"अनुगच्छतु प्रवाह" हे आम्ही शालेय जीवनात शिकलो नाही. शिकलो असतो तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. असो. एका सुट्टीच्या आदल्या दिवशी घरात फर्मान निघाले कि उद्या आपल्याला अबकड ह्या नातलगांना भेटायला जायचे आहे. अनुगच्छतु प्रवाह ह्या सूत्रानुसार अस्मादिकांनी मिळालेली भूमिका दिवसभर जमेल तशी पार पाडली. ठिकाण होते कान्हुर मेसाई. पाबळ गावाच्या शेजारचे गाव. पाबळ गावातली मस्तानीची समाधी बघता येईल का ह्या विनंतीला मान देऊन आमच्या स्नेह्यांनी ह्या ठिकाणाची भेट घडवून आणली.
कोण होती मस्तानी?
थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या दोन पत्नींपैकी एक होती मस्तानी.
जन्म : २९ ऑगस्ट १६९९
जन्म स्थळ : पन्ना राज्य, बुंदेलखंड
वडील : महाराजा छत्रसाल बुंदेला
पती : थोरले बाजीराव पेशवे
अपत्ये : समशेर बहादुर ऊर्फ कृष्णराव
मृत्यू ठिकाण : पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे
पन्ना राज्याचे राजे महाराजा छत्रसाल बुंदेला ह्यांनी १७२० साली दिल्ली च्या मुसलमान सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य घोषित केले आणि आठ वर्ष यशस्वी लढा दिला. मुहम्मद खान बंगेश ह्याने जेव्हा त्याच्या सैन्यासह हल्ला केला तेव्हा महाराजा छत्रसाल बुंदेला ७९ वर्ष्याचे होते. घनघोर युद्धात पराभव झाल्यावर महाराजा छत्रसाल बुंदेला जैतपूरच्या किल्ल्यात आश्रयाला गेले. मुसलमान हल्लेखोरांनी त्यांचे बहुतेक सर्व राज्य काबीज करून लुटले. महाराजा छत्रसाल बुंदेला ह्यांनी थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्याकडे मदत मागितली.
थोरले बाजीराव पेशवे सैन्यासह चाल करून गेले आणि त्यांनी मुसलमान हल्लेखोरांचा पराभव केला. महाराजा छत्रसाल बुंदेला ह्यांनी थोरले बाजीराव पेशवे ह्यांना झाशी प्रांत दिला तसेच त्यांची मुलगी मस्तानी बाजीरावास दिली. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावे हा या मागचा हेतू होता.
पाबळ हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. दुष्काळी किंवा अर्ध दुष्काळी भाग म्हणा. या ठिकाणी मस्तानीला मुद्दामून राहायला पाठवण्यात आले किंवा अन्य काही कारण होते हे अस्मादिकांस माहित नाही.
No comments:
Post a Comment