Tuesday, May 4, 2021

मी पाळलेले मांजर

खुशी लहान होती तेव्हा कधीतरी "आपण एक प्राणी पाळूया ना", "आपण एक मांजर पाळूया ना", "आपण एक कुत्रा पाळूया ना" असे प्रश्न विचारायची.  त्या प्रश्नांना मला स्थळ-काळानुसार समर्पक उत्तरं द्यावी लागत.  शहरातल्या फ्लॅट मधे प्राणी पाळायचा हे मला कधी पटले नव्हते.  प्राणी पाळला तर त्याची जबाबदारी माझ्यावरच येणार हे मी ओळखून होतो.  आणि प्राणी पाळण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता.  वेळ नव्हता यापेक्षा ते करण्याची तयारी नव्हती.  आणि आपल्यामुळे त्या बिचाऱ्या मूक प्राण्याला त्रास होणार असं मला होऊ द्यायचे नव्हते.  पण कोणीतरी कुठेतरी म्हणून ठेवलंय, "प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते".  ती वेळ येईपर्यंत कितीही काही खटपट केली तरी आपलं काही चालत नाही.  आणि ती वेळ आली कि ती गोष्ट तुमच्यापर्यंत चालत येते.  जणू काही तुमचा त्यात काहीच भाग नाही.

मागच्या महिन्यातला, म्हणजे एप्रिलचा पहिला आठवडा.  उन्हाळ्याने टोक गाठलेलं.  तशात लॉकडाउन पुढ्यात दिसायला लागलेलं.  शहरातल्या बागा, मैदानं वगैरे ठिकाणं नुकतीच बंद झालेली.  त्यामुळे सकाळचं रनिंग बंद.  दिवसभर घरी बसून करायचं काय, हाच मागच्या वर्षीचा जुना प्रश्न पुन्हा नव्याने पुढे आलेला.  एका सकाळी कचऱ्याची पिशवी टाकण्यासाठी मी दार उघडलं.  दाराच्या पुढ्यात एक मांजराचं पिल्लू होतं.  ते पळत घरात आलं.  मी काही प्रतिक्रिया द्यायचा आधीच पळत पुढे गेलं.  त्याच्या मागे मी.  ते थेट खुशीच्या रूम मधे शिरलं.  उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सकाळी अंथरूणात लोळत पडणारी खुशी "मांजर आलंय" असं मी सांगितल्यावर एका सेकंदात उठली.

खुशीला मांजराचं पिल्लू हवंच होतं.  पिल्लू घरात सगळीकडे फिरायला लागलं.  त्याला आम्ही खायला दिलं.  पिल्लू फारच निरागस गोड होतं.  त्याला परत खाली नेऊन सोडायचा प्रश्नच नव्हता.  आमचा अख्खा दिवस पिल्लाच्या मागे.  त्याला काय खायला पाहिजे.  ते कसं खेळतंय.  कुठून कशा उड्या मारतयं.  रात्री पिल्लाला भूक लागली.  ते ओरडायला लागलं.  त्याला काय खायला द्यायचं कळेना.  थोडं सुकट दिलं.  ते खाऊन त्याला अजून हवं झालं.  चार वेळा सुकट खाल्यावर त्याची भूक भागली.  रात्री खुशी पिल्लाला बरोबर घेऊन झोपली.

सकाळी उठल्यावर पिल्लाने दीप्तीच्या पायावर अंथरुणातच शी केली.  त्याला शी ची सवय कशी लावायची हा प्रश्न अजून सुटला नव्हता.  झाड न लावलेली एक कुंडी हा आमचा उपाय तितकासा लागू पडला नव्हता.  आमचे पुढचे दोन दिवस पिल्लाच्या मागे गेले.  पिल्लू घरात सगळीकडे चौकसपणे दिवसभर हिंडलं फिरलं.  उड्या मारून खेळलं.  त्याला योग्य सवयी लावण्यासाठी आम्ही त्याच्या मागे.  किचन प्लॅटफॉर्म आणि डायनिंग टेबल ह्या दोन ठिकाणी बिलकुल चढायचं नाही.  ताटलीत दिलेलं खायचं.  आम्ही जेवत असताना ताटात यायला बघायचं नाही.  पिल्लू पटापट शिकलं.  पण शी आणि शु चा प्रश्न सुटत नव्हता.  छोटी कुंडी पिल्लाला फारशी आवडली नव्हती.  रोज बेडशीट धुवाव्या लागत होत्या.  शु करण्यासाठी बीन बॅग हि त्याची आवडती जागा होती.  शेवटी कंटाळून मी आणि दीप्तीने जवळच्या पेट शॉप मधून सॅण्ड पिट आणि सॅण्ड आणली.  हा उपाय प्रभावी ठरला.

जवळच्या पेट शॉप मधून मी मांजराचं खाणं आणलं.  खुशीने पिल्लाचे कान साफ केले.  भूक लागल्यावर पिल्लाला खायला मिळायला लागलं.  "काय नशीब फिरलं ह्याचं.  आत्ता पर्यंत पार्किंग मधे धुळीत रहात होतं.  झुरळं वगैरे काय मिळेल ते खात होतं.  आणि आता बघा.  भूक लागली कि आयतं खायला मिळतंय.  मजेत ताणून झोपायला मिळतंय."  इति दीप्ती.

सर्वेशने पोलिसांना लिहिलेले पत्र केदारने मला WhatsApp वर पाठवलं होतं.

 मी त्या पत्राला उत्तर लिहिलं. 

प्रति,

सर्वेश केदार कुलकर्णी

प्रथमेश नगरी, सिंहगड रोड,

पुणे 

 

मांजर पाळण्याच्या परवानगी बाबत तुझे पत्र मिळाले.  तू एक गुणी मुलगा आहेस असे आमच्या लक्षात आले आहे.  त्यानुसार, खाली नमूद केलेल्या अटींना बांधील राहिल्यास, आम्ही तुला एक मांजर पाळण्याची परवानगी देत आहोत.

१. सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.  अशा काळात मांजर लगेच उपलब्ध होणे शक्य नाही.  त्यामुळे योग्य वेळी योग्य मांजर उपलब्ध होईपर्यंत वाट बघावी.  ह्याबाबत आई वडिलांना तसेच आजी आजोबांना सतत विचारणा करून त्रास देऊ नये.

२. शाळेचा अभ्यास नियमितपणे करावा.

३. आई वडिलांना आजी आजोबांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नये.  तसे करताना आढळल्यास मांजर पाळण्याची परवानगी रद्द केली जाईल.

योग्य वेळी एक योग्य मांजर घरी आणण्याबाबत तुझ्या आई वडिलांना आम्ही सूचना देत आहोत.  करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपल्यानंतर, साधारणपणे जेव्हा तू तिसऱ्या इयत्तेत असशील, तेव्हा तुझे आई वडील एक मांजर तुमच्या घरी आणतील.  त्या मांजराचा योग्य तो सांभाळ करावा.  तसेच त्याचे फाजील लाड करू नयेत.  मांजराला योग्य सवयी लावण्याबाबत जागरूक राहावे.

मांजर पाळून एक महिना झाल्यानंतर "मी पाळलेले मांजर" ह्या विषयावर एक निबंध लिहून आमच्याकडे पाठवावा.  उत्कृष्ट निबंधास उचित बक्षीस दिले जाईल.


पोलीस निरीक्षक,

सिंहगड रोड पोलीस ठाणे,

पुणे

 

आहनाला कॅट बघायचं होतं.  एक दिवस तिला घरी आणलं.  अख्खा दिवस तिने दोन मिनिटं पण कॅट ला मोकळं सोडलं नाही.

खुशी आणि आहना मांजराचे केस विंचरतायत
खुशी आणि आहना मांजराचे केस विंचरतायत
 

मांजर पाळून आम्हाला आता एक महिना होतोय.  आता दार उघडं दिसलं तरी मांजर बाहेर पळून जात नाही.  त्याला त्याचं घर मिळालंय.  "Home is where the heart is" असं एक बाबाजी कधीतरी म्हणून गेलाय.  सकाळी पावणे सात वाजता मी उठलो कि माझ्या आवाजाने मांजर आमच्या खोलीच्या दरवाजाबाहेर येतं.  मी दरवाजा उघडला कि मला अंग घासत माझ्या पायात फिरत रहातं.  जोपर्यंत मी त्याला खायला देत नाही तोपर्यंत.  खायचं, खेळायचं, झोपायचं.  हाच दिवसभराचा कार्यक्रम.  आता त्याचं अंग स्वच्छ झालंय.  आकाराने दुप्पट झालंय.  अंगात ताकद आली आहे.  दीप्तीने त्याचं नाव Alexander ठेवलंय.  खुशी त्याला खेळायला नवनवीन खेळणी बनवून देते.


लॉकडाउन सुरु झाला तेव्हा समजत नव्हतं पुढचे काही महिने कसे जातील.  मांजराने सगळंच चित्र बदललंय.  असं म्हणतात कि मूल निवडण्याचा पर्याय आई वडिलांना नसतो. मूल आई वडिलांना निवडतं.  आमच्या मांजराचंही तसंच काहीसं झालंय.  त्याने आम्हाला निवडलंय.

 

 

No comments:

Post a Comment