Saturday, August 26, 2017

भूषणगड आणि वैराटगड

शुक्रवारच्या सुट्टीच्या दिवशी (श्रीगणेश चतुर्थी, २५ ऑगस्ट २०१७) श्रीगणेशाच्या कृपेने आमची सातारा प्रांतावर स्वारी यशस्वी झाली.  त्याचा हा इतिवृत्तांत.

टोळके
१. बिकाश हजारिका
२. प्रयास गुप्ता
३. योगेश सावंत

बिकाश हा आसामी (म्हणजे आसामचा) ऑफिसच्या लंचमध्ये माझ्याशेजारी बसला होता.  माझ्या ट्रेकच्या बाता ऐकुन ह्यालाही ट्रेकला यायचंय म्हणाला.  त्याच्याशी बोलुन जरा चाचपणी केली.  गाडी आमच्या ट्रॅकवर चालायला ठीकठाक होती.  कुठे जायचंय कसं जायचंय वगैरे त्याला थोडक्यात सांगितलं.
दणकट जवान प्रयास कुठेही जायला तयारच असतो.  कधीच कुरकुरत नाही.  सकाळी सहाला निघून वाटेत ब्रेकफास्ट, आधी भूषणगड आणि नंतर वैराटगड असा बेत ठरवला.  माझ्याबरोबर एक भरवश्याचा भिडू आणि एक नवीन भिडू. एक पाहिलेला गड आणि एक नवीन गड.  खिचडी चांगली पकणार असं दिसत होतं.

दोन्ही प्राणी माझ्या सोसायटी पर्यंत येऊन आम्हाला निघायला सात वाजले.  मुंबई बंगलोर हायवे वरचे ट्रॅफिक पाहुन विचारात पडलो - भूषणगड आणि वैराटगड दोन्ही होतील का आज.  का फक्त वैराटगड करायचा, का वैराटगड आणि पांडवगड करायचे, का वैराटगड आणि रायरेश्वर करायचे, वगैरे वगैरे.  तासभर विचार विमर्श करून निर्णय घेण्यात आला - "भूषणगड आणि वैराटगड" हाच प्लॅन ठरल्याप्रमाणे करू.  वेळेचं आणि ट्रॅफिकचं बघुया कसं जमतंय ते.

सुरूर फाटा सोडल्यावर ट्रॅफिक जरा कमी झाले.  ठरल्याप्रमाणे हॉटेल स्माईल स्टोन ला ब्रेकफास्ट साठी थांबलो.  तोपर्यंत पोटातल्या कावळ्यांना खजूर आणि खारका खायला दिल्या.  पोटोबा भरल्यावर गप्पांची गाडी रुळावर आली.  साताऱ्यात लेफ्ट टर्न मारल्यानंतर सगळं ट्रॅफिक गायब.  रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेतं.  गावकऱ्यांची लगबग चाललेली बाप्पांच्या आगमनासाठी.  बरेचजण बाप्पांना घेऊन बाइकवरून चाललेले.  काही बाइक्सवर दोन गावकरी आणि दोन बाप्पा.  थोडावेळ प्रयासने गाडी चालवली.  मग बिकाश (म्हणजे आसामचा विकास) ने गाडी जी काही उडवली, प्रयास आणि मी जीव मुठीत धरून बसलो होतो.  सातारा रहिमतपूर रस्त्याला सहाव्या गियर मध्ये!

कसे गेलो भूषणगडा पर्यंत
पुण्याहून साताऱ्याला गेल्यावर फ्लायओव्हर न घेता डावीकडचा सर्विस रोड पकडुन तिथुन रहिमतपूरकडे जाणारा लेफ्टचा रस्ता पकडला.  रहिमतपूरहुन पुढे गेलो औंध पर्यंत.  औंधहुन पळशीचा रस्ता पकडला.  आता भूषणगड लांबवर दिसायला लागला.  ह्या परिसरात हा एकमेव डोंगर आहे हे इंटरनेटवर वाचले होते.  त्यामुळे डोंगराच्या दिशेने जात राहिलो.

जवळ पोहोचल्यावर रस्त्यावरून दिसणारा भूषणगड

अशा प्रकारे गूगल मॅप आणि गावकऱ्यांच्या साहाय्याने भूषणगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.  गाड्या लावायला भलीमोट्ठी पार्किंगची जागा बनवलेली आहे.  का ते नंतर समजलं.  हा गड कमी आणि देवीचं श्रद्धास्थान जास्त आहे.  नवरात्र किंवा इतर उत्सवांमध्ये हे पार्किंग फुल्ल होत असेल.  आज फक्त आमचीच गाडी होति.


पायथ्यापासुन दिसणारा भूषणगड
 
गडावर आम्ही तीनच ट्रेकर होतो.  बाकी काही देवीच्या दर्शनाला आलेले भाविक.  पार्किंग पासुन वीसेक मिनिटात गडावर पोहोचलो.  खालपासुन वरपर्यंत सोप्या पायऱ्या आहेत.  एवढ्या लांब इथवर कशाला आलो असे झाले.  गड छोटा आहे हे इंटरनेटवर वाचले होते, पण इतका छोटा... ह्यापेक्षा घोराडेश्वरचा डोंगर मोठा आहे माझा हिल रनिंगचा.

भूषणगडावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या


पुण्यनगरीच्या ट्रेकर्ससाठी सावधानतेचा इशारा - हा फारच छोटा किल्ला आहे.  पुण्याहून साडेतीन चार तासांचं ट्रॅफिक झेलत इथवर आलात तर भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे.  जवळपास कुठे आला असलात आणि दोनेक तास वेळ असेल तर जा इथे.
किंवा आम्ही बनवला तसा प्लॅन बनवा - भूषणगडाबरोबर आणखी एक किंवा दोन गड करा.

भूषणगडाच्या दरवाजाचा approach

पायऱ्या चढून गेल्यावर दरवाजा डाव्या बाजुला आहे.  दरवाजाच्या दोन्ही बाजुला बुरुज आहेत.  आतमध्ये दोन्ही बाजुला पहारेकर्यांसाठी छोट्याश्या देवड्या आहेत.  सुरक्षेच्या दृष्टीने हि सगळी व्यवस्था.  दरवाजाची कमान तुटलेली आहे.

भूषणगडाच्या दरवाज्यात उभारलेला माझा मित्र प्रयास गुप्ता.  दरवाजाची कमान तुटलेली आहे.

गडावर पोहोचल्यावर आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली.  गडाची तटबंदी काही ठिकाणी व्यवस्थित आहे आणि
बरीचशी ढासळलेली आहे.  भन्नाट वाऱ्यात बसायला मजा आली.  पाऊस नसल्यामुळे गडावरून आजुबाजुचा परिसर व्यवस्थित दिसत होता.  रस्ते, शेतं, शेतीच्या पाण्याचे कॅनॉल, झाडं, हिरव्यागार मोकळ्या जागा, भूषणगडवाडीमधली घरं.

भूषणगडावरून दिसणारे परिसराचे विहंगम दृश्य

गडावर एक मोठी चौकोनी विहीर आहे.  विहिरीत घाणेरडे पाणी, कचरा, आणि वास पुरेपूर होता.  कचऱ्याची allergy असल्यामुळे मि तिथून पळ काढला.  गडावर पण कचरा भरपूर आहे.  पायथ्यापासुन देवीच्या देवळापर्यंत आणि आसपासच्या परिसरात प्लास्टिक कचरा आहे.  देवळापासुन लांबच्या परिसरात कचरा नावालाच कुठेतरी.  एकंदरीत भूषणगडाला भेट देऊन प्लास्टिक कचऱ्याची समस्या किती गंभीर झालेली आहे त्याची जाणीव झाली.

गडावरून खाली उतरायला पंधरा मिनिटे पुरे झाली.  सोप्या पायऱ्या असल्यामुळे घसरण्याचा काही प्रश्न नाही.

आता वैराटगडाकडे कूच केले.  जेवणाची वेळ झालेली होति. पण आता जेवलो असतो तर वैराटगड खालीच राहिला असता.  वैराटगड करून मगच जेवायचे ठरवले.  गाडी मि घेतली आणि चाळीसच्या स्पीडने रमतगमत निघालो.  भजीचं दुकान आणि वडापावची गाडी बघुन प्रयासला थांबायचं होतं.  हे healthy नाहीये असं त्याला सांगुन गाडी पळवली.  मि आणलेले ड्रायफ्रुटस त्याला खायला दिले.
रस्त्यात एक सूर्यफुलांचे शेत दिसले.  त्याच्यात शिरून फोटो काढले.  रस्त्यावर बसुन फोटो काढले.  सहाव्या गियरमध्ये रामटवर जाण्यापेक्षा हे किती छान.  स्पीड जितका कमी तितका आजुबाजुचा परिसर अधिक चांगल्या प्रकारे दिसतो.

सूर्यफुलांच्या शेतात शिरून फोटोग्राफी.  शेतातली रोपे तुडवली जाणार नाहीत असे बघुनच आम्ही चाललो


आजुबाजुला विंडमिल्स दिसत होत्या.  एखाद्या विंडमिलला भेट द्यायचा विचार होता.  मि गूगल मॅप मध्ये बघुन किंवा गावकऱ्यांना विचारून रस्ता शोधलाही असता, पण मीच गाडी चालवत असल्यामुळे ते काही झाले नाही.

मधेच कधीतरी विकासने आत्तापर्यंत किती कॅलरीज बर्न झाल्या ते सांगितले.  आम्ही चावी फिरवल्यावर जिम मध्ये कोणता एक्सरसाईझ किती वेळ केल्यावर किती कॅलरीज बर्न होतात ते पण सांगितले.  नंतर आम्ही त्याला लक्षात येणार नाही अशा प्रकारे "कॅलरी बर्निंग" ह्या विषयावर त्याची खेचली.

आल्या रस्त्यानेच साताऱ्याला पोहोचुन पुण्याकडे जाणारा रस्ता पकडला.  वैराटगडाकडे जाणारा लेफ्ट टर्न मला माहिती होता.  वैराटगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचायला दोन तास लागले.  मि आधी एकदा गेलेलो असल्यामुळे रस्ता मला माहित होता.  मधे थोडा वेळ प्रयासने गाडी चालवली.  विकासचं हॉरीबल ड्रायविंग बघुन त्याला परत गाडी दिलीच नाही.

कसे पोहोचलो वैराटगडावर
मुंबई बंगलोर हायवेवर साताऱ्याकडुन आल्यावर पाचवड गावात लेफ्ट टर्न घेतला.  २.६ किलोमीटर सरळ जाऊन मग उजवीकडे वळलो.  १.३ किलोमीटर सरळ गेल्यावर Y जंकशन येते.  डावीकडचा रस्ता गावात जातो.   तिकडे न जाता उजवीकडचा रस्ता घेतला.  थोडे पुढे गेल्यावर योग्य जागा बघुन गाडी पार्क केली - P.  तिथुन चालायला सुरुवात केली.

वैराटगडाच्या पायथ्याशी गाडी लाऊन सामानाची आवराआवर झाली.  विकासने पॅन्ट बदलली.  तिघांनी झाडांना पाणी घातले.  भूषणगड हा फुसका बार होता, वैराटगड हे खरे ट्रेकिंग आहे ह्याची योग्य कल्पना प्रयास आणि विकास ह्यांना दिली.  रिकामा ओढा पार करून पायवाटेने जायला सुरुवात केली.  गावातले चार पाच जण वेगवेगळ्या ठिकाणी गुरं चरायला आलेले होते.  त्यांना Hi Hello करून पुढे निघालो.

वैराटगडावर जाणाऱ्या वाटेवर प्रयास आणि विशाल.  दूरवर दिसणारा वैराटगड

मागच्या वेळी संदीप बझारने जोशात येऊन पायवाट सोडली आणि झाडाझुडूपातली वाट पकडली होति.  ह्यावेळी मि व्यवस्थित बघत पायवाट बिलकुल सोडली नाही.  सुरुवातीचा दगड धोंड्यातला चढ जीव काढतो.  प्रयास आणि विकास बऱ्याच वेळेला बसले.  दोघांना धीराने वरपर्यंत घेऊन गेलो.
तीनला निघुन चारच्या आधी आम्ही गडावर होतो.  हा जबरदस्त परफॉर्मन्स थोडासा अनएक्सपेक्टड होता - पोटात कावळे कोकलत असताना.  अंधार पडायच्या आत परत खाली पोहोचायचा धोका आता टळला होता.  पाऊस पण नव्हता.

नेहमीप्रमाणे जागा शोधून मि माझ्या आवडत्या पोझमधे फोटो काढला

वरच्या पठारावर पोहोचल्यावर डावीकडुन फिरायला सुरुवात केली.  गडाची तटबंदी व्यवस्थित आहे.  एखाद्याच ठिकाणी पडझड झालेली आहे.  सप्टेंबर यायला अवकाश आहे, पण गुलाबी लाल पिवळ्या फुलांची सुरुवात झालेली दिसली.  गडावरून चहुबाजुंनी दिसणारं नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत गडाची फेरी पूर्ण केली.  ढगाळलेलं आकाश, आजुबाजुच्या गावातली ठिपक्याएवढी घरं, शेतं, झाडं, हिरव्यागार मोकळ्या जागा, छोटे मोठे डोंगर.

वैराटगडावरून दिसणारे परिसराचे विहंगम दृश्य

पूर्ण गडावर आम्ही तिघंच होतो.  गर्दीच्या जागा टाळून केलेली अशी मनमोकळी भटकंती मला फार आवडते.

वैराटगडावर एक दिवसाचा किल्लेदार प्रयास गुप्ता

 निघताना हलकासा पाऊस सुरु झाला.  हळुहळु उतरायला सुरुवात केली.  उतरताना घसरू नये म्हणून काय काळजी घ्यायची ते विकास आणि प्रयासला सांगितले.  लांब पायाचा प्रयास चांगला उतरत होता.  जवळच्या गावातली काही मुलं, माणसं चढताना भेटली.
उतरून Night Fury (म्हणजे Nissan Terrano) पाशी पोहोचलो.  पाच वाजायला आले असतील.  प्रयास आता भूक भूक करायला लागला.  विकास चांगला तग धरून राहिला.  म्हणजे सध्या average असला तरी कोणे एके काळी हा चांगला मजबूत असणार.

मुंबई बंगलोर हायवे लागताच veg हॉटेल शोधायला लागलो. पहिल्या veg हॉटेलला प्रयासने नाक मुरडले.  दुसऱ्यालाही त्याचे तेच.  पण मि थांबलोच.  श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सर्व हॉटेलवाले एकतर धंदा सोडून निवांत बसलेले किंवा बाप्पांच्या आगमनात गर्क.  Prompt service आज कुठेच मिळणार नव्हती.  हॉटेलवाल्यांनी जेवण द्यायला जेवढा वेळ लावला तितकाच मि जेवायला लावला.

श्रींच्या कृपेने रस्त्याला फारसं ट्रॅफिक नव्हतं.  नाहीतर संध्याकाळी ह्या रस्त्यानी पुण्यात यायचे म्हणजे ट्रॅफिकने जीव जातो.  मजल दरमजल करत नऊ वाजता घरी पोहोचलो.  थकल्यामुळे लवकर झोपलो.  उद्या सकाळच्या फुटबॉलची तयारी उद्या सकाळी उठल्यावरच.

No comments:

Post a Comment