Friday, September 4, 2020

शाळा आणि शिक्षण


जपान संदर्भात काही फोटो कुणीतरी कधीतरी इंटरनेट वर टाकलेत.  मधेच कुठूनतरी ते समोर येतात.  त्यातला एक हा फोटो, तिथल्या एका शाळेतला.  छोटी मुलं शाळेची साफसफाई करतायत.  शाळा धुऊन पुसून स्वच्छ करतायत.  का?  कशासाठी?  शाळेला सफाई कर्मचारी ठेवता येत नाहीत?  लहान मुलांना शाळेत ह्यासाठी पाठवतात?  शिकण्यासाठी, का शाळेची सफाई करण्यासाठी?  

दादौ, जरा अर्धा मिनिट थांबून शिक्षण म्हणजे काय हा विचार केला तर?  फाडफाड इंग्रजी बोलायला शिकणं म्हणजे शिक्षण का?  वयाच्या पाचव्या वर्षी नायट्रोजन सायकल, फोटोसिन्थेसिस, आणि ह्यासारख्या टॉपिक वर पोपटासारखं बोलणं म्हणजे शिक्षण का?

इंग्रजी डिक्शनरी उघडून बघितली तर education हा शब्द आलाय एका लॅटिन शब्दावरून, ज्याचा अर्थ आहे “a breeding, bringing up, rearing”.  पुढे बघितले तर education ह्या शब्दाचे दोन अर्थ दिलेत, उदाहरणासकट.

1. (uncountable) The process of imparting knowledge, skill and judgment.
    Good education is essential for a well-run society.

2. (countable) Facts, skills and ideas that have been learned, either formally or informally.
    He has had a classical education.

शिक्षण, एक आहे मोजता येणारं, आणि दुसरं मोजता न येणारं.  फक्त मोजता येणाऱ्यावरच भर दिला, आणि मोजता न येणाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, कि काय होईल?  त्यात पण, आज knowledge आणि information ह्याची गल्लत झालीये.  आपण ज्याला knowledge समजतोय ते खरंच knowledge आहे, का information आहे, हे बघतोय का आपण?  आज आपण आपल्या मुलांना जे शिक्षण देतोय त्यातूनच त्यांची वाढ होणार आहे ना?  मग असं शिक्षण घेऊन पुढे गेल्यावर काय होतं?  बघायचंय? 

 

वय वाढत गेलंय, बॅंकेतला बॅलन्स वयानुसार वाढत गेलाय.  पोष्टाने पत्र पाठवून ख्यालीखुशाली विचारण्याचे दिवस संपलेत.  लँडलाईन फोन, बटणाचा मोबाईल फोन, स्मार्टफोन, असं करता करता आयफोन हातात आलाय.  पण कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकायचा नाही हे कुणी कधी शिकवलं नाहीये.  त्यामुळे पोस्ट ऑफिस मधे येऊन लाख दोन लाखाची सेव्हिंग केल्यावर कचरा तिथेच टाकून आम्ही पुढे निघालो.  आम्हाला कधी कोणी शिकवलंच नाही सार्वजनिक मालमत्तेची काळजी घ्यायला.  आम्ही फक्त गांधी नेहरू कुटुंबाच्या सनावळ्या पाठ केल्या.  

आता परत एकदा वरचा त्या जपानी शाळेतला फोटो बघा.  नव्याने काही दिसतंय?  वयानुसार अक्कल, समज वाढत जाते हा खोटेपणा आहे.  आणि साठाव्या वर्षी कोणाला अक्कल शिकवणं फार अवघड असतं.  म्हणून लहान वयातच हे शिक्षण देणं गरजेचं असतं.