Sunday, August 17, 2025

क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय


देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो.  -- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

देशासाठी आपल्याकडून फार काही करता येत नसले तरी आपला अल्पसा सहभाग दाखवण्याचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट.  भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अस्मादिकांनी सकाळी घरामध्ये राष्ट्रध्वज उभारला.  परिसरातील झेंडावंदन समारंभात सहभाग नोंदवला.  ह्या शुभ दिवशी एखादे उचित असे स्थळ पाहण्याचा बेत ठरवला.  क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय.  ह्या जागेचे एप्रिल २०२५ मध्ये नवीन स्वरूपात उद्घाटन झाले आहे.  ह्या स्थळाला भेटीचा हा वृत्तांत.

पता = ३८५ / १५, प्रभात कॉलनी, चिंचवड गाव, पिंपरी चिंचवड ४११०३३

पाहण्यासाठी लागणारा वेळ = अंदाजे एक तास 

पार्किंग = जागेअभावी उपलब्ध नाही 

तिकीट = माणशी १०० रुपये 

वेळ = सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत

दर सोमवारी साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुट्टी

एका वेळी दहा ते पंधरा जणांना आत सोडतात.  पुढच्या गटाला साधारण एक तासाने आत पाठवतात.  मधल्या वेळात काय करायचे असा प्रश्न असेल तर जवळच मोरया गोसावी मंदिर आहे.

चापेकर बंधूंना फाशी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची वाहतात झाली.  वाड्याचा नवीन मालक दुर्गुणी होता.  वाड्यात दारू, जुगार, पत्ते वगैरे प्रकार सुरु झाले.  १९७२ साली गिरीश प्रभुणे आणि इतर युवकांनी हे थांबवण्याचा निर्धार करून हे सर्व उद्योग उध्वस्त केले. ज्या वास्तूत क्रांतिवीर चापेकर बंधूंचा जन्म झाला, शिक्षण झाले, त्यांना प्रखर देशभक्तीचे धडे मिळाले, त्या वास्तूची वाताहात थांबवण्याचा गिरीश प्रभुणे आणि इतर युवकांनी निश्चय केला.

१९७२ साली क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना झाली.  चापेकर वाड्यात व्यायाम शाळा सुरु झाली.  १९९८ साली क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांची स्मृती शताब्दी साजरी झाली.  त्या वेळी चापेकर वाड्यात स्मारक बनवण्याचे काम सुरु झाले.  २००५ साली वाडा जनतेला पाहण्यासाठी खुला करण्यात आला. 

२०१४ साली सरकार बदलले.  करदात्यांचा पैसा मदरसे दर्गे हज सफरी ह्यात न जाता देशासाठी योग्य ठिकाणी खर्च होऊ लागला.  क्रांतिवीर चापेकर बंधू वाडा हे राष्ट्रीय स्मारक अद्यवावत करण्ययात आले.  चापेकर वाड्याच्या मागील बाजूस बहुमजली भव्य संग्रहालय बनवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तीन मजली चापेकर वाड्यात प्रवेश केल्यावर आपला मार्गदर्शित दौरा (Guided Tour) सुरु होतो.  वाड्यामध्ये फोटो काढले तर चालतात पण विडिओ बनवण्ययास मनाई आहे.  चापेकर कुटुंबाचा आणि त्यांच्या वाड्याचा इतिहास सांगितला जातो.  चिंचवड जवळच्या चापे गावचे चित्पावन ब्राम्हण चापेकर.  क्रांतिवीर चापेकर बंधूंचे वडील हरी विनायक चापेकर निष्णात वैद्य होते.  कीर्तनकार होते.  गावोगावी जाऊन कीर्तन करीत असत.

चापेकर वाडा

तुळशी वृंदावन, गाय वासरू, वाड्याचा प्रत्येक भाग हुबेहूब साकारला आहे.  दृक श्राव्य स्वरूपात वाड्याचा एक एक भाग पाहात आपण पुढे पुढे जातो.  दिवाणखाना, स्वयंपाकघर, धान्य कोठी, कीर्तन सरावाची खोली. 


इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या मागच्या पानावर छापले होते ते शिवाजी महाराजांचे चित्र

वाड्याच्या भिंतींवर निवडक ऐतिहासिक प्रसंग, चित्रे लावली आहेत. 


समर्थ रामदास स्वामींचे संभाजी राजांस पत्र

पहिल्या मजल्य्यावर काही ऐतिहासिक प्रसंग उत्तम रीतीने साकारले आहेत.  त्याकाळचे मुद्रणालय.  द्रविड बंधूंचा वध.  येरवडा कारागृहात लोकमान्य टिळक आणि क्रांतिवीर चापेकर ह्यांची भेट.  क्रांतिवीर चापेकर बंधूंना मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यानंतर भगिनी निवेदिता यांनी त्यांच्या मातेचे सांत्वन करण्यासाठी वाड्यास दिलेली भेट. 


त्याकाळचे मुद्रणालय

१८९६ साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली.  त्याकाळी पुण्याच्या कॅन्टोन्मेंट परिसरात अनेक इंग्रज सैनिक, अधिकारी, त्यांचे कुटुंब राहात होते.  प्लेगच्या साथीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी इंग्रज सरकारने वॉल्टर रँड ह्याची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक केली.  वॉल्टर रँड ह्याने पुण्याच्या जनतेवर अनेक अत्याचार केले.  लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ह्या वृत्तपत्रांतून त्याविरोधात आवाज उठवला.  लोकमान्य टिळकांच्या प्रखर राष्ट्रपेमी विचारांनी प्रेरित होऊन क्रांतिवीर चापेकर बंधू व सहकाऱ्यांनी इंग्रज जुलमी अधिकारी वॉल्टर रँड ह्याचा वध करण्याचा बेत आखला. 


वॉल्टर रँडच्या वधाआधी चतुःशृंगीच्या देवीला घातलेले साकडे

इंग्रज जमेल तेवढे जमेल तसे भारतातून लुटून नेट होते.  गरिबी उपासमारी साथीचे रोग इंग्रजी अत्याचार ह्यांनी जनता त्रस्त होती.  तशातच इंग्रजांनी फर्मान काढले, राणी व्हिक्टोरिया हिचा हीरक महोत्सव साजरा करावा.  जो कोणी ह्या महोत्सवाला विरोध करेल त्याला देशद्रोही समजून शिक्षा करण्यात येईल.

राणीचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी सर्व इंग्रज अधिकारी राजभवन येथे जमणार. जुलमी अधिकारी वॉल्टर रँड ह्याचा वध करण्याची हि संधी आहे हे क्रांतिवीर चापेकर बंधूंना लक्षात आले.  गणेशखिंड रस्त्यावर रँडला गाठायचा बेत बनला.  २२ जून १८९७ रोजी राणीचा हीरक महोत्सव साजरा झाला.  रात्रीची वेळ.  रस्त्यावर अंधार.  दामोदर आणि बाळकृष्ण तलवार आणि बंदूक घेऊन गणेशखिंडीत तयार.  बग्गी आल्यावर दामोदराने आवाज दिला, "गोंद्या आला रे आला".  काही अंतरावर बाळकृष्ण लपला होता.  बाळकृष्णाने बग्गीवर चढून अत्याचारी इंग्रज रँड वर गोळी घातली.  पाठोपाठ आणखी एक बग्गी आली.  रँड नक्की कोणत्या बग्गीत हे कळायला मार्ग नाही.  बाळकृष्णाने आलेल्या बग्गीवर चढून आत बसलेल्या इंग्रजाला गोळी घातली.  रँडचा सहाय्यक अधिकारी जागीच ठार झाला. जुलमी अधिकारी वॉल्टर रँड बारा दिवसांनंतर निर्वतला. 

इंग्रज जुलमी अधिकारी वॉल्टर रँड ह्याचा वध

इंग्रज जुलमी अधिकारी वॉल्टर रँड ह्याचा वध कोणी केला हे द्रविड बंधूंना माहित होते.  त्याकाळच्या वीस हजार रुपयांसाठी द्रविड बंधूनी चापेकर बंधूची माहिती ब्रिटिशांना दिली.  हे कळल्यानंतर क्रांतिवीर वासुदेव हरी चापेकर, महादेव विनायक रानडे, व खंडो विष्णू साठे यांनी फितूर द्रविड बंधूंना ठार केले.  हा प्रसंग जिथे घडला तो पुण्यातला खुन्या मुरलीधर.


द्रविड बंधूंचा वध

क्रांतिवीर चापेकर बंधूंना फाशी होण्याच्या आदल्या रात्री लोकमान्य टिळकांनी येरवडा कारागृहात त्यांची भेट घेतली.


येरवडा कारागृहात लोकमान्य टिळक आणि क्रांतिवीर चापेकर ह्यांची भेट

बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर, व महादेव विनायक रानडे ह्यांनी १८९९ साली देशासाठी बलिदान दिले. 

सर्व पुतळे जिवंत वाटावेत इतके हुबेहूब बनवले आहेत.  उत्कृष्ट वेशभूषा, प्रकाश योजना, आणि नेपथ्य यामुळे सर्व प्रसंग समोर घडत आहेत असे वाटतात.  दुसऱ्या मजल्यावर वॉल्टर रँड ह्याचा वधाचा प्रसंग कळस गाठतो.  त्यानंतर आपण ह्या राष्ट्रीय स्मारकातून बाहेर पडतो.  रोजच्या जीवनाला तोंड देण्यासाठी एक नवीन वेगळी ऊर्जा घेऊन.

आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहोत ते अशाच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांमुळे.  स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय आणि त्याचा दुरुपयोग का आणि कसा करू नये हे समजण्यासाठी काही दिवस शेजारच्या बांगलादेश किंवा लष्करी राजवटीच्या म्यानमार मध्ये काही दिवस व्यतीत करावे.