Thursday, August 31, 2017

घोराडेश्वर


माझ्या घरापासून सगळ्यात जवळचा डोंगर घोराडेश्वरचा.  ह्या डोंगरावर मि बऱ्याचदा गेलोय.  कधी भल्या पहाटे.  कधी दुपारचा.  कधी एकटाच.  कधी फॅमिली ट्रेक.  कधी डोंगर पठारावर हिल रनिंग केलंय.  कधी मागच्या दगडांवर भर्राट वारा खात बसलोय.  कधी तासाभरात रिटर्न.  कधी तीन तासांची मनसोक्त भटकंती.

काल दुपारी परत एकदा पूर्ण डोंगर पालथा घातला.  एकट्यानेच.  सोलो ट्रेक केल्याशिवाय समजणार नाही ह्याची रंगत काय आहे.
हौशी आणि नवख्या ट्रेकर्ससाठी सावधानतेचा इशारा - परिसराची योग्य माहिती करून घेतल्याशिवाय आणि काटेकोर प्लॅन बनवल्याशिवाय एकट्याने गिरिभ्रमण (solo trek) करणे धोक्याचे ठरू शकते.  साहसाला सावधतेची जोड असावी.

घोराडेश्वर डोंगरावर बहुतेकजण जातात ते पायर्यांच्या वाटेने गुहेतील शिवमंदिरापर्यंत.  ही पिटुकली वारी मि थांबवली आहे बऱ्याच आधी.  मि अलीकडच्या डोंगरवाटेने चढून माथ्या पर्यंत जातो.  तिथुन पलीकडच्या टोकापर्यंत जातो.  कधी त्याच्याही पुढे.

कालचा प्लॅन पूर्ण डोंगर फिरण्याचा होता.  रस्त्याच्या थोड्या आतल्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत मि गाडी ठेवली.  इथे परत येईपर्यंत आता पायगाडी.
डोंगरावर जाणारी वाट समजण्यासाठीच्या दोन खुणा म्हणजे डोंगराच्या निम्म्या उंचीवरचे खजुराचे झाड आणि तिथे पोहोचल्यावर तिथुन पुढे दिसणारा झेंडा.  ह्या दोन खुणा ध्यानात ठेऊन गेल्यावर भरकटण्याची शक्यता नाही.


डोंगरभ्रमंतीस सुरुवात
पिंपरी-चिंचवडच्या निसर्गप्रेमी मंडळींनी बऱ्याच ठिकाणी चर खणलेले आहेत.  बांधावर झाडेही लावली आहेत.  बऱ्याचदा रविवार सकाळी ही मंडळी नवीन झाडे लावण्यासाठी आणि झाडांना पाणी घालण्यासाठी आलेली असतात.

पिंपरी-चिंचवडच्या निसर्गप्रेमी मंडळींनी खणलेले चर

घोराडेश्वर डोंगराच्या एका बाजुला जुना पुणे-मुंबई रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजुला एक्सप्रेस वे (मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग) आहे. त्यामुळे ह्या डोंगरात फिरताना जंगल ट्रेक चा फील कुठेच येत नाही.  दोन-तीनच भाग आहेत जिथे गच्च झाडीमुळे थोडा जंगलाचा भास होतो.  वन्य प्राणी तर इथे नाहीतच.  दोन महामार्गांच्या मधल्या बेचक्यात कुठला प्राणी टिकतोय आज.  पक्षी येतात तेवढेच.

माझा रानावनातल्या वाटा धुंडाळण्याचा जो काही थोडाफार कॉन्फिडन्स आहे तो ह्या घोराडेश्वराच्या डोंगरामुळेच.  शहरातल्या रस्त्यांवर तर मि अट्टल रस्ताचुकव्या आहे.  त्याच गल्लीबोळांतून दहा वेळा गेलो तरी मला रस्ता काही समजत नाही.  गूगल मॅपने माझ्यासारख्यांचं जग बरंचसं बदलुन टाकलंय.  पण वाट न चुकता एकटा ट्रेक करण्याचा कॉन्फिडन्स मला दिला तो ह्या घोराडेश्वरानेच.

तळेगाव, देहूरोड आणि परिसरात ढगांची लपाछपी रंगात आली होती.

नेहमीप्रमाणे आजही भर्राट वारा सोबतीला होता.  वाऱ्याबरोबर जर पाऊस पण आला तर दोघांचे कॉम्बिनेशन डेडली होते मग.  कसे ते इथे वाचा.  काल रात्री धो धो कोसळलेला पाऊस आज सुट्टीवर दिसतोय.  वीस मिनिटात डोंगर पठारावर पोहोचलो.

सप्टेंबर नुकताच येतोय, पण रानफुलं आधीच जमली आहेत गटागटाने

पठारावरच्या खोलगट भागात पावसाचे पाणी साठलेले होते.  एक मेंढपाळ कुटुंब त्यांच्या साठ-सत्तर शेळ्या मेंढ्यांना घेऊन आले पाणी प्यायला.  मेंढ्यांचा कळप आडवा जाऊ दिला.  मग थोडेसे हिल रनिंग.  पठारावरून पलीकडे जाईपर्यंत.  पलीकडच्या बाजुला थोडेसे उतरून गेल्यावर काही भन्नाट जागा आहेत.  बऱ्याच ठिकाणी मोठमोठे दगड पुढे आलेले आहेत.  ह्या बाजुने सुसाट वारा अंगावर येतो.  दगडांवर बसुन आजुबाजुचा परिसर न्याहाळण्यात वेळ कसा जातो समजत नाही.  लांबवर क्रिकेट स्टेडियम, एक्सप्रेस वे वरच्या गाड्या, पलीकडचे छोटे मोठे डोंगर दिसतात.

दगडांवर बसुन भर्राट वारा खाण्याची माझी आवडती जागा

दगडांच्या बाजूने खाली उतरायला वाट आहे.  ह्यावर्षी हिवाळ्यात एक गृहस्थ बरेच दिवस इथे पायऱ्या बनवत होते.  रोज पहाटेपासून त्यांची मेहेनत चालु असायची.  त्यांच्या मेहेनतीचे फळ आता पावसाळ्यात स्पष्ट दिसतंय.  ह्या भागात उतरणे त्यांनी सोपे करून टाकले आहे.  घसरण्याची शक्यता एखाद्याच ठिकाणी उरली आहे.  थोडे पुढे गेल्यावर Y जंकशन येते.  Y जंकशन पर्यंत त्यांच्या पायऱ्या भरघोस मदत करतात.
Y जंकशन पासुन डावीकडे जाणारा रस्ता घेतला तर आपण डोंगराला फेरा घालुन जिथुन चढायला सुरुवात केली त्या ठिकाणी जातो.  उजवीकडे जाणारा रस्ता क्रिकेट स्टेडियम पर्यंत जातो.

Y जंकशन

स्टेडियम पर्यंत जाण्यासाठी मि उजवीकडचा रस्ता पकडला.  परत फिरून आल्यावर इथपासून सरळ वर न जाता मि डोंगराला वळसा घालुन जायचे ठरवले होते.
स्टेडियम पर्यंत जाणारी पायवाट डोंगराच्या पुढंपर्यंत गेलेल्या एका सोंडेवरून जाते.  दोन्ही बाजुला गच्च झाडं.  बाजुला सीआरपीएफ चा परिसर असल्यामुळे ह्या झाडांना कोणी हात लावत नसावे.

दोन्ही बाजुला गच्च झाडं आणि मधून गेलेली पायवाट


डोंगर उतरून गेल्यावर एक छोटेसे देऊळ आणि देवळाच्या बाजुला एक पत्र्याची खोली आहे.  आजुबाजुच्या झाडीमुळे आणि खोलगट भागात असल्यामुळे हे लांबुन दिसत नाही.  देवळाच्या बाजुने जाणारी पायवाट पकडुन पुढे गेलो.  ह्या भागात फारसं कोणी फिरकत नसल्यामुळे कि काय, झाडं भरगच्च आहेत.
स्टेडियम समोर दिसायला लागल्यावर थांबलो.  आजुबाजुला विखुरलेल्या काचेच्या बाटल्या क्रिकेटवीरांची आठवण करून देत होत्या.

डोंगर उतरून गेल्यावर समोर दिसणारे क्रिकेट स्टेडियम

एका पाणी ब्रेक नंतर परतीची वाट धरली.  पावसाची एक सर येऊन गेली.  नंतर झकास ऊन पडले.  पावसामुळे काही ठिकाणी पायवाट आणि दगड घसरडे झालेले होते.  पावसाळी ट्रेक मध्ये पायवाट न पकडता तिच्या बाजुने गवतातुन चालावे.  पायाला ग्रीप मिळते.  उन्हाळी ट्रेक मध्ये हेच गवत सुकल्यावर घसरडे बनते.  उन्हाळ्यात पायवाटेवर ग्रीप मिळते.
 
D - मागच्या बाजूचे दगड जिथे भर्राट वाऱ्यात बसुन फोटोग्राफी केली.  इथपासून खाली डोंगर उतरून आलो
Y - Y जंकशन.  इथून सरळ वाटेने डोंगर उतरून आलो

आल्या वाटेने Y जंकशन पर्यंत गेलो.  Y जंकशन पासुन सरळ वर न जाता डोंगराला वळसा घालुन जाणारी वाट पकडली.  इकडे सहसा कोणी फिरकत नाही.  या वाटेवर कधीही या, वातावरण नेहेमीच आल्हाददायक असते.  हि वाट डोंगराच्या पायथ्यालगत जात नाही.  ह्या वाटेने जाताना नेहमी ध्यानात ठेवायचे - डोंगर पूर्णपणे उतरायच्या फंद्यात पडायचे नाही.  साधारण ३०% height gain असलेल्या भागातुन पायवाटेने पुढे पुढे जात राहायचे.

पावसाळी दिवसात इथे पाणी डोंगरावरून खाली वाहत येते. काही ओहोळ सोपे आहेत तर काही उगाच चाचणी परीक्षा घेणारे.

हि वाट पुढे मुख्य वाटेल मिळते जिथुन खजुराच्या झाडापर्यंत चढून गेलो होतो.  उतरून गाडी पर्यंत खाली आलो.  चार वाजता सुरु झालेली पायगाडी पावणेसहाला थांबली.

कालच्या डोंगरभ्रमंतीचा मॅप
P
- गाडी पार्किंगची जागा
1 - चढाईचा पहिला टप्पा, खजुराचे झाड
2 - चढाईचा दुसरा टप्पा, पठारावरच्या झेंडा
3 - मागच्या बाजुची दगडांवर बसायची जागा. इथून खाली उतरलो
Y - Y जंकशन. इथून सरळ खाली उतरलो 
5 - क्रिकेट स्टेडियम पुढ्यात दिसेपर्यंत डोंगर उतरून गेलो.
आल्या वाटेने Y जंकशन पर्यंत गेलो. उजवीकडच्या वाटेने डोंगराला वळसा घालुन चढून गेलेल्या वाटेल लागलो. तिथून उतरून P पाशी रिटर्न

पावणेसहा वाजताही पूर्ण उजेड होता.  मुंबई-पुणे वाले आणि हिंजवडीचे ट्रॅफिक झेलत अर्ध्या तासाने घरी पोहोचलो.

No comments:

Post a Comment