पाच सहा वर्षांपूर्वी कधीतरी आंतरजालावर महाराष्ट्राचा, सह्याद्रीचा मागोवा घेत असताना साल्हेर नावाच्या गिरिदुर्गाची माहिती मिळाली. महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर. पहिला मान कळसुबाईचा. साल्हेर - महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला. मला इथे जायचं होतं. पण आपल्या नशिबात कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नसते. आणि असेच असावे. विनासायास आयतं जे मिळतं त्याची कुणाला किंमत नसते. अनेक प्रयत्नांनंतर जे मिळतं त्याचं मोल आपल्याला समजलेलं असतं. इतक्या वर्षांनी साल्हेर भेटीचा योग आता जुळून आला. भेटही अफाट आनंददायी झाली. त्याचा हा इतिवृत्तांत.
अनेक ट्रेकिंग ग्रुप वाले साल्हेर सालोटा मोरा हरगड वगैरे असा दोन दिवसाचा मोठा दौरा ठेवतात. मला तो नको होता. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त ठिकाणं बघायला मला आवडत नाही. मला भेटायचं होतं फक्त साल्हेरला. दिवसभराचा वेळ देऊन. त्याचा योग्य तो मान राखून.
साल्हेर चढून जायचे तीन मार्ग आहेत.
१. वाघांबे गावातून सुरु होणाऱ्या वाटेने साल्हेर-सालोटा ह्यांच्यामधल्या खिंडीतून साल्हेरला जाता येते. बरेचजण ह्या वाटेने जातात.
२. माळदर गावातून निघून साल्हेर-सालोटा ह्यांच्यामधल्या खिंडीतून साल्हेरला जाता येते.
३. साल्हेरवाडी गावातून सुरु होणाऱ्या वाटेने साल्हेरला जाता येते.
आमच्या स्वारीसाठी स्वप्नीलने साल्हेरवाडी गावातून सुरु होणाऱ्या वाटेची निवड केली. तशी आमची स्वारी शुक्रवारी रात्री सुरु झाली. ऑफिस वगैरे आटपून स्वप्नील अकराच्या सुमारास कोकणे चौकात आला. सुदैवाने चाकण भागात ट्रॅफिक जॅम लागले नाही. मोकळे रस्ते मिळाल्यावर निसान टेरॅनो सुसाट पळते. नेपाळ, भूतान, एव्हरेस्ट, सह्याद्री, आणि अनेक विषय आमच्या चर्चेस आले. नाशिकला आम्ही अपेक्षेपेक्षा तासभर आधी पोहोचलो होतो. गाडी एका योग्य जागी थांबवुन तासभर झोप काढली. मला तर हा एक तास पाच मिनीटांसारखा वाटला. डासांनी त्यांच्या पद्धतीने मला जागे केले. मग प्रथमेशला उचलायला निघालो. प्रथमेश आम्हाला सामील झाल्यावर त्याच्याकडे टेरॅनो सुपूर्द केली. मागच्या सीट वर जमेल तितका झोपायचा माझा विचार होता. माझ्यासाठी झोप आवश्यक होती. दिवसभर पायगाडी चालवायची होती ना. आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात पुन्हा टेरॅनो. पण आता उजाडलं होतं. नाशिक सोडल्यानंतर एकामागुन एक डोंगर डोकावायला लागले. सगळेच स्वप्नीलचे मित्र.
एका ठिकाणी थांबुन पोटपूजा केली. स्वप्नील दोनदा चहा प्यायला. हा अस्सल चहाप्रेमी असून मिळेल तिथे चहा पितो. काल रात्री आमची स्वारी सुरु झाल्यापासुन ह्याचे चार चहा झालेत. नारायणगावला पहिला, नाशिक मधे दुसरा, आणि आता सकाळी दोन. नाशिकहून दिंडोरी, वणी, सप्तशृंगी, अभोणा, कनशी, डांगसौंदाणे ह्या मार्गे साल्हेरवाडीत, म्हणजे आमच्या आजच्या स्वारीच्या बेस कॅम्प मधे दाखल झालो. साल्हेरवाडीत पोहोचल्यावर टेरॅनो लाउन दिली तिच्या दिवसभराच्या विश्रांतीसाठी. नऊच्या सुमारास आम्ही साल्हेर कडे कूच केले. आमची पायगाडी सुरु होतेय तोच एक ट्रेकर आम्हाला येऊन मिळाला. हा साल्हेर solo (एकटा) करणार होता. आम्हाला बघुन आमच्यात आला. आम्ही आता तिनाचे चार झालो.
|
आज कुठवर पल्ला गाठायचाय ते बघताना प्रथमेश आणि स्वप्नील |
आम्हाला मिळालेला सह्यमित्र शुभम काल दिवसभरात दोन किल्ले एकट्याने पाहुन मग साल्हेरवाडीत येऊन झोपला होता. आता सकाळी साल्हेरला सुरुवात करताना आमच्याबरोबर सामील झाला. जमलं तर उद्या नवीन कुठलातरी किल्ला बघण्याचा ह्याचा बेत होता. माणसाने असे धडाकेबाज असावे.
आकाश ढगाळलेलं होतं. पण पाऊस नव्हता. वातावरणात आर्द्रता नव्हती. एकंदरीत मौसम विभाग आज आमच्यावर खुश होता. गावकरी शेळ्या मेंढ्या गुरं चरायला आमच्या आधीच बाहेर पडलेले. आम्हा तिघांना देवीचे मंदिर बघून परत यायला सांगुन स्वप्नील
टाइम लॅप्स फोटो काढायच्या तयारीला लागला. वर ढगांच्या विविध स्पर्धा चालु होत्या ना. साल्हेरवाडी गावातुन साल्हेरला जाताना स्वप्नीलच्या म्हणण्यानुसार किल्ला पायथ्यापासुनच सुरु होतो. म्हणजे छोटे मोठे अवशेष कुठे कुठे आपली आतुरतेने वाट पहात असतात. एका भिंतीवर गणपती कोरलेला.
|
भिंतीवरचा गणपती |
भिंतीवरचा गणपती पाहून पुढे निघाल्यावर दहा मिनिटांनी पोहोचलो पहिल्या दरवाजात. दरवाजात दोन्ही बाजूला द्वार शिल्प. शुभ चिन्ह म्हणुन कमळ शिल्प. स्वप्नीलने आम्हाला ह्याबद्दल माहिती दिली. चुन्याचा वापर न करता दगडावर दगड रचून इथे बुरुज आणि भिंती बांधलेल्या.
|
पहिल्या दरवाजात |
पाच मिनिटांनी पोहाचलो दुसऱ्या दरवाजात. दुसरा आणि तिसरा दरवाजा मिळून उत्तम संरक्षण व्यवस्था बनवलेली.
|
दुसरा आणि पलीकडे तिसरा दरवाजा |
इथे दरवाज्यात शिलालेख दिसला. काय लिहिलंय ते मी अजुन शोधतोय.
|
दरवाजातला शिलालेख |
साल्हेरवाडीतुन साल्हेरला जाताना सहा दरवाजे लागतात. तीन झाले आणि तीन राहिले. पुढच्या पाच मिनिटात आम्ही पोहोचलो वीर सरदार सूर्याजी काकडे ह्यांच्या समाधीपाशी.
|
वीर सरदार सूर्याजी काकडे ह्यांची समाधी |
पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे शिवरायांच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांपैकी एक. १६७२ साली साल्हेर गावाजवळ मुघलांबरोबर झालेल्या घनघोर लढाईत छोट्या तोफेचा गोळा लागुन हे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. मराठ्यांनी मुघलांविरुद्ध मोकळ्या मैदानात जिंकलेली हि पहिली लढाई. झाले असे कि १६७१ साली शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेदरम्यान साल्हेर स्वराज्यात आला. हि बातमी दिल्ली दरबारी पोहोचल्यावर पादशहा चिडला. त्याने इखलास खान आणि बहलोल खानास वीस हजार घोडेस्वारांसह साल्हेर काबीज करायला पाठवले. १६७२ मधे मोगल फौजेने साल्हेरला वेढा घातला. शिवाजी राजांनी गुप्तहेरांमार्फत सरनौबत प्रतापराव गुजरांना फौज घेऊन साल्हेरकडे जाण्याचा संदेश दिला. तसेच पेशवे मोरोपंत पिंगळे ह्यांना फौजेनिशी कोकणातुन पाठवले. साल्हेर गावाला
घनघोर लढाई झाली.
सभासद बखरीत ह्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते ते खालीलप्रमाणे.
एक तर्फेनें लष्करांनी घोडी घातलीं. एक तर्फेने मावळे लोक शिरले. आणि मारामारी
केली. मोठें युद्ध जाहालें. चार प्रहर दिवस युद्ध जाहालें मोंगल, पठाण, रजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटें आराबा घालून युद्ध जाहालें. युद्ध होतांच पृथ्वीचा धूराळा असा उडाला कीं, तीन कोश औरसचौरस आपलें व परकें माणूस दिसत नव्हतें. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहालें. घोडीं, उंट, हत्ती, [यांस] गणना नाहीं. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहाले त्यामध्यें रुतों लागलें. असा कर्दम जाहाला. मारतां मारतां घोडे जिवंत उरले नाहींत. जे जिवंत सापडले ते साहा हजार घोडे राजियाकडे गणतीस लागले. सवाशें हत्ती सांपडले. साहा हजार उंटें सांपडली. मालमत्ता खजीना, जडजवाहीर, कापड, अगणित बिछाईत हातास लागली. बेवीस वजीर नामांकित धरले. खास इखलासखान व बेलोलखान पाडाव जाले. ऐसा कुल सुभा बुडविला. हजार दोन हजार सडे सडे पळाले. असें युद्ध जालें. त्या युद्धांत प्रतापराव सरनोबत व आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रुपाजी भोंसले व सूर्यराव कांकडे, शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदाजी जगताप व संताजी जगताप व मानाजी मोरे व विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ व मुकुंद बल्लाळ, वरकड बाजे वजीर, उमराव असे यांणी व सरदारांनीं कस्त केली. तसेंच मावळे लोक यांणी व सरदारांनीं कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत या उभयतांनीं आंगीजणी केली. आणि युद्ध करितां सूर्यराव कांकडे पंचहजारी मोठा लष्करी धारकरी, याणे युद्ध थोर केलें. ते समयीं जंबूरियाचा गोळा लागून पडला. सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे. भारतीं जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला. वरकडही नामांकित शूर पडले. असें युद्ध होऊन फत्ते जाहाली.
अशा ह्या ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यात ठिकठिकाणी ऐतिहासिक वस्तु, शिल्पं दिसतात.
|
मारुती |
माचीवर चढून आल्यावर वाट आता बऱ्यापैकी सपाट भागातुन चाललेली.
|
ऐतिहासिक शिल्प |
आता वाटेच्या उजव्या हाताला साल्हेरचं शिखर आणि डाव्या हाताला नजर जाईल तिथपर्यंत छोटे मोठे डोंगर. पहाटे नाशिक सोडल्यापासुन आजुबाजुला छोटे मोठे दिसतायत आणि स्वप्नील प्रत्येक डोंगर ओळखतोय. प्रत्येकाची माहिती देतोय. अरे मला तर माझ्या घरातल्या वस्तुंच्या जागाही माहित नाहीयेत इतक्या अचूकपणे.
|
डावीकडचा नाखिंद्या आणि उजवीकडचा कोठ्या |
तिसऱ्या दरवाजातुन निघाल्यापासुन अर्ध्या तासाने आम्ही चौथ्या दरवाजापाशी पोहोचलो. पाचवा आणि सहावा दरवाजाही लागोलाग मिळाला.
|
सहावा दरवाजा |
सहाव्या दरवाजातुन पलीकडे गेल्यावर आम्ही पोहोचलो होतो साल्हेरच्या पठारावर. थोड्या अंतरावर होते एक यज्ञकुंड.
|
यज्ञकुंड |
इथुन पुढे पंधरा मिनिटांवर मिळाला गंगासागर तलाव आणि रेणुका मातेचं मंदिर. तलावातलं पाणी पिण्यासारखं राहिलं नव्हतं. आधीच एकविसाव्या शतकात माणसांची बुद्धी कमी चालते. त्यात प्लास्टिकचा अनिर्बंध वापर म्हणजे माकडाच्या हाती कोलीत. पाण्यातला आधुनिक कचरा ह्या प्राचीन परिसरात जबरदस्त कॉन्ट्रास्ट होता.
|
रेणुका देवीच्या मंदिराच्या आवारातला एक प्राचीन दगड. की प्राचीन काळच्या खांबाचा एक भाग?
पलीकडे गंगासागर तलाव |
इथे स्वप्नीलने टाइम लॅप्स फोटो काढला.
गंगासागर तलावाशेजारी आहे रेणुका मातेचं पुरातन मंदिर. रेणुका देवीच्या मंदिराच्या आवारात कोरीवकाम केलेले अनेक दगड आहेत. मला वाटतं इथे कधीकाळी दगडी खांब असलेला मंडप असावा. काळाच्या ओघात मंडप गायब झाला असावा. आता फक्त खांबाचे दगड उरले.
|
रेणुका देवीच्या मंदिराच्या आवारातला प्राचीन दगड. मला हा प्राचीन काळच्या खांबाचा भाग वाटला. |
आता आम्ही निघालो साल्हेरच्या शिखराकडे. परशुरामांचं मंदिर समोर दिसत होतं. चौघेही लांब पल्ल्याचे ट्रेकर असल्याने आमच्यात अजुन दमले कोणीच नव्हते.
|
साल्हेरच्या शिखराकडे जाताना |
परशुराम मंदिरासमोरच्या चौथऱ्यावर आचरट पर्यटकांनी इतिहासात उमटवलेले त्यांचे ठसे मराठीत नाही तर गुजरातीत. इथुन गुजरात समोर दिसतो. बहुदा मराठी ट्रेकर्स पेक्षा गुजराती पर्यटक इथे जास्त येत असावे. आमच्या नशिबाने आज इथे गर्दी नव्हती. स्वप्नीलच्या माहिती प्रमाणे रविवारी गुजरातहुन बऱ्यापैकी पर्यटक येतात इथे.
|
लिहावे तरी पायधुळी मिरवावे |
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला किल्ला एवढ्यापुरताच साल्हेर मर्यादित नाही. साल्हेर हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर. समुद्रसपाटीपासुन उंची १५६७ मीटर. चहुबाजुचे छोटे मोठे डोंगर इथुन बघताना खुजे वाटतात. ढगांच्या शर्यती तर अप्रतिम बघण्यासारख्या. असा अवाढव्य कॅनव्हास बघत बघण्यासारखं दुसरं सुख नाही.
|
महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उंच शिखरावरून ... सेलबारी डोंगररांगेचा अप्रतिम नजारा |
आल्या वाटेने परत न जाता आम्ही साल्हेर-सालोटा ह्यांच्यामधल्या खिंडीतून येणाऱ्या वाटेने खाली निघालो. खिंडीपर्यंत न जाता ह्या वाटेतले दरवाजे पाहुन परत यायचा बेत होता. माझं रात्रभर ड्रायविंग आणि जेमतेम एक तास झोप. थकव्याने सोप्या जागीही घात होऊ शकतो. त्यामुळे नेहमीपेक्षा वेग कमी करून सावधगिरीने उतरायला सुरुवात केली. जसजसे पुढे गेलो तसतशी वाट अवघड होत गेली. काहीतरी गडबड झाल्याचा स्वप्नीलला संशय आला. आम्ही उतरण्याची वाट न घेता एक दुसरीच पायवाट पकडली होती. उतरून ज्या दरवाज्यात आम्हाला जायचे होते तो आमच्या खालच्या बाजुला कुठेतरी होता. आम्ही त्या दरवाज्याच्या वरच्या कड्यावर पोहोचलो होतो. कड्यावर पोहोचल्यानंतर समोर सालोटा साद घालत होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र इथुन मार्ग नव्हता. आम्ही पोहोचलो होतो तिथून समोर शेकडो फूट दरी. वाट ह्या कड्यावर येऊन संपली होती.
|
साल्हेरहून सालोट्याचे अवलोकन करताना ... अद्वितीय सह्यमित्र स्वप्नील खोत |
आता आमच्याकडे एकच पर्याय होता. आल्या वाटेने परत जाऊन खिंडीत जाणारा मार्ग घेणे. चौघातलं कोणीही पॅनिक झालं नाही. वाटा शोधणे आणि मार्ग काढणे हे आम्हाला नवीन नव्हते. तसं बघितलं तर सरळसोट मळलेल्या वाटेने केलेल्या वरणभात ट्रेकमधे मजा नाही. त्यात वाटा शोधण्याची अशी एखादी लोणच्याची फोड हवीच चवीला. आणि समोर आलेल्या परिस्थितीला न डगमगता सामोरे जायला इथेच तर शिकता येते ह्या बिनभिंतीच्या शाळेत. ह्या बिनभिंतीच्या शाळेबद्दल बरंच काही आहे बोलण्यासारखं. बोलू आपण कधीतरी.
|
बिकट वाट वहिवाट असावी धोपट मार्गा सोडु जरा
सह्याद्रीमधि सह्य गड्यांनो अखंड भटकत फिरू जरा |
आल्या वाटेने शांतपणे परत फिरलो. सावधपणे दरवाज्यात पोहोचुन तिथुन खिंडीत जाणारा योग्य मार्ग पकडला. इथुन समोर सालोटा आणि त्यावर जाणारी वाट दिसत होती.
|
सालोटा |
साल्हेरहुन साल्हेर-सालोटा ह्यांच्यामधल्या खिंडीत जाणारी हि वाट आम्ही साल्हेरवाडितुन चढून आलो त्या वाटेपेक्षा वेगळी होती. इथे पर्वताचा कडा कापुन त्यात वाट बनवलेली. तटबंदी बनवण्याची गरजच नाही. शेकडो फुटांचा सरळसोट कडा हेच इथले नैसर्गिक संरक्षण. काही ठिकाणी पाषाण खडक फोडून पाण्याची टाकं, गुहा बनवलेल्या.
|
साल्हेरबद्दल, सह्याद्रीबद्दल, इतिहासाबद्दल भरभरून बोलताना स्वप्नील खोत |
पुढच्या दरवाज्यात पोहोचल्यावर स्वप्नील म्हणाला ह्या जागेवरून सर्वजण दरवाज्यातुन समोर दिसणाऱ्या सालोट्याचे फोटो काढतात. आम्हीही काढले.
|
दरवाजातुन समोर दिसणाऱ्या सालोट्याचा फोटो काढताना |
ह्याआधी स्वप्नील सहा वेळा साल्हेरला आला होता. माझी, प्रथमेशची, आणि शिमवची हि पहिलीच साल्हेर भेट.
|
दरवाजातुन समोर दिसणारा सालोटा ... स्वप्नीलच्या कॅमेऱ्यातुन |
इथुन पुढे डोंगराचा कडा कापुन वाट बनवलेली. कड्याच्या बाजुनेही जमेल तितकी भिंत राहु दिलेली. वाऱ्यापासुन संरक्षण. शेकडो फूट खोल दरीत पडण्याची भीती नाही. पुढच्या दरवाजात एक शिलालेख दिसला.
|
शिलालेख |
इथे स्वप्नील ची वारा खात बसायची आवडती जागा. चौघेही बसलो. पावणेदोन झाले होते. आता खाद्य विश्रान्ती गरजेची होती. घरात जे पदार्थ खाल्ले जात नाहीत ते सुद्धा अशा ठिकाणी रुचकर लागतात. खाद्य विश्रान्ती नंतर इथुन आम्ही परत फिरायचे ठरवले. दोन वाजत होते. साल्हेरवाडीत उतरून जायला आमच्याकडे मुबलक वेळ होता. बरोबर पाणीही मुबलक होते.
आता मी माझी स्पेशल फोटोग्राफी सुरु केली. तटबंदीवर एक पाय पुढे ठेऊन फोटो. असे फोटो नंतर बघताना भयानक दिसतात. प्रत्यक्षात काढताना सोपे असतात. हो फोटो काढणाऱ्याला दृष्टीभय नसावे आणि तो sure footed असावा. आणि खरंतर "देवाक काळजी" हे ज्याने त्याच्या गाडीच्या मागच्या बाजुला
लिहिलेय किंवा स्वतःचा WhatsApp Status ठेवलाय त्याला चांगल्या प्रकारे
ओळखता येतं कुठे आणि कसं उभं राहायचं आणि बसायचं. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स ओळखता येतो. ज्याने कधी स्वतःच्या घराजवळची टेकडीही चढलेली नाही त्याला ह्याच काय सगळ्या डोंगरातल्या सगळ्या जागा धोकादायक आहेत. पुर्वीच्या काळी ह्यांच्यासाठी होते "घरबशांसाठी नकाशे". काल्पनिक नकाशे ज्यांच्यात सगळीकडे विचित्र प्राणी, साप, राक्षस वगैरे दाखवलेले. कुठेच जाऊ नका. घरीच बसा. सगळीकडे भयानक धोका आहे. आताच्या जमान्यात ह्यांच्यासाठी आहे टी व्ही. घरबसल्या सगळं दिसतंय. जोडीला स्मार्ट फोन आहेच. कशाला जिवाला कष्ट घ्या.
|
माझी स्पेशल फोटोग्राफी |
समोरच्या दरीत ओढ्याचे कोरडे पात्र बघुन मला रायलिंग पठारावरून समोर दरीत पाहिलेली कोरडी काळ नदी आठवली.
|
माझी स्पेशल फोटोग्राफी |
पुढचा फोटो बसुन काढण्यातला. हाही नंतर बघताना भयानक दिसतो पण काढायला सोपा आहे. माझी स्पेशल फोटोग्राफी चालु असताना स्वप्नील आणि प्रथमेशने माझे फोटो काढले. ही फोटोग्राफर मंडळी हुशार असते. कुठे पटकन फोटो काढायचा ते ह्यांना सांगावे लागत नाही.
|
स्वप्नीलच्या कॅमेऱ्यातुन ... माझी स्पेशल फोटोग्राफी
पलीकडे सालोटा |
ह्या भागाला मीपणाचा रंग फासला गेला असल्यास माफी असावी. तसा माझा उद्देश नव्हता. पुढच्या दरवाजातुन वर पोहोचल्यावर साल्हेरच्या शिखराकडे न जाता साल्हेरवाडीहुन येणाऱ्या वाटेकडे आमची पायगाडी वळली.
इथे कारवीची छोटी झुडुपं जागोजागी. नंतर राजकुमार डोंगरे सरांकडुन माहिती मिळाली कि ही टोपली कारवी.
|
टोपली कारवी |
बहुदा ही लहान रोपटी असावीत. सह्याद्रीच्या ह्या कठीण खडकात टिकायचे वाढायचे; आणि वर कडक ऊन, झोडपुन काढणारा पाऊस, आणि बोचरं थंडी वारं. अशात कारवी वाढते. नुसतीच वाढत नाही तर डोंगरच्या डोंगर भरून टाकते. जिथे इतर बऱ्याच झाडांचा टिकाव लागत नाही.
इथे अनेक भग्नावशेष विखुरलेले. कधीकाळी हनुमानाचं मंदिर असावं.
|
भग्नावशेष विखुरलेले |
गंगासागर तलावापासुन साधारण सव्वा तासात उतरून साल्हेर वाडीत परतलो.
आम्ही उतरायच्या शेवटच्या टप्प्यात होतो तेव्हा जवळपासच्या गावातले काही जण चढून जात होते. अंधार पडायच्या आत ते नक्कीच वरपर्यंत पोहोचत नव्हते. पोहोचले असते तरी पुढे काय? बहुदा थोडं अंतर जाऊन परत उतरून येणार असावेत.
मला बघायचे होते ते खडकातले भलेमोठे पावलांचे ठसे काही गवसले नाहीत. पाच सहा वर्षांपूर्वी एका ब्लॉग मधे मला त्यांची माहिती मिळाली होती. पण तो ब्लॉग काही आता सापडत नव्हता. स्वप्नीलच्या ओळखीत एक जण आहेत जे शंभर वेळा साल्हेरला गेलेत. त्यांचा फोन दिवसभरात लागला नाही. नंतर नाशिकहून पुण्याकडे जाताना त्यांचा फोन लागला. त्यांनी स्वप्नीलला शिखरावरच्या परशुराम मंदिरातल्या पादुकांबद्दल सांगितलं. खालच्या साल्हेरवाडी गावातल्या गावकऱ्यांना अशा काही पावलांबद्दल माहिती नव्हती.
|
उतरल्यानंतर परत एकदा पाहुन घेतला महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला |
साल्हेरवाडीत चहा पोह्यांचा कार्यक्रम करून नाशिक दिशेला मार्गस्थ झालो. शिवम त्याचा उद्याचा प्लॅन बदलुन आमच्याबरोबर आला. आता हा नारायणगाव जवळ राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे जाणार होता. आदल्या दिवशी एकट्याने दोन किल्ले आणि आज साल्हेर. खूप झालं कि.
पाऊस पडत नव्हता पण वातावरण भन्नाट होतं. ह्या भागात ढगांचं आणि डोंगरांचं काय चालतं अभ्यास कारण्यासारखं आहे. त्यांच्यात वारा सोबतीला.
गाव तिथं यष्टी झाली असली तरी ती इथे बागलाणात पोहोचलेली दिसली नाही. इथे जीपगाड्यात पुरेपूर माणसं कोंबलेली. टपावर पण भरपूर बसवलेली. जीपगाडीच्या मागुन आणि बाजुनेही लटकवलेली. बैलगाडी हा पुणे जिल्ह्यात दुर्मिळ झालेला प्रकार इथे पाहायला मिळाला.
एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला नागशिल्प आहेत म्हणुन स्वप्नीलने माहिती दिली. ति जागा आल्यावर नागशिल्प पहाण्यासाठी थांबलो. तोपर्यंत समोर पुसटसं इंद्रधनुष्य तयार झालेलं. ढग, डोंगर, आणि वारा ह्यांचा खेळ तर जिकडे तिकडे चालु होताच. नागशिल्प सोडुन आम्ही त्यांच्या मागे.
|
ढग, डोंगर, वाऱ्याचा खेळ कॅमेऱ्यात टिपताना |
नागशिल्पांना गावकऱ्यांनी शेंदूर फासलेला.
|
नागशिल्प |
नाशिकच्या दिशेने थोडं पुढे गेल्यावर बघतो तर नारायणरावांनी जाता जाता नवनवीन रंगांचा खेळ मांडलेला. सोबतीला जिकडे तिकडे त्याच जोडीचे डोंगर किल्ले. किती वेळा गाडी थांबवणार आणि किती वेळा फोटो काढणार.
स्वप्नीलचा प्लॅन होता नारायणगावला त्याच्या काही मित्रांना भेटून त्यांच्याबरोबर हरिश्चन्द्रगडावर जायचा. पण त्याच्या मित्रांनी प्लॅन रद्द केला. हो नाही करता करता स्वप्नीलनेही पुण्यात परतण्याचा निर्णय घेतला. आता स्वप्नीलचा फोन झाला त्याच्या ओळखीतल्यांबरोबर जे शंभर वेळा साल्हेरला गेलेत. माझी माहिती बरोबर होती. साल्हेरला खरंच खडकातले भलेमोठे पावलांचे ठसे आहेत. शिखरावरचं सध्याचं परशुराम मंदिर हे नव्याने बांधलेलं आहे. आधीचं परशुराम मंदिर आताच्या मंदिरापासुन काही अंतरावर होते. तिथेच खडकातले भलेमोठे पावलांचे ठसे आहेत. म्हणजे आता परत एकदा साल्हेरला जावं लागणार.
नाशिक मधे त्याच्या घराजवळ प्रथमेशने आमचा निरोप घेतला. आता शिवम माझ्या बाजुच्या सीट वर आला आणि स्वप्नील मागच्या सीट वर झोपायला गेला. सिन्नर फाट्यावर लक्षात ठेऊन बाह्यरस्ता घेतला. इथला नवीन रस्ता म्हणजे विमानांचा रनवे! आणि रस्त्याला गाड्याही नाहीत. पण आता पुणे नाशिक रस्त्याला टोलवाटोलवी झाली आहे. एका ठिकाणी आम्ही तिघांनी थोडी पेटपूजा करून घेतली.
नारायणगाव बस स्टॅन्ड समोर शिवम चे भाऊ त्याला घ्यायला आले होते. इथुन पुढे स्वप्नील आणि मी दोघं. आता मला झोप यायला लागली. दोनदा गाडी थांबवुन आराम केला. स्वप्नीलला त्याच्या घराजवळ सोडून मी घरी पोहोचायला अडीज वाजत होते. अंघोळ करण्याची गरज होती पण अंगावरची साल्हेरची पुटं लगेच धुऊन टाकायला मन अजिबात तयार नव्हतं.
ह्या प्रचंड यशस्वी साल्हेर स्वारी नंतर आता नाशिक बागलाण भागात लक्ष घालणे गरजेचे आहे. माझ्या डोक्यात चक्र फिरलीयेत आणि एक प्लॅन तयार झालाय. बघूया कधी जमतेय ते.