साधारण १५ वर्षापूर्वी एकदा आम्ही हरिश्चन्द्रगडावर ट्रेकिंगचा प्लॅन बनवला होता. शाम भैय्या, श्रीजित, मी, आणि सिंग अंकल. सिंग अंकलच्या नेतृत्वाखाली आम्ही मोहीम फत्ते करून आलो होतो. सिंग अंकलनी पूर्ण वेळ आम्हा तिघांना उत्कृष्टपणे सांभाळून घेतले. आम्ही सर्व शिधासामुग्री बरोबर घेऊन गेलो होतो. रॉकेल, स्टोव्ह, भांडी, डाळ, तांदूळ, वगैरे. जमेल तशी डाळ तांदळाची खिचडी बनवून खाल्ली. एक गुहा साफसुफ करून त्यात झोपलो. रात्रभर ढेकूण चावले. घरी परतेपर्यंत आमच्या कपड्यात आणि सामानात ढेकूणच ढेकूण. दोन दिवस चालून चालून जीव गेला. परतीच्या चालीत तर थकल्याने माझी बडबड बंद झाली. इतक्या महाप्रचंड गडावर ट्रेकर फक्त आम्ही चारच. बाकी एका झापात एक धनगर आजी आजोबा आणि त्यांच्या बरोबर चार कच्ची बच्ची. त्यांनी आम्हाला लिंबू सरबत बनवून दिलं. बदल्यात आम्ही त्यांना आमच्याकडचं उरलेलं साहित्य दिलं. रॉकेल, डाळ, तांदूळ.
आता परत एकदा हरिश्चन्द्रगडावर जायचा योग्य आला. स्वछंद गिर्यारोहकांबरोबर. १५ जणांच्या टोळीला घेऊन गेलेले राहुल आणि मी. ह्यावेळीही आमची मोहीम फत्ते. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद, विशाल.
 |
कोकणकड्यावर १७ स्वछंद गिर्यारोहक |
शनिवार २३ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता एक एक करत सर्वजण बसमधे जमलो. ह्या ट्रेक मधे विशाल नसल्यामुळे बसमधून जाता येताना गाण्याचे तास झाले नाहीत. बसच्या प्रवासात मी जमेल तशी झोप घेतली. माळशेज घाटातून वळिवरे गावी बस साधारण साडेतीन वाजता पोहोचली. चहा पोहे, आवरा आवरी वगैरे करून निघेपर्यंत पाच वाजले.
 |
शेकोटी ... अंकुशच्या कॅमेऱ्यातून |
सर्वांची तोंडओळख करून घेऊन हरिश्चन्द्रगडावर नळीच्या वाटेने चढाई करण्यास सुरुवात केली. राहुल आणि कमळू दादा पुढे, सगळ्यात मागे मी, आणि आमच्या मधे १५ जणांची टोळी. ट्रेक संपेपर्यंत आम्ही हे फॉर्मेशन तुटू दिले नाही.
पायगाडीला सुरुवात होताच माझ्या उजव्या बुटात काटा टोचू लागला. आधीच्या ट्रेक नंतर बूट व्यवस्थित साफसूफ न करता मी तसेच आणले होते. हा धडा परत एकदा शिकायला मिळाला. मी ड्रॅगनचं शेपूट असल्यामुळे (म्हणजे आमच्या १७ जणांच्या रांगेत सगळ्यात मागे) मला मोकळा वेळ असा मिळतच नव्हता. पहिल्या विश्रांती हॉल्ट मधे वेळ मिळताच मी बूट काढून त्यात अडकलेला काटा बाहेर काढला. “It isn’t the mountains ahead to climb that wear you out; it’s the pebble in your shoe.” हे अलींचं ब्रीदवाक्य इथे प्रत्यक्ष जगायला मिळालं. सह्याद्रीच्या बिनभिंतींच्या शाळेत असे शेकडो धडे मोफत मिळतात. शिकण्याची इच्छा पाहिजे.
रात्रीच्या अंधारात किती चाललो ते कळत नाही आणि थकायलाही होत नाही. पहिल्या दोन तासाची चढाई चांगल्या वेगात झाली. सुरुवात अशी झकास झाली कि पूर्ण ट्रेक व्यवस्थित होतो.
पहाटेच्या वेळी वानरांचे आवाज जंगलात घुमत होते. उजाडल्यावर समोर कोकणकडा दिसायला लागला. आत्तापर्यंत बंद असलेले कॅमेरे अधे मधे सुरु झाले.
 |
छोट्या मोठ्या दगड धोंडयांतून वर चढत गेलेली नळीची वाट |
हरिश्चन्द्रगडावर जायच्या वाटांपैकी सगळ्यात कठीण वाट हि नळीची वाट.
कोकणकडा व बाजूचा डोंगर ह्यांच्या मधल्या अरुंद घळीतून गेलेली हि नळीची
वाट.
एका छोट्याशा घटनेत फर्स्ट एड किट बाहेर काढावे लागले. बाकी हा अवघड ट्रेक सर्वांनी व्यवस्थित पूर्ण केला. तसे चालून चालून पाय सर्वांचेच थकले.
रॉक पॅच आल्यावर राहुल आणि कमळू दादाने रोप लावले. एकेक करत सर्वांना वर घेतले. कोणीही न धडपडता दोन्ही रॉक पॅच व्यवस्थित पार पडले.
 |
एका रॉक पॅच ला राहुल आणि कमळू दादा एकेकाला वर घेताना |
वैधानिक इशारा : नळीच्या वाटेने जाणे अवघड आहे. प्रस्तररोहणाचे तंत्र दोन ठिकाणी वापरावेच लागते. ह्या वाटेने कोकणकड्यावर जायला सात ते बारा तास लागतात. योग्य तयारीनिशी व माहितगार माणसांबरोबरच ह्या मार्गाने जावे.
मधेच कुठेतरी दोन तीन वेळा दरीत दरड कोसळल्याचा आवाज उरात धडकी भरवणारा होता.
 |
एक छोटासा फोटो ब्रेक |
सर्वजण एकमेकाला मदत करत मार्ग आक्रमिला. एकीचे बळ म्हणजे काय त्याचं उत्तम प्रात्यक्षिक.
 |
एक अवघड वळण लीलया पार करताना स्वछंद गिर्यारोहक अंकुश तोडकर |
एका मोक्याच्या जागी अंकुश आणि मी एकमेकांचे फोटो घेतले.
 |
अगदी मोक्याच्या जागी टिपलेला फोटो ... अंकुशच्या कॅमेऱ्यातून |
पूर्ण ट्रेक मधे सर्वात मागे राहणे म्हणजे आज माझी पेशन्स टेस्ट होती.
आपण हरिश्चन्द्रगडावर जायच्या वाटांपैकी सगळ्यात कठीण वाटेने आलोय, आणि इतर वाटा ह्यापेक्षा सोप्या आहेत हे कळल्यावर एकाने मला विचारले "मग आपण ह्या वाटेने का आलोय?" त्यावर माझे सरळ सोपे उत्तर - "खाज".
"अजून किती चढायचं राहिलंय?" ह्या प्रश्नाला माझं नेहमी एकच उत्तर - "ह्या समोरच्या डोंगराच्या पलीकडे जायचंय."
सकाळी पाचला सुरु झालेली आमची पायगाडी दुपारी बाराला कोकणकड्याच्या नयनरम्य स्टेशनवर पोहोचली. आज आम्ही कोकणकडा खालूनही पाहिला आणि वरूनही. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट. हिवाळ्यातल्या दिवसांमधलं धुरकट वातावरण आजही होतं.
 |
कोकणकड्यावरून नजारा |
अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, रौद्रभीषण कोकणकडा. इथे इंद्रव्रज दिसणे म्हणजे दुग्धशर्करायोग.
कोकणकड्यावर आमची मनसोक्त फोटोग्राफी झाली. आता इथे पाहतो तर बरीच गर्दी. नळीच्या वाटेने चढून आलेले आम्हीच होतो. पण इतर वाटांनी आलेले बरेच जण होते.
भूक आणि थकव्यामुळे आता जेवणाचे वेध लागलेले. भास्कर दादाच्या झापात जेवणाची पंगत बसली.
 |
भास्कर दादाच्या झापात जेवणाची पंगत |
जेऊन झाल्यावर कमळू दादाला निरोप दिला. हे महाशय आता नळीच्या वाटेने एकटे उतरून जाणार होते. आमच्या सर्वांसाठी अशक्य कल्पना. जंगलांच्या संगतीनं वाढलेली हि रानाची पाखरं. ह्यांच्यासाठी हा रोजचा उद्योग.
पोटोबा भरल्यावर आता डोंगरच्या विठोबाला भेटायला निघालो.
 |
हरिश्चन्द्रेश्वराचे दुरून दर्शन |
हरिश्चन्द्रेश्वर मंदिराच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात बरीच गर्दी. हरिश्चन्द्राची जत्राच भरलेली जणू.
 |
मंदिराच्या आवारात रचलेले दगड
काही आखीव रेखीव तर काही ओबड धोबड |
मंदिराच्या आवारातल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी भरून घेतलं. जमेल तसे जमेल तितके डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतले.
एका शिलालेखातला चक्रपाणी हा शब्द मला ओळखता आला.
 |
हरिश्चन्द्रेश्वराचे मंदिर |
जरी हा गड असला तरी महाराष्ट्रातल्या इतर डोंगरी किल्ल्यांपेक्षा बराच
वेगळा. इथे गडाला तटबंदी नाही. चहुबाजूंच्या रौद्रभीषण कडेकपारी हेच इथलं नैसर्गिक संरक्षण. गडाचा आकार अजस्त्र. इथली कातळात कोरलेली बांधकामं आणि गुहा भव्य दिव्य. हि प्राचीन
देवळं, गुहा, पाण्याच्या टाक्या आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.
 |
मंदिराच्या आवारातील पुरातन कलाकृती |
चार हजार वर्षांची पौराणिक पाश्वर्भूमी लाभलेलं हे स्थान.
हरिश्चन्द्रेश्वराचं मंदिर पाहून झाल्यावर केदारेश्वराची गुहा पाहून आलो. गुहेत कंबरभर पाणी होते. गुहेतल्या चार खांबांपैकी एकच खांब शाबूत आहे. अशी आख्यायिका आहे कि जेव्हा चौथा खांब तुटेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल.
 |
दारू पिने टाळा. आनी जमलं तर एखांदं झाड लावा. |
हरिश्चन्द्रेश्वराचा निरोप घेत होतो तेवढ्यात त्याने आणखी एक कलाकृती पुढ्यात मांडली. मला ते
गंडभेरुंड वाटलं. नंतर शोध घेतल्यावर बोध झाला, ते एक
कीर्तीमुख होतं. ह्या विषयात धुंडाळताना मला सापडलेली हि उपयुक्त
साईट आणि हा
ब्लॉग.
 |
कीर्तीमुख |
हरिश्चन्द्रेश्वराच्या परिसरात अशा कलाकृतीपूर्ण शिळा (खरंतर कलाकृतीच) विखुरलेल्या पाहून परत एकदा तोच विचार मनात आला, "का हे असे?" ... जगण्याची समृद्ध अडगळ? नक्कीच नाही. खरंतर आपल्याकडे आहे वैश्विक ज्ञानाचा वारसा. ज्याला त्याला आपापल्या चष्म्यातून आजूबाजूचं जग दिसतं. प्रत्येकाचा चस्मा वेगळा तसेच दृश्य वेगळे. नव्हे दृश्य तेच पण दिसतं वेगळे. थोडक्यात काय, जशी दृष्टी तशी सृष्टी. असो. बोलू आपण ह्या विषयावर कधीतरी.
गड उतरायला निघण्यापूर्वी हेड काउन्ट घेऊन राहुल ने काही सूचना दिल्या.
गड उतरून खिरेश्वर गावात पोहोचायला आम्हाला साधारण तीन ते चार तास लागणार
होते.
आमच्यापैकी काहींना तारामती शिखरावर जायचं होतं. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी हे एक. पण ट्रेकचं टाइम मॅनेजमेंट विचारात घेता आम्ही तिथे भेट द्यायचं टाळलं. गणेश गुहा आणि आजूबाजूच्या इतर गुहा पाहून पुढे निघालो.
खिरेश्वर गावात उतरायची वाट नळीच्या वाटेपेक्षा बरीच सोपी. पण उतरताना सावधगिरी बाळगणे इष्ट. अति थकव्याने पायाखालच्या वाटेवर लक्ष न राहिल्यास घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वजण एकमेकाला साहाय्य करत उतरलो. आम्ही उतरताना कितीतरी ग्रुप चढून येत होते. आज नक्कीच हरिश्चन्द्राची जत्रा होती.
 |
हरिश्चन्द्रगडावरून टोलार खिंडीकडे जाताना |
टोलार खिंडीत एका ठिकाणी दगडात कोरलेले व्याघ्रशिल्प आहे असे आनंद पाळंदे ह्यांच्या एका पुस्तकात मी वाचले आहे.
वाटेत ठिकठिकाणी गावकऱ्यांनी लिंबू सरबताची दुकानं मांडलेली. टोलार खिंडीतून उतरून खिरेश्वर ह्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. चहापानाचा कार्यक्रम उरकून बसमधे बसलो. वाटेत एक ठीक जागा बघून खाद्य विश्रांती केली. बसच्या पूर्ण प्रवासात मी जमेल तशी झोप काढली. दहाच्या सुमारास शिवाजीनगरला पोहोचलो.
आमचा पूर्ण ट्रेक प्लॅन प्रमाणे पार पडला. भल्या पहाटे ताजेतवाने
असताना चढाई सुरु केली. दुपारच्या कडक उन्हाने कातळकडे तापायच्या आधी
दोन्ही रॉक पॅच पार केले. अवघड अशा नळीच्या वाटेने सर्वजण सुखरूपपणे
कोकणकड्यावर पोहोचलो. वेळेत जेवायला भास्कर दादाच्या झापावर पोहोचलो.
गडावर फार टंगळ मंगळ न करता गड उतरायला घेतला. अंधार पडायच्या आत उतरून
खिरेश्वर गावात पोहोचलो.
२०१७ चा शेवट तर झकास झाला. २०१८ मधे नवीन मोहिमा करायच्या आता. स्वछंद गिर्यारोहकांबरोबर तुम्हाला ट्रेक करायचा असल्यास
ह्या साईटला भेट द्या.