Friday, September 29, 2017

माझा आवडता किल्ला - तिकोना

आजचा निबंध आहे माझा आवडता किल्ला - तिकोना.

तुम्ही कॉलेज बुडवून सिंहगडला गेलायत का?  गेला नसाल तर तो एक वेगळा विषय आहे.  आणि ऑफिस बुडवून तिकोनाला?  कशी वाटली आयडिया?

आज पहाटे ४:४५ ला उठून दुर्गा टेकडी वर १ तास हिल रनिंग झकास झाले.  नवरात्रीमुळे बऱ्यापैकी वर्दळ होती.  थोडंफार धुकं पण होतं.

ऑफिसला न जाता माझ्या आवडत्या तिकोना किल्ल्याला जायचं ठरवलं.  हा माझ्या घरापासूनचा सगळ्यात जवळचा किल्ला आहे.  फारशी गर्दी नसते.  त्यामुळे कचरा पण नाही.  चढायला सोपा.  बालेकिल्ल्यावरून चहुबाजूंचे विहंगम दृश्य दिसते.  इंद्रवज्र दिसण्याइतका मी अजून भाग्यवान नाही.  आम्हाला एकदा धुक्यात पडलेली आमचीच सावली दिसलीये.  अर्ध्या दिवसात तिकोनाची मस्त भटकंती होते.  भल्या पहाटे गेलो आणि वेळ असेल, तर वाटेत बेडसे लेण्यांसमोरून सूर्योदय पाहण्याचा स्टॉपही भारी होतो.

हौशी आणि नवख्या ट्रेकर्ससाठी सावधानतेचा इशारा - परिसराची योग्य माहिती करून घेतल्याशिवाय आणि काटेकोर प्लॅन बनवल्याशिवाय एकट्याने गिरिभ्रमण (solo trek) करणे धोक्याचे ठरू शकते.  साहसाला सावधतेची जोड असावी.

घरून निघालो तेव्हा १० वाजून गेले होते.  जुन्या मुंबई-पुणे रस्त्याचे सकाळचे mixed veg ट्रॅफिक कामशेत पर्यंत भरभरून खाल्ले.  Mixed veg म्हणजे पायी चालणार्यांपासून २० चाकी ट्रेलरपर्यंत सर्व काही असते त्यात.  कामशेतला लेफ्ट टर्न घेतल्यानंतर ट्रॅफिक हळूहळू कमी होत गेले.  घरून निघाल्यापासून दीड तासात तिकोना पेठ ह्या पायथ्याच्या गावी पोहोचलो.  खिंडीत गाडी पार्क केली.

ह्याच्या विशिष्ट आकारामुळे तिकोना उर्फ वितंडगड दुरूनही ओळखू येतो.  त्रिकोणी आकाराच्या डोंगरावर आणखी एक छोटा त्रिकोण बसवलेला.

पायथ्याच्या तिकोना पेठ गावामधून दिसणारा तिकोना किल्ला

पाऊस नुकताच संपत आलाय.  त्यामुळे झाडोरा भरपूर असणार.  नेहमीच्या वाटेनेच जायचे ठरवले.  ह्या दिवसात वहिवाट सोडू नये.  नव्या वाटा आणि परिसर धुंडाळायला उन्हाळा चांगला.  खिंडीपासून आल्या रस्त्याने चालत गेलो जिथून किल्ल्यावर जायची वाट सुरु होते.

रस्त्याच्या कडेला अधेमधे बहरलेली रानफुले

सुरुवातीचा चढ संपल्यावर चौकात पोहोचलो.  चौकात म्हणजे ह्या ठिकाणी चार वाटा येऊन मिळतात.  म्हणून मी ह्याला चौक म्हणतो.  चढून आल्यानंतर किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडे वळावे.  डावीकडची वाट झाडोऱ्यानी भरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून घळीत उतरते, जिथे मी गाडी पार्क केली.  चौकातून सरळ गेलो तर डोंगराच्या कडेने गेलेली वाट सातवाहन कालीन गुहांपर्यंत पोहोचवते.  ही गुहांपर्यंत जाणारी वाट गच्च झाडोऱ्यानी भरलेली होती.  इकडे उन्हाळ्यातच जाणे बरे.  मी उजवीकडची किल्ल्यावर जाणारी वाट पकडली.

चौकापासून दोनच मिनिटात एक प्राचीन काळची चेकपोस्ट लागते.  गडावर जाणाऱ्या वाटेवरील पहिली तपासणीची जागा.  आजूबाजूच्या परिसरातील निरोपांची गडावर देवाण घेवाण करण्याचे केंद्र.  तसेच  गडावरील होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण.  सध्या फक्त दगडी चौथरे उरलेत.

डोंगराच्या सोंडेवरून किल्ल्यावर जाणारी वाट
डोंगराच्या पलीकडच्या बाजूने माकडांचा आवाज आला.  ह्या सातवाहन कालीन गुहांच्या बाजूला घनदाट रान आहे.

पावसाळा संपून उन्हं पडू लागल्याने रानफुलांचा बहर जोमात होता.  पहिल्या चेकपोस्ट पासून डोंराच्या धारेने चढत गेल्यावर दहा मिनिटात एका छोटेखानी पण अभेद्य भासणाऱ्या दरवाजापाशी पाशी पोहोचलो.  निळ्या ड्रेसमधले श्री. मोहोळ आज स्वागताला हजर नव्हते.  नेहमी हसतमुख चेहेऱ्याने स्वागत करून प्रत्येकाला गुळ-पाणी देणार.

डोंगरात खोदून काढलेला दरवाजा
डोंगरात खोदून काढलेल्या पहिल्या दरवाजापासून पाचच मिनिटात येतो गडाचा दुसरा वेताळ दरवाजा.  दरवाजाच्या दोन्ही बाजूला छोटेखानी बुरुज.  बुरुज व्यवस्थित आहेत, पण जागा मिळेल तशी झाडंझुडुपं वाढलेली.

वेताळ दरवाजाच्या बाजूचे छोटेखानी बुरुज

दरवाजातून आत गेल्यावर मोकळी जागा आहे.  पहारेकर्यांच्या खोल्यांचे फक्त दगडी जोते शिल्लक आहेत.   वेताळेश्वर मंदिराचे अवशेष म्हणजे जमिनीवरचे काही शेंदूर लावलेले दगड वगैरे.  इथल्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण झालेलं दिसतंय ह्या वर्षी.

जवळच्या एखाद्या गावातली सात आठ पोरं किल्ल्यावरून बोंबलत खाली आली.  शनिवार रविवारी येणारे पुण्या-मुंबई चे हौशी ट्रेकर्स आज नव्हते.

हा बुरुज म्हणजे डोंगराच्या सोंडेवरून येणाऱ्या वाटेवर लक्ष्य ठेवण्यासाठी उत्तम जागा
इथल्या आजच्या परिस्थितीवरून गतकाळचे वैभव ओळखणे अवघड आहे.  वेताळ दरवाजापासून पुढे गेल्यावर पाच मिनिटात भेटला चपटदान मारुती.  दगडात कोरलेली मारुतीची पंधरा फुटी मूर्ती.  एका पायाखाली राक्षसाला दाबून त्याला चपट दान देणारा मारुती.

वरच्या बाजूला काही आवाज येत होते.  काय आहे ते बघायला तिकडे गेलो.  दोन्ही मोहोळ बंधू मिळून भर उन्हात श्रमदान करत होते.  एका घराच्या जोत्याची डागडुजी.

पुढच्या पाच मिनिटात पोहोचलो ती जागा आहे श्रीरामाची गादी.  इथे श्रीरामाचे मंदिर होते.  परिसरातील राज्यकारभार चालवण्यासाठी सदर होती.  श्रीरामाच्या पादुका गादीवर ठेऊन राज्यकारभार चालवला जात असे.  आज दोन्ही वास्तु अस्तित्वात नाहीत.  तसे राज्यकर्तेही अस्तित्वात नाहीत.

इथून पुढे डावीकडील पायऱ्यांची वाट बालेकिल्ल्यावर जाते.  उजवीकडील वाटेने उतरून गेल्यावर महादरवाजा आहे.  मी नेहमी आधी महादरवाजा बघून मग बालेकिल्ल्यावर जातो.

बालेकिल्ल्यावर जाणारी डावीकडील पायऱ्यांची वाट
उजवीकडची वाट उतरून महादरवाजाकडे जाते
महादरवाजाला जाणाऱ्या वाटेवर भरपूर झाडं आणि भरपूर सावली आहे.  किल्ल्यावर येणारे बरेचजण महादरवाजापाशी येतच नाहीत.  फक्त बालेकिल्ल्यावर जातात.  पहिल्या वेळेस माझेही असेच झाले होते.  आता बोर्ड लावल्यामुळे नव्याने येणाऱ्या गिरीप्रेमींना फायदा होत असेल.

झाडांच्या सावलीत महादरवाजाकडे उतरत जाणारी वाट
पाच मिनिटात महादरवाजापाशी पोहोचलो.  इथे काही घरांची जोती, किल्ल्याचा मुख्य दरवाजा, आणि चोर दरवाजा आहेत.  किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित आहे.

मुख्य दरवाजातून समोर पायथ्याचे तिकोना-पेठ गाव आणि मळवंडी धरणाचा जलाशय दिसतो.  ह्यावर्षी पाऊस दमदार झाल्यामुळे परिसर हिरवागार, आणि मळवंडी धरणात पाणी भरभरून साठलेलं.

किल्ल्याचा मुख्य दरवाजा
जुन्या काळी हा मार्ग प्रचलित होता.  सध्या इथून किल्ला उतरणे किंवा चढणे अशक्य.  दरवाजाच्या बाहेर फक्त चार पायऱ्या आहेत.  त्यांच्या पलीकडे गच्च झाडोरा आणि तीव्र उतार.  कित्येक वर्षे वापरात नसल्याने वाट नाहीशी झालेली आहे.

मुख्य दरवाजाच्या बाहेरचा गच्च झाडोरा
समोर पायथ्याचे तिकोना पेठ गाव आणि मळवंडी धरणाचा जलाशय
उन्हाळ्यात झाडोरा नसताना मला इथे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसल्यायत.

मुख्य दरवाजाच्या बाजूला एक छोटासा चोर दरवाजा आहे.  बहुदा पूर्वीच्या काळी लाकडी दार असावे.

मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेला चोर दरवाजा
इथून परतलो आलेल्या जागी - श्रीरामाची गादी.  सध्या इथल्या गुहेत एक साधूबाबा वास्तव्यास आहेत.
आता पायऱ्यांच्या वाटेने बालेकिल्ल्यावर चढाई.  भर दुपारच्या उन्हात झाडांच्या सावल्या मिळण्यासारखं सुख नाही.

पायऱ्यांच्या वाटेने बालेकिल्ल्यावर चढाई
पाच मिनिटात चुन्याच्या घाण्यापाशी पोहोचलो.  पूर्वीच्या काळचे सिमेंट बनवण्याची हि जागा.  इथे बनवलेल्या मिश्रणाचा उपयोग बांधकामात होत असे.

चुन्याचा घाणा
इथून पुढे तिकोना त्याचे अविष्कार दाखवायला सुरुवात करतो.  सर्वप्रथम दिसतात खडकातल्या भल्यामोठ्या आणि तीव्र चढाच्या पायऱ्या आणि वर भक्कम बुरुज.  पावसाच्या दिवसात पाण्यामुळे ह्या पायऱ्या जास्तच अवघड बनतात.  कोण्या गिरीप्रेमी मित्रांनी लावलेल्या रोपची खूपच मदत होते.

खडकातल्या भल्यामोठ्या आणि तीव्र चढाच्या पायऱ्या
पायऱ्या चढून वर गेलो कि समोर येते भरभक्कम तटबंदी आणि त्यातला दरवाजा.  दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक खडकात कोरलेलं भलंमोट्ठ पाण्याचं टाकं आणि त्याच्या वर राहण्यासाठी जागा.  पाण्याच्या कुबट वासामुळे फार वेळ इथे थांबता येत नाही.  पाणी ओलांडून पलीकडच्या जागेत कसं जायचं ते काही मला अजून उमगलं नाहीये.

खडकात कोरलेलं पाण्याचं टाकं आणि वर राहण्यासाठी जागा
तटबंदीतल्या दरवाजातून आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला आहे टेहळणीचा बुरुज.  इथे एका बाजूने तुंग खुणावत राहतो.  इकडे कधी येतोयस.  का नेहमीप्रमाणे तिकोनावरूनच माघारी.

इथून वर जाण्यासाठी परत मोठमोठ्या तीव्र चढाच्या पायऱ्या.  चढताना डाव्या बाजूला बांधलेला उंच बुरुज.  कोण होता ह्या सगळ्याचा आर्किटेक्ट.  कसं बांधलं असेल हे सगळं.  PWD ला तासभर मुस्काडून काढण्यागत बांधकाम.  आज शेकडो वर्षे सह्याद्रीतील सोलपटवणारे ऊन पाऊस झेलुनही त्याच आवेशात उभे.

पायऱ्या चढून गेल्यावर मागे वळून पाहताना
इथे खडकात खोदलेल्या काही गुहा आणि पाण्याची टाकं आहेत.  सध्या गडावरील कुठल्याच टाक्यातले पाणी पिण्यायोग्य नाही.

इथला छोटेखानी पण अभेद्य भासणारा परिसर हा एक उत्तम टेहळणीचा किल्ला असल्याची साक्ष देतात.

उंच बुरुज - टेहळणीसाठी उत्तम जागा
शेवटच्या काही पायऱ्या चढून बालेकिल्ल्यावर पोहोचलो.  तटबंदीच्या कडेकडेने चालत गेलो.  एक छोटा साप तटबंदीवर ऊन खात पहुडला होता.  मी तिथे पोहोचल्याचे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते.  आणि माझ्याही.  तो सुर्र्कन पळाल्यावर मला दिसला.

तटबंदीतल्या खिडकीतून दिसणारा नजारा

इथल्या आठ दहा उंच पायऱ्या चढून बालेकिल्ल्याच्या वरच्या भागात पोहोचलो.  इथे त्रंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे.  मंदिरासमोर दोन दगडी नंदी आणि एक शिवलिंग ठेवले आहे.

मंदिरासमोरील नंदी आणि शिवलिंग
कडेला एका घराचे जोते शिल्लक आहे.  आज वारा पडलेला होता.  त्यामुळे ऊन चांगलंच जाणवत होतं.  पहिला पाणी ब्रेक थेट बालेकिल्ल्यावरच केला.

बालेकिल्ल्यावरील घराचे जोते

बालेकिल्ल्यावर एक बांधीव तलाव आहे.  हिरव्या पाण्याने भरलेला.  हा तलाव पाहून मला नेहमी संदीप खरेंचं बूमबूमबा गाणं आठवतं.  ...पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप

बालेकिल्ल्यावरील पाण्याचा तलाव
ह्या परिसरातल्या प्राचीन घाटवाटांवर लक्ष्य ठेवण्यासाठी तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले बांधले गेले.  पवना धरणाच्या पाणीसाठ्याने तीन बाजूंनी वेढलेला तुंग दुरूनही ओळखता येतो.  काहीजण तुंग आणि तिकोना असा दोन्हीचा ट्रेक करतात म्हणे.  तिकोन्याच्या पायथ्याशी पोहोचणे सोपे आहे. तुंगचा पायथा गाठायचा म्हणजे पवना धरणाच्या जलाशयाला वळसा घालून जायचे.  दूरचा प्रवास.  काही वर्षांपूर्वीपर्यंत धरणाच्या जलाशयातून लाँचने पलीकडे जाता येत असे.  आता रस्ता झाल्याने आणि मागणीअभावी लाँचची सेवा बंद पडली.

बालेकिल्ल्यावरून दिसणारा परिसर
पवना धरणाचा पाणीसाठा
दूरवर धुक्यात हरवलेला तुंग
किल्ल्याच्या तटबंदीवर फुललेली सोनकीची फुले

शिवरायांच्या काळात ह्या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख करण्यासाठी होत असे.

औरंगाबाद, अहमदनगर, हैदराबाद अशा सपाट प्रदेशात गनिमांनी रियासती चालवल्या.  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मात्र त्यांना शूर मावळ्यांनी कापून काढले.  किल्ला बांधावा तर असा.  आणि सैन्य जमवावं तर असं.  शे दीडशे मावळ्यांनी हजारभर गनिमांना वर्षभर झुंजवत ठेवावं.

तिकोनाच्या तटबंदीवरुन
आल्या मार्गाने साधारण ४५ मिनिटात किल्ला उतरून आलो.  दुपारच्या उन्हात पळण्याचा प्रश्नच नव्हता.  सकाळच्या आल्हाददायक वातावरणात जमेल तिथे मी पळत खाली उतरलोय.

उतरल्यावर खिंडीकडे वाटचाल.  वाटेत एक तुटलेले झाड दिसले.  का तुटले असेल.  वीज कडाडून, का मनुष्यप्राण्याचे काम.

तुटलेले झाड
खिंडीत पोहोचल्यावर दुसरा पाणी ब्रेक घेतला.  पुढे काय?  लगेच घरी जाण्यापेक्षा एखादी नवीन जागा बघण्याइतका वेळ होता.  घरून निघण्याआधी गुगल मॅप मध्ये आजूबाजूचा परिसर बघून ठेवला होता.  मुंबई-पुणे महामार्गाच्या जवळची एक नवीन टेकडी मनात होती.  पण इतकी सुंदर भटकंती झाल्यानंतर महामार्गाच्या बाजूला परत जायला मन होत नव्हते.  खिंडीपर्यंत पोहोचणारा हा रस्ता पुढे कुठपर्यंत जातो ते पाहायचे ठरवले.

खिंडीपासून पुढे कुठेतरी जाणारा रस्ता
माणसे, वाहने नसलेल्या ह्या रस्त्याला फक्त पक्ष्यांचे आणि कीटकांचे आवाज.  ऊन काही कमी होत नव्हते.  फारसा चढ उतार न करता वाट एका लयीत चाललेली.

पूर्णपणे वर्दळ विरहित कच्चा रस्ता

दहा मिनिटांनी आडबाजूला असलेले एक फार्महाऊस दिसले.  रस्त्याने पुढे चालत राहिलो.  इकडे प्राणी कोणी असण्याची शक्यता नाहीच.  सरडे बरेच दिसले.  विविध पक्ष्यांचे आवाज चालू होते.  मला त्यातला एकही ओळखता नाही आला.

अर्ध्या तासाने एक देऊळ आले.  देवळात काही गावकरी दुपारचे पहुडलेले होते.  देवळासमोर एका जागी उंदरासारख्या दिसणाऱ्या दगडी प्रतिकृती दाटीवाटीने रचलेल्या.

झोपेत व्यत्यय आल्यामुळे कि काय, गावकरी बोलायला फारसे उत्सुक नव्हते.  त्यांना रामराम करून परतीची वाट धरली.

देवळाच्या समोर रचलेले दगडी बैल
नंतर घरी जाताना ह्या दगडी प्रतिकृतींबद्दल माहिती समजली.  पवनानगर जवळ एका गावकऱ्याला गाडीत लिफ्ट दिली, तो बोलका निघाला.  त्याने माहिती दिली.  मळवंडीचे हे देऊळ आसपासच्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे.  पंचक्रोशीतले शेतकरी त्यांच्या बैलांच्या तब्बेतीसाठी ह्या देवळात नवस बोलतात.  नवस पावला तर बैलाची लाकडी किंवा दगडी प्रतिकृती देवळात अर्पण करतात.

उन्हं उतरल्यावर आता रस्ता मजेदार वाटत होता.  पण आता थकवा जाणवायला लागला.  सकाळच्या हिल रनिंग नंतर दुपारचा ट्रेक, जरा जास्तच होतं.

मळवंडी गावाजवळची गाववाट
एका बाजूला डोंगराचा कडा, पक्ष्यांची गाणी, तर दुसऱ्या बाजूला दूरवरचे मळवंडी गावातले आवाज.  आणि मधून चाललेला हि गाववाट.  गाववाट, कारण पायवाटही नाही आणि गाडीवाटही नाही.  अर्ध्या तासात खिंडीत गाडीजवळ पोहोचलो.  इथे शेवटचा पाणी ब्रेक.

खिंडीतून दिसणारा रस्ता
डावीकडच्या कोपऱ्यातून तिकोना डोकावतोय
अशा प्रकारे दिवसभर स्वछंद फिरल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये दाखल झालो.

Monday, September 25, 2017

गरजवंताला अक्कल नसते

सध्या पुण्यातल्या ज्या सगळ्यात माजोरड्या, चाबरट, आणि खोटारड्या बायका आहेत त्या SBI Tilak Road branch मध्ये भरती आहेत.  किंबहुना मागच्या आठ दहा वर्ष्यात हे चित्र बदललेले नाही.  ग्राहक हा राजा असतो वगैरे असले शहाणपण ह्यांच्या राज्यात शिकवले जात नाही.  जाऊ दे.  तुम्ही काम करताय आणि त्याचा तुम्हाला फुल्ल पगार मिळतो, ह्याचाही ह्यांना पूर्ण विसर पडलाय.  बँकेकडून सगळ्या facilities पाहिजेत, दाबून पगार पाहिजे, पण बँकेत कामाला बसवल्यावर मात्र उर्मटपणा आठवतो.  तुझ्या साडीचा रंग कोणता, माझ्या साडीचा रंग कोणता, माझी सासू काय म्हणाली, तुझी सासू काय म्हणाली, ह्याच्यातच ह्यांचा दिवस संपतो.

ह्या ब्रँचचा मॅनेजर जर कधी माझ्या समोर आला तर मला त्याला काही सांगायचंय.  तो समोर येणार नाहीच म्हणा.  झापडं ओढून दिवसभर केबिनमध्ये बसलेला असतो (किंवा असते).  कधी चुकुन माकुन समोर आलाच तर, बाबा रे, तुझ्या राज्याच्या वेशीवर (म्हणजे तुमच्या ब्रँचच्या मुख्य दारासमोर) एक भलामोठ्ठा बोर्ड लाव, आणि त्याच्यावर ठळक अक्षरात लिही, "गरजवंताला अक्कल नसते".  म्हणजे तुझ्या राज्यात येणाऱ्या क्षुल्लक बायापाडयांना आधीच जाणीव होईल पुढे काय एक्सपेक्ट करायचं त्याची.  नंतर चिडचिड नको.

स्टाफ असा, तर ह्यांचा राजा (किंवा राणी) कशी असेल.  पेपरात छापून दिलेल्या चित्रांवर आणि बातम्यांवर जाऊ नका.  स्वच्छ, नीटनेटके कपडे घालून कोणी हुशार होत नसतं.  नाहीतर रस्त्यावर हुशार लोकांच्या फॊजा निघाल्या असत्या.  अरे त्या मल्ल्याला लाखो करोडो वाटताना तुम्ही तुमची अक्कल गहाण टाकली होतीत.  आणि बँकेत आलेल्या साधारण ग्राहकांच्या समोर माज करून दाखवता.

आता तुम्ही म्हणाल "कशाला ह्यांच्या वाटेला गेलास".  बरोबर आहे.  चूकच झाली.  आणि आता सुधारतोय.  ह्यांच्याकडचे सर्व अकाउंट्स बंद करून टाकले.  फक्त एक शेवटचा उरलाय.  तोही संपला कि जा मेल्यांनो मसणात.

Tuesday, September 19, 2017

नाणेघाट, नानांचा अंगठा, आणि भोरांड्याचं दार - स्वछंद गिर्यारोहकांबरोबर एक अप्रतिम गिरीभ्रमंती

रविवार १७ सप्टेंबर २०१७ रोजी स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे आणि इतर स्वछंद गिर्यारोहकांबरोबर नाणेघाट, नानांचा अंगठा आणि भोरांड्याचं दार पाहायचा योग आला.  त्याचा हा इतिवृत्तांत.  खरंतर हा पायलट ट्रेक ठरला होता.  मेंबर वाढल्यामुळे रेग्युलर ट्रेक बनला.  पुण्याहुन ११ जण आणि मुंबईहुन ९ असे २० ठरले होते.

टोळके
१. विशाल काकडे
२. डॉ. मुग्धा कोल्हटकर मॅम
३. स्वप्नील खोत
४. सविता कानडे मॅम
५. सुरेश भाग्यवंत
६. उदय मोहिते
७. सागर मोहिते
८. रुपेश गौल  (रुपेश मित्रा, तुझं आडनाव जर मि चुकवलं असेल तर चुक भुल देणे घेणे)
९. भाग्येश मोहिते
१०. दिलीप गाडे
११. योगेश सावंत

शनिवारी दिवसा विशाल आणि भाग्येशने स्वछंद गिर्यारोहकांचा रिव्हर्स अंधारबन ट्रेक यशस्वीरीत्या पार पाडला.  त्यांची बस रात्री ९ वाजता शिवाजीनगरला पोहोचली.  तिच बस घेऊन त्यांनी पुढचा ट्रेक सुरु केला.  ठरल्याप्रमाणे ११ वाजता इतर सदस्य जमले आणि बस मार्गस्थ झाली.  रुपेश आणि मि नाशिक फाट्याला बसमध्ये चढलो.  नारायणगावला चहा आणि मसाला दुध अशी सर्वांची फर्माईश होती.  सर्व हॉटेले बंद झाल्यामुळे ति राहुन गेली.

ड्राइवर काकांना बिलकुल घाईची लागलेली नव्हती.  त्यांनी सरळ सोप्या पद्धतीने बस चालवली.  रात्रीच्या अंधारात विशालने गुगल मॅपचा आधार घेत ड्राइवर काकांना रस्ता सांगितला.  घाटात एका चेकपोस्ट वर पोलीसमामांनी १०० रुपये घेतले.  आधी ५० दिले तर ते त्यांना कमी पडले.  पुण्यापासुन जसजसे लांब गेलो तसतसे रस्तावरचे खड्डे वाढतच गेले. त्यामुळे झोप काही चांगली झाली नाही.
साधारण साडेतीनला विशालने एका ठिकाणी बस थांबवली.  सर्वजण बसमधुन उतरून तयार झालो.  इथुन पुढे पायगाडीने प्रवास होता.  उद्या दुपारी बस कुठे आणायची ते विशालने ड्राइवर काकांना सांगितले.  आम्ही नाणेघाटातुन चढुन जाणार होतो आणि भोरांड्याच्या दाराने उतरणार होतो.

मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक आमच्या दोन तास आधी पोहोचले होते.  त्यांनी चढायला सुरुवात केलेली होती.  नाणेघाट चढून गेल्यावर त्यांना भेटण्याचा आमचा प्लॅन होता.

सर्वांची थोडक्यात तोंडओळख केली आणि पायगाडीला स्टार्ट मारला.  मिट्ट अंधार असल्यामुळे आजुबाजुच्या परिसराचा फारसा अंदाज येत नव्हता.  बॅटऱ्यांच्या उजेडात सर्वजण एका रांगेत जात होतो.  वाट अवघड नव्हती पण घाम काढणारी होती.  बहुदा आमचा स्पीड चांगला होता.  ट्रेकची सुरुवात चांगल्या स्पीडने केली कि पूर्ण ट्रेक चांगला जातो.  नवखे कोणीच नसल्यामुळे हा ट्रेक चांगला होणार ह्याचा अंदाज आला.

पायगाडीला सुरुवात झाल्यानंतर थोड्या अंतरावर हे निसर्ग पर्यटन केंद्र लागले.  इथे काही खेळणी होती लहान मुलांसाठी.

नाणेघाटाच्या पायऱ्या जिथे सुरु होतात तिथे एक मोठा ब्रेक घेतला.  निमित्त होते नानांच्या अंगठ्याचा फोटो काढण्याचे.  हळुहळु उजाडायला लागले.  थोडे उजाडल्यावर नानांचा अंगठा दिसायला लागला.  अंगठा नक्की कसा बघायचा ते काही मला समजले नाही. असो.  आमचा लॉन्ग ब्रेक चालु असताना एका उंदराने आमच्या अधेमधे लुडबुडून जमेल तसे खाऊचे तुकडे पळवुन नेले.

उजाडल्यावर दिसणारा नानांचा अंगठा. डावीकडच्या घळीतून नाणेघाटाची वाट घाटमाथ्यावर जाते

आम्ही पहिला टप्पा जोरदार पार केलेला होता.  लॉन्ग ब्रेक आटोपल्यावर पुढच्या वाटचालीस सुरुवात.  घडीव पायऱ्यांची वाट माथ्यापर्यंत आहे. कुठे चुकण्याचा प्रश्नच नाही.  ग्रुप ट्रेक मध्ये लीड ला राहण्याचा मोह काही मला सोडवत नाही.

नाणेघाटातील पायऱ्यांची वाट

फार्फार पुर्वीच्या काळी कधीतरी सोपारा ते पैठण हा व्यापारी मार्ग होता.  कल्याण ते जुन्नर हा ह्या मार्गाचा एक भाग.  सातवाहन काळातील हा एक्सप्रेस-वे.  ह्या मार्गावर सह्याद्री चढून वर येण्याचा घाट तो नाणेघाट.  कल्याण पासुन ५५ किलोमीटर वर हा नाणेघाट आहे.

सप्टेंबरच्या सकाळी नाणेघाटातुन दिसणारं विहंगम दृश्य.  नजर जाईल तिथपर्यंत ढग रेंगाळतायत.  सर्वत्र हिरवंगार रान आणि मधेच एखादी वीसेक घरांची वाडी.

एक दोन वेळा वानरांचा आवाज परिसरात घुमला.  मोरांचा आवाज ह्या पूर्ण ट्रेक मध्ये कुठेच आला नाही.  रात्री बंद असलेले कॅमेरे आता बाहेर आले होते.  आम्हा सर्वांचा स्पीड चांगला असल्यामुळे वेळेत ट्रेक पूर्ण होतो का नाही वगैरे विषय आलेच नाहीत.  आणि दिवसभर मनसोक्त फोटोग्राफीला वेळ मिळाला.

नाणेघाटातुन दिसणारा नानांच्या अंगठ्याचा कडा

सध्याच्या काळात माळशेज घाटाचा गुळगुळीत डांबरी रस्ता बनल्यावर नाणेघाटाची गरज संपली.  आसपासच्या गावातले दोनेक जण फक्त जाताना दिसले.  नाणेघाटाच्या शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेली पाण्याची टाकं आणि सातवाहन कालीन लेणी आहेत.  घाट चढून वर आल्यावर प्यायला पाणी आणि आरामाला जागा हवीच.

नाणेघाटातली सातवाहन कालीन लेणी

सातवाहन राजा सातकर्णी ह्याची राणी नागनिका हिने हि लेणी बनवुन घेतली.  लेण्याच्या भिंतींवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे.  सातवाहनांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग वाचा.

सातवाहन कालीन लेण्याच्या भिंतीवर कोरलेला शिलालेख

इथून पुढे नाणेघाटाचा फक्त शेवटचा चढ राहिला होता.  एका घळीतला दगड धोंड्यांनी भरलेला १०० मीटर ट्रॅक.  पाणी वाहुन जायला भरपूर जागा असल्यामुळे हे दगड घसरडे नव्हते.

नाणेघाटाचा शेवटचा टप्पा
शेवटचा चढ मि हिल गियर टाकुन संपवला.  साडेआठला आम्ही घाटमाथ्यावर आलो.  समोर नाणेघाटाच्या प्राचीन दगडी मार्गाला भिडलेला आजचा डांबरी रस्ता पाहुन आश्चर्य वाटले.  डोंगरपठारावर उजवीकडे जीवधन किल्ला तर डावीकडे नवरा नवरी भटजी आणि वाजंत्र्यांचा डोंगर.  मध्ये जुन्नरहुन आलेला आजच्या काळातला डांबरी रस्ता.  ह्या रस्त्याने सर्वसामान्य जनतेची सोय केलेली आहे.  तशीच गैरसोयही केलेली आहे.  इथपर्यंत दुचाकी आणि चारचाकी सहज येत असल्यामुळे काचपात्रातून तीर्थप्राशन करणाऱ्यांची गर्दी आता इथे जमु लागलीये.

नाणेघाटाच्या प्राचीन दगडी मार्गाला घाटमाथ्यावर भिडणारा आजचा डांबरी रस्ता.  समोर जीवधन किल्ला.

मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक इथुन बऱ्याच आधी पुढे गेलेले होते.  ते आम्हाला भोरांड्याच्या दाराने उतरून गेल्यावरच भेटले.

उन्हात न्हाऊन निघालेलं डोंगरपठार, सर्वत्र हिरवंगार गवत, काही रानफुले, मधेच कुठेकुठे पाणी.  दूरवर दिसणारे उंचच उंच डोंगर.  उत्कृष्ट लँडस्केप.

डोंगरपठारावर ढगात बुडालेले नवरा, नवरी, भटजी, आणि वाजंत्री

नाणेघाट चढून घाटमाथ्यावर पोहोचल्यावर एक दगडी रांजण दिसतो.  ह्या मार्गाचा वापर करणारे व्यापारी इथे टोल देत असणार नाण्यांच्या स्वरूपात.  म्हणून हा नाणेघाट.

घाटमाथ्यावर पोहोचल्यावर बाजुला दगडी रांजण - सातवाहन कालीन टोल बूथ

डोंगरपठारावर पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही बाजूच्या नानांच्या अंगठ्याकडे मोर्चा वळवला.  घाटमाथ्यावरून कोकणच्या दिशेला थेट आकाशात घुसलेला डोंगर आणि पलीकडे सरळसोट खोल दरी.  एक टप्पा आऊट वगैरे नाहीच.  डायरेक्ट बाउन्सर कोकणात जाणार.  हाईट ची भीती घालवायची असेल तर अतिउत्तम जागा.

नानांच्या अंगठ्या वरून...
समोर हिरवाईने नटलेल्या कोकणच्या वाड्या
आजुबाजुला भिरभिरणारे चतुर (म्हणजे Dragon flies)
ह्या रम्य सकाळी सोनकीच्या फुलांमध्ये आणि ढगांमध्ये जास्त कोण तो खेळ चाललेला


एकेक करत सर्वजण नानांच्या अंगठ्यावर पोहोचलो.  रुपेश खालीच राहिला.  मागचे काही आठवडे (त्यात वीकेंड्स पण) त्याच्या कंपनीने त्याला जबरी राबवून काढल्याने बिचारा मिळेल तिथे मिळेल तशी झोप पूर्ण करत होता.  यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर सर्वानुमते इथे एक खादंती ब्रेक झाला.  सुरेश भाग्यवंत सरांनी आणलेली भाकरी, मिरचीचा ठेचा आणि चटणी ज्यांनी नानांच्या अंगठ्यावर बसून खाल्ली तेच खरे भाग्यवंत.

नानांच्या अंगठ्या वरून...
दरीत पडलेली अंगठ्याची सावली, अजस्त्र वीजवाहक सांगाडे, दूरवर ढगांची लयलूट, आणि अंगठ्यावर सोनकीच्या फुलांची गर्दी
समोर एक चुकार ढग मधेच येऊन थांबलेला, आणि त्याची दरीत पडलेली सावली

नानांच्या अंगठ्यावरून उतरल्यानंतर आम्ही दूरवर दिसणाऱ्या आमच्या ब्रेकफास्ट च्या जागी पायगाडी वळवली.  डोंगरपठारावर सकाळच्या उन्हात न्हालेली रानफुलं.  दूरवर दिसणारे सह्याद्रीचे रथी महारथी.  असं दिवसभर भटकलं तरी मन भरेल कि नाही सांगता येत नाही.


सोनकीच्या फुलांची मुक्तहस्ताने उधळण

वाटेत एक मेलेला साप सापडला.  ह्या भागात साप खूप आहेत म्हणे.  आमच्या वाटेल त्यातला एकही नाही आला.  सापांविषयी दिवसभरात चांगली डिस्कशन झाली.  इतरही अनेक विषय चावले गेले.  भुतं, सातवाहन काळ, घाटवाटा, भारतीय स्वातंत्र्यलढा, आजूबाजूचे किल्ले, रानफुलं, वगैरे वगैरे.  स्वप्नील खोत हा तर एक चालता बोलता विकिपीडिया आहे.  विशेष म्हणजे डोकं आभाळात असूनसुद्धा पाय पक्के जमिनीवर.


दुपारच्या उन्हात ढग आणि धुकं हटल्यावरचे नवरा, नवरी, भटजी, आणि वाजंत्री

रस्त्यावर बसून थोडी फोटोग्राफी झाली.  मि माझी फोटो स्टाईल रुपेश आणि उदय मोहिते सरांना शिकवली.

फोटोग्राफी करण्याचा मोह कोणाला आवरत नाही

आधी एक चहाचा राऊंड, मग अनलिमिटेड पोहे, वर अजून एक चहाचा राऊंड असा भरपेट ब्रेकफास्ट झाला.  खुर्चीत बसल्या बसल्या मि एक डुलकी घेतली.  काहीजण पळशीकरांना भेटून आले.
आता आल्या वाटेने नाणेघाटातून उतरून न जाता भोरांड्याच्या दाराने जायचे होते.  भोरांड्याच्या दारापर्यंत पोहोचण्याची एक छोटीशी शोधमोहीम पार पडली.

भोरांड्याचं दार

हि घळ ६०० फूट उतरत जाते.  कोकणातल्या घाटवाटा पावसाळ्यात सुद्धा घाम काढतात.  उन्हाळ्यात काय होत असेल इथे.

भोरांड्याच्या दारानी उतरताना...
स्वछंद गिर्यारोहक विशाल काकडे

उतरायला सुरुवात केली तेव्हा तासाभरात खाली पोहोचू असा अंदाज होता.  जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसा उलगडा झाला.  हे काही तासाभराचं काम नाही.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
The one and only Swapnil Khot

दगडधोंड्यांनी भरलेली घळ पुढे गेल्यावर अवघड बनत गेली.  एके ठिकाणी डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा दोन वाटा दिसल्या.  उजवीकडची वाट गावात जाते. डावीकडच्या वाटेने उतरून गेलो.  आता वाट शोधावी लागत होती.  एखादं झाडावरचं मार्किंग, कुठे दगडावर रंगवलेला बाण.  काही वेळ मि लीड ला राहून वाट शोधली.

दगडांचा हा माझा देश
जितका राकट कणखर, तितकाच मृदू मुलायम

भोरांड्याच्या ह्या घाटवाटेल पाण्याची चिंता नाही.  खळाळत्या झर्याचं गोड पाणी शेवटपर्यंत साथीला राहतं.  पावसाळा संपुन झरा आटल्यावर मात्र पुरेसं पाणी बरोबर ठेवलंच पाहिजे.

पाणी प्यावं तर असं.  हेच खरे भाग्यवंत.

दोन चार वेळा झरा ओलांडावा लागला.  झरा ओलांडायला सोपा आहे, फक्त सावध राहवं.  शेवाळ्याने भरलेले दगड घसरडे होते.  शेवाळ्याचा थर जितका जाड तितकी घसरण जास्त.

अश्या कुत्र्याच्या छत्र्या (mushrooms) जागोजागी होत्या


निसर्गदेवतेच्या कृपेने पाऊस आला नाही.  पाऊस आला असता तर हि वाट आणखीनच अवघड झाली असती.

भोरांड्याच्या दारानी उतरणारे ११ स्वछंद गिर्यारोहक
Chimps never leave chimps behind ह्या उक्ती प्रमाणे कोणीही एकटे पडणार नाही ह्याची दक्षता सर्वांनी पूर्णवेळ घेतली.


हा झरा भोरांड्याच्या दारात जो सुरु झाला तो माळशेज घाटाचा रस्ता येईपर्यंत सोबतीला होता

सव्वातीन तासात आम्ही भोरांड्याच्या दाराने उतरून आलो.  मागे वळुन पाहिल्यावर दूरवर दिसत होतं भोरांड्याचं दार.

उतरून आल्यावर एकदा पाहून घेतलं, कुठच्या भोरांड्याच्या दारातून खाली आलोय आपण


सरत्या पावसाच्या दिवसातला हा ट्रेक काय वर्णावा.  उन्हाचा रखरखाट नाही.  थंडीचा कडाका नाही.  झोडपणारा पाऊस नाही.  सर्वत्र आल्हाददायक वातावरण.  टोळक्याचा मेळ व्यवस्थित जमलेला.  सगळीकडे रानफुलांची सोबत.  खाण्यापिण्याची चंगळ.  बरोबर घेतलेले पाणी संपण्याचा धोका नाही.  हे सगळं कमी पडतं म्हणुन कि काय नानांच्या अंगठ्यावरून दिसणारा अलौकिक नजारा, एक नवीन घाटवाट उतरण्याचं समाधान, प्यायला हवं तितकं झऱ्याचं चवदार पाणी, आणि शेवटी झऱ्यातली डुंबाडुंबी म्हणजे कळसच झाला.

खळाळत्या झऱ्यातली हि मजा शब्दात कशी सांगावी

झऱ्यातली डुंबाडुंबी थांबवुन बाहेर पडायला कोणीच तयार नव्हतं.  झऱ्यासमोर दिसणारा पूल आणि गाड्यांचे आवाज मात्र आजच्या जगाची आठवण करून देत होते.

खाते पिते घर के ४ जाडजूड सुटलेले मर्द रस्त्यावरून झऱ्याच्या काठाला उतरले.  बॉड्या काढून ठेऊन काहीतरी खायला लागले.  बहुदा खाऊन झाल्यावर झऱ्यात एन्ट्री मारणार असावेत.

नाईलाजाने झरा सोडून आम्ही रस्ता पकडला.  काय करणार.  १२ तास निसर्गाच्या बरोबर राहिल्यानंतर मग ह्या मानवनिर्मित कृत्रिम वातावरणात परत येणं फार अवघड होतं.  विशालने ड्राइवर काकांना फोन करून बोलावून घेतले.  आवरा आवरी करून गाडीत बसलो. 

बायकर्सची एक मोठी झुंड रस्त्याच्या कडेला थांबली होती.  त्यांच्यातला एक जण वळण घेताना रस्ता सोडून बाजुच्या खोलगट भागात पडला होता.  त्यांचं मदतकार्य चालू होतं.

मुंबईचे ९ स्वछंद गिर्यारोहक जवळच पोहोचले होते.  बसने त्यांच्याकडे गेलो.  थोड्या गप्पा टप्पा झाल्यावर आमची बस पुण्यनगरीच्या दिशेने निघाली.  बसमध्ये मी जमेल तेवढी झोप काढली.  थोड्या वेळाने चहा वडापावचा pitstop आला.  मी झोपुनच राहिलो बसमध्ये.

जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. ११ पैकी ५ व्हेज आणि ६ नॉनव्हेज अशी विभागणी झाली.  व्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी आणि नॉनव्हेज वाले त्यांच्या आवडीच्या ठिकाणी.  दोन्ही हॉटेलं ५० मीटर अंतरावर.
जेवायला माझ्या शेजारी स्वप्नील खोत हा निगर्वी निर्भीड सह्यमित्र बसला होता.  जग जिंकलंयस तु मित्रा.  ह्या सह्याद्रीला अभिमान आहे तुझ्यासारख्या सह्यमित्रांचा.  तुझ्यासारख्यांसाठीच ह्या ओळी लिहिल्या आहेत
क्या ये उजाले
क्या ये अँधेरे
दोनों से आगे है मंज़र तेरे
क्यों रौशनी तू बाहर तलाशे
तेरी मशालें हैं अंदर तेरे
क्यों ढूंढना पैरों के निशां
जाए वहीं ले जाए जहाँ

आणि मला सुचलेल्या ह्या चार ओळी
स्वप्नील खोत येति ट्रेकला
तोचि दिवाळी दसरा

पोटोबा भरल्यानंतर सर्वांना घरी परतायचे वेध लागले होते.  परतीच्या प्रवासात विशालने त्याचा गाण्याचा तास सुरु केला.  इतरांनी त्याला जमेल तशी साथ दिली.  साडे अकरा वाजता नाशिक फाट्यावर रुपेश आणि मि गाडीतुन उतरलो.  ४ किलोमीटर आणि ४० मिनिटात मि चालत घरी पोहोचलो.

ह्या offbeat ट्रेक ला किती खर्च आला ते विचारूही नका.  सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची हि भटकंती पैश्यात मोजता येत नाही.  भाग्य लागतं नशिबाला.