Tuesday, June 5, 2018

दीप्ती आणि खुशीचा पहिला नाईट ट्रेक

नको नको झालेल्या उन्हाळ्याचा सुखद शेवट होतोय.  पाऊस काही दिवसांवर पोहोचलाय.  अशा मौसम बदलाच्या दिवसात विशालने नाणेघाट नाईट ट्रेक ठेवला.  मागच्या वर्षी सप्टेंबरमधे इथला ट्रेक स्वछंद गिर्यारोहकांबरोबर केल्यानंतर मि दीप्तीला बऱ्याचदा सांगत होतो, आपण एकदा नाणेघाट आणि नानाच्या अंगठ्याला भेट देऊया.  आता दीप्ती आणि खुशी यायला तयार झाल्या.  फक्त नाणेघाट चढून जायचा होता.  नाईट ट्रेक असल्यामुळे उन्हाच्या त्रासाचा काही प्रश्नच नव्हता.  दोघींचा हा पहिलाच नाईट ट्रेक.  माझा आधीचा दणदणीत परफॉर्मन्सचा हेड लॅम्प आणि बकरे काकांनी ऑस्ट्रेलियाहुन आमच्यासाठी आणलेला, असे दोन हेड लॅम्प तिघात घेतले.  हेड लॅम्प असला कि हात मोकळे राहतात.  हातात पकडायची बॅटरी घेऊन नाईट ट्रेक करताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी हात मोकळे मिळत नाहीत.

बस नऊ वाजता शिवाजीनगरहुन निघून कोकणे चौकातुन पुढे जाणार होती.  आम्ही तिघे कोकणे चौकात वेळेत हजर होतो आणि दहाच्या सुमारास बसमधे बसलो.  राजु ड्रायव्हरचं जेवण झालं नव्हतं.  त्याने त्याच्या घराजवळ डबा घेतला.  अट्टल ट्रेकर, हौशी ट्रेकर, आणि नवखे ट्रेकर अशा तीनही प्रकारच्या ट्रेकर्स ने युक्त अशी आमची बस नाशिक रस्त्याने निघाली.  चाकण वगैरे औद्योगिक भाग असल्यामुळे ह्या रस्त्याला रात्रीही ट्रॅफिक लागते.

सव्वा अकरा वाजता एका हॉटेलसमोर थांबलो.  राजु ड्रायव्हरचं जेवण बाकी होतं ना.  इतरांनी टाइम पास केला.   हॉटेल समोर खरी बैलगाडी आणि खोटे बैल.  बैल तंतोतंत हुबेहूब बनवलेले होते.  ह्या मूर्तिकाराचे कसब अफलातून.



हॉटेलमधे आम्हीच शेवटचे गिऱ्हाईक होतो.  आम्ही बाहेर पडल्यावर हॉटेलचं दार लावून घेण्यात आलं.  मि बस मधे जमेल तेवढी झोप घेतली.  मागच्या नाईट ट्रेकला मी दिवसा न झोपता आणि दिवसभर व्यस्त राहून गेलो होतो, आणि मग ट्रेक मधे हालत वाईट झाली होती.  तशी आज मी दुपारी थोडी तासभर झोप घेतली होती.

बस मधे मला गाढ झोप लागली होती.  विशालच्या बोलण्याने मला जाग आली.  माळशेज घाटात विशालने बस थांबवली होती जिथून नाणेघाट ट्रेकला सुरुवात होते.  अडीज वाजले होते.  माळशेज घाटाच्या रस्त्यावरून तुरळक वाहतूक सुरु होती.

ह्या महिन्याभरात घाटातला रस्ता म्हटल्यावर मला WhatsApp वर पाहिलेले हे चित्र आठवते

सर्वांची तोंडओळख करून घेऊन ट्रेकला सुरुवात केली.  बेडकांचं गुणगान मोठ्या आवाजात चालू.  एका ठिकाणी तर इतका मोठा आवाज होता कि आधी आम्हाला वाटलं माळशेज घाटातल्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकच्या टायरचा आवाज येतोय.  ट्रकच्या टायरमधे हवा कमी असेल तर असा आवाज येतो.  पण आवाज कमी जास्त न होता आणि सतत येत होता.  दुसरी शक्यता होती मोठ्या संख्येने भिरभिरणाऱ्या मधमाश्या किंवा आणखी कोणत्या माश्या.  हि शक्यता तर नाही ना हे पडताळून पाहण्यासाठी आम्ही अंदाज घेतला.  तर हा आवाज मोठ्या संख्येने जमलेल्या बेडकांचा होता.  जीव वीतभर आणि आवाज कोसभर.

पहिल्या तासाभरातच एक मोठा खेकडा, एक विंचू, आणि एक साप ह्यांनी दर्शन दिले.  काजवेही दिसले.  हौशी आणि नवख्या ट्रेकर्समुळे आमच्या टोळीचा वेग कमी होता.  पण हे अपेक्षित होतंच. रात्रीच्या अंधारात दूरवरचं फार काही दिसत नाही.  त्यामुळे "अजून किती", "कुठपर्यंत जायचंय" वगैरे असले प्रश्न अंधार असेपर्यंत हौशी आणि नवख्या ट्रेकर्सकडुन येत नाहीत.

विशाल सगळ्यात पुढे आणि अमोल सगळ्यात मागे होता.  बाकी सगळे त्यांच्या मधे.  हे आमचं आजचं ट्रेक फॉर्मेशन.  बराच वेळ झाला तरी पायऱ्या काही येईनात.  नाणेघाट ट्रेक म्हणजे पहिला अर्धा भाग पायवाटेने डोंगर चढायचा आणि पुढचा अर्धा भाग जुन्या काळी बांधलेल्या आणि आता थोड्याफार शिल्लक असलेल्या पायऱ्यांनी चढाई.  रात्रीच्या अंधारातही नानाचा अंगठा दूरवर कुठे आहे ते ओळखता येते.  नानाच्या अंगठ्याच्या डावीकडून वाट वर पोहोचते.  आम्ही वाटेच्या उजव्या बाजूला कुठेतरी होतो.  मागच्या कुठल्यातरी जागी डाव्या ऐवजी आम्ही उजवे वळण घेतले होते.  आता नानाचा अंगठा आमच्या बरोबर समोर दिसत होता.  म्हणजे आम्हाला डावीकडे जायला पाहिजे होतं.  वाटेत एक पाण्याचं मोठं टाकं लागलं.  हे सध्याच्या नाणेघाट ट्रेक रूट वर लागत नाही.  वाट चुकल्याने नवीन काहीतरी गवसतंच.  डावीकडे जात आमच्या अंदाजाप्रमाणे थोड्या वेळाने आम्ही पायऱ्यांच्या वाटेला येऊन मिळालो.

अंदाजाप्रमाणे सहाला सर्वजण वरच्या सातवाहन कालीन गुहेपर्यंत पोहोचले.  गुहेत आठ दहा ट्रेकर मुलं रात्री झोपायला होती.  आमच्या आवाजांनी जाग आल्यावर त्यातला मोठा ग्रुप आवरून बाहेर पडला.  तिघांचा छोटा ग्रुप गुडुप्प झोपलेलाच.  आम्ही आत शिरून गुहेची पाहणी केली.  ब्राम्ही लिपीतला शिलालेख.  पुतळ्यांच्या पायाचे राहिलेले अवशेष.  गुहा पाहून झाल्यावर पुढे निघालो.

नाणेघाटाचा शेवटचा टप्पा  ...  शिवमच्या कॅमेऱ्यातून

शेवटचा घळीतला टप्पा संपवून पठारावर पोहोचल्यावर विशालने सर्वांना नाणेघाटाबद्दल आणि परिसराबद्दल माहिती सांगितली.  टोळीचा एकूण अंदाज घेऊन नानाच्या अंगठ्यावर जाणे ऐच्छिक ठेवण्यात आले.  खुशीला आता थकव्याने झोपायचे होते.  मी खुशीबरोबर थांबलो आणि दीप्तीला नानाच्या अंगठ्यावर पाठवले.  इतरांची नानाच्या अंगठ्याची स्वारी होईपर्यंत मागे राहिलेल्या आम्ही सहाजणांनी निद्रादेवीची आराधना केली.

नानाच्या अंगठयावरून दिसलेला जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका  ...  फोटो टिपलाय समीरनने

नानांचे अंगठे बहाद्दर उतरून आल्यावर आम्ही सर्वजण चहा पोह्यांच्या कार्यक्रमाला निघालो.  चहा पोहे बनायला वेळ लागेपर्यंत विशालने उनो चा डाव सुरु केला.  हे प्रकरण मला नवीन होतं.  एक डाव मी बघून घेतला.  पुढचे दोन डाव खेळून मी त्यात पहिल्या तीनात सुटलेला होतो.  आज माझा लकी डे होता तर.  मला सुचलेली उनो ची स्ट्रॅटेजि तुम्हाला सांगतो.  दुसऱ्या कोणाला सांगू नका.  आपल्याजवळचे वाइल्ड कार्ड्स पहिल्या फटक्यात वापराचे नाहीत.  मागे ठेवायचे.  कारण डावाच्या सुरुवातीला सगळ्यांची चढाओढ लागलेली असते वाइल्ड कार्ड्स वापरून इतरांना कार्ड उचलायला लावायला.  त्या गोंधळात भाग न घेता डावाच्या सुरुवातीला आपली कार्ड्स कमी करण्याचा प्रयत्न करायचा. डाव थोडा पुढे गेला कि काहींचे पत्ते संपत आलेले असतात आणि काहींचे वाढलेले असतात.  डावाच्या ह्या मधल्या भागात आपले वाइल्ड कार्ड्स वापरायचे.  साध्या कार्ड्स पेक्षा वाइल्ड कार्ड्स संपवणे सोपे असते.  बघा हि स्ट्रॅटेजि पुढच्या वेळी वापरून.

प्रजेश आणि मि रेड हॅट आणि लिनक्स ह्या विषयावर थोडी चर्चा केली.  चाय पे चर्चा.  चहा-पोहे-उनो कार्यक्रम निवांत पार पडला.  मधल्या काळात काहीजण पळशीकरांना भेटून आले.  त्यांना भेटण्याची इथे उत्तम व्यवस्था आहे.  आता विशालचा राजू ड्रायव्हर बरोबर फोन झाला होता आणि त्याचे त्या ठिकाणी जवळच आगमन झालेले होते हे आम्हाला समजले.  ड्रायव्हर चा फोन लागत नाही म्हणून विशालने मधल्या वेळासाठी उनो बाहेर काढला होता.  उनो बरोबर ठेवणे हि विशालची अफलातून आयडिया आहे.

गाडी जिथे आली होती तिथे सर्वजण गेलो.

स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे दूरवरून चालत येतोय

आमचा नाणेघाट ट्रेक पूर्ण झालेला होता.  आता ऐच्छिक श्रेणीतले तीन पर्याय होते.  समोर दिसणारा जीवधन किल्ला, जवळच असलेला चावंड किल्ला, आणि जवळच असलेलं कुकडेश्वर मंदिर.  टोळीतले अर्धे सदस्य पूर्णपणे थकलेले आणि आता कसलाही किल्ला बिल्ला बघण्याचा मनस्थितीत नव्हते.  त्यांच्यासाठी जीवधन किल्ला जीवघेणा झाला असता.  चावंडही कल्पनेच्या बाहेर होता.  आम्ही कुकडेश्वर मंदिर बघून घरी जायचे ठरवले.

प्राचीन काळचे कुकडेश्वर मंदिर छोटेसेच आहे.  आतून बाहेरून चहूबाजूंनी दगडी भिंतीत कोरीवकाम केलेले आहे.  काळाच्या ओघात बरेचसे कोरीवकाम झिजून गेले आहे.  सह्याद्रीच्या ह्या भागात तुफान पाऊस कोसळतो.

कुकडेश्वर मंदिराच्या भिंतीवरील झिजलेले कोरीवकाम
बाराव्या शतकात बांधलेलं हे शिवमंदिर हेमाडपंती वास्तुकलेचं सुंदर उदाहरण आहे.  पण मंदिराच्या आतमधे आज कोपऱ्या कोपऱ्या वर कोळिष्टकं.  मला वाटत होतं झाडू घेऊन सर्व साफ करावी.

कुकडेश्वर मंदिराच्या आवारात ठेवलेल्या प्राचीन कलाकृती
मंदिराच्या आवारात काही प्राचीन मुर्त्या मांडून ठेवलेल्या.  म्हटलं तर मुर्त्या, म्हटलं तर दगड.  आजुबाजुचा प्लास्टिक कचरा आपण सध्या एकविसाव्या शतकात असल्याची जाणीव करून देत होता.  कुकडेश्वर मंदिर आणि परिसर बघून मला परत तोच प्रश्न, का हे असं.  जगण्याची समृद्ध अडगळ?  अहो ज्याला त्याला आपापल्या चष्म्यातून आजूबाजूचं जग दिसतं.  प्रत्येकाचा चस्मा वेगळा तसेच दृश्य वेगळे.  नव्हे दृश्य तेच पण दिसतं वेगळे.  थोडक्यात काय, जशी दृष्टी तशी सृष्टी.  काही हजार वर्षांची पार्श्वभूमी आहे ह्या भूमीला.  काळाच्या ओघात अनेक रूढी परंपरा आल्या आणि गेल्या.  शेकडो बदल घडले.  आज अडगळ म्हणून सगळं बाजुला टाकणं हा सोयीस्कर आपमतलबीपणा झाला.  धर्म हि संकल्पना काय आहे तेच आज बहुतेकजण विसरून गेलेत.  रूढी, परंपरा, पूजा अर्चा म्हणजे धर्म अशी आज सर्वसाधारण व्याख्या बनलीये.

काही हजार वर्षांपूर्वी धर्म हि मूळ संकल्पना काय होती ते विचारात घेऊया.  मानवी जीवनात आचरण कसे असावे त्याची समाजातल्या ज्ञानी माणसांकडून मिळालेली शिकवण.  हि शिकवण रोजच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी सोपी जावी म्हणून काही मार्गदर्शक सूचना (guidelines) तयार झाल्या.  कालांतराने त्यांचे प्रथा परंपरात रूपांतर झाले.  शतकानुशतके काळ पुढे चालला.  मूळ संकल्पना मागे पडत गेली आणि प्रथा परंपरा हाच धर्म असा समज झाला.

आज जे कालबाह्य झाले आहे ते वेगळे करून मूळ संकल्पना काय आहे ते पहिले तर लक्षात येते.  आपल्याकडे आहे वैश्विक ज्ञानाचा वारसा.  हजारो वर्षांच्या संक्रमणात तो झिजलाय विरलाय कोळीष्टकात अडकलाय.  ओळखू येत नाहीये.  पण चित्र पूर्णपणे फिस्कटलेलं नाहीये.  आजही कित्येकांना काही गूढ अनाकलनीय प्रश्नांचा शोध सोडवत नाही.  १९९९ साली आलेला सुपर हिट सायन्स फिक्शन पिक्चर द मॅट्रिक्स पाहिलायत?  वाचोवस्की ब्रदर्स ना ह्या पिक्चरची प्रेरणा कुठून मिळाली माहितीये?  योग वसिष्ठ.  माहिती नसेल तर हे बघा, हे पण बघा, आणि हे पण बघा.  वेळात वेळ काढून हेही वाचा.  मग परत एकदा द मॅट्रिक्स पहा.  बघा ह्या वेळी नक्कीच वेगळा वाटेल.

असो.  हा गहन विषय खूप झाला.  कुकडेश्वर मंदिरापासून आम्ही निघाल्यावर थोड्या अंतरावर चावंड किल्ला लांबून आमची गंमत बघत होता.  कसे पुढ्यात पोहोचुन सुद्धा इथे न येता जातायत.  काय करणार.  नाईलाज होता.  नारायणगावला दूध पिण्याचा pit stop झाला.  मि आणि खुशी गाडीतच झोपलो होतो.  गाडीतला परतीचा प्रवास म्हणजे काहींसाठी गाण्यांच्या भेंड्या.  माझ्यासाठी झोपेचा तास.

तीनच्या सुमारास कधीतरी कोकणे चौकात उतरून घरी पोहोचलो.  घरी आल्यावर खुशी आणि दीप्ती मोजत होत्या ट्रेक मधे कोणकोणते प्राणी पाहिले.  बेडूक, खेकडा, साप, काजवे, माकडं.  नाईट ट्रेक खुशी ने चांगला पूर्ण केला म्हणजे आता दिवसाचे छोटे ट्रेक ती चांगले पूर्ण करेल.  आता दिवसाच्या सोप्या ट्रेकला आम्हा तिघांनाही जाता येईल.  तुम्हालाही स्वछंद गिर्यारोहकांबरोबर ट्रेक करायचा असेल तर हे संकेतस्थळ बघा.

No comments:

Post a Comment