Friday, December 29, 2017

हरिश्चन्द्राची जत्रा

साधारण १५ वर्षापूर्वी एकदा आम्ही हरिश्चन्द्रगडावर ट्रेकिंगचा प्लॅन बनवला होता.  शाम भैय्या, श्रीजित, मी, आणि सिंग अंकल.  सिंग अंकलच्या नेतृत्वाखाली आम्ही मोहीम फत्ते करून आलो होतो.  सिंग अंकलनी पूर्ण वेळ आम्हा तिघांना उत्कृष्टपणे सांभाळून घेतले.  आम्ही सर्व शिधासामुग्री बरोबर घेऊन गेलो होतो.  रॉकेल, स्टोव्ह, भांडी, डाळ, तांदूळ, वगैरे.  जमेल तशी डाळ तांदळाची खिचडी बनवून खाल्ली.  एक गुहा साफसुफ करून त्यात झोपलो.  रात्रभर ढेकूण चावले.  घरी परतेपर्यंत आमच्या कपड्यात आणि सामानात ढेकूणच ढेकूण.  दोन दिवस चालून चालून जीव गेला.  परतीच्या चालीत तर थकल्याने माझी बडबड बंद झाली.  इतक्या महाप्रचंड गडावर ट्रेकर फक्त आम्ही चारच.  बाकी एका झापात एक धनगर आजी आजोबा आणि त्यांच्या बरोबर चार कच्ची बच्ची.  त्यांनी आम्हाला लिंबू सरबत बनवून दिलं.  बदल्यात आम्ही त्यांना आमच्याकडचं उरलेलं साहित्य दिलं.  रॉकेल, डाळ, तांदूळ.

आता परत एकदा हरिश्चन्द्रगडावर जायचा योग्य आला.  स्वछंद गिर्यारोहकांबरोबर.  १५ जणांच्या टोळीला घेऊन गेलेले राहुल आणि मी.  ह्यावेळीही आमची मोहीम फत्ते.  मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद, विशाल.

कोकणकड्यावर १७ स्वछंद गिर्यारोहक
शनिवार २३ डिसेंबरच्या रात्री ११ वाजता एक एक करत सर्वजण बसमधे जमलो.  ह्या ट्रेक मधे विशाल नसल्यामुळे बसमधून जाता येताना गाण्याचे तास झाले नाहीत.  बसच्या प्रवासात मी जमेल तशी झोप घेतली.  माळशेज घाटातून वळिवरे गावी बस साधारण साडेतीन वाजता पोहोचली.  चहा पोहे, आवरा आवरी वगैरे करून निघेपर्यंत पाच वाजले.
शेकोटी ...   अंकुशच्या कॅमेऱ्यातून
सर्वांची तोंडओळख करून घेऊन हरिश्चन्द्रगडावर नळीच्या वाटेने चढाई करण्यास सुरुवात केली.  राहुल आणि कमळू दादा पुढे, सगळ्यात मागे मी, आणि आमच्या मधे १५ जणांची टोळी.  ट्रेक संपेपर्यंत आम्ही हे फॉर्मेशन तुटू दिले नाही.

पायगाडीला सुरुवात होताच माझ्या उजव्या बुटात काटा टोचू लागला.  आधीच्या ट्रेक नंतर बूट व्यवस्थित साफसूफ न करता मी तसेच आणले होते.  हा धडा परत एकदा शिकायला मिळाला.  मी ड्रॅगनचं शेपूट असल्यामुळे (म्हणजे आमच्या १७ जणांच्या रांगेत सगळ्यात मागे) मला मोकळा वेळ असा मिळतच नव्हता.  पहिल्या विश्रांती हॉल्ट मधे वेळ मिळताच मी बूट काढून त्यात अडकलेला काटा बाहेर काढला.  “It isn’t the mountains ahead to climb that wear you out; it’s the pebble in your shoe.” हे अलींचं ब्रीदवाक्य इथे प्रत्यक्ष जगायला मिळालं. सह्याद्रीच्या बिनभिंतींच्या शाळेत असे शेकडो धडे मोफत मिळतात.  शिकण्याची इच्छा पाहिजे.

रात्रीच्या अंधारात किती चाललो ते कळत नाही आणि थकायलाही होत नाही.  पहिल्या दोन तासाची चढाई चांगल्या वेगात झाली.  सुरुवात अशी झकास झाली कि पूर्ण ट्रेक व्यवस्थित होतो.

पहाटेच्या वेळी वानरांचे आवाज जंगलात घुमत होते.  उजाडल्यावर समोर कोकणकडा दिसायला लागला.  आत्तापर्यंत बंद असलेले कॅमेरे अधे मधे सुरु झाले.

छोट्या मोठ्या दगड धोंडयांतून वर चढत गेलेली नळीची वाट

हरिश्चन्द्रगडावर जायच्या वाटांपैकी सगळ्यात कठीण वाट हि नळीची वाट.  कोकणकडा व बाजूचा डोंगर ह्यांच्या मधल्या अरुंद घळीतून गेलेली हि नळीची वाट.

एका छोट्याशा घटनेत फर्स्ट एड किट बाहेर काढावे लागले.  बाकी हा अवघड ट्रेक सर्वांनी व्यवस्थित पूर्ण केला.  तसे चालून चालून पाय सर्वांचेच थकले.

रॉक पॅच आल्यावर राहुल आणि कमळू दादाने रोप लावले.  एकेक करत सर्वांना वर घेतले.  कोणीही न धडपडता दोन्ही रॉक पॅच व्यवस्थित पार पडले.

एका रॉक पॅच ला राहुल आणि कमळू दादा एकेकाला वर घेताना
वैधानिक इशारा : नळीच्या वाटेने जाणे अवघड आहे.  प्रस्तररोहणाचे तंत्र दोन ठिकाणी वापरावेच लागते.  ह्या वाटेने कोकणकड्यावर जायला सात ते बारा तास लागतात.  योग्य तयारीनिशी व माहितगार माणसांबरोबरच ह्या मार्गाने जावे.

मधेच कुठेतरी दोन तीन वेळा दरीत दरड कोसळल्याचा आवाज उरात धडकी भरवणारा होता.

एक छोटासा फोटो ब्रेक
सर्वजण एकमेकाला मदत करत मार्ग आक्रमिला.  एकीचे बळ म्हणजे काय त्याचं उत्तम प्रात्यक्षिक.

एक अवघड वळण लीलया पार करताना स्वछंद गिर्यारोहक अंकुश तोडकर
एका मोक्याच्या जागी अंकुश आणि मी एकमेकांचे फोटो घेतले.

अगदी मोक्याच्या जागी टिपलेला फोटो ...   अंकुशच्या कॅमेऱ्यातून
पूर्ण ट्रेक मधे सर्वात मागे राहणे म्हणजे आज माझी पेशन्स टेस्ट होती.

आपण हरिश्चन्द्रगडावर जायच्या वाटांपैकी सगळ्यात कठीण वाटेने आलोय, आणि इतर वाटा ह्यापेक्षा सोप्या आहेत हे कळल्यावर एकाने मला विचारले "मग आपण ह्या वाटेने का आलोय?"  त्यावर माझे सरळ सोपे उत्तर - "खाज".

"अजून किती चढायचं राहिलंय?" ह्या प्रश्नाला माझं नेहमी एकच उत्तर - "ह्या समोरच्या डोंगराच्या पलीकडे जायचंय."

सकाळी पाचला सुरु झालेली आमची पायगाडी दुपारी बाराला कोकणकड्याच्या नयनरम्य स्टेशनवर पोहोचली.  आज आम्ही कोकणकडा खालूनही पाहिला आणि वरूनही.  पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट.  हिवाळ्यातल्या दिवसांमधलं धुरकट वातावरण आजही होतं.

कोकणकड्यावरून नजारा
अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, रौद्रभीषण कोकणकडा.  इथे इंद्रव्रज दिसणे म्हणजे दुग्धशर्करायोग.

कोकणकड्यावर आमची मनसोक्त फोटोग्राफी झाली.  आता इथे पाहतो तर बरीच गर्दी.  नळीच्या वाटेने चढून आलेले आम्हीच होतो.  पण इतर वाटांनी आलेले बरेच जण होते.

भूक आणि थकव्यामुळे आता जेवणाचे वेध लागलेले.  भास्कर दादाच्या झापात जेवणाची पंगत बसली.

भास्कर दादाच्या झापात जेवणाची पंगत
जेऊन झाल्यावर कमळू दादाला निरोप दिला.  हे महाशय आता नळीच्या वाटेने एकटे उतरून जाणार होते.  आमच्या सर्वांसाठी अशक्य कल्पना.  जंगलांच्या संगतीनं वाढलेली हि रानाची पाखरं.  ह्यांच्यासाठी हा रोजचा उद्योग.

पोटोबा भरल्यावर आता डोंगरच्या विठोबाला भेटायला निघालो.

हरिश्चन्द्रेश्वराचे दुरून दर्शन
हरिश्चन्द्रेश्वर मंदिराच्या आवारात आणि आजूबाजूच्या परिसरात बरीच गर्दी.  हरिश्चन्द्राची जत्राच भरलेली जणू.

मंदिराच्या आवारात रचलेले दगड
काही आखीव रेखीव तर काही ओबड धोबड
मंदिराच्या आवारातल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी भरून घेतलं.  जमेल तसे जमेल तितके डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेतले.

एका शिलालेखातला चक्रपाणी हा शब्द मला ओळखता आला.

हरिश्चन्द्रेश्वराचे मंदिर
जरी हा गड असला तरी महाराष्ट्रातल्या इतर डोंगरी किल्ल्यांपेक्षा बराच वेगळा.  इथे गडाला तटबंदी नाही.  चहुबाजूंच्या रौद्रभीषण कडेकपारी हेच इथलं नैसर्गिक संरक्षण.  गडाचा आकार अजस्त्र.  इथली कातळात कोरलेली बांधकामं आणि गुहा भव्य दिव्य.  हि प्राचीन देवळं, गुहा, पाण्याच्या टाक्या आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.


मंदिराच्या आवारातील पुरातन कलाकृती
चार हजार वर्षांची पौराणिक पाश्वर्भूमी लाभलेलं हे स्थान.

हरिश्चन्द्रेश्वराचं मंदिर पाहून झाल्यावर केदारेश्वराची गुहा पाहून आलो.  गुहेत कंबरभर पाणी होते.  गुहेतल्या चार खांबांपैकी एकच खांब शाबूत आहे.  अशी आख्यायिका आहे कि जेव्हा चौथा खांब तुटेल तेव्हा कलियुगाचा अंत होईल.

दारू पिने टाळा.  आनी जमलं तर एखांदं झाड लावा.
हरिश्चन्द्रेश्वराचा निरोप घेत होतो तेवढ्यात त्याने आणखी एक कलाकृती पुढ्यात मांडली.  मला ते गंडभेरुंड वाटलं.  नंतर शोध घेतल्यावर बोध झाला, ते एक कीर्तीमुख होतं.  ह्या विषयात धुंडाळताना मला सापडलेली हि उपयुक्त साईट आणि हा ब्लॉग.

कीर्तीमुख

हरिश्चन्द्रेश्वराच्या परिसरात अशा कलाकृतीपूर्ण शिळा (खरंतर कलाकृतीच) विखुरलेल्या पाहून परत एकदा तोच विचार मनात आला, "का हे असे?"   ... जगण्याची समृद्ध अडगळ?   नक्कीच नाही.  खरंतर आपल्याकडे आहे वैश्विक ज्ञानाचा वारसा.  ज्याला त्याला आपापल्या चष्म्यातून आजूबाजूचं जग दिसतं.  प्रत्येकाचा चस्मा वेगळा तसेच दृश्य वेगळे.  नव्हे दृश्य तेच पण दिसतं वेगळे.  थोडक्यात काय, जशी दृष्टी तशी सृष्टी.  असो.  बोलू आपण ह्या विषयावर कधीतरी.

गड उतरायला निघण्यापूर्वी हेड काउन्ट घेऊन राहुल ने काही सूचना दिल्या.  गड उतरून खिरेश्वर गावात पोहोचायला आम्हाला साधारण तीन ते चार तास लागणार होते.

आमच्यापैकी काहींना तारामती शिखरावर जायचं होतं.  महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी हे एक.  पण ट्रेकचं टाइम मॅनेजमेंट विचारात घेता आम्ही तिथे भेट द्यायचं टाळलं.  गणेश गुहा आणि आजूबाजूच्या इतर गुहा पाहून पुढे निघालो.

खिरेश्वर गावात उतरायची वाट नळीच्या वाटेपेक्षा बरीच सोपी.  पण उतरताना सावधगिरी बाळगणे इष्ट.  अति थकव्याने पायाखालच्या वाटेवर लक्ष न राहिल्यास घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वजण एकमेकाला साहाय्य करत उतरलो.  आम्ही उतरताना कितीतरी ग्रुप चढून येत होते.  आज नक्कीच हरिश्चन्द्राची जत्रा होती.

हरिश्चन्द्रगडावरून टोलार खिंडीकडे जाताना
टोलार खिंडीत एका ठिकाणी दगडात कोरलेले व्याघ्रशिल्प आहे असे आनंद पाळंदे ह्यांच्या एका पुस्तकात मी वाचले आहे.

वाटेत ठिकठिकाणी गावकऱ्यांनी लिंबू सरबताची दुकानं मांडलेली.  टोलार खिंडीतून उतरून खिरेश्वर ह्या पायथ्याच्या गावात पोहोचलो.  चहापानाचा कार्यक्रम उरकून बसमधे बसलो.  वाटेत एक ठीक जागा बघून खाद्य विश्रांती केली.  बसच्या पूर्ण प्रवासात मी जमेल तशी झोप काढली.  दहाच्या सुमारास शिवाजीनगरला पोहोचलो.


ट्रेक क्षितिज संस्थेच्या साईट वरून घेतलेला हरिश्चन्द्रगडाचा नकाशा
आमचा पूर्ण ट्रेक प्लॅन प्रमाणे पार पडला.  भल्या पहाटे ताजेतवाने असताना चढाई सुरु केली.  दुपारच्या कडक उन्हाने कातळकडे तापायच्या आधी दोन्ही रॉक पॅच पार केले. अवघड अशा नळीच्या वाटेने सर्वजण सुखरूपपणे कोकणकड्यावर पोहोचलो.  वेळेत जेवायला भास्कर दादाच्या झापावर पोहोचलो.  गडावर फार टंगळ मंगळ न करता गड उतरायला घेतला.  अंधार पडायच्या आत उतरून खिरेश्वर गावात पोहोचलो.

२०१७ चा शेवट तर झकास झाला.  २०१८ मधे नवीन मोहिमा करायच्या आता.  स्वछंद गिर्यारोहकांबरोबर तुम्हाला ट्रेक करायचा असल्यास ह्या साईटला भेट द्या.

Tuesday, December 12, 2017

भटकंतीच्या क्षमतेची सत्वपरीक्षा - K2S

एखाद्याच्या हृदयाचं कार्य व्यवस्थित चाललंय कि नाही ते बघायला ट्रेडमिल टेस्ट करून ECG काढतात.  अगदी तंतोतंत नाही पण ढोबळमानाने निष्कर्ष कळून जातो.  त्याचप्रमाणे पुण्यातल्या ट्रेकर्सना स्वतःच्या भटकंतीच्या क्षमतेची सत्वपरीक्षा करायची असेल तर एक उत्तम जागा आहे.  K2S म्हणून ओळखतात.  साधारण १३ किलोमीटरचे अंतर.  १६ टेकड्या चढायच्या आणि उतरायच्या.  कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून सिंहगडापर्यंत.

शनिवार ९ डिसेंबरच्या रात्री आम्हा सहा स्वछंद गिर्यारोहकांचा हा योग जमून आला.  तसे आमच्यात नवे नवखे कोणीच नव्हते.  त्यामुळे परीक्षा कोणाचीच नव्हती.  ९ च्या आसपास एक एक करत स्वारगेटला हजर झालो.  काहीजण जेऊन तर काहीजण न जेवता.

टोळके :
१. अमित
२. अमोल
३. गुरुदास 
४. प्रशांत
५. विशाल (म्होरक्या)
६. योगेश

साडेनऊच्या PMT मधे बसायला जागा मिळाली.  कात्रज बोगद्यातून बाहेर पडल्यावर बसमधून उतरलो.  आवरा आवरी करून दहाला चालायला सुरुवात झाली.  वाघजाई मंदिरा समोर खाद्य विश्रांती करून पुढे निघालो.

सर्वांचा वेग चांगला होता.  नवखे कोणीच नसल्यामुळे आजचा ट्रेक वेळेत पूर्ण होणार हा अंदाज आला.  लीड ला राहण्याच्या मोहात न पडता आज मी सर्वात मागे राहायचे ठरवले.

एकमेकाला समजून घेऊन मिळून मिसळून राहणाऱ्या अशा मंडळींबरोबर अवघड ट्रेकही सोपा होऊन जातो.

प्रशांतच्या कॅमेऱ्यातुन ...   सेल्फी टाइम
स्लो मुव्हींग ट्रॅफिक आम्ही सुरुवातीलाच मागे टाकली होती.  गप्पांमध्ये फार अडकून न पडता आम्ही चांगल्या वेगाने पुढे सरकत होतो.  गप्पांचं गुऱ्हाळ सुरु झालं कि पायगाडीचा वेग मंदावतो.  तसे रात्रभरात शेकडो विषय चघळून झाले.

रात्र जशीजशी सरत होती तशी एकेक टेकडी मागे पडत होती.

दोन ठिकाणी गाई गुरं आडोशाला बसलेली.  त्यांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण दूरपर्यंत ऐकू येत होती.  त्यांना असं रात्रभर बसण्यात काही धोका नव्हता.  कारण इथे वन्य प्राणी कोणीही नाहीत.  सध्या मनुष्य नावाच्या प्राण्याने इतर प्राणिमात्रांसाठी जागाच सोडलेली नाही.

अमितच्या कॅमेऱ्यातुन ...   निद्रादेवीच्या अधीन पुणे आणि पिंपरी चिंचवड


ह्या ट्रेक मधे रॉक पॅच कुठेच नाही.  घसाऱ्याचा (scree) त्रास फारतर एखाद्याच जागी.  काट्याकुट्यांनी भरलेल्या झाडोऱ्यातून वाट शोधावी लागत नाही.  सरळसोट पायवाटेनं चालत राहायचं.  फक्त लांडगे ज्याप्रमाणे त्यांच्या सावजाला पळून पळून थकवतात त्याप्रमाणे १६ टेकड्या आपला चालून चालून जीव काढतात.  एकेकीचा विचार केला तर ह्या टेकड्यांमध्ये फारसा दम नाही.  पण एकत्रितरित्या सर्व मिळून एक वेगळीच अनुभूती देऊन जातात.  K2S नावाची.

दहा वगैरे टेकड्या झाल्या असतील.  आता अमितचा डावा पाय दुखायला लागला.  दोन महिन्यापूर्वीच्या ऍक्सीडेन्ट नंतरचा त्याचा हा पहिलाच मोठा ट्रेक.  इथून पुढे अमित बसला कि आमचा छोटा ब्रेक.  असे करत करत सिंहगडच्या गाडीरस्त्याला लागलो.  इथून गडावर जायला काही मिळते का हा आमचा शोध लवकरच संपला.  एक जीपवाला खाली आला आम्हाला शोधत.  वर जाणाऱ्या एका रिक्षाने त्याला सांगितले होते.  जीपमधून सिंहगड गाठला.  गेल्या पाच सहा वर्षात मी इकडे फिरकलेलो नव्हतो.  ह्या परिसरातले मागच्या तीसेक वर्षातले बदल डोळ्यासमोर तरळून गेले.  दुसरीत असताना इथे पहिल्यांदा आलो होतो.

बोचऱ्या थंडीने परिसराचा ताबा घेतलेला.  सूर्योदय अजून व्हायचा होता.  पण पुणेकर त्याआधीच सिंहगडावर पोहोचलेले.  सिंहगड - इतिहास - पर्यटन - पुणे - ह्या गोष्टींबद्दल न बोललेलंच बरं.  तसं वेगवेगळे बघितले तर चारही विषय उत्तम आहेत.  पण मला इथे काय म्हणायचंय ते तुम्हाला कळलं असेलच.  सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

सिंहगडावरून पाहताना ...   आम्ही चालून आलो त्या १६ टेकड्या

आम्ही थांबलो ती जागा सूर्योदय पाहण्यासाठी एकदम मोक्याची होती.  प्रशांत आणि अमितने त्यांच्या लेन्सच्या कॅमेऱ्यांमधून सूर्योदय टिपला.  सूर्यदेवाचे आगमन झाल्यानंतर हळूहळू थंडीने काढता पाय घेतला.  त्या वेळी परिसरातल्या सर्व जनमानसात आम्ही सहा जण वेगळे दिसत असू.  भल्या पहाटेच पूर्णपणे थकलेले, झोपाळलेले.

गडावर फिरून यायचा आमचा बेत होता.  अमितने दुखऱ्या पायामुळे त्यातून माघार घेतली.  मग इतरांनीही तो विचार सोडून दिला.

प्रशांतच्या कॅमेऱ्यातुन ...   सूर्योदयाची केशरी उधळण
K2S जिंकलेल्या आम्हा सहा जणांनी आता पावलं उचलेनात.  नरवीर सिंहाचा गड समोर उभा ठाकलेला.  माझ्या राजाच्या शब्दाखातर मी रात्रीत घोरपडीमागून चढलो.  छाती फुटेस्तोवर उदेभानाचे घाव झेलले.  कल्याण दरवाजात उभे राहून बघा ४ फेब्रुवारी १६७० ची ती रात्र आठवते का.

सिंहगडावरची न्याहारी - कांदाभजी आणि भाकरी भरीत

जीपवाल्याचा शोध घेऊन त्याला पाचारण करण्यात आले.  जीपमधून गडाच्या पायथ्याला पोहोचलो.  रात्रीप्रमाणे दिवसाही आमचे नशीब चांगले होते.  काही मिनिटातच बस आली.  स्वारगेट येईपर्यंत बस मधे जमेल तशा डुलक्या घेतल्या.  झोपेचा खूप मोठा साठा बाकी होता.  पुढचा स्वारगेट ते पिंपळे सौदागर प्रवासही बसमधे डुलक्या काढण्यात गेला.  बस स्टॉप पासून घरी जाणं हे एक वेगळेच प्रकरण ठरले.  पाय थकले नव्हते, पण निद्रादेवीचा कोप होतो कि काय असे वाटायला लागले.  रविवारच्या दिवसभरात झोप हा एकच विषय.  पण K2S व्यवस्थितरित्या खिशात घातल्याचे समाधान त्यापेक्षा जास्त.

कधीतरी असं reset बटण दाबणं फार उपयुक्त असतं.  मग रोजचं रहाटगाडं ओढायला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात.

Friday, December 8, 2017

रायलिंग पठार, उपांड्या घाट, आणि मढे घाट - एक स्वछंद गिरिभ्रमंती

वृश्चिक संक्रांतीच्या पुण्य मुहूर्तावर (फिरंगी कालगणनेनुसार १६ नोव्हेंबरच्या सकाळी) कैलासगड आणि जमलं तर घनगड पदरात पाडुन घ्यायचा बेत ठरवला.  माझा दिवस साडेचार वाजता उजाडला.  राहुल उठल्याची खातरजमा करून त्याच्या घराकडे कूच केले.  पुढे विशाल आणि यज्ञेशना उचलेपर्यंत घड्याळाचे काटे सहा पर्यंत पोहोचले.  चौघं गाडीत स्थिरावल्यावर प्लॅन मे चेंज, कैलासगड च्या ऐवजी उपांड्या घाट आणि मढे घाट करायचे ठरले.

आजचे स्वछंद गिर्यारोहक :
१. राहुल आवटे
२. विशाल काकडे
३. यज्ञेश गंद्रे
४. योगेश सावंत

आजचा पहिला प्रश्न होता पोटाची खळगी भरण्याचा.  एवढ्या सकाळी कुठेच काही मिळणार नव्हते.  गाडी पुण्यनगरीपासून दूर जाताना विशालने काकांना फोन करून तो प्रश्न सोडवला.  साडेसातला आम्ही मिसळीवर ताव मारत होतो.  काकांना जेवणाची ऑर्डर देऊन मार्गस्थ झालो रायलिंग पठाराच्या दिशेने.  सिंगापूरच्या वाटेने पुढे जात गुगल मॅप ने दाखवलेल्या लिंगाणा पार्किंग ह्या ठिकाणापर्यंत गाडी दामटवली.  विशाल आणि यज्ञेशला ह्या भागातले सर्व रस्ते पाठ.  गावातल्या एका माणसाच्या सांगण्याप्रमाणे एका ठिकाणी गाडी लावून दिली.  आमच्या भोवती आजूबाजूची आठ दहा पोरं गोळा झाली.  आपल्या गावात हे कोण आलंय बघायला.

पायगाडीला सुरुवात झाल्याझाल्या यज्ञेश आणि विशालने वेग पकडला.  रायलिंग पठार हे प्रकरण मला नवीन होतं.  सह्याद्रीच्या खडकाळ माळरानात जमतील तिथं झाडं झुडुपं आणि इतर ठिकाणी सुकलेलं रानगवत.  मधेच कुठेतरी काटेरी.  वाट शोधायला यज्ञेश आणि विशाल पुढे, आणि त्यांच्या मागून राहुल आणि मी.  समोर लिंगाणा दिसायला लागल्यावर पावलं झपाझप पडली नाहीत तर नवल.

रायलिंग पठारावरून समोर रायगडाचा रखवालदार लिंगाणा
उजवीकडे लांबवर दुर्ग दुर्गेश्वर रायगड
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरच्या ह्या पठाराला रायलिंग का म्हणतात त्याचे उत्तर इथून समोरच दिसते.  समोर उभा अजोड अभेद्य लिंगाणा आणि लांबवर दुर्ग दुर्गेश्वर रायगड.

लिंगाण्यावर जायची वाट आणि खडकात कोरलेल्या गुहा इथून दिसल्या.  जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी १६४८ मधे लिंगाणा किल्ला बांधून घेतला.  इथल्या गुहांमध्ये कैदी ठेवले जात.  १८१८ साली ब्रिटिशांनी लिंगाणा घेतल्यावर इथे जायच्या पायऱ्या, सदर, बुरुज, दरवाजे, तटबंदी सर्व काही उध्वस्त केले.  सध्या लिंगाण्यावर जाण्यासाठी प्रस्तररोहणाचे तंत्र वापरण्याला पर्याय नाही.  दुरूनही अंदाज येतो - लिंगाण्यावर पोहोचण्याचा मार्ग जितका अवघड तितकाच वर पोहोचल्यावरचा आनंद त्रिशतकी असेल.

लिंगाण्याचं दुरून दर्शन
इथे किती वेळ थांबलं तरी मन भरत नव्हतं आणि चला आता म्हणायला कोणीच तयार नव्हतं.  दिवसभरात उपांड्या घाट आणि मढे घाट करायचा असल्यामुळे कसेबसे परत फिरलो.

थोड्या अंतरावर बोराट्याची नाळ खुणावत होती.  यज्ञेशचा विचार होता थोडं पुढे जाऊन यायचा.  विशालने दूरदृष्टीने तो हणून पाडला.  बोराट्याच्या नाळेला दुरून नमस्कार करून पुढे निघालो.

बोराट्याच्या नाळेला दुरून नमस्कार


आमची परत जातानाची वाट आलेल्या वाटेपेक्षा वेगळी होती.  पुन्हा एकदा विशाल आणि यज्ञेश वाट शोधायला, तर राहुल आणि मी त्यांच्या मागून.  विशाल आणि यज्ञेशचं वाटा शोधण्याचं तंत्र अचूक होतं.  तरीपण काही वेळा काटेरी रानातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.  अंदाज घेत घेत, काही ठिकाणी गर्द झाडीतून मार्ग काढत पुढे जात होतो.  एका ठिकाणी येऊन बोध झाला - आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय जिथून पुढे जाण्यासाठी गर्द झाडीने भरलेला चढ चढायचा आहे.  परत मागे जाण्याचा पर्याय योग्य नव्हता.  वेळ, पाणी, आणि शक्तीचा विचार करता.  जमेल तसे पुढे सरकत राहिलो.  चढून आल्यावर मागे वळून पहिले - आपण कुठून वर आलोय ते.

अशा ठिकाणी वर चढून येणं जितकं बोचरं त्रासदायक तितकंच वर पोहोचल्यावरचं समाधान स्फुर्तीदायक
कपड्यांवर अडकलेले काटेकुटे काढून काढून थकलो.  यज्ञेशने तर तो प्रयत्नच सोडून दिला.

विशाल आणि यज्ञेशच्या बिनतोड दिशाज्ञानाने गाडीची जागा अचूक हेरली.  आता आमची गाडी निघाली उपांड्या घाटाकडे.  राहुलने गाडी चालवून मला आराम दिला.  तसेच ऑटोमोबाईल इंजिनीरिंग ह्या विषयी राहुलकडून आम्हाला काही ज्ञान प्राप्ती झाली.

रस्ते कसेही असले तरी २०५ मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्स आणि रुंद टायरची निसान टेरॅनो सर्व जागी पोहोचते.  गावातल्या शाळेचं आवार ही पार्किंगसाठी योग्य जागा.

पार्किंगसाठी योग्य जागा - गावातल्या शाळेचं आवार
काही शेतं पार करून उपांड्या घाटाच्या दिशेने निघालो.  वाटेत एक शांत जागा पाहून खाद्य विश्रांती साठी थांबलो.  जेवणाची वेळ झाली होती.  पण आम्ही जेवणार होतो उपांड्या घाट उतरून आणि मढे घाट चढून वर आल्यावर.

खाद्य विश्रांती साठी निवडलेली जागा

उपांड्या घाटाच्या सुरुवातीपासून बऱ्याच अंतरापर्यंत एक लोखंडी पाईप आहे.  हा वापरात नाही.  कधी काळी वापरात असावा खालच्या गावात पाणी पुरवण्यासाठी.

उपांड्या घाटाची सुरुवात

घाटाची उतरण सुरु झाल्यावर राहुल आणि मी वेग वाढवला.  एकच वाट उतरत जात असल्यामुळे चुकायचा प्रश्नच नव्हता.  विशाल आणि यज्ञेशने गप्पांचा गियर टाकलेला.


उपांड्या घाटातून दिसलेलं पठार आणि पलीकडे दरी
अर्ध्या तासात आम्ही घाट उतरून खालच्या पठारावर पोहोचलो.  आता उजवीकडे वळत पुढे जाऊन मढे घाटाची वाट शोधायची होती.

खालच्या पठारावरून दिसलेला उपांड्या घाट व मढे घाट
गावातून पुढे गेल्यावर एक झरा आहे.  तो झरा ओलांडल्यावर मढे घाटाची वाट आहे - इति यज्ञेश आणि विशाल.  वाट शोधताना परत यज्ञेश आणि विशाल पुढे, आणि त्यांच्या मागून राहुल आणि मी.


स्वछंद गिर्यारोहक यज्ञेश गंद्रे
अशा सुकलेल्या गवतात फोटो छान येतात हे मला महाबळेश्वरच्या परिसरात फिरून माहिती आहे.  उपांड्या घाट उतरल्यानंतर तासभर आम्ही ह्या सपाट वाटेने भटकत होतो.

वाटेशेजारी एक मंदिर दिसले.  मंदिराच्या आवारात कोंबडीचा नेवैद्य झाल्याच्या खुणा होत्या.  एका तुटलेल्या वीरगळीचा वरचा भाग, एका भंगलेल्या मूर्तीचा वरचा भाग मंदिराच्या आवारात विखुरलेले.

भंगलेल्या आणि तुटलेल्या मूर्ती बघताना एक गोष्ट कळते ती म्हणजे शिवाजी या नावाला एवढे महत्व का दिले जाते ते...
काय माहिती आज या मूर्तीचा एवढातरी भाग पाहायला मिळाला असता की नाही ते...
-- शंतनू परांजपे
मंदिराच्या बाजूने पुढे निघालो तोच एक दर्शनाला आलेले कुटुंब भेटले.  आरामात घरी बसायचं सोडून आम्ही इथे का भटकतोय हा त्यांचा साधा सोपा प्रश्न.  त्यांच्या प्रश्नाला जमेल तसं उत्तर देऊन, पुढची वाट विचारून, आम्ही मार्गस्त झालो.  थोडं पुढे एक वीरगळ दिसली.  आम्हाला अर्थबोध काही झाला नाही.

वीरगळ
पुढे वाट झाडाझुडूपात हरवत चाललेली.  एका ठिकाणी झरा लागला, पण आम्ही झरा ओलांडण्याचा योग्य ठिकाणी आलेलो नव्हतो.  विशाल आणि यज्ञेशच्या सल्ला मसलतीतून निर्णय झाला - इथे वाटा हुडकत  भटकण्यापेक्षा परत त्या देवळापर्यंत मागे फिरून तिथून योग्य वाट शोधावी.  त्याप्रमाणे देवळापर्यंत येऊन आमची वाट शोधायला सुरुवात.  नंतर लक्षात आले - आम्ही त्या देवळाकडे आणि त्याच्या पलीकडच्या भागात उगाच शिरलो होतो.  देवळाकडे न वळता आणखी सरळ गेलो असतो तर योग्य वाटेने झरा गाठला असता.  पण रानातल्या अशा वाटा शोधण्याचा आनंद काही औरच.  सरळ सोप्या वहिवाटेवर तो कसा मिळायचा.

झरा पार करून मढे घाटाची वाट पकडली.  घाट सुरु झाल्यावर चुकण्याचा प्रश्न नव्हताच.  आता राहुल आणि मी वेग वाढवला.  आज आम्ही दोघं मारुतीरायाला नमस्कार करून आलो होतो.  तर यज्ञेश आणि विशालने घाट चढता उतरताना महिनाभराच्या राहिलेल्या गप्पा संपवल्या.  मढे घाट चढून आल्यावर धबधबा दिसला.

थोडंसं इतिहासात डोकावताना...   का म्हणतात ह्याला मढे घाट
४ फेब्रुवारी १६७० ची रात्र.  नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, आणि सातशे मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.  कोंढाणा स्वराज्यात आणला.  पण ह्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.  त्यांची अंत्ययात्रा ज्या घाटातून त्यांच्या उमरठ गावी नेली, तो हा मढे घाट.

मढे घाटाच्या सुरुवातीचा धबधबा
मढे घाटाच्या वरपासून धबधब्यापर्यंत सगळीकडे आचरट पर्यटकांनी केलेला विचकट कचरा.  असो.  एकविसावं शतक हे प्लास्टिकचं आणि कचऱ्याचं आहे.

पावणे पाचला गाडीजवळ पोहोचलो.  आता पोटातले कावळे वरून काहीतरी मोठं पडण्याची आशा करून बसलेले.  सकाळपासून त्यांना फक्त जिवंत ठेवण्यापुरता खुराक दिला होता आम्ही वेळोवेळी.

जाताना एका ठिकाणी थांबून तोरण्याचे फोटो काढले.

गरुडाचं घरटं ... किल्ले तोरणा
इथे रस्त्याला वर्दळ फारशी नाही.  पण रस्ता मात्र सुरेख सुंदर गुळगुळीत.  का ते थोड्या नंतर कळले.  बारामतीच्या एका शेतकरी बाईंनी इथे भरपूर जमीन घेतली आहे.  विकत कि कशी ते कळू शकले नाही.  त्यामुळे रस्त्याचा एकदम कायापालट झालाय.

गुंजवणे धरणाच्या परिसरात आल्यावर गाडी थांबवावीच लागली.


गुंजवणे धरणाच्या परिसरातला नितांत सुंदर सूर्यास्त
काकांच्या हॉटेलात तुडुंब जेवलो.

पुण्यनगरीत परतताना एक सापप्रसंग घडला.  झाले असे कि एका वळणानंतर अचानक समोर नक्षीदार अंगाचा मजबूत साप.  रस्ता सपाट गुळगुळीत आणि वर्दळ फारशी नाही.  त्यामुळे गाडी वेगात चाललेली.  त्याला मी गाडीच्या चाकांच्या मधे घेतला जेणेकरून कोणतं चाक त्याच्यावरून जाणार नाही.  माझ्या बाजूला डुलक्या काढत असलेल्या राहुलला सापाचा पत्ताच नव्हता.  पण माझ्या मागच्या सीट वर बसलेल्या यज्ञेशने साप अचूक ओळखला.  त्याचं म्हणणं एकच - तू गाडी थांबव.  आणि मी त्याला परत परत सांगतोय - अरे मी नाही त्याला मारला, मी त्याला मधे घेतला गाडीच्या चाकांच्या.  यज्ञेश, विशाल, आणि राहुल गाडीतून उतरून बघून आले.  साप पळून गेला होता.  माझ्यासाठी एकच चांगली गोष्ट झाली - मी त्याला मारलेलं नाही हे स्पष्ट झालं ज्याअर्थी तो पळून गेला होता.

नंतर यज्ञेशने सापांविषयी आमच्या ज्ञानात बरीच भर घातली.

अशा रीतीने दिवसभराची स्वछंद गिरिभ्रमणाची मेजवानी लुटून घरी परतलो.