तुम्हाला आवडेल त्या चालीत म्हणा.
वासोटा गड मोठा, नाही गर्दीला तोटा. रविवार २५ नोव्हेंबर २०१८ ला दिवसभरात हि लाईन मला बऱ्याच वेळा आठवली. भल्या पहाटे पाचच्या दरम्यान बामणोलीला पोहोचलो तेव्हा बऱ्यापैकी धक्का बसला. आमची बस थांबली होती त्याच्या आजूबाजूला सगळीकडे बस, कार, टेन्ट. सगळ्या मोकळ्या जागा भरलेल्या. अंधारात अंदाज येत नव्हता. पण हजार एक माणसं परिसरात होती. हि सगळी आज वासोट्याला येणार कि काय. आली तर वासोटा पळून जाईल दुसरीकडे कुठेतरी. कोण्या एके काळी अतिशय दुर्गम असलेला हा वनदुर्ग. आज इतका सोपा झालाय? हजाराच्या झुंडीने हौश्या नवश्यांनी जाण्यासारखा?
उजाडलं आणि थोड्या वेळानी इथली गर्दी कमी व्हायला लागली. म्हणजे बरेच जण इथे फक्त टेन्ट मधे रहायला आणि खादडायला आलेले होते. बामणोली हा आता एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट झालाय तर. ह्या गर्दीत भर घालायला आम्ही सदतीस जण आणि आमची बस. बस थांबवल्यावर बापूने अंग पसरून ताणून दिली. मेल्यासारखा झोपला होता. उत्तम ड्रायव्हरचं लक्षण आहे हे. गाडी चालवताना सदैव सतर्क. आणि गाडी इच्छित स्थळी पोहोचवली, म्हणजे कामगिरी पूर्ण झाली, कि असेल त्या परिस्थितीत ताणून द्यायची. मग आजूबाजूला भोंगे वाजवलेत तरी चालतंय. बापू एक नंबर ड्रायव्हर आहे. रात्रभर गाडीत आपण निर्धास्त झोपावं. एकदाही कधी गचका बसून झोपमोड झाली नाहीये. आज पांढरे काका (बसचे मालक) पण आले होते. त्यांची मात्र अनेकदा झोपमोड झाली आम्ही बसमधून चढ उतार केल्यामुळे. त्यांच्या झोपाळू आवाजातल्या बडबडीने थेट निळू फुलेंची आठवण झाली.
बस मधून बाहेर पडून मी पण परिसराची पाहणी केली.
|
भल्या पहाटे बामणोली परिसर |
इथला परिसर भन्नाटच आहे. आत्तापर्यंत जितक्या वेळा बामणोलीला आलो होतो तितक्या वेळा इथे मोकळे रस्ते आणि तुरळक माणसं पहिली होती. आजचं चित्र नव्यानेच पहात होतो.
|
गाड्या, गर्दी, तंबू नसले तर जगात भारी जागा आहे हि. पण आता फेमस झाल्यामुळे विचका झालाय हो. |
इथे चहा आणि नाश्त्याची सोय विशालने करून ठेवली होती. चहा आणि नाश्त्यानंतर आम्ही आणलेले रिकामे डबे इथून भरून घेतले. दुपारच्या जेवणासाठी चपात्या आणि भाजी.
सर्वजण तयार होऊन बस च्या समोर जमलो. तेहतीस पार्टीसिपंट आणि चार संयोजक. विशाल, अमोल, स्मिता, आणि डॅनी. विशालने दिवसभराची रूपरेषा सांगितली. आवश्यक त्या सूचना दिल्या. सर्वांची तोंडओळख झाली. आमच्यासाठी तीन बोटी ठरवल्या होत्या. दोन बोटीत प्रत्येकी बारा जण आणि एका बोटीत तेरा. बोटीत जाऊन बसलो.
|
मारा स्टार्टर ... होऊ द्या सुरु |
आता दीड तासाचा प्रवास होता बोटीतून. बऱ्याच दिवसांनी इथल्या बोटीत बसलो. आमच्या आधीच्या सफरी आठवल्या.
|
बोटीत बसल्या बसल्या फोटोग्राफी |
सर्व बोटी एकाच दिशेने निघालेल्या. वासोट्याच्या जत्रेला. दीड तास म्हणजे फोटोग्राफीला भरपूर वेळ. मधे मधे कॅमेरा खुशीकडे दिला. फोटो काढत काढतच शिकेल. मी शिकतोय तशीच.
|
बोटीत बसल्या बसल्या फोटोग्राफी |
कोयना धरणाचा पाणीसाठा शिवसागर ह्या नावाने ओळखला जातो. कोयना, सोळशी, आणि कांदोटा ह्या तीन नद्यांचे पाणी इथे साठते. ह्या जलाशयाच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कोयना अभयारण्य. कोयना अभयारण्यातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे वासोटा किल्ला. हा प्रदेश ज्या सह्याद्री पर्वतरांगांचा भाग आहे तो आहे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज. पृथ्वीवरच्या सर्वात जास्त जैववैविध्य असलेल्या ठिकाणांपैकी एक.
बोटींनी एक वळण घेतलं आणि समोर लांबवर वनदुर्ग वासोटा दिसायला लागला. हळूहळू जवळ येत गेला.
|
शिवसागर जलाशय
सर्व बोटी एकाच ठिकाणाकडे चालल्यायत
लांबवर दिसणारा वनदुर्ग वासोटा |
पावणे नऊला निघालेल्या बोटी सव्वा दहा च्या सुमारास थांबल्या. वीसेक बोटी इथे आलेल्या. प्रत्येक बोटीत दहा ते पंधरा माणसं. म्हणजे साधारण अडीजशे माणसं आज वासोट्याच्या जत्रेला होती. आम्ही सर्वजण एक घोळका करून थांबलो.
|
वासोटा ट्रेक ला सुरुवात |
विशाल वन विभागाच्या ऑफिस मधे जाऊन इथली पूर्तता करून आला. विशाल ने सर्वांना ट्रेक बद्दल माहिती आणि सूचना दिल्या. अमोल सगळ्यात पुढे. विशाल सगळ्यात मागे. अमोल आणि विशालच्या मधे आजचे स्वछंद गिर्यारोहक. त्यांच्यामधे डॅनी आणि स्मिता. असे चालू लागलो. इथे कोणी हरवायची शक्यताच नव्हती. वाटेला गर्दीच एवढी होती.
कॉंक्रिटच्या जंगलातून खऱ्या जंगलात नव्यानेच आलेले काहीजण बोंबा ठोकत चेकाळत निघालेले. सुरुवातीचा काही काळच. नंतर शांत झाले.
सगळीकडे घनदाट झाडं. त्यांच्यामधून वाट गेलेली. पूर्ण वेळ सावलीतून. सर्वात वर मोठे वृक्ष, त्यांच्यापेक्षा कमी उंचीवर दुसरा झाडांचा थर, तिसरा थर झुडुपांचा, आणि जमिनीलगत गवत वगैरे, असं चार थरांचं जंगल आहे हे.
|
आम्ही सारे खादाड |
झरा आल्यावर थंडगार पाणी प्यायलो.
हजारो माणसांनी जा ये करून वाट पूर्णपणे मळलेली झाली आहे. अवघड टप्पा कुठेच नाही. खुशी आणि मी सुसाट चढून गेलो. बराच वेळ खुशी लीड ला असलेल्या अमोलच्या बरोबरीने चढून गेली. आमची पुढच्या पिढीतली ट्रेकर तयार होतेय तर.
चढाईच्या शेवटच्या टप्प्यात वाट मोकळ्यावरून जाते. इथे ऊन लागते. हा टप्पा सुरु व्हायच्या आधी एक ब्रेक घेतला.
|
शेवटच्या टप्प्यावर मागे वळून पहाताना |
शेवटच्या टप्प्यात काही पायऱ्या आहेत. चढून गेल्यावर समोरच मारुतीचं मंदिर. त्याच्यासमोर आज जत्रेची गर्दी.
|
राम राम तू म्हणत रहा आणि जगाला भिडत रहा |
तसं मधल्या गर्दीचा आम्हाला फरक नाही पडत. आमचं कनेक्शन दूरचं आहे. दुरून नमस्कार आणि दुरूनच आशीर्वाद.
डाव्या बाजूला झाडाखाली अमोल ने जागा हेरून ठेवली होती. जेवणाच्या पंगतीसाठी. तिथे सर्व जण जमलो. इथे चुन्याचा घाणा आहे.
|
चुन्याच्या घाण्याचं चाक |
चपात्या, भाजी, चटणी, लोणचं असं आम्ही सगळ्यांनी डब्यातून आणलं होतं ते फस्त केलं.
इतरांचं जेऊन होतंय तोवर आम्ही आजूबाजूला फेरफटका मारला.
|
सदरेचे अवशेष |
परत घोळक्यात येतोय तोवर विशाल ने पुढच्या सूचना द्यायला सुरुवात केलेली. ग्रुप फोटो काढून किल्ला पहायला निघालो.
|
आजचे स्वच्छंद गिर्यारोहक |
आम्ही आधी गडाची डावीकडची बाजू पाहणार होतो आणि मग उजवीकडची. त्याप्रमाणे डाव्या बाजूला निघालो. जोडटाक्यातलं पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही.
इथे समोर हरिश्चन्द्रगडावरच्या कोकणकड्याची आठवण देणारा बाबू कडा. त्याच्यावर जुना वासोटा. शिवकाळात इथे तुरुंग होता. १६६१ साली राजापूरच्या वखारीतून पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना इथे कैदेत ठेवण्यात आले होते.
|
बाबू कडा
वर जुना वासोटा |
आता जुन्या वासोट्यावर जायला वन विभागाकडून बंदी आहे. हे योग्यच आहे. वन्य प्राण्यांना एवढी तरी जागा माणसांनी सोडलीच पाहिजे. ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला आहे. त्या काळचं जंगलातलं माणसांचं आश्रयस्थान. आणि आजचं प्राण्यांचं आश्रयस्थान.
गडाची हि बाजू बघून झाल्यावर, यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर आम्ही निघालो गडाची पलीकडची बाजू बघायला.
सदरेचे अवशेष म्हणजे भलामोठा बांधून काढलेला प्लॅटफॉर्म उरला आहे ज्याच्यावर सदर होती. सदर म्हणजे राज्यकारभार चालवण्याची जागा.
|
औट घटकेचे मनसबदार |
पुढे जाऊन महादेवाचे मंदिर पाहिले.
|
समोर खोटा नागेश्वर सुळका
पलीकडे नागेश्वर सुळका |
विशालने इथून दिसणाऱ्या ठिकाणांची माहिती दिली. समोर खोटा नागेश्वर.
त्याच्या पलीकडे नागेश्वर. चकदेव. रसाळगड सुमारगड, महिपतगड कोणत्या
दिशेला आहेत ते.
एका दरवाजाची फक्त कमान बाकी आहे.
|
दरवाजाची कमान |
आता गर्दी कमी झाली होती. माचीवर गेल्यावरही आमची भरपूर फोटोग्राफी झाली. आज आम्ही पाच जण स्वच्छंद गिर्यारोहकांचे टीशर्ट घातलेले एकत्र होतो. असा योग दुर्मिळ असतो. हा फोटो झालाच पाहिजे ना.
|
स्वच्छंद गिर्यारोहक
(तुमच्या) डावीकडून उजवीकडे - अमोल, योगेश, डॅनी, स्मिता, विशाल |
मालिका जिंकण्यात सिंहाचा वाटा असलेला धोनी ज्याप्रमाणे पुरस्कार समारंभात करंडक कनिष्ठ खेळाडूच्या हाती सोपवून स्वतः शांतपणे कोपऱ्यात उभा असतो त्याप्रमाणे विशाल फोटोत कडेला. परिस्थिती पाहून त्याप्रमाणे उत्तम आयोजन केलं ह्याही ट्रेकचं विशालने. धन्यवाद मित्रा. असेच यशस्वी ट्रेक आयोजित करत रहा.
लाँच चालवणारे आता आम्हाला बोलवायला आले. चला लवकर खाली उतरून. वेळेत परत जायचे होते. पण काहींची फोटोग्राफी अजून संपेना.
|
मारुतीराया |
सकाळी गर्दीत अडकलेला मारुतीराया आता मोकळा सापडला. बिनछपराचं मंदिर. काहींना छपराची गरजच नसते. तसं बघितलं तर आपल्या सगळ्यांच्यातच रहातोय हा. हे मूर्त स्वरूप फक्त प्रातिनिधिक आहे. पंधरा मिनिटात घोराडेश्वर डोंगर चढून जाणारा तोच. कितीही वेळा बघीतला तरी परत एकदा तिकोन्यावर जाणारा तोच. दुर्गा टेकडीच्या खड्या चढावर स्प्रिंट मारणारा तोच. उन्हातान्हात दिवसभर भीमाशंकरचं रान तुडवत फिरणाराही तोच. सकाळी सातारा अर्ध मॅरेथॉन पळाल्यानंतर दुपारी जरंडेश्वर डोंगर चढून जाणारा तोच. वैराटगडावर एकटा फिरणाराही तोच. आपण फक्त निमित्तमात्र. आज वासोटा. मग गोरखगड. शिवथरघळ. रामशेज. साल्हेर. सालोटा. हरगड. चावंड. धोडप. तुंग. तोरणा. कैलासगड. प्रबळगड. घनगड. रोहिडा. रतनगड. हरिश्चन्द्रगड. पाबरगड. भैरवगड. जीवधन. हडसर. भोरगिरी. सुधागड. चंद्रगड. मृगगड. सरसगड. पदरगड. हा न संपणारा डाव आहे. जिंकण्यासाठी खेळायचा नसतो. पुढे आलेल्या परिस्थितीला पुरून उरण्यासाठी खेळायचा. हार न मानता पुढे चालत रहायची जिद्द मिळवण्यासाठी खेळायचा. धडपडलं तरी परत उठून पुढे जाण्याची ताकद मिळवण्यासाठी खेळायचा. शक्ती आणि युक्तीचा योग्य वापर कुठे कसा करायचा ते शिकण्यासाठी खेळायचा. दीप्ती आणि खुशी ह्या खेळात आल्या हे किती छान. आम्हा तिघांनी केलेला हा तिसरा ट्रेक. खुशी तर ग्रुप मधे लीड ला चालते. कुठेही घाबरत नाही. अवघड जागा न धडपडता पार करते. आजच्या आमच्या वासोटा ट्रेक मधे अवघड जागा तशा नव्हत्याच. मोठा ग्रुप असल्यामुळे विशाल ने पठडीतली वाट कुठे सोडलीच नाही.
टोळीत पुढे असलेले आम्ही काही जण किल्ला उतरायला सुरुवात केली. आत्तापर्यंत सर्व ग्रुप उतरायला लागले होते. आम्हीच फक्त बाकी होतो. उतरताना वाट सोपी आहे. वर झाडांची गर्द सावली.
|
वासोटा उतरताना |
दीप्ती आणि खुशी पुढे गेल्या. मी मागे थांबलो. टोळीच्या रेंगाळणाऱ्या शेपटाला घेऊन विशाल मागून आला. एका ठिकाणी वाटेच्या बाजूला काही अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत त्या विशालने दाखवल्या.
|
अज्ञात वीरांच्या समाध्या |
कोणाच्या असतील ह्या समाध्या?
ताई तेलीण आणि
बापू गोखले ह्यांच्या युध्दात प्राण गमावलेल्या योद्धयांच्या? का १८१८ मधे झालेल्या मराठे आणि इंग्रजांच्या लढाईत हुतात्मा झालेल्या वीरांच्या?
विशाल आणखी पुढे जाऊन परिसर धुंडाळून आला. शोधाशोध करायला आज वेळ नव्हता. उतरायच्या वाटेने पुढे चालते झालो.
झरा आल्यावर थंडगार पाणी पिऊन घेतले. हा आनंद काय आहे ते घरात बसून नाही समजू शकत. शब्दात वर्णनही नाही करता येत. त्यासाठी दिवसभराची तंगडतोड करत रानोमाळ हिंडावं लागतं.
उतरून सर्व जण वन विभागाच्या ऑफिस समोर जमलो. विशाल ने पुढचा कार्यक्रम सांगितला. सकाळचेच तीन ग्रुप करून लाँच मधे बसलो.
|
ट्रेक संपला. परतीचा पाणप्रवास सुरु. |
लाँचच्या परतीच्या प्रवासात काहींनी झोपा काढल्या. काहींनी फोटोग्राफी केली. संध्याकाळच्या वेळी काही सुरेख फोटो मिळाले. पाण्यात बुडालेलं झाड.
|
लाँच मधून फोटोग्राफी |
शिवसागर तलाव आणि कोयना अभयारण्याचा परिसर.
|
लाँच मधून फोटोग्राफी |
विमानं गेल्यावर उरलेले ढगांचे पट्टे.
|
लाँच मधून फोटोग्राफी |
अर्ध्या तासापूर्वी दिसलेले ढगांचे पट्टे आता पसरले. नारायणरावांनी आजचा कारभार आटोपता घेतलेला. आणि जाता जाता ह्या ढगांच्या पट्ट्यांना रंगवलेले.
|
तेच ढगांचे पट्टे, अर्ध्या तासानंतरचे |
सहाच्या सुमारास बोटी बामणोलीला पोहोचल्या. दीड तासाचा जलप्रवास पूर्ण झाला. इथे खुशीने दीप्तीचा आणि माझा एक अप्रतिम फोटो काढला.
|
खुशीची फोटोग्राफी |
आज दिवसभरात जेवढं ट्रेकिंग झालं त्यापेक्षा जास्त फोटोग्राफी झाली.
सर्व स्वछंद गिर्यारोहक बस मधे बसल्यावर बस पुण्याच्या दिशेने निघाली. दोन्ही वेळच्या बोटीच्या प्रवासात मी झोपलो नव्हतो. आता माझा झोपायचा तास सुरु. बस मधे अंताक्षरी जी सुरु झाली ती बस पुण्यात पोहोचेपर्यंत चालू होती. त्यात हिंदी गाण्यांबरोबर मराठी गाणी, गझल, भक्तिगीतं, मनाचे श्लोक असं सर्व काही होतं. प्रवास अजून लांबला असता तर "निरमा, वॉशिंग पावडर निरमा" वगैरे जाहिराती सुध्दा ऐकायला मिळाल्या असत्या. प्रत्येक ट्रेक जसा वेगळा तशीच ट्रेक नंतरच्या परतीच्या प्रवासातली अंताक्षरीही दरवेळी वेगळी.
अकराच्या दरम्यान बस शिवाजीनगरला पोहोचली. आम्हाला पांढरे काका आणि बापूने कोकणे चौकात सोडले. आमच्या घराजवळ.
कोकणे चौकात पाव भाजी खाऊन घरी पोचलो तेव्हा सव्वा बारा होत होते. अशा प्रकारे स्वछंद गिर्यारोहकांबरोबर आणखी एक आठवणीत राहील असा ट्रेक यशस्वीरीत्या पार पडला. तुम्हालाही स्वछंद गिर्यारोहकांबरोबर ट्रेक करायचा असेल तर
ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
No comments:
Post a Comment