Tuesday, December 25, 2018

K2S - कशासाठी

Only those who will risk going too far can possibly find out how far one can go.  -- T.S. Eliot

जर तुम्ही पुण्यनगरीत रहात असाल आणि असं काही करायची हुक्की आली तर जवळच एक उत्तम जागा आहे.  जागा नव्हे एक प्रयोगशाळा म्हणा.  स्वतःला ओळखण्याची.  स्वतःच्या क्षमता जाणून घेण्याची.  तमाम ट्रेकर मंडळींमधे हि प्रयोगशाळा K2S म्हणून प्रसिद्ध आहे.  कात्रज ते सिंहगड.  के टु एस.  जुन्या मुंबई बंगलोर रस्त्यातल्या बोगद्यापासून चालत जायचं सिंहगडापर्यंत.  अंतर मोजलं तर साधारण १३ किलोमीटर.  ह्यात सपाट भाग कुठेच नाही.  १६ टेकड्या चढायच्या आणि उतरायच्या.  एकामागोमाग एक.  एकदा चालायला सुरुवात केली कि हा प्रयोग संपवावाच लागतो.  मधे कुठे सोडून देऊ शकत नाही.  तसा पर्यायच उपलब्ध नाही.  एकदा सुरुवात केली कि प्रयोग संपवूनच सोडायचा.

मागच्या वर्षी मी केलेला हा प्रयोग जरा अवघड गेला होता.  शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोन तास फुटबॉल खेळलो.  पूर्ण दिवस छोट्या मोठ्या कामांमधे गेला.  दिवसा झोप न घेता तसाच थकलेल्या अवस्थेत रात्री K2S चा प्रयोग केला.  हात पाय गळाले नव्हते पण निद्रादेवी क्रोधीत झाली.  ते प्रकरण इथे वाचा.

ह्यावेळी शनिवार सकाळचं फुटबॉल सोडून दिलं.  दुपारी अर्धा तास झोपायचा प्रयत्न केला.  दिवसा जमेल तेवढा आराम करायचा प्रयत्न केला.  असा K2S साठी संध्याकाळी तयार होतो.  साडेसात वाजता विशालचा फोन आला, त्याने ग्रुप घेऊन स्वारगेट सोडलंय.  आणि मी अजून घरीच होतो.  बापरे.  मग बदाबद बॅग भरली आणि निघालो.  पिंपळे सौदागर ते स्वारगेट रिक्षा प्रवास हा एक वेगळा विषय ठरला.  मीटर भाड्याने रिक्षा मला वर्ज्य आहे.  तरी वेळेला करावी लागली.  बुद्धिबळाच्या पटावरचा जसा घोडा, तशी पुण्याच्या रस्त्यांवर रिक्षा.  बुद्धिबळाच्या पटावर सगळ्यात आगळा वेगळा कोण असेल तर घोडा.  भयंकर अनाकलनीय चाल.  प्रचंड अनपेक्षित मार्गक्रमण.  सगळ्या सुखद सुरळीत चाललेल्या राज्यात नेमक्या वेळी येऊन कडमडणार आणि सगळा डाव पलटवणार.  नाहीतर नेमक्या ठिकाणी उभा रहाणार आणि प्रतिस्पर्ध्याच्या नाकात दम आणणार.  हल्ला करायला लागला कि समोरच्याला पळता भुई थोडी.  आणि दोन घोडे एकत्र आले तर मग विचारूच नका.  तर अशा ह्या रिक्षाने तिच्या अगम्य अतर्क्य चालीने वाटेतला पटाचा जमेल तेवढा भाग उधळत मला इच्छित स्थळी वेळेत नेऊन पोहोचवले.

एक एक करत १४ स्वछंद गिर्यारोहक जमा झालो.  साडेनऊला बस आल्यावर बस मधे चढलो.  बस पूर्ण भरलेली.  बरेचसे K2S साठीचे ट्रेकर्स.  काही पुण्यातून आपापल्या गावी परतणारे गावकरी.  कात्रज घाट चढून गेल्यावर जो बोगदा आहे, त्याच्या नंतर लागेचच K2S ट्रेकची सुरुवात आहे.  इथे बस बरीचशी रिकामी झाली.  एक मोठा ग्रुप खाजगी बस मधून आला होता.  त्यांच्यातल्या एकाने स्टिरीओ सिस्टिम वर मोठ्या आवाजात गाणी लावलेली.  आत्ता उडतोय.  रात्रीत K2S ह्याचा जीव काढेल.  तो मोठा ग्रुप आणि पंधरा राही ट्रेकर्स पुढे गेल्यावर आम्ही त्यानंतर K2S च्या वाटेने सुरुवात केली.  थोडं पुढे गेल्यावर एका मोकळ्या ठिकाणी आम्ही १४ जणांनी तोंडओळख करून घेतली.  देवळाजवळ न जाता K2S च्या वाटेने पुढे निघालो.  अमोल सगळ्यात पुढे, भाग्येश सगळ्यात शेवटी, आणि ह्या दोघांमधे बाकीचे सगळे.  हे फॉर्मेशन तुटू द्यायचे नाही.  काहीही झाले तरी स्वछंद गिर्यारोहक कधीच कोणाला सोडून जात नाहीत.

काही वेळापूर्वी विशाल आणि ग्रुप देवळापासून पुढे गेले होते.

पुणे आणि सभोवतालचा परिसर  ...  K2S ट्रेक मधे पाहिलेला

मुंबई बंगलोर नव्या रस्त्याला जो बोगदा आहे त्या डोंगरावरून K2S ची वाट जाते.  पुणे आणि सभोवतालचा बराच मोठा परिसर इथून दिसतो.

पहिल्या दोन टेकड्या मोठ्या आहेत.  ह्या दोन मधेच चित्र बरंचसं स्पष्ट होतं. आज ट्रेकला किती वेळ लागणार ते.

तिसरी किंवा चौथी टेकडी असेल जिथे आम्ही विशाल आणि पहिल्या फळीतल्या स्वछंद गिर्यारोहकांना जाऊन मिळालो.  आता विशाल ने सगळ्यांचं एक फॉर्मशन केलं.  अमोल सगळ्यात पुढे.  भाग्येश सगळ्यात शेवटी.  दोघांच्या मधे सगळ्या स्वछंद गिर्यारोहकांना घेऊन विशाल आणि प्रसाद.

टेकड्यांमागून टेकड्या संपवल्या.  आज मी ठरवूनच आलो होतो.  K2S तोडायचाच.  पूर्ण वेळ अमोल बरोबर लीड ला राहिलो.

अंधाराची भीती घालवण्यासाठी रात्रीचा K2S ट्रेक हि उत्तम जागा आहे.  आज पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश पूर्णवेळ मदतीला होता.  टॉर्चची गरजच नव्हती.  हात मोकळे असलेले केव्हाही चांगलेच.  ह्या ट्रेकला वाट चुकायचा धोका नाही.  शेवटची टेकडी येईपर्यंत एकच वाट आहे.  वाट सोडून कुठेही डावीकडे उजवीकडे जायचे नाही.  वाट जाईल तशा सर्व टेकड्या चढायच्या आणि उतरायच्या.  कुठेही टेकडी सोडून शॉर्टकट मारायला जायचं नाही.  सिहंगडावरच्या टॉवरवरचा लाल लाईट पहिल्या टेकडीपासून दिसत राहतो.

आज डिसेंबरच्या थंडीतला शनिवार आणि पौर्णिमा.  K2S साठी जुळून आलेला योग्य दिवस.  तसा K2S अवघड प्रकारे करायचा असेल तर दिवसा करावा.  रात्रीच्या वेळी अवघड प्रकारे करायचा असेल तर उन्हाळ्यातल्या अमावास्येच्या रात्री करावा.  मिट्ट काळोखात.

टेकड्या चढण्या उतरण्याचा आज भरपूर सराव झाला.  टेकड्या उतरताना आज मी वापरलेली तंत्र सांगतो. 
१. नाकासमोर सरळ न उतरता तिरकं उतरत जायचं.  हे तुम्हाला माहिती असेल.  आता ह्यातले बारकावे बघा.  दहा बारा पावलं एका बाजूला तिरकं गेल्यावर दुसऱ्या बाजूला तिरकं जायचं.  अशी बाजू बदलल्याने आपण चालत्या वाटेपासून फार लांब भरकटत जात नाही.  बाजू बदलताना दोन पर्याय आहेत.  शरीराची दिशाही बदलायची, किंवा शरीराची दिशा तीच ठेऊन फक्त बाजू बदलायची.
२. उतारावर वेग पकडला असाल आणि थांबायचं असेल तर डावीकडे नव्वद अंशात वळायचं.  वेग कमी होऊन थांबुन जाल. डावीकडेच का वळायचं, उजवीकडे का नाही ह्याचं माझ्याकडचं उत्तर हे माझं एक सीक्रेट आहे.  कोणाला सांगू नका.  मला डावीकडे वळणं सोपं जातं कारण माझ्या शरीराची डावी बाजू उजव्या बाजूपेक्षा जास्त लवचिक आहे.  कोणाला सांगू नका.  तुम्ही तुमच्यासाठी योग्य असेल त्या बाजूला वळा.
३. नेहमीपेक्षा छोटी पावलं टाकत उतरायचं.  ह्यामुळे उतरताना शरीराचा तोल सांभाळला जातो.
४. उतरताना मधेच थांबायचं नाही. एका वेगात उतरत राहायचं.  वेग कमी किंवा जास्त करायचा नाही.  थांबलो तर "आता काय करू" असा प्रश्न पडतो, आणि सुसाट वेग पकडला तर उतारावर थांबणं अवघड.
५. वाटेच्या बाजूला मोठे दगड असतील तर हाताने त्यांचा आधार घ्यायचा.  हाताने आधार घेतला कि पायांवरचा भार कमी होतो.
६. वाटेच्या बाजूला मजबूत झाड असेल तर त्याचा आधार घ्यायचा.
७. अवघड ठिकाणी ढुंगण टेकवून घसपटत जाण्याला पर्याय - पाय दुमडून अर्ध बसायचं, ढुंगण टेकवायचं नाही.  ह्यासाठी पायात ताकद लागते.  आता पायांच्या लांबीचा वापर करून एक एक पाय पुढे टाकत जायचं.  खूप वेळ नाही पण दोन चार पावलं असं जाता येईल, ज्यात छोटी असलेली अवघड जागा पार होईल.  दुमडलेला पाय अडकत नाही ह्याकडे लक्ष असू द्या.  एक पाय पूर्ण दुमडला आणि दुसरा पूर्ण लांब करून पुढे टाकला,  तर दुमडलेला पाय परत सरळ करता येत नाही.  पोझिशन लॉक होते.  त्यामुळे ८० % पाय दुमडून २० % बाकी ठेवावा.  तसेच पुढे टाकलेला पाय ८० % लांब करून २० % बाकी ठेवावा. अशी मोकळी जागा ठेवावी.

एवढं ज्ञान पाजळल्यावर तुम्हाला जर वाटलं कि मी डोंगर उतरण्याचा निष्णात आहे, तर तो तुमचा गैरसमज असेल.  माझी हुशारी डोंगर चढण्यात आहे.  पायातली ताकद डोंगर चढायला कामी येते.  डोंगर उतरण्यात ताकदीचे काय काम.  थांबूया.  स्व मग्न होण्याआधीच आवरते घेउया.

K2S हि काही ऐतिहासिक जागा नाही.  त्यामुळे वाटेत किल्ल्याच्या भिंती, बुरुज, दगडात कलाकुसर केलेली देवळं, वीरगळी, सतीच्या शिळा, असलं इथे काहीएक नाही.  हि आहे स्वतःचा शोध घ्यायची एक प्रयोगशाळा.  ह्या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्याचं वैशिष्ठ्य आहे एन्ड्युरन्स.  सहनशक्ती.  एकेकीचा विचार केला तर ह्या टेकड्या सोप्या आहेत.  एका रांगेत १६ मांडल्यामुळे K2S हा अनोखा प्रयोग जमून आलाय.  आज सगळे ग्रुप मिळून अडीजशे ट्रेकर असतील हा प्रयोग करून पहाणारे.  पुढे गेलेल्या आणि मागून येणाऱ्या ग्रुप चे टॉर्च दिसत रहातात.  त्यामुळे कुठून आलोय आणि कुठे जायचंय त्याचा अंदाज येतो.

शेवटच्या टेकडीला तीन वाटा आहेत.  लीड ला असेलेले आम्ही पाच जण इथे थांबलो.  प्रसाद आमच्या आधी इथे पोहोचला होता.  मधल्या फळीतले स्वछंद गिर्यारोहक येईपर्यंत आम्हाला इथे थांबायचं होतं.  पहाटेचे पाच वाजले असतील.  इथे हाडं गोठवणारी थंडी.  रात्री चालताना थंडी नव्हती.  आता इथे झोप तर राहूदे बाजूला, थंडीमुळे काय करावे ते कळत नव्हते.

एक एक करत मधल्या फळीतले स्वछंद गिर्यारोहक दाखल झाले.  १५ झाल्यावर निघालो.  उजवीकडची वाट पकडली जी रस्त्यावर जाते.  रविवार सकाळी सिंहगड चढणाऱ्यांची रांग पूर्ण डोंगरभर.  अंधारात त्यांचे टॉर्च ओळीने चमकत होते.

विशालने सांगून ठेवलेली जीप रस्त्यावर तयार होती.  १४ जण कोंबून बसलो.

गुगल मॅप मधे बघितलेला K2S ट्रेक चा भाग
केशरी ठिपका  = पायगाडीला सुरुवात
लाल ठिपका = गाडीरस्त्याला येऊन मिळालो
ह्या दोन्ही ठिपक्यांना जोडणाऱ्या डोंगरांच्या रेषेवरून चालत १६ टेकड्या पार करायच्या

सिंहगडावर जाणाऱ्या गाडीरस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात रस्ता कॉंक्रिटचा बनवण्याचं काम चालू आहे.  पुणे दरवाजातून वर गेलो.  रविवार सकाळची तुडुंब गर्दी.  लिंबू पाणी, चिंच, काकड्या, वगैरे विकणारी दुकानं.  तेच नेहमीचं दृश्य.  अजून सूर्योदय व्हायचा बाकी होता.

पुणे दरवाजातून वर गेल्यावर
कुठच्या १६ टेकड्या चालून आलो त्यांचा फोटो काढला.

१६ टेकड्या ज्या आम्ही चालून आलो  ...  सिंहगडावरून पाहिलेल्या

बऱ्याच दिवसानंतर आज इथे येत होतो.  कोणालाही कितीही आपलासा वाटला तरी हा गड आहे सिंहाचा. तानाजीचा आणि शिवबाचा.  आपण सगळे इथे उपरा.

K2S ट्रेकच्या पहिल्या टेकडीपासून दिसत होता तो लाल लाईट  ...  आणि टॉवर

आम्हाला सागर हॉटेलपाशी थांबायचं होतं.  सागर हॉटेल शोधून काढलं.  मालक हजर नव्हते.  हॉटेल अजून सुरु झालेलं नव्हतं.  आम्हीच हॉटेलचा बोर्ड बाहेर आणून ठेवला.  मागून येणाऱ्या स्वछंद गिर्यारोहकांना कुठे थांबायचंय ते कळण्यासाठी.

आजचे सगळे स्वछंद गिर्यारोहक इथे पोहोचायला वेळ लागणार होता.  समोर कड्याजवळ गेलो.  इथे उजव्या बाजूला कल्याण दरवाजा.  न राहवून तिकडे गेलो.  जातानाच सूर्योदय झाला.

सूर्योदय  ...  कल्याण दरवाजाजवळून पाहिलेला

कल्याण दरवाजाजवळ भरपूर फोटो काढले. 

शाळेत आणि कॉलेजला असताना मला एक प्रश्न होता, ह्या दरवाजाला कल्याण दरवाजा का म्हणतात?  इथून मुंबई जवळच्या कल्याणला जाणारी वाट आहे काय?  नंतर कधीतरी कळले, इथून खाली डोंगर उतरून गेल्यावर कल्याण नावाचे गाव आहे.  म्हणून हा कल्याण दरवाजा.

दरवाजात वरच्या बाजूला शिलालेख आहे त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला.  मोबाईल मधे चांगला आला नाही.  परत कधीतरी DSLR घेऊन येईन.
श्री शालिवाहन शके १६७२ कारकीर्द
श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान

असं दगडात लिहिलेलं आहे.

दरवाजाच्या आतल्या बाजूच्या देवड्या.  दगडी भिंतीतले कोनाडे.  बाहेरच्या दोन्ही बाजूकडच्या भिंतींवरची शरभ शिल्प.  दरवाजावरची कमळ शिल्प.  गणपती.  दरवाजाच्या पुढे काढलेले बुरुज.  का ते कळत नाही पण इथे आलं कि मन तृप्त होतं.

कल्याण दरवाजा
पलीकडे गर्दीने भरलेला पुणे दरवाजा आणि इथे मनमोकळा कल्याण दरवाजा.  किती मोठा कॉन्ट्रास्ट.

दुसरा दरवाजा

दोन दरवाजे आणि त्यांचे बुरुज.  युद्धशास्त्राच्या दिशेने पहिले तर उत्कृष्ट रचना आहे.

वाट उतरून थोडं पुढे गेलो.

बुरुज  ...  वाटेने थोडं खाली उतरून पाहिलेला
मग परत फिरून तृप्त मनाने सागर हॉटेल पाशी परतलो.  बरेचसे स्वछंद गिर्यारोहक इथे आलेले होते.  मागे रेंगाळलेले काहीजण थोड्या वेळात पोहोचले.

यथावकाश न्याहारी केली.  कांदाभजी, लाल चटणी, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, हिरवा ठेचा, मडक्यातलं दही.  रात्रभराच्या जोमदार ट्रेकिंग नंतर कल्याण दरवाजाला सुखद भेट आणि त्यानंतर पोटभर जेवण.  अजून काय पाहिजे जीवाला.

सिंहगडावर न्याहारी

निघालो तेव्हा साडेनऊ होऊन गेले होते.  जीपने कोंढणपूर गावात गेलो.  विशालने जीपची व्यवस्था आधीच करून ठेवली होती.  नेहमीप्रमाणे हाही ट्रेक विशालने उत्तम प्रकारे घडवला.  ट्रेकिंग संस्था चालू करणे सोपं आहे.  आयोजित केलेला प्रत्येक ट्रेक उत्तम प्रकारे पार पाडणं, तेही खंड न पाडता प्रत्येक वर्षी, हे भलतं अवघड आहे.

थोड्या वेळाने स्वारगेट बस आली.  बस मधे जमेल तशी झोप काढली.  स्वारगेटला उतरून तिथे मी शिवाजीनगर बस पकडली.  शिवाजीनगरला रस्त्यापलीकडे जाऊन पिंपरी गाव बस घेतली.  कोकणे चौकात घराजवळ उतरलो.  एक ग्लास उसाचा रस पिऊन घरी गेलो तेव्हा एक वाजला असेल.  १०० टक्के बॅटरी संपलेल्या अवस्थेत घरी जाऊन चालत नाही.  ९० टक्के बॅटरी संपवून १० टक्के बाकी ठेवावी लागते.  का ते सुज्ञ ट्रेकर जाणून असतीलच.  राहिलेली झोप पूर्ण करायला मला तीन तास लागले असतील.  मग?  कशासाठी करायचा हा खटाटोप.  सुट्टीच्या दिवशी खाऊन पिऊन ताणून द्यायची.  मस्त मजेत दिवस घालवायचा.  टीव्ही समोर लोळायचं.  कशाला जीवाला त्रास.  कशासाठी.  उत्तर सापडलं नसेल आणि शोधायची इच्छा असेल तर पडा एकदा घराबाहेर.  करा सीमोल्लंघन.  पडा कम्फर्ट झोन च्या बाहेर.  स्वछंद गिर्यारोहकांच्या ह्या संकेतस्थळ भेट द्या आणि बघा पुढचा कुठला ट्रेक करता येतोय ते.

Tuesday, December 11, 2018

Python script to execute commands on a remote machine, when passwordless SSH setup is in place

In our lab we have setup passwordless SSH between some systems, using SSH keys.  A python script was required that could login to a remote system where passwordless SSH is in place, execute the given command, and obtain its output.  I used Paramiko module for doing this task.  Here is the script.

import paramiko

remote_system = 'your.ip.address.here'
remote_user = 'jdoe'
remote_port = 22
remote_cmd = 'ls'

remote_ssh_client = paramiko.SSHClient()
    # Create SSH client object

remote_ssh_client.load_system_host_keys()
    # Load host keys from a system (read-only) file

remote_ssh_client.set_missing_host_key_policy(paramiko.WarningPolicy())
    # Set policy to use when connecting to servers without a known host key
    # WarningPolicy = Policy for logging a Python-style warning for an unknown
    # host key, but accepting it

ssh_connect_timeout = 10
    # in seconds
remote_ssh_client.connect(remote_system, port=remote_port, look_for_keys=True, timeout=ssh_connect_timeout)
    # Connect to an SSH server and authenticate to it.
    # The server's host key is checked against the system host keys (see
    # load_system_host_keys) and any local host keys (load_host_keys).
    # If the server's hostname is not found in either set of host keys, the
    # missing host key policy is used (see set_missing_host_key_policy)
    #
    # look_for_keys   set to True to enable searching for discoverable private
    # key files in ~/.ssh/
    #
    # Raises : SSHException  if the server fails to execute the command

exec_command_timeout = 10
    # in seconds
remote_stdin, remote_stdout, remote_stderr = remote_ssh_client.exec_command(remote_cmd, timeout=exec_command_timeout)
    # Execute a command on the SSH server. A new Channel is opened and the
    # requested command is executed.  The command's input and output streams
    # are returned as Python file-like objects representing stdin, stdout, and stderr

for line in remote_stdout:
   print line.strip('\n')

remote_ssh_client.close()
    # Close this SSHClient and its underlying Transport


And how is this script different than the usual way of login using SSH when username and password are given.  In this script, I have told SSH to look for private key files of the mentioned user.  You'd have noticed that I have not provided a password to the connect function.  Instead, I am sending a parameter named look_for_keys along with value True.  This makes a search of discoverable private key files in ~/.ssh/ and if found, it is used for login to the remote system.


What if we were using Spur module instead of Paramiko?  Spur module does provide the functionality that we are looking for.  Instead of sending a password, we could mention our private key file using argument private_key_file.  Or we could pass the optional argument look_for_private_keys, in case name of private key is not known beforehand.  Here is an example.

import spur

remote_system = 'your.ip.address.here'
remote_user = 'jdoe'
remote_port = 22
remote_cmd = 'ls'

remote_shell = spur.SshShell(
    hostname = remote_system,
    port = remote_port,
    username = remote_user,
    look_for_private_keys = True,   # Search for discoverable private key files in ~/.ssh/
)

remote_result = remote_shell.run([remote_cmd])
    # Execute the given command

print (remote_result.output)
    # Display the output obtained from executing the given command


And if you are wondering how to do passwordless SSH setup, well there are plenty of HOW-TOs available all over the Internet.

Wednesday, November 28, 2018

वासोटा गड मोठा, नाही गर्दीला तोटा

तुम्हाला आवडेल त्या चालीत म्हणा.  वासोटा गड मोठा, नाही गर्दीला तोटा.  रविवार २५ नोव्हेंबर २०१८ ला दिवसभरात हि लाईन मला बऱ्याच वेळा आठवली.  भल्या पहाटे पाचच्या दरम्यान बामणोलीला पोहोचलो तेव्हा बऱ्यापैकी धक्का बसला.  आमची बस थांबली होती त्याच्या आजूबाजूला सगळीकडे बस, कार, टेन्ट.  सगळ्या मोकळ्या जागा भरलेल्या.  अंधारात अंदाज येत नव्हता.  पण हजार एक माणसं परिसरात होती.  हि सगळी आज वासोट्याला येणार कि काय.  आली तर वासोटा पळून जाईल दुसरीकडे कुठेतरी.  कोण्या एके काळी अतिशय दुर्गम असलेला हा वनदुर्ग.  आज इतका सोपा झालाय?  हजाराच्या झुंडीने हौश्या नवश्यांनी जाण्यासारखा?

उजाडलं आणि थोड्या वेळानी इथली गर्दी कमी व्हायला लागली.  म्हणजे बरेच जण इथे फक्त टेन्ट मधे रहायला आणि खादडायला आलेले होते.  बामणोली हा आता एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट झालाय तर.  ह्या गर्दीत भर घालायला आम्ही सदतीस जण आणि आमची बस.  बस थांबवल्यावर बापूने अंग पसरून ताणून दिली.  मेल्यासारखा झोपला होता.  उत्तम ड्रायव्हरचं लक्षण आहे हे.  गाडी चालवताना सदैव सतर्क.  आणि गाडी इच्छित स्थळी पोहोचवली, म्हणजे कामगिरी पूर्ण झाली, कि असेल त्या परिस्थितीत ताणून द्यायची.  मग आजूबाजूला भोंगे वाजवलेत तरी चालतंय.  बापू एक नंबर ड्रायव्हर आहे.  रात्रभर गाडीत आपण निर्धास्त झोपावं.  एकदाही कधी गचका बसून झोपमोड झाली नाहीये.  आज पांढरे काका (बसचे मालक) पण आले होते.  त्यांची मात्र अनेकदा झोपमोड झाली आम्ही बसमधून चढ उतार केल्यामुळे.  त्यांच्या झोपाळू आवाजातल्या बडबडीने थेट निळू फुलेंची आठवण झाली.

बस मधून बाहेर पडून मी पण परिसराची पाहणी केली.

भल्या पहाटे बामणोली परिसर

इथला परिसर भन्नाटच आहे.  आत्तापर्यंत जितक्या वेळा बामणोलीला आलो होतो तितक्या वेळा इथे मोकळे रस्ते आणि तुरळक माणसं पहिली होती.  आजचं चित्र नव्यानेच पहात होतो.

गाड्या, गर्दी, तंबू नसले तर जगात भारी जागा आहे हि.  पण आता फेमस झाल्यामुळे विचका झालाय हो.

इथे चहा आणि नाश्त्याची सोय विशालने करून ठेवली होती.  चहा आणि नाश्त्यानंतर आम्ही आणलेले रिकामे डबे इथून भरून घेतले.  दुपारच्या जेवणासाठी चपात्या आणि भाजी.

सर्वजण तयार होऊन बस च्या समोर जमलो.  तेहतीस पार्टीसिपंट आणि चार संयोजक.  विशाल, अमोल, स्मिता, आणि डॅनी.  विशालने दिवसभराची रूपरेषा सांगितली.  आवश्यक त्या सूचना दिल्या.  सर्वांची तोंडओळख झाली.  आमच्यासाठी तीन बोटी ठरवल्या होत्या.  दोन बोटीत प्रत्येकी बारा जण आणि एका बोटीत तेरा.  बोटीत जाऊन बसलो.

मारा स्टार्टर  ...  होऊ द्या सुरु
आता दीड तासाचा प्रवास होता बोटीतून.  बऱ्याच दिवसांनी इथल्या बोटीत बसलो.  आमच्या आधीच्या सफरी आठवल्या.

बोटीत बसल्या बसल्या फोटोग्राफी
सर्व बोटी एकाच दिशेने निघालेल्या.  वासोट्याच्या जत्रेला.  दीड तास म्हणजे फोटोग्राफीला भरपूर वेळ.  मधे मधे कॅमेरा खुशीकडे दिला.  फोटो काढत काढतच शिकेल. मी शिकतोय तशीच.

बोटीत बसल्या बसल्या फोटोग्राफी
कोयना धरणाचा पाणीसाठा शिवसागर ह्या नावाने ओळखला जातो.  कोयना, सोळशी, आणि कांदोटा ह्या तीन नद्यांचे पाणी इथे साठते.  ह्या जलाशयाच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कोयना अभयारण्य.  कोयना अभयारण्यातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे वासोटा किल्ला.  हा प्रदेश ज्या सह्याद्री पर्वतरांगांचा भाग आहे तो आहे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज.  पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैववैविध्य असलेल्या ठिकाणांपैकी एक.

बोटींनी एक वळण घेतलं आणि समोर लांबवर वनदुर्ग वासोटा दिसायला लागला.  हळूहळू जवळ येत गेला.

शिवसागर जलाशय
सर्व बोटी एकाच ठिकाणाकडे चालल्यायत
लांबवर दिसणारा वनदुर्ग वासोटा

पावणे नऊला निघालेल्या बोटी सव्वा दहा च्या सुमारास थांबल्या.  वीसेक बोटी इथे आलेल्या.  प्रत्येक बोटीत दहा ते पंधरा माणसं.  म्हणजे साधारण अडीजशे माणसं आज वासोट्याच्या जत्रेला होती.  आम्ही सर्वजण एक घोळका करून थांबलो.

वासोटा ट्रेक ला सुरुवात

विशाल वन विभागाच्या ऑफिस मधे जाऊन इथली पूर्तता करून आला.  विशाल ने सर्वांना ट्रेक बद्दल माहिती आणि सूचना दिल्या.  अमोल सगळ्यात पुढे.  विशाल सगळ्यात मागे.  अमोल आणि विशालच्या मधे आजचे स्वछंद गिर्यारोहक.  त्यांच्यामधे डॅनी आणि स्मिता.  असे चालू लागलो.  इथे कोणी हरवायची शक्यताच नव्हती.  वाटेला गर्दीच एवढी होती.

कॉंक्रिटच्या जंगलातून खऱ्या जंगलात नव्यानेच आलेले काहीजण बोंबा ठोकत चेकाळत निघालेले.  सुरुवातीचा काही काळच.  नंतर शांत झाले.

सगळीकडे घनदाट झाडं.  त्यांच्यामधून वाट गेलेली.  पूर्ण वेळ सावलीतून.  सर्वात वर मोठे वृक्ष, त्यांच्यापेक्षा कमी उंचीवर दुसरा झाडांचा थर, तिसरा थर झुडुपांचा, आणि जमिनीलगत गवत वगैरे, असं चार थरांचं जंगल आहे हे.

आम्ही सारे खादाड
झरा आल्यावर थंडगार पाणी प्यायलो.

हजारो माणसांनी जा ये करून वाट पूर्णपणे मळलेली झाली आहे.  अवघड टप्पा कुठेच नाही.  खुशी आणि मी सुसाट चढून गेलो.  बराच वेळ खुशी लीड ला असलेल्या अमोलच्या बरोबरीने चढून गेली.  आमची पुढच्या पिढीतली ट्रेकर तयार होतेय तर.

चढाईच्या शेवटच्या टप्प्यात वाट मोकळ्यावरून जाते.  इथे ऊन लागते.  हा टप्पा सुरु व्हायच्या आधी एक ब्रेक घेतला.

शेवटच्या टप्प्यावर मागे वळून पहाताना
शेवटच्या टप्प्यात काही पायऱ्या आहेत.  चढून गेल्यावर समोरच मारुतीचं मंदिर.  त्याच्यासमोर आज जत्रेची गर्दी.

राम राम तू म्हणत रहा   आणि जगाला भिडत रहा

तसं मधल्या गर्दीचा आम्हाला फरक नाही पडत.  आमचं कनेक्शन दूरचं आहे.  दुरून नमस्कार आणि दुरूनच आशीर्वाद.

डाव्या बाजूला झाडाखाली अमोल ने जागा हेरून ठेवली होती.  जेवणाच्या पंगतीसाठी.  तिथे सर्व जण जमलो.  इथे चुन्याचा घाणा आहे.

चुन्याच्या घाण्याचं चाक

चपात्या, भाजी, चटणी, लोणचं असं आम्ही सगळ्यांनी डब्यातून आणलं होतं ते फस्त केलं.

इतरांचं जेऊन होतंय तोवर आम्ही आजूबाजूला फेरफटका मारला.

सदरेचे अवशेष
परत घोळक्यात येतोय तोवर विशाल ने पुढच्या सूचना द्यायला सुरुवात केलेली.  ग्रुप फोटो काढून किल्ला पहायला निघालो.

आजचे स्वच्छंद गिर्यारोहक
आम्ही आधी गडाची डावीकडची बाजू पाहणार होतो आणि मग उजवीकडची.  त्याप्रमाणे डाव्या बाजूला निघालो.  जोडटाक्यातलं पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही.

इथे समोर हरिश्चन्द्रगडावरच्या कोकणकड्याची आठवण देणारा बाबू कडा.  त्याच्यावर जुना वासोटा.  शिवकाळात इथे तुरुंग होता.  १६६१ साली राजापूरच्या वखारीतून पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना इथे कैदेत ठेवण्यात आले होते.

बाबू कडा
वर जुना वासोटा
आता जुन्या वासोट्यावर जायला वन विभागाकडून बंदी आहे.  हे योग्यच आहे.  वन्य प्राण्यांना एवढी तरी जागा माणसांनी सोडलीच पाहिजे.  ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला आहे.  त्या काळचं जंगलातलं माणसांचं आश्रयस्थान.  आणि आजचं प्राण्यांचं आश्रयस्थान.

गडाची हि बाजू बघून झाल्यावर, यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर आम्ही निघालो गडाची पलीकडची बाजू बघायला.

सदरेचे अवशेष म्हणजे भलामोठा बांधून काढलेला प्लॅटफॉर्म उरला आहे ज्याच्यावर सदर होती.  सदर म्हणजे राज्यकारभार चालवण्याची जागा.

औट घटकेचे मनसबदार
पुढे जाऊन महादेवाचे मंदिर पाहिले.

समोर खोटा नागेश्वर सुळका
पलीकडे नागेश्वर सुळका
विशालने इथून दिसणाऱ्या ठिकाणांची माहिती दिली.  समोर खोटा नागेश्वर.  त्याच्या पलीकडे नागेश्वर. चकदेव.  रसाळगड  सुमारगड, महिपतगड कोणत्या दिशेला आहेत ते.

एका दरवाजाची फक्त कमान बाकी आहे.

दरवाजाची कमान
आता गर्दी कमी झाली होती.  माचीवर गेल्यावरही आमची भरपूर फोटोग्राफी झाली.  आज आम्ही पाच जण स्वच्छंद गिर्यारोहकांचे टीशर्ट घातलेले एकत्र होतो.  असा योग दुर्मिळ असतो.  हा फोटो झालाच पाहिजे ना.


स्वच्छंद गिर्यारोहक
(तुमच्या) डावीकडून उजवीकडे - अमोल, योगेश, डॅनी, स्मिता, विशाल
मालिका जिंकण्यात सिंहाचा वाटा असलेला धोनी ज्याप्रमाणे पुरस्कार समारंभात करंडक कनिष्ठ खेळाडूच्या हाती सोपवून स्वतः शांतपणे कोपऱ्यात उभा असतो त्याप्रमाणे विशाल फोटोत कडेला.  परिस्थिती पाहून त्याप्रमाणे उत्तम आयोजन केलं ह्याही ट्रेकचं विशालने.  धन्यवाद मित्रा.  असेच यशस्वी ट्रेक आयोजित करत रहा.

लाँच चालवणारे आता आम्हाला बोलवायला आले.  चला लवकर खाली उतरून.  वेळेत परत जायचे होते.  पण काहींची फोटोग्राफी अजून संपेना.

मारुतीराया

सकाळी गर्दीत अडकलेला मारुतीराया आता मोकळा सापडला.  बिनछपराचं मंदिर.  काहींना छपराची गरजच नसते.  तसं बघितलं तर आपल्या सगळ्यांच्यातच रहातोय हा.  हे मूर्त स्वरूप फक्त प्रातिनिधिक आहे.  पंधरा मिनिटात घोराडेश्वर डोंगर चढून जाणारा तोच.  कितीही वेळा बघीतला तरी परत एकदा तिकोन्यावर जाणारा तोच.  दुर्गा टेकडीच्या खड्या चढावर स्प्रिंट मारणारा तोच.  उन्हातान्हात दिवसभर भीमाशंकरचं रान तुडवत फिरणाराही तोच.  सकाळी सातारा अर्ध मॅरेथॉन पळाल्यानंतर दुपारी जरंडेश्वर डोंगर चढून जाणारा तोच.  वैराटगडावर एकटा फिरणाराही तोच.  आपण फक्त निमित्तमात्र.  आज वासोटा. मग गोरखगड. शिवथरघळ. रामशेज. साल्हेर. सालोटा. हरगड. चावंड. धोडप. तुंग. तोरणा. कैलासगड. प्रबळगड. घनगड. रोहिडा. रतनगड. हरिश्चन्द्रगड. पाबरगड. भैरवगड. जीवधन. हडसर. भोरगिरी. सुधागड. चंद्रगड. मृगगड. सरसगड. पदरगड.  हा न संपणारा डाव आहे.  जिंकण्यासाठी खेळायचा नसतो.  पुढे आलेल्या परिस्थितीला पुरून उरण्यासाठी खेळायचा.  हार न मानता पुढे चालत रहायची जिद्द मिळवण्यासाठी खेळायचा.  धडपडलं तरी परत उठून पुढे जाण्याची ताकद मिळवण्यासाठी खेळायचा.  शक्ती आणि युक्तीचा योग्य वापर कुठे कसा करायचा ते शिकण्यासाठी खेळायचा.  दीप्ती आणि खुशी ह्या खेळात आल्या हे किती छान.  आम्हा तिघांनी केलेला हा तिसरा ट्रेक.  खुशी तर ग्रुप मधे लीड ला चालते.  कुठेही घाबरत नाही.  अवघड जागा न धडपडता पार करते.  आजच्या आमच्या वासोटा ट्रेक मधे अवघड जागा तशा नव्हत्याच.  मोठा ग्रुप असल्यामुळे विशाल ने पठडीतली वाट कुठे सोडलीच नाही.

टोळीत पुढे असलेले आम्ही काही जण किल्ला उतरायला सुरुवात केली.  आत्तापर्यंत सर्व ग्रुप उतरायला लागले होते.  आम्हीच फक्त बाकी होतो.  उतरताना वाट सोपी आहे.  वर झाडांची गर्द सावली.

वासोटा उतरताना

दीप्ती आणि खुशी पुढे गेल्या.  मी मागे थांबलो.  टोळीच्या रेंगाळणाऱ्या शेपटाला घेऊन विशाल मागून आला.  एका ठिकाणी वाटेच्या बाजूला काही अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत त्या विशालने दाखवल्या.

अज्ञात वीरांच्या समाध्या
कोणाच्या असतील ह्या समाध्या?  ताई तेलीण आणि बापू गोखले ह्यांच्या युध्दात प्राण गमावलेल्या योद्धयांच्या?  का १८१८ मधे झालेल्या मराठे आणि इंग्रजांच्या लढाईत हुतात्मा झालेल्या वीरांच्या?

विशाल आणखी पुढे जाऊन परिसर धुंडाळून आला.  शोधाशोध करायला आज वेळ नव्हता.  उतरायच्या वाटेने पुढे चालते झालो.

झरा आल्यावर थंडगार पाणी पिऊन घेतले.  हा आनंद काय आहे ते घरात बसून नाही समजू शकत.  शब्दात वर्णनही नाही करता येत.  त्यासाठी दिवसभराची तंगडतोड करत रानोमाळ हिंडावं लागतं.

उतरून सर्व जण वन विभागाच्या ऑफिस समोर जमलो.  विशाल ने पुढचा कार्यक्रम सांगितला.  सकाळचेच तीन ग्रुप करून लाँच मधे बसलो.

ट्रेक संपला.  परतीचा पाणप्रवास सुरु.

लाँचच्या परतीच्या प्रवासात काहींनी झोपा काढल्या.  काहींनी फोटोग्राफी केली.  संध्याकाळच्या वेळी काही सुरेख फोटो मिळाले.  पाण्यात बुडालेलं झाड.

लाँच मधून फोटोग्राफी

शिवसागर तलाव आणि कोयना अभयारण्याचा परिसर.

लाँच मधून फोटोग्राफी

विमानं गेल्यावर उरलेले ढगांचे पट्टे.

लाँच मधून फोटोग्राफी

अर्ध्या तासापूर्वी दिसलेले ढगांचे पट्टे आता पसरले.  नारायणरावांनी आजचा कारभार आटोपता घेतलेला.  आणि जाता जाता ह्या ढगांच्या पट्ट्यांना रंगवलेले.

तेच ढगांचे पट्टे, अर्ध्या तासानंतरचे

सहाच्या सुमारास बोटी बामणोलीला पोहोचल्या.  दीड तासाचा जलप्रवास पूर्ण झाला.  इथे खुशीने दीप्तीचा आणि माझा एक अप्रतिम फोटो काढला.

खुशीची फोटोग्राफी
आज दिवसभरात जेवढं ट्रेकिंग झालं त्यापेक्षा जास्त फोटोग्राफी झाली.

सर्व स्वछंद गिर्यारोहक बस मधे बसल्यावर बस पुण्याच्या दिशेने निघाली.  दोन्ही वेळच्या बोटीच्या प्रवासात मी झोपलो नव्हतो.  आता माझा झोपायचा तास सुरु.  बस मधे अंताक्षरी जी सुरु झाली ती बस पुण्यात पोहोचेपर्यंत चालू होती.  त्यात हिंदी गाण्यांबरोबर मराठी गाणी, गझल, भक्तिगीतं, मनाचे श्लोक असं सर्व काही होतं.  प्रवास अजून लांबला असता तर "निरमा, वॉशिंग पावडर निरमा" वगैरे जाहिराती सुध्दा ऐकायला मिळाल्या असत्या.  प्रत्येक ट्रेक जसा वेगळा तशीच ट्रेक नंतरच्या परतीच्या प्रवासातली अंताक्षरीही दरवेळी वेगळी.

अकराच्या दरम्यान बस शिवाजीनगरला पोहोचली.  आम्हाला पांढरे काका आणि बापूने कोकणे चौकात सोडले.  आमच्या घराजवळ.

कोकणे चौकात पाव भाजी खाऊन घरी पोचलो तेव्हा सव्वा बारा होत होते.  अशा प्रकारे स्वछंद गिर्यारोहकांबरोबर आणखी एक आठवणीत राहील असा ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला.  तुम्हालाही स्वछंद गिर्यारोहकांबरोबर ट्रेक करायचा असेल तर ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Monday, November 5, 2018

शिकलेले आणि न शिकलेले

सर्वसाधारणपणे असा समज असतो कि शिकलेले लोक सुसंस्कृत असतात आणि न शिकलेले सुसंस्कृत नसतात.  समज असतो.  खरं काय ते त्यापेक्षा वेगळं असू शकतं.  असू शकतं हि पण एक शक्यता झाली.  खरंच असतं का?

एकदा उल्फ ट्रॉपेन्स बरोबर त्याच्या गावाच्या आजूबाजूला सायकल वरून फिरताना माझी अखंड बडबड सुरु होती.  तो मात्र शांत.  काही वेळाने मला जाणीव झाली, दूर दूर पर्यंत थांगपत्ता नसलेल्या जगाकडे आपण आपल्या छोट्याश्या खिडकीतून पहात असतो.  आणि जे काही दिसते, आपल्याला वाटते हे असेच असते.  त्या दिवशी उमगले.  जितकं जास्त डोळे उघडे ठेऊन फिरू, बघू, तितकं जास्त जग समजत जाईल.

अनेकदा आपण माणसांच्या कॅटेगरी बनवतो.  बनवतो आपल्याच मनात.  आपल्याच मनाचे खेळ.  शहरी आणि गावातले.  श्रीमंत आणि गरीब.  शिकलेले आणि न शिकलेले.  वगैरे वगैरे.  अशा शेकडो कॅटेगरी बनावट येतील.  पिणारे आणि न पिणारे.  क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट प्रेम नसलेले.  वगैरे वगैरे वगैरे.  सध्या इथेच थांबू.  करू तितके आपल्या मनाचे खेळ.

कॅटेगरी म्हटलं कि मला फुटबॉल टीम सिलेक्शन टेबल आठवतं.   शिकलेल्या आणि न शिकलेल्या लोकांचं टेबल बनवायचं झालं तर ते असं असेल.

                |
  शिकलेले        |      
शिकलेले
  सुसंस्कृत        |       असंस्कृत
         १      |    २
                |
----------------|----------------

                |
         ३      |    ४  
                |
  न शिकलेले      |       न शिकलेले
 
सुसंस्कृत        |       असंस्कृत
                |


मग?  काय वाटतंय?  कुठे बसेल जास्त जनता?  तुमचे अंदाज तुम्हीच बांधा.  मी फक्त कॅटेगरी सांगितल्या.  तशी सुरुवात मी करून दिलीय.  पुढे तुमचं घोडं तुम्हीच दामटायचंय.  मला ना स्टॅटिस्टिक्स येतं ना सायकॉलॉजि.  बिनभिंतीच्या शाळेत शिकलेली आम्ही टवाळ पोरं.  इतरांना काय शिकवणार.

Friday, October 19, 2018

चिमणी आणि गवत - दोन अवघड आव्हाने

आता तुम्ही म्हणाल चिमणी आणि गवत हि आव्हाने कशी काय होऊ शकतात. ति पण अवघड.  आत्तापर्यंत मलाही असाच वाटत होतं.  काय आहे ना, वेळ आणि ठिकाण योग्य (किंवा अयोग्य) असेल (नक्की कसे ते तुमच्या बघण्यावर आहे) तर चिमणी आणि गवतच काय, इतर सटर फटर गोष्टी पण आव्हान ठरू शकतात.  कसे काय ते सुट्टीच्या दिवशी दिवसभर घरात टीव्ही पुढे बसून नाही समजत हो.  त्यासाठी घराबाहेर पडून प्रत्यक्ष जग पाहावे लागते.  अनुभवावे लागते.  मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण कि असे अनेक एकाहून एक अनुभव (किंवा किस्से, किंवा मॅटर, काय समजायचे असेल तसे समजून घ्या) माझ्यापर्यंत पोहोचलेत.  कुठून?  कसे?  सह्याद्री पर्वतरांगा फार लांब नाहीत माझ्या घरापासून.  आणि जिवाभावाचे सवंगडी मिळाले तर दूरची अंतरंही आवाक्यात असतात.  तशी ही जागा एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.  आधुनिक जगात वेस्टर्न घाट म्हणून ओळखतात.  आमच्यासाठी आमचे हक्काचे माहेरघर.  बिनभिंतीची शाळा.  होम अवे फ्रॉम होम.  असो.  चिमणी आणि गवत ही अवघड आव्हाने कशी ते पाहूया आता.

आता परतीचा पाऊस थांबलाय.  बाकी असलेल्या दुसऱ्या साल्हेर स्वारी बद्दल मागच्या आठवड्यात मी स्वप्नीलला विचारले.  काही कारणाने ह्यावेळी साल्हेर स्वारीचा योग्य नव्हता. त्या ऐवजी भीमाशंकर परिसरात जायचे ठरले.  ह्या ठिकाणाची उत्तम माहिती असलेल्या एका एक्स्पर्ट सोबत.  शिल्पा बडवे.  आमची पाच जणांची टोळी ठरली.  मुंबईहून शिल्पा, मंदार, आणि यज्ञेश.  पुण्यातून स्वप्नील आणि मी.

यज्ञेश काही कारणामुळे येऊ शकला नाही.  शनिवार १३ ऑक्टोबर २०१८ ला रात्री कर्जत स्टेशनला एकत्र भेटून पुढे जायचे ठरले.  पुण्याहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनच्या वेळा शिल्पाने आम्हाला पाठवल्या.  ते दोघं कोणत्या ट्रेनने कर्जतला येतायत ते ही सांगितले.  अकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन समोर स्वप्नील आणि मी भेटलो.  ट्रेनला तुडुंब गर्दी होती.  बसायला जागा सोडाच, दोन पायावर उभं रहायला मिळालं हे आमचं नशीब.  उभं रहायला मिळालं ते डब्याच्या टोकाला दारासमोरच्या जागेत.  बाजूच्या टॉयलेट मधून वास.  गेले कित्येक वर्ष ट्रेनच्या जनरल डब्याचे तोंड न बघितलेल्या मला हा एक नवीन अनुभव होता.  एकदाचे कर्जत स्टेशनला उतरलो.  समोरून शिल्पा आणि मंदार चालत आले.  भुकेला उत्तर म्हणून स्वप्नील आणि शिल्पाने वडा पाव पोटात ढकलले.

कर्जत स्टेशनच्या बाहेर जीपवाले काका आमची वाट बघत थांबले होते.  कर्जत स्टेशन पासून राजपे गावात जाण्यासाठी आमची सोय शिल्पाने उत्तम केलेली.  भीमाशंकर परिसरात शिल्पाने अनेक ट्रेक केले आहेत, तसेच ह्या परिसराची तिला उत्तम माहिती आहे हे विशाल कडून ऐकले होते.  ह्या ताई फारच हुशार आहेत हे तसे लगेच समजले.

कर्जत पासून राजपे गावात जीपने जाताना
ड्रायव्हर काका आणि त्यांची महिंद्रा जीप दोन्ही उत्तम होते.  कर्जत पासून दूर दूर गेलो तसा रस्ता हळूहळू डांबरी कमी आणि मातीचा जास्त होत गेला.  आम्ही शहरीकरणापासून दूर दूर जात असल्याचे प्रतीक होते ते.  रस्ताच्या कडेला जिकडे तिकडे कुर्डू, म्हणजे silver spiked cockscomb.  महाबळेश्वर परिसरात रस्त्याच्या कडेला हे बऱ्याच ठिकाणी असतात.  त्यामुळे मला लगेच ओळखता येतात.  कर्जत ते राजपे अंतर साधारण सव्वा तासाचे आहे.  ठरलेल्या ठिकाणी रात्री कधीतरी पोहोचलो.  कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले.  तीन वाजले असावेत.  घरातल्यांना न उठवता घरासमोरच्या व्हरांड्यात स्थायिक झालो.  चौघांना झोपण्यासाठी भरपूर जागा.  शिल्पा, स्वप्नील, आणि मंदार आपापल्या स्लीपिंग बॅग मधे.  मी व्हरांड्यात.  स्लीपिंग बॅग ह्या वस्तूचा माझ्याशी अजून संबंध आला नाहीये.  पाचला उठायचे ठरले.  मग त्यात साडेपाच असा बदल करण्यात आला.

झोपल्यावर थोड्या वेळाने एक डास आला.  मग मी बॅगेतून टीशर्ट काढून ते डोक्यावर घेतले.  पायातले बूट काढले नव्हतेच.  फुल पॅन्ट आणि फुल हाताचे जॅकेट.  असे सर्व अंग झाकून घेतले.  मधेच कधीतरी कोणीतरी माझ्या डोक्यासमोर एक उशी आणि माझ्या पायावर एक पांघरूण टाकले.  डोक्याला उशी मिळाली हे कित्ती भारी.

मी व्हरांड्याच्या टोकाला झोपलो होतो.  माझ्या पायाजवळ हालचाल जाणवली.  जाग येऊन उभा राहिलो.  बघतो तर एक मध्यम आकाराचा बेडूक.  तो सरपटणारा प्राणी नाही हे बघून छान वाटले.  त्याला व्हरांड्याच्या बाहेर हाकलून परत झोपलो.  साडेपाच वाजता माझ्या मोबाईल मधला अलार्म वाजला.  पहाटे सूर्योदयापूर्वी उठणे आता मला काही नवीन नाही.  बाकीचे तिघे अजून झोपेच्या राज्यात हरवलेले.  तिथून बाहेर यायचा रस्ता त्यांना सापडेना.  मी उठून परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली.

राजपे गावातली पहाट
मोबाईल मधे फुलांचे फोटो घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले.  हा नवीन मोबाईल घेतल्यानंतरचा माझा हा पहिलाच ट्रेक ज्याच्यात मी मोबाईलचा कॅमेरा म्हणून वापर करत होतो.  नंतर ट्रेकला सुरुवात करताना शिल्पाने मला माझ्या मोबाईल मधल्या कॅमेऱ्याचे योग्य सेटिंग करून दिले.

बाकीचे तिघं अजूनही झोपेच्या राज्यात हरवलेले.  तेवढ्यात माझ्या अंकुश दादाबरोबर गप्पाटप्पा. आम्हा दोघांचा जवळपास एक फेरफटका. 

आम्ही जिथे आलो होतो ती चार घरांची वस्ती होती.  दूरवर भीमाशंकर डोंगररांग.

राजपे गावातून दिसलेली भीमाशंकर डोंगररांग
एकेक करत तिघेही उठले आणि तयार झाले.  तोपर्यंत माझा इकडे तिकडे टाइम पास.  एक मेलेला किडा सापडला त्याचा फोटो.  वगैरे वगैरे.  आजूबाजूच्या उंच डोंगररांगांमुळे सूर्योदय काही दिसला नाही.

A dead beetle

चहा घेऊन तयार होऊन आमची पायगाडी सुटायला सव्वा सात होत होते.  अंकुश दादा आणि आम्ही चार जण निघालो दिवसभराच्या भटकंतीसाठी.  पदरघाट चढून पुढे पेढ्याचा घाट चढून भीमाशंकर परिसरात जायचं आणि आंबेनळी घाटातून उतरून परत राजपे गावात यायचं असा आजचा बेत होता.  म्हणजे आजचा दिवस घाटवाटांचा.  आजच्या तीनही घाटवाटा माझ्यासाठी नवीन होत्या.  शिल्पा आणि स्वप्नीलला भीमाशंकर परिसर काही नवीन नाही.  तसा आजच्या दिवसभरासाठी अंकुश दादा आमच्याबरोबर वाटाड्या.  चालायला सुरुवात करताच अंकुश दादाने असा काही वेग पकडला.  त्याच्या जोडीला शिल्पाही त्याच वेगात.  ट्रेकला संथ सुरुवात करण्याची सवय असलेला मी म्हणजे त्यांच्या ट्रेनला मागे जोडलेला गार्डचा डबा झालो होतो.

राजपे गावातून भीमाशंकरच्या दिशेने  ...  दिवसभराच्या भटकंतीची दमदार सुरुवात

लवकरच गावाजवळचा सपाट भाग संपून चढ आला.  इथेही अंकुश दादा सुसाट वेगात.  आम्ही एक एक करत त्याच्या मागून.  चढ चढायला लागलो तशी जी काही उरली सुरली झोप डोळ्यांवर रेंगाळत होती ती पळून गेली.  वेळ मिळेल तसे मी फोटो घेतले.  सकाळच्या वेळी डोंगरात घुमलेले वानरांचे हुप्प हुप्प आवाज.  अधून मधून पक्षांची किलबिल.

हिरवे तुरे आणि त्यातून बाहेर पडलेली छोटी निळसर फुलं इथे बऱ्याच ठिकाणी.

धाकटा अडुळसा
Common name = Green Shrimp Plant, turquoise crossandra
मराठी = धाकटा अडुळसा
कोकणी = रोरीझाड
Botanical name = Ecbolium ligustrinum

आम्हाला पाहून एक माकड खिचच खिचच असा धोक्याचा इशारा देणारा आवाज काढत होतं.

सर्व परिसर छोट्या झुडुपांनी आणि मोठ्या झाडांनी भरलेला.  जमिनीलगत छोटी झुडुपं.  उंचावर मोठी झाडं.  असं दोन थरांचं जंगल.

I love mornings  ...  and I love trees
फार मोठा ब्रेक न घेता आम्ही पदरघाट पटापट चढत होतो.  ट्रेकचा पहिला टप्पा असा जोरदार झाला तर पूर्ण ट्रेक व्यवस्थित पूर्ण होतो.

इथे कुर्डू सगळीकडे.  नंतर दुपारी अंकुश दादाने सांगितले ह्यांच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.  सुंदर लागते.

कुर्डू  ...  इंग्लिश मधे silver spiked cockscomb
मधेच कुठेतरी लहू आणि भरत आम्हाला येऊन मिळाले.  भन्नाट वेगात दोघे आमच्या पुढे जायचे.  पुढे कुठेतरी आमच्यासाठी थांबलेले असायचे.

रानफुल  ...  कदाचित hibiscus hirtus असावे

आजच्या ट्रेकची सुरुवात अशी दणक्यात झाली.  रेग्युलर ट्रेकर साठी पदरघाट सोपा आहे.  चढ दम काढतो.  पण वाट अवघड नाही.

Echoes on the wall

तासभर पदरघाट चढल्यावर एका सपाट भागात येऊन पोहोचलो.  इथे आमचा दोन मिनिटांचा पहिला ब्रेक.  मग पुढे वाटचाल.

पदरघाटातला सपाटीचा भाग
पावसाळा नुकताच संपतोय.  त्यामुळे कातळ सपाटीवरचं गवत काही ठिकाणी अजून हिरवं तर काही ठिकाणी वाळलेलं पिवळं.  झाडं सगळी हिरवीगार.  छोटी झुडुपं, गवत ह्यांचे अनेकविध प्रकार.

रानफुलं

सकाळपासून अधे मधे खेकडे दिसत होते.  माझ्या मते समृद्ध जंगल परिसर असल्याचं हे लक्षण असावं.  dragonflies आणि damselflies असणे हे सुध्दा प्रदुषणविरहित जंगल ओळखण्याची एक खूण आहे.

खेकडा

ह्या दिवसात सह्याद्रीच्या बऱ्याच भागात तेरड्याची फुलं फुलतात.  इथे तेरडा फारसा कुठे नाही.  नावाला एखाद्या ठिकाणी तुरळक काही दिसला.

पदरगड
पदरगडावरच्या कातळ सुळक्यांमुळे पदरगड दुरूनही ओळखता येतो.

एका ठिकाणी जंगली कडीपत्ता दिसला.  झाडं झुडुपं पक्षी फुलं मला ओळखता येत नाहीत.  अशी दोन चार ओळखता येतात.

जंगली कडीपत्ता
सकाळपासून काही ठिकाणी झाडांवर खुणा दिसल्या.  कोणी ट्रेकर्सनी मेहनत घेऊन सर्वांच्या फायद्यासाठी लावलेल्या.  काही ठिकाणी अंधारात चमकतील असे छोटे चौकोनी रिफ्लेक्टर.  काही ठिकाणी झाडांवर लाल रंगाने खुणा.

झाडावरची खूण

झाडांच्या तुटलेल्या फांद्या जिथे पडल्या होत्या त्यांच्यावर उगवलेल्या कुत्र्याच्या छत्र्या दिसल्या.  एका ठिकाणी बऱ्याच मोठ्या.  त्यांचे फोटो घेतले.

झाडाच्या तुटलेल्या फांदीवर उगवलेली भलीमोठी कुत्र्याची छत्री
किति मोठी ते समजण्यासाठी बाजूला पाय ठेऊन फोटो काढला
आता वाटेत एक छोटा चिमणी क्लाइंब.  चिमणी क्लाइंब म्हणजे अरुंद घळीतून वर चढून जायचे.  एकमेकाला मदत करत सर्व जण न धडपडता चढून आलो.  मग एक छोटा ब्रेक.

छोट्या ब्रेक मधली माझी फोटोग्राफी
पावणेदोन तासात आम्ही पदरघाटाचा मोठा टप्पा चढून आलो होतो.

रानफुल

साडेनऊच्या सुमारास दुसऱ्या चिमणी क्लाइंबच्या समोर पोहोचलो.  हा चिमणी क्लाइंब भलता उंच.  अंकुश दादा, लहू, भरत, आणि स्वप्नील एकटेच चढले.  फ्री क्लाइंब.  त्यांचे हे कसब आम्ही बाकीचे बघत होतो.  कुठून कसे पाय टाकतायत.  कुठे होल्ड पकडतायत.  बॉडी वेट कसे बॅलन्स करतायत.  त्यांच्या मदतीने आम्ही बाकीचे चढलो.  एका अवघड ठिकाणी रोप लावण्यासाठी खडकात बोल्ट मारलेला.  आम्ही रोप आणलेला नव्हता.  खाली एकाने उभं राहायचं आणि त्याच्या खांद्यावर पाय ठेऊन दुसऱ्याने वर चढायचं अशी युक्ती केली.  अंकुश दादा, लहू, भरत, आणि स्वप्नील हे एक्स्पर्ट होतेच पूर्ण वेळ आम्हा तिघांच्या मदतीला.

मला थोडं पायाला खरचटलं.  एका अवघड ठिकाणी थोडं खाली घसरलो.  वर जायचेच आहे हा एकाच विचार मनात असेल तर जे असेल त्यातून मार्ग काढता येतो.

मागे कधीतरी स्वप्नील इथपर्यंत येऊन इथून परत गेला होता.  आज आम्ही सगळे रोप नसताना हा अवघड चिमणी क्लाइंब चढलो.  व्यवस्थित sync झालेली, एकमेकाला मदत करणारी टीम असेल तर अवघड आव्हानेही पेलता येतात.  जे एकट्याने झेपत नाही ते अशा एकजूट असलेल्या टीम मधे शक्य होते.  सह्याद्रीत शिकलेला हा आमचा आजचा पहिला धडा.

अशा ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात.  प्रत्येकाचे वैयक्तिक कसब.  एकमेकाला मदत करण्याची तयारी.  मदत करताना स्वतःची तसेच समोरच्याची शारीरिक क्षमता ओळखणायची हुशारी.  चढण्याचा क्रम.  बरोबरचे सामान वर चढवून नेणे.  शक्ती आणि युक्तीचे योग्य कॉम्बिनेशन.

टीमवर्क ह्या विषयावर किती पुस्तकं वाचली, किती कॉर्पोरेट प्रेसेंटेशन पहिली, किती कॉर्पोरेट ट्रेनिंग अटेंड केली तरी घागर रिकामीच असते.  फक्त घागर भरण्याचं फीलिंग आलेलं असतं.  त्याऐवजी अशी अवघड आव्हानं पेलता आली तर मिळवलं.  बघा पटलं तर.  नाही तर सर्टिफाइड ट्रेनर असतातच मोठमोठ्या कंपन्यांमधून एसी मीटिंग रूम मधे बसवून दोन तासात टीमवर्क शिकवायला आणि ट्रेनिंग अटेंड करणाऱ्यांना क्वालिफाइड बनवायला.

चिमणी क्लाइंब
हा अवघड टप्पा चढून आल्यानंतर छोटी खिंड आहे.  खिंडीत थोडावेळ थांबलो.  इथून आम्हाला डावीकडच्या वाटेने चढून भीमाशंकरच्या दिशेला जायचे होते.  उजवीकडे पदरगडावर जाणारी अवघड वाट होती.  इथपर्यंत आलोय तर पदरगड पाहून मग पुढे जायचं ठरलं.  मंदार आणि मी पदरगडावर न जाता इथे खिंडीतच थांबायचं ठरवलं.  चिमणी क्लाइंब ने आत्ताच जीव काढलेला.  लगेच पदरगडाची अवघड वाट हे जरा जास्तच झालं असतं.  तसे चढून गेलोही असतो.  पण चढण्यापेक्षा उतरणे अवघड असते.  शीर सलामत तो पगडी पचास.  सामान आमच्याबरोबर सोडून बाकीचे पाच जण पदरगडाच्या अवघड वाटेने चढून गेले.

चिमणी चढून आल्यानंतरच्या छोट्या खिंडीत उभं राहून पाहिलेला पदरगड
पदरगड कोणी व केव्हा बांधला हि ठोस माहिती इतिहासात उपलब्ध नाही.  हा एक टेहळणीचा किल्ला होता.  आजूबाजूच्या परिसरावर व गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी उत्तम ठिकाण.  पदरगडावरील कातळ सुळक्यांना कलावंतिणीचा महाल असं म्हणतात.  हे नाव का ते मला समजले नाही.  किल्ला ह्या संकल्पनेत असलेल्या दगडी भिंती, बुरुज, दरवाजे, वगैरे इथे नाहीत.  सरळसोट उभे कातळकडे आणि त्यांच्या पलीकडे खोल दऱ्या हीच इथली नैसर्गिक संरक्षण व्यवस्था.  इथे खोदलेल्या गुहांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आजूबाजूच्या परिसराच्या टेहळणीसाठी अतिशय उत्तम आहे, इति स्वप्नील.

पदरगड सर करायला गेलेले आमचे पाच शिलेदार परत येईपर्यंत मंदार आणि मी गप्पा मारल्या.  परिसराचे फोटो घेतले.  समोर भीमाशंकरच्या दिशेने जाणारी वाट दिसत होती.  सुकलेल्या गवताने झाकलेली.

खिंडीतून पाहिलेली भीमाशंकरच्या दिशेने जाणारी वाट
पदरगड सर करून आमचे पाच शिलेदार तासाभराने एक एक करत खिंडीत परत आले.  मागच्या वेळी अर्ध्यावर सोडून द्यायला लागलेला पदरगड ह्या वेळी सर झाल्यामुळे स्वप्नील भलताच खुश झालेला.  आता उरलेला घाट चढून भीमाशंकरच्या दिशेने जायचे होते.  वाट अशी नव्हतीच.  ज्या काही वाटेसदृश्य जागा दिसत होत्या त्या सुकलेल्या गवताने आच्छादलेल्या.  सुकलेल्या गवतावरून पाय घसरत होता.  पायाला ग्रीप न मिळाल्यामुळे छोट्या अंतरालाही बराच वेळ लागत होता.  गवत हे एक अवघड आव्हान ठरू शकतं हे आज इथे समजलं.  काही ठिकाणी मी गवत काढून टाकून जागा मोकळी करून मग पुढे गेलो.  पण हे करण्यात बराच वेळ जात होता.  गवतात अधे मधे काटेरी वेली होत्या त्या वेगळ्याच.

पदरगड  ...  समोरच्या डोंगरावरून पाहिलेला
आम्हाला वर जायला वाट मिळेना.  लहू आणि भरत पुढे जाऊन पाहून आले.  हे दोघं जर वर जाऊ शकत नसतील तर आम्ही इतर काय जाणार.  बऱ्याच साधक बाधक चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला कि परत मागे जाऊन तिथे असलेल्या पेढ्याच्या वाटेने भीमाशंकरच्या दिशेने जावे.  सव्वा अकरा वाजत होते.  आमच्यासाठी वेळ हा काही धोक्याचा भाग नव्हता.

ठरल्या प्रमाणे परत फिरून पदरगडाच्या समोरच्या खिंडीत उतरून आलो.  अवघड ठिकाणी उतरताना मला इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो.  मग एक एक करत एकमेकाला मदत करत चिमणी क्लाइंब उतरलो.  चिमणी क्लाइंब हा प्रकार मात्र मला चढायला अवघड आणि उतरायला त्या मानाने सोपा जातो.  कदाचित माझ्या शारीरिक उंची आणि लांब पायांमुळे.

पदरघाटात दिसलेली वनसंपदा

पदरघाट बराच उतरून गेल्यावर उजव्या बाजूची भीमाशंकरकडे जाणारी पेढ्याची वाट पकडली. का म्हणत असतील ह्या वाटेल पेढ्याची वाट?  कधीकाळी कुणीतरी इथून जाऊन पेढे वाटले असतील म्हणून का?  घाटवाटांची नावं अशीच काही कारणांनी पडलेली असतात.  मढे घाट.  वाजंत्री घाट.  सवाष्णी घाट.  नाणेघाट.  रडतोंडी घाट.  त्रिगुणधारी घाट.  अंधारबन घाट.  ठिपठिप्या घाट.  गणपती घाट.  वाघजाई घाट.  पायरीची वाट.

घाटवाट म्हणजे पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी वापरली जाणारी सह्याद्रीच्या डोंगरातली वाट.  मग घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या जवळपास कुठेतरी मोक्याच्या ठिकाणी बांधलेले टेहळणीचे किल्ले हे आलेच.  आजच्या आधुनिक काळातही काही ठिकाणी ह्या घाटवाटांनी कोकणातली माणसं घाटावर आणि घाटावरची माणसं कोकणात पायी प्रवास करतात.  शंभराची नोट टपरीवर नाहीतर नाक्यावर नाहीतर दुकानात फार विचार न  करता दोन मिनिटात संपवणारी शहरी माणसं आज जशी आहेत तशीच यष्टीचे वीस रुपये वाचवायला डोंगर चढून उतरून दिवसभर पायपीट करून जवळच्या मोठ्या गावात जाणारी खेड्यापाड्यातली गरीब साधी माणसंही आहेत.

असो.  सबंध जग हे विविध प्रकारच्या बहुढंगी बहुरंगी माणसांनी भरलेलं आहे.  सध्या आम्ही भीमाशंकर परिसरातली विविध प्रकारची बहुढंगी बहुरंगी वनसंपदा पहात हरपून गेलो होतो.

दुपारच्या वेळी पाहिलेलं भीमाशंकर अभयारण्य  ...  समोर एक स्वछंद विहरणारं फुलपाखरू
एका ठिकाणी डोंगराच्या कड्यावर जाऊन स्वप्नील पदरगडाचे फोटो काढून आला.  सह्यभ्रमंती करावी तर स्वप्नील सारखी.  इतर कशाचाही विचार न करता.  अफाट.

फटकळ तोंडाची, कुतर्क स्वभावाची, किरकिरी सोबत असेल तर भूतान सारख्या स्वप्नवत प्रदेशातली भटकंतीही नकोशी होऊन जाते.  एकमेकाला समजून घेणाऱ्या सवंगड्यांबरोबर केलेली सह्य भ्रमंती अवघड असली तरी किती हवीहवीशी वाटते.

अफाट सह्यभ्रमंती करताना  ...  अद्वितीय सह्यमित्र स्वप्नील खोत
सकाळी खालच्या पठारावरून पाहिलेला पदरगड आणि आता ह्या पदरगडाच्या समोरच्या डोंगरावरून दिसणारा पदरगड ह्यात बराच फरक.  पदरगड तोच.  त्याच्या दिसण्यात फरक.  इथून पदरगड एखाद्या अजस्त्र पेन्सिलीच्या टोकासारखा दिसत होता.

एका वेगळ्या कोनातून पाहिलेला पदरगड
मेटरहॉर्न किंवा माछापुछछे जसे त्या जागांची ओळख आहेत तसं हे शिखर माझ्यासाठी इथली ओळख झाली आहे
आता मोकळ्यावर चालताना कडक उन्हाचे चटके बसत होते.  ऑक्टोबर हीट घरात बसून नाही समजत.  पेढ्याचा घाट चढताना अंगातून टपाटप घाम गळत होता.  मधे एखादा झाडांच्या सावलीचा भाग आला कि आमची क्षणभर विश्रांती.  पाण्याच्या बाटल्या एकेक करत रिकाम्या व्हायला लागल्या.

रानफुल

वाटेत एका ठिकाणी पाणी भरून घेतले.  ह्या वर्षीचा पाऊस संपला असला तरी पुढचे दोन तीन महिने इथे भीमाशंकर परिसरात पाणी असते.  आता जेवणाची वेळ झालेली होती.  एक योग्य जागा निवडून जेवण्यासाठी थांबलो.  शरीरातले बरेच पाणी घामावाटे कमी झाल्याने मला भरपेट खाण्यापेक्षा पाणी पिण्याची आवश्यकता होती.

जेऊन झाल्यावर भीमाशंकरच्या दिशेने निघालो.  आता डोंगर चढायचा होता.  डाव्या बाजूला सुकलेल्या गवताने भरलेला डोंगराचा भाग.  उजव्या बाजूला खोल दरी.  मधे वाट.  बऱ्याच ठिकाणी एक माणूस जाईल इतकीच.  ऑक्टोबरच्या मध्यावरचे सूर्यदेव वर भरात येऊन तळपत होते. काही ठिकाणी पायाखाली बारीक दगड किंवा माती आली तर त्याच्यावरून पाय घसरण्याची शक्यता.  घामाच्या धारा लागलेल्या.  असा अवघड टप्पा सर्व वेळ पूर्ण एकाग्रतेने पार करावा लागतो.  जरा लक्ष विचलित झाले तरी घात होऊ शकतो.

बऱ्याच वेळानी एकदाची हि कठीण परीक्षा संपली.  आता आम्ही खूप लांबवर पसरलेल्या पठारावर आलो होतो.  इथून पुढे आम्हाला डोंगरपठारावरून चालायचं होतं.

एका ठिकाणी दगडावर पाय सोडून बसलो.  ह्या माझ्या आवडत्या पोझ मधे फोटो काढला.

माझी आवडती पोझ
स्वतःला आलमगीर, म्हणजे सबंध जगाचा मालक समजणाऱ्या औरंगजेबाला आणि त्याच्या अफाट फॊजेला ह्याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी आणि इथल्या चिवट काटक मरहट्ट्यांनी झुंजवलंय.  दिल्लीहून महाराष्ट्र बुडवायला आलेला औरंगजेब इथेच महाराष्ट्रात हाय खाऊन गेलाय.  आज ज्याला वेस्टर्न घाट म्हणून ओळखतात त्याचं इंग्रजी नाव आहे बेनेव्होलेन्ट माउंटन्स.  सुज्ञास अधिक इशारा न लगे.

असं पाणी पिण्याचा प्रसंग काही वेगळाच.  तो शब्दात सांगता येत नाही.
माझी सकाळची एनर्जी लेव्हल आणि आत्ताची ह्यात मला सपष्ट फरक जाणवत होता.  बॅटरी निम्म्यावर आली होती.  दुपारचे सव्वा तीन होत होते.  म्हणजे सकाळी सुरवात केल्यापासून पायगाडी आठ तास चालली.  स्वप्नील आणि इतर अजूनही फुल पॉवर मधे होते.  लहू आणि भरत तर सकाळपासून प्रत्येक टप्प्यावर आमच्या दुप्पट वेगात होते.

आता इथून पुढे जाण्यासाठी दोन पर्याय होते.
पहिला पर्याय : हनुमान तलाव आणि नागफणी बघून मग आंबेनळी घाट ज्या ठिकाणी सुरु होतो त्या ठिकाणी यायचे.  हा मोठी पायपीट करावणारा आणि त्यामुळे अवघड पर्याय होता.
दुसरा पर्याय : एक देवीचं मंदिर बघून मग आंबेनळी घाट ज्या ठिकाणी सुरु होतो त्या ठिकाणी यायचे.  ह्यात कमी पायपीट असल्याने हा सोपा पर्याय होता.
मी अर्थातच सोपा पर्याय निवडला.  दिवसभर घामावाटे अंगातलं पाणी कमी झाल्यामुळे (dehydration किंवा निर्जलीकरण) मला आता थकवा जाणवत होता.

सपाट डोंगरपठारावरून चालणं घाट चढण्या उतारण्यापेक्षा सोपं होतं.

सपाट डोंगरपठारावर चालताना


एका ठिकाणी काही झुडुपात छोटी लाल फळं होती.  पिकलेली लाल आणि कच्ची हिरवी.  झुडुपाला गोलसर चमकदार पानं.

फळं  ...  काही कच्ची काही पिकलेली

अंकुश दादाने सकाळपासून दिसल्या त्या रानभाज्या दाखवल्या.  कशाकशाची भाजी करून खातात.  कशी लागते.

दुसरा सोपा पर्याय निवडल्यापासून पाऊण तासात देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो.  आजूबाजूच्या परिसरात फुलांची बहार.  फुलांचे फोटो काढले.

फुलांच्या राज्यात

अंकुश दादा आणि शिल्पा ताईंच्या गप्पा होई पर्यंत मी आजूबाजूला फिरून वेगवेगळ्या प्रकारे फुलांचे फोटो काढले.  तसंही माझा भूगोल कच्चा आहे.  आणि भीमाशंकर परिसराबद्दल मला काही माहिती नाही.  हा अमुक अमुक माळ, तो पलीकडचा भुताचा माळ, हि कोणती वाट, तो पलीकडे तमुक तमुक डोंगर.  ह्या त्यांच्या गप्पा मला अनाकलनीय होत्या.

मंदिर
माझ्या रिझर्व्ह कोट्यातला थोडा सुकामेवा खाल्ला.  अशा मोठ्या ट्रेकला गेल्यावर एक डबा सुकामेवा मी रिझर्व्ह कोट्यात ठेवतो.  कधी अवघड प्रसंग आलाच तर भुकेने जीव जाणार नाही.

फुलांचे ताटवे

परत एकदा आजूबाजूला फिरून फुलांचे फोटो काढले.  मग हा पंधरा मिनिटांचा ब्रेक संपवून आंबेनळी घाटाच्या दिशेने निघालो.  सव्वा चार होत होते.  आम्ही वेळेत होतो.

झाडांच्या परिसरातून जाताना

दिवस कलल्यावर आता उन्हाचा त्रास होत नव्हता.  उन्हाची जागा आता थकव्यानी घेतली होती.

सपाट पसरलेला खडकाळ माळ

साडेचारला पोहोचलो आंबेनळी घाट जिथे सुरु होतो तिथे.  मंदिरापासून इथपर्यंतची ही पंधरा मिनिटही मला बरीच मोठी वाटली.  थकव्यामुळे.  हनुमान तलाव आणि नागफणी बघायला गेलेले चार सह्यमित्र यायला वेळ होता.

भीमाशंकर परिसरातल्या घाटवाटांची अनभिषिक्त सम्राज्ञी शिल्पा बडवे

गवतात आडवा होऊन मी अर्धा तास झोप काढली.  जंगलातला हा निजेला धोंडा काय वर्णावा.  शांत निश्चिन्त झोप.

हनुमान तलावाला भेट दिल्यानंतर नागफणी वेळेअभावी रद्द करून आमचे चौघे सह्यमित्र पळत इथपर्यंत आले.  चालत आले असते तर उशीर झाला असता.  अंधार व्हायच्या आधी आंबेनळी घाट उतरून राजपे गावात पोहोचायचं होतं.

भीमाशंकर परिसरात सदाहरित, निम-पानझडी, आणि पानझडी अशा तीनही प्रकारची झाडं आहेत.  अनेक औषधी वनस्पती व वृक्ष आहेत.  विविध फुलपाखरं, कीटक, पक्षी आहेत.  साप, बेडूक, खेकडे, शेकरू खार, बिबट्या, सांबर, जंगली डुकरं आहेत.  अशी मोजदाद करायला गेलो तर वेळ अपुरा पडायचा.  फक्त भीमाशंकर मंदिराच्या परिसरात भाविकांनी केलेला अतोनात कचरा हा इथला शाप.  इथे फिरताना कचरा दिसायला लागला कि समजायचं भीमाशंकर मंदिर जवळ आलंय.  जितकं मंदिराच्या जवळ जाऊ तितका कचरा वाढत जातो.  असा कचरा करून कोणता देव प्रसन्न होतोय.

स्वप्नील आणि मंदार आजची हकीगत सांगत होते.  एका ठिकाणी पन्नास एक साऊथ इंडियन पिंड दानाला जमले होते.  नदीच्या परिसरात त्यांनी अखंड कचरा केलेला.  असा कचरा केला तर कसलेही पुण्य पदरात पडत नाही.  पूर्वज कोप पावतात.  जोपर्यंत कचरा करणारे परत येऊन केलेला सर्व कचरा स्वतः साफ करत नाहीत तोपर्यंत ते कोपलेले भरकटत राहतात.

त्यांचं जाऊ दे.  आम्ही सात जण आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो.

आंबेनळी घाट उतरायच्या आधी दूरवर पाहिलेला पदरगड

अंधार पडायच्या आत आंबेनळी घाट उतरून राजपे गावात पोहोचायचे होते.  सर्व भिडू उत्तम ट्रेकर असल्यामुळे अंधार पडला तरी धोका असा नव्हता.

डोंगरातल्या एका घळीमधून वाट उतरत गेलेली.

गर्द झुडुपांमधून उतरत गेलेली वाट
सुरुवातीला गर्द झुडुपांमधून उतरत गेलेली अरुंद वाट.  पाच मिनिटात झुडुपं कमी होत गेली आणि त्यांची जागा मोठमोठ्या दगड धोंड्यांनी घेतली.  अधे मधे मध्यम आकाराची झाडं.  काही वेळा डोंगरात घुमलेला वानरांचा हुप्प आवाज ऐकू आला.

चढताना जशी पायात ताकद लागते तशी उतरताना फारशी लागत नाही.  उतरताना शरीराचा तोल सांभाळण्याचे कसब लागते.  मोठमोठ्या दगड धोंड्यातून उतरताना पूर्ण अंगाचा व्यायाम होत होता.  आता आमचं एकच ध्येय होतं - अंधार पडायच्या आत घाट उतरून गावात पोहोचायचं.

स्वप्नील एका ठिकाणी कड्यावर पुढे जाऊन सूर्यास्ताचे फोटो काढून आला.  निसर्गात फिरावं तर असं.  शंभर टक्के जिथे आहे तिथे.  सगळ्याचा आस्वाद घेत.

आंबेनळी घाट

मोठमोठ्या दगड धोंड्यातून वाट काढत जाताना सावधगिरी बाळगावी लागते.  आणि ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात थकव्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.

हे मोठे दगड धोंडे संध्याकाळच्या वेळी पण अंगातून घाम काढत होते.  स्वप्नीलने म्हटल्याप्रमाणे दिवसभरात प्रत्येकाच्या अंगातून बादलीभर घाम गळाला असेल.  बरोबर असलेले पाणी जपून वापरायचे होते.  थोडा रिझर्व्ह कोटा शेवटपर्यंत असावा.

किती उतरलो तरी वाट काही संपेना.  लहू आणि भरत पुढे निघून गेले.  आम्ही बाकीचे पाच जण जमेल तसे उतरत होतो.  फार घाई करून पण उपयोग नव्हता.  सावधगिरीने उतरणे योग्य.

हळू हळू अंधार पडत गेला.  अंधारामुळे आमचा वेग आणखी मंदावला.  थकवा तर होताच.  आंबेनळी घाट उतरून राजपे गावात पोहोचणे हि आमच्या संयमाची आणि चिवटपणाची आजची कठीण परीक्षा होती.  अंधारात पायाखालची वाट नीट दिसेना.  उजव्या बाजूला दरी.  एक माणूस जाईल इतकीच वाट.  अधे मधे मातीमुळे घसरडी.  काही अवघड ठिकाणी मी बसून घसपटत उतरलो.  पूर्ण अंधार पडल्यावर नेहमीप्रमाणे माझा हेड टॉर्च कामी आला.  हेड टॉर्च डोक्यावर न लावता हातात धरून चाललो.  हेड टॉर्च डोक्यावर लावला तर त्याच्या भोवती गोळा झालेल्या किड्यांचा त्रास होत होता.

राजपे गावात पोहोचलो तेव्हा ड्रायव्हर काका गप्पा ठोकत आमची वाट बघत बसलेले होते.  अंकुश दादाच्या घराच्या ओसरीत बसून चहा घेतला.  बूट काढून साफ केले.  तोंड धुतलं.  आम्ही चार जण थकलेले.  तर अंकुश, लहू, आणि भरत आत्ताही ताजे टवटवीत.  आमच्यासाठी जो अवघड ट्रेक होता तो ह्यांचा दिवसभराचा पोरखेळ होता.  अंकुश दादाने काहीही मानधन घ्यायला स्पष्ट नकार दिला.  सह्याद्रीतल्या अशा छोट्या गावात पाड्यात जिथे शहरीपणा दूरदूर पर्यंत सापडत नाही तिथे माणुसकी आणि आपुलकी मात्र भरभरून मिळते.  पैशात सगळं काही मोजता येत नाही हो.  थोड्या गप्पा टप्पा करून निघालो.

काकांनी आम्हाला कर्जत स्टेशन समोर सोडले.  भुकेची जाणीव झाल्यामुळे त्यावर उपाय शोधला.  एका छोट्याश्या हॉटेलात प्रत्येकी एक प्लेट इडली.  मग कर्जत स्टेशनात शिरून तिकीट काढले.  शिल्पा आणि मंदार मुंबईच्या दिशेने गेले.  पुण्याला जाणारी ट्रेन आल्यावर स्वप्नील आणि मी त्यात चढलो.  चढताना दारात फार मारामारी नव्हती.  पण आत गेल्यावर डब्यात तुडुंब गर्दी.  हि चेन्नईला जाणारी लांब पल्ल्याची ट्रेन होती.  डब्यात काही लांब पल्ल्याचे तर काही पुण्याला जाणारे प्रवासी.  एक दीड शहाणा माजोरा मराठी माणूस समोर बसलेल्यांबरोबर भलत्या बाता मारत होता.  तासाभराच्या वाचाळगिरीत त्याने दुनियाभराच्या जाती काढल्या.  पण आपण त्याची जात नको काढायला.  त्याला आपण एक दीड शहाणा माजोरा मराठी माणूस म्हणूया.  त्याच्या बाता ऐकायला त्याला समोर एक प्रेक्षक मिळालेला.  त्याच्या बातांनी माझी करमणूक झाली.  तेवढाच कंटाळवाण्या प्रवासात विरंगुळा.  पुणे स्टेशन आल्यावर आम्ही उतरण्याच्या आधीच वर चढणाऱ्यांची दारात झुंबड.  मागच्या रेट्याने उड्या टाकून उतरलो.  बॅटरी संपल्याने माझा फोन बंद झाला होता.  स्वप्नीलने त्याच्या फोन मधून मला ओला ऑटो करून दिली.  घरी पोहोचायला बारा वाजून गेले होते.

ह्या सव्वीस तासात ट्रेकिंग नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिनभिंतीच्या शाळेमधले एकाहून एक उत्कृष्ट धडे मिळाले.  एकमेकाला समजून घेणाऱ्या सवंगड्यांबरोबर केलेली हि दिवसभराची सह्य भटकंती जशी केली तशी शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.  गोड मानून घ्यावा.  असा अफाट अप्रतिम अनुभव तुम्हालाही मिळावा हि प्रार्थना.  पण त्यासाठी स्वतःचा कंफर्ट झोन सोडून बाहेर पडावे लागते.