Monday, June 3, 2019

बाबा आणि खुशीची नेपाळ सफर

"तुझी लढाई फक्त तुझ्या स्वतःबरोबर आहे.  दुसऱ्या कुणाबरोबर नाही.  इतरांकडे लक्ष देऊ नकोस."  बाबा ऐकत होता.  अडकून पडलेलं एक दार उघडत होतं.  बाहेरून मदत मिळाल्यावर बऱ्याच वर्षांपासून अडकलेलं दार उघडलं.  एके दिवशी बाबा विचार करत होता, "जर आपण दार अडकूच द्यायचं नाही असं ठरवलं तर?"  ठरवणं हि पहिली पायरी.  सतत जागरून राहून प्रयत्नपूर्वक पुढे जाणं हि योग्य वाटचाल.  आपली वाट आपणच शोधावी लागते.  दुसऱ्या कुणावर सोडून देऊन चालत नाही.  असे शेकडो धडे जगाच्या बिनभिंतीच्या शाळेत मिळतच असतात.  शिकणाऱ्याला.  शिकायची इच्छा नसणाऱ्याची घागर रिकामीच राहते.  "मोठी होत जाईल तशी खुशी शिकेलच शाळेतले आणि शाळेबाहेरचे धडे.  जर तिला बरोबर घेऊन पुढची सफर केली तर ... तीही तयार होईल असेल त्या परिस्थितीला न डगबगता सामोरे जायला.  घरकोंबडी नाही होणार." बाबा विचार करत होता.  अन्नपूर्णा बेस कॅम्प (ABC) ट्रेक नंतर कधीतरी करता येईल.

बाबा आणि खुशीचा बेत ठरला.  मे महिन्याच्या सुट्टीत दोघांची नेपाळ सफर.  मागच्या वर्षी बाबा नेपाळ सफर करून आला होता तो अनुभव पाठीशी होताच.  बाबाने सफारीची तयारी सुरु केली.  मागच्या वर्षी बाबा फिरला तसं अख्खं नेपाळ ह्यावेळी धुंडाळत फिरायचं नाही.  काठमांडू आणि पोखरा ह्या दोनच ठिकाणी जायचं.  बाबाने प्लॅन बनवला तो असा. 
दिवस पहिला : पुणे ते काठमांडू
दिवस दुसरा : काठमांडू ते पोखरा
दिवस तिसरा : पोखरा मधली ठिकाणं पाहणे
दिवस चौथा : पोखरा मधली ठिकाणं पाहणे
दिवस पाचवा : पोखरा मधली ठिकाणं पाहणे
दिवस सहावा : पोखरा ते काठमांडू
दिवस सातवा : काठमांडू मधली ठिकाणं पाहणे
दिवस आठवा : काठमांडू ते पुणे

प्रत्येक दिवशी काय करायचं त्याची यादी बाबाने बनवली.  कितीही काटेकोर नियोजन केलं तरी सफर सुरु झाल्यावर हि यादी फक्त संदर्भ म्हणून कामाला येते हा अनुभव बाबाला नवीन नव्हता.  त्यामुळे पोखरा मधली कोणती ठिकाणं पाहायची त्याची बाबाने वेगळी यादी बनवली.  काठमांडू मधली कोणती ठिकाणं पाहायची त्याची एक वेगळी यादी बनवली.  पुणे ते काठमांडू (दिल्ली मार्गे) आणि काठमांडू ते पुणे (दिल्ली मार्गे) हि विमानाची तिकिटं काढली.

आठ दिवसाच्या सफरीसाठी स्वतःची बॅग स्वतः कशी भरायची ते शिकण्याची खुशीची हि पहिलीच वेळ.  बाबाला कॉन्फिडन्स होता खुशी पूर्ण ट्रिप मजेत फिरणार.  खुशीला कॉन्फिडन्स होता बाबा ट्रिप योग्य प्रकारे करवणार.  काळजी करण्याचं काम दोघांनी मम्मा वर सोडलेलं.

बाबा आणि खुशीची सफर सुरु
सकाळचं पुणे ते दिल्ली आणि दुपारचं दिल्ली ते काठमांडू दोन्ही विमानं वेळेत निघाली आणि वेळेत पोहोचली.  भारतीय नागरिकांना नेपाळ मधे जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही.  नेपाळ आणि भारतामधल्या कराराप्रमाणे भारतीय नागरिक कितीही दिवस नेपाळ मधे राहू शकतात आणि काम करू शकतात.

काठमांडू विमानतळावर  ...  आगमन पत्र
तीन वाजता बाबा आणि खुशी काठमांडू विमानतळातून बाहेर पडले.  टॅक्सी न करता चालत बाहेरच्या रस्त्यापर्यंत येऊन तिथून त्यांनी आधी ठरवलेल्या जवळच्या हॉटेल नंदिनी पर्यंत चालत गेले.  काठमांडू विमानतळाच्या जवळपास बरीच हॉटेलं आहेत.  नेपाळी पाचशे रुपयापासून तीन हजार रुपयांपर्यंत.  आपले शंभर रुपये म्हणजे नेपाळी एकशे साठ रुपये.  बाबा आणि खुशी आवरून हॉटेल बाहेर पडले.  दुसऱ्या दिवशीच्या पोखरा जाण्याची तिकिटं काढली.  मग जवळची बौद्धनाथ हि जागा पाहिली.

बाबा सकाळी सहा वाजता उठला.  खुशी दमलेली असल्यामुळे त्याने खुशीला आठ वाजेपर्यंत झोपू दिले.  तोपर्यंत चहा पिऊन, ब्रेकफास्ट साठी जवळची चांगली जागा त्याने बघून ठेवली.  काठमांडू एअरपोर्ट जवळच्या रस्त्यावर सकाळी लवकर वर्दळ सुरु झाली होती.  एअरपोर्ट पासून बाहेर येणारा रस्ता शांत होता.  हा रस्ता चकाचक स्वच्छ, एकही खड्डा नाही, रस्त्यावर पट्टे आखलेले, बाजूने चालायला फूटपाथ.  असे रस्ते काठमांडूत इतर कुठे सापडणे अशक्य.

काठमांडू एअरपोर्ट पासून बाहेर येणारा रस्ता

ब्रेकफास्ट करून बाबा आणि खुशी जवळच्या भागात फेरफटका मारून आले.  आता ते उन्हाने भाजून निघालेल्या दख्खनच्या पठारापासून दूर आले होते.  इथे काठमांडू व्हॅली मधे सकाळच्या वेळी उन्हाचा त्रास कुठेच नव्हता.  नऊ वाजून गेले तरी वातावरण आल्हाददायक होते.  एअरपोर्टच्या बाजूला गोल्फ कोर्स आहे तिथे काहीजण गोल्फ खेळत होते.

बाबा आणि खुशीला हॉटेल नंदिनी पेक्षा बरंच चांगलं हॉटेल तिथून जवळ सापडलं.  हॉटेल रुद्र व्ह्यू.  पोखराहून काठमांडूला परत आल्यावर राहण्यासाठी चांगली जागा सापडली.  म्हणतात ना, शोधा म्हणजे सापडेल.  आणि ट्रिप ऍडव्हायजर किंवा गुगल मॅप मधे बघून हॉटेल शोधणं आणि प्रत्यक्ष जाग्यावर बघून हॉटेल शोधणं ह्यात बराच फरक आहे.

बाबा आणि खुशी तयार होऊन, हॉटेल सोडून काठमांडू डोमेस्टिक एअरपोर्टला चालत गेले.  पोखराला जाणारं विमान नेहमीप्रमाणे उशिरा निघणार होतं.  काठमांडू विमानतळावरून निघणारी डोमेस्टिक फ्लाईट्स कधीच वेळेत निघत नाहीत.  बाबाला हे माहिती होतं.

काठमांडू डोमेस्टिक एअरपोर्ट
एअरपोर्ट वर बराच वेळ बसून राहायला लागलं तरी खुशी कंटाळली नाही.

फ्लाईट नंबर ६०७  ...  काठमांडू ते पोखरा
मोकळ्या वेळात खिडकीजवळ उभं राहून खुशी आणि बाबाने समोरून जाणाऱ्या विमानांचे फोटो टिपले.  जितकी जास्त फोटोग्राफी करू तितकं जास्त शिकता येतं.  तास दोन तास मोकळा वेळ हाताशी असेल तर कॅमेरा जवळ ठेवावा.

रॉयल भूतान एरलाईन्स म्हणजे द्रुक एअर च्या विमानाच्या शेपटावरचा द्रुक म्हणजे थंडर ड्रॅगन
 द्रुक एअर चं विमान बघून खुशी आणि बाबाला त्यांची दोन वर्षांपूर्वीची भूतान सफर आठवली.

थाई एअरवेज

थाई एअरवेज चं विमान दिसल्यावर चार वर्षांपूर्वीची थायलंड सफर आठवली.

काठमांडू ते पोखरा ह्या दोनशे किलोमीटरच्या प्रवासाला बसने सहा तास लागतात.  विमानाने एक तास.

दोन वाजता बाबा आणि खुशी पोखरा च्या छोट्याशा विमानतळातून बाहेर पडले.  कुठल्या हॉटेलला जायचंय ते बाबाने ठरवून ठेवलं होतंच.  चालत जाताना बॅगा जड होतात.  पोखरा विमानतळापासून फार लांब नाही, आणि लेक साईड रस्त्यावर असलेलं हॉटेल द कान्तिपूर बाबाने बघून ठेवलं होतं.

हॉटेलवर थोडा वेळ आराम करून बाबा आणि खुशी निघाले इंटरनॅशनल माउंटन म्युझियम बघायला.  पोखरा मधे आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा इंटरनॅशनल माउंटन म्युझियम ला भेट द्यावी.  दुपारच्या वेळात.  सकाळचा वेळ इतर ठिकाणांसाठी ठेवावा.  इंटरनॅशनल माउंटन म्युझियम लेक साईड रोड पासून लांब आहे.  तीन किलोमीटरचं अंतर जायला एकतर टॅक्सी करावी लागते किंवा सायकल भाड्याने घेऊन जाता येते.  लेक साईड रोडला मायक्रो, सिटी बस असले प्रकार नाहीत.  इंटरनॅशनल माउंटन म्युझियमची वेळ आहे नऊ ते पाच.  शक्यतो इथे शनिवारी जाणं टाळा.  कारण शनिवारी इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दी असते.  शनिवार हा नेपाळमधला साप्ताहिक सुट्टीचा दिवस आहे.

इंटरनॅशनल माउंटन म्युझियम पूर्ण बघायचं असेल तर कमीत कमी तीन तास लागतात.  बाबाला हे माहिती होतं.  घाई करून बघण्याची हि जागा नाही.  कोणतंही चांगलं म्युझियम बघायला कमीत कमी तीन तास तरी लागतातच.  इंटरनॅशनल माउंटन म्युझियम मधल्या एका खोलीत दर एका तासाने अठरा मिनिटांची एक फिल्म दाखवतात.  आज फिल्म बघायला काहीच गर्दी नव्हती.  म्युझियम मधेही गर्दी नव्हती. 

एका ट्रेकिंग ब्लॉग मधे बाबाने एकदा "बिले देणे" असे वाचले होते.  त्यावेळी "बिले देणे" म्हणजे काय ते त्याला काहीच समजले नव्हते.  बिले हे काय साधन असते ते इथे बाबाला आणि खुशीला बघायला मिळाले.  "बिले देणे" म्हणजे काय ते समजण्यासाठी हे वाचा.  बाबाच्या मनात विचार आला, लीड क्लाइम्बर म्हणजे व्हॉलीबॉल मधला हिटर पोझिशन ला खेळणारा खेळाडू असतो तसा.  किंवा फुटबॉल मधला स्ट्रायकर.  बिनधास्त आणि तितकाच सर्जनशील.   आणि "बिले देणारा" म्हणजे व्हॉलीबॉल मधला लिबेरो पोझिशन ला खेळणारा.  नाहीतर फुटबॉल मधला स्वीपर किंवा गोल किपर.  सदैव सतर्क.

बिले

एव्हरेस्ट वरून खाली आणलेल्या काही हजार किलो कचऱ्यापैकी काही निवडक कचरा इथे मांडून ठेवलाय.  एव्हरेस्ट हि केवळ जगातली सर्वात उंच जागा न राहता आता तो एक ज्वलंत प्रश्न बनलाय.  कचऱ्याचा आणि गर्दीचा.  त्याबद्दल बाबाने खरडलेल्या चार दहा ओळी इथे वाचा.

एव्हरेस्ट वरून खाली आणलेल्या काही हजार किलो कचऱ्यापैकी काही निवडक कचरा
इंटरनॅशनल माउंटन म्युझियमच्या आवारात बिल्डिंगच्या बाहेरही बघण्यासारख्या काही जागा आहेत.  क्लाइंबिंग वॉल.  जुन्या काळच्या नेपाळी घराची प्रतिकृती.  मृत गिर्यारोहकांसाठी स्मारक.

स्मारक
आज संध्याकाळी पाऊस नाही पडला.  पोखरा मधे वर्षातल्या बऱ्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडतो.  संध्याकाळी बाबा आणि खुशी लेक साईड रोड ला फेरफटका मारून जेऊन आले.  हायग्राउंड ऍडव्हेंचर्स च्या ऑफिस मधे जाऊन झिप फ्लायर ची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं खुशीला ते करता येणार नाही.  ती छोटी आहे अजून.

सकाळी सहा वाजता बाबा उठला.  हॉटेलच्या टेरेस वर बाबाने व्यायाम केला.  ढगाळ आणि धुकट हवामानामुळे सूर्योदय आणि दूरवरची बर्फाच्छादित शिखरं फारशी स्पष्ट दिसली नाहीत.

ब्रेकफास्ट करून नऊ वाजता बाबा आणि खुशी हॉटेलच्या बाहेर पडले.  आजचा बेत भाड्याने सायकली (माउंटन बाईक) घेऊन पामे गावापर्यंत सफर करण्याचा.  एका सायकलचे एका तासाचे नेपाळी शंभर रुपये ह्या दराने पोखारामधे सायकली (माउंटन बाईक) भाड्याने मिळतात.  नेपाळी शंभर रुपये म्हणजे आपले साठ रुपये.  सायकल निवडताना सायकलची सीट कशी आहे ते बघून घ्यायचं हे बाबाला माहिती होतं.  सीटची दिशा थोडी खाली करून घ्यायची, म्हणजे सायकल चालवायला आरामदायक होते.  सीटची दिशा वर असेल तर सायकल चालवायला अवघड जाते.

बाबा पुढे आणि खुशी मागे अशी दोघांनी सायकल चालवली.  लेक साईड रोडला ट्रॅफिक फारसं नसतं.  फेवा लेक च्या कडेने जाणारा रस्ता लेक च्या पुढे गेल्यावर खडबडीत झाला.

एका अरुंद लोखंडी पुलावर
दमल्यावर छोटे ब्रेक घेत, खुशीला जमेल तेवढ्या वेगाने बाबा आणि खुशी पामे गावाच्या पलीकडे पोहोचले.  पामे गावात तळलेले छोटे मासे खायला मिळतात.  बाबा आणि खुशी थांबले नाहीत तळलेले छोटे मासे खायला.

फेवा लेक जवळच्या उथळ परिसरात फुललेली फुलं
Common name = Water Hyacinth
Sanskrit = जल कुम्भी
Botanical name = Eichhornia crassipes

सायकली घेऊन दोन तास झाले होते.  आता बाबा आणि खुशी परतून पोखराच्या दिशेने निघाले.  खडबडीत चढ उताराच्या रस्त्यांवर खुशीने न डगमगता न धडपडता सायकल चालवली.

माउंटन बाईक्स आणि त्यांचे माउंटन मधले रस्ते

सारंगकोट डोंगरावरून उडालेले पॅराग्लायडर फेवा लेक च्या बाजूला ज्या जागी उतरतात तिथे आता ते उतरत होते.  बाबा आणि खुशी तिथे थोडा वेळ थांबले.

पॅराग्लायडर उतरताना

परत जाताना एका ठिकाणी बाबा आणि खुशी थांबले.  पोखराहून काठमांडूला जायची तिकिटं काढायला.  थोडं पुढे गेल्यावर परत एकदा थांबले.  हेली एअर नेपाळ च्या गायरोकॉप्टर राईडची तिकिटं काढायला.  ठरल्या प्रमाणे तीन वाजता हेली एअर नेपाळ चा माणूस आम्हाला घ्यायला हॉटेल वर आला.  नेपाळ मधे इतर फ्लाईट वेळेवर निघत नसली तरी हेली एअर नेपाळ चा माणूस मात्र दिलेल्या वेळेवर हजर होतो.  पोखरा विमानतळावर पोहोचतोय तर हेली एअर नेपाळ च्या कर्मचारी समोर उभ्या.  तासाभरापूर्वी निरभ्र असलेलं हवामान आता वेगाने बदलत पावसाळी होत होतं.  अशा हवामानात गायरोकॉप्टर उडवणे धोकादायक होतं.  आम्ही उद्या सकाळी सातची वेळ ठरवली.  त्यांच्या ड्रायव्हरने बाबा आणि खुशीला परत हॉटेल वर नेऊन सोडलं.  थोड्याच वेळात तुफान पाऊस सुरु झाला.  वादळी पाऊस.  जोरजोरात विजा चमकून कडाडणारे आवाज.  हॉटेलच्या खिडकीतून पाऊस बघायला खुशीला मजा आली.

पोखारामधला संध्याकाळचा पाऊस साधारण तीन तास पडतो.  सातच्या सुमारास संपलेला असतो.  आज सात वाजून गेले तरी पाऊस बारीक बारीक चालूच होता.  बाबा आणि खुशी लेक साईड रोड ला फेरफटका मारून जेऊन आले.  उद्या सकाळी सात वाजता गायरोकॉप्टर राईड साठी तयार राहायचे होते.

सकाळी सातच्या आधीच हेली एअर नेपाळ चा ड्रायव्हर हॉटेलच्या रिसेप्शन मधे हजर होता.  गायरोकॉप्टर साठी सकाळच्या वेळी हवामान उत्तम असतं.  हेली एअर नेपाळ च्या दोन पैकी एकच गायरोकॉप्टर चालू होतं.  दुसरं काही कारणाने बंद होतं.  आधी खुशी बसली गायरोकॉप्टर मधे.  न घाबरता.  अशी बसली होती जणू काही हि रोजच उडते गायरोकॉप्टर मधून.

गायरोकॉप्टर मधून उडताना
गायरोकॉप्टर मधे पुढे पायलट आणि मागे पॅसेंजर अशा दोन सीट.  पायलटची सीट पुढे सरकवून पॅसेंजरने बसायचं.  मग पायलट बसणार.  पायलट पूर्ण वेळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) बरोबर संपर्कात असतो.  तो काय बोलतोय ते पॅसेंजरला हेडफोन मधून ऐकू येतं.  पायलट आणि पॅसेंजर दोघांकडेही हेडफोन आणि माईक असल्यामुळे दोघे आपापसात बोलू शकतात.  दोन्ही बाजूची दारं बंद केली कि गायरोकॉप्टर बंदिस्त होतं.  जर उघड्या असलेल्या अल्ट्राफ्लाईट मधून उडायचं असेल तर एव्हिया क्लब नेपाळ ची अल्ट्राफ्लाईट घ्या.

खुशीची सफर झाल्यावर बाबा गायरोकॉप्टर मधे बसला.

विश्व् शांती स्तूप  ...  गायरोकॉप्टर मधून बघितलेला

आज ढगाळ धूसर हवामानामुळे अन्नपूर्णा पर्वतरांगेतली बर्फाच्छादित शिखरं फारशी दिसत नव्हती.  आकाश निरभ्र असेल तर अन्नपूर्णा पर्वतरांगेतली बर्फाच्छादित शिखरं स्पष्ट दिसतात.

लँडिंग ची तयारी
गायरोकॉप्टर ला दोन पंखे असतात.  मागे एक आणि हेलिकॉप्टर ला असतो तसा वर एक.

गायरोकॉप्टर जवळून बघितलेलं
मागे एव्हिया क्लब नेपाळ चं अल्ट्राफ्लाईट ठेवलंय त्यांच्या हँगर मधे

नऊ वाजता बाबा आणि खुशी हॉटेल वर आलेले होते.  ब्रेकफास्ट करून झाल्यावर बाबाने लिस्ट बघितली, पोखरा मधे काय पाहून झाले आणि काय काय अजून बाकी आहे.  बाबा आणि खुशीने आता फेवा लेक मधे बोटींग आणि पलीकडचा डोंगर चढून विश्व् शांती स्तूप बघायचं ठरवलं.  लेक साईड रोडने जाताना लेक च्या कडेला एका ठिकाणी एक उंचावर बांधलेली जागा आहे.  तिथून लेक मधे बांधून ठेवलेल्या होड्या दिसत होत्या.  त्यांचे सुंदर फोटो मिळाले.  ह्या रंगीबेरंगी होड्यांना नेपाळी भाषेत डुंगा म्हणतात.

One rope to tie them all
लेक च्या पलीकडे जाण्यासाठी आणि परत येताना लेक मधल्या बेटावरच्या ताल बाराही देवळाला भेट देण्यासाठी बाबाने होडी ठरवली.  होडीत बसल्या नंतर थोड्या वेळाने बाबा आणि खुशीला लक्षात आले कि आपली बॅग तिथेच विसरली जिथे होडी ठरवली.  लेक च्या पलीकडे गेल्यावर होडीवाल्याने फोन करून खात्री केली कि बॅग तिकीट काउंटर वर त्यांनी ठेवली आहे.  बाबा आणि खुशीने डोंगर चढायला सुरुवात केली.

पाण्याच्या बाटल्या बॅगेत राहिल्या.  त्यामुळे एक बॉटल पाणी विकत घ्यावे लागले.  हॉटेल मधून निघताना बाबा आणि खुशी त्यांच्याकडच्या बॉटल पाण्याने भरून घेतात.  प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल विकत घेत नाहीत.  इथे एक घ्यावी लागली.

दीड हजार बाटल्या जरी विकत घ्यायची कोणाची ऐपत असली तरी जाईल तिथे प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेऊ नयेत.  एकविसावं शतक हे प्लॅस्टिकचं आहे.  हे जर असंच चालू राहिलं तर ह्या शंभर वर्षात सबंध पृथ्वी प्लॅस्टिकमय होऊन जाईल.  मग काय करणार.  प्लास्टिक प्रदूषण पैसे देऊन परत घालवता येत नाही.

विश्व् शांती स्तूपाच्या ह्या वाटेवरतीही काही प्लास्टिक बाटल्या आणि रॅपर लोकांनी टाकलेले होते.  विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी जोपर्यंत लोकांच्या डोक्यात अकला येत नाहीत तोपर्यंत प्लास्टिक कचरा हा होणारच.

डोंगर चढत जाणारी विश्व् शांती स्तूपाची वाट

बाबा आणि खुशीला डोंगर चढून जायला पन्नास मिनिटं लागली.  मागच्या वर्षी बाबाला एकट्याला तीस मिनिटं लागली होती.  आता वातावरण पावसाळी बनत चाललं होतं.

हा विश्व् शांती स्तूप जपान्यांनी बांधलेला आहे.  इतकं आखीव रेखीव शिस्तबद्ध बांधकाम आणि नीटनेटका परिसर हे नेपाळयांचं काम नाही.

विश्व् शांती स्तूप
पाऊस यायच्या आत स्तूप बघून घ्यावा म्हणून बाबा आणि खुशीने पटापट पाय उचलले.  स्तूपाच्या वरच्या भागातून बघितलं तर दुरून पाऊस पुढे सरकताना दिसत होता.

बाबा आणि खुशी स्तूप बघून पायऱ्या उतरतायत तेवढ्यात पाऊस आलाच.  कॅमेरा भिजू नये म्हणून बाबाने टीशर्टच्या खाली धरला.  बाबा आणि खुशीने डोंगर उतरायला सुरुवात केली.  पाऊस पडतोय म्हणून पळून चालणार नव्हतं.  ओल्या झालेल्या दगडांवरून न बघता गेलो तर पाय घसरू शकला असता.

सुरुवातीचा हलका पाऊस आता थोडा जोर धरत होता.  बाबा आणि खुशी न धडपडता डोंगर उतरून आले.  डोंगर चढण्या उतरण्याचं तंत्र बाबाच्या मागून चालून खुशी शिकलेली आहे.  होडीवाल्यांचा पत्त्यांचा डाव रंगात आला होता.  त्यांचा होडीवाला चहा पीत रंगलेला डाव बघत होता.  बाबा आणि खुशी होडीत बसले.  लेक मधल्या बेटावरच्या ताल बाराही देवळात थोडा वेळ थांबण्यात काही धोका नव्हता.  लेक मधल्या बेटावर कोणीच नव्हते.  मंदिराचा पुजारी मंदिराचं दार बंद करत होता.  आता पावसाचा जोर वाढत चालला होता.  होडीवाल्याने होडी दमदारपणे वल्हवत काठाला आणली.  बाबा आणि खुशीने त्यांची विसरलेली बॅग घेतली.  इथे काहीजण लेक मधले मासे पकडत होते.

पाऊस सुरु झाल्याने लेक साईड रोड वर काहीच वर्दळ नव्हती.  काल संध्याकाळी खुशीचं आईसक्रीम खायचं राहून गेलं होतं.  खुशी आणि बाबा आईसक्रीम खात खात हॉटेल वर आले.  आता पावसाने कालच्यासारखं वादळी रूप धारण केलं.

पाऊस थांबल्यावर बाबा आणि खुशी लेक साईड रोड ला जेवायला गेले.  जेऊन परत येताना एक टॅक्सी ठरवली उद्या पहाटे सारंगकोटला सूर्योदय पाहायला जाण्यासाठी.

टॅक्सीवाला चार चाळीस ला हॉटेलच्या रिसेप्शन समोर हजर होता.  आज सारंगकोट ला जाणाऱ्या रस्त्यावर फारश्या गाड्या नव्हत्या.  टॅक्सिवाल्याने बाबा आणि खुशीला एकदम वरपर्यंत सोडलं.  थोडं अलीकडे जिथे काही जण सोडतात तिथे नाही.  बाबा आणि खुशी वेळेत पोहोचले होते.  सूर्योदय व्हायला थोडा वेळ बाकी होता.  समोरची अन्नपूर्णा पर्वतरांगेतली बर्फाच्छादित शिखरं धुकट हवामानामुळे स्पष्ट दिसत नव्हती.  सूर्योदय झाल्यावर शिखरांच्या एकेक कडा चमकू लागल्या.  समोरचं दृश्य टिपण्यासाठी कॅमेरा आणि मोबाईल तोकडे होते.  डिस्कव्हरी चॅनेलवाल्यांनी "व्हाय ट्रॅव्हल व्हेन यु कॅन (घरबसल्या) एक्सप्लोर" अशी कितीही जाहिरातबाजी केली तरी एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेणे आणि टीव्हीत कार्यक्रम पाहणे ह्या दोन संपूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

सारंगकोट डोंगरावरून पाहिलेली अन्नपूर्णा पर्वतरांगेतली बर्फाच्छादित शिखरं

बाबा आणि खुशी गाडीजवळ आले तेव्हा ड्रायव्हर गाडीत मस्त झोपला होता.  हॉटेलवर परतल्यावर खुशीने राहिलेली झोप पूर्ण केली.

बाबा आणि खुशीचा दुपारचा बेत ठरला गुप्तेश्वर महादेव गुहा आणि डेव्हिस फॉल्स बघायला जायचा.  सायकलवरून.  चांगल्या सायकल (माउंटन बाईक) मिळण्याचं एक चांगलं दुकान बाबाने हेरून ठेवलं होतं.  तिथे जाऊन बाबा आणि खुशीने दोन सायकली भाड्याने घेतल्या.

गुप्तेश्वर महादेव गुफा प्रवेशद्वार असा फलक आहे त्या गल्लीत गेल्यावर दोन्ही बाजूंना छोटी दुकानं मांडलेली.  गल्लीतून पुढे गेल्यावर तिकीट काउंटर.  तिकीट घेतल्यानंतर जिन्याने खाली उतरत जायचं.  जमिनीखाली जात राहायचं.  पाण्यामुळे जमीन घसरडी आहे.  लाईट आहेत, पण स्वतःचा टॉर्च बरोबर ठेवा.  गर्दी झाली तर काही ठिकाणी श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.  डेव्हिस फॉल्स चं पाणी जमिनीखाली गडप होतं तिथपर्यंत जाता येतं.

गुप्तेश्वर महादेव गुहा बघून झाल्यावर बाबा आणि खुशी गेले रस्त्यापलीकडचा डेव्हिस फॉल्स बघायला.  फेवा लेक वरच्या धरणातून आलेलं पाणी वाहत येऊन इथे जमिनीखाली जातं.

डेव्हिस फॉल्स

इथे एका छोट्या तळ्यात थोड्या उंचावर एक मूर्ती ठेवलेली.  बाजूला एक माणूस नाणी विकत होता.  काहीजण दहा रुपये देऊन त्याच्याकडची नाणी घेऊन पाण्यातल्या मूर्तीवर टाकत होते.  बाबा आणि खुशीने नाणी विकत घेतली, त्यांच्या नाण्यांच्या संग्रहात ठेवायला.

पाण्यातली मूर्ती

गुप्तेश्वर महादेव गुहा आणि डेव्हिस फॉल्स ह्या जागा जवळ जवळ आहेत.  कधी गेलात तर दोन्ही पहा. ह्या दोन जागा पाहून झाल्यावर बाबा आणि खुशी लेक साईड रोड ला परत आले.

लेक साईड रोड ला सायकल चालवताना

बाबा आणि खुशी हॉटेल वर परत आले आणि थोड्या वेळाने पाऊस सुरु झाला.  पाऊस थांबल्यावर बाबा आणि खुशी लेक साईड रोडला दुकानं धुंडाळत फिरले.  जेऊन आले.  उद्या दुपारी बाराला बाबा आणि खुशीचं पोखरा ते काठमांडू फ्लाईट होतं.

दुपारी बाराच्या पोखरा ते काठमांडू फ्लाईटच्या आधी सकाळी बाबा आणि खुशीने परत एकदा सायकल वरून रपेट करण्याचं ठरवलं होतं.  काल ज्या दुकानातून सायकली घेतल्या होत्या त्या बाईंना बाबा आणि खुशीने कालच सांगून ठेवलं होतं उद्या सकाळी सातला आम्ही सायकली घ्यायला परत येऊ म्हणून.  बाबा आणि खुषीकडे दोन तास वेळ होता.  लेक साईड रोडने जात जिथपर्यंत चांगला सपाट रस्ता आहे तिथपर्यंत गेल्यानंतर बाबा आणि खुशी थांबले.

फेवा लेक च्या बाजूला एक छोटा ब्रेक

परत जाताना एका ठिकाणी थांबून बाबा आणि खुशीने ब्रेकफास्ट केला.  हॉटेल द कांतीपुर राहण्यासाठी उत्तम आहे, पण तिथे ब्रेकफास्ट आणि जेवण फारसं चांगलं नाही.

वेळेत हॉटेल सोडून बाबा आणि खुशी पोखरा एअरपोर्ट कडे चालत निघाले.  एअरपोर्ट वर सिमरिक एरलाईन्स च्या काउंटर वर कोणीच नव्हतं.  बऱ्याच वेळाने दोन कर्मचारी उगवले.  फ्लाईट लेट असणार ह्याचा बाबाला अंदाज आला.  पोखरा विमानतळाला महाबळेश्वर बस स्टॅन्ड सारखा टच आहे थोडासा.

बराच वेळ थांबवून शेवटी एकदाचं काठमांडू जाणाऱ्यांना विमानात बसवण्यात आलं.  एका रांगेत अलीकडे पलीकडे दहा दहा सीट.  मधे मोकळी जागा.  वीस सीट पैकी दरवाजाच्या समोरच्या सीट वर एअर होस्टेस बसली.  बराच वेळ झाला तरी विमान काही हलेना.  एका कर्मचाऱ्याने दरवाजातून आत येऊन ताजा खबर दिली, काठमांडू मधे हवामान खराब असल्यामुळे विमान इथेच थांबवून ठेवण्यात येत आहे.  सगळ्या प्रवाशांना परत खाली उतरवले. 



थोड्या वेळाने प्रवाशांना परत विमानात बसायला सांगण्यात आपले.  ह्या वेळी विमान काठमांडू च्या दिशेने उडाले.  काठमांडू जवळ आलं होतं तेव्हा विमानाने दोन तीन गपक्या घेतल्या.  फार वेळ न घालवता आहे त्या परिस्थितीत पायलटने विमान जमिनीवर उतरवले.  प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

बाबा आणि खुशी काठमांडू विमानतळावरून बाहेर आले.  हॉटेल रुद्र व्हू पर्यंत चालत गेले.  विमानतळावरून हॉटेलपर्यंत आणि हॉटेलवरून विमानतळापर्यंत चालत जाण्यात जी मजा आहे ती टॅक्सी मधे नाही.

संध्याकाळी एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा आज आराम करून उद्या पूर्ण दिवस काठमांडू फिरायचं असं बाबा आणि खुशीने ठरवलं.  हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात बाबा आणि खुशी पायी फिरून आले.  हॉटेल रुद्र व्हू मधे थुक्पा आणि मोमोज खूप छान मिळतात.  थुक्पा म्हणजे सूप आणि नूडल्स एका बाउल मधे एकत्र.  आपल्याकडे आपण ज्या चायनीज नूडल्स खातो त्यांना इथे चाऊमीन म्हणतात.  आपल्या इथे आपण जे पदार्थ चायनीज म्हणून खातो ते सगळे तिबेटियन पदार्थ आहेत.

सकाळी हॉटेल रुद्र व्हू मधला ब्रेकफास्ट करून बाबा आणि खुशी बाहेर पडले.  आजचा पहिला पडाव कोपान मोनॅस्टरी.  हि जागा जरी जगात भारी असली तरी तिथपर्यंत जायचा रस्ता वैताग आहे.  टॅक्सी घेतली ती होती सतरा वर्ष चालवलेली जुनी मारुती 800.  टॅक्सी ड्रायव्हर हि तसेच रिटायरमेंट ला आलेले.  सारखे खोकत होते.

सतरा वर्ष चालवलेली जुनी मारुती 800
कोपान मोनॅस्टरी मधे एक कोर्स चालू होता.  त्यामुळे आम्हाला मुख्य मेडिटेशन हॉल मधे जाता येणार नव्हते.  वीस मिनिटात बघून परत या असं सांगून दारावरच्या रखवालदाराने बाबा आणि खुशीला आत सोडले.  कोपान मोनॅस्टरी मधे नेपाळी लोकांना फक्त शनिवारीच प्रवेश असतो.  इतर दिवशी नाही.  तुम्ही इथे गेलात तर शनिवार सोडून इतर दिवशी जा.  ऑफिसच्या वरच्या पहिल्या मजल्यावरच्या लायब्ररीला भेट द्यायला विसरू नका.

मुख्य मेडिटेशन हॉल चे दार

पहिल्या मजल्यावरच्या लायब्ररी मधे बाबा आणि खुशी बराच वेळ होते.  जेवणाची वेळ झाल्यावर त्यांना बाहेर पडावे लागले.

बाबा आणि खुशीने फुलांचे मनसोक्त फोटो काढले.




कोपान मोनॅस्टरी मधून बाहेर पडल्यावर बाबा आणि खुशी आले त्या वाटेने परत निघाले चालत.  आजका अगला पडाव स्वयंभूनाथ.  थोड्या अंतरावर मायक्रो मिळाली.  मायक्रो म्हणजे मारुती इको पेक्षा थोडी मोठ्या आकाराची गाडी.  काठमांडू शहरातलं सर्वसामान्य जनतेचं दळणवळणाचं सर्वात जास्त वापरात असलेलं साधन.  गर्दिने ठासून भरलेली नाही, पण मोकळी मायक्रो खुशीला बघायला मिळाली.

मागच्या वर्षी बाबा फक्त शाक्य महाकाल मंदिर परिसरात येऊन परत गेला होता.  स्वयंभूनाथ राहून गेला होता.  पुण्यातल्या पर्वती डोंगरापेक्षा थोडा मोठा आहे स्वयंभूनाथ डोंगर.  डोंगराच्या भोवती सर्व बाजूंनी छोटी बौद्ध मंदिरं वगैरे आहेत.  डोंगरावर चालत जायला दोन बाजूंनी पायऱ्यांची वाट आहे.  डोंगर सर्व बाजूंनी झाडांनी भरलेला आहे.  ह्या परिसरात माकडं भरपूर आहेत.  त्यामुळे खाण्याचे पदार्थ हातात घेऊन फिरू नये.  धर्म ह्या संकल्पनेवर विश्वास नसणार्यांनी इथे भेट दिली नाही तरी चालेल.  फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून बघायला गेलेल्यांनी विसरू नये कि हा धार्मिक परिसर आहे.  इथे अर्ध्या चड्डीवर जाऊ नये.  प्रत्येक ठिकाणी चप्पल बूट घालून आत शिरू नये.  मुर्त्या, शिलालेख, घंट्या, स्तूप वगैरे तुटलेल्या जीर्ण अवस्थेत असतील तरी त्यांचा आदर ठेवावा.  त्यांच्यावर बसून फोटो काढू नयेत.  माज करायचाच असेल तर एखाद्या मशिदीत किंवा मदरशात जाऊन करावा.  तिथे नक्कीच योग्य प्रतिसाद मिळेल.

घंटा

दगडात केलेलं कोरीवकाम

स्तूप
सय मॉँटगोमेरी ह्या निसर्ग शास्त्रद्यांना अथेना द ऑक्टोपसचा डोळा जसा दिसला तसाच इथला स्तूप दिसतो : serene, all-knowing, heavy with wisdom stretching back beyond time.

धातूच्या फलकावर कोरलेला लेख

वज्र
वज्र ह्या संकल्पनेबद्दल जाणून घेण्यासाठी हे वाचा.

स्वयंभूनाथ डोंगरावरून दिसलेलं काठमांडू शहर
स्वयंभूनाथ डोंगराच्या पलीकडच्या बाजूने बाबा आणि खुशी उतरले शाक्य महाकाल मंदिराच्या परिसरात.

शाक्य महाकाल मंदिराच्या परिसरात
ह्या परिसरात सकाळी लवकर भेट देणं उत्तम.  सहा ते आठ.  सर्व जगाचा विसर पाडायला लावणारे वातावरण असते इथे सकाळच्या वेळी.

आता बाबा आणि खुशी निघाले काठमांडू दरबार स्क्वेअर पहायला.  तिसऱ्या शतकापासून इथे बांधकाम असण्याचे संदर्भ आहेत.  तेव्हापासून आजपर्यंतचा विचार करता इथली मंदिरं आणि राजवाडे वेळोवेळी घडत गेली, बदलत गेली.  सर्व इतिहास जाणून घ्यायचा असेल तर इथे आल्यावर गाईड करावा.  नाहीतर तिकिटाबरोबर मिळालेल्या माहितीपत्रकाचा आधार घ्यावा.

पंचमुखी हनुमान मंदिर

राजवाडा आणि राजवाड्याच्या परिसरात असलेली देवळं, मुर्त्या, मोकळ्या जागा, कारंजी, वगैरे अशा सर्व भागाला नेपाळमध्ये दरबार स्क्वेअर असं म्हणतात.

२००१ सालापर्यंत राजा आणि त्यांच्या कुटुंबियांचे विधी, कार्यक्रम इथे व्हायचे.  २००१ साली एखाद्या भयानक दुःस्वप्नात घडावं त्याप्रमाणे घडलेल्या घटनेत राजा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर नऊ जणांची हत्या घडली.  सध्या नेपाळमधे राजसत्ता अस्तित्वात नाही.

नरसिंह

२०१५ साली झालेल्या भूकंपात इथल्या अनेक वास्तूंचं नुकसान झालं.  सध्या चिन्यांच्या मदतीने पुनर्बांधणीचं काम चालू आहे.  धूर्त चिन्यांनी जितकी मदत केलीय त्याच्या दहापट केलेल्या मदतीची जाहिरात केलीय.

कोरीवकाम
कोपान मोनॅस्टरी, स्वयंभूनाथ, आणि काठमांडू दरबार स्क्वेअर ह्या तीन जागा बघून बाबा आणि खुशीने आजचा काठमांडू दौरा आटोपता घेतला.  उद्या दुपारच्या फ्लाईटच्या आधी एक जागा सकाळी बघून होऊ शकत होती.  हॉटेल मधल्या सगळ्यांचं म्हणणं पडलं कि आहे त्या वेळात चंद्रगिरीला जाऊन वेळेत परत येणे शक्य नाही.  आहे तेवढ्या वेळात पाटण दरबार स्क्वेअर बघून होईल.

बाबा आणि खुशी सकाळी सात वाजता हॉटेलच्या बाहेर पडले.  हॉटेलच्या बाहेरच टॅक्सी मिळाली.  टॅक्सीवाल्याशी बोलून बाबाला लक्षात आले कि चंद्रगिरीला जाऊन आपण वेळेत परत येऊ शकतो.  पाटण दरबार स्क्वेअरला जाण्यासाठी केलेली टॅक्सी चंद्रगिरीच्या दिशेने वळवली.

सव्वा आठला बाबा आणि खुशी तिकीट काउंटर समोर पोहोचले होते.  आज गर्दी नव्हती.  शनिवारच्या दिवशी इथे तुडुंब गर्दी असते.  चंद्रगिरी डोंगरावर जाण्याचे तीन पर्याय आहेत.  चालत, गाडीरस्त्याने, किंवा केबल कार मधे बसून.  चालत ट्रेक करायचा झाला तर अख्खा दिवस पाहिजे.  केबल कार मधे बसून दहा मिनिटात वर जाता येते.

केबल कार

नेपाळच्या इतिहासात चंद्रगिरी डोंगर महत्वाचा आहे.

चंद्रगिरी डोंगरावरून समोर दिसलेल्या बर्फाच्छादित पर्वतरांगा

आता बाबा आणि खुशीला भूक लागली होती.  पण वेळेत परत जाणं जास्त महत्वाचं होतं.

केबल कार मधून डोंगर उतरताना

हॉटेल पर्यंत परत जाताना टॅक्सीवाल्याने भलत्या प्रकारे टॅक्सी चालवली.  हॉटेल वर गेल्यावर प्रत्येकाने बाबाला विचारले, आलात का पाटण दरबार स्क्वेअर बघून.  बाबा आणि खुशी चंद्रगिरी डोंगरावर जाऊन आले ते ऐकून कोणी मोठी प्रतिक्रिया दिली नाही.  जी काही प्रतिक्रिया असेल ती सगळ्यांनी मनातच ठेवली.  "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ह्या म्हणीला नेपाळी भाषेत प्रति म्हण असेल तर ती आठवली असेल त्यांना.

हॉटेल सोडून बाबा आणि खुशी चालत काठमांडू विमानतळावर गेले.  जाताना वाटेत ब्रेकफास्ट केला.  बाबा आणि खुशी विमानात बसले होते तेव्हा समोर तिबेट एअरलाईन्स चं विमान दिसलं.  बाबाला जमलं तर कधीतरी ल्हासा बघायचंय.  चिनी ड्रॅगनने घशात घातलेला तिबेट कधी स्वतंत्र होईल असे वाटत नाही.

काठमांडू एरपोर्टवर  ...  दिल्लीला जाण्याच्या तयारीत
समोर तिबेट एअर लाईन्स चं विमान थांबलंय

काठमांडू ते दिल्ली फ्लाईट वेळेत निघालं.  दिल्लीला जायच्या ऐवजी विमान मधूनच लखनौला वळवण्यात आलं.  दिल्लीला वादळी हवामानामुळे विमान उतरवणे शक्य नव्हतं.  विमानातल्या अनेकांची पुढची फ्लाईट होती.  त्यातल्या काहींनी पुढे जाऊन गलका केला.  बाबाने विचारल्यावर एअर होस्टेस ने सांगितलं कि तुमचं दिल्ली ते पुणे विमान वेळेत मिळेल.  बाबाने विचार करून दिल्ली ते पुणे फ्लाईट चार तासानंतरचं घेतलं होतं.  आणि दोन्ही फ्लाईट इंडिगो एअरलाईन्सची.  वेगवेगळ्या कंपन्यांची फ्लाईट घेऊ नयेत.  काही वेळ लखनौला थांबून विमान निघालं दिल्लीला.  दिल्लीला जाताना इंडीगो तर्फे त्यांनी प्रत्येकाला नूडल्स खायला दिल्या.  काठमांडू ते दिल्ली ह्या तिकिटात काठमांडू ते लखनौ आणि लखनौ ते दिल्ली असा ज्यादाचा विमान प्रवास, आणि फुकटात नूडल्स खायला मिळाल्यामुळे दिल्लीला पोहोचल्यावर मागच्या सीट वरच्या गुजराती बाई फोनवर सांगत होत्या, "पैसा वसूल हो गया."  गुजराती पर्यटक जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी सर्व काही पैशात मोजतात.  आणि त्यांची तोंडं सतत चालू.  एकतर खाण्यासाठी नाहीतर बडबडण्यासाठी.

दिल्लीला इंटरनॅशनल एअरपोर्ट वर उतरल्यानंतर बाबा आणि खुशीने बॅगा घेतल्या.  आता त्यांना डोमेस्टिक एअरपोर्टच्या टर्मिनल एक ला जायचं होतं.  जे इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून दहा किलोमीटर लांब होतं.  त्यात बस, टॅक्सी करायची तर सगळे दिल्लीचे भामटे.  बाबा आणि खुशी डोमेस्टिक एअरपोर्टच्या टर्मिनल एक ला पोहोचले तेव्हा त्यांच्या दिल्ली ते पुणे विमानाची वेळ होऊन गेली होती.  ते विमान एक तास उशिरा सुटत होतं.  त्यामुळे बाबा आणि खुशीला मिळालं.  भर पावसातच विमान दिल्लीहून निघालं.  पुण्यात पोहोचल्यावर बाबा आणि खुशीसाठी वातावरण एकदम वेगळं.  पाऊस, थंड हवा बिलकुल नाही.  पुढचे चार दिवस बाबा आणि खुशीला वाटत होतं ह्या कुठल्या तप्त वाळवंटात येऊन पडलोय आपण.  हळूहळू दख्खनच्या पठारावरच्या भाजक्या उन्हाळ्याची सवय झाली.

3 comments:

  1. भाषेवरच, इंग्रजी आणि मराठी, प्रभुत्व अप्रतिम.लिखाणात प्रत्यक्ष स्थलदर्शनाच्या अनुभूतीचे सामर्थ्य. खुशी बाबांच्या तालमीत तयार होताना दिसतेय.

    ReplyDelete