब्रेकफास्ट च्या जागी पायगाडी वळवली.  डोंगरपठारावर सकाळच्या उन्हात न्हालेली रानफुलं.  दूरवर दिसणारे सह्याद्रीचे रथी महारथी.  असं दिवसभर भटकलं तरी मन भरेल कि नाही सांगता येत नाही.


सोनकीच्या फुलांची मुक्तहस्ताने उधळण

वाटेत एक मेलेला साप सापडला.  ह्या भागात साप खूप आहेत म्हणे.  आमच्या वाटेल त्यातला एकही नाही आला.  सापांविषयी दिवसभरात चांगली डिस्कशन झाली.  इतरही अनेक विषय चावले गेले.  भुतं, सातवाहन काळ, घाटवाटा, भारतीय स्वातंत्र्यलढा, आजूबाजूचे किल्ले, रानफुलं, वगैरे वगैरे.  स्वप्नील खोत हा तर एक चालता बोलता विकिपीडिया आहे.  विशेष म्हणजे डोकं आभाळात असूनसुद्धा पाय पक्के जमिनीवर.


दुपारच्या उन्हात ढग आणि धुकं हटल्यावरचे नवरा, नवरी, भटजी, आणि वाजंत्री

रस्त्यावर बसून थोडी फोटोग्राफी झाली.  मि माझी फोटो स्टाईल रुपेश आणि उदय मोहिते सरांना शिकवली.

फोटोग्राफी करण्याचा मोह कोणाला आवरत नाही

आधी एक चहाचा राऊंड, मग अनलिमिटेड पोहे, वर अजून एक चहाचा राऊंड असा भरपेट ब्रेकफास्ट झाला.  खुर्चीत बसल्या बसल्या मि एक डुलकी घेतली.  काहीजण पळशीकरांना भेटून आले.
आता आल्या वाटेने नाणेघाटातून उतरून न जाता भोरांड्याच्या दाराने जायचे होते.  भोरांड्याच्या दारापर्यंत पोहोचण्याची एक छोटीशी शोधमोहीम पार पडली.

भोरांड्याचं दार

हि घळ ६०० फूट उतरत जाते.  कोकणातल्या घाटवाटा पावसाळ्यात सुद्धा घाम काढतात.  उन्हाळ्यात काय होत असेल इथे.

भोरांड्याच्या दारानी उतरताना...
स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे

उतरायला सुरुवात केली तेव्हा तासाभरात खाली पोहोचू असा अंदाज होता.  जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसा उलगडा झाला.  हे काही तासाभराचं काम नाही.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
The one and only Swapnil Khot

दगडधोंड्यांनी भरलेली घळ पुढे गेल्यावर अवघड बनत गेली.  एके ठिकाणी डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा दोन वाटा दिसल्या.  उजवीकडची वाट गावात जाते. डावीकडच्या वाटेने उतरून गेलो.  आता वाट शोधावी लागत होती.  एखादं झाडावरचं मार्किंग, कुठे दगडावर रंगवलेला बाण.  काही वेळ मि लीड ला राहून वाट शोधली.

दगडांचा हा माझा देश
जितका राकट कणखर, तितकाच मृदू मुलायम

भोरांड्याच्या ह्या घाटवाटेल पाण्याची चिंता नाही.  खळाळत्या झर्याचं गोड पाणी शेवटपर्यंत साथीला राहतं.  पावसाळा संपुन झरा आटल्यावर मात्र पुरेसं पाणी बरोबर ठेवलंच पाहिजे.

पाणी प्यावं तर असं.  हेच खरे भाग्यवंत.

दोन चार वेळा झरा ओलांडावा लागला.  झरा ओलांडायला सोपा आहे, फक्त सावध राहवं.  शेवाळ्याने भरलेले दगड घसरडे होते.  शेवाळ्याचा थर जितका जाड तितकी घसरण जास्त.

अश्या कुत्र्याच्या छत्र्या (mushrooms) जागोजागी होत्या


निसर्गदेवतेच्या कृपेने पाऊस आला नाही.  पाऊस आला असता तर हि वाट आणखीनच अवघड झाली असती.

भोरांड्याच्या दारानी उतरणारे ११ स्वछंद गिर्यारोहक
Chimps never leave chimps behind ह्या उक्ती प्रमाणे कोणीही एकटे पडणार नाही ह्याची दक्षता सर्वांनी पूर्णवेळ घेतली.


हा झरा भोरांड्याच्या दारात जो सुरु झाला तो माळशेज घाटाचा रस्ता येईपर्यंत सोबतीला होता

सव्वातीन तासात आम्ही भोरांड्याच्या दाराने उतरून आलो.  मागे वळुन पाहिल्यावर दूरवर दिसत होतं भोरांड्याचं दार.

उतरून आल्यावर एकदा पाहून घेतलं, कुठच्या भोरांड्याच्या दारातून खाली आलोय आपण


सरत्या पावसाच्या दिवसातला हा ट्रेक काय वर्णावा.  उन्हाचा रखरखाट नाही.  थंडीचा कडाका नाही.  झोडपणारा पाऊस नाही.  सर्वत्र आल्हाददायक वातावरण.  टोळक्याचा मेळ व्यवस्थित जमलेला.  सगळीकडे रानफुलांची सोबत.  खाण्यापिण्याची चंगळ.  बरोबर घेतलेले पाणी संपण्याचा धोका नाही.  हे सगळं कमी पडतं म्हणुन कि काय नानांच्या अंगठ्यावरून दिसणारा अलौकिक नजारा, एक नवीन घाटवाट उतरण्याचं समाधान, प्यायला हवं तितकं झऱ्याचं चवदार पाणी, आणि शेवटी झऱ्यातली डुंबाडुंबी म्हणजे कळसच झाला.

खळाळत्या झऱ्यातली हि मजा शब्दात कशी सांगावी

झऱ्यातली डुंबाडुंबी थांबवुन बाहेर पडायला कोणीच तयार नव्हतं.  झऱ्यासमोर दिसणारा पूल आणि गाड्यांचे आवाज मात्र आजच्या जगाची आठवण करून देत होते.

खाते पिते घर के ४ जाडजूड सुटलेले मर्द रस्त्यावरून झऱ्याच्या काठाला उतरले.  बॉड्या काढून ठेऊन काहीतरी खायला लागले.  बहुदा खाऊन झाल्यावर झऱ्यात एन्ट्री मारणार असावेत.

नाईलाजाने झरा सोडून आम्ही रस्ता पकडला.  काय करणार.  १२ तास निसर्गाच्या बरोबर राहिल्यानंतर मग ह्या मानवनिर्मित कृत्रिम वातावरणात परत येणं फार अवघड होतं.  विशालने ड्राइवर काकांना फोन करून बोलावून घेतले.  आवरा आवरी करून गाडीत बसलो. 

बायकर्सची एक मोठी झुंड रस्त्याच्या कडेला थांबली होती.  त्यांच्यातला एक जण वळण घेताना रस्ता सोडून बाजुच्या खोलगट भागात पडला होता.  त्यांचं मदतकार्य चालू होतं.

मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक जवळच पोहोचले होते.  बसने त्यांच्याकडे गेलो.  थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर आमची बस पुण्यनगरीच्या दिशेने निघाली.  बसमध्ये मी जमेल तेवढी झोप काढली.  थोड्या वेळाने चहा वडापावचा pitstop आला.  मी झोपुनच राहिलो बसमध्ये.

जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. ११ पैकी ५ व्हेज आणि ६ नॉनव्हेज अशी विभागणी झाली.  व्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी आणि नॉनव्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी.  दोन्ही हॉटेलं ५० मीटर अंतरावर.
जेवायला माझ्या शेजारी स्वप्नील खोत हा निगर्वी निर्भीड सह्यमित्र बसला होता.  जग जिंकलंयस तु मित्रा.  ह्या सह्याद्रीला अभिमान आहे तुझ्यासारख्या सह्यमित्रांचा.  तुझ्यासारख्यांसाठीच ह्या ओळी लिहिल्या आहेत
क्या ये उजाले
क्या ये अँधेरे
दोनों से आगे है मंज़र तेरे
क्यों रौशनी तू बाहर तलाशे
तेरी मशालें हैं अंदर तेरे
क्यों ढूंढना पैरों के निशां
जाए वहीं ले जाए जहाँ

आणि मला सुचलेल्या ह्या चार ओळी
स्वप्नील खोत येति ट्रेकला
तोचि दिवाळी दसरा

पोटोबा भरल्यानंतर सर्वांना घरी परतायचे वेध लागले होते.  परतीच्या प्रवासात विशालने त्याचा गाण्याचा तास सुरु केला.  इतरांनी त्याला जमेल तशी साथ दिली.  साडे अकरा वाजता नाशिक फाट्यावर रुपेश आणि मि गाडीतुन उतरलो.  ४ किलोमीटर आणि ४० मिनिटात मि चालत घरी पोहोचलो.

ह्या offbeat ट्रेक ला किती खर्च आला ते विचारूही नका.  सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची हि भटकंती पैश्यात मोजता येत नाही.  भाग्य लागतं नशिबाला.