आमच्या दुसऱ्या गुजरात फॅमिली ट्रिप मध्ये आम्ही पाहिलेलं लिटिल रण ऑफ कच्छ इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. गोड मानून घ्यावा. खारट दिसला तरी.
दुसऱ्या गुजरात फॅमिली ट्रिप मध्ये आमचा
रण ऑफ कच्छ ह्या ठिकाणी भेट द्यायचा बेत ठरला. ट्रिप च्या आधी कुठे जायचं, काय पाहायचं असं संशोधन करताना आम्हाला
लिटिल रण ऑफ कच्छ हि जागा समजली. इथल्या काही भागात पक्षी निरीक्षक येतात. आम्हाला पक्षी निरीक्षणात रस नव्हता. आम्हाला इथला स्थानिक प्राणी म्हणजे रानटी गाढव पाहायचे होते. इथले सपाट वाळूचे भाग बघायचे होते. भुज आणि रण ऑफ कच्छ बघून झाल्यानंतर आमची स्वारी आली लिटिल रण ऑफ कच्छ मध्ये. किडी आणि जोगड ह्या दोन गावांच्या मधल्या भागात असलेल्या इको कॅम्प ह्या ठिकाणी.
किडी गावाच्या पुढे रस्ता अरुंद. रस्त्यात एक गायींचा खूप मोठा कळप चालला होता. शंभर एक गाई असतील. अरुंद रस्ता अख्खा गाईंनी व्यापलेला. आमची रुंद टेरॅनो त्या कळपात घालायला मन होईना. सहा दिवस गुजरातच्या सपाट रस्त्यांवर शंभरच्या वर वेगात पळणारी टेरॅनो आता गोगलगायीच्या चालीने चाललेली. असा बराच वेळ गेला. मग मागून एक स्थानिक टेम्पोवाला आला. त्याने बिनदिक्कत त्याचा टेम्पो कळपात घातला. मग त्याच्या बरोबरीने आम्ही तो कळप पार केला. With great power comes great responsibility हे मी टेरॅनो चालवताना कधीच विसरत नाही.
पुढे एका ठिकाणी रस्त्यापासून जवळ एक
नीलगाय दिसली.
इको कॅम्प हि जागा तिथले पोहोचल्यावर आम्हाला तिघांना लगेच आवडली.
 |
इको कॅम्प |
आपल्याकडे जसा भाजीत कडीपत्ता घालतात तसं इथे भाजीत कडुलिंबाची पानं घालतात. स्वादिष्ट जेवणाचा समाचार घेतल्यावर दीप्ती आणि खुशीला विश्रांती घ्यायची गरज होती. भुज ते इको कॅम्प ह्या सकाळच्या दोनशे किलोमीटरच्या टप्प्यानंतर दोन तास विश्रांती हवीच. नोव्हेंबर महिन्यातही इथे उन्हाचा तडाखा जोरदार होता. उन्हाळ्यात इथे काय
होत असेल. आराम करण्याचं सर्किट माझ्या डोक्यात बसवायचं राहून गेलंय.
त्यामुळे मी बाहेर पडलो इको कॅम्प जवळचा परिसर टेहळण्यासाठी. नजर जाईल
तिथपर्यंत सपाट प्रदेश. अधे मधे खुरटी झुडुपं. जमीन भुसभुशीत. जमिनीत
मिठाचं प्रमाण जास्त.
जी रानटी गाढवं बघायला इथे आलो ती जवळपासच्या परिसरात दिसली. जितकं जवळ जाता येईल तितक्या जवळ जाऊन फोटो काढले.
 |
इंडियन वाइल्ड ऍस, घुडखुर |
गाढवासारखा दिसणारा हा प्राणी इथे लिटिल रण ऑफ कच्छ मधे राहतो. इथल्या अति अवघड परिस्थितीत इतर बरेच प्राणी तग धरून राहू शकत नाहीत.
इंडियन वाइल्ड ऍस, म्हणजे घुडखुर हा प्राणी अतिशय मजबूत असतो. एके काळी हा प्राणी पश्चिम भारत, पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान हे भाग, अफगाणिस्तान, इराणचा आग्नेय भाग अशा विस्तृत परिसरात रहात असे. सध्या फक्त लिटिल रण ऑफ कच्छ मधेच ह्यांचे वास्तव्य आहे. कमी होत होत ह्यांची संख्या चारशे वर पोहोचली होती. १९७२ साली ह्यांचा समावेश
अत्यंत लुप्तप्राय प्रजातींमध्ये केला गेला. तेव्हापासून ह्यांचे संवर्धन केल्यामुळे आता ह्यांची संख्या साडेचार हजाराच्या जवळपास पोहोचली आहे.
 |
कळप |
दहा मिनिटं माझी फोटोग्राफी चालली. हळूहळू सगळे लांब निघून गेले. लांबवर मिठाचे ढीग रचून ठेवले होते त्यांच्याकडे मग मी मोर्चा वळवला. ढिगांच्या जवळ गेलो तसं जमिनीतलं मिठाचं प्रमाण वाढत गेलं. ढिगांजवळ तर मिठाचीच जमीन. पंधरा वीस मिठाचे ढीग. जिकडे तिकडे वेगवेगळ्या आकाराचे मिठाचे तुकडे. छोट्यापासून मोठ्यापर्यंत.
 |
मिठाच्या राज्यात |
एक नंबर जागा. हि जागा दीप्ती आणि खुशीला दाखवली पाहिजे. त्यांना बोलवायला इको कॅम्प मधे परत गेलो. जाताना हातात जमतील तितके मिठाचे तुकडे घेऊन गेलो. जाताना जे इंडियन वाइल्ड ऍस दिसले त्यांचे जमतील तसे फोटो घेतले. कार्तिक महिन्यातल्या दुपारी इथे उन्हाचा इतका जोरदार चटका. उन्हाळ्यातल्या दुपारी इथे काय होत असेल.
वैधानिक इशारा : लिटिल रण ऑफ कच्छ हे एक वाळवंट आहे. इथे दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे. फक्त उन्हाळ्यात नाही तर इतर ऋतूतही.
खुशी माझ्याबरोबर आली मिठाचे डोंगर बघायला.
 |
मिठाच्या ढिगासमोर |
मिठाच्या व्यापारातले जे middle man आहेत ते इथल्या मीठ बनवणाऱ्या गावकऱ्यांकडून मीठ विकत घेऊन इथे ढीग करून ठेवतात. बाजारात जेव्हा चढा भाव येतो तेव्हा मागणीप्रमाणे विकतात. हे जाडं मीठ घरगुती वापरासाठीचं नाहीये. ह्याचा वापर औद्योगिक ठिकाणी होतो.
संध्याकाळच्या चहानंतर आमच्या जीप सफारी साठी अजय धमेचा त्यांच्या महिंद्रा थर जीप सोबत तयार होते. ह्यांना लिटिल रण ऑफ कच्छ परिसराची खडानखडा माहिती आहे. सुरुवातीला त्यांनी आम्हाला वाइल्ड ऍस बद्दल माहिती सांगितली. कळप दाखवले. नर एकेकटे किंवा छोट्या गटाने राहतात. माद्या आणि त्यांची पिल्लं कळपात राहतात. प्रत्येक मादी बरोबर एक पिल्लू होतं. जरी दिसायला गाढवासारखे असले तरी हे प्राणी वेगात पळू शकतात. जीपच्या वेगात. ह्यांच्या मागच्या पायांची लाथ अतिशय तडाखेदार असते. हे साधारण वीस ते तीस वर्ष जगतात.
वाइल्ड ऍसचे कळप वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही निघालो लिटिल रण ऑफ कच्छ मधला
सूर्यास्त पाहायला. आणि सॉल्ट फार्म, म्हणजे मिठाची शेती पाहायला.
एका ठिकाणी इंडियन वाइल्ड ऍसची हाडं होती.
 |
इंडियन वाइल्ड ऍसच्या हाडांबरोबर फोटो |
नजर जाईल तिथपर्यंत सपाट भाग. दूर क्षितिजावर
मृगजळ दिसलं. मृगजळ किंवा mirage हा नुसता शब्द जरी दिसला तरी मनात विचारांची वावटळ उठते. जे अस्तित्वात नाही ते दाखवतं ते मृगजळ. जे अस्तित्वात आहे ते न दाखवणं हे ही एक मृगजळच ना. पहिल्या प्रकारचं हे समजून येणारं, तर दुसऱ्या प्रकारचं सहजासहजी समजून न येणारं. जग किती फसवं आहे ते एका जागी बसून शांतपणे विचार करायला लागल्यावरच समजतं. introspection म्हनत्यात त्यासनी. बरं, जे दिसतं आहे ते मृगजळ आहे का नाही ते तरी कसं ओळखायचं. म्हणजे एक असा कुठला फॉर्मुला अस्तित्वात नाही जो सगळ्या ठिकाणी लागू पडेल. प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या तऱ्हा. दुनिया जितकी दिसते त्यापेक्षा लाख पटींनी complicated आहे.
 |
लिटिल रण ऑफ कच्छ मधे संध्याकाळची सफारी
ड्रायव्हर सीट वर अजय धमेचा
मागे दीप्ती आणि खुशी |
लिटिल रण ऑफ कच्छ चा भाग १९७२ साली
इंडियन वाइल्ड ऍस अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. लिटिल रण ऑफ कच्छ हे एक वाळवंट आहे. पण हे आपल्याला माहित असलेल्या नेहमीच्या वाळवंटांसारखं नाहीये. कोणे एके काळी हा भाग वाळवंट नव्हता. दोन हजार वर्षांपूर्वी इथल्या काही भागात समुद्र होता. ह्या भागातून नद्या वाहात होत्या. ह्या सुपीक भागात शेती केली जात होती.
नंतरच्या काळात जे बदल घडले त्यामुळे इथले नद्यांचे प्रवाह थांबले. समुद्र मागे हटून जमीन मोकळी झाली. आज हा सपाट भाग नापीक आणि खारट जमिनीचा आहे. पावसाळ्यात समुद्राचे पाणी इथे काही किलोमीटर आतपर्यंत येतं. दुसऱ्या बाजूने नदीच्या पुराचं पाणी येतं. इथला बराचसा भाग पाणथळ होऊन जातो. पूर ओसरला कि पुढच्या वर्षीच्या पुरापर्यंत जमीन कोरडी असते.
कच्छ भागाचा इतिहास जाणून घेण्यासाठी
इथे टिचकी मारा.
अजय धमेचांना आम्हाला सूर्यास्त पाहण्यासाठी एका खास जागी घेऊन जायचं
होतं. तिथे वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांची महिंद्रा थर जोरात
पळवली. नव्याने इथे आलेल्या ड्रायव्हरने असले प्रकार करू नयेत. गाडी
उलटण्याची धोका संभवतो.
 |
सॉल्ट फार्म, म्हणजे मिठाची शेती |
लिटिल रण ऑफ कच्छ मधे इथले स्थानिक लोक मिठाची शेती करतात. इथे चार ते पाच फूट खोदल्यावर पाणी लागतं. पण गोडं नाही. खारट पाणी. कारण कोणे एके काळी इथे समुद्र होता. मिठाची शेती करणं हे प्रचंड मेहनतीचं काम आहे. तळपत्या उन्हात मेहनत करावी लागते. वर्षातले सहा ते सात महिने मिठाचे शेतकरी ह्या भागात झोपड्या उभारून राहतात. इथे लाईट नाहीत. कारण इथे वीज नाही. दूर दूर पर्यंत एकही झाड नाही. कुठेही आडोसा नाही. दिवसभर डोक्यावर अखंड तळपता सूर्य. दिवसा तापमान चाळीस च्या वर. आणि रात्री प्रचंड थंडी. तापमान पाचच्या दरम्यान. खाणं, पाणी, प्रत्येक वस्तू दूरवरच्या वस्तीवरून आणायची. अशा प्रकारे तुम्ही आम्ही दोन दिवसही राहू शकणार नाही. आणि वर्षभर कष्ट करून एका कुटुंबाला कमाई होते साधारणपणे साठ हजार रुपये. ऐकून धक्का बसला. ह्यांच्याकडून मीठ विकत घेणारे जे middle man आहेत ते भरपूर पैसे कमावतात. सध्या जगभर हेच तर चाललंय. गरीब साध्याभोळ्या माणसांची मेहनत, आणि कोणीतरी "शिकलेले" दुसरेच त्यांच्या जीवावर पैसे कमावतात. काठमांडू मधल्या "तिबेट पीस इन्" हॉटेलच्या नेपाळी मालकाने गप्पांमध्ये मला "तनखा" शब्दाचा अर्थ सांगितला होता. तन खा. नोकर नोकरी करतो आणि मालक त्याच्या जीवावर गब्बर होतो. असो. जगातले सगळे प्रश्न सोडवणं हे आपल्या एकट्याचं काम नाही.
अजय धमेचा आम्हाला सूर्यास्त बघायला एका जगात भारी जागी घेऊन आले. एकदम वेळेत.
 |
लिटिल रण ऑफ कच्छ मधला सूर्यास्त |
डोंगराळ भागात सूर्य सूर्यास्ताला क्षितिजापर्यंत न जाता वरच कुठेतरी गायब होतो. इथे सूर्य क्षितिजाला टेकून मग क्षितीजाच्या आड बुडाला. जमिनीवर सगळीकडे मिठाचा थर पसरलेला. दूर दूर वर नजर जाईल तिथपर्यंत.
 |
मिठाच्या राज्यात |
पावसाळ्यात इथे एका बाजूने समुद्राचं पाणी येतं आणि दुसऱ्या बाजूने नदीचं. सगळ्या भागात दोन फूट पाणी असतं. पाणी ओसरल्यावर ज्या भागात समुद्राचं पाणी आलं होतं त्या भागात असा मिठाचा थर राहतो. ह्या वर्षी पंधरा किलोमीटर परिसरात असा मिठाचा थर पसरलाय.
 |
मिठाच्या राज्यातली फोटोग्राफी |
आम्ही अजय धमेचा यांच्या बरोबर असल्याने अंधार पडला तरी धोका नव्हता. नवखा माणूस जर इथे अंधार पडल्यावर थांबला तर हरवण्याची शक्यताच जास्त.
 |
मिठाच्या राज्यात |
रण ऑफ कच्छ ह्या जागची गर्दी टाळून त्याच्या तोडीस तोड जागा पाहायची असेल तर ती आहे लिटिल रण ऑफ कच्छ. अशा जगात भारी जागा कितीतरी आहेत आपल्या भारतात. पाहणाऱ्याला दिसतात.