आता तुम्ही म्हणाल चिमणी आणि गवत हि आव्हाने कशी काय होऊ शकतात. ति पण अवघड. आत्तापर्यंत मलाही असाच वाटत होतं. काय आहे ना, वेळ आणि ठिकाण योग्य (किंवा अयोग्य) असेल (नक्की कसे ते तुमच्या बघण्यावर आहे) तर चिमणी आणि गवतच काय, इतर सटर फटर गोष्टी पण आव्हान ठरू शकतात. कसे काय ते सुट्टीच्या दिवशी दिवसभर घरात टीव्ही पुढे बसून नाही समजत हो. त्यासाठी घराबाहेर पडून प्रत्यक्ष जग पाहावे लागते. अनुभवावे लागते. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण कि असे अनेक एकाहून एक अनुभव (किंवा किस्से, किंवा मॅटर, काय समजायचे असेल तसे समजून घ्या) माझ्यापर्यंत पोहोचलेत. कुठून? कसे? सह्याद्री पर्वतरांगा फार लांब नाहीत माझ्या घरापासून. आणि जिवाभावाचे सवंगडी मिळाले तर दूरची अंतरंही आवाक्यात असतात. तशी ही जागा एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आधुनिक जगात वेस्टर्न घाट म्हणून ओळखतात. आमच्यासाठी आमचे हक्काचे माहेरघर. बिनभिंतीची शाळा. होम अवे फ्रॉम होम. असो. चिमणी आणि गवत ही अवघड आव्हाने कशी ते पाहूया आता.
आता परतीचा पाऊस थांबलाय. बाकी असलेल्या दुसऱ्या साल्हेर स्वारी बद्दल मागच्या आठवड्यात मी स्वप्नीलला विचारले. काही कारणाने ह्यावेळी साल्हेर स्वारीचा योग्य नव्हता. त्या ऐवजी भीमाशंकर परिसरात जायचे ठरले. ह्या ठिकाणाची उत्तम माहिती असलेल्या एका एक्स्पर्ट सोबत. शिल्पा बडवे. आमची पाच जणांची टोळी ठरली. मुंबईहून शिल्पा, मंदार, आणि यज्ञेश. पुण्यातून स्वप्नील आणि मी.
यज्ञेश काही कारणामुळे येऊ शकला नाही. शनिवार १३ ऑक्टोबर २०१८ ला रात्री कर्जत स्टेशनला एकत्र भेटून पुढे जायचे ठरले. पुण्याहून कर्जतला जाणाऱ्या ट्रेनच्या वेळा शिल्पाने आम्हाला पाठवल्या. ते दोघं कोणत्या ट्रेनने कर्जतला येतायत ते ही सांगितले. अकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन समोर स्वप्नील आणि मी भेटलो. ट्रेनला तुडुंब गर्दी होती. बसायला जागा सोडाच, दोन पायावर उभं रहायला मिळालं हे आमचं नशीब. उभं रहायला मिळालं ते डब्याच्या टोकाला दारासमोरच्या जागेत. बाजूच्या टॉयलेट मधून वास. गेले कित्येक वर्ष ट्रेनच्या जनरल डब्याचे तोंड न बघितलेल्या मला हा एक नवीन अनुभव होता. एकदाचे कर्जत स्टेशनला उतरलो. समोरून शिल्पा आणि मंदार चालत आले. भुकेला उत्तर म्हणून स्वप्नील आणि शिल्पाने वडा पाव पोटात ढकलले.
कर्जत स्टेशनच्या बाहेर जीपवाले काका आमची वाट बघत थांबले होते. कर्जत स्टेशन पासून राजपे गावात जाण्यासाठी आमची सोय शिल्पाने उत्तम केलेली. भीमाशंकर परिसरात शिल्पाने अनेक ट्रेक केले आहेत, तसेच ह्या परिसराची तिला उत्तम माहिती आहे हे विशाल कडून ऐकले होते. ह्या ताई फारच हुशार आहेत हे तसे लगेच समजले.
 |
कर्जत पासून राजपे गावात जीपने जाताना |
ड्रायव्हर काका आणि त्यांची महिंद्रा जीप दोन्ही उत्तम होते. कर्जत पासून दूर दूर गेलो तसा रस्ता हळूहळू डांबरी कमी आणि मातीचा जास्त होत गेला. आम्ही शहरीकरणापासून दूर दूर जात असल्याचे प्रतीक होते ते. रस्ताच्या कडेला जिकडे तिकडे कुर्डू, म्हणजे silver spiked cockscomb. महाबळेश्वर परिसरात रस्त्याच्या कडेला हे बऱ्याच ठिकाणी असतात. त्यामुळे मला लगेच ओळखता येतात. कर्जत ते राजपे अंतर साधारण सव्वा तासाचे आहे. ठरलेल्या ठिकाणी रात्री कधीतरी पोहोचलो. कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले. तीन वाजले असावेत. घरातल्यांना न उठवता घरासमोरच्या व्हरांड्यात स्थायिक झालो. चौघांना झोपण्यासाठी भरपूर जागा. शिल्पा, स्वप्नील, आणि मंदार आपापल्या स्लीपिंग बॅग मधे. मी व्हरांड्यात. स्लीपिंग बॅग ह्या वस्तूचा माझ्याशी अजून संबंध आला नाहीये. पाचला उठायचे ठरले. मग त्यात साडेपाच असा बदल करण्यात आला.
झोपल्यावर थोड्या वेळाने एक डास आला. मग मी बॅगेतून टीशर्ट काढून ते डोक्यावर घेतले. पायातले बूट काढले नव्हतेच. फुल पॅन्ट आणि फुल हाताचे जॅकेट. असे सर्व अंग झाकून घेतले. मधेच कधीतरी कोणीतरी माझ्या डोक्यासमोर एक उशी आणि माझ्या पायावर एक पांघरूण टाकले. डोक्याला उशी मिळाली हे कित्ती भारी.
मी व्हरांड्याच्या टोकाला झोपलो होतो. माझ्या पायाजवळ हालचाल जाणवली. जाग येऊन उभा राहिलो. बघतो तर एक मध्यम आकाराचा बेडूक. तो सरपटणारा प्राणी नाही हे बघून छान वाटले. त्याला व्हरांड्याच्या बाहेर हाकलून परत झोपलो. साडेपाच वाजता माझ्या मोबाईल मधला अलार्म वाजला. पहाटे सूर्योदयापूर्वी उठणे आता मला काही नवीन नाही. बाकीचे तिघे अजून झोपेच्या राज्यात हरवलेले. तिथून बाहेर यायचा रस्ता त्यांना सापडेना. मी उठून परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली.
 |
राजपे गावातली पहाट |
मोबाईल मधे फुलांचे फोटो घेण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. हा नवीन मोबाईल घेतल्यानंतरचा माझा हा पहिलाच ट्रेक ज्याच्यात मी मोबाईलचा कॅमेरा म्हणून वापर करत होतो. नंतर ट्रेकला सुरुवात करताना शिल्पाने मला माझ्या मोबाईल मधल्या कॅमेऱ्याचे योग्य सेटिंग करून दिले.
बाकीचे तिघं अजूनही झोपेच्या राज्यात हरवलेले. तेवढ्यात माझ्या अंकुश दादाबरोबर गप्पाटप्पा. आम्हा दोघांचा जवळपास एक फेरफटका.
आम्ही जिथे आलो होतो ती चार घरांची वस्ती होती. दूरवर भीमाशंकर डोंगररांग.
 |
राजपे गावातून दिसलेली भीमाशंकर डोंगररांग |
एकेक करत तिघेही उठले आणि तयार झाले. तोपर्यंत माझा इकडे तिकडे टाइम पास. एक मेलेला किडा सापडला त्याचा फोटो. वगैरे वगैरे. आजूबाजूच्या उंच डोंगररांगांमुळे सूर्योदय काही दिसला नाही.
 |
A dead beetle |
चहा घेऊन तयार होऊन आमची पायगाडी सुटायला सव्वा सात होत होते. अंकुश दादा आणि आम्ही चार जण निघालो दिवसभराच्या भटकंतीसाठी. पदरघाट चढून पुढे पेढ्याचा घाट चढून भीमाशंकर परिसरात जायचं आणि आंबेनळी घाटातून उतरून परत राजपे गावात यायचं असा आजचा बेत होता. म्हणजे आजचा दिवस घाटवाटांचा. आजच्या तीनही घाटवाटा माझ्यासाठी नवीन होत्या. शिल्पा आणि स्वप्नीलला भीमाशंकर परिसर काही नवीन नाही. तसा आजच्या दिवसभरासाठी अंकुश दादा आमच्याबरोबर वाटाड्या. चालायला सुरुवात करताच अंकुश दादाने असा काही वेग पकडला. त्याच्या जोडीला शिल्पाही त्याच वेगात. ट्रेकला संथ सुरुवात करण्याची सवय असलेला मी म्हणजे त्यांच्या ट्रेनला मागे जोडलेला गार्डचा डबा झालो होतो.
 |
राजपे गावातून भीमाशंकरच्या दिशेने ... दिवसभराच्या भटकंतीची दमदार सुरुवात |
लवकरच गावाजवळचा सपाट भाग संपून चढ आला. इथेही अंकुश दादा सुसाट वेगात. आम्ही एक एक करत त्याच्या मागून. चढ चढायला लागलो तशी जी काही उरली सुरली झोप डोळ्यांवर रेंगाळत होती ती पळून गेली. वेळ मिळेल तसे मी फोटो घेतले. सकाळच्या वेळी डोंगरात घुमलेले वानरांचे हुप्प हुप्प आवाज. अधून मधून पक्षांची किलबिल.
हिरवे तुरे आणि त्यातून बाहेर पडलेली छोटी निळसर फुलं इथे बऱ्याच ठिकाणी.
 |
धाकटा अडुळसा |
Common name = Green Shrimp Plant, turquoise crossandra
मराठी = धाकटा अडुळसा
कोकणी = रोरीझाड
Botanical name =
Ecbolium ligustrinum
आम्हाला पाहून एक माकड खिचच खिचच असा धोक्याचा इशारा देणारा आवाज काढत होतं.
सर्व परिसर छोट्या झुडुपांनी आणि मोठ्या झाडांनी भरलेला. जमिनीलगत छोटी झुडुपं. उंचावर मोठी झाडं. असं दोन थरांचं जंगल.
 |
I love mornings ... and I love trees |
फार मोठा ब्रेक न घेता आम्ही पदरघाट पटापट चढत होतो. ट्रेकचा पहिला टप्पा असा जोरदार झाला तर पूर्ण ट्रेक व्यवस्थित पूर्ण होतो.
इथे कुर्डू सगळीकडे. नंतर दुपारी अंकुश दादाने सांगितले ह्यांच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. सुंदर लागते.
 |
कुर्डू ... इंग्लिश मधे silver spiked cockscomb |
मधेच कुठेतरी लहू आणि भरत आम्हाला येऊन मिळाले. भन्नाट वेगात दोघे आमच्या पुढे जायचे. पुढे कुठेतरी आमच्यासाठी थांबलेले असायचे.
 |
रानफुल ... कदाचित hibiscus hirtus असावे |
आजच्या ट्रेकची सुरुवात अशी दणक्यात झाली. रेग्युलर ट्रेकर साठी पदरघाट सोपा आहे. चढ दम काढतो. पण वाट अवघड नाही.
 |
Echoes on the wall |
तासभर पदरघाट चढल्यावर एका सपाट भागात येऊन पोहोचलो. इथे आमचा दोन मिनिटांचा पहिला ब्रेक. मग पुढे वाटचाल.
 |
पदरघाटातला सपाटीचा भाग |
पावसाळा नुकताच संपतोय. त्यामुळे कातळ सपाटीवरचं गवत काही ठिकाणी अजून हिरवं तर काही ठिकाणी वाळलेलं पिवळं. झाडं सगळी हिरवीगार. छोटी झुडुपं, गवत ह्यांचे अनेकविध प्रकार.
 |
रानफुलं |
सकाळपासून अधे मधे खेकडे दिसत होते. माझ्या मते समृद्ध जंगल परिसर असल्याचं हे लक्षण असावं.
dragonflies आणि
damselflies असणे हे सुध्दा प्रदुषणविरहित जंगल ओळखण्याची एक खूण आहे.
 |
खेकडा |
ह्या दिवसात सह्याद्रीच्या बऱ्याच भागात तेरड्याची फुलं फुलतात. इथे तेरडा फारसा कुठे नाही. नावाला एखाद्या ठिकाणी तुरळक काही दिसला.
 |
पदरगड |
पदरगडावरच्या कातळ सुळक्यांमुळे पदरगड दुरूनही ओळखता येतो.
एका ठिकाणी जंगली कडीपत्ता दिसला. झाडं झुडुपं पक्षी फुलं मला ओळखता येत नाहीत. अशी दोन चार ओळखता येतात.
 |
जंगली कडीपत्ता |
सकाळपासून काही ठिकाणी झाडांवर खुणा दिसल्या. कोणी ट्रेकर्सनी मेहनत घेऊन सर्वांच्या फायद्यासाठी लावलेल्या. काही ठिकाणी अंधारात चमकतील असे छोटे चौकोनी रिफ्लेक्टर. काही ठिकाणी झाडांवर लाल रंगाने खुणा.
 |
झाडावरची खूण |
झाडांच्या तुटलेल्या फांद्या जिथे पडल्या होत्या त्यांच्यावर उगवलेल्या कुत्र्याच्या छत्र्या दिसल्या. एका ठिकाणी बऱ्याच मोठ्या. त्यांचे फोटो घेतले.
 |
झाडाच्या तुटलेल्या फांदीवर उगवलेली भलीमोठी कुत्र्याची छत्री
किति मोठी ते समजण्यासाठी बाजूला पाय ठेऊन फोटो काढला |
आता वाटेत एक छोटा चिमणी क्लाइंब. चिमणी क्लाइंब म्हणजे अरुंद घळीतून वर चढून जायचे. एकमेकाला मदत करत सर्व जण न धडपडता चढून आलो. मग एक छोटा ब्रेक.
 |
छोट्या ब्रेक मधली माझी फोटोग्राफी |
पावणेदोन तासात आम्ही पदरघाटाचा मोठा टप्पा चढून आलो होतो.
 |
रानफुल |
साडेनऊच्या सुमारास दुसऱ्या चिमणी क्लाइंबच्या समोर पोहोचलो. हा चिमणी क्लाइंब भलता उंच. अंकुश दादा, लहू, भरत, आणि स्वप्नील एकटेच चढले. फ्री क्लाइंब. त्यांचे हे कसब आम्ही बाकीचे बघत होतो. कुठून कसे पाय टाकतायत. कुठे होल्ड पकडतायत. बॉडी वेट कसे बॅलन्स करतायत. त्यांच्या मदतीने आम्ही बाकीचे चढलो. एका अवघड ठिकाणी रोप लावण्यासाठी खडकात बोल्ट मारलेला. आम्ही रोप आणलेला नव्हता. खाली एकाने उभं राहायचं आणि त्याच्या खांद्यावर पाय ठेऊन दुसऱ्याने वर चढायचं अशी युक्ती केली. अंकुश दादा, लहू, भरत, आणि स्वप्नील हे एक्स्पर्ट होतेच पूर्ण वेळ आम्हा तिघांच्या मदतीला.
मला थोडं पायाला खरचटलं. एका अवघड ठिकाणी थोडं खाली घसरलो. वर जायचेच आहे हा एकाच विचार मनात असेल तर जे असेल त्यातून मार्ग काढता येतो.
मागे कधीतरी स्वप्नील इथपर्यंत येऊन इथून परत गेला होता. आज आम्ही सगळे रोप नसताना हा अवघड चिमणी क्लाइंब चढलो. व्यवस्थित sync झालेली, एकमेकाला मदत करणारी टीम असेल तर अवघड आव्हानेही पेलता येतात. जे एकट्याने झेपत नाही ते अशा एकजूट असलेल्या टीम मधे शक्य होते. सह्याद्रीत शिकलेला हा आमचा आजचा पहिला धडा.
अशा ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. प्रत्येकाचे वैयक्तिक कसब. एकमेकाला मदत करण्याची तयारी. मदत करताना स्वतःची तसेच समोरच्याची शारीरिक क्षमता ओळखणायची हुशारी. चढण्याचा क्रम. बरोबरचे सामान वर चढवून नेणे. शक्ती आणि युक्तीचे योग्य कॉम्बिनेशन.
टीमवर्क ह्या विषयावर किती पुस्तकं वाचली, किती कॉर्पोरेट प्रेसेंटेशन पहिली, किती कॉर्पोरेट ट्रेनिंग अटेंड केली तरी घागर रिकामीच असते. फक्त घागर भरण्याचं फीलिंग आलेलं असतं. त्याऐवजी अशी अवघड आव्हानं पेलता आली तर मिळवलं. बघा पटलं तर. नाही तर सर्टिफाइड ट्रेनर असतातच मोठमोठ्या कंपन्यांमधून एसी मीटिंग रूम मधे बसवून दोन तासात टीमवर्क शिकवायला आणि ट्रेनिंग अटेंड करणाऱ्यांना क्वालिफाइड बनवायला.
 |
चिमणी क्लाइंब |
हा अवघड टप्पा चढून आल्यानंतर छोटी खिंड आहे. खिंडीत थोडावेळ थांबलो. इथून आम्हाला डावीकडच्या वाटेने चढून भीमाशंकरच्या दिशेला जायचे होते. उजवीकडे पदरगडावर जाणारी अवघड वाट होती. इथपर्यंत आलोय तर
पदरगड पाहून मग पुढे जायचं ठरलं. मंदार आणि मी पदरगडावर न जाता इथे खिंडीतच थांबायचं ठरवलं. चिमणी क्लाइंब ने आत्ताच जीव काढलेला. लगेच पदरगडाची अवघड वाट हे जरा जास्तच झालं असतं. तसे चढून गेलोही असतो. पण चढण्यापेक्षा उतरणे अवघड असते. शीर सलामत तो पगडी पचास. सामान आमच्याबरोबर सोडून बाकीचे पाच जण पदरगडाच्या अवघड वाटेने चढून गेले.
 |
चिमणी चढून आल्यानंतरच्या छोट्या खिंडीत उभं राहून पाहिलेला पदरगड |
पदरगड कोणी व केव्हा बांधला हि ठोस माहिती इतिहासात उपलब्ध नाही. हा एक टेहळणीचा किल्ला होता. आजूबाजूच्या परिसरावर व गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी उत्तम ठिकाण. पदरगडावरील कातळ सुळक्यांना कलावंतिणीचा महाल असं म्हणतात. हे नाव का ते मला समजले नाही. किल्ला ह्या संकल्पनेत असलेल्या दगडी भिंती, बुरुज, दरवाजे, वगैरे इथे नाहीत. सरळसोट उभे कातळकडे आणि त्यांच्या पलीकडे खोल दऱ्या हीच इथली नैसर्गिक संरक्षण व्यवस्था. इथे खोदलेल्या गुहांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आजूबाजूच्या परिसराच्या टेहळणीसाठी अतिशय उत्तम आहे, इति स्वप्नील.
पदरगड सर करायला गेलेले आमचे पाच शिलेदार परत येईपर्यंत मंदार आणि मी गप्पा मारल्या. परिसराचे फोटो घेतले. समोर भीमाशंकरच्या दिशेने जाणारी वाट दिसत होती. सुकलेल्या गवताने झाकलेली.
 |
खिंडीतून पाहिलेली भीमाशंकरच्या दिशेने जाणारी वाट |
पदरगड सर करून आमचे पाच शिलेदार तासाभराने एक एक करत खिंडीत परत आले. मागच्या वेळी अर्ध्यावर सोडून द्यायला लागलेला पदरगड ह्या वेळी सर झाल्यामुळे स्वप्नील भलताच खुश झालेला. आता उरलेला घाट चढून भीमाशंकरच्या दिशेने जायचे होते. वाट अशी नव्हतीच. ज्या काही वाटेसदृश्य जागा दिसत होत्या त्या सुकलेल्या गवताने आच्छादलेल्या. सुकलेल्या गवतावरून पाय घसरत होता. पायाला ग्रीप न मिळाल्यामुळे छोट्या अंतरालाही बराच वेळ लागत होता. गवत हे एक अवघड आव्हान ठरू शकतं हे आज इथे समजलं. काही ठिकाणी मी गवत काढून टाकून जागा मोकळी करून मग पुढे गेलो. पण हे करण्यात बराच वेळ जात होता. गवतात अधे मधे काटेरी वेली होत्या त्या वेगळ्याच.
 |
पदरगड ... समोरच्या डोंगरावरून पाहिलेला |
आम्हाला वर जायला वाट मिळेना. लहू आणि भरत पुढे जाऊन पाहून आले. हे
दोघं जर वर जाऊ शकत नसतील तर आम्ही इतर काय जाणार. बऱ्याच साधक बाधक
चर्चेनंतर असा निर्णय घेण्यात आला कि परत मागे जाऊन तिथे असलेल्या पेढ्याच्या वाटेने
भीमाशंकरच्या दिशेने जावे. सव्वा अकरा वाजत होते. आमच्यासाठी वेळ हा काही धोक्याचा भाग नव्हता.
ठरल्या प्रमाणे परत फिरून पदरगडाच्या समोरच्या खिंडीत उतरून आलो. अवघड ठिकाणी उतरताना मला इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो. मग एक एक करत एकमेकाला मदत करत चिमणी क्लाइंब उतरलो. चिमणी क्लाइंब हा प्रकार मात्र मला चढायला अवघड आणि उतरायला त्या मानाने सोपा जातो. कदाचित माझ्या शारीरिक उंची आणि लांब पायांमुळे.
 |
पदरघाटात दिसलेली वनसंपदा |
पदरघाट बराच उतरून गेल्यावर उजव्या बाजूची भीमाशंकरकडे जाणारी पेढ्याची वाट पकडली. का म्हणत असतील ह्या वाटेल पेढ्याची वाट? कधीकाळी कुणीतरी इथून जाऊन पेढे वाटले असतील म्हणून का? घाटवाटांची नावं अशीच काही कारणांनी पडलेली असतात. मढे घाट. वाजंत्री घाट. सवाष्णी घाट. नाणेघाट. रडतोंडी घाट. त्रिगुणधारी घाट. अंधारबन घाट. ठिपठिप्या घाट. गणपती घाट. वाघजाई घाट. पायरीची वाट.
घाटवाट म्हणजे पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी वापरली जाणारी सह्याद्रीच्या डोंगरातली वाट. मग घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या जवळपास कुठेतरी मोक्याच्या ठिकाणी बांधलेले टेहळणीचे किल्ले हे आलेच. आजच्या आधुनिक काळातही काही ठिकाणी ह्या घाटवाटांनी कोकणातली माणसं घाटावर आणि घाटावरची माणसं कोकणात पायी प्रवास करतात. शंभराची नोट टपरीवर नाहीतर नाक्यावर नाहीतर दुकानात फार विचार न करता दोन मिनिटात संपवणारी शहरी माणसं आज जशी आहेत तशीच यष्टीचे वीस रुपये वाचवायला डोंगर चढून उतरून दिवसभर पायपीट करून जवळच्या मोठ्या गावात जाणारी खेड्यापाड्यातली गरीब साधी माणसंही आहेत.
असो. सबंध जग हे विविध प्रकारच्या बहुढंगी बहुरंगी माणसांनी भरलेलं आहे. सध्या आम्ही भीमाशंकर परिसरातली विविध प्रकारची बहुढंगी बहुरंगी वनसंपदा पहात हरपून गेलो होतो.
 |
दुपारच्या वेळी पाहिलेलं भीमाशंकर अभयारण्य ... समोर एक स्वछंद विहरणारं फुलपाखरू |
एका ठिकाणी डोंगराच्या कड्यावर जाऊन स्वप्नील पदरगडाचे फोटो काढून आला. सह्यभ्रमंती करावी तर स्वप्नील सारखी. इतर कशाचाही विचार न करता. अफाट.
फटकळ तोंडाची, कुतर्क स्वभावाची, किरकिरी सोबत असेल तर भूतान सारख्या स्वप्नवत प्रदेशातली भटकंतीही नकोशी होऊन जाते. एकमेकाला समजून घेणाऱ्या सवंगड्यांबरोबर केलेली सह्य भ्रमंती अवघड असली तरी किती हवीहवीशी वाटते.
 |
अफाट सह्यभ्रमंती करताना ... अद्वितीय सह्यमित्र स्वप्नील खोत |
सकाळी खालच्या पठारावरून पाहिलेला पदरगड आणि आता ह्या पदरगडाच्या समोरच्या डोंगरावरून दिसणारा पदरगड ह्यात बराच फरक. पदरगड तोच. त्याच्या दिसण्यात फरक. इथून पदरगड एखाद्या अजस्त्र पेन्सिलीच्या टोकासारखा दिसत होता.
 |
एका वेगळ्या कोनातून पाहिलेला पदरगड
मेटरहॉर्न किंवा माछापुछछे जसे त्या जागांची ओळख आहेत तसं हे शिखर माझ्यासाठी इथली ओळख झाली आहे |
आता मोकळ्यावर चालताना कडक उन्हाचे चटके बसत होते. ऑक्टोबर हीट घरात बसून नाही समजत. पेढ्याचा घाट चढताना अंगातून टपाटप घाम गळत होता. मधे एखादा झाडांच्या सावलीचा भाग आला कि आमची क्षणभर विश्रांती. पाण्याच्या बाटल्या एकेक करत रिकाम्या व्हायला लागल्या.
 |
रानफुल |
वाटेत एका ठिकाणी पाणी भरून घेतले. ह्या वर्षीचा पाऊस संपला असला तरी
पुढचे दोन तीन महिने इथे भीमाशंकर परिसरात पाणी असते. आता जेवणाची वेळ
झालेली होती. एक योग्य जागा निवडून जेवण्यासाठी थांबलो. शरीरातले बरेच
पाणी घामावाटे कमी झाल्याने मला भरपेट खाण्यापेक्षा पाणी पिण्याची आवश्यकता
होती.
जेऊन झाल्यावर भीमाशंकरच्या दिशेने निघालो. आता डोंगर चढायचा होता. डाव्या बाजूला सुकलेल्या गवताने भरलेला डोंगराचा भाग. उजव्या बाजूला खोल दरी. मधे वाट. बऱ्याच ठिकाणी एक माणूस जाईल इतकीच. ऑक्टोबरच्या मध्यावरचे सूर्यदेव वर भरात येऊन तळपत होते. काही ठिकाणी पायाखाली बारीक दगड किंवा माती आली तर त्याच्यावरून पाय घसरण्याची शक्यता. घामाच्या धारा लागलेल्या. असा अवघड टप्पा सर्व वेळ पूर्ण एकाग्रतेने पार करावा लागतो. जरा लक्ष विचलित झाले तरी घात होऊ शकतो.
बऱ्याच वेळानी एकदाची हि कठीण परीक्षा संपली. आता आम्ही खूप लांबवर पसरलेल्या पठारावर आलो होतो. इथून पुढे आम्हाला डोंगरपठारावरून चालायचं होतं.
एका ठिकाणी दगडावर पाय सोडून बसलो. ह्या माझ्या आवडत्या पोझ मधे फोटो काढला.
 |
माझी आवडती पोझ |
स्वतःला आलमगीर, म्हणजे सबंध जगाचा मालक समजणाऱ्या औरंगजेबाला आणि त्याच्या अफाट फॊजेला ह्याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी आणि इथल्या चिवट काटक मरहट्ट्यांनी झुंजवलंय. दिल्लीहून महाराष्ट्र बुडवायला आलेला औरंगजेब इथेच महाराष्ट्रात हाय खाऊन गेलाय. आज ज्याला वेस्टर्न घाट म्हणून ओळखतात त्याचं इंग्रजी नाव आहे बेनेव्होलेन्ट माउंटन्स. सुज्ञास अधिक इशारा न लगे.
 |
असं पाणी पिण्याचा प्रसंग काही वेगळाच. तो शब्दात सांगता येत नाही. |
माझी सकाळची एनर्जी लेव्हल आणि आत्ताची ह्यात मला सपष्ट फरक जाणवत होता. बॅटरी निम्म्यावर आली होती. दुपारचे सव्वा तीन होत होते. म्हणजे सकाळी सुरवात केल्यापासून पायगाडी आठ तास चालली. स्वप्नील आणि इतर अजूनही फुल पॉवर मधे होते. लहू आणि भरत तर सकाळपासून प्रत्येक टप्प्यावर आमच्या दुप्पट वेगात होते.
आता इथून पुढे जाण्यासाठी दोन पर्याय होते.
पहिला पर्याय : हनुमान तलाव आणि नागफणी बघून मग आंबेनळी घाट ज्या ठिकाणी सुरु होतो त्या
ठिकाणी यायचे. हा मोठी पायपीट करावणारा आणि त्यामुळे अवघड पर्याय होता.
दुसरा
पर्याय : एक देवीचं मंदिर बघून मग आंबेनळी घाट ज्या ठिकाणी सुरु होतो त्या
ठिकाणी यायचे. ह्यात कमी पायपीट असल्याने हा सोपा पर्याय होता.
मी
अर्थातच सोपा पर्याय निवडला. दिवसभर घामावाटे अंगातलं पाणी कमी
झाल्यामुळे (dehydration किंवा निर्जलीकरण) मला आता थकवा जाणवत होता.
सपाट डोंगरपठारावरून चालणं घाट चढण्या उतारण्यापेक्षा सोपं होतं.
 |
सपाट डोंगरपठारावर चालताना |
एका ठिकाणी काही झुडुपात छोटी लाल फळं होती. पिकलेली लाल आणि कच्ची हिरवी. झुडुपाला गोलसर चमकदार पानं.
 |
फळं ... काही कच्ची काही पिकलेली |
अंकुश दादाने सकाळपासून दिसल्या त्या रानभाज्या दाखवल्या. कशाकशाची भाजी करून खातात. कशी लागते.
दुसरा सोपा पर्याय निवडल्यापासून पाऊण तासात देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. आजूबाजूच्या परिसरात फुलांची बहार. फुलांचे फोटो काढले.
 |
फुलांच्या राज्यात |
अंकुश दादा आणि शिल्पा ताईंच्या गप्पा होई पर्यंत मी आजूबाजूला फिरून वेगवेगळ्या प्रकारे फुलांचे फोटो काढले. तसंही माझा भूगोल कच्चा आहे. आणि भीमाशंकर परिसराबद्दल मला काही माहिती नाही. हा अमुक अमुक माळ, तो पलीकडचा भुताचा माळ, हि कोणती वाट, तो पलीकडे तमुक तमुक डोंगर. ह्या त्यांच्या गप्पा मला अनाकलनीय होत्या.
 |
मंदिर |
माझ्या रिझर्व्ह कोट्यातला थोडा सुकामेवा खाल्ला. अशा मोठ्या ट्रेकला गेल्यावर एक डबा सुकामेवा मी रिझर्व्ह कोट्यात ठेवतो. कधी अवघड प्रसंग आलाच तर भुकेने जीव जाणार नाही.
 |
फुलांचे ताटवे |
परत एकदा आजूबाजूला फिरून फुलांचे फोटो काढले. मग हा पंधरा मिनिटांचा ब्रेक संपवून आंबेनळी घाटाच्या दिशेने निघालो. सव्वा चार होत होते. आम्ही वेळेत होतो.
 |
झाडांच्या परिसरातून जाताना |
दिवस कलल्यावर आता उन्हाचा त्रास होत नव्हता. उन्हाची जागा आता थकव्यानी घेतली होती.
 |
सपाट पसरलेला खडकाळ माळ |
साडेचारला पोहोचलो आंबेनळी घाट जिथे सुरु होतो तिथे. मंदिरापासून इथपर्यंतची ही पंधरा मिनिटही मला बरीच मोठी वाटली. थकव्यामुळे. हनुमान तलाव आणि नागफणी बघायला गेलेले चार सह्यमित्र यायला वेळ होता.
 |
भीमाशंकर परिसरातल्या घाटवाटांची अनभिषिक्त सम्राज्ञी शिल्पा बडवे |
गवतात आडवा होऊन मी अर्धा तास झोप काढली. जंगलातला हा निजेला धोंडा काय वर्णावा. शांत निश्चिन्त झोप.
हनुमान तलावाला भेट दिल्यानंतर नागफणी वेळेअभावी रद्द करून आमचे चौघे सह्यमित्र पळत इथपर्यंत आले. चालत आले असते तर उशीर झाला असता. अंधार व्हायच्या आधी आंबेनळी घाट उतरून राजपे गावात पोहोचायचं होतं.
भीमाशंकर परिसरात सदाहरित, निम-पानझडी, आणि पानझडी अशा तीनही प्रकारची झाडं आहेत. अनेक औषधी वनस्पती व वृक्ष आहेत. विविध फुलपाखरं, कीटक, पक्षी आहेत. साप, बेडूक, खेकडे, शेकरू खार, बिबट्या, सांबर, जंगली डुकरं आहेत. अशी मोजदाद करायला गेलो तर वेळ अपुरा पडायचा. फक्त भीमाशंकर मंदिराच्या परिसरात भाविकांनी केलेला अतोनात कचरा हा इथला शाप. इथे फिरताना कचरा दिसायला लागला कि समजायचं भीमाशंकर मंदिर जवळ आलंय. जितकं मंदिराच्या जवळ जाऊ तितका कचरा वाढत जातो. असा कचरा करून कोणता देव प्रसन्न होतोय.
स्वप्नील आणि मंदार आजची हकीगत सांगत होते. एका ठिकाणी पन्नास एक साऊथ इंडियन पिंड दानाला जमले होते. नदीच्या परिसरात त्यांनी अखंड कचरा केलेला. असा कचरा केला तर कसलेही पुण्य पदरात पडत नाही. पूर्वज कोप पावतात. जोपर्यंत कचरा करणारे परत येऊन केलेला सर्व कचरा स्वतः साफ करत नाहीत तोपर्यंत ते कोपलेले भरकटत राहतात.
त्यांचं जाऊ दे. आम्ही सात जण आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो.
 |
आंबेनळी घाट उतरायच्या आधी दूरवर पाहिलेला पदरगड |
अंधार पडायच्या आत आंबेनळी घाट उतरून राजपे गावात पोहोचायचे होते. सर्व भिडू उत्तम ट्रेकर असल्यामुळे अंधार पडला तरी धोका असा नव्हता.
डोंगरातल्या एका घळीमधून वाट उतरत गेलेली.
 |
गर्द झुडुपांमधून उतरत गेलेली वाट |
सुरुवातीला गर्द झुडुपांमधून उतरत गेलेली अरुंद वाट. पाच मिनिटात झुडुपं कमी
होत गेली आणि त्यांची जागा मोठमोठ्या दगड धोंड्यांनी घेतली. अधे मधे मध्यम
आकाराची झाडं. काही वेळा डोंगरात घुमलेला वानरांचा हुप्प आवाज ऐकू आला.
चढताना जशी पायात ताकद लागते तशी उतरताना फारशी लागत नाही. उतरताना शरीराचा तोल सांभाळण्याचे कसब लागते. मोठमोठ्या दगड धोंड्यातून उतरताना पूर्ण अंगाचा व्यायाम होत होता. आता आमचं एकच ध्येय होतं - अंधार पडायच्या आत घाट उतरून गावात पोहोचायचं.
स्वप्नील एका ठिकाणी कड्यावर पुढे जाऊन सूर्यास्ताचे फोटो काढून आला. निसर्गात फिरावं तर असं. शंभर टक्के जिथे आहे तिथे. सगळ्याचा आस्वाद घेत.
 |
आंबेनळी घाट |
मोठमोठ्या दगड धोंड्यातून वाट काढत जाताना सावधगिरी बाळगावी लागते. आणि ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात थकव्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
हे मोठे दगड धोंडे संध्याकाळच्या वेळी पण अंगातून घाम काढत होते. स्वप्नीलने म्हटल्याप्रमाणे दिवसभरात प्रत्येकाच्या अंगातून बादलीभर घाम गळाला असेल. बरोबर असलेले पाणी जपून वापरायचे होते. थोडा रिझर्व्ह कोटा शेवटपर्यंत असावा.
किती उतरलो तरी वाट काही संपेना. लहू आणि भरत पुढे निघून गेले. आम्ही बाकीचे पाच जण जमेल तसे उतरत होतो. फार घाई करून पण उपयोग नव्हता. सावधगिरीने उतरणे योग्य.
हळू हळू अंधार पडत गेला. अंधारामुळे आमचा वेग आणखी मंदावला. थकवा तर होताच. आंबेनळी घाट उतरून राजपे गावात पोहोचणे हि आमच्या संयमाची आणि चिवटपणाची आजची कठीण परीक्षा होती. अंधारात पायाखालची वाट नीट दिसेना. उजव्या बाजूला दरी. एक माणूस जाईल इतकीच वाट. अधे मधे मातीमुळे घसरडी. काही अवघड ठिकाणी मी बसून घसपटत उतरलो. पूर्ण अंधार पडल्यावर नेहमीप्रमाणे माझा हेड टॉर्च कामी आला. हेड टॉर्च डोक्यावर न लावता हातात धरून चाललो. हेड टॉर्च डोक्यावर लावला तर त्याच्या भोवती गोळा झालेल्या किड्यांचा त्रास होत होता.
राजपे गावात पोहोचलो तेव्हा ड्रायव्हर काका गप्पा ठोकत आमची वाट बघत बसलेले होते. अंकुश दादाच्या घराच्या ओसरीत बसून चहा घेतला. बूट काढून साफ केले. तोंड धुतलं. आम्ही चार जण थकलेले. तर अंकुश, लहू, आणि भरत आत्ताही ताजे टवटवीत. आमच्यासाठी जो अवघड ट्रेक होता तो ह्यांचा दिवसभराचा पोरखेळ होता. अंकुश दादाने काहीही मानधन घ्यायला स्पष्ट नकार दिला. सह्याद्रीतल्या अशा छोट्या गावात पाड्यात जिथे शहरीपणा दूरदूर पर्यंत सापडत नाही तिथे माणुसकी आणि आपुलकी मात्र भरभरून मिळते. पैशात सगळं काही मोजता येत नाही हो. थोड्या गप्पा टप्पा करून निघालो.
काकांनी आम्हाला कर्जत स्टेशन समोर सोडले. भुकेची जाणीव झाल्यामुळे त्यावर उपाय शोधला. एका छोट्याश्या हॉटेलात प्रत्येकी एक प्लेट इडली. मग कर्जत स्टेशनात शिरून तिकीट काढले. शिल्पा आणि मंदार मुंबईच्या दिशेने गेले. पुण्याला जाणारी ट्रेन आल्यावर स्वप्नील आणि मी त्यात चढलो. चढताना दारात फार मारामारी नव्हती. पण आत गेल्यावर डब्यात तुडुंब गर्दी. हि चेन्नईला जाणारी लांब पल्ल्याची ट्रेन होती. डब्यात काही लांब पल्ल्याचे तर काही पुण्याला जाणारे प्रवासी. एक दीड शहाणा माजोरा मराठी माणूस समोर बसलेल्यांबरोबर भलत्या बाता मारत होता. तासाभराच्या वाचाळगिरीत त्याने दुनियाभराच्या जाती काढल्या. पण आपण त्याची जात नको काढायला. त्याला आपण एक दीड शहाणा माजोरा मराठी माणूस म्हणूया. त्याच्या बाता ऐकायला त्याला समोर एक प्रेक्षक मिळालेला. त्याच्या बातांनी माझी करमणूक झाली. तेवढाच कंटाळवाण्या प्रवासात विरंगुळा. पुणे स्टेशन आल्यावर आम्ही उतरण्याच्या आधीच वर चढणाऱ्यांची दारात झुंबड. मागच्या रेट्याने उड्या टाकून उतरलो. बॅटरी संपल्याने माझा फोन बंद झाला होता. स्वप्नीलने त्याच्या फोन मधून मला ओला ऑटो करून दिली. घरी पोहोचायला बारा वाजून गेले होते.
ह्या सव्वीस तासात ट्रेकिंग नावाने ओळखल्या जाणाऱ्या बिनभिंतीच्या शाळेमधले एकाहून एक उत्कृष्ट धडे मिळाले. एकमेकाला समजून घेणाऱ्या सवंगड्यांबरोबर केलेली हि दिवसभराची सह्य भटकंती जशी केली तशी शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न. गोड मानून घ्यावा. असा अफाट अप्रतिम अनुभव तुम्हालाही मिळावा हि प्रार्थना. पण त्यासाठी स्वतःचा कंफर्ट झोन सोडून बाहेर पडावे लागते.